डिजिटल तंत्रज्ञान : ड्रोनगाथा
जीवनातील कला ह्या निसर्गाच्या नकला असतात. तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा हे लागू पडतं. विमानाचं शोध लावण्यापूर्वी राईट बंधूनी आकाशात उडणाऱ्या पक्षांचा अभ्यास केला होता. पक्षी कशा प्रकारे हवेत झेपावतात? उडतांना दिशा कशी बदलतात? जमिनीवर कसे परतात आणि या क्रियेत ते कोणत्या बळाचा उपयोग करतात याच सूक्ष्म निरीक्षण करूनच त्यांनी विमानाचा शोध लावला होता. पण आज उडत्या विमानाजवळ आकाशात उडणारे पक्षी जवळ फिरकू नये यासाठी विमानाला एक खास प्रणाली जोडलेली असते, किती हा स्वार्थीपणा! असो. लग्न समारंभ धार्मिक-राजकीय सभा, दुरवर पसरलेली गर्दी किंवा अवघड ठिकानचं छायाचित्रन करण्यासाठी पक्षी किंवा भुंग्यासारखं उडणार 'ड्रोन' हल्ली हमखास नजरेत पडतं ड्रोनचं प्रथम दर्शन आमिर खानच्या 'थ्री-इडियट' या चित्रपटात झालं होतं. २०१६ मध्ये उरी लष्कर तळावरील हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मौलाची कामगिरी बजावणारं हवाई उपकरण म्हणजे 'ड्रोन'. त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ड्रोनचा उपयोग अतिरेक्याची नेमकी ठिकाण शोधून काढण्यासाठी झाला होता. नवीन वाटत असलं तरी हे तंत्रज्ञान परदेशात विकसित होऊन कितीतरी वर्ष होत आहेत. डिजिटल युगातील या बहुउपयोगी अविष्काराबद्दल हा लेख.
ड्रोन म्हणजे पायलट नसलेलं छोटं पण अगदी हलकं विमान. त्याला 'अनमॅनड एअरक्राफ्ट' असेही संबोधतात. हवेत उडणार ड्रोन एखाद्या रोबोट सारखं काम करतं. यामध्ये विविध सेन्सर आणि जीपीएस असल्यामुळे त्याकडून आपण अनेक कामं करून घेऊ शकतो. ड्रोनमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सर्किट, सेन्सर्स व सॉफ्टवेअरमुळे अति दूर अंतरावरून रिमोटद्वारे त्याला नियंत्रित करता येतं. पूर्वी शत्रू राष्ट्राच्या भागात टेहळणी करण्यासाठी, त्यांच्या हालचाली टीपण्यासाठी अनुभवी पायलट असलेली विमानं वापरल्या जायची. हे काम जोखमीच होतं. शत्रू राष्ट्राची रडार त्यांना टिपून ती पाडली जायची. महागड्या विमानासह पायलटचा जीव अशी दोहेरी हानी होत असे. 'आवश्यकता अविष्काराची जननी असते', ड्रोनमुळे हि समस्या दूर झाली. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या वायुदलाने शत्रू राष्ट्रावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच एक ड्रोन आपल्या सीमेवर टेहळनी करत होतं. अर्थात पाकिस्तानच्या सैन्यानी भारताची युद्ध तयारीचा अंदाज घेण्यासाठी ते पाठविलं होतं. वायुदलाच्या रडारवर येताच ते पाडण्यात आलं.
• ड्रोन तंत्रज्ञानची सुरुवात
इंटरनेट, जीपीएस प्रमाणे ड्रोनचा शोध आणि वापर सर्वप्रथम अमेरिकेच्या संरक्षण विभागात झाला होता. त्याचा उपयोग सरंक्षण क्षेत्रापुरताच मर्यादित होता. मानवरहीत ड्रोन तयार करण्याचं श्रेय पहील्या विश्वयुद्धात ब्रिटिश रॉयल फ्लायइंगच्या रेजिनॉल्ड डेनीला जातं. त्यानंतर इज्राईलचा ज्यू वैज्ञानिक अब्राहम करीमने मानवरहित ड्रोन तयार केला. त्याला 'फादर ऑफ ड्रोन' असे म्हणतात. अमेरिकेच्या वर्ल्ड टॉवरवर झालेल्या ९/११ हल्ल्यातील कुविख्यात मास्टरमाइन्ड ओसामा बिन लादेन तसेच दहशदवाद्याची अचूक ठिकानं शोधण्यासाठी अमेरिकन गुप्तचर एजेंसी सीआयएने अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग केला. आज भारतासह सर्व देशाच्या सैन्याकडे सीमेची देखरेखीसाठी, दुर्गम ठिकाणी साहित्य वाहून नेण्यासाठी आणि गरज पडल्यास शत्रूवर अचूक हल्ला करण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग होत आहे. येत्या काळात हे तंत्रज्ञान संरक्षणापुरते मर्यादित न राहता नागरी क्षेत्रात त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होणार आहे.
• ड्रोन कसं काम करतं?
ड्रोन उडण्याचं तंत्रज्ञान काहीसं हेलिकॉप्टर किंवा विमानासारखंच आहे. उडण्यासाठी त्याला गतीने फिरणारे पंखे जोडलेले असतात ज्याला तांत्रिक भाषेत 'प्रोपेलर' म्हणतात. प्रोफेलर गतीने फिरण्यामुळे हवेचा वरील दाब कमी होऊन 'लिफ्टिंग फोर्स' निर्माण होतो आणि ड्रोन वर उडतं. ही क्रिया न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार होत असते. 'फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इकवल रिऍक्शन'. ड्रोनला चार, सहा किंवा आठ प्रोपेलर असतात. या प्रोपेलरची गती कमी जास्त करुन उडत्या ड्रोनची दिशा बदलता येते. पायलट ठराविक प्रोपेलरची गती नियंत्रित करुन ऐच्छीक दिशेला ड्रोन वळवू शकतो. उपयोगानुसार ड्रोनमध्ये वेगवेगळे सेन्सर्स, छायाचित्रासाठी कॅमेरे, गती नियंत्रित करण्यासाठी अकॅसेलोमीटर, गायरोस्कोप आणि विद्युत उर्जेंसाठी लिथीयम बॅटरी असते.
• विविध क्षेत्रात ड्रोनचा उपयोग
संरक्षण क्षेत्राप्रमाणे इतर क्षेत्रातही ड्रोनचा उपयोग खूप वाढला आहे. ड्रोनला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्यामुळे त्याच्या उपयुक्ततेचं परीघ वाढलं आहे. वेळेस अनेक कामं करत आहे दुर्गम ठिकाणी लागलेली आग, पूर किंवा जोखमीच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी व साहित्य पोहचवण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. उंच ठिकाणचे तापमान मोजण्यासाठी, जमिनीचे सर्च रिपोर्ट काढण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. टोलेजगं इमारतीच्या बांधकामाचे निरीक्षण करण्यासाठी, ग्राहकांना कामाची गती दाखविण्यासाठी किंवा इमारतीचे ३-डी छायाचित्र काढण्यासाठी ड्रोनचा वापर होतो. कृषी क्षेत्रासाठी ड्रोन एक वरदान ठरलं आहे. पिकाची देखरेख करण्यासाठी, खत, फवारणी करण्यासाठी किंवा दुर्गम ठिकाणावर बीज फेकण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.
• ड्रोनविषयी कायदे :
विज्ञानाचे नवनवीन शोध 'दुधारी तलवारी' प्रमाणे असतात. हितकारक आणि हानिकारकसुद्धा. हवाई वाहतुकीसाठीचं विमान जगातील बलाढय देश अमेरिकेतील ट्वीन टॉवरवर आदळून दहशतवादी ते जमीनदोस्त करतील असा विचारही कुणी केला नसेल. किंवा प्रवासी विमानाचे अपहरण करुन दहशतवादी वाटेल त्या मागण्या मान्य करुन घेतील असा विचारसुद्धा कुणी केला नसेल. ड्रोनचा वाढता प्रसार व भविष्यातील संभाव्य धोके ओळखून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ( DGCA ) या नागरी उड्डाणाचे नियमन करणाऱ्या संस्थेने २५ऑगस्ट , २०२१ मध्ये प्रथमच ड्रोनबाबत काही नियम आखून दिले आहेत.
भारतीय हद्दीत कुणीही परदेशी व्यक्ती ड्रोन उडवू शकणार नाही. व्यापार-उद्योगासाठी ड्रोनचा वापर करावयाचा झाल्यास परदेशी लोकांना भारतीय संस्थेकडून युनिक आयडेन्टिटी नंबर ( UIN )नंबर घेणे बंधनकारक आहे. नॅनो ड्रोन वगळता सर्वच ड्रोनची नोंदणी DGCA कडे करणे आवश्यक आहे. नोंदणी नंतर प्रत्येक ड्रोनला युनिक आयडेंटिटी नंबर(UIN) मिळणार आहे. ५० फूट उंची( नॅनो ड्रोन) आणि २०० फूटाची उंची (मायक्रो ड्रोन) वगळता सर्वच ड्रोनला DGCA ची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच ड्रोन नियंत्रित करणाऱ्या सर्व पायलेटला ड्रायविंग लायसेन्सप्रमाणे ड्रोन उडविण्याचं रीतसर प्रमाणपत्र आणि लायसेन्स मिळविणे अनिवार्य केलं आहे. ड्रोनच्या उंचीबद्दलसुद्धा कायदे आहेत. साधारण ४०० फुटाच्या उंचीवर ड्रोन उडविण्याची परवानगी DGCA देत नाही. विमानाप्रमाणे ड्रोनसाठीसुद्धा 'नो फ्लायिंग झोन' आहेत. देशातील विमानतळ, देशाचे लष्करी तळ, संरक्षणशी निगडित संस्थेच्या वास्तू, राज्याच्या किंवा देशाच्या महत्वाच्या वास्तू तसेच आंतरराष्ट्रीय सीमासारख्या क्षेत्रात विना परवाना ड्रोन उडविणे कायद्याने गुन्हा असून तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच नवीन DGCA नियमानुसार परवानगी शिवाय परकीय देशातून ड्रोन आयात करणे गुन्हा आहे.
•ड्रोनचे प्रकार (वजनानुसार)
वजनानुसार ड्रोनचे ५ प्रकार आहे.
नॅनो : २५० ग्राम पेक्षा कमी वजनाचे ड्रोन
मायक्रो : २५० ग्रामपासून २ किलो वजनाचे ड्रोन
स्मॉल : २ किलो ते २५ किलो वजनाचे ड्रोन
मेडीयम : २५ किलो ते १५० वजनाचे ड्रोन
मोठे ड्रोन : १५० किलोपेक्षा जास्त वजनाचे ड्रोन.
• भविष्यातील ड्रोन -
येणाऱ्या काळात ड्रोन तंत्रज्ञान अजुन विकसित होईल. शक्तिशाली ड्रोन बांधकाम, शेती तसेच दुर्गम ठिकाणी प्रवासी किंवा माल वाहतूक करण्यासाठी होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेमूळे स्वयंचलित, स्वयंनियंत्रित ड्रोन मानवरहित कारप्रमाणे काम करतील. उंची आणि अंतराची प्रोग्रॅमिंग केलेले ड्रोन नियोजित ठिकाणाचे काम करुन परत येतील. अतिवृष्टी भागात, पूरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी, भूकंपग्रस्त क्षेत्रात मदत करण्यासाठी, तसेच दुर्गम जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी आणि सर्वच आपत्तीव्यवस्थापन कार्यात मनावरहित ड्रोनचा सर्रास उपयोग होणार आहे. बोगद्याच्या कामाची प्रगती बघण्यासाठी किंवा जोखीम असलेल्या भागाचं चित्रण करण्यासाठी ड्रोनचा हमखास उपयोग होणार आहे. जंगली प्राण्याच्या हालचाली टिपण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी ड्रोनचा उपयोग होईल. सियाचिन सारख्या जगातील सर्वात उंच बर्फाळ युद्धभूमीची टेहळणी, जवानासाठी अन्न, शस्त्र व रसद पोहचवण्यासाठी, धोकादायक बर्फाळ प्रदेशाचं निरीक्षण करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होणार आहे.
पोस्टल पार्सल डिलीव्हरी करणाऱ्या ड्रोनबद्दल वृतपत्रात बातमी आली होती. 'टेकइगल' या स्टार्टअप कंपनीने गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनचा उपयोग पोस्ट विभागात कसा होऊ शकतो याची यशस्वी चाचणी घेतली होती. ड्रोनचा उपयोग पोस्टल सेवेसाठी जर झाला तर पार्सल पारंपारिक गतीच्या पाचपट गतीने डिलिव्हर होऊ शकतं, त्या चाचणीत हे निष्पन्न झालं. येणारं युग हे 'ड्रोनयुग' असणार यात शंका नाही!
© प्रेमप्रकाश जैस्वाल (पेडगावकर) ९८२२१०८७७५
ह. मु. छ. संभाजीनगर
No comments:
Post a Comment