रोबोटस आणि कॉबोटस
रोबोटीक्स म्हणजे काय? रोबोटीक्स ही इंजिनयरिंगची एक ब्रँच आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल, मॅकनिकल आणि कॉम्पुटर इंजिनियरिंगचा उपयोग करुन एक मशीन बनविली जाते जी प्रोग्रॅमिंगच्या सहाय्याने ठराविक कार्य करू शकते. मानवी शरीराची संरचनेचा अभ्यास करूनच मानवासारखी निर्जीव मशीनला 'ह्युमोनाईड रोबोट' म्हणतात. एखादं कार्य रोबोट पार पाडत असेल याचा अर्थ तो मानवीय रोबोटच असतो असे नाही. एखादी 'यांत्रिक आर्म' प्रोग्रॅमिंग करुन ठराविक कार्य पार पाडत असेल तर त्या छोटया यंत्राला सुद्धा रोबोट असेच म्हणतात.
रोबोट हा शब्द रोबोटा पासून आला आहे ज्याचा अर्थ होतो 'फोर्स्ड वर्क'. रोबोट मशीन एखाद्या मानवाप्रमाणे कार्य करत असते. मनुष्य शरीरात पाच इंद्रिये असतात जसेकी नाक, कान, डोळे, जीभ आणि जीभ. इंद्रियाकडची संवेदना आपल्या ब्रेनकडे जाते, ब्रेनमध्ये ती प्रोसेस होऊन आपन त्यानुसार हालचाल करत असतो. रोबोट्समध्ये सुद्धा असंच घडतं. त्यासाठी रोबोट मशीनला आसपास काय घडत आहे हे सेन्स करण्यासाठी अनेक सेन्सर्स लावलेले असतात. सेन्सर हा रोबोटचा इलेक्ट्रिकल पार्ट झाला. सेन्सर सेन्स करुन सिग्नल प्रोसेसरला पाठवितात. उदाहरणार्थ, रोबोटला जोडलेला कॅमेरा सभोवतालाचे चित्र स्कॅनकरुन तो कॉम्पुटर प्रोसेसरला पाठवितो. एलडिआर (लाईट डिपेंडन्ट रेजिस्टर) जोडलेलं असेल तर तो प्रकाशाला सेन्स करुन त्याचं रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करुन ते सिग्नल प्रोसेसरला पाठवेल.
कॉम्पुटर प्रोसेसिंग हा रोबोटचा दुसरा पार्ट आहे. सेन्सरने पाठविलेले सिग्नल रोबोटचा मायक्रोकंट्रोलर प्रोसेसर प्रोसेस करतो. कॉम्पुटरने प्रोसेस केलेले सिग्नलचा इलेक्ट्रिक सिग्नल आऊटपुट रोबोटच्या आर्मला दिलं असल्यास तो आर्म काम करणार. हा रोबोटचा तिसरा भाग म्हणजेच मॅकेनिकल इंजिनियरिंग होय. जर प्रोसेसरच्या आउटपुटला मोटर किंवा इतर मॅकनिकल पार्ट जोडलेला असेल तर तो रोबोटचा पार्ट ठराविक दिशेला हालचाल करणार. एकूण रोबोट्सची रचना ही मानवी शरीराचा अभ्यास करूनच तयार केलेली आहे. सेन्सरी अवयवा(ज्ञानेद्रीय) च काम सेन्सर, ब्रेनच काम मायक्रोकंट्रोलर तर मानवासारख्या हालचालीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोटार, ग्रीपर वापरले जातात.
प्राचिन काळी विज्ञान प्रगत नव्हतं तेंव्हा किती तरी वर्षे मानवजात चुंबकाची पूजा करायची. लोखंड जवळ नेताच हा चुंबक त्यास खायाला उठतो. अर्थात त्यामध्ये आत्मा आहे, असं समजून त्याची पूजा व्हायची. कालांतराने त्यावर संशोधन झालं आणि तो सुद्धा चुंबकीय गुणधर्म असलेला एक धातू आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. चुबंकाचा शोध मानवजातीसाठी हे मोठं आश्चर्य होतं.
एके काळी बसस्टॅन्ड रेल्वेस्टेशनवर रोबोटसारखा दिसणारा मोठा वजनकाटा असायचा. त्या वजनकाट्यावर उभे राहून एक रुपयाचा शिक्का टाकला की ती मशीन थोडं आवाज करुन आपल्या वजनाच लिखित कार्ड आपल्याला दयायची. हे सर्व ऑटोमॅटिक व्हायचं. हे बघून सर्वांना खूप आश्चर्य वाटायचं. पण डिजिटल क्षेत्रात झालेल्या प्रगतीमूळे रोबोटीक्स तंत्रज्ञान खुपचं विकसित झालं आहे. हुबेहूब मानवासारखा दिसणारा रोबोट्स सर्वच क्षेत्रात काम करतांना दिसत आहे. रोबोटीक्स तंत्रज्ञानाचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात उत्पादन, क्वालिटी कंट्रोल, ट्रान्सपोर्टेशन तसेच वैद्यकीय क्षेत्रात सर्जरी करण्यासाठी, हॉटेल्स मध्ये फूड सर्व्ह करण्यासाठी, कार्यशाळेत शिकविण्यासाठी होत आहे. मानवीय शरीराला काम करण्याच्या मर्यादा असतात पण निर्जीव रोबोट्स न थकता किती तरी तास काम करू शकतो. विशेष म्हणजे जिथे जोखीम आहे अशा ठिकानासाठी रोबोट हे वरदान आहे.
आयझक असिमो, या अमेरिकन वैज्ञानिकाला प्रथम रोबोट ही कल्पना सुचली. पहिला रोबोट हा सन १९५० मध्ये जॉर्ज सी डिवोलने प्रथम प्रोग्रॅमेबल रोबोटची निर्मिती केली होती. युनिमेट असं त्याचं नाव होतं. नंतर जोसेफ अँगलबर्गरने जॉर्ज डिवोलच्या रोबोटमध्ये बदल करुन त्याचं पेटेन्ट मिळविलं. त्यांनी युनिमेशन नावाची कपंनी स्थापन करुन प्रथमचं 'प्रोग्रामेबल' रोबोटच उत्पादन सुरु केलं. त्यामुळेच अँगलबर्गरला 'फादर ऑफ रोबोटीक्स' असे म्हणतात. कालांतराने इलेक्ट्रिकल, मॅकेनिल आणि कॉम्पुटर क्षेत्र प्रचंड विकसित झालं. त्यानुसार रोबोटीक्स तंत्रज्ञानसुद्धा बदल घडले. वर्षे १९६१ मध्ये जनरल मोटार कंपनीमध्ये प्रथमचं इंजेक्शन मोल्डिंग उद्योगात रोबोट्सचा उपयोग करण्यात आला. १९७३ मध्ये फोक्सवॉगन या जर्मन कपंनीने वाहन उत्पादन उद्योगात रोबोट्सचा उपयोग केला. रोबोटीक्स तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग(एमएल)ची जोड मिळाल्यामुळे मूळे मानवासारखा हुबेहूब दिसणारा रोबोट्स इतरांशी संवाद साधताना दिसत आहे.
कोबोट्स:
कोबोट्स म्हणजे कॉलॅब्रोटीव्ही रोबोटस. हा रोबोट्स मानवाच्या जोडीने किंवा सोबत काम करत असल्यामुळे त्यास कॉलॅब्रोटीव्ही रोबोट्स असे म्हणतात. हल्ली उद्योग क्षेत्रात पारंपारिक रोबोट्सच्या जागी कॉलॅब्रोटीव्ही रोबोट्सचा उपयोग वाढत आहे. हा रोबोट्स मानवाच्या सोबत काम करत असल्यामुळे त्यास कॉलॅब्रोटीव्ही रोबोट्स असे म्हणतात. त्याचा आकार तुलनेने छोटा आणि गरजेनुसार या कोबोट्सचं प्रोग्रॅमिंग बदलून तो वापरल्या जातो. उद्योग क्षेत्रात कोबोट्स कामगारसोबत एक मदतनीस म्हणून काम करत असल्याने उत्पादनाला गती मिळून उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.
इंडस्ट्रियल रोबोट :
औद्योगिक उत्पादन क्षेत्रात प्रॉडक्शन लाईनवर काम करणारे रोबोट्स आपण बघत असतो. प्रोग्रॅमिंग करुन ठरवून दिलेले एक काम ते अविरत करत असतात. हे रोबोट्स म्हणजे एक रोबोटीक आर्म, ग्रीपर, काही सेन्सर्स आणि त्याला नियंत्रित करणार कंट्रोल युनिट. प्रोग्रॅमिंगनुसार हे रोबोट्स ऑटोमॅटिकली दिलेलं काम करत असतो. मागील काही वर्षात जगात इंडस्ट्रियल रोबोट्स प्रमाण खूप वाढलं असून युरोपमध्ये ऍव्हरेज रोबोट डेन्सीटी ९९, अमेरिकेत ८४ तर आशियायी देशात ६३ आहे. इंटरनेशनल फेडेरेशन ऑफ रोबोटीक्स नुसार वर्षे २०१६ पर्यंत जगात दोन लक्ष नव्वद हजार इंडस्ट्रियल रोबोट्स काम करत होते. वर्षे २०१५ च्या तुलनेत ही संख्या १४ टक्क्यानी जास्त होती. दर वर्षी साधारण १२ % नी रोबोट्स संख्या वाढत आहे.
ऑटोमॅटेड गायडेड वेहिकलं:
सर्विस रोबोट्स :
हल्ली हॉस्पिटल्स व रेस्टॉरंटमध्ये सेवा देण्यासाठी रोबोट्सचा उपयोग होत आहे. घरभर फिरून घर स्वच्छ करणारा रोबोट आपण जाहिरातीत बघत असतो. हल्ली लॉन क्लिनिंग, व्हक्युम क्लिनिंग सारख्या कामासाठी रोबोटचा सर्रास उपयोग होत आहे. त्यामुळे वेळेची बचत होत आहे.
टॉय रोबोट्स :
वर्ष २००६ मध्ये जग विख्यात इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनीने प्रथमचं Aibo नावाच्या मनोरंजक रोबोट तयार केला होता. त्यानंतर मुलांमध्ये खेळता खेळता तंत्रज्ञान आणि प्रोग्रॅमिंग विषयी जागृती निर्माण यासाठी किती तरी टॉय रोबोटची निर्मिती झाली.
हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी :
वर्षे २०१८ मध्ये कोरियन इलेकट्रॉनिक्स कंपनी एलजीने प्रथमच सेवा पुरविणाऱ्या रोबोट तयार केला जो ग्राहकांना एखाद्या वेटरप्रमाणे सेवा देत होता.
सेक्युरिटी रोबोट्स :
राहिवासी किंवा कार्यालयीन सुरक्षेसाठी रोबोट्सचा उपयोग होत आहे. रोबोटला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्यामुळे घरातील हालचाली कॅमेरा आणि सेन्सर्सने टिपून रोबोट्स इंटरनेटद्वारे स्मार्टफोनवर मेसेज पाठवितो.
वैद्यकीय क्षेत्र :
अर्धांगवायूचा आघात झालेल्या रुग्णाच्या शारीरिक हालचालीला मर्यादा येतात. अशा रुग्णाची फिजिओथेरपी ट्रीटमेंट करण्यासाठी रोबोटचा उपयोग होतो. इक्सोस्केलटन अशा 'वियरेबल' रोबोटमध्ये रुग्णाचा पाय टाकून रोबोटद्वारे पायाची हालचाल वाढविण्यास मदत होते. येथे रोबोट थेरपीस्टसारखी सेवा देतो. हल्ली सांधे रिप्लेसमेन्ट सारख्या शस्त्रक्रियेत रोबोटचा उपयोग होत आहे. शस्त्रक्रिया करतांना निष्णात सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये रोबोटचा खुबीने उपयोग करत आहेत.
ह्युमोनाईड रोबोट्स :
हा हुबेहूब मनुष्य शरीरासारखा दिसणारा रोबोट असतो ज्याची हालचाल मानवी शरीरासारखी असते. अशा रोबोटला जेंव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त होते तेंव्हा तो मनुष्यासारखा चालतो (चाकावर) आणि बोलतोसुद्धा. अशाचं प्रकारचा रोबोट जर्मनीतील मुनीचविमानतळावर विमान प्रवाशांना मदत करत आहे. प्रवाशांनी फ्लाईटच्या वेळा, बोर्डिंग पास, सीट अलोकेशन सारख्या प्रश्नाची तो तंतोतंत उत्तर देत असतो. एआय तंत्रज्ञानामूळे तो प्रवाशासोबत बोलतांना सतत शिकत जातो.
रोबोटीक्स तंत्रज्ञानाच्या विकासामूळे कामगारांना बराच फायदा झाला. आता ते जोखमीचे काम टाळू शकतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अपघातात घट होत आहे. एकचं काम वारंवार करण्यासाठी स्किल वर्करची गरज नसते कारण अशी कामे रोबोटिक आर्मद्वारे अविरत करून घेता येतं. त्यामुळे उत्पादनात प्रचंड बदल होत आहे. अर्धांग वायू रुग्ण बरे करण्यासाठी रोबोट तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. रोबोटमूळे शस्त्रक्रियेची गुणवत्ता वाढून रुग्णांना फायदा होत आहे.
नवीन तंत्रज्ञानाचे जसे फायदे तसे तोटेसुद्धा असतात. रोबोटीक्स त्याला अपवाद नाही. भविष्यात रोबोट, एआय मिळून मानवाचा रोजगार तर कमी करणार नाही ना, अशी भिती व्यक्त होत आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती आपण थोपवू शकत नाही. मग त्यावर पर्याय काय? कामगारांच्या नोकरीत कपात होऊन त्याच्यावर बेरोजगार किंवा उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून परदेशात 'युनिवर्सल बेसिक इन्कम' सारख्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत कामगारांना मासिक आर्थिक मदत दिली जात असते. 'अति नको.! त्यामुळे आज गरज आहे अशा तंत्रज्ञानाच्या घोडदौडीवर वेळीच नियंत्रण ठेवण्याची!
© प्रेम जयस्वाल, छ संभाजीनगर
९८२२१०८७७५
No comments:
Post a Comment