ad1

Wednesday, 19 September 2018




एलईडी ब्लब: खरंच वीजेचं बिल कमी करतो का ?

आजच्या धकाधकीच्या जीवनात मेहनतीनं कमावलेले चार पैसे मासिक खर्च, बिल आणि हप्ते भरण्यातच संपून जातात. दोन पैसे वाचवून महिन्याचे बजेट सांभाळतच  माणसाचं आयुष्य पुढं पुढं सरकत असतं. पेट्रोल, डिझेल, विजेचे दर, हॉस्पिटल खर्च, कर, शिक्षणाची फी कमी झालेल्या बातम्या ऐकिवात नसतात. त्यांचा आलेख चढताचं असतो. लाईटबिल हातात घेतेवेळेस मनात एक धाकधूकी असते. एक मोठा 'शॉक' देण्याची क्षमता त्या कागदात असते. क्वचित ते कमी आलं तर त्या सारखा सुखद क्षण नसतो.  आणि ते कमी यावं म्हणून आपण वाटेल ती बचत करत असतो. ह्या बचतीचा धागा पकडूनच विजेची उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या जाहिरात करत असतात. हल्ली सगळीकडं एलईडी वापरून वीज बचत करा अशी चर्चा आहे. या सुरात सूर मिळवून शासनानेहि काही योजना चालविल्या आहेत. पण त्यामुळं पाहिजे तेव्हडा फरक होताना दिसत नाही. फक्त एलईडी ब्लब वापरून मोठी वीज बचत होणे हा गोड गैरसमझ आहे आणि तो दूर व्हावा त्यासाठी हा लेखप्रपंच.

 'एलईडी ब्लब एक बार, बिल कम आयेगा बार बार'
'विजेची बचत करण्यासाठी एलईडी ब्लब वापरा'
'एलईडी ब्लब काळाची गरज'
'कट ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी बिल !'
'एनर्जी सेवडं, एनर्जी अर्नड'

एलईडी ब्लब विकणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीत अशी ठळक टॅग लाईन असते. या सर्व वाक्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो कि पारंपारिक ट्यूब, सीएफएल न वापरता तुम्ही एलईडी ब्लब वापरल्यानं विजेची बचत होते. यातं गैर असं काही नाही. एलईडी ब्लबला कमी वीज लागते, प्रकाश मात्र जास्त असतो. त्यामुळं २० वॉट सीएफएल ब्लबच्या ऐवजी आपण 9 वॉटचा एलईडी ब्लब वापरला तर तेव्हडाचं प्रकाश पडून आपले ११ वॉट वीजेची बचत होते. असे घरातील ७-८ ब्लब बदलले तर एकूण ८८ वॉट वीज बचत होईल, असं आपण मानतो.

थोडक्यात एलईडी ब्लब वापरून प्रत्यक्षात किती बचत होते याचा एक ढोबळ हिशोब केला तर ती बचत एकदंरीत वीज वापराच्या तुलनेत अगदी क्षुल्लक आहे.

देशातील लाखो घराचा विचार केल्यास ही खूप मोठी वीज बचत आहे. एकंदरीत देशाच्या साधनसंपतीचा विचार केल्यास हि खूप मोठी ऊर्जाबचत आहे याबद्दल किंचितशी शंका नसावी. त्यामुळं एलईडी ब्लब वापरणे कधीही चांगले. सध्या सर्वत्र एलईडी ब्लब उपलब्ध आहेत. खपं प्रचंड वाढल्यामुळं त्याच्या किमतीत घसरण होऊन माफक किमतीत ते सर्वत्र उपलब्ध आहेत.  पण मूळ मुद्दा असा की हे ब्लब वापरूनसुद्धा विजेच्या बिलात लोकांना अपेक्षित फरक दिसत नाही. असं का ?

तर कारण असे :

आपल्या घरात आपण लाईटशिवाय इतर अनेक उपकरण वापरत असतो. जसेकी पंखा, टीव्ही, फ्रीज, कुलर, कंप्युटर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, पाण्याची मोटर, गिझर, वॉशिंग मशीन, पिठाची चक्की, इलेक्ट्रिक प्रेस, ओव्हन, ड्रायर, एक्झॉस्ट फॅन, चार्जर इ. या उपकरणाला लागणाऱ्या विजेच्या तुलनेत एलईडी ब्लबला लागणारी वीज अगदी नगण्य असते.

उदाहरणार्थ बोअरची मोटर अर्धा तास चालवली तर महिन्याला  साधारण 50 युनिट वीज वापर होतो. त्यातच पाण्याची पातळी, इमारतीची उंची जेव्हडी जास्त तेव्हड बिल जास्त. थोडक्यात आपण वापरत असलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाला वीज लागते. थोडक्यात :

जास्त पाणी वापर म्हणजे जास्त वीज बिल.
जास्त मोबाईल वापर म्हणजे जास्त बिल,
जास्त कंप्युटर, लॅपटॉप वापर म्हणजे...
जास्त कपडे धुणे, झाडाला पाणी म्हणजे ......
जास्त सदस्य, जास्त पाहुणे म्हणजेच.....
जास्त कपड्याची इस्त्री म्हणजे .....
जास्त सिरीयल पाहिल्या म्हणजे .....
जास्त वेळ आंघोळ म्हणजेच ......
जास्त वेळ एसीचं सुख म्हणजेचं......
वरची टाकी भरून वाहते म्हणजेच पाणी आणि वीज दोन्ही वाया गेले ! म्हणजेच जास्त बिल असं समजावे.


वॉशिंग मशीन, फॅन, पिठाची घरगुती चक्की, ड्रायर हे गोलगोल फिरणारे उपकरण खूपचं वीज ओढत असतात. तसेच वीज ओढण्यात पाणी तापवण्याचा गिझरचा पहिला नंबर लागतो. रोज अर्धा तास गिझर चालत असेल तर महिन्याला 45 युनिट वीज खातो. या तुलनेत एलईडी ब्लबचं युनिट काहीच नाही.  कारण गिझर हा 3000 वॉटचा असतो. म्हणजे एक गिझर चालू ठेवणे म्हणजे 9 वॉटचे  333 एलईडी ब्लब चालू ठेवण्यासारखा प्रकार!

त्यामुळं एलईडी ब्लब चुकीन काही तास चालू राहिला तर विशेष काही फरक पडणार नाही पण वरील सर्व उपकरने काही मिनिटे/सेकंड जरी जास्त वापरली तर वीजबिलात खूप फरक पडतो. वीज बिल जास्त येतो.

खरचं विजेचं बिल कमी करायचं असेल तर वर नमूद केलेल्या सर्व विजेच्या उपकरणाचा वापर कमीत कमी करने आवश्यक आहे.  घरातील लाईट-फिटिंग तसेच योग्य अर्थिंग असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मोटारपंप, एसी, पंखे, फ्रीज सारख्या उपकरणाची नियमित दुरुस्ती, देखभाल करणे आवश्यक आहे. अधून मधून हे उपकरण घेत असलेलं करंट इलेक्ट्रिशियनकरवी चेक करून घ्याव. सतत पाण्यात राहून क्षारमुळे बोअरचा पंप जाम होतो आणि प्रचंड विद्युत खातो. त्यामुळे बोअरच्या स्टार्टरबोर्ड वर करंटमीटर असतो त्याकडे नियमित लक्ष असावे. करंटमीटर नेहमीपेक्षा जास्त दाखवतं असेल तर पंप दुरुस्त करून घ्यावा.

मनुष्याच्या भौतिकसुखाला अंत नाही. मानवी जीवन सुसह्य व्हावं म्हणून बाजारात नवनवीन उपकरण येत आहेत. बऱ्याच उपकरणात रिमोट कंट्रोल असतंच. रोज नवीन  डिस्काउंट-ऑफर देऊन विजेच्या उपकरणाच्या जाहिराती आपल्याला भुरळ घालत असतात.  उपकरण जरी अर्ध्या किमतीत मिळत असलं तरी न चुकता येणाऱ्या विजबिलात डिस्काउंट हा प्रकार नसतो. पिठाची चक्की, बार्बेक्यू असे काही उपकरण आहेत की ज्याचा वापर आपण क्वचितच करतो. पण ती उपकरण घरातील जागा व्यापतात शिवाय वीजबिल वाढवतात. त्याच प्रमाणे नवीन उपकरण घेताना ते खरोखरचं आवश्यक आहे का याचा सद्सदविवेक बुद्धीनं विचार करावा. तसेच ते उपकरण किती वीज खातं हे त्याच्या 'स्टार रेटिंग' वरून लक्षात घ्यावे. 'पाच स्टार रेटिंग' म्हणजे सर्वात कमी वीज घेणार उपकरण. कारण विजेचे भावाचा आलेख हा चढताचं असतो. नवीन घर, फ्लॅट किंवा ऑफिस घेताना त्या वास्तूतं खेळती हवा, योग्य प्रकाशयोजना आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. इन्व्हर्टर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबच्या बॅटरी जुन्या झाल्यास त्या खूप करंट ओढतात आणि वीज बिल वाढतं. इन्व्हर्टर तर चार्जिंगसाठी  100% वीज घेऊन परतीत वीज गेल्यानंतर 75%  वीज देतं. 25% वीज स्वतः खातो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेचे आकार. विद्युत महामंडळाने विजेच्या वापराचे स्लॅब ठरवून दिले आहेत. म्हणजे 100 युनिट पेक्षा कमी युनिटसाठी कमी आकार, 100 युनिट पेक्षा जास्त युनिटसाठी जास्त आकार. आणि 300 युनिटपेक्षा जास्त युनिटसाठी खूप जास्त भावाने वीज आकारली जाते. त्यामुळे जेव्हडा विजेचा वापर कमी तेव्हड बिल कमी.

शेवटी कंजुशी आणि काटकसर यामधील फरक समजणे आवश्यक. बरीच मंडळी ह्या दोन शब्दातील फरक समजण्यात चूक करतात. वीज असतानाही अंधारात बसणे हि कंजुशी. गरज पडेल तेंव्हाच लाईट-पंखा चालवणे हि चांगली काटकसर. पण गरज नसताना घरातील अनावश्यक लाईट पंखे चालू ठेवणे हा निवळ निष्काळजीपणा. विजेची बचत हा एक संस्काराचाच भाग आहे. अन्न, पाणी असो की वीज त्याची बचत कशी करावी याचे संस्कार प्रत्येक घराघरात तसेच शालेय शिक्षणात होणे आवश्यक आहे. किंबहुना शालेय शिक्षणात त्याचा अंतर्भाव व्हायलाचं पाहिजे. वीज बचतीसाठी घरातील वरिष्ठ पालक मंडळी जबाबदार असतात. कारण हे संस्कार वरूनचं खाली झिरपत येत असतात.  त्यामुळे इतर जीवनोपयोगी मूल्यासोबत अन्न, पाणी, पैसा आणि वीज बचत करण्याचे अमूल्य संस्कार आणि शिकवणं वरिष्ठाने कनिष्ठाला देऊन देशाच्या साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यात अमूल्य हातभार लावावा. ती एक प्रकारची देशसेवाच होईल.

अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगचे इतर लेखही वाचा.




© प्रेम जैस्वाल 9822108775
([ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]

Tuesday, 18 September 2018



एमसीबी कसा ट्रिप होतो ?


विजेचं शॉर्ट-सर्किट होऊन आग लागल्याच्या बातम्या आपण वाचतो. असे प्रकार घडू नयेत म्हणून हल्ली प्रत्येक घर-कार्यालयामधील विजेच्या मुख्य-बोर्डावर मिनिएचर सर्किट ब्रेकर [एमसीबी] लावलेले असतात.  हा एमसीबी सर्किट ब्रेक करण्याचं काम करतं,  कसे ?

हे माहित करून घेण्यापूर्वी आपण लाईटमीटर जवळचा 'फ्यूज' कीटकॅट कसा काम करतो,  हे आधी बघूया.  कारण कालच्या फ्युजची जागाच आज एमसीबीनं घेतली आहे.  घरातील वायरिंग किंवा उपकरणात बिघाड झाल्यास पूर्वी फ्यूज 'उडत' असे. त्यामुळं हा फ्यूज कसा उडतो, ते आधी बघू.

मुळात विद्युत महामंडल आपल्याला २३० व्हॉल्टचा अखंड विद्युत पुरवठा करत असते. त्या विजेला आपण उपकरण जसेकी लाईट, फॅन, मोटार इ. जोडले तरंच त्यातून करंट [विद्युत प्रवाह] वाहत, नसता करंट वाहत नाही. जेंव्हा एखाद उपकरण चालू असतं तेंव्हा त्यातून ठराविक प्रमाणात करंट वाहत असतं. पण जेंव्हा एखादया उपकरणात बिघाड होतो तेंव्हा त्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेतून खूपच जास्त करंट वाहत. या जास्त करंटमूळ त्या तारेत प्रचंडउष्णता निर्माण होते आणि ती तार तापते.  हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर घरातील तारा काही क्षणातच वितळतात.  मग 'शॉर्ट सर्किट' होऊन घराला आगही लागू शकते.

असं घडू नये म्हणून मीटरच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचा फ्यूज (किटक्याट) लावलेला असतो.  या  किटक्याट मध्ये एक विशिष्ट धातूची बारीक तार जीला 'फ्युजतार' असेही म्हणतात. तीचा 'मेलटिंग पॉईंट' खूप कमी असतो. हि तार उष्णतेने थोडीशी जरी तापली तरी वितळून तुटून जाते.  त्यामुळं वीज पुरवठा खंडीत होतो. विद्युत मोटारीत बिघाड, बोअरमध्ये बिघाड झाल्यास किंवा अपेक्षेपेक्षा जास्त लोड वाढल्यास सुद्धा हि फ्यूजतार वितळते. फ्यूज तार वितळून, वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळं वायरिंग जळून अख्या घराला आग लागण्याचे प्रकार टाळले जातात. पण त्यामध्ये पुन्हा पुन्हा फ्यूजतार बदलण्याची कटकट असायची. शिवाय फ्यूजतार बदलताना शॉक लागण्याची भीती असायची. त्यामुळं हल्ली फ्युजला पर्याय म्हनून सर्वत्र 'एमसीबी' च वापरतात.  करंट प्रमाणाबाहेर वाढल्यास हा एमसीबी ट्रिप होतो. उपकरणातील दोष काढून आपण पुन्हा तो सहज चालू करू शकतो. या एमसीबीच काम खूप मजेदार असतं.

शालेय विज्ञानात आपण सर्वच हे शिकलो आहो कि-

 ' 'जेंव्हा दोन धातूच्या पट्या सोबत तापविल्या तर त्या प्रसरण पावतात.' 

एमसीबीमध्ये याच सिद्धांताचा खुबीनं उपयोग केलेला असतो. एमसीबी मध्ये फ्यूज तारची जागा ह्या दोन भिन्न धातूच्या पट्या घेतात. जेंव्हा जास्त करंट वाहतं तेंव्हा उष्णतेमुळं ह्या पट्या तापतात आणि प्रसरण पावतात. त्यामुळं एमसीबीचा खटका खाली पडुन वीज पुरवठा खंडीत होतो, अपघात टळतो.

ज्यामुळे तो खटका खाली पडला तो उपकरणातील दोष निस्तारून आपण सहजपणे पुन्हा तो एमसीबी चालू करू शकतो. थोडक्यात सुरक्षेच्या दृष्टीनं एमसीबी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हल्ली इलेक्ट्रिशियन प्रत्येक खोली किंवा मोठ्या उपकरणासाठी वेगळा एमसीबी लावतात जेणेकरून घरातील इतर भागाचा विद्युत पुरवठा खण्डित होत नाही. थोडक्यात, घरासाठी एमसीबी म्हणजे एक प्रकारचा 'सेक्युरिटी गार्ड'चं !

अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगचे इतर लेखही वाचा.

[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]


© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल
 premshjaiswal@gmail.com

Friday, 14 September 2018




काही उपकरणाच्या बटनावर अशीच खूण का असते ?

दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, ऑडिओ सिस्टीम, रेफ्रिजरटर, वॉशिंग मशीन, एसी, तसेच ऑफिसमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर,  युपीएस, वॉटर फिल्टरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळत असतो. हल्ली सर्वच इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये थोडंफार इलेक्ट्रॉनिक्स भाग असतोच. 

वरील सर्व उपकरण चालूबंद करण्यासाठी एक बटन असतं.  वरील सर्व उपकरणाच्या पॉवर ऑन-ऑफ बटनाकडे बघितलं तर लक्षात येईल की काही ठराविक उपकरणाच्या बटनावरचं एक गोल मोठी रिंग ' ० 'असते आणि त्यावर ' I ' असा मार्क असतो. याचं कारण काय ?

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन प्रकार असतात, एक ऍनॉलॉग आणि दुसरा डिजिटल. ऍनॉलॉग हे जुन्या पद्धतीचे उपकरण ज्याचे सर्व पार्ट ऍनॉलॉग असतात. वाहणार करंट किंवा माहिती हि ऍनॉलॉग असते.

डिजिटल उपकरणात वाहणारी माहिती हि हाय आणि लो स्वरूपात असते.  हाय म्हणजेच वन (1) आणि  लो म्हणजे झिरो (०)   अशा स्वरूपात असते.  मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, स्कॅनर, टॅब, एलसीडी टीव्ही हे सर्व डिजिटल उपकरण आहेत. या डिजिटल उपकरणात डिजिटल आयसी, मायक्रोप्रोसेसरसारखे नाजूक पार्ट जोडलेले असतात. हे सर्व उपकरण डिजिटल आहेत हे लक्षात यावं म्हणून 'पॉवर ऑन-ऑफ' हे एकसारखं म्हणजे फोटोतं दाखविल्याप्रमाणं असतं. या सिम्बॉलमध्ये एक मोठा 'झिरो' आणि '1' दडलेला आहे.

डिजिटल उपकरण वापरायला नाजूक असतात त्यामुळं त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी या ब्लॉगचे इतर लेखही वाचा. हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.


© काॅपीराईट

- प्रेम जैस्वाल
 premshjaiswal@gmail.com

Wednesday, 12 September 2018



वस्तूच्या पॅकिंगमध्ये सिलिका जेल का ठेवतात ?


बाजारातून खरेदी केलेल्या बऱ्याच वस्तूच्या पॅकिंगमध्ये आपल्याला एक छोटासा राखाडी रंगाचं 'पाऊच' दिसतो. त्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं ' थ्रो अवे, डू नॉट इट' [फेकून द्या, खाऊ नका] . पॅकिंग उघडल्यानंतर आपण तो लगेच फेकून देतो. पण ते काय असतं? ते कशासाठी ठेवल्या जातं?

कारखान्यात पॅकिंग झालेल्या वस्तू विक्रेत्याकडून विक्री होऊन ग्राहकाच्या हातात पोहचण्यासाठी बरेच दिवस लागतात. हा काळ निश्चित नसतो. खूपदा तो माल कितीतरी महिने वा वर्ष स्टोकिस्ट, डीलरकडे पडून राहतो.  आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू आहेत त्यामुळे तापमानात सतत बदल होत असतात.  कोरडं हवामान ठीक पण ओल्या हवामानात आद्रतेमुळं वस्तू खराब होतात, बुरशी लागते.  हे टाळण्यासाठीच ओलावा शोषून घेणारी 'सिलिका जेल' त्यात ठेवलेली असते. सिलिका जेल म्हजेचं सिलिका डायऑक्साईड. तिच्या गुणधर्म असतो की ती हवेतील  ४०% आद्रता शोषून घेते. सिलिका जेल जास्तीत जास्त 4 ते 12 महिने वस्तू टिकवून ठेवू शकते.

लेदर फूटवेअर, मोबाईल, वॉचेस, इलेक्ट्रिनिक्स गॅझेट्स, थर्मास, गॉगल इ. वस्तूच्या पॅकिंगमध्ये ती आढळते.

Monday, 10 September 2018






भारतीय रेल्वे स्थानकावरील बोर्डवर समुद्रसपाटीपासून उंची (Mean Sea Level, MSL) का लिहिलेली असते?
                          
                            -प्रेम जैस्वाल

    - - - - - - - - - - - - - -

भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आपण नेहमी बघतो कि प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या बोर्डवर हिंदी आणि इंग्रजीत 'समुद्र तल से उंचाई' --- मी. असं लिहिलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी ती साईड-पोलवर सुद्धा लिहिलेली असते.

खरं तर ही माहिती आपल्यासाठी लिहिलेली नसते तर ती माहिती रेल्वेच्या मोटरमन(ड्राइवर), गार्ड  आणि रेल्वेच्या अभियंत्यासाठी खूप महत्त्वाची असते.

उदाहरणार्थ, जर मुंबईहुन नाशिक जाणारी जनशताब्दी ट्रेन 10 मीटर समुद्रसपाटीपासून पुढं 100 मीटर उंची (समजा इगतपुरी) असलेल्या ठिकाणावर चढणार असेल तर त्या ट्रेनचा मोटरमन उंचीचा बोर्ड बघून त्या रेल्वेच्या इंजिनाचा जोर वाढवेल (आपल्या भाषेत ऍक्सेकेटर!) आणि ट्रेनची गती त्याप्रमाणे नियंत्रित ठेवेल.

त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन इगतपुरीहुन मुंबईकडं उतारावर जाताना मोटरमन समुद्रसपाटीपासूनची उंची बघून किती 'ब्रेक' लावला पाहिजे याचा विचार करेल. रेल्वेला दुचाकी-चारचाकीसारखं अर्जंट ब्रेक लावता येत नाही.  त्यामुळं मोटरमनला उंची-खोली आणि अंतराचा अंदाज बांधून आधीच निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला त्या ठिकाणच्या उंचीच्या फलकाची मदत होते.

हल्ली जास्तीत जास्त भारतीय रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आहे. रेल्वे चालताना आपण बघतो कि विद्युततारा ह्या कायम रेल्वेच्या संपर्कात येत असतात. जर उंची कमी-जास्त असेल तर रेल्वेचा ताराशी व्यवस्थित संपर्कचं होणार नाही. थोडक्यात, विद्युतीकरनचं काम करताना विजेच्या तारांची उंची सगळीकडे समान राखणे आवश्यक आहे जेणेकरून रेल्वे मार्गावरील विजेच्या तारांचा रेल्वेवरील तारांशी सतत संपर्क होत राहील आणि विद्युतप्रवाह सुरळीत चालू राहील.

त्यामुळं विद्युतीकरनच काम करतानाही रेल्वेच्या अभियंत्यांना त्या त्या ठिकाणची अचूक उंची माहित असणे आवश्यक असते.

हेच कारण आहे की प्रत्येक रेल्वे स्थानकावर अशी उंची नमूद केलेली असते.