ad1

Monday, 8 October 2018

पीसी-एमसीईडीचा स्तुत्य उपक्रम





उद्योजक प्रशिक्षण : पीसी-एमसीईडीचा स्तुत्य उपक्रम

नुकतंच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चिंचवड शाखेतर्फे घेण्यात आलेल्या 'डिजिटल मार्केटिंग' कार्यशाळेच प्रशिक्षण घेऊन मी परत आलो. मार्केटिंग हा प्रत्येक व्यवसाय-उद्योगाचा अविभाज्य भाग. त्यामुळं हा डिजिटल कोर्स शिकून घ्यावा अशी खूप दिवसापासून इच्छा होती. म्हणतात ना 'इच्छा प्रबळ असेल तर सारं घडून येतं.' पीसी-एमसीईडीकडून ही संधी चालून आली.  'शासकीय' असूनही पुढंमागं न पाहता मी ह्या तीन दिवसीय कार्यशाळेचं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्या अनुभवाबद्दल हा लेख.

चेंज इज कॉन्सटन्ट. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. आपल्या सभोवताली अनेक बदल घडताना आपण बघत असतो, त्याचा अनुभव घेत असतो.  आज संगणक व इंटरनेट क्रांतीनं या युगात प्रचंड बदल घडवून आणले आहेत. या बदलासोबत बदलणे प्रत्येकाला क्रमप्राप्त झाले आहे. थोडक्यात बदलाशी वाद न घालता त्याशी समरस होण्यातच सर्वांचं भलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटाचं तिकीट ऑन-लाईन खरेदी न करता पारंपारिक पद्धतीनं रांगेत उभं राहून,  रोख रक्कम देऊनचं तिकिट घ्यायचं ठरवलं तर आपल्या पदरी निराशाच पडेल. कारण हल्ली सर्व सिनेमागृह ऑन-लाईन तिकीट बुकिंगनं  हाऊसफुल्ल होत असतात. आणि यदाकदाचित आपल्याला तिकीट मिळालं तरी पाहिजे तशी आसनव्यवस्था मिळणार नाही.

आणि असंच उदाहरण आपण व्यवसाय-नोकरीतील मार्केटिंगच्या संदर्भात घेऊ शकता.  पूर्वी एखादी वस्तू-सेवेची मार्केटिंग करणं खूप क्लिष्ट, वेळखाऊ आणि खर्चिक काम होतं.  प्रचंड जाहिरात खर्च, मग सेल्स ऑफिसर शेकडो 'कोल्ड कॉल' करून लीड जनरेट करत असत, प्रत्येक्ष फॉल्लोउप होऊन शेवटी व्यवहार. प्रत्येक विक्रीमागे लागणार मनुष्यबळ, कार्यालय खर्च खूप जास्त असे. कंप्युटर आणि इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मार्केटिंगसह इतर क्षेत्रात एक मोठी क्रांतीच घडली. आज जगभरातील खरेदीदार आणि विक्रेता दोन्ही कोणत्यानं कोणत्या मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रीनवर सहज उपलब्ध असल्यानं जास्तीत जास्त  व्यवहार हे ऑन-लाईन घडत आहे.  त्यामुळंच उद्योगात टिकून राहण्यासाठी फक्त पारंपरिक मार्केटिंगवर सर्वस्व अवलंबुन न राहता नव्या 'डिजिटल मार्केटिंग' चे टूल्स शिकून घेणं, त्याचा योजनाबद्द वापर करणे आवश्यक आहे.

'आवश्यकता हि अविष्काराची जननी असते.' थोडक्यात समाजाच्या गरजेनुसारच नवीन वस्तू किंवा सेवा जन्म घेत असतात.  कदाचित त्यामुळंच शासनाच्या  'महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ'  यांच्या चिंचवड शाखेनं उद्योजकासाठी विविध नवनवीन कोर्सेसच प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. ज्यामध्ये आयात-निर्यात, डिजिटल मार्केटिंग, बिजनेस फायनान्स मॅनेजमेंटसह अनेक उद्योगिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण मोजक्या दिवसाचं आणि अत्यन्त माफक शुल्कामध्ये उपलब्ध आहे. एमसीईडी-पिंपरीचिंचवड शाखेचा हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे.  एमसीईडीच्या डिजिटल मार्केटिंगचा प्रशिक्षणार्थी या नात्यानं माझा हा अनुभव आहे.

बदलाच्या या युगात स्वतःस 'अपडेट' केलं नाही तर आपण 'आऊटडेट' होत जातो. जगात सर्व गोष्टी डिजिटल होत असताना फक्त पारंपरिक मार्केटिंग टूल्स वापरणे म्हणजे स्पर्धेतून माघार घेण्यासारखे आहे. तसेच जुनाट शस्त्राला 'धार' लावून घेणं कधीही चांगलं, म्हणून मी 'डिजिटल मार्केटिंग'च प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. या कोर्सचा प्रचार आणि प्रसार पुरेसा न झाल्यान ह्याचं प्रशिक्षण फक्त काही मोठ्या शहरातच उपलब्ध होतं. त्यातच प्रशिक्षणाची अफाट वीस-पंचविस हजार फी, हॉटेलजेवण आणि प्रवासाचा खर्च  सर्वांच्या आवाक्यात नव्हतं. त्यामुळं 'विद्येच माहेरघर' असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी कमी शुल्कात अशा प्रशिक्षनाची सोय उपलब्ध करून एमसीएईडी-पिंपरी चिंचवड शाखेनं महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी खूप मोठं काम केलं आहे.

उद्योगविश्व म्हणजेच खाजगी कंपन्या. घडीच्या काट्यावर, काटेकोर शिस्तीत, चकाचक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नोकरवर्गाचा 'शासकीय' संस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोणच खूप वेगळा असतो. किंबहुना तो नकारात्मक असतो असं सांगायला हरकत नाही. त्यांना बऱ्याच शंकाकुशंका असतात. जसकी शासकीय प्रशिक्षण- मग प्रशिक्षक कसे असतील? तळमळीनं शिकवतील का वरवरचं? खरचं शिकवतील की टाईमपास? पूर्ण शिकवतील का फक्त औपचारिकता! असे नानाविध प्रश्न पडने साहजिक आहे.

पण अनुभवी प्रशिक्षणार्थी म्हणून सांगतो कि शासनपुरस्कृत पीसी-एमसीईडी येथील प्रशिक्षन घेतल्या नंतर आपला शासकीय संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जातो. त्यांच्या संस्थेच्या नावाला साजेसं कामचं पीसी-एमसीईडी आज करत आहे. शासकिय असूनही दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात काहीच उणीवा राहू नये म्हणून एमसीईडी खाजगी क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून देत असते. या केंद्रातील प्रोजेक्ट ऑफिसर सर्व प्रशिक्षणार्थींना इतर उद्योगाची माहिती तसेच शासनाच्या योजनेची माहिती देत असतात. प्रशिक्षणार्थी उद्योजकांना ते आस्थेने, तळमळीने शिकवून त्यांना उद्योगनिर्मितीस प्रोत्साहित करत असतात. उद्योग हा देशाचा आर्थिक कणा आहे. देशाच्या औद्योगिक प्रगतिच देशाची पत, जीडीपी वाढवत असते. त्यामुळंच जीडीपीला महत्व आहे. त्यामुळं गरज आहे की सर्व एमसीईडी सारख्या इतर शासकीय संस्थेने शासनाचं उद्योग विकासाच धोरण राबवताना फक्त ते औपचारिकता न ठेवता इमानेइतबारे राबविले पाहिजे जेणेकरून पुढं अनेक उद्योजक घडून देशाची पत वाढेल आणि देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लागेल.

प्रशिक्षण कालावधीत एमसीईडीनं चहा, भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.  आमच्या या प्रशिक्षण प्रवासात उत्तम 'हमसफर' सहप्रशिक्षणार्थी लाभले त्यामुळं प्रवासाचा शीण जाणवला नाही, त्यांचे मनपूर्वक आभार. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात ही छोटी पण ज्ञानाने मोठी कार्यशाळा संपन्न झाली. त्यासाठी मी आभार मानतो एमसीईडी-पिंपरी चिंचवड शाखेच्या प्रोजेक्ट ऑफिसर श्री श्रीकांत कुलकर्णी सरांचे, ज्यांनी आम्हाला उद्योगासंदर्भी अत्यंत तळमळीनं बहुमूल्य मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित केलं. मी आभार मानतो आमचे प्रशिक्षक श्री श्रीकांत लांबोले सर, एक्सपर्ट फॅकल्टी श्री अभिजित धेंडे सरांचे. श्री युवराज लांबोले सरांनी चांगलं मोटिवेट केलं, त्यांचेही आभार.  पीसी-एमसीईडी संस्थेच्या इतर सर्व कर्मचारी वर्ग जे या उपक्रमाशी प्रत्येक्ष-अप्रत्येक्षपणे जुळलेले आहेत त्यांचे आभार.  पीसी-एमसीईडीच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा.


 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com

No comments:

Post a Comment