ad1

Sunday, 10 November 2024

आर्टीफिशियल इंटलीजन्स: जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती........!


         जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती........! 
              (आर्टीफिशियल इंटलीजन्स)
दैनंदिन व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. मोबाईलशिवाय जीवन व्यतित करणे आता कठीणच. पण हल्ली होतं असं कि महत्वाचं काम पार पाडण्यासाठी तुम्ही मोबाईल चालू करता पण मध्येच तुमच्या आवडीची पोस्ट किंवा रील स्क्रीनवर सुरु होते. तुम्ही त्या पोस्टला 'हुक' होता आणि त्यात गुंतून जाता. मग रील मागून रील येत जातात. त्याचा आनंद घेत, कमेंटमधील वादविवाद वाचत कधी तुमचा एक तास वाया गेला हे तुम्हाला कळत सुद्धा नाही.  अरेच्चा! मी तर कुणाला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला होता, माझा एक तास वाया गेला! तुमच्यासोबत हे निश्चित घडलं असणार. आर्टिफिशियल इंटलीजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचीच ही किमया आहे. पुढील लेख वाचून असं का घडतं हे तुम्हाला समजून जाईल अशी मी आशा करतो. या पुढे आर्टिफिशियल इंटलीजन्सचा फक्त 'एआय' असा संक्षिप्त उल्लेख मी करणार आहे.

बुद्धिमत्ता, सृजनशीलता, कल्पकता अशा काही विशेष गुणामुळे मानव या धरतीवर अधिराज्य गाजवत आला आहे. पण आता तो आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्यासारखीच बुद्धिमत्ता असणारं तंत्रज्ञान किंवा मशीन निर्मिती करू पाहत आहे. एखाद्या कम्प्युटर मशीनमध्ये मानवासारखी बुद्धिमता विकसित करणे या तंत्रज्ञानालाच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशिंयल इंटलीजन्स (एआय) असे म्हणतात. अर्थात अशी बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी त्या सिस्टीम किंवा मशीनला प्रथम शिकविणे आवश्यक आहे. त्या शिकविण्याच्या प्रक्रियेला मशीन लर्निंग (एमएल) असे म्हणतात. याच कारणामूळे एआयसोबत एमएलचा सुद्धा उल्लेख होतो, एआय-एमएल (AI-ML) असा.

एआय-एमएल कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू. घरात एक छोटं बाळ आहे. घरात वावरतांना घरातील सर्व वस्तूचं ज्ञान आपण त्याला देत असतो. त्या वस्तू बघून तो सतत शिकत असतो. बाळ जसा मोठा होत जातो तसा त्याच्या ज्ञानात भर पडत जाते. त्याला मांजर दाखविली कि मांजरीचा आकाराचं चित्र त्याच्या बुद्धीत फिट बसतं. मांजरीचा रंग, चार पाय, तोंडावर लांब मिशा, चालण्याची लकब, तिचा आवाज हे सर्व तो बघून, निरीक्षण करुन शिकत जातो. अशाच प्रकारे तो घरातील इतर सदस्याची माहिती घेतो. तसेच फर्निचर, फळ किंवा इतर निर्जीव वस्तूबद्दल तो शिकत जातो. एकदा का त्याने आपल्या बुद्धिमध्येत हे सर्व ज्ञान स्टोअर केलं की पुढच्या वेळेस त्याच्यासमोर प्राणि आला तर तो सहज सांगू शकेल की ती मांजर आहे. ही निर्जीव वस्तू खुर्ची आहे. हे कशामुळे शक्य झालं?  त्या बाळाला आपण शिकवत गेलो, तो शिकत गेला आणि आता त्याच्याकडे एव्हडी बुद्धिमत्ता विकसित झाली कि तो सर्व वस्तू आता ओळखू शकतो.  जसं वय वाढत जाईल तसा त्या वस्तूबद्दलच्या ज्ञानात भर पडेल.

एआयचा विकास करतांना वैज्ञानिकांनी याचं सर्व बाबीचा सूक्ष्म विचार करून हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. अर्थात ते करण्यासाठी गणितशास्त्राचा निश्चित उपयोग झाला आहे.   आपण जेंव्हा कंप्युटर किंवा मशीनवर काम करतो तेंव्हा आपल्याला काय आवडतं, कोणती गाणी आवडतात, कोणते चित्रपट, सिरीयल आवडतात हे एका बाळाप्रमाणे मशीन शिकत जाते. शॉपिंग करतांना आपल्याला कोणते रंग, डिजाईन, पॅटर्न, किमंतीचे कपडे आवडतात हे आपल्या सर्च डेटा मधून मशीन शिकत असते.  याला मशीन लर्निंग असे म्हणतात. एकदा का मशीनला तुमचा सर्च डेटा खंगाळून तुमची चॉईस कळली की पुढच्या वेळेस तुम्ही मोबाईल चालू करत्याक्षणी तुमच्या समोर तुमच्या आवडीची गाणी, सिरीयल, मुव्ही किंवा शॉपिंग वस्तू समोर दिसतात. हे सर्व मशीन लर्निंग अलगोरिदमंन घडतं.  बऱ्याच नेटकऱ्यांना हा प्रश्न पडतो की मोबाईल किंवा कॉम्प्युटरला आपली चॉईस कशी माहित पडते? तो एव्हडा बुद्धिमान कसा?  तर त्याचं उत्तर असं की त्याला तुम्हीच शहाणं केलेलं असतं. तुम्ही तुमच्या सर्चमध्ये जे जे पाहिलं ते त्या मशीनने स्वतःकडे स्टोअर केलं आहे (अर्थात मशीन लर्निंगमूळे!).

दैनंदिन जीवनात आपण कुटुंब सदस्य, मित्रांसोबत विविध विषयावर चर्चा करत असतो. कधी प्रत्यक्ष कधी मोबाईलवर. कृपया लक्षात ठेवा, तुमचा प्रिय मोबाईल संभाषण ऐकत असतो. पुढच्या क्षणी मोबाईल चालू केल्यास तुम्ही चर्चील्या विषयासंबंधित रिल्स किंवा पोस्ट तुम्हांला स्क्रीनवर झळकतांना दिसतात.  बऱ्याचदा आपल्या मनात काही चाललेलं असतं आणि नेमकी तिच पोस्ट स्क्रीनवर दिसते!  कसं शक्य आहे?   तर तुम्ही जेंव्हा चर्चा करत होतात तेंव्हा तुमच्या संभाषनातील एकूण एक शब्द तुमचा मोबाईल 'डेटा' म्हणून घेत असतो. त्यावरून तुमची आवड आणि चर्चेचा नेमका विषय काय हे मोबाईल/ मशीनला माहित पडतं. त्या एकंदरीत संभाषनाच्या डेटामधून (बिग डेटा) नेमकी महत्वाची माहिती तो पद्दतशीरपणे वेगळी करुन तो तुमच्यासमोर त्या वस्तू किंवा सेवेच्या विक्रीची जाहिरात झळकवतो.   बिन कामाच्या अफाट डेटामधून कामाची मौल्यवान माहिती काढण्याच्या प्रक्रियेला 'डेटा मायनिंग' असे म्हणतात. मातीतून सोनं काढण्यासारखी ती प्रक्रिया असते. ऑनलाईन शॉपिंग, जाहिरात, फ्रॉड डिटेक्शन मध्ये याचा उपयोग होतो. थोडक्यात तुमच्या आवडी निवडीची माहिती कुटुंबातील सदस्याप्रमाणे ती मोबाईलला सुद्धा माहित असते. 

गुगलवर किंवा इमेलमध्ये काही मजकूर टाईप करतांना आपोआप पुढचे शब्द अवतरतात आणि आपल्या टायपिंगचं काम ते सोपं करत जातात, असं होतं ना? तुम्ही हेसुद्धा नक्कीच अनुभवलं असणार.  होतं असं की जेंव्हा लाखो गुगल वापरकर्ते इमेलवर पत्रलेखन करतात तेंव्हा ते मशीन आपोआप ते शिकत जाते. जसेकी मशीनला कळतं लोकांनी To Whomsoever... असं टाईप केलं तर ९०% त्याचे पुढचे शब्द it may concern असे असतात. अर्थात येथे एनएलपी (नेचरल लंग्न्वेज प्रोसेसिंग) कामी येतं. मशीन लर्निंगमूळे मशीन हे शिकून घेते. मग जेंव्हा आपण To whomsoever टाईप करतो it may concern शब्द आपोआप स्क्रीनवर प्रकट होतात. थँक्स टू एआय-एमएल! 

आज घडीला एआयचे तीन प्रकार आहेत. नॅरो एआय, जनरल एआय आणि सुपरइंटलीजन्ट एआय. ज्या एआयची बुद्धिमता मानवीय बुद्धिमत्तेपेक्षा कमी आहे त्याला नॅरो एआय असे म्हणतात तर जो एआय मानवीय बुद्धिमत्तेची बरोबरी करू शकतो त्यास जनरल एआय असे म्हणतात. पण ज्या एआयची बुद्धिमत्ता मानवीय बुद्धिमत्तेच्याही पुढे काम करते त्याला सुपर इंटलीजन्ट एआय असे म्हणतात. सध्या आपल्याला नॅरो एआय मदत करत असतो.  थोडक्यात आपण पूर्णतः एआयवर विश्वास न ठेवता मानवीय बुद्धिमत्ता मिळून एखादा निर्णय घेत असतो. नॅरो एआयची काही उदाहरण आपण बघूयात.

ऑनलाईन शॉपिंग करतांना या आधीच्या आपल्या कपड्याच्या खरेदीचा पॅटर्न बघून एआयने त्यासारख्याचं काही वस्तू स्क्रीनवर दाखविल्या असल्या तरी त्याचा रंग किंवा डिजाईन आपल्याला सूट होईलच असं नसतं. त्यामुळे आपण त्याची निवड करत नाही. येथे मानवीय बुद्धिमत्तेचा उपयोग करुन आपण निर्णय घेतो. गुगलवर एखादं वाक्य टाईप करतांना प्रत्येक वेळी आपण एआयने सुचविलेले आयते शब्द टाईप करतोच असं नाही.  युट्युबवर गाणी ऐकताना आवडत्या प्रकारच्या गाण्याची यादी स्क्रीनवर झळकते ती सर्वच गाणी आपण ऐकतो का? नाही.  त्यातील काही गाण्याचं संगीत, लिरिक्स, अभिनेता,  अभिनेत्री आपल्याला आवडतं नसल्याने आपण बऱ्याचदा टाळतो सुद्धा. कारने प्रवास करतांना आपण कायम जीपीएसच्या सूचना पाळतोच असं नाही. त्याने मार्ग सुचविलेला असला तरी त्या रस्त्यावरील खड्डे, निर्जन रस्ता असल्यामुळे आपण त्या मार्गाने प्रवास करणे टाळतो. आजाराचे निदान करतांना वैद्यकीय तज्ञ  मशीन रिपोर्टमधील रिडींगवर १००% अवलंबुन राहत नाहीत तर स्वतःच्या क्लिनिकल एक्जामिनेशनचा ते आधार घेत असतात. येथे त्याचा प्रदीर्घ अनुभव कामी येतो. इलाज करतांना डॉक्टर प्रत्येक रुग्णाची लाईफस्टाईल, जेनेटिक फॅमिली हिस्ट्री, औषधाची ऍलर्जी, इतर आजार याचा अभ्यास करुनचं इलाज करतात. हा झाला नॅरो एआय जो फक्त ह्युंमन इंटलीजन्सला मदत करत असतो. 

दुसरा प्रकार आहे जनरल एआय.  या एआय प्रकारात तो मानवीय बुद्धिमत्तेच्या बरोबरीने काम करणार आहे. हा नॅरो एआयच्या पुढंचा टप्पा असणार आहे. यामध्ये मशीन लर्निंगची जागा डीप लर्निंग घेणार असून त्यासाठी प्रचंड डेटाची गरज पडणारं आहे.  जनरल एआय जास्तच पॉवरफुल असणार आहे. कारण मानवीय बुद्धिमत्तेची बरोबरी करू शकणारा डेटा किंवा माहिती त्याच्याकडे असणार आहे. चालकरहित कार हे जनरल एआयचं उत्तम उदाहरण आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी त्यामध्ये अनेक सेन्सर्स, रडार, लायडरसारखे उपकरण जोडलेले असतात. तिसरा प्रकार सुपरइंटिलिजेंट एआय. नावाप्रमाणे हा मानवी बुद्धिमत्तेच्याही पुढंचा एआय असणार. सध्या तरी हा फक्त इमॅजनरी एआय असून वास्तविक विश्वात तो मुळीचं नाही.  हल्ली विज्ञानावर आधारित फिक्शन चित्रपटात तो बघावयास मिळतो. पुढील वर्षभर पृथ्वीवर काय बदल घडतील अशी भन्नाट भविष्यवाणी करण्या इतपत त्याची बुद्धिमत्ता वाढलेली असणार!

'जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती.....'  संत तुकारामांनी हे विठूरायाबद्दल लिहिलं होतं. मी जिथे जातो माझा विठू माझ्यासोबत असतो. तो माझा हात पकडून मला पडू देत नाही, चुका किंवा अनर्थ घडू देत नाही असा माझा विठू!  आज दैनंदिन जीवनात एआय सतत आपल्या सोबत राहून आपल्या चुका होणार नाही, आपल्याला कुणी फसविणार नाही याची काळजी घेतो. हल्ली असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे एआयने प्रवेश केला नाही.  मग ते उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, संरक्षण, मनोरंजन क्षेत्र असो की जीवन सुसह्य करणारे ऑनलाईन शॉपिंग फूडचे प्लॅटफॉर्म. सर्वच क्षेत्रात एआयने शिरकाव केल्यामुळे त्या त्या क्षेत्रातील कामं सोपी होऊन गती, क्रयशक्ती आणि विश्वसनीयतेत निश्चित वाढ झाली आहे.  एखादं उपकरण काम करत नसेल तर आता कस्टमर केअर नंबर डायल करण्याची गरज नाही. एआय तुमच्या मदतीला धावून येतो. चाटबोट चालू करुन तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तत्परतेने देते. फ्रॉड किंवा फसवणूक होऊ नये म्हणून एआय तुमच्या चेहऱ्याशिवाय लॉक उघडत नाही. येथे तो पहारेकऱ्यांची भूमिका निभावतो. ऑनलाईन वस्तू निवडतांना ती कुणी किती वेळेस खरेदी केली, त्यासोबत कोणती वस्तू सूट होईल, त्याला मॅच होणारा इतर कलर कोणता अशी सर्वच बाबतीत मित्रासारखा मदत करतो. जोखमीचे व्यवहार करतांना फेस व फिंगरस्कॅनकरुन तुमचे पैसे सांभाळतो.  कारने प्रवास करतांना तो योग्य मार्ग, मार्गावरील अडथळे, रस्त्याची स्थिती, इटीए, वातावरणाची रियल टाईम माहिती सांगून एखाद्या गाईडच्या भूमिका निभावतो. .  तर कधी ड्रोनद्वारे दुष्मनराष्ट्राच्या हालचाली टिपून सैन्याना मदत करुन देशसेवेच्या भूमिकेत असतो. आजाराचे योग्य निदान करण्यासाठी तो संभाव्य आजाराचे नाव सांगून डॉक्टरांना इलाजासाठी मदत करतो. हल्ली ग्रामीण भागातील शेतकरीसुद्धा येत्या चोवीस तासात हवामानाचा संदेश मोबाईलवर बघून कामाचे नियोजन करतात. एआय पिक पेरणी, मशागत सारख्या शेतीकामात मदत करतो. तर बाजारात धान्याचे भाव, पुढील भावाचा अंदाज दर्शवून शेतकऱ्यांना माहिती देतो. विमानप्रवासात पायलटला वातावरणाची स्थिती आणि संभाव्य धोक्याबद्दल आधीच सूचना देतो. विमान बुकिंग करतांना चाटबोट तसेच योग्य मार्ग निवडण्यास एआय मदत करतो. विद्युत शक्तीचा योग्य वापर आणि लिकेज कमी करण्यासाठी ग्रीडचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एआयचा उपयोग होतो. तर कोरोनासारख्या महामारीत लस संबंधित रिसर्च, डेव्हलोपमेंटमध्ये वैज्ञानिकांना त्यांनी मदत केली होती. शेअर मार्केट क्षेत्रात तो आर्थिक सल्लागाराची भूमिका निभावतो. मागील घडामोडीचा अभ्यास करुन तो गुंतवणूकदाराना शेअर्सचा पुढील ट्रेंड, जोखीम याची माहिती देतो. उद्योग विश्वासाठी तर एआय एक वरदान ठरत आहे. उत्पादन सुरळीत करण्यासाठी तो कच्चा आणि पक्क्या मालाची रियल टाईम नोंद घेत सूचना देत असतो. उत्पादनासाठी लागणाऱ्या मशीनची योग्यप्रकारे देखरेख, प्रेहेंटिव्ह मेंटेनन्स चार्ट तयार करुन डाऊनटाईम कमी करतो. एकंदरीत सर्वच क्षेत्रात एआय आपल्यासोबत राहून एक मदतनीस, सोबती, साथीची भूमिका पार पाडणार आहे.

नवीन तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठीच असतं. त्याचे अनेक फायदे असतात तसे तोटे सुद्धा. संगणकामूळे टायपिंग मशीन बंद पडल्या. मोबाईलमूळे लँडलाईन, एसटीडी-पीसीओ बूथ गायब झाले. ऑनलाईन बुकिंगमूळे बस, ट्रेन विमान ट्रॅव्हल्स, सिनेमा, नाटक मनोरंजन तिकीट विक्री करणाऱ्याचा रोजगार गेला. सिसिटीव्हीमूळे वाचमनच्या नोकरीत कपात झाली. इमेल, व्हाट्सअप, ऍमेझॉन फ्लिपकार्ट मूळे पोस्टखातं फक्त एफडी योजनेपूरत मर्यादित राहीलं. एआयमूळे अजुन परिस्थिती बिकट होऊन बुडत्याचे पाय अजुन खोलात जातील अशी भिती वाटत आहे. पण भिती वाटण्याचे मुळीच कारण नाही. एआयमूळे काही रोजगाराची निश्चितच दारे बंद होत असली तरी प्रोग्रॅमिंग कोडींग किंवा एआय संबंधित आयटी क्षेत्राची द्वारे उघडणार आहेत. फक्त गरज आहे बदलानुसार बदलण्याची, नवीन स्किल्स शिकण्याची.

परवा गुगलचे हेड सुंदर पिचाईने सांगितल्याप्रमाणे, 'गुगलमध्ये हल्ली २५% प्रोग्रॅमिंगची कामे एआय करतो! मानव जातीने बुद्धिमत्तेचा वापर करुन एआय तंत्रज्ञानाची निर्मिती केली. तोच एआय आता मानवासारखी कामे करुन मानवजातीच्याचं रोजगाराच्या संधी कमी करत आहे. भस्मासुराने महादेवाच्याचं डोक्यावर हात ठेवण्यासारखा हा प्रकार नव्हे का! 

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानवीय बुद्धिमत्तेच्या पुढे जाणे त्याला एव्हढे सोपे नसणार. कल्पकता, विचार शक्ती, अंतरमनाचा आवाज, मानवीयता, भावना, सिक्स्थ सेन्स, गट फिलिंग असे काही गुण आहेत ज्याचा अंतर्भावं एआयमध्ये करणे सोपे नाही. 'अति सर्वत्र वर्जयेत' प्रमाणे एआयचा सुद्धा अतिरेक नकोय. 

© प्रेम जैस्वाल पेडगावकर 
    मो. ९८२२१०८७७५
(कृपया नावासह शेअर करावे, प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाची लिखित परवानगी आवश्यक.)




No comments:

Post a Comment