शॉप, अप टु 50% ऑफ!
'नथिंग कम्स फ्री. नथिंग. नॉट इव्हन गुड. इस्पेशीअली नॉट गुड.'
हा एक सुंदर इंग्रजी सुविचार आहे. त्याचा अर्थ असा की 'फ्री काहीच मिळत नसतं. वस्तू तर नाहीच, आणि अगदी चांगली तर नाहीच' म्हणजे जगात काहीही मोफत मिळत नसतं. मिळालं तरी ते चांगलं नसतं. चांगल्या वस्तूसाठी चांगली किंमत मोजावीच लागते. मग असे असतानाही 50% ऑफच्या मौसममध्ये का बरे एव्हडी गर्दी ? हा यक्ष प्रश्न आहे. आणि याचंच उत्तर आपल्याला या लेखात मिळणार आहे.
सिझन सेल 50% ऑफ म्हणजेच चक्क अर्ध्या किमतीत खरेदी. ग्राहकांसाठी ही ऑफर म्हणजे एक पर्वणीच. हा एक खरेदीचा परमोच्च आनंद मिळवण्याचा काळ. मॉल संस्कृतीमध्ये हे दिवस एका उत्सवापेक्षा कमी नसतात. या ऑफरचीच तर खरेदीदार मोठया आतुरतेने वाट पाहत असतात. विंडो शॉपिंग करून आधीच त्याने ब्रँडविषयी सर्व माहिती संग्रहित केलेली असते. ब्रॅण्ड सिलेक्शन फिक्स झालंच असत. आता उरतं फक्त 50% ऑफचे डिस्प्ले बघून दनादन शॉपिंग करून अर्धे पैसे वाचवणं.
मॉल संस्कृती रुजू होण्याआधी लोक शहरातील दुकान किंवा काही मोठया शोरूममध्येच खरेदी करतं. काही मुंबईसारख्या मेट्रो शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये शॉपिंग मॉल होते पण तिथे हॉटेलमध्ये उतरणारा उच्च वर्गच शॉपिंग करत असे. मध्यमवर्गीय किंवा त्याखालील समाजाला त्याची माहिती नव्हती. शहरातील दुकाने आकाराने जरी मोठे असले तरी ब्रँडसाठी हवा असा 'प्रोफेशन्यालिझम' म्हणजे व्यवहारिकता त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे डिस्काउंट हा प्रकार खूपच कमी होता, किंबहुना ते देत नसतं. त्यामुळे ग्राहकाने काही सूट मागितली तर ' कुछ गुंजाईश नही, वाजवी भाव रखा है, भैया आप हमारे हरदमके कस्टम्बर आपको ज्यादा कैसे लगायेंगे किंवा आपसे ज्यादा नही लेंगे साहब' असं म्हणून आणि मग एकूण रकमेवरची चिल्लर माफ करून आपली बोळवण व्हायची. आनंद एव्हढाच कि चिल्लर माफ केली.
आजच्या वीस वर्षाआधी तयार कपड्याच्या बाजारामध्ये मोजकेच ब्रॅण्ड होते आणि अनब्रँडेडचा बाजार मोठा होता. टेलरकडून कपडे शिवून घेतले जायचे. काही छोटे उत्पादक कपडे तयार करून काहीतरी नाव देऊन विक्री करायचे. जे कपडे वर्षो न वर्ष विकले गेले नाही, डिफेक्टिव्ह असतील असे कपडे ते एका मोठ्या व्यापाऱ्यास ठोकने विकत असत. मग तो व्यापारी असे दुय्यम दर्जाचे कपडे शहरात एखादा हॉल भाड्याने घेऊन ३-४ दिवसाचा 50% ऑफचा सेल लावायचे. अशा हॉलमध्ये कपडे 'ट्रायल' करून बघण्याची मुभा नसायची. त्यामुळे एकदा कपडे घेतल्यानंतर काही त्रुटी निघाली तर 'आलिया भोगासी....' कारण एकदा घेतलेला माल परत करायची सोय नसायची.
मागील काही वर्षात भारतातील सर्व मोठया शहरात मॉल सुरु झाले. मॉलमधील ब्रॅण्ड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे त्यांना समाजातील विविध स्तर, त्याची आवड निवड, खरेदीचा पॅटर्न आणि मुख्य म्हणजे खरेदीची ताकतेचा अंदाज असतो. हे माहित करण्यासाठी त्यांच्याकडे तसा सांख्यिकी डाटाच असतो. तेंव्हा कोणत्या फॅशनची चलती आहे, कोणता पॅटर्न, कोणते साईज, कलरची चलती आहे हे ठरवूनच माल तयार करण्यात येतो. यदाकदाचीत हे गणित बिघडलं तर मोठा स्टॉक गोडाऊनमध्येच पडुन राहण्याची भिती असते.
ब्रॅण्ड मोठा असेल तर त्याचा देशभरातील पसारा खूप मोठा असतो. उत्पादन-निर्मितीचे कारखाने, गोडाऊन, वितरण व्यवस्थापन, सर्व मोठया शहरात कितीतरी फ्रनंझाईजी आऊटलेट, मॉल आउटलेट, प्रत्येक मॉलमध्ये मॅनेजरसह सेल्समन. याशिवाय वितरण टीम सह सर्वे टीम, जाहिरात आणि मार्केटिंग टीम. प्रत्येक ब्रॅण्डच्या प्रोडक्टचा एक प्रोडक्ट मॅनेजर असतो जो त्या प्रोडक्टचा सर्वेसर्वा असतो. उदा. रँग्लर जीन्स. मग रँग्लर जीन्सचा सध्या ट्रेंड कसा, त्याला निवडणारा वर्ग कोणता, त्याची किंमत किती असावी, स्पर्धकांच्या तुलनेत आपली जीन्स कशी आणि तो कोणत्या शहरातील आउटलेटमध्ये चालेल, हे सर्व तो ठरवत असतो. आपला ब्रँड ज्या ग्राहकांसाठी बनवला आहे त्यापर्यत पोहचण्यासाठी ती कंपनी खूप पब्लिसिटी आणि जाहिरात करत असते. मग त्याचे व्यवस्थित नियोजन करून वृत्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ, मॅगझीन, न्यूजआर्टिकल्ससह चित्रपट आणि सोशल मीडिया या मध्ये जाहिरात केली जाते. ब्रँड म्हंटल तर ग्राहक हा राजाचं, मग त्यासी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे वेगळा विभाग असतो. हा सर्व खर्च खूप मोठा असतो. एक ब्रॅण्ड, त्याच्या दिमतीला असलेली संबंधीत टीम आणि जाहिरात यामुळे ब्रँड महाग झालेला असतो. त्यामुळे ऑफर सोडता इतर काळात आहे त्या किमतीत त्यांना वस्तू विकणे भाग असते. मार्केटिंगचा भाग किंवा मागणी-पुरवठा याचे गणित चुकल्यामुळे अधून मधून, कधी उत्सवात छुटपुटं ऑफर येत असतात. पण त्या ग्राहकाला इतक्या आकर्षित करत नाहीत कि ज्यामुळे सेल वाढेल.
मॉलमध्ये फिरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या डोक्यात एक प्रश्न कायम घोळत असतो की एव्हड मोठं चकाचक एसी शोरूम, मॅनेजरसह आठ-दहा सेल्समन,आणि आत एकही ग्राहक नाही, मग या सेल्समनचा पगारखर्च, भाडे वजाकर्ता यांना नफा कसा होत असेन? थोडक्यात, त्यांना कसं परवडत असेल ? पण मी येथे सांगू इच्छितो कि हे सर्व खर्चाचे गणित गृहीत धरूनच त्यांनी ब्रॅण्डची किंमत ठरवलेली असते. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही.
ब्रँड हा ५०% ची ऑफर हे गृहीत धरूनच एमआरपी ठरवत असतो. तसेच संपूर्ण पैसे जाहिरातीत खर्च न करता थोडी ऑफर देऊन ब्रँड लोकापर्यंत पोहचावण्याचा कंपन्यांचा मानस असतो. असाच ब्रँड मोठा होतो आणि ऑफरमध्ये सेल होऊन कंपनीची गुंतवणूक मोकळी होते. उलाढाल वाढून नफा वाढतो. लोकांना सवय पडून ते ब्रॅण्डचे दिवाने होतात.
याशिवाय 50% ऑफचे इतरही अनेक फायदे कंपनीला होत असतात. बरेचसे न विकलेले आऊट ऑफ फॅशन, ऑड साईज तसेच ट्रायल व्हरजण कपडे ऑफरमध्ये खपवले जातात. काही लॉट एखाद्या आउटलेटमध्ये चालत नाही मग तो इतर ठिकाणी सेलमध्ये विकून कंपनी भांडवल मोकळ करून घेतात. शेवटी 50% ऑफर देऊनही जो माल विकल्या जात नाही तो 'ब्रँड फॅक्टरी' मध्ये समाविष्ट होतो. मग हि ब्रॅण्ड फॅक्टरी विविध ब्रँडचा माल 50-60% ऑफवर तो वर्षभर विकते. थोडक्यात काहीच शिल्लक राहत नाही.
मॉलमध्ये जास्तीत जास्त 50% ऑफचे डिस्प्ले हे 'अपटू 50% ऑफ' असे असतात. याचा अर्थ जास्तीत जास्त डिस्काउंट 50% . मग अशा डिस्काउंटचा बोर्डवर 50% खूप मोठ्या अक्षरात आणि ' अपटू' हे शब्द खूप पातळ कुपोषित फॉन्टमध्ये उभे लिहिलेले असते किंवा एका छोट्या साईझमध्ये आपले लक्ष न जावे असे छोटया अक्षरात लिहिलेले असते. हेतू असा कि 50% ऑफ बघून ग्राहक आत यावा, त्याने ऑफरचे काही कपडे बघावे, आवडले तर ठीक नाहीतर 'न्यू अरायवल' दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोतच. काही शोरूम फ्लॅट 50% असा मोठा फलक दर्शनी भागावर लावतात. आत नावाला २०-२५ गारमेंट फ्लॅट 50% वाले असतात. त्यापैकी एकही आपल्या साईजचा नसतो म्हणून ग्राहकांचा हिरमोड होतो. एमआरटीपीसी कायद्या अंतर्गत हा गुन्हा ठरू नये म्हणून त्यांना काही वस्तू ठेवणे आवश्यक असते. बाकी काही गारमेंटवर साधारण २०-३०% सूट असते. असाच काहीसा प्रकार मद्य विक्रते करत असतात. एका विदेशी मद्य विक्रेत्याने जाहिरात बंदी असतानाही दुकानावर 'स्मिरन ऑफ' असा मोठा बोर्ड लावून बारीक अक्षरात मिनरल वॉटर लिहिलं. 'स्मिरण ऑफ हा मद्याचा ब्रँड, त्याची जाहिरात करता येत नाही. एका अधिकाऱ्यानं चौकशी केल्यानंतर त्याने - हो आम्ही स्मिरन ऑफ मिनरल वॉटर विकतो म्हणनू १ बाटली 'स्मिरण ऑफ मिनरल वॉटर'ची आणून दाखवली! बाकी स्मिरण ऑफ वोडकाची विक्री जोरात होत होती.
ब्रँड कोण घेत? तयार कपडे असो का इतर वस्तू, मुळात ब्रॅण्डेड घेणारे दोन वर्ग असतात. तयार कपड्याचाच विचार केल्यास एक वर्ग ज्यांना ब्रॅण्डेड कपड्याची गुणवत्ता आवडते आणि दुसरा वर्ग म्हणजे फक्त 'टॅग'साठी ब्रँडेड कपडे विकत घेणारा. वय १६ ते २५ वयोगटातील मुलं दुसऱ्या वर्गात मोडतात. त्यांना टॅग दाखवून मित्रात मिरवायचं असतं. मटेरियल आणि डिझाईनशी काही घेणंदेणं नसतं. त्यामुळे ब्रॅण्डचा फायदा होतो. हे समीकरण खाद्य ब्रॅण्डलाही लागू होतं. 'मी बियिंग ह्यूमनचा टि-शर्ट घालून मित्रांसोबत ओलाने ओरबीट मॉलला गेलो, केएफसी मध्ये खालं, सीसीडी मध्ये कॉफी पिली आणि मित्राच्या फोक्सवॅगनने परत आलो', अशा 'ब्रँडेड चॅटिंग' करणे त्यांना 'कुल' वाटते.
तसा 50% ऑफचा फायदा अनेक लोक आपआपल्या परीने घेत असतात. मिक्स स्टॉक असल्यामुळे ही खरेदीचं तडजोडीची ठरते. पाहिजे ते डिझाईन, पॅटर्न, कलर आणि माप याचा मेळ लागणे कठीण होत. त्यामुळे अर्ध्या किमतीच्या खरेदी-दबाबासमोर कधी कधी निवड शरणागती पत्करते. मग शाळा-कॉलेजची 'यंग जनरेशन' एकदम टि-शर्टचा स्टॉक भरतात. महिला ग्राहकही सेल्समनला जास्त त्रास न देता थोडी तडजोड करून शॉपिंग करतात. काही भलतेच 'आशावादी' एक साईज कमीचे टि शर्ट-जीन्स आगाऊ घेऊन ठेवतात. काही दिवसांनी आपला वेटलॉस होऊन आपण स्लिम-ट्रिम दिसू अशी त्यांना आशा असते. पण असं काही घडत नाही, वजनकाटा हालत नाही, कपडे पडून राहतात. काहींना पर्यटन किंवा परदेशी गमन करायचं असतं. पाश्चिमात्य कपडे परिधान करून सेल्फीची हौस तिकडे पुरी होणार असते, म्हणून काही तशी खरेदी होते.
मॉलमधील 50% ऑफचा समाजातील गरीब बांधवानाही चांगला फायदा होत असतो. आवाक्यात नसणारे ब्रँड आता ते खरेदी करू शकतात. तेंव्हा आता तेही फॅशनच्या प्रवाहात येतात. 50% ऑफवर खरेदी करनं मात्र श्रीमंत उच्चवर्गासाठी अवघड काम असतं. 'लुकिंग गुड, लुकिंग बॅड' सांभाळण्यामध्ये त्यांचा बराच वेळ जात असतो. मोकळं चाकळ अस्सल जीवन जगणं त्यांना जमत नसतं. सायंकाळच्या 'पिक आवर्स' मध्ये शॉपिंगला गेलं तर खरेदी करताना आपलाच स्टाफ, पेशन्ट किंवा क्लायंट भेटून फोत्री होण्याची भिती असते. मग ते सकाळ किंवा भर दुपारची निवांत वेळ साधतात. अशाच एका सकाळी मी 50% ऑफमध्ये खरेदीस गेलो, तसं मी नेहमीच जात असतो. बिलिंग काउन्टरच्या रांगेमध्ये माझ्यासमोर एक ओळखीचे मोठे डॉक्टर होते. नमस्कार झाला. बिलिंग करते वेळेस त्यांच्या लक्षात आले की त्यांनी निवडलेले दोन कपडे ऑफरवाले नसून ते 'न्यू अरायवल' लॉट मधले आहेत. आता बिलिंग काऊन्टरवर येऊन कपडे परत करणं त्यांना शोभनारं नव्हतं. तेंव्हा नाइलाजाने पूर्ण बिल अदा करून डॉक्टर महाशयांना ते घ्यावेच लागले. माझं मलाच अवघडल्यासारखं झालं.
एका मोठ्या शहरात रिलायन्स मॉल सुरु झाला होता. जागा आणि पसारा खूप मोठा होता. सुरुवात जोरात व्हावी म्हणून त्यानी मोठमोठे होर्डिंग लावून एक खास ऑफर ठेवून वातावरण मुक्त ठेवलं होतं. मॉलमध्ये काही तुरळीक ठिकाणीच सेल्समन ठेवले होते. गर्दी वाढून मोठा सेल होईल आणि बिलिंग सोपी व्हावी या योजणेने त्यांनी कपड्याला सेन्सरही लावले नाही. पण घडले भलतेच. काही दिवसानंतर त्या स्टोअर मॅनेजरच्या लक्षात आलं कि स्टॉक आणि कॅश कलेक्शन हे टॅलीच होत नाही. स्टॉक तर कमी होतोय पण कॅश काही वाढतं नाही. पाणी कुठं मुरतय हे पाहण्यासाठी त्यानें मॉलमध्ये खोल चौकशी केली. सर्व व्हिडीओ-फुटेज बघून घेतले. लक्षात आलं की काही विंडो शॉपर हे 'विशिष्ट' हेतूने येत होते. जुन्या शर्टच्या आत स्लिमशर्ट आणि बर्मुड्यावर दुसरा बरमुडा चढवून चक्क '100%' ऑफ घेऊन हे लोक बिनदीकत बाहेर जात होते. टि-शर्ट तर खुपचं कमी झाले होते. आता काय उपाय, ट्रायलरूममध्ये कैमरा तर लावता येत नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून एक खास सेल्समन पुरुष-ट्रायलरूमच्या बाहेर उभा करून हा प्रकार थांबला. तो पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं.
एकदा मुंबईहुन पुणे बस प्रवासात मला एक युवक भेटला. माझा सहप्रवासी म्हणून गप्पाटप्पा सुरु झाल्या. त्याच नुकतंच एंगेजमेंट झालं होतं. लग्नात विनाकारण खर्च टाळावा असा पुरोगामी विषय चघळत आमची चर्चा चालू होती. ओघात त्याने एक मस्त किस्सा सांगितला. मुलगी बापाची लाडकी म्हणून लग्नाच्या कपडे, जोडे इ साठी त्याच्या सासऱ्याने त्याला ₹ २५०००/- दिले होते. ह्या महाशयाने काय करावं? त्याने फ्लॅट 50% ऑफची वेळ साधली, आपले व्यवहारचातुर्य पणाला लावून फक्त ₹ ११५००/- मध्ये सर्व खरेदी केली आणि उरलेले पैशात हनिमून टिकेटस! मला त्याच्या व्यवहार चातुर्याचं खूप कौतुक वाटलं. कारण लग्नसोहळा संपेपर्यंत हे महाशय कुठे कशी बचत करतील मी असा विचार करत होतो.
साधारण २३ वर्षापूर्वीची गोष्ट. मी नुकताच मुंबईत स्थिरावलो होतो. पगार खूप कमी होता पण कपडे खरेदीचा मोठा शौक. मुंबईमध्ये चर्नी रोडच्या एका हॉलमध्ये मोठा सेल सुरु होता. 50% ऑफ असल्यामुळे खूप गर्दी होती. काही टेबलावर घडी न केलेल्या मिक्स कपड्याचे ढीग लावले होते. एका शर्टच्या ढिगावर माझ्यासह ५-६ जण चांगले शर्ट शोधत होते. डिझाईन आवडलं तर साईज नाही आणि साईज असेल तर डिजाईन नाही. दोन्ही भेटले तर किंमत! अशात माझ्या बाजूवाल्या ग्राहकानी दोन चांगले शर्ट उचलले. त्याची निवड खरंच चांगली होती आणि ते अजून एक शर्ट शोधत होते. अशा वेळेस नेमके इतराच्या हातातील कपडेच आपल्याला जास्त चांगले वाटत असतात. माझ्यासोबत तसच झालं. मला त्याच्या हातातील एक शर्ट खूप आवडला होतो, मला तो हवा होता. पण ते काही खाली ठेवत नव्हते. माझी एक नजर ढिगाकडे दुसरी त्या हातातील शर्टकडे. पण थोड्याच वेळात त्याने एक पॅन्ट निवडली आणि तो शर्ट परत ढिगावर ठेवला. क्षणाचाही विलंब न करता मी तो उचलला. दीडशे रुपये देऊन एका पॉलिथिन बॅगमध्ये तो घडी न केलेला शर्ट मी रूमवर घेऊन आलो. मला उद्या ते नेसून मिरवायचं होतं. मी खूपचं आनंदी होतो पण माझा तो आनंद जास्त काळ टिकणार नव्हता. दुसऱ्या दिवशी शर्ट नेसून मी खिशात पेन टाकणार तेंव्हा लक्षात आलं कि त्या शर्टला खिसाच नाही. एका क्षणाला मी वुमन्स शर्ट तर घेऊन नाही आलो, अस वाटलं. पण तसंही काही नव्हतं. मुळात टेलर खिसा लावायचं विसरला होता. तस मुंबईत माणसं स्वतःत एव्हडी गुंग असतात कि दुसऱ्यानं काय घातलं हे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसते. तसाच बिनखिशाचा शर्ट मी काही दिवस वापरून टाकला.
एक ब्रँड विकसित करून लोकांच्या हृदयात जागा करण्यासाठी कंपनी करोडो रुपये खर्च करते. लोगो, कॉपीरराईट, पब्लिसिटी आणि जाहिरातीमध्ये करोडो रुपयाची गुंतवणूक केलेली असते. एव्हढच नाहीतर त्या ब्रॅण्डला कंपनी आपल्या मुलाप्रमाणे, तळहातातील फोडाप्रमाणे जीवापाड जपत असते. कोणत्याही परिस्थितीत ब्रॅण्डच नाव खराब होणे त्यांना परवडनारे नसते. म्हणून कधीही ब्रँडेड वस्तू मोठ्या ऑफरवर खरेदी करणे हे चांगलंच. फक्त घेतेवेळेस घाई न करता थोडी काळजीपूर्वक खरेदी करावी. कारण तो गारमेंट किंवा वस्तू आऊट ऑफ फॅशन, खूप जुनी असेल तर खरेदीचा आनंद जास्त काळ टिकणार नाही आणि पश्चाताप होईल.
जे कपडे ब्रँडेड नाही अशा कपड्याच्या सेलमध्ये खरेदी करणे टाळावेत. कारण अशा कपड्याचा कुणी वाली नसतो. मटेरियल, रंग आणि डिझाईन याची शाश्वती नसते. असे कपडे सेकन्ड्स किंवा फौल्टी असू शकतात. तसेच हॉलमध्ये लागलेले सेल हे तात्पुरते असल्यामुळे कपडे परत करायची मुभा नसते, त्यामुळे अशी खरेदी टाळलेली बरी.
©प्रेम जैस्वाल, औरंगाबाद
premshjaiswal@gmail.कॉम

No comments:
Post a Comment