ad1

Thursday, 4 June 2026


                        

                                     उबंटू 

पैशाची हाव समुद्राच्या पाण्यासारखी असते. समुद्राचे पाणी पिल्याने तहान भागत नाही. उलट त्या खाऱ्या पाण्याने तहान वाढतचं जाते. तहान वाढली तसा मनुष्य पुन्हा जास्त पाणी पितो. शेवटी शरीरात मिठाचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मग ही हाव पद, प्रतिष्ठा किंवा पैशाची असू शकते.

आज येथे हे नमूद करायचं कारण काय? आज पैशामागे जग अधाशा सारखं धावत आहे आणि हा पैसा कमीत कमी कष्ट करून कसा मिळवता येईल याचा मनुष्य विचार करत आहे. राजकारणातून मिळणारा पैसा थोडा त्याच मार्गाचा.  निवडणुकीत दहा लाख लावा पन्नास लाख काढा!  अर्थात ते पन्नास लाख किंवा कोटी हे शासनाकडून त्या त्या शहर किंवा गावासाठी निधी स्वरूपात देण्यात आलेले असतात.  थोडक्यात गावातील इतर गोर-गरीब, दिन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी, मूलभूत सुविधेसाठी आलेला निधी हा वरच्या वर लाटला जातो. मूठभर लोकांचे कल्याण होऊन संपूर्ण गाव, शहर किंवा देश आहे त्यापेक्षाही खंगुण जातो.  हा प्रकार फक्त भारत देशात नाही तर जगातील इतर सर्व देशात कमी-जास्त प्रमाणात घडत असतो. स्वार्थी भौतिक सुखाच्या नादात मनुष्यचं मन एव्हड असंवेदनशील झालं की त्याला इतरांचा किंचितसा विचार करावयास वेळ नाही.

सर्व बाबतीत प्रगत, सुशिक्षित, नितीमत्तेची जान,सद्सदविवेक बुद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान असूनही मनुष्यजात असा स्वार्थी विचार करत असेल तर मग शहरीकरणाचा लवलेश नसलेली हजारो मैल दूर वनात राहणारी आदिवासी जमात अशाच स्वार्थीवृत्तीची असेल का? रानात वणवण भटकून मिळालेली कंद-मुळे, शिकार करून मिळालेलं मांस खातांना ते इतरांचा मुळीच विचार करत नसतील का?  

हे जाणून घेण्यासाठी एका मानवशास्त्रीय वैज्ञानिकांनी एक भन्नाट प्रयोग  केला.    त्यासाठी त्याने आफ्रिकेच्या दूर वनात जेथे खूपच अप्रगत मनुष्य वस्ती आहे अशा जागेची निवड केली. तेथे गेल्यानंतर त्याला दहा उघडी-नागडी उनाड मुलं जंगली खेळ खेळताना दिसली.  या वैज्ञानिकाने थोड्या दूर  अंतरावर एका झाडाच्या बुंध्याच्या सभोवताली गोलाकर अशी दहा फळ ठेवली.  आणि त्या दहा मुलांना 'जो पहिला येईल त्याला सर्व फळे मिळतील तेंव्हा शिट्टी वाजल्यानंतर पळत जाऊन ती फळ घेण्याचा आदेश दिला'.  वैज्ञानिकाला वाटलं की शिट्टी वाजल्यानंतर या पैकी एखादा मुलगा जोरात पुढे पळून हवे तितके फळ हातात घेऊन खात बसणार आणि मग इतरांना खायला काहीच मिळणार नाही, इतर उपाशी राहतील. पण प्रत्यक्षात घडलं उलटंच. ती सर्व दहा मुलं थोडंही न पळता एकमेकांच्या हातात हात घालून शांतपणे हळू हळू त्या झाडा जवळ गेली. प्रत्येकांनी एक एक फळ हातात घेतलं आणि एक गोलाकार रिंगण करून एकमेकांना देत ती खाऊ लागली. हा प्रकार बघून त्या वैज्ञानिकाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. असं अनपेक्षित घडलचं कसं यावर त्याचा विश्वासच बसेना. म्हणून वैज्ञानिकाने त्या आदिवासी मुलांची मानसिकता जाणून घेण्याचं ठरवलं. त्यावर मुलांनी सांगितलं की 'आमच्या समूहात जे जे मिळतं ते सर्वांचं असतं, त्यावर सर्वांचा सारखाच अधिकार असतो' इंग्रजीत यालाच ,'आय एम बीकॉज वी आर' असं म्हणतात. उबंटू नावानी हे तत्त्वज्ञानाच उदाहरण प्रसिद्ध आहे. मग मनात विचार येतो- जर हाच प्रयोग विकसित शहरातील मुलासोबत केला असता तर?

सांगायचं तात्पर्य असं की, या जगात सर्वांसाठी सर्व मुबलक प्रमाणात आहे. पण प्रत्येक्षात  ५% हावरट उद्योजक आणि राजकारणी नेत्याकडे ९५% संपती एकवटलेली आहे. आणि ९५% लोकांकडे फक्त ५% संपती आहे. याला 'संपत्तीची हाव'हे एकच कारण आहे. राजकारण्यांच्या भ्रष्ट्राचाराबदल प्रसिद्ध वक्ते शिव खेरानी खूपच छान उदाहरण दिलं आहे. एक भारतीय नेता काही कारणानिमित्त परदेशी जातो. तेथील मंत्री त्याची राहण्या, खाण्याची आणि मनोरंजनाची खूपच चांगली सोय करतो. न राहून आपला नेता त्याला विचारतो,' एक साधे राजकारणी असून तुम्ही माझी एव्हडी सोय कशी केली?' त्यावर तो मंत्री आपल्या नेत्यांना एका खिडकीजवळ घेऊन जातो. दूर एक पूल असतो त्याकडे बोट दाखवून तो आपल्या नेत्याला विचारतो, ' तो दूर पूल दिसतो का?'  हा नेता म्हणतो 'हो दिसतो की'.  त्यावर तो परदेशी मंत्री म्हणतो,' १०% मित्रा १०% !

काही वर्षानंतर तोच परदेशातील मंत्री भारतात येतो.  हा नेता परतफेड म्हणून त्याची खूपच सोयसाय करतो. भारावून जाऊन तो भारतीय नेत्यास 'एव्हड  जंगी स्वागत कसं करू शकतोस मित्रा?' याचं कारण विचारतो. त्यावर आपला नेता त्या नेत्यास एका खिडकीतून बोट दाखवत विचारतो,' तो पूल दिसतो का?' परदेशीय मंत्री म्हणतो- ' नाही दिसतं' . त्यावर आपला नेता म्हणतो,'१००% मित्रा १००% !'   मूळात तेथे पुलच नसतो!!

मग कसा विकास होईल गाव, शहर आणि देशाचा.  एकीकडे आडमाप कर आणि महागाईने जनता त्रस्त असते तर दुसरीकडे एखाद्या लाकडाला किटाणू वाळवी   जसे आतून पोखरून पोकळ करतात तसा भ्रष्ट राजकारणी, गुत्तेदार आणि त्याच्याशी लागेबंधे असलेल्या नोकरवर्गाकडून देश पोखरला जातो. उदघाटना आधीच करोडो रुपये खर्च केलेले पूल वाहून जातात. अचानक छत कोसळून हजार करोडो रुपयाचे नुकसान होते. आणि हा वाया गेलेला पैसा जनतेच्या कराद्वारे वसूल केलेला असतो. 

दहा सदस्य असलेल्या कुटुंबात आलेला पैसा जर एक दोन व्यक्ती स्वतःसाठी खर्च करून असतील तर इतर आठ सदस्याने जीवन कसं जगायचं? गाव-खेड्याच्या विकासासाठी आलेला निधी काही राजकारणी स्वतःचचं घर भरण्यासाठी खर्च करत असतील तर यासारखी 'नीच'ता नाही.  रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आरोग्य याबाबतीत गावातील इतर जनतेचे काय हाल होतील याबद्दल त्यांनी थोडी तरी संवेदना बाळगावी. आणि हिच बाब राज्य आणि देशासाठी लागू पडतं. 

गरज आहे थोडा विचार करण्याची, थोडी संवेदनशीलता जागृत करण्याची. तेंव्हाच नवा सूर्योदय होईल. सर्वसामन्याचा विकास होईल.


© प्रेम जैस्वाल, पेडगावकर 9822108775
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)

Tuesday, 26 May 2026


                  





लाल पटका ( आमचा बाप )

काही व्यक्तींची देहबोली खूप प्रभावी असते. त्यांच्या चेहऱ्यावरीलं हावभाव, देहबोली सतत संवादाचे काम करत असतात. आमचे पिताश्री शंकरलाल म्हणजे 'दादा', असंच एक व्यक्तिमत्व होतं. साडे-पाच फुटापेक्षा जास्त उंची, मध्यम कडक आंगकाठी. पांढरा सदरा-धोती, डोक्यावर लाल फेटा चढवल्यानंतर त्यांचा गोरापान चेहरा भलताच उठून दिसायचा. तशी आमच्या भितीत वाढ व्हायची. जोरात चालतांना करsss करsss असा आवाज करणारे चामडीजोडे त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावायचे. सभोवतालच्या चार गावातील लोकांत त्यांच्याविषयी आदरयुक्त भिती होती. एका हाताने बंद छत्री टेकवत जेंव्हा हि स्वारी झप झप झोकात चालायची तेंव्हा आदराने लोकांचे हात 'राम राम ठोकण्यासाठी' वर व्हायचे. त्यांना बघताच गल्लीबोलीत पत्ते, पैशाचे डाव खेळणारी पोरंसोर मंडळी धूम ठोकून पसार व्हायची. कारण चालत चालता चामडीजोडे सैल करून मारण्याच खास कसब त्यांच्याकडे होतं! शिवाय त्यांच्या भारदस्त आवाजात एक दरारा होता.  लहानपणापासून आम्ही वडिलांना 'दादा'च म्हणायचो ?  कदाचित गावातील इतर समाजातील मंडळी त्यांना 'दादा' नावांनी हाक मारत असावी, तेच पुढे चालत गेलं. हा लेेेख खास त्यांंच्या विषयी.

निजामच्या काळात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांच शिक्षण मोडी वाचण्या-लिहिण्यापूरतच झालं होतं. पण जीवनाच्या विद्यापीठातलं त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि जीवनमूल्याचे संस्कार एखाद्या पदवीधराला लाजवणारे होते. 'मग स्वतः जुजबी शिकून तुम्ही आमच्या शिक्षणाच्या पाठी का लागलात?'  या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एका घटनेची आठवण करून सांगितलं- त्याकाळी क्वचितच गावात, पोलीस निरीक्षक(चीफ साहेब), तहसीलदार, बीडीओ अशी अधिकारी मंडळी भेट द्यायची. अशा दुययम, तृतीय वर्ग कर्मचाऱ्यांचा खेडेगावात प्रचंड दरारा असायचा. गावकरी आपल्या परीने त्यांची चांगली सोयसाय करायचे. सर्व गाव त्यांना बघायला गोळा व्हायचा.  मग ती अधिकारी मंडळी जास्तीच ऐटीत येऊन बाजेवर चहाचे फुरके मारत लोकांवर इंग्रजी शब्दफेक करायची. बिचाऱ्या गावकऱ्यांना त्या शब्दातलं अ कि ढं कळत नसे. पण साहेबांच्या विंग्रजीने ते खूपच प्रभावित होतं.  बाप रे, साहेब खूपच हुशार आहेत असं त्यांना वाटे. इंग्रजी म्हणजे हुशार हा गैरसमझ तसा जुनाचं.  साहजिकच अशा घटनेने आमचे दादा बेचैन होतं. या घटनेने दादाच्या मनात शिक्षणाविषयी जिद्द निर्माण केली. शिक्षण सर्वोपरी आहे हे ते समजून गेले. दूरदृष्टी निर्माण होते ती अशी. मग काय, आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत आम्हा भावंडाना शिकविण्याची जिद्द सुरु झाली. गावातून तालुकाच्या ठिकाणी मग औरंगाबाद असं आम्ही सर्व शिक्षण घेत गेलो. त्यांच्या या ध्यासामुळे कठीण परिस्थितीत चुलत-सख्खे असे आम्ही सात भावंड उच्चशिक्षित झालो. एक जिल्हा न्यायाधीश, दोन प्राध्यापक, एक डॉक्टर, एक एम.ए., मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर सर्वात लहान भाऊ कृषी अभियांत्रिकी पदवीधर झाला. शिकलेल्या सुना येऊन 'एक उच्चशिक्षित कुटुंब' अशी समाजात वेगळी ओळख निर्माण झाली. अर्थात हजार वस्तीच्या छोट्या पेडगावासाठी हा बदल खूपच मोठा होता. समाज आणि सभोवतालच्या चार गावाला प्रेरित करणारं एक ऊर्जास्रोत होतं. अर्थात, मुलांना पारंपरिक शेती-धंद्यास न जूपता उच्च शिक्षण दिल्याचा दादांना प्रचंड अभिमान होता आणि तसं ते मोकळं बोलूनही दाखवायचे. विशेष म्हणजे , खूप शिकलेले मुलं म्हणजे मोठया पदावर नोकरी म्हणजेच अफाट पैसा, असे त्यांचे संकुचित विचार मुळीच नव्हते. धनसंपत्तीमुळे नाही तर कुटुंबाच्या उच्चशिक्षणातील प्रगतीमुळे दादांचा दरारा वाढतंच गेला. आज हा शिक्षणरूपी वटवृक्ष खूप बहरला आहे. पारंब्या फुटाव्या तसे कुटुंबातील अनेक मुलं-मुली डॉक्टर, इंजिनियर होऊन फक्त अर्थार्जनच्या पाठी न धावता समाजसेवा करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने घरातील मुलांनी फक्त सामान्य महाविद्यालयात प्रवेश नं घेता  आयआयटी, एम्स, आयआयएम, ऐनआयटी, बिट्स पिलानी सारख्या संस्थेत गरुड झेप घेतली आहे. मग या वृक्षाच्या कलमा इतर ठिकाणी लावल्या गेल्या, त्याही वृक्षात रूपांतर होऊन वाढल्या.

असं घडत असताना आमच्या कुणाच्याही शाळेत त्यांनी भेट दिलेली मला आठवत नाही. मी चौथ्या इयतेत शिकत असतानाच फक्त एक प्रकरण मला आठवतं - घटक चाचणीत भरपूर लिहूनही आमच्या मुख्याध्यापकांनी मला कमी गुण दिले होते. माझं हे गाऱ्हाणं कुठून तरी दादांना कळालं. दुसऱ्या दिवशी मोठे गुरुजी (मुख्याध्यापक) आणि दादाची सहज भेट झाली. गप्पाच्या ओघात दादाने माझं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडलं. तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी माझी कान उघाडणी केली,  'प्रेम्या, एक पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर गेला' या एका वाक्याच्या उत्तरा ऐवजी तू त्या पक्षास इतरत्र फिरवून पाच वाक्य लिहिलेत म्हणजे जास्त गुण मिळत नाहीत'!  ललीत लेेेखन म्हणजे 'वित भर जीवाला हातभर झगा!' कदाचित माझ्या लिखानाच बीज बालपणीच पेरलं गेलं असावं.

दादा वैद्य नव्हते पण गावी-परगावी कुणी आजारी आहे असं माहित होताच हातातील काम बाजूला सारून ते आधी धावायचे. त्यासाठी नात्याचे बंधन नव्हते. लगेच 'तू घाबरू नकोस तुला काही होणार नाही. वेडा आहेस का, थोडी हिम्मत राख' असा हक्काचा धीर देत त्यांचा हेकळणी, तुळस, सारख्या औषधी झाडपाल्याचा इलाज सुरु व्हायचा. पूर्वी गावात डॉक्टर-दवाखाने नव्हते. शेत-घरकाम करताना गावकऱ्यांना मार लागायचा, जख्म व्हायची.  कधी केसतोड तर कधी हाड टीचायचे. गरीब गावकऱ्यांना शहरात जाऊन इलाज करणे शक्य नसायचे त्यामुळे ते दुखणे अंगावर काढीत. दादाला हे माहित पडलं की ते स्वतः रोग्याकडे धावायचे. लगेच एखादी काच फोडून ते त्यातील पु काढून, स्वच्छ करून त्यावर झाडपाला लावून जख्म बांधून टाकायचे. बघणाऱ्याला ते किळसवानं वाटायचं पण दादांसाठी ते नेहमीच काम होतं. अशा रुग्णसेवेत त्यांचा हातखंडा होता. तूटलेलं हाड बांबूच्या कम्बड्या बांधून ते जोडलं जायचं. कालांतराने तो रोगी बरा होऊन कामाला जायचा. काय मिळत असावं त्यांना अशा सेवेत? पण ते करायचे.

त्यांचं हे रुग्णप्रेम फक्त मनुष्यजातीपुरत मर्यादित नव्हतं. एखादी गाय, म्हैस किंवा बैल प्राणि आजारी आहे हे माहित पडलं की ते जिद्दीने पेटून उठायचे. मग इतर कामे आपोआप बाजूला, प्राथमिकता फक्त तो रोगी. माझ्या बालपणीची ती घटना. भर दुपारी शेतातून वाघा गडी धावत आला होता. कंठया बैलाला पान लागला होता. आमच्या गावच्या भाषेत पान लागने म्हणजे सर्पदंश. बातमी एकूण दादाला चलबिचल होताना मी पाहिलं होतं. दुपारी गड्यानी कंठयाला बैलगाडीत टाकून घरी आणलं. धोतर खोसून गड्याला सोबत घेऊन दादाचा झाडपाल्याचा इलाज सुरु झाला. हळूहळू गावातील लोक जमा झाले. खंडीभर गुरात लाल्या-कंठया सर्वांची आवडती जोडी. बालपणी मी सुद्धा ती जोडी हाकली होती.  कंठया गेला तर जोड फुटणार होतं. धांदीन पाय बांधलेल्या कंठयाच तोंड जबरीने फाकवून त्यात काढे, औषध टाकले जात होते. कंठया दुःखाने तडफत होता. शेवटी जे नको होतं ते झालं.  विष कंठ्याच्या अंगात भिनत गेलं.  सूर्य मावळला होता, कंठयाने शेवटचा श्वास घेतला. कंठया गेला. बैलाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत दादा हरले.  दुःख अनावर होऊन दादा ढसढसा रडले. तो दिवस मला आजही आठवतो. मनाने पाषाणासारखा कठोर मनुष्य रडू शकतो, मी ते पहिल्यांदा पाहिलं होतं.

शेतीची कामं आणि इतर व्यवसायामुळे ते कधीही घरी बसलेले आम्हाला आठवत नाही. सुर्योदयापूर्वी बांड्या घोड्यावर ती स्वारी परगावी निघून जायची. ते परत येईपर्यंत आम्ही झोपी जायचो.  बालपणीचे आम्हा भावंडाचे तंटे प्रकरण 'दादाला सांगू का?' या एका वाक्याने संपायचे. त्यामुळे त्यांच्यासमोर बसून मनमोकळं बोललेलं मला आठवत नाही. दोन वेळेस मार खाल्याचं मला नक्की आठवतं. ते घरात तर आम्ही बाहेर किंवा ते परगावी तर आम्ही घरात.  गावपंचायत वगळता त्यांना गावातील राजकारणात विशेष रुची नव्हती. क्वचीत गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच नेमणुकीविषयी ते आपलं मत मांडायचे. 

त्यांना सर्वात जास्त तिटकारा होता तो अंधश्रद्धा, कर्मकांड आणि त्यायोगे होणाऱ्या भक्तांच्या लुटीचा. देव मंदिराच्या नावाखाली होणारी लुट त्यांना आवडत नसे. काम सोडून रामाच्या पाठीमागे धावणारी जनता त्यांना आवडत नसे. 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' किंवा 'काय काशी करिती गंगा। भीतरी चांगा नाहीं तो।।’  असंच त्यांचं म्हणणं होत. पंढरपुर, तिरुपती बालाजी सारख्या दर्शनात लोकांना लुबाडणारी मंडळी, तेथील अस्वच्छता बघून त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर ते अध्यात्मापासून थोडं दूरचं गेले.

कर्तृत्त्ववान पूर्वजांची महती काही ओळीत सामावने कठीण जाते.  दोन ओळीच्या मध्ये सुद्धा बरंच काही बोलण्यासारखं असतं. खूप खस्ता खालेल्या असतात त्यांनी. प्रसंगी अपमान सहन केलेला असतो. अशिक्षित वातावरणात 'शिक्षण' असा चाकोरी बाहेरचा विचार करणे तसं सोपं नव्हतं. एक प्रकारचा जोखीम पत्करल्यासारखा तो प्रकार होता. क्वचीत थोडे मागे ओढण्याचे प्रयत्न झालेले असतात. शोकांतिका अशी की हे सर्व जोपर्यंत आपल्यावर तशी वेळ येत नाही तो पर्यंत कळत नाही! 

आज त्याच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गावात किती तरी तरुण मंडळी उच्चशिक्षित होऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात नोकरी करत आहेत. साहजीकच त्यामुळे आज गाव शिक्षित होऊन सुधारणा होत आहे. गरज आहे की गावातील तरुण मंडळींनी इतरांना उच्चशिक्षण घेण्यास मदत व मार्गदर्शन करण्याची. जेंव्हा केंव्हा गावात शिक्षणाविषयी चर्चा होईल, स्व. शंकरलाला म्हणजे आमच्या दादाच नाव आवर्जून घेतल्या जाईल. थोडी का होईना, 'मागे कीर्ती उरावी' ती अशी.   त्यांच्या पालखीचे भोई होऊन त्यांनी शिकविलेल्या जीवनमूल्यावर आणि दाखविलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली.

© प्रेम जैस्वाल, पेडगावकर,
    ह.मु. औरंगाबाद, मो. ९८२२१०८७७५

Saturday, 25 April 2026

गुजरा हुवा जमाना.....

                  
            

गुजरा हुवा जमाना.......

"मुस्सा मामू सायकील होना"
" कित्ते टेम के लिए होना? पछान बताव?"
"एक घंटा,  बडेभाई हमेशाच ले जाते, मैं भी लेगया पहले तुमारेसे."

लोखंडाच्या गंजलेल्या टपरीवर मलकट पांढरा कुर्ता पायजामा नेसलेले, दाढी, चेहऱ्यावर वण व कायम वैफल्यग्रस्त दिसणारें मूस्साभाई कधी अंथरलेल्या पोत्यावर तर कधी लोखंडी खुर्चीवर विराजमान असायचे. समोर एक छोटा लाकडी टेबल, त्यावर जुनं फाटकं रजिस्टर, दोऱ्याने बांधलेला पेन किंवा रिफील असे.   त्यापुढे आठ-दहा जुन्या सायकली ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभ्या असत. चैनीच कव्हर व मागच्या मडगार्डवर ठळक अक्षरात नंबर पेंट केलेलं असायचा. टपरीच्या आत सायकल रिपेरिंगसाठीचे हत्यार, जुन्या चाकांच्या रिंग, सायकल सीट घंट्या व इतर सुटे भाग अस्ताव्यस्त पडलेले असे.  टपरीच्या बाजूला मळकट बादलीत पाणी, हवेचा पम्प, पंपचरचं सामान आणि अस्ताव्यस्त पडलेले सायकलचे ट्यूब-टायर दिसे.  मुस्साभाईच्या बाजूला चहा-भज्जेच्या एक-दोन हाटेली आणि पान-टपऱ्या होत्या.  लहान मुलं ढुंकूनही त्या टपऱ्याकडे वळत नसत.  तिकडे वयस्कर मंडळीं, मोंढ्याचे व्यापारी, कर्मचारी वर्ग तेथे चहा-पान व धूर सोडतांना दिसायची. 

सकाळी मूसाभाई दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून बसलेले असायचे. गावखेड्यात मुक्कामी  असलेल्या बसेस साधारण आठ वाजता वडाच्या झाडाजवळ धूळ उडवत थांबायच्या. बाजार, खरेदी, शेतमाल व कापूस विक्रीसाठी आलेली ग्रामस्थ मंडळीसाठी हा थांबा सोयीचा होता. कपडे झटकत प्रवासी बसमधून उतरायचे.  कच्च्या रस्त्याने उडणाऱ्या धुळीने ते माखलेले असायचे. बाहेर गावी जाणारे प्रवासी मात्र मुख्य बसस्टँडला जात. येथूनच सायकल भाड्याने घेऊन बाजारात, कापूस विकत घेणाऱ्या जिनिंग मिल कडे लोकं जायची. भाड्याने घेतलेल्या सायकलमुळे कामं पटपट व्हायची. जातांना सायकल परत करुन लोकं बसस्टँड गाठायची. नाहीतर 'नाईटचार्ज' लागत असे.

त्याकाळी मोजक्या लोकांकडे सायकली असायच्या. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात खोली घेऊन राहणाऱ्या तरुणानां भाड्याच्या सायकलीशिवाय पर्याय नसे. अशी काही 'शहरी' तरुण मंडळी राजेश खन्ना, अमिताभ सारखी हिप्पी वाढवून सायकल चालवीतांना, कट मारतांना दिसायची.  सायकल विकत घेण्याची आयपत नसल्यामुळेच भाड्याने सायकली घेतल्या जायच्या. किंवा दोन तीन मित्रामध्ये एक सायकल असायची. संपूर्ण गावामध्ये क्वचित एखाद्या कुटुंबाकडे ही चैनीची वस्तू असायची.  एखादा पाहुणा सायकलने गावात आला तर त्या सायकलभोवती चकरा मारून ती मालकीची आहे की भाड्याची, लोकं याची खात्री करून घेत.  रस्तेच नव्हते तेंव्हा दिवसात एक एसटी बस असे. इतर वेळेसाठी पर्याय एकच होता - भाड्याची सायकल.

मला आठवतं, ८वीत असतांना झेंडावंदन करुन आम्ही सायकल शिकण्याचं ठरवलं.  मुस्साभाईला ओळख सांगून त्याकडून दोन सायकली घेतल्या. सोबत मोठे बंधू जयभैय्या आणि मीत्र अशोक ठाकूर होता.  अंगुठ्याने टायरची हवा चेक करत त्याने आम्हांला दोन सायकली दिल्या.  पोलीस मैदानावर शिकतांना मी ब्रेक दाबायचं विसरलो.  सायकल सरळ पोलीस कार्यालयाच्या फेंसिंगला जाऊन धडकली. सायकल समोरचा एसएस स्टीलचा लोगो 'H' वाकला व मलाही थोडं लागलं. माझ्या जखमेपेक्षा मला त्या वाकलेल्या H लोगोची चिंता वाटू लागली. मुस्साच्या लक्षात आलं तर काय करायचं? ते आधीच तसं होतं 'हमने कुछ नही किया' असं सांगायचं का? पण आमचं नशीब, त्याचं लक्ष त्याकडे गेलंच नाही. भाडं भरून आम्ही सुटलो.

'संपूर्ण भारत देशात हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध होता. खरं तर आमचा तो भ्रम होता. आमचे पाऊल कधी हिंगोलीबाहेर पडलेच नसल्याने आम्हालासुद्धा ते खरंच वाटायचं. एकदा दसऱ्यात एक प्रसिद्ध सायकल कलाकार आला. त्याच्या नावावर 'अखंड सात दिवस' सायकल चालविण्याचा विक्रम होता म्हणे. अशी सर्वत्र चर्चा झाली. रामलीला मैदानावर, आम्रपालीजवळ त्याने 'शो' सुरु केला. राजेश खन्नासारखी हेअरस्टाईल असलेला तो कलाकार गोलाकार मैदानात अखंड सायकल चालवतांना दिसला. मधेच तो चालत्या सायकलीवर शर्ट बदलयाचा तर मधूनच पाणी पीत होता तर कधी दोन्ही हात सोडून हळूहळू गोलाकार सायकल फिरवत होता.  आत एका कपड्यावर प्रेक्षक पैसे टाकत होती.  एक तास हा प्रकार बघून आमच्यासारख्या नवशिक्याना खूपच आश्चर्य वाटायचं. तो कसा झोपत असेल? थकल्यानंतर विश्रांतीचं काय? जेवन आणि हो प्रात:विधि?  पण असे प्रश्न आमच्या बालबुद्धीत येण्याचा प्रश्नच नव्हता.

आठवीचं वर्ष संपता संपता मी सायकल शिकलो. अधून मधून मी सायकलने टायपिंग क्लासला जात असे. ऐके दिवशी आम्ही एसटी बसने बाहेर गावी जाणार होतो. पेडगाव ते हिंगोली आणि एक तासानंतर बाहेर गावी जाणारी एसटी बस होती. त्या एक तासात काम करून मला परत बसस्टॅन्डला यायचं होतं.  मी भाड्याची सायकल घेतली. वळनावर वाळूवर चाक जाताच स्लिप होऊन मी पडलो. खुराणा बंगल्याच्या दक्षिणेला खाली खोलगट जमिनीवर चौधरीची लॉउंड्री होती. नेहमीचा ग्राहक त्यामुळे चौधरीने मला उचलून घरी आणलं. एक तासात माझ्या गळ्यात फ्रॅक्चरचा पट्टा आला. उजव्या हाताला प्लास्टर चढविण्यात आलं होतं. ऐन परीक्षेच्या काही दिवसाआधी हा अपघात घडला होता. चिंता दोन परीक्षेची होती, टायपिंग व आठवी वार्षिक. कंदी रुग्णालयातून पैंडल रिक्षाने वर्गशिक्षक खिल्लारे सराचं घर गाठलं. 'सामायिक परीक्षेच्या मार्कांवरून वार्षिक परीक्षेचे मार्क मिळतील, चिंता करू नकोस' सरांनी असं आश्वासन दिलं. आठवी पास झालो. 30 WPM ऐवजी सरळ 40 WPM परीक्षेला बसून टायपिंग परीक्षा पास झालो.

दहावीला गणिताच्या पडोळे सरांची ट्यूशन अगदी सकाळी सहाला असायची. फटलक फटलक कव्हरला घासणाऱ्या चैनचा आवाज आणि घंटीचा गजर करत आम्ही गल्याबोळ्या पार करत ट्यूशन गाठायचो. जैन मंदिराच्या भोंग्यातून 'मैं नही माखन खायो...' अनुप जलोटाची प्रभातभजन कानी पडायचे. मधूनच ते 'हिरे मोतीsssss.ईईई ' असा लांब आलाप घ्यायचे. त्या लांब आलाप दरम्यान आपण किती सायकल चालविली ते मी मोजत असे. आता तो फालतू प्रकार आठवून माझं मलाचं हसू येतं. हिंगोली आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची झुंड सायकलने ये-जा करतांना दिसायचे. त्याकाळी महाविद्यालयाचा दर्जा नावाला साजेसा होता. याच काळात शहरापासून दूर असलेल्या शेतात पहिल्यांदाच मी एक जेन्टस आणि एक लेडीज सायकली जोडीने उभ्या बघितल्या!

कालांतराने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पगारी वाढून रस्त्यावर स्वतःची सायकल, लुना, एम-80 सुद्धा दिसू लागल्या. पण त्या 'भाड्याच्या सायकली' इतिहास जमा झाल्या. पुढे इंजिनियरिंगला असतांना विद्यार्थी आणि बरेच प्राध्यापकसुद्धा सायकलने महाविद्यालयात यायचे. आज देशातील मोठया शहरात स्वतः चालविण्यासाठी सायकलीप्रमाणे कार भाड्याने मिळतात. पुढे एआय तंत्रज्ञानावर आधारित चालकरहित कारसुद्धा मिळतील. पण आमच्यासाठी त्या भाड्याने मिळणाऱ्या सायकली कायम आठवणीत राहणार - पचास पैसे एक घंटा!

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर 
मो. 9822108775 


Tuesday, 21 April 2026

कॉर्पोरेट हॉस्पिटलचा विळखा


तीन वर्षांपूर्वीची घटना. डेंग्यूने आजारी मुलीच्या मृत्युची बातमी  कदाचित सर्वानी वाचलीच असावी. आजारी ७ वर्षाच्या मुलीचे पालक तिला दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम येथील पंच तारांकित कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एडमिट करतात. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर ती  दगावते.  हॉस्पिटलच नाव खराब होवू नये म्हणून तिला त्वरित घरी घेवून जा असे सांगण्यात येतं. सामान्य अशा 'डेंग्यू' आजाराचं १८ लाखाचं बिल त्या पालकांच्या हातात थोपवलं जातं. कळस म्हणजे ज्या शेवटच्या कपड्यात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो त्याचेसुद्धा बिल पालकाकडून वसूल केल्या जातं! विशेष म्हणजे हे बिल एकदम बरोबर कसं याचं सविस्तर विश्लेषण 'कॉर्पोरेट हॉस्पिटल' चा स्टाफ 20 लिखित पानात पटवून देतं!

या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघनं साहजिक होतं. सुपरसॉनिक गतीने ही बातमी जेंव्हा समाज माध्यमामधे व्हायरल झाली त्यामुळे आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांना चौकशीचे आदेश दयावे लागले. कैंसर, एखाद्या अपरीचित दुर्धर आजार, मल्टीपल सर्जरी किंवा दीर्घ काळासाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरी एकंदरित बिल एव्हड़ होवू शकत नाही, मग डेंग्यूसारख्या सामान्य आजाराच एव्हड़ अफाट बिल जनतेला खुप जास्त वाटनं साहजिक. आज गांव-तालुका पातळीवरील सामान्य दवाखान्यात शेकडो डेंग्यु रुग्ण उपचार घेताना आणि बरे होताना आपण पाहतो. क्वचितच, जेंव्हा पेशन्टला व्हेंटीलेटर गरज पड़ते तेंव्हा रुग्ण शहरातील मोठ्या किंवा शासकीय हॉस्पिटलमधे जातात किंवा त्याला 'रेफर' केल्या जातं. पण तेथील खर्च एव्हड़ झालेलं ऐकिवात नाही. विशेष म्हणजे फोर्टिसच्या बिलामधे वापरल्या गेलेल्या कन्झुमेबल्स आणि त्याचे भाव बघून कोणाचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. चौकशी अंती असं आढळलं कि या बिलामधील सर्वात मोठा हिस्सा हा 'सर्जीकल मटेरियल' चा होता. ज्यामधे एकूण ६६० डिस्पोजेबल इंजेक्शन, २७७६ हैण्डग्लोवचा खर्ज जोडण्यात आला होता. एका ₹१३/-च्या ग्लुकोस्ट्रीपसाठी त्या पालकाकडून ₹२००/- चार्ज घेण्यात आले होते.

यमो हरति प्रणान्‌, वैद्य प्राणन्‌धनानिच । सुभाषितावरून  वैद्यकीय व्यवसायावरील टीका नवीन नाही.  परंतु मागील काही दिवसात डॉक्टरावर होणाऱ्या टिका वाढत्या असून जीव घेण्या हल्ल्यानी डॉक्टर मंडली त्रस्त झाली आहेत. समाजात डॉक्टरप्रमाणे इतरही व्यवसायिक,उद्योजक किंवा राजकारणी आपन बघतो. फक्त दोन निवडणुकी दरम्यान त्यांची इनोव्हा, बंगलो, आणि इतर कमाई कितीतरी पटीने वाढलेली आपण वाचतो.     पण त्यांच्यावर लोकांनी हल्ले केले किंवा जाहीर वाच्यता केलेली कुठेच ऐकीवात नाही. किंवा त्यांना कुणी देशलुटारू, भ्रष्ट म्हणण्या इतपत कुणाची हिंमत होत नाही. किंबहुना अशी हिंमत होत नाही. कारण त्यांची प्रतिक्रिया परवडणारी नसते.  पण डॉक्टर म्हंटले कि 'एक सॉफ्ट टारगेट'! रोज एक तरी बातमी वर्तमानपत्रात वाचावयास मिळते. आधीच अशा घटनेमुळे त्रस्त, अडचणीत आणि धाकधुकीत असलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाचे हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरांसाठी वरील बातमी ऐकून 'भित्यापाठी वाघोबा' अशी स्थिति झाली.

पाण्यातील मासा 
झोपणार कैसा 
जावे त्यांच्या वंशा 
तेंव्हा कळे l 

डॉक्टरांवरील वाढते हल्ले, राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, समाजातील ढासळती प्रतिष्ठा, क्लिष्ट शासकीय नियमावली आणि शेवटी 'थँकलेस जॉब' या कारणांनी येत्या काळात वैद्यकीय क्षेत्राची अवस्था खूपच बिकट होत जाणार आहे.  एकेकाळी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असं समीकरण होतं. पण हल्ली कोणताही डॉक्टर स्वतःच्या मुलाला किंवा मुलींना वैद्यकीय क्षेत्र निवडू देत नाही. ऐकून सर्वच डॉक्टरांची मुलं अभियांत्रिकीसाठीची जेईई परीक्षा देऊन आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी किंवा इतर महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. यामागील हेतू स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आपल्या मुलांना वैद्यकीय क्षेत्रात करियर घडवू  द्यायचं नाहीये.   आज घडीला देशातील २६ लाख विध्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात. त्यातील खूप कमी मुलं ही डॉक्टरपुत्र  असतात. 

आज मुम्बई दिल्लीसारख्या मेट्रो शहरामधे नोकरीस असलेल्या, आयटी क्षेत्रात काम करणारी सॉफ्टवेअर मण्डळी भरपूर मोठ्या पैकेजवर काम करत असते. प्रत्येक वस्तु ब्रैंडेड घेणारा पैकेजवाला हा नोकरवर्ग किरकोळ आजरासाठीसुद्धा कोर्पोरेट हॉस्पिटलमधे भरती होतात. आपल्या परिसरातील छोट्या हॉस्पिटल नर्सिंग होममधे इलाज होत असतानाही हा वर्ग एक ब्रेंड म्हणून कॉर्पोरेट हॉस्पिटलकड़ेच आकर्षित होतो. एकच छताखाली सर्व सुविधा,  'कैशलेस हॉस्पिटलायझेशन', राजीव गांधी योजना, महात्मा फुले योजनेमूळे पैशे भरायची गरज पडत नाही. पण अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमधे त्यांच्या आजारावर इलाज करणारे डॉक्टर निष्णात आहेत कि नाही याचीही त्यांना कल्पना नसते. 

एक नफाखोरीचा उद्योग म्हणून प्रत्येक शहरात कितीतरी कॉर्पोरेट हाउस चैरिटी आणि समाजसेवेच्या नावाखाली हॉस्पिटल सुरु करत आहेत. ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचं कामकाज एखादया 'फाइव स्टार' व्यवसायिक हॉटेलसारखं असतं. ज्यामधे वेगवेगळे मैनेजमेंट डिपार्टमेंट आणि मोठा स्टाफ असतो ज्यांचा हॉस्पिटलला जास्तीत जास्त नफा कमवून देणे हाच मूळ हेतु असतो. कॉर्पोरेट म्हंटल तर तेथे खाजगी कंपनीचे सर्व नियम लागू पडतात. जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांच्या हाताखाली वेगवेगळे जनरल मैनेजर, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेप्यूटी मेनेजर आणि स्टाफ असा अफाट पसारा असतो. मग त्यांचा पगार, भत्ते, कमिशन आणि इतर खर्च एव्हड़ा असतो कि हॉस्पिटलची गाड़ी सुरळीत चालून भरपूर नफा व्हावा म्हणून एकीकडे जास्तीत जास्त 'कॉस्ट कटिंग' आणि दुसरीकडे पेशंटचे 'अफाट बिल' अशी 'नफेखोरीची योजना' असते. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी दिलेलं टारगेट पूर्ण करणारे गल्लेलठ पगार असणारे 'एमबीए स्मार्ट मेनेजर' ची गरज असते. कदाचित याच कारणाने बऱ्याच नॉन-मेडिको स्टाफचा पगार अशा हॉस्पिटलमधे डॉक्टरापेक्षा जास्त असतो. अशा हॉस्पिटलचा प्रभावी 'मार्केटिंग व पब्लिसिटी' डिपार्टमेंट असतो ज्याना मंथली ठराविक पेशंट आणन्याचं टारगेट, कमीशन दिल्या जात. जवळ जवळ सर्वच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही धनाड्य आणि कोणत्यानं कोणत्या राजकिय पक्षाशी जवळीक असलेल्या उद्योजकाची आहेत. 'सेवा पेक्षा मेवा प्रिय' असलेल्या या उद्योजकात रुग्णसेवा ही फक्त तोंडाला लावण्यापूरती किंवा कागदावर दाखविण्यापुरती असते. 

प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल हे एक चैरिटेबल ट्रस्ट आणि 'रिसर्च सेंटर'ही असतात. गरीब रुग्णासाठी काही बेड येथे राखीव असावित, त्यांना कमी दरात सुविधा मिळावी तसेच मेडिकल क्षेत्रात या रिसर्च सेंटरनी नवनवीन संशोधन करावित अशी सरकारची अपेक्षा असते. पण तसे काही संशोधन किंवा प्रयोग होताना दिसत नाहीत कदाचित या उदासीनतेमुळे वैद्यकिय संशोधनात आपण इतर पाश्चात्य देशाच्या तुलनेत बरेच मागे आहोत. तसेच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही एक चैरिटेबल ट्रस्ट असते आणि नियमाप्रमाने कॉरपोरेट होस्पिटलची काही बेड गरीब पेशंटसाठी राखीव ठेवावे लागते, पण प्रत्यक्षात हे सर्व कागदावर दाखवले जाते. आज किती कॉर्पोरेट हॉस्पिटल हा नियम पाळतात? दूसरा मुद्दा असा की हॉस्पिटल जरी चैरिटेबल असेल तरी तेथील मेडिकल आणि सर्जीकल स्टोरला हे चैरिटीचे नियम लागू होत नाहीत. आणि हॉस्पिटलच्या एकन्दरीत बिलात मेडिकल, डिस्पोसजेबल, सर्जिकल आणि शेवटी टैक्सचा खुप मोठा वाटा असतो. मग १५ दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन मधे २७७६ हैण्डग्लोज, ६६० सिरिंज वापरले जाते. हे किंवा अशी ओषध आणि सर्जीकल अतिशय घासाघिस करून कमीत कमी दरात मोठ्या फार्मासूटिकल किंवा सर्जीकल कम्पन्याकडून खरेदी केली जातात. त्या मोठ्या खरेदीवर मिळनारी इतर 'स्किम'चा हिशोब लावला तर ज्या ग्लुकोस्ट्रिप साठी ₹200/- हॉस्पिटल चार्ज करतात ती त्यांना फक्त ₹ 13/-ला पड़ते! अशा प्रकारे रुग्णाला चार्ज करताना त्याची किंमत अवाच्या सव्वा लावली जाते. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पेशंटशी व्यक्तिगत सम्बन्ध नसते किंवा सम्बन्ध ठेवायची गरज नसते. त्यामुळे तो पेशंट गरीब आहे का आमिर याच्याशी त्यांचं काही देणेघेणे नसते. त्यामुळे बऱ्याचदा एकाच पेशन्टला किती तरी वेगवेगळे डॉक्टर बघून बिल वाढवत जातात, नको त्या टेस्ट, इन्वेस्टिगेशन सांगितले जाते आणि कन्झुमेबलच बिल चेपल्या जाते. उदा. एखाद्या पेशंटचा पाय दुखत असेल तर त्यास फिजिशियन,न्यूरो फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन विजिट देत बसतात. मग प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन, इन्वेस्टिगेशन आणि औषधि, कन्झुमेबल यामुळे बिल वाढत जातं. त्यातच पेशंट मेडिक्लेम पॉलिसीधारक असेल तर मग बघायची सोय नाही!

आता मुळ मुद्दा. 18 लाखाच्या या कॉर्पोरेट बिलामधे सर्व खर्च वजा जाता प्रत्येक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टराना फिस म्हणून किती रूपये मिळाले असतील? अर्थात इतर खर्चाच्या तुलनेत ही रक्कम खुपचं कमी असते. मग असे असताना प्रत्यक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राची का बदनामी व्हावी? ही फाइव स्टार हॉस्पिटल्स पेशन्टला पद्धतशिर लूटतात आणि बदनामी मात्र डॉक्टर आणि सम्पूर्ण वैद्यकिय क्षेत्राची होते. मग सर्वच डॉक्टरावर टिकेची झोड़ उड़ते. डॉक्टरविरुद्ध विचाराना हवा मिळते. खालच्या पातळीची विशेषणं लावली जातात. डॉक्टरकडून थोड़ी जरी चुक झाली तरी त्याचा 'पराचा कावळा' करण्यात जनता कसर सोडत नाही. मग अशात राजकारणीही मागे कसे राहणार, तेही आपली पोळी भाजुन घेतात. काही दिवसा अगोदर राजकारणी नेत्यांनी मुम्बई-पुण्याच्या डॉक्टरांना अशीच एक 'खळ..खटयानळ' धमकी दिली. 'डॉक्टरांनी पेशंटला वेठीस् धरु नये, गाठ आमच्याशी आहे'. त्यांचा रोख लहान हॉस्पिटल किंवा नर्सिंगहोमवर होता. कदाचित कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा तेथील 'चमत्कारिक बिल' आणि पद्दतशिर लूटीची त्याना कल्पना नसावी. 

मंगलयान, चंद्रयान, राफेल, गगनचुबी उंचच्या उंच पुतळे अशा बाबतीत देशाची प्रगती किंवा दिंडोरे पिटले जात असले तरी आरोग्यासारख्या मूलभूत क्षेत्रात पाहिजे तशी प्रगती देशाने केलेली नाही. आज जगातील सर्व प्रगत राष्ट्रे जीडीपीच्या साधारण ६% खर्च आरोग्यावर करत असताना तर आपला देश जीडीपीचा फक्त १.५% खर्च आरोग्य सेवेवर खर्च करत असतो. त्यातील ५०% रक्कमेचा भ्रष्टाचार वजा करता जीडीपीच्या साधारण ० .७५% रक्कमच आरोग्यावर खर्च होतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आरोग्यसेवेत शासनाचा सहभाग, म्हणजे सरकारी इस्पितळाचा सहभाग फक्त १७% आहे. म्हणजे देशाच ८३% आरोग्य हे खासगी डॉक्टरांच्या सेवेवर अवलंबुन आहे. आणि याचाच फायदा खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट उद्योजक घेत आहेत. कोरोनामुळे शासनाचं हे पितळ उघडं पडलं. देशात ठिकठिकाणी तात्पुरते इस्पितळं सुरु करावी लागत आहेत. आरोग्य क्षेत्रात शासनाचा टक्का वाढला तर आरोग्यावर होणारा जनतेचा खर्च , कॉर्पोरेट हॉस्पिटलची मनमानी कमी होईल.  

आज छोट्या आणि मध्यम स्वरूपच्या हॉस्पिटलमुळेच वैद्यकिय क्षेत्राची पत टिकून आहे जिथे आजही खेड्यापाड्या तील गरीब रुग्णाना कमी दरात सेवा देणारे डॉक्टर सेवाव्रती भावनेने सेवा देत आहेत. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या अशा प्रकारामुळे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कॉर्पोरेटच्या भंपक जाहिराती, त्यांचे रुग्ण ओढण्याचे प्रभावी मार्केटिंग नेटवर्क, तंत्र यामुळे उत्तम सेवा देवूनही त्यांच्याशी स्पर्धा करण्यात त्यांची दमछाक होत आहे. 

स्वतःचे हॉस्पिटल सुरु करायचे म्हन्टल तर योग्य जागा, भाड़े, मेन्टेनेन्स, स्टाफचा पगार, कीचकट शासकीय ना हरकत परवानगी, उपकरणें आणि एव्हड़ सर्व करून मोठ्या हॉस्पिटलसोबत स्पर्धा! या समस्येमुळे उच्चशिक्षित डॉक्टरमण्डली आपल्या देशात व्यवसाय सुरु न करता परदेशी जाणे पसन्द करत आहे. आयटी क्षेत्र किंवा इंजीनियरचे ब्रेनड्रेन आपन समजू शकतो पण उद्या देशाचे उच्चशिक्षित डॉक्टरच बाहेर जात असतील तर ही मोठी समस्या आहे.
आजही 70% गांव आणि तालुका जिल्ह्याचे पेशंटचा भार छोट्या शहरातील नॉन-कॉर्पोरेट आणि छोट्या-मोठ्या सरकारी हॉस्पिटलवर आहे. वैद्यकिय स्टाफ, उपकरणाची कमी आणि इतर मुलभुत सुविधा नसतानाही ते त्यांचे काम ईमानएतबारे करत आहेत. इतर लहान हॉस्पिटलमधे डॉक्टर स्वतः पेशन्टला वैयक्तिक जाणत असल्यामुळे कुठे तरी डॉक्टर-रुग्ण हे नातं टिकून आहे. भविष्यात महाराष्ट्र शासन बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार आहे त्याचा निश्चितच जनतेला होईल.

वाईट प्रवृती इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्य क्षेत्रात असतीलही पण त्यामुळे सरसगट सर्वांनाच दोषी समजणे चुक. थोडक्यात अशी लूट थांबावी म्हणून गरज आहे की अशा मोठ्या हॉस्पिटलसाठी शासनाने एक कठोर नियमावली आखुन द्यावी जेणेकरून रुग्णावर होणारा खर्च कमी होवून जनता बिलामुळे होरपळुन जाणार नाही किंवा कर्जबाजारी होणार नाही, त्यावर एक अंकुश राहील. तसेच शासनाच्या आरोग्य विभाग, मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडिया यानि वेळीच अशा प्रकाराची दखल घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून वैद्यकिय क्षेत्राबद्दल वाढती संभृमता, दुष्प्रचार कमी होईल, पेशंटचा डॉक्टर आणि हॉस्पिटलप्रती विश्वास वाढेल.


© प्रेम जैस्वाल पेडगावकर 9822108775
     ह. मु. औरंगाबाद 
 ( हा लेख नावासह सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)

Monday, 6 April 2026

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

         गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी!

सण-उत्सवाचा निखळ आंनद, मजा ही गावखेड्यात असते, असं म्हंणलं तर वावगं ठरणार नाही. शहरात आपोआपच त्यावर मर्यादा येतात. होळीची गाणी ऐकतांना याची प्रचिती येते. कोणतंही होळीच गाणं हे शहरात चित्रित झालेलं मी तरी बघितलं नाही. किंबहुना 'होळी' खेळायची तर ती गावकऱ्यानीं असं म्हणायला हरकत नाही. कारण शहरी लोकांना अशी 'खुलके होळी' खेळायला 'लुकिंग गूड लुकिंग बॅड'  अशा पुष्कळ मर्यादा असतात. या वरूनच आठवते बालपनीची होळी. 

आमच्या बालपणी पंधरा दिवसापूर्वीच होळीची चाहूल लागायची.  होळीदहनासाठी लाकडं लागायची. वयांनी मोठी आणि थोडी टवाळ मुलं गावातून 'बोंबलत' होळी दहनासाठी चावडीवर लाकडं गोळा करत फिरायची. हल्ली 'बोंब मारने' हा वाक्यप्रचार फक्त पुस्तकात वाचण्यात येतो. मुळात त्याचा उगम किंवा संबंध निश्चितच होळीसी असणार. त्याकाळी आजच्यासारखी गॅस शेगडी प्रकार नव्हता. स्वयंपाकासाठी प्रत्येक घराच्या आवारात गोवऱ्याचा थप्पी आणि फोडलेली लाकडं असायची. कित्येकांच्या घरासमोर एखादं मोठं लाकडाचं खोड असायचं. तसं आमच्याही आवारात खूप लाकडं ठेवलेली असायची. गावभर लाकडासाठी बोंबा मारत फिरणाऱ्या अशा टोळक्याच्या तोंडी खूपच अश्लील वाक्य असायची.  पण गावखेड्याच्या बोलाचालीत त्या 'शिव्या' कायम असायच्या. बऱ्याचदा अशा बोंबलनाऱ्या टोळीच्या मागे मागे आम्ही सुद्धा फिरायचो.  प्रत्येक घरातून हक्कानी लाकडं किंवा गवऱ्या घेतल्या जायच्या. मनाई करणाऱ्याच्या घरासमोर जोर जोरात बोंबा मारल्या जायच्या. मागून मिळत नसेल तर रात्रीत ती आवरातून चोरीने लाकडं पळविली जायची. मग या भितीने बऱ्याचदा लाकडं घरात आणून ठेवली जायची. अशा वेळेस एखाद्याच्या वखर नागराचं किंवा बैलगाडीच्या कामाची लाकडी सामान सरळ होळीत नेल्याचे प्रकार घडायचे. पण त्यामुळे कुठे ही भांडण तंटा झालेला मला आठवत नाही. 

प्रतिष्टीत व्यक्तींच्या समक्ष होळीपूजन आणि दहन व्हायचं. का? माहित नाही पण आमच्या काळी होळीला सुद्धा फटाके फोडले जायचे. सायंकाळी पेटविलेली होळीचा निखारा दुसऱ्या दिवशीपर्यंत असायचा. त्या होळीच्या राखेला खूप महत्व होतं. आमच्या छ संभाजीनगरमध्ये मी कारल्याच्या बिया लावत असतांना आमच्या आईने 'त्या बियाला होळीच्या राखेसोबत लावायचं असतं' असं सांगितलं होतं. बऱ्याचशा आजारासाठी होळीची राख जतन करुन ठेवल्या जायची. हल्ली शहरात होळीनिमित्त साखरेच्या गाठी विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. पण पूर्वी ह्या गाठी खोब्रा, खजूर आणि इतर मेव्यापासून तयार केलेल्या असायच्या. बताशाच्या गोड गाठी हल्ली दिसत नाही. बताश्याच्या गोड गाठीची हार गळ्यात घालून आम्ही ती खात खात खेळायचो.  आता सर्वत्र 'गोड म्हणजे विष' असा अपप्रसार सुरु आहे. होळी म्हणजेच पुरणपोळी हे समीकरण आहे. गावभर ही पुरणपोळीच जेवण व्हायचं.   डायबेटीस किंवा मधुमेह हा शब्द आम्ही ऐकला नव्हता. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी हा शब्द प्रथम ऐकला होता. त्यामुळे एका बैठकीत 'तेरा पुरणपोळ्या' किंवा 'किलोभर बुंदी' फस्त करणाऱ्या बहादरांनासुद्धा 'डायबेटीस' झालेला मी पाहिला नाही!

आम्हाला वेध दुसऱ्या दिवशीच्या धुळवडीचे लागलेले असायचे.  कृत्रिम रंगाचा इतिहास खूप अलीकडंचा. पण हजारो वर्षापासून महत्व असलेल्या होळीसाठीचे रंग मग कुठून यायचे? आमच्या बालपणी होळीच्या काही दिवस आधी आम्ही पळसाच्या लाल फुलापासून रंग तयार करायचो. शेतरानात ही फुलं सहज उपलब्ध व्हायची. भर उन्हात रानाला शोभून दिसणारी ती पळसाची टवटवीत फुलं आम्ही दगडावर वाटून तिच्यापासून रंग तयार करण्याचे प्रयोग आम्ही करायचो. पण शेवटी तो एक असफल प्रयत्न असायच. कारण पाहिजे तसा पक्का रंग त्या फुलापासून तयार होत नसे. 

पूर्वी आमच्या घरी किराणा दुकान होतं. होळी धूळवडीसाठी लहानमोठ्या पिचकाऱ्या आणि रंग विकले जायचे. लहाणाला लहान आणि मोठ्यांना मोठी पिचकारी त्यामुळे आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे असे विचार येत. अगदी बालपणी पिचकारी एकचं प्रकारची असायची. त्याचं प्लास्टिक अगदी तकलादु असायचं तिचं काम क्षणिक असायचं. काही तासात ती क्रॅक व्हायची. कालांतराने फुग्यात रंग भरून मारण्याचा प्रकार सुरु झाला. पण पाण्याची सोयीस्कर होळी तेंव्हा ही होती आणि आजही ती कायम आहे. 

पण गावातील होळीचा खरा रंग गावातील मंडळी 'पूर्णतः रिचार्ज' झाल्यानंतर दिसायचा. होळीसाठी गावकरी आधीपासूनच दारूचा 'इंतजाम' करुन ठेवत. सर्वांना देशी दारू कदाचित परवडत नसावी त्यामुळे गावभर हातभट्टीची दारू उपलब्ध असायची. जसा दिवस चढायचा तसा धूळवडीचा रंग चढत असे. रंगाने पूर्णतः माखलेलं शरीर,  फुल्ल रिचार्जमूळ चालण्याच्या अवस्थेत नसलेले गावकऱ्याचा आजचा रंगढंग, चेहऱ्याचे हावभाव जरा वेगळेच असायचे. कधी न पिणाऱ्याला आज आग्रहाणे  पाजल्यामूळ त्यांची खरी पंचायत व्हायची. विशेष म्हणजे आजच्या दिवशी पुरुष-महिला भेदभाव दूर सारून काही ठराविक महिलासुद्धा या 'रंगात' सामील व्हायच्या. त्या काळी महिलांच मद्यप्राशन हे समाजाला मान्य नव्हतं. आता जेंव्हा शहरातील दारूच्या दुकानात महिलांना दारू विकत घेतांना बघतो तेंव्हा असं वाटतं की समाजातील अनेक बंधने, नियम आणि कायदे हे फक्त गरीब आणि मागास जनतेसाठीच तयार करण्यात आले आहेत. शहरात अशा गोष्टीकडे 'मॉडर्न किंवा चेंज' म्हणून बघितल्या जातं! असो. 

गावातील होळी उत्सव साजरा करण्यात बंजारा समाज अग्रेसर असायचा. किंबहुना 'बंजारा समाजामुळेच गावातील होळीला रंग चढायचा' असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.  लेझीम, डफडा, गाणी आणि अंगीच असलेली नृत्यकला यामुळे त्यांना फक्त बहाना हवा असायचा. 'रिचार्ज' झाल्यानंतर सर्वकाही आपोआप घडत जायचं. नाचत नाचत, झुलत झुलत ही मंडळी आमच्यासमोर 'परफॉर्म'  करायची.  आमचे काका कधी बकेटीत कालवलेला रंग तर कधी बकीटभर पाणी नाचणाऱ्या मंडळीवर ओतून दयायचे. अर्थात नंतर आमच्या दादा(वडील) किंवा काकांकडे दारूची मागणी ठरलेली असायची. दारू दिली नाही ते भांडायचे. त्यातही मजा असायची. लवकर मागणीची पुर्तता केली नाही की बंजारा समाजाचं पथक जोरात सुरु व्हायचे -

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

हे अस्सल आणि निखळ मनोरंजन होतं. काही दिखावा नाही की कृत्रिमपणा नाही. लोकं पित असले तरी त्यातही वयोमर्यादा असायची. नशेतही सर्वांचा आदर आणि मानसन्मान राखल्या जायचा. भांडण सुद्धा व्हायची पण गावातच ती मिटविली जायची. 'तशव्या' हा शब्द मी आमच्या वडिलांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकायचो. त्या शब्दाचा अर्थ मी वयस्कर झाल्यानंतर मला कळाला. गावातील मोहनसिंग ठाकूरकाका, बाबुसिंग ठाकूरकाका, हिरामण पटेलकाका,  किसन आमरू राठोडकाका, गनाजी गव्हाळेमामा , सरपंच, पाटील आमचे वडील आणि अशी बरीचशी प्रतिष्टीत मंडळी गावातील भांडण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याआधीच मिटवून टाकत असत. शब्दाला मान तर मोठयाचा सन्मान असायचा. बासंबा सर्कलमध्ये कदाचित पेडगाव हे मोठं गाव असावं.  त्यामुळे जत्रा, पोळा असो की धूळवड, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावात नेहमी पोलीस बंदोबस्त असायचा. किमान एक तरी पोलीस गावात फिरत असे.  शेवटी तो ही माणूसच, बऱ्याचदा धूळवडीच्या रंगात तो सुद्धा 'रंगून' जायचा!

अशीच एक धूळवड मला आठवते. गावात नुकतच विजेचं काम चालू होतं. पेडगावच्या मार्गावर इलेक्ट्रिकचे पोल रोवण्याचं आणि तार ओढण्याचं काम चालू होतं. विजेच्या पोल आणि इतर सामानाच्या रंगरंगोटीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चमचम चमकणारा रंग आणून ठेवला होता. एका धूळवडीमध्ये पारंपारिक रंग फिके पडून गावभर हाच रंगाचा वापर झाला होता. विशेष म्हणजे त्या दिवशी बासंबा पोलीस स्टेशनचे कडक जमादार 'बेग' बंदोबस्तासाठी आले होते.  मला आठवतं, त्यांनी बंदोबस्त प्रकार बाजूला सारून त्यादिवशी पुढाकार घेऊन गावातील सर्व लोकांना चमकीचा रंग लावला होता. दुपार होता होता संपूर्ण गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर ती चमकी दिसत होती. 

कुठे गेले ते दिवस? बदल कायम होतात आणि या पुढेही ते होत राहणार. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण जो निखळ आणि असल आनंद आम्ही खिशात खडकू नसतांनासुद्धा आम्ही आमच्या बालपणी अनुभवला तो आता नाही.   असं म्हणतात,' जसं जशी आर्थिक परिस्थिती संपन्न होत जाते तस तसा तुमचा आनंद महाग होत जातो'. हल्ली गावातून शहरात आलेली श्रीमंत मंडळी या आनंदापासून वंचित आहे. आनंदासाठी ती दूर वरची मोठी ठिकाण ती शोधत असतात. इतर ठिकाणी पर्यटन केल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही.  पण तिथल्या मुंग्यासारख्या गर्दीत त्यांना हवा असलेला आनंद मिळतोच असं नाही! विशेष म्हणजे आता हिच लागन गावाकडील लोकांमध्ये सुद्धा होत आहे. 

आज ती लोकं नाहीत, तो रंग नाही, ती रंगत नाही.  गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी, आठवणी!!


©प्रेमकुमार जैस्वाल (पेडगावकर)

Monday, 30 March 2026

कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा वाली कोण ?






'सक्सेस हॅज मेनी फादर, फेल्युर इज अल्व्वेज ओर्फन'


भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी नाही. पूर्वी परीक्षा म्हंटल तर दहावी किंवा बारावी बोर्डाची, आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षेला अनन्यसाधारण महत्व होत आणि एक वलय होता. जसजसे शिक्षण क्षेत्रात बदल होत गेले आणि स्पर्धा वाढली तसे नवनव्या परीक्षेचा जन्म झाला. हल्ली दहावी, बारावी बोर्डाव्यतिरिक्त दहावी शिष्यवृत्ती, एनटीएसई, केव्हीपीआय, आरएमओ तसेच बारावीत एमएच-सीईटी, जेईई-मेन, जेईई-ऍडव्हान्स, बिटसॅट, नीट, जीपमार नाटासारख्या अनेक देशपातळीवरील स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता काही वर्षा आधीपासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात. काही अपवाद सोडले, तर या परीक्षेचा अभ्यास स्वतः हुन करणे विध्यार्थ्यांना जमत नाही म्हणून विध्यार्थी या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतात.

पूर्वी शाळेत शिक्षकांना एखादा विध्यार्थी एखाद्या विषयात कमजोर वाटला तर त्याकाळचे 'गुरुजी' त्याकडे खास लक्ष देऊन शाळेतच वेगळा वेळ देऊन शिकवायचे. ह्या मागील शिक्षकाचा हेतू खूप प्रामाणिक होता. काही शिक्षक शाळेतच 'एक्स्ट्रा क्लास' घेऊन काही कमजोर विध्यार्थ्याचा विषय पक्का करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे. कालांतराने शाळेच्या वेळापत्रकात हे बसत नसल्यामुले शिक्षकांनी घरी क्लास घ्यायला सुरुवात केली. यातच अर्थकारण येऊन त्याचे रूपांतर पुढे 'ट्युशन क्लास' आणि नंतर भरमसाठ फी घेणाऱ्या 'कोचिंग क्लास' मध्ये झाले. सुरुवातीच्या काळात ट्युशनच्या 'कुबड्या' घेऊन चालणारा विध्यार्थी म्हणजे 'ढ' समजल्या जायचा. पण कालांतराने कमी मार्क मिळण्याची भिती तसेच शालेय शिक्षकाच्या हातातील 'हातचे मार्क' या भितीने सर्वच विध्यार्थ्याने कोचिंग लावायला सुरुवात केली आणि हे क्षेत्र भरभराटीस आलं.


आज मूलं जन्मल्यापासून दहावी, बारावी, सर्व पदव्यासहीत सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोचिंग क्लास आपल्या जवळपास उपलब्ध आहेत. आपण रोज हया फोटो-जाहिराती वृत्तपत्रात बघतच असतो. जाहिरातीचा भरणा असलेल्या वर्तमानपत्रात अर्ध्याहुन जास्त जाहिराती ह्या कोचिंग क्लासेसच्या असतात. कधी कधी वाटते कि यास वृत्तमानपत्र म्हणावं कि जाहिरातपत्र! इतर संस्थेप्रमाणे वर्तमानपत्रालाही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पीटीआय ने आखून दिलेली एक नियमावली आहे पण पैशाच्या बाजारात पीटीआयच्या नियमाला बगल देऊन सरळसरळ मोठमोठ्या जाहिराती पुढच्या पानावर छापल्या जातात. वेळप्रसंगी मुख्य बातमीला बाजूला किंवा छोटी बनवून, जॅकेट चढवून जाहीराती छापल्या जातात. संपूर्ण जगाला अक्कलेच डोज पाजणारा वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला स्वतःची नियमावली पाळणे मात्र जमत नाही, असो.


मूळ मुद्दा असा की आज कोणत्याही क्लासेसच्या जाहिरातीकडे जर आपण पाहिल तर लक्षात येईल कि त्यात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच छायाचित्र छापलेले आपल्याला दिसतील, का ? जर जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचेच फोटो आणि सत्कार होत असतील तर कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ते आपल्या जीवनात काहीच चांगलं करणार नाहीत का ? त्यांचा वाली कोण ? का एखादे कोचिंगक्लासवाले हे सांगत नाही की आमच्या कडे हे अमुक अमुक विध्यार्थी होते पण त्यांना हि परीक्षा काही जमली नाही पण ते इतर क्षेत्रात खूपकाही चांगले काम करू शकतात. काही वर्षापूर्वी आपल्याकडील वृत्तपत्रात फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच फोटो छापले जायचे. त्यांची मुलाखत घेतली जायची. त्यामुळे इतर विध्यार्थ्याचे खच्चीकरणं व्हायचे. विध्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन नैराश्य, आत्महत्यासारखे प्रकार घडत असत. असे होऊ नये म्हणून शासनाने मेरिटलिस्ट छापण्यावरच बंदी आणली. आज कोणत्याही वृत्तपत्रात दहावी किंवा बारावीची मेरिटलीस्ट छापली जात नाही.


इतिहासातील धडे शिकूनच आपण वर्तमानातील वाटचाल करत असतो. मायक्रोसॉफ्टचे बिलगेटस् हे इतर विध्यार्थ्याप्रमाणे हुशार नव्हते पण आज जगातील सर्वोच्च विध्यापीठातील गुणवंत त्यांच्यासोबत काम करत आहेत. क्रिकेटचा सम्राट भारतरत्न सचिन तेंडुलकर इयत्ता आठवीत नापास झाला होता. सैराट सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे नागराज मंजुळे विपरीत परिस्थितीत लहानाचे मोठे झाले, दहावीत नापास झाले. अर्थात त्या काळच्या शाळा किंवा कोचिंग क्लासने बिलगेटस, सचिन आणि नागराज मंजुळे सारख्यांचे फोटो छापले नसतील, हार-तुरे देऊन सत्कार केला नसेल पण आज ही लोक यशाच्या एव्हडया उच्च शिखरावर पोहचली आहे की त्यांचा साधा ऑटोग्राफ मिळणे कठीण आहे. कदाचित चांगले १०० पैकी १०० गुण मिळवनारे 'परीक्षार्थी' बनण्यात ते नापास झाले असतील पण आज आवडीच्या क्षेत्रातील चांगले विद्यार्थी होऊन त्यांनी यश गाठलं आहे.


मुळात शासनमान्य शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंगक्लास याच्या शिकवणीची पद्धत समजण्यात पालक गल्लत करतात. खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शाळा-महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांच्या वर्गातील तळागाळातील विध्यार्थ्याकडेसुद्धा तेव्हढेच लक्ष देतात जेव्हढे लक्ष ते हुशार विध्यार्थ्याकडे देत असतात. शिक्षकांची ही प्रामाणिक इच्छा आणि जिद्द असते की त्यांनी शिकवलेला विषय हा वर्गातील सर्व स्तरावरील विध्यार्थ्यांना समजावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे. कोणी एकच विध्यार्थी मेरिटमध्ये आणणे असा ' फोटो-जाहिरात आणि मार्केटिंग' वाला हेतू त्यांचा नसतो. थोडक्यात जो विध्यार्थी बसलेला आहे त्याने उठून चालण्यासाठी तयार करणे, जो चालत आहे त्याची गती वाढवणे आणि जो गतीने चालत आहे त्याची गती वाढवणे असा शुद्ध हेतू असतो. त्यामुळे शाळेत एकूण सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. आणि कदाचित अधोगती झाली तरी शालेय शिक्षक तो आमचाच विध्यार्थी आहे असं म्हणायला लाजत नाही.


या उलट कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाच सर्व लक्ष हे पुढील बाकावर बसलेल्या दोन-तीन रांगेपर्यंत मर्यादित असत. कारण या रांगेमधील विद्यार्थीच पुढे क्लासेसला 'रँक' देणारे असतात आणि त्यांचेच 'फोटो' क्लासेसच्या बिजनेसच्या जाहिरातीसाठी उपयुक्त असतात. कोचिंग शिक्षकाचा पगारही त्या रँकनुसार वाढत असतो. हया पुढील बाकावरील हुशार विध्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासच्या शिक्षकाच्या डोक्याला ताप नसतात, आणि त्यांना व्यवस्थित शिकवणे, शँका निरसरन करणे त्यांना भाग असते. या उलट मागील बाकावरील विध्यार्थी ज्यांचा विषय खूप कच्चा असतो असे विद्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासेस शिक्षकांसाठी ताप असतात. अशा विध्यर्थ्याच्या खालच्या पातळीवर येऊन शिकवण्याइतका संयम सर्व क्लासेस शिक्षकात नसतो. त्यामुळे ते वाऱ्यावर सोडले जातात. अशा पद्धतीत पुढचे विध्यार्थी खूप पुढे जातात आणि मागचे खूप मागे. थोडक्यात पुढील बाकावरील विध्यार्थी म्हणजे लग्नातील 'मानकरी' सारखे असतात त्यांना दुःखवून चालत नाही. काही पुढील बाकावरील विध्यार्थी वगळता मागच्या विद्यार्थ्यांच्या फोटोची क्लासेसला गरज नसते. मग एकूण जेईईसाठी कोचिंग घेणारे २५०० विध्यार्थी आणि पात्र मात्र १५ असे प्रकार घडतात, मग उरलेल्या २४८५ विद्यार्थ्यांनी काय करावं एव्हढ साधं मार्गदर्शनही कोचिंगवाले करत नाहीत.


मग आपल्या जाहिरातीत जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विध्यार्थ्याचे फोटो दिसावे म्हणून बरेच क्लासेसवाले वेगवेगळे उद्योग करत असतात. वेळप्रसंगी इतर क्लासेसच्या विध्यार्थ्यांना लाखो-करोडो रुपयाची ऑफर देऊन फोटो घेतले जातात. हा आमदार-खासदार फोडण्याचाच प्रकार असतो. किंवा बळेच मोठा धनादेश, हारतुरे आणि पेढे देऊन फोटो काढून घेतले जातात, असे अनेक प्रकार अलीकडे घडत आहेत. 'रँक विकण्याचा घोडेबाजार' कोटासारख्या कोचिंगक्लासच्या पंढरीस नवीन नाही. एकंदरीत पैशाच्या या खेळात सर्वांकडून पैसे उकळून फक्त काही विध्यार्थ्याच भलं होत असताना दिसत आहे. उदाहरण दयायच असल्यास, संपूर्ण भारतात जेईई परीक्षेमध्ये उत्तीर्ण विध्यार्त्याची एकूण संख्या ३९०० असेल तर या तुलनेत भारतातील सर्व कोचिंगच्या उत्तीर्ण विध्यार्थ्याच्या फोटो-संख्येची बेरीज हि ७००० पेक्षा जास्त असणार, कारण एकाच विद्यार्थ्यांचे फोटो आपल्याला विविध क्लासेसच्या जाहिरातीत तसेच होर्डिंगवर बघायला मिळतात. थोडक्यात म्हणायचे तर -

सक्सेस हॅज मेनी फादर
फेल्युर इज अल्वेज ओर्फन


एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवणे ही शासनाची जबाबदारी आहे. कालच वृत्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंत्र्यांनी ११वी, १२वी विज्ञानशाखेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती आवश्यक केली आहे. 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे उशिरा का होत नाही पण हा एक आशेचा किरण दिसत आहे. कारण त्यामुळे सर्वसाधारण तसेच तळागाळातील विद्यार्थ्याला फायदाच होईल. कारण कोचिंग क्लासेसची फी सर्वांना परवडणारी नसते. मुलांसाठी वाटेल ते करणारे पालक वेळप्रसंगी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून कर्ज काढतात आणि त्यांच्या हाती काही लागत नाही. महाविद्यालयातच दर्जेदार शिक्षण मिळाल्यास गरीब आणि सर्वांचा फायदाच होईल. 'गुरु' म्हणजे काय, त्यांची शिकवण्याची पद्धत माहित पडेल. महाविद्यालयातील फक्त शिक्षण नाही तर महाविध्यालयीन वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार होतील जे आज होताना दिसत नाहीत. वार्षिक स्नेहसम्मेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांचं व्यक्तिमत्वही उजळेल. थोडक्यात फक्त हुशार मुलांचा कोचिंग क्लासचा बाजार कमी होईल.


फक्त गरज आहे सरकारी आदेश तंतोतंत लागू होण्याची. कारण आपल्याकडे पळवाट शोधणाऱ्या हुशार 'बिरबल' ची कमी नाही. उद्या चक्क महाविद्यालयातील बायोमेट्रिकच रिमोटने कोचिंग क्लासेसला जोडलेली आढळल्यास आश्चर्य वाटू नये. दिवसातून तीन वेळेसची बायोमॅट्रिक आवश्यक केल्यास त्यास संस्थाचालकापासून सर्वच स्तरातुन विरोध होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांशी सोयरसुतक नसलेल्या शिक्षकाचे श्रम वाढतील. मागील कितीतरी वर्षांपासून एकाच रुळावर चालणारी गाडी जेंव्हा पटरी बदलेल तेंव्हा थोडा खडखडाट होणे साहजिक आहे. त्यातल्या त्यात श्रीमंत पालक जे आपले पाल्य कोटासारख्या इतर ठिकाणी कोचिंगसाठी ठेवतात त्यांचाही या बदलास विरोध होईल, क्लासेसवाल्यांचीही वेळेची थोडी सर्कस होईल. पण महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने इमानेइतबारे शिकवल्यास सर्वच विषयाची कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही आणि खरोखरच विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. पण हा बदल होणे आवश्यक आहे.


शिक्षणातील ह्या बाबीस फक्त शासनास जबाबदार धरणे चूक होईल, पालकही तेव्हढेच जबाबदार आहेत. त्यांनाही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी इतर मुलांचे अनुकरण न करता वेगळी शाखा, क्षेत्र निवडावे कारण प्रत्येकाचा पालकाचा पाल्यामध्ये एक वेगळा टेलेन्ट असतोच. जाहिरातीतील मेरिटचे फोटो आणि आमिषाचा गळाला लागून पालक आणि विद्यार्थी नको ते क्लास लावतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती न होता आर्थिक नुकसान होते. गरज आहे त्यांनी आपल्या मुलांचा वेळीच कल ओळखण्याची आणि मेरिटचा अट्टाहास न करता पाल्याची एकूण खरी प्रगती ज्या क्षेत्रात होऊ शकते तेच क्षेत्र निवडण्याची आणि त्याच क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यास त्यास मदत करण्याची.

©
प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह.मु. औरंगाबाद ९८२२१०८७७५

एडिट

एडिट 


सोबतचा फोटो एडिट केलेला आहे. पहिला कृष्ण-धवल तर दुसरा रंगीन! हल्ली फोटो एडिट करणं म्हणजे 'बायें हाथ का खेल'. हात कशाला लागतं, ऐआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला फक्त आदेश (प्रोम्प्ट) द्या आणि पाहिजे तसा फोटो एडिट करुन घ्या. एव्हढंच काय फोटो नसतांनासुद्धा फक्त एखाद्या व्यक्तीच सविस्तर वर्णन दया हा अल्लाउदीनचा जादूई चिराग तुम्हाला वाटेल तशा इमेजेस बनवून देतो. त्या फोटोला बोलता करतो. साजेसा आवाज देतो आणि बरंच काही. प्रत्येक आऊटपुटनंतर स्वतःहून ' जहाँपनां, अजुन काही चांगले बदल हवेत का?' असंही विचारतो. 'देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी' सारखं होऊन जातं. 

सोबतचा फोटो १९८१ चा आहे. त्याकाळी फोटो प्रकार दुर्मिळ होता. तालुक्याच्या ठिकाणी एखादं फोटो स्टुडिओ असायचं. १९७५ पर्यंत शाळेतील प्रवेशासाठी पासपोर्ट अट नव्हती कारण फोटो हा प्रकार तेव्हढा चलनात नव्हता. पण मी आठवीत म्हणजे १९८१ मध्ये झेडपी मध्ये प्रथमचं प्रवेश अर्जाला फोटो लागत होता. त्यामुळे आपण फोटो काढणार हा आनंद. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाप्रमाणे सुरुवातीला कलर फोटोग्राफी हा प्रकार नव्हता. पण ठराविक फोटोग्राफरकडे दोन रुपये जास्त देऊन ब्लॅक अँड व्हाईट फोटोला 'एडिट' करुन रंगीन करुन देण्याची सोय मात्र होती. फोटोग्राफर सरळ सरळ त्या फोटोवर ब्रशने रंग चढवून त्याचा रंगीत फोटो तयार करायचे. शरीराला स्किन कलर, केसांना काळा तर कपड्यांना पाहिजे तो कलर देऊन मोकळे! मग असा रंगीन फोटो घेऊन आम्ही मिरवायचो. थोडक्यात एडिट हा प्रकार पूर्वी सुद्धा होता. एडिटचे जसे फायदे तसे नुकसान सुद्धा.  पेशवे इतिहासातील 'ध' चा 'मा' हा आनंदीबाईने केलेला एक एडिट सर्वांनी वाचला असेन ज्यामूळे नारायणराव पेशव्याचा खून झाला. 

इतर क्षेत्राप्रमाणे फोटोग्राफी मध्ये सतत बदल होत गेले. गाव-खेड्यात असूनही आमच्या घरी वर्ष १९७५ मध्ये 'अगफा' कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. नंतर त्या कॅमेराचे रोल मिळत नव्हते म्हणून तो पडीत झाला. त्याकाळी कॅमेराचे रोल अगदी अंधारात कॅमेऱ्यामध्ये फिट केल्या जायचे. फोटो काढून झालेले रोल(निगेटिव्ह), एखाद्या स्टुडिओमध्ये धुवून मिळायचे, म्हणजे पॉसिटीव्ह फोटो मिळायचे. काही फोटो वाया जायचे. रोल महाग असल्यामुळे फोटो काढतानाच खूप काळजीपूर्वक शॉट घेतल्या जायचा. काही वर्षानी रंगीन फोटो घेण्याची सोय झाली. फ्लॅश हा प्रकार खूप नंतर आला. 

आजच्यासारखं प्रत्येक शासकीय कामासाठी त्याकाळी फोटोची गरज नव्हती. शहरातील जत्रेत फोटोवाल्याचा स्टॉल असायचा. त्याच्याकडे छान 'बॅकग्राउंड' साठी काही रंगबिरंगी पडदे किंवा एका उघड्या कारची प्रतिकृती असायची. त्या प्रतिकृतीमागे बेंचवर बसलेल्या व्यक्ती उघड्या कारमध्ये बसल्यासारख्या भासायच्या. सर्वच भन्नाट! असे ब्लॅक अँड व्हाईट लाकडी फ्रेममध्ये मढविलेले लहान आकाराचे फोटो आजही एखाद्या मातीच्या जुन्या घराच्या भिंतीवर टांगलेले नजरी पडतात.

मला आठवतं. मी बारावी इयतेत शिकत असतांना छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील स.भू. महाविद्यालयाच्या स्नेह-संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते परीक्षित सहानी (3इडियट, फरहानचा बाप) आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर त्यांना आमच्या हॉस्टेलचे रेकटर डॉ बोरीकर सर हॉस्टेलला घेऊन आलेत. मग सर्व हॉस्टेलमधील विध्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढला. आमचा तो ग्रुपफोटो घेण्यासाठी त्याकाळी कॅमेऱ्यामनने तो कॅमेरा एका मोठ्या पडदयाने झाकला होता. असा मोठा कॅमेरा मी पहिल्यांदाच बघितला होता. 

डिजिटल क्रांतीनंतर फोटोग्राफीमध्ये बदल घडले. रील प्रकार बंद होऊन डिजिटल कॅमेरे अवतरले. रिल्सची जागा मेमरीकार्डने घेतली. एक्सट्रा मेमरीकार्ड वापरून हजारो फोटो, शूटिंग घेण्याची सोय झाली. पूर्वी फोटोसोबत फोटोग्राफर रिल्सचे नेगेटिव्ह परत करायचे. त्या निगेटिव्हवरून परत फोटो काढले जायचे. आता हा प्रकार बंद झाला. पूर्वी जत्रेच्या खेळणीत छोटे कॅमेरा विकत मिळायचा. या कॅमेऱ्याच्या पुढे चित्रपटाच्या छोटया नेगेटिव्हची फिल्म लावून बघण्याची सोय असायची. कॅमेऱ्यासोबत काही निगेटिव्ह फ्री मिळायच्या. जत्रेत हा हमखास विकला जाणारी खेळणी होती. पुढे पुढे या कॅमेऱ्यामध्ये दोन फिल्म बघण्याची सोय झाली. 

हल्ली फोटो व्हिडीओ तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली. प्रत्येक मोबाईल धारक फोटोग्राफर झाला आहे. पाहिजे तसा सुंदर फोटो तो काढू शकतो. रोज डीपी बदलू शकतो.ऐआयच्या मदतीने पाहिजे त्या ठिकाणी स्वतःचा फोटो काढू शकतो. अगदी अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प महोदयासोबतसुद्धा! सेल्फी, टाईमर लावून फोटो घेऊ शकता. टीबी मेमरीमध्ये हजारो व्हिडीओ सेव्ह करण्याची सोय झाली. पण आता हे सर्व क्षणिक वाटतं. काढलेले फोटोज, व्हिडीओ मेमरी स्वरूपात सेव्ह होतात. नंतर त्याला कुणी बघत नाही. किंवा त्याचं अप्रूप नसतं. एक गोष्ट मात्र नक्की. एव्हढ सर्व डिजिटल आणि सहज सर्व गोष्टी उपलब्ध असूनही कोणत्याच व्यक्तिकडे स्वतःचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो मात्र उपलब्ध नसतात!

©प्रेमकुमार जैस्वाल 
9822108775

हिंदी-उर्दू: दो बहनोकी बात



अब तो यह रिवाज सा बन गया है के हिन्दुस्तान के पार्लमेन्ट में जब भी कोई मंत्री या एमपी, फिर वह किसी भी पार्टी के क्यों न हो अपनी बात रखते है तो बात बात में एक शेर जरूर सुनाते है। असल बात यह कि किसी भी बात या मुददो का वजन बढाने के लिए शेर की सहायता जरुरी ली जाती है l इतना ही नही श्रोताओ का दिल जीतने के कई सभा-सम्मेलन में अपने भाषण में नेता या वक्ता एक शेर जरूर सुनाते है और लोगों का दिल जीत लेते है। और ये दिल जितने वाले शेर अक्सर उर्दू भाषा में  हि लिखे होते है। एक सर्वे के मुताबिक हिन्दुस्तान के पार्लमेंट में आज तक जितने भी शेर सुनाए गये वो तकरीबन ९०% उर्दू में थे।


जी हां, हम बात हिंदी-उर्दू भाषा की कर रहे है। जो दो सग्गी बहने है। हम सब एक बडी गलत फ़हमी है के उर्दू हमारी नहीं बल्की पडोसी मुल्क की भाषा है। हालांकि यह सरासर गलत है, झूठ है। इस में लोंगों की कोई गलती नही क्यों कि हिन्दू लोग उर्दू को मुश्किल और मुस्लिम की भाषा समझकर बोलने से परहेज रखते आये है । 'रिलिजियस पॉलिटिक्स' ने इस भाषाका बटवारा कर दिया हैं । हालांकी हिंदी में उर्दू इस तरह घुली है जैसे दूध में शक्कर जिन्हे एक दुसरे से १००% अलग करना मुश्किल है l शब्दो का परहेज कर के आप ना तो 'शुद्ध हिंदी' बात कर सकते ना 'शुद्ध उर्दू!' और हिंदी में सिर्फ उर्दू नहीं बल्की पारसी, अफगाणि, गुजराती, कनडा, पोर्तुगीज और अंग्रेजी शब्द भी घुलमील गये है l 


हालांकि कोई भी भाषा 'रिजनल' होती है 'रिलिजनल' नही । जैसे पंजाब की पंजाबी, तमिलनाडु की तमिल, गुजरातकी गुजराथी, कर्नाटक की कन्नडी। कहने का मतलब जो मुस्लिम पंजाब में रहते है वो पंजाबी बोलते है। जो गुजरात में रहते है वो गुजराती बोलते है। जो तमिलनाडु में रहते है वो तमिल बोलते है। इस हिसाब से उर्दू को मुस्लिम समाज की भाषा कहना बहोत गलत होगा। वैसे शुरु से उर्दू नॉन-रिलीजस भाषा रही है।


आज लोग भले ही उर्दू भाषा बोलने मे परहेज करते होंगे लेकिन यही उर्दू के शेर, नज्म या शायरी आप जब गुलजार(संपूर्ण सिंग कालरा) के गीतों में, अमिताभ बच्चन (असली नाम इन्कलाब श्रीवास्तव) के डायलोग मे या फिर लता मंगेशकर के गीतों में सुनते तो बड़ा मजा आता है। आप यह समझ ले कि हिंदी-उर्दू सग्गी बहने-बहने है। हिंदी मां है तो उर्दू मौसी। हिंदी नग्मे तभी अच्छे लगते है जब उन्हें उर्दू की झालर लगाई जाती है। जो भी बॉलीवुड की फिल्में हिट हुयी उसका बड़ा श्रेय उर्दू को जाता है। हिंदी फिल्में नयी हो या पुरानी उसके संवाद और गीत उर्दू शब्द के बगैर आप सोच भी नही सकते। इश्क, मोहब्बत, सनम,मेहबूब, जुल्फे, गेसू, दास्ताँ, जमीन, हुजूर,झील,कयामत,मजबूर,सर्द, आरजू, फिझा, जिस्म और ऐसे कई हजार शब्द होंगे जो अक्सर उर्दू से लिये गये। हिंदी फिल्मों के कलाकार फिर वो दिलीप कुमार, प्राण, राजेश खन्ना, राजकपूर, बलराज साहनी, परीक्षित साहनी, देवानन्द,अमिताभ हो या मीना कुमारी, वहीदा रहमान, हेमा मालिनी, नूतन जैसी अभिनेत्रीयाँ इन सभी को कामयाब और मशहूर बनाने में उर्दू का बड़ा हाथ है। इतना ही नही फिल्में हिट होने में गीतों का बड़ा योगदान होता है इसलिये उर्दू के सही उच्चारन के लिए महान गायिका लता दीदी ने भी उर्दू सिखी थी। आज हम सिर्फ हिंदी नही बल्कि मराठी में भी उर्दू के कई शब्दों का इस्तेमाल करते है। एक ऎसा भी दौर था जब मशहूर होने के लिए हिंदी शायर खुद अपना नाम भी बदल देते थे l उदाहरन : गुलजार, फिराख गोरखपुरी, मनोज मुंतशीर, नाजीर बनारसी ऐसे कई हिंदी शायर उर्दू नाम धारन करने के बाद मशहूर हुये l 


वैसे उर्दू की पैदास हिन्दुस्तान मे ही हुयी है। कहा जाता है के जब मुगलो का आक्रमण हुवा उस वक्त फ़ारसी का ज्यादा चलन था। जब मुगल शासक आये तब उनके साथ साथ फ़ारसी, अरेबिक और तुर्की यह सब भाषा भारत मे आयी। इन भाषाओं का जब दिल्ली के ब्रज या खड़ी बोली के साथ मिश्रण हुवा तो नयी भाषा का जन्म हुवा। दिल्ली मे जब फारशी शासक के सेनाने शेकडो वर्ष तक डेरा लगाया था तब कुछ सैनिको की भाषा पारसी,कुछ अरेबिक और कुछ तुर्की थी। फिर उनकी भाषा को संबंध दिल्ली के खड़ी बोलि बोलने वाले लोगों से हुवा। आपस के इस बोलि भाषा को 'ओरडु'(सैनिक की भाषा) ऎसा नाम दिया गया l १७८० से पहले उर्दू को रेक्ता, रेक्ती, हिंदवी कहा जाता था और बाद में 'उर्दू' ऐसा नामकरण हुवा। १८ वे सदी तक उर्दू और हिंदीमे बिल्कुल भी फर्क नही था। हालाँकि उर्दू यह शब्द तुर्की से लिया गया। कई किताबें पारसी,तुर्की और अरेबिक मे लिखी गयी। चूँकि उर्दू बादमें बोलि भाषा बन गयी वह तेजी से आगे बढि, बहते गयी और आगे बढी और बाकी भाषाएँ पीछे रह गयी। जब आप कोई भाषामें सिर्फ लिखते हो तो वह 'स्टैटिक' बनती है या थमसी जाती है। लेकिन वही भाषा जब बोली भाषा बनती है तो वह बहाव के साथ 'डायनामिक' बन जाती है। उर्दू के साथ यही हुवा, वह जोरसे बहती चली गयी। बाद में महान कवि आमिर खुसरों ने उसे नये मुकामपर पहुंचाया। उर्दू मे कई शब्द दिल्ली के हिंदी खड़ी बोलीसे लिए गये। दोनों भाषा का व्याकरन एक जैसा है। हिंदी और उर्दू एक दुसरे के इतने करीब है के जब आप हिंदी बोलते हो हो उसमें कई शब्द उर्दू के होते है और आप जब उर्दू बात करते हो तो पच्चास प्रतिशत सेभी ज्यादा शब्द हिंदी होते है। जब हिंदी के शब्द पढने में दिक्कत होती है तो हम सोचते है 'कहीं ये उर्दू शब्द तो नहीं?' इसलिये हिंदी फिल्में नयी हो या पुराणी उसके संवाद और गीत उर्दूके बगैर अधूरे है। आज भारत के ५ स्टेट में उर्दू को राजभाषा का दर्जा है जैसे हैदराबाद, यूपी, बिहार, झारखंड और जम्मू-कश्मीर। आज भारतके कुछ दक्षिण इलाखों में बहोत ही शुद्ध उर्दू बोली जाती है। चूँकि दक्षिणमे तेलगु, कनडा, मलयालम और तमिल जैसे भाषा का ज्यादा प्रभाव है, उर्दू मे कई लोकल शब्द शामिल हुए है।


यह कहना भी सरासर गलत होगा के उर्दू पाकिस्तानी भाषा है। क्योंकि वहाँ उर्दू कम और बाकि भाषाऐ जैसे के बलूची, कश्मीरी, पाशतु, अरबी इ ज्यादा बोली जाती है।उर्दू जबान को १० करोड़ पूर्व पाकिस्तानी मुस्लिम याने आज के 'बांग्लादेश'  ने भी कभी नही अपनाया फिर वो पाकिस्तानी भाषा कैसे हो सकती है? पुरब पाकिस्तान याने आज के बांगलादेश की भाषा बांगला है, उर्दू नहीं l पाकिस्तान से जादा हिन्दुस्तान मे उर्दू बोली जाती है। हिन्दुस्तानमे ५ करोड़ तो पाकिस्तान में सिर्फ 1.25 करोड़ जनता उर्दू बोलती है। 'मोहाजिर' याने बटवारे के वक्त जीन मुस्लिमों को यूपी, पंजाब,हरियाणा, कश्मीर और दिल्ली जैसे ईलाखो से पाकिस्तान जाना पड़ा सिर्फ वही मुस्लिम उर्दू भाषा का इस्तेमाल करते है।। 'हम अलग तो हमारी भाषा भी कुछ अलग होना चाहिये' इसलिये पाकिस्तान ने भले ही उर्दू को राष्ट्रीय भाषा का दर्जा दिया हो लेकिन वो सरासर गलत है क्योंकि वहाँ बोलि भाषा मे उर्दू 'दूसरे स्थान' पर है।


दिलचस्व बात यह है कि १८वे सदि तक सिर्फ और सिर्फ अच्छे जानकार हि इन भाषाको पढ़ और समझ सकते थे। १९वे सदि मे ये दोनों भाषाएँ बहोत विकसित हुई। हिंदी को आगे बढाने मे मुंशी प्रेमचंद, संत कालिदास्, संत तुलसीदास, संत सूरदास और सन्त कबीर जैसे महान संत और साहित्य लेखक का बहोत बड़ा योगदान रहा। आज संपूर्णसिंग कालरा (गुलजार), रघुपति सहाय (फ़िराक़ गोरखबादी), रामप्रसाद बिस्मिल और महाराजा चंदूलाल जैसे गैर-मुस्लीम लेखक या कवि भी है जिन का उर्दूको आगे बढानेमे बढ़ा सहयोग रहा है।


भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग का जन्म अब के पाकिस्तान में हुवा था। बहोत कम लोग यह जानते है के उनकी शिक्षा उर्दू में हुई। जब वो प्रधान मंत्री बने तब ६० बरस के  रिवाज के मुताबिक उन्हें हिंदी मे भाषण देना जरूरी था। उन्होंने कुल ४८ मिनट भाषण दिया लेकिन बहोत कम लोग यह जानते है के उस भाषण की स्क्रिप्ट उर्दू भाषा में लिखी गयी थी ! क्योंकि डॉ. मनमोहन सिंग को उर्दू पढ़ना ज्यादा आसान लगता है।उर्दू का बहोत सा साहित्य पंजाब से आया है। विशेष बात यह कि उर्दू के कई शायर-लेखक पंजाब से आये है।


सिर्फ सियासत के लिए भाषा को बाटा जाता है l इसलिये जब कोई अगली बार आप से उर्दू में कुछ कहे या कुछ लिखे तो गलतफहमी में ना रहे, क्यों कि वह भी हमारी याने हिन्दुस्तान में पैदा हुई भाषा हैं l सिर्फ मुस्लिम समाज या किसी और देश की तो कतई नही।

तभी तो 
उर्दू के मशहूर शायर मुनावर राणा ने एक शेर में सही कहा, 

'लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है,
मैं उर्दूमें गझल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है।'




© प्रेमकुमार जैस्वाल
(आप यह लेख नाम के साथ शेअर कर सकते है। )

Thursday, 25 December 2025

सायकल पंप



                       सायकल पंप 

१९९६ ची घटना. नुकताच चार दिवसांचा बिजनेस टुर करून मी ऑफिसला पोहचलो होतो.  रिपोर्टींग करून आता टूर वर नं जाता काही दिवस लोकल(मुंबई) मध्येच काम करायचं असं ठरवलं होतं. थकलेलो असलो तरी ऑफिस स्टाफ सोबत टुरबद्दल गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात आमच्या मार्केटिंग मॅनेजरनी मला कॅबिनमध्ये बोलावलं. आत जाताच -

"तुला आताच्या आता टुरवर जावं लागेल", एखादा मोठा बॉम्ब पडावा तसे त्यांचे शब्द माझा कानावर पडले!

"पण... सर मी आताच टुरवरनं आलोय... थकलोय आनं कपडे...., सर उद्या गेलं तर चालेल का?"

" ते मला काही माहित नाही, व्हॉईस-प्रेसिडेंट साहेबांचा फोन आला आहे, एक पेशन्ट ऑक्सिजनवर आहे आणि त्याच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं कॉम्प्रेसर बंद पडलंय, रुग्ण दगावू शकतं, तुला जावंच लागेल. कपडे, ट्रेन तिकीट वगैरे ते सर्व बघून घे...वाटल्यास... टुर खर्च क्लेम करतांना तू थोडं जास्तीचं क्लेम कर, मी मंजूर करीन!" थोडं गोडगोड बोलत त्यांनी मला पटवलंच.

आता विचार करण्यासाठी वेळ नव्हता. सर्विस इंजिनियर असल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. लायका लॅब या मुंबई स्थित फार्मा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण विभागात मी नोकरीला होतो. भारतात वातावरणापासून ऑक्सिजन तयार करणाऱ्या 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन' चा मी पहिला सर्विस इंजिनियर, असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.  त्या काळी आम्ही फक्त ५ लिटर/मिनिट देणाऱ्या मशीन विकायचो. सीओपीडी म्हणजे जुनाट फुफुस दम्याचे आजार असलेले रुग्ण ते मशीन वापरायचे. त्यांच्यासाठी ऑक्सिजन हेच जीवन असतं. किंमत थोडी जास्त असल्याने फक्त श्रीमंतचं ती मशीन घेत असत. सततची सिलेंडरची कटकट नको म्हणून हा उत्तम पर्याय होता. वीज जोडल्याबरोबर हवेतील ऑक्सिजन वेगळं करून हि मशीन रुग्णाला देते, एव्हड इन्स्टंट, सोपं!

अशीच एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुरत जवळच्या खेड्यातील एका पटेल कुटुंबाने आमच्याकडून खरेदी केली होती. त्यांच्या पत्नीला चाळीशीच्या आतच फुफुसाचा मोठा आजार झाला होता. फुफुसतज्ञ डॉक्टरांनी त्यांना या पुढील जीवनात नेहमीसाठी २४ तास २ लिटर ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला होता. सिलिंडरची उपलब्धता, अदलाबदलीची कटकट टाळण्यासाठी त्यांनी आमच्याकडून विजेवर चालणारी हि मशीन घेतली होती. तरी असे रुग्ण आणीबाणी काळात लागेल यासाठी एक सिलेंडर ते घरी ठेवतातच.

आका का हुकूम सरआंखोपे!  समजून एक वजनदार कॉम्प्रेसर रिक्षमध्ये घेऊन मी अंधेरी ऑफिस ते गोरेगाव रूमवर, तेथून लोकलने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहचलो. आरक्षित तिकीट नसल्यामुळे हमालाला पैसे देऊन जुगाड करत सुरत ट्रेन पकडली. एक कॉम्प्रेसर, सर्विस बॅग आणि स्वतःची बॅग अशी सर्कस सांभाळत रात्री १२ ला सुरतला पोहचलो. बाहेर तुफान पाऊस पडत असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशाने तुफान गर्दी केली होती. कसाबसा त्यातून मार्ग काढत स्टेशन बाहेर पडलो.

धो धो पावसात बाहेर पडताच ऑटोरिक्षावाल्यानी मला घेरलं. माझ्याकडील सामान, चेहऱ्यावरील हावभाव बघून एक ' मोटा ग्राहक' मिळतोय असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण ज्या ठिकाणी मी जाणार त्या ठिकाणच नाव घेताच ती रिक्षाड्रायव्हर मंडळी दूर दूर होत गेली.  काही ' भाई बद्दा दूर छे, नथी जवानू' असं काही म्हणतं तोंड वाकडं करू लागली. पण त्यापैकी एका म्हाताऱ्या रिक्षावाल्याला माझी किव आली, '८० रुपिया देना पडेगा, है तो बोलो' मी घासाघीसच्या भानगडीत न पडता सरळ होकार दिला आणि निघालो.

सुरत स्टेशन पासून ते गाव साधारण १४-१५ किमी लांब असावं. तुफान पावसामुळे सुरत शहराच्या रस्त्यावर खच्च पाणी साचलं होतं. त्यातच पाणी रिक्षाच्या फुटरेस्टवरून वाहत असल्याने सामानाची सर्कस होतं होती. रिक्षावाला गुजराती भाषेत काय बडबड करत होता, काहीच कळत नव्हतं. पावसातचं गाव गाठलं. मध्य रात्रीची वेळ असल्याने फक्त एक घर सोडून संपूर्ण गाव गाढ झोपी गेलं होतं.  पाऊस, वीज बंद झाल्यामुळे अंधारात घरचा पत्ता विचारत कसाबसा रात्री १ ला आम्ही त्यांच्या घरी पोहचलो. मी आलो बघून पटेल कुटुंबाला हायसं वाटलं. घरातील एका वृद्ध महिलेने हात जोडून गुजराती भाषेत माझं स्वागत केलं, नंतर कळालं की ती रुग्णाची सासू होती. ती काय बोलली ते मला नाही कळालं पण त्यांच्या भावना मी समजू शकत होतो. एक मुलगा माझी बॅग आणि कॉम्प्रेसर घेऊन मला आत रुग्णाजवळ घेवून गेला. घरातील रुग्णाची अवस्था बघून मी चक्रावून गेलो.

मशीन तर बंदच होतं आणि स्टॅन्डबाय सिलिंडरचं ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनवायू मिळत नव्हता. ऑक्सिजन अभावी  ती महिला 'पाण्याविन माशा'  सारखी तडफडत होती.  तिला ऑक्सिजन नितांत गरज होती. थोडा तरी प्राणवायू मिळून ती मी येईपर्यंत जिवंत राहावी म्हणून त्याच्या जीवनाचा जोडीदार पतीने एक युक्ती केली. सायकलच्या चाकात हवा भरणाऱ्या पम्पला एक रबरी नळी जोडून त्याद्वारे तो पत्नीच्या नाकात हवा ढकलण्याचा प्रयत्न करत होता.  बाबाचा हा प्रयत्न त्यांची छोटी छोटी मुलं कावऱ्या-बावऱ्या केविलवाणी नजरेने बघत होती.  ते दृश्य खूपच ह्रदयद्रावक होतं. नाव 'पटेल' असं गर्भश्रीमंत असलं तरी त्यांची परिस्थिती अत्यन्त बेताची होती. 

मी क्षणाचाही विलंब न करता कंदिलाच्या उजेडात दहा मिनिटात ऑक्सिजन मशीनचं कॉम्प्रेसर बदललं आणि विजेची वाट बघत बसलो. आता रात्रीचे २ वाजले होते. जाम थकल्यामुळे मी क्षणात झोपी गेलो असतो पण  रुग्णाची अवस्था आणि तिला वाचविणाऱ्या पतीची धडपड बघून माझी झोपंच उडाली. वीज येईपर्यंत त्याचा तो सायकलमध्ये हवा मारण्याचा पंप चालूच होता.  लवकरात लवकर वीज यावी म्हणून मी प्रार्थना करत होतो. माझी थकलेली अवस्था बघून रुग्णाचा पती पटेल मला  'भाई, तमे अंय्या सोजावं' म्हणत होता. पण मी न झोपता बसल्याजागी गुंगत होतो.

तेव्हड्यात चमत्कार व्हावा तसा ओसरीतला विजेचा पिवळा ब्लब चमकला.  विज आल्याचा आनंद त्या 'पती' च्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मी कव्हर पॅक न करता लगेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन चालू केली आणि रुग्णाच्या नाकाला रबरी 'नोजल कॅनुला' लावला. आता 99% शुद्ध प्राणवायू रुग्णाच्या शरीरात धावत होता. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता, आभार प्रगट करण्यासाठी शब्दाची गरज नव्हती.

टेस्टिंगसाठी मशिनचं कव्हर मी मुद्दाम उघडं ठेवलं होतं. मशीन चालू, त्यामुळे थोडं अंग टाकण्यासाठी मी आता मोकळा झालो होतो.  कशी तरी २-३ तास झोप घ्यावी म्हणून बाहेर ओसरीत आंथरलेल्या गोदडीवर मी झोपी गेलो. सकाळी सहा वाजता उठून मशीनचं कव्हर लावलं. चहा पित सर्विस रिपोर्ट व बिल तयार करून मी चालता झालो. 

वैद्यकीय उपकरण नोकरी-व्यवसायात असताना अशा किती तरी सीओपीडी, अस्थमा रुग्णांशी माझा जवळून संबंध आला आणि अनेक बरेवाईट अनुभव आले. डॉ नितु मांडके, डॉ उडवाडियासारख्या किती तरी निष्णात तज्ञ डॉक्टर्स,  पॅराशूट ऑइलचे मालक श्री मरिवाला, हेक्स्टचे डायरेकटर सारखे किती तरी उद्योगपतीकडे आमच्या मशीन्स होत्या. त्या मशिनच्या सर्व्हिसिंग निमित्ताने मी त्यांना भेटत असे.  आज कोरोना महामारीत ऑक्सिजनच्या भिषण टंचाईला पर्यायी व्यवस्था म्हणून जगभर ऑक्सिजन मशीन किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सर्वत्र वापरल्या जात आहे. खरं तर ऑक्सिजन सिलेंडरला उत्तम पर्याय म्हणून हे वैद्यकीय उपकरण मागील २५ वर्षापूर्वी देशात उपलब्ध होतं आणि देशातील सर्व मिलिटरी रुग्णालयं ती वापरत होती.  वर्ष १९९७ मध्ये या मशीनची विस्तृत माहिती देणारा  'मोडॅलिटीज ऑफ ऑक्सिजन इनरीचमेन्ट' हा माझा लेख 'बायो-मेड' या  प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाला होता.  त्यावेळी मी 'कोअर हेल्थकेअर' या गुजरातमधील उद्योगसमूहात टेरियरी मॅनेजर या पदावर कार्यरत होतो.

एक अनुभव म्हणून मी हा लेख शेअर केला आहे. 

- प्रेम जैस्वाल,  छ संभाजीनगर (औरंगाबाद)
9822108775 

Monday, 24 November 2025

आर्ट ऑफ गिव्हिंग


'आर्ट ऑफ लिव्हिंग' सर्वाना परिचित आहे. आपल्या अवतीभवती कितीतरी लोक त्यांचे साधक असतील. 'जीवन जगण्याची कला' असा त्याचा अर्थ होतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सुदर्शनक्रिया, प्राणायाम, योग इ. त्यामध्ये शिकविले जाते. ज्यांच उदर भरलेले आहे त्यांच्यासाठी ते आवश्यकही आहे. पण समाजातील उपेक्षित, पिडीत, अनाथ घटकांचा विचार करता जगण्यासाठी अध्यात्म आणि योगा एव्हड़च पुरेस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा अशा मुलभुत गरजा पूर्ण झाल्याशिवाय योग आणि आध्यात्माला अर्थ नाही. 'भूके पेट न होये गोपाला....!' त्यामुळे आजही समाजाच्या तळागाळातील लोकांच्या मुलभुत गरजांचा विचार करता 'आर्ट ऑफ गिव्हिंग' हि तेव्हडेच महत्वाचे वाटते.

प्राचिन काळापासून मनुष्य हा कळपात राहणारा प्राणि होता. जेंव्हा शेती व्यवसाय विकसित नव्हता आणि मनुष्य परावलंबी होता, तेंव्हा जंगलात शिकार करण्यासाठी मनुष्य कळपात फिरायचा आणि मिळालेल्या शिकारीवर त्याची उपजीविका चालायची. अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय, हिंस्र प्राण्यापासून रक्षण, संकटकाळी धावून जाण्यासाठी, सुखदुःखात एकमेकाला मदत आदी कारणामुळे मनुष्याला कळपात राहणे आवश्यक होते. अड़ीअडचणीत एक दुसऱ्यांना देवून-घेवून लोक मदत करायचे. अनेक सण-उत्सवात धान्य, कपड्यांची देवान-घेवान व्हायची. त्यामुळे आपापसतील प्रेम-संबंध, नाते वृंदिगत व्हायचे. अडचणीत त्याचा फायदा होता. आणि त्यातुनच पुढे वेगवेगळ्या समाजाची निर्मिति झाली. गावखेड्यात आजही शेतातिल दूध,भाज्या-फळे, हुरड़ा, आंबे इ. शेजाऱ्याना वाटण्याची प्रथा आहे. कदाचित त्यामुळेच गावात भिक्षुक कमी आढळतात. शहरात यदा कदाचित असे कुणी केलेच तर त्याला 'शेअरिंग' असे 'सोफिस्टिकेटेड' नाव आहे. परंतु विज्ञानातील शोध आणि आर्थिक प्रगतिमुळे मनुष्य आता एव्हड़ा स्वावलंबी झाला आहे कि त्याला आता कळपात राहण्याची गरज उरली नाही. भौतिक सुखात तो गुरफटून गेल्यामुळे त्याला इतरांशी काही देने-घेणे, कुणाच्या सुखदुःखात, अडचणीत जाण्याची गरज वाटत नाही. जन्मदाते आई-वडील, जवळचे नातेसंबन्धी आणि समाजाचा येण्याजाण्याचा 'त्रास' नको म्हणून आज उच्चशिक्षित नोकरदार दूर नोकरी शोधत आहे. अशा असंवेदनशील आत्मकेंद्री वर्गाची संख्या दिवसंदिवस वाढून एक आत्मकेंद्री, चंगळवादी समाजाची निर्मिति होत आहे. ज्या समाजात राहून मनुष्य लहानाचा मोठा होतो, ज्या समाजाकडून संस्कार, जीवनमूल्य शिकलो तोच समाज आता त्यास नकोस वाटन, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पाऊस संपल्यानंतर छत्री अडचणीची होते, असा तो प्रकार आहे. सामाजिक बांधीलकी आणि संवाद फक्त व्हाट्सप आणि फेसबुकपुरते मर्यादित झाले आहे. हल्ली व्हाट्सप्प फेसबुकवरील हजारो मित्रातच मनुष्य मशगूल आहे. त्याला शेजारच्या 'व्हाट्सप' मित्राशी दोन मिनिटे बोलण्यासाठी वेळ नाही आणि गरजही वाटत नाही. थोडक्यात कळपात राहनारा प्राणि आज कुलुपात राहणे पसंद करत आहे. आपल्या गरजा पूर्ण होऊन स्वावलंबी झाल्याचा हा परिणाम आहे. विज्ञानाच्या प्रगतिमुळे जग जरी अगदी एका खेड्यासारखे वाटत असले तरी ह्या प्रगतिमुळे मनुष्य एकमेकापासून दुरावला गेला आहे, हेही तितकेच खरे. असो, 'कालाय तस्मै नमः' 


काळानुरूप मनुष्यात कितीही बदल झाले तरी त्यामुळे 'आर्ट ऑफ गिव्हिंग' चे महत्व कमी झालेले नाही. पण हल्ली धावपळीच्या युगात मनुष्य आपले काम आणि अर्थार्जनामध्ये खुप व्यस्त आहे. कुणास काही देणे तर दूर पण घेण्यासाठीही त्याच्याकड़े वेळ नाही. व्हाट्सप, फेसबुकवरील 'मित्रांना' गुड़ मॉर्निंग, गुड़ नाईट आणि मोठमोठे अवजड सुविचार (जे इतरांचे असतात) देण्याघेण्यामध्येच धन्यता मानतो. खऱ्या आर्ट ऑफ गिव्हिंगला आपल्या धनाच्या श्रीमंतीपेक्षा 'मनाशी श्रीमंती' लागते. याची प्रचिती घ्यायची असेल तर एक वेळेस हे करून तर बघा. त्यासाठी अगदी गावखेड्यातच जाण्याची गरज नाही. आपल्या शहरी जीवनात राहूनही 'आर्ट ऑफ' गिव्हिंग' चा अनुभव घेऊ शकता. 


औरंगाबादला माझा वैद्यकीय उपकरणाचा व्यवसाय होता तेंव्हाची ही घटना.  प्रसूतिनंतर बालरुग्णाना लागणारे वार्मर, फोटोथेरपी ज्याना सामान्यजनता 'काचेची पेटी' म्हणतात अशा उपकरणाची हॉस्पिटलला विक्री आणि दुरुस्ती आम्ही करायचो. कमी वजनाच्या, जन्मताच काविळ झालेल्या नवजात बाळाना ह्या उपकरणामध्ये उपचारासाठी ठेवल्या जाते. त्यावेळेस आमचं ऑफिस नव्हतं म्हणुन सर्व कामकाज घरूनच चालायच. मला आठवते सकाळची कामे, हॉस्पिटल-व्हिजीट आटोपूण मी दुपारी आरामात पहुडलो होतो. तेव्हड्यात कुणीतरी बेल वाजवून माझी झोपमोड़ केली. बाहेर बघतो तर एक नीटनेटक्या ड्रेसमध्ये ऑफिस एग्जीक्यूटिव वाटावे असे गृहस्थ उभे होते. अवकाळी पावसात ते थोड़े भिजलेही होते. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघता ते खुप घाबरलेले आणि गोंधळलेले वाटत होते. विचारपूस केल्यानंतर कळाल कि त्यांच नवजात बाळ शासकीय रुग्णालयाच्या अतिव दक्षता विभागात भरती होत. त्या बाळाला काविळ झाला होता आणि शासकीय रुग्नालयाच्या काविळ कमी करणाऱ्या फोटोथेरपी मशिनीची निळी ट्यूब काम करत नव्हती त्यामुळे इलाज होत नव्हता. अशा रुग्णालयात एखादा सुटाभाग खरेदी करायचा असल्यास एका वेळखाऊ दिव्यचक्रातुन जावे लागते. म्हणून ते स्वतः डॉक्टराकडून माझा पत्ता घेवून स्वखर्चाने माझ्याकडे ती ट्यूब खरेदी करण्यासाठी आले होते. इमर्जन्सी व त्यांची आर्थिक परिस्थिति बघून मी त्यांना ती ट्यूब मला आली त्या किमतीत देवून टाकली. पण पुढचा प्रश्न ती ट्यूब मशीनमध्ये बसवनार कोण? शासकीय रुग्णालयात काम करायच म्हणजे त्यांच्या लांबलचक, वेळखाऊ नियमाने जावे लागते. सर्विस चार्जेस तर मिळनार नव्हतेच, परन्तु नवजात बाळ आणि त्यांची अड़चन लक्षात घेवून पड़त्या पावसात मी ते उपकरण चालू करून दिले. फोटोथेरपी चालू झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आंनद बघण्यासारखा होता. पूर्ण व्यवहारात सरकारी नियम बाजूला ठेवून 'सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड' या भावनेने मी त्यांना निस्वार्थ मदत केली. कालांतराने मी ते सर्व विसरूनही गेलो होतो.


तीन वर्षानंतर औरंगाबादच्या रामा इंटरनेशनल या पंचतारांकित हॉटेलमध्ये बालरोगतज्ञानची कॉन्फ्रन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये आमच्या कंपनीचाही स्टॉल होता. पहिल्याच दिवशी स्टॉलची व्यवस्थित मांडणी करताना एक हॉटेल स्टाफ मला स्वतः येऊन विचारतो, 'साहब आपको कुछ ठंडा, पेप्सी कुछ चाहिये तो आप मुझे जरूर कहेना?', मला थोड़ आश्चर्यच वाटल की येथे कुणाशी माझा काही परिचय नसताना अस अचानक कुणी मला असं का विचाराव. मग त्याने मला स्वतःहुन आठवण करून दिली कि मी तोच व्यक्ती आहे ज्याच बाळ आजारी असताना तुम्ही भर पावसात मदत केली होती. ते महाशय रामा इंटरनेशनल पंचतारांकित हॉटेलचे 'कॅॅप्टन' होते.


कॉन्फ्रन्सच्या शेवटच्या रात्री रामा हॉटेलच्या लॉनवर बैंक्वेट होती. कंपनीस्टाफ व डिलरचे मिळून आम्ही आठजण होतो. आयोजकाने प्रत्येक स्टॉलला जेवणाच्या फक्त दोनच पासेस दिल्या होत्या. नियमानुसार आमच्यापैकी दोन जण बेंकवेटला जावू शकत होतो बाकी आम्ही बाहेर जेवन्याचं ठरवत होतो. कारण इतर सहा जणाना पंचतारंकित हॉटेलमध्ये पैसे देवून जेवने परवडणारे नव्हते. कोण बेनक़्वेट ज्वाइन करणार आणि बाहेर कोण जेवनार या द्विधेत असताना तेच रामा हॉटेलचे कैप्टन माझ्याकड़े येवून मला आस्थेने विचारतात की आपणास काही प्रोब्लेम आहे का. मी त्यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बैंकवेटच्या पासेसचा अख्खा गठ्ठाच माझ्या पुढे आणून ठेवला. 'सर, तुम्हाला हव्या तेव्हडया पासेस बिनधास्त घ्या!' मी त्यांच्याकडून बैंकवेटच्या सहा पासेस घेतल्या. शासकीय नियम आणि पैशाचा विचार न करता मी त्याला मदत केली होती आणि विसरून गेलो होतो पण त्याच्या ते पक्क लक्षात होत. 'रिटर्न गिफ्ट' म्हणून तेही पंचतारांकित हॉटेलचे सर्व नियम बाजूला करून किंवा आपले अधिकार वापरून आम्हास मदत करत करण्यास तयार होते. 'आर्ट ऑफ गिव्हिग' चा तो परिणाम होता. असं म्हणतात कि 'जे आपण इतराना देतो ते व्याजासहित परत मिळतं '.


निसर्गही आपल्याला भरभरुन देत असतो. प्रकाश, पाणी, हवा, पाऊस, ऊन, वारा, माती, जमीन, सावली, फूल, फळे, वृक्ष, इंद्रधनुष्य, पक्ष्यांची किलबिल अशा कितीतरी गोष्टी तो आपल्याला फुकटात घेतो. एखाद्या फळाचे बी चुकीने जरी शेतात पडल तर काही वर्षानी तिथे रसाळ फळाचे झाड़ उभे दिसते. सर्वच फळ-फुलांचे झाड़ आपण लावत नाही. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी निसर्गाकडून काहीही घेत नाही. मग निसर्गाकडून सर्वच गोष्टी फूकटात घेत असताना आपण फुकटात इतराना काय देतो, हे महत्वाचे आहे. म्हणूनच 'घेता' या कवितेत प्रसिद्ध कवि विन्दा करंदिकर म्हणतात -

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।।

©    -प्रेम जैस्वाल पेडगावकर
        9822108775

Tuesday, 21 October 2025

एक वो भी दिवाली....



                एक वो भी दिवाली थी! 

आज समाजमाध्यमात एक पोस्ट वाचली, " आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मोबाईलचा डाटा कधीच समाप्त न होवो. तुमचा वाय-फाय अखंडीत चालत राहो, वगैरे." या शुभेच्छामध्ये एक विनोद आणि हल्लीच्या परिस्थितीवर टीका सुद्धा होती. मग प्रश्न पडतो, कुठून कोठे आलो आपण? हा लेख वीज नसलेल्या काळातील दिवाळीबद्दल आहे. 

दसरा संपताच काही दिवसांनी दिवाळीचे वेध लागायचे. शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या. कोजागिरी पौर्णिमेंनंतर गावात फक्त आमच्या घरावर आकाशदिवा लावल्या जायचा.  लहाने काका कलाकार होते. आकाशदिवा किंवा गणपती ते घरीच तयार करायचे. किंबहुना रेडिमेड प्रकार उपलब्ध नसावा. बांबूच्या कमड्या तयार करुन त्याचा षटकोनी आकाराचा आकाशदिव्याचा सांगडा तयार करायचे. चिक्की तयार करुन त्या सांगड्यावर रंगीत पेपर चिपकविल जायचं. त्याकाळी रेडिमेड डिंक, फेव्हीकोल असं काही नसायचा. एक वेळेस मी तो आकाशदिवा बनविण्याचा  अयशस्वी प्रयत्न केला होता. मोठया खांबाला वर अजुन एक खांब बांधून साधारण ३० फुटावर तो दिवा लावला जायचा. रोज संध्याकाळी त्याला खाली उतरवून त्यातील दिव्याची ज्योत  व्यवस्थित करुन, तेल टाकलं जायचं. झेंड्याप्रमाणे हळुवार दोर ओढून तो आकाश कंदील वर चढविण्यात भलतीच मजा यायची. तिस फुटाची ती उंची बालपणी खूपच जास्त वाटायची. गावातील दूरवरच्या शेतातील मंडळींना तो लाल दिवा लुकलूकतांना दिसायचा. १९८३ पूर्वी पर्यंत गावामध्ये वीज नव्हती.

दिवाळीची खरी तयारी रंगरंगोटीने व्हायची.  तीन भावाचं एकत्र कुटुंब बरंच मोठं होतं.  तेव्हढाच मोठा घराचा पसारा होता.  मातीच्या जुन्या घरासह नंतर बांधलेली विटा सिमेंटची भिंत असलेली जोडणीची मोठी बैठक होतीच. त्याकाळी गावातील फक्त दोन तीन घरचं सिमेंट आणि जोडणीचे असावे.  जोडणीच घर म्हणजे त्याकाळी वैभवाच प्रतिक.   दिवाळीत सर्वात मोठं काम म्हणजे संपूर्ण 'घर रंगविणे' हेच होतं. घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न असेल तरचं घरात लक्ष्मी येणार, असं त्यामागचं कारण. त्यामुळे दसऱ्यानंतर हे काम सुरु व्हायचं. 

दिवाळी काही दिवसावर येताचं गावभर मातीच्या भिंतीची डागडुगी सुरु व्हायची. पावसाने भिंतीचे पापुद्रे निघायचे तर कधी भिंती पडायच्या. गावभर भिंती दुरुस्ती करुन त्याला शेनाने सावरण्यांची काम चालू व्हायचे. लहानमोठं काम लोकं घरच्या घरीच निपटून घ्यायचे पण मोठं असलं तर मात्र गडी लागायचा. गावात चिखलाचा गारा करुन भिंत दुरुस्त करण्यासाठी 'शिरपा गारा स्पेशालिस्ट' होता.   जेवण भाकरी आणि थोडंफार धान्याचा मोबदला ठरवून त्या करवी लोकं गारा तयार करुन भिंती दुरुस्त करुन घ्यायचे. शिरपा जसा उंचीला तसा अंगानीही धीपाड जाडजूड होता. त्यामुळे मोठा चिखलाचा गारा तुडवनं त्याला सहज जमायचं. 

शेनाने सारवल्यामूळे भिंतीला नवीन जीवन मिळायचं. हिरव्या शेणामुळे भिंतीला एक प्रकारचा नवीन 'कलर शेड' यायचा. हाच प्रकार आमच्या घरी घडायचा.  महिलावर्ग 'फ्री स्टाईल' ने भिंतीचे खड्डे भरून,  सारवून भिंतीला मजबूत करायचे. दिवाळी जवळ येता कामाला गती मिळायची. बालपणी आजच्या सारखे एशियन, बर्जर सारखे विविध तयार पेंट नव्हते की ब्रश नव्हते. मातीच्या भिंतीला चुनखडी कालवून लावल्या जायची. ठराविक भिंतीला अभ्रक लावली जायची. हा रंगरंगोटीचा विभाग आमच्या लहान काकाकडे होता. हिंगोलीच्या शॉपिंग लिस्ट मध्ये 'अभ्रक'खडी,गेरू, इतर रंगाचा समावेश करायचे. ऐका मोठ्या कापडी पिशवीत ती अभ्रक आणि थोडया गारगोट्या टाकून त्या पिशवीला पाणी टाकून सतत तुडवलं जायचं.  तुडवल्यामूळे  अभ्रकच्या पापुद्र्या अगदी बारीक होऊन तिचा चमकणाऱ्या नेलपेंट सारखा पेस्ट तयार व्हायचा. अशी अभ्रक जेंव्हा मातीच्या रुक्ष भिंतीवर चढायची तेंव्हा भिंतीला चारचांद लागायचे. ती चमचम चमकायची. पूर्वी आजच्या सारखी सरसकट भिंत एकाच रंगात न रंगवता खाली साधारण दीड फुटाची लाल रंगीत बॉर्डर मारली जायची. बॉर्डरमूळे ती भिंत जास्तच उठून दिसायची. तागापासून तयार केलेले लहान मोठे 'कुच्चे' वापरून संपूर्ण घराची रंगरंगोटी व्हायची. पेंटर हा प्रकार आम्हाला माहित नव्हता, आम्हीच पेंटर होतो. सर्व रंगाची कामं घरातील करण्याजोगी मंडळी आमच्यासारख्या लहानांना हाताशी धरून पार पाडायची. भिंतीचा वरचा भाग मोठे भाऊ तर  खालचा भाग आम्ही मारायचो. 

भल्या मोठ्या घराच्या खोल्याच्या रंगोटीचं काम लक्ष्मीपूजन दिवसापर्यंत चालायचं. घरासोबतचं मोठी बैठक, पिठाची गिरणीला रंगवावं लागायचं. काही ठिकाणी चुना तर काही ठिकाणी अभ्रक. नंतर नंतर ठराविक रंगाचे डिस्टेम्परचे पॅकेट बाजारात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे रंगवन्याच काम बरंच सोपं झालं.  शेवटी तो लक्ष्मीपूजनाचा दिवस उगवायचा.  या दिवशी छोटे काकाचं आध्यात्म शिगेला पोहचलेलं असायचं.  पोथी पुरानातून त्यांनी चांगले दोहे शोधून काढलेले असायचे.  दिवसभर वाटीमध्ये गडद लाल रंग आणि बारीक कुच्चा घेऊन ते कोणत्या नं कोणत्या खोलीत उंच स्टूलवर उभं राहून दोहे लिहायचे. आज 'कर्फ्यू दिवस' असायचा.  नेहमीप्रमाणे आज आम्ही काकांच्या 'कव्हरेज क्षेत्रा'त येणं टाळायचो. नोकराचं आज काही खरं नसायचं, त्यांचं काकांची बोलणी खानं ठरलेलं असायचं.  चूक झाली की 'बैल बैल, तुझे समजता नही ' ही त्यांची ओरड कायम असायची. आम्ही ती मुकाट ऐकून ते क्षेत्र टाळायचो. हेच आमचं 'बचाव तंत्र' होतं. दुपार होता होता लहान मोठ्या बैठकीसहित सर्व ठिकाणच्या भिंतीवर त्यांचे दोहे लिहून घराला 'अध्यात्मिक टच' लाभायचा. प्रत्येक प्रवेशद्वारावर 'शुभ लाभ' तर चौकटीवरच्या भिंतीवर 'ॐ' किंवा 'श्री' लिहिलं जायचं. 'शुभ-लाभ' चा अर्थ कमविलेलं लाभ किंवा धनाचा शुभ मार्गाने घरात प्रवेश व्हावा , वाईट मार्गाने नको हा त्यामागील अर्थ! भिंतीवर लांबलचक दोहे लिहिले जायचे. सतत वाचून ते आम्हाला मुखोदगत व्हायचे. काहीचा अर्थ स्पष्ट कळायचा तर काही फक्त वाचल्या जायचे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे -

चलो सखी अब जायीये जहाँ बसे ब्रिजराज l
गोरस बेचत हरी मिले एक पंथ दो काज l l 

पद पखारी जलू पान करी आप सहित परिवार l
पितर पारू करी प्रभू हिपूनी मुदित गये लेहूपार ll

राम नाम अंकितग्रह शोभा बरणीन जाय l
गो तुलसीका बंधतर देख हर्ष कपिलाय ll

राम नाम सब कोई कहे दशरथ कहे ना कोय 
एक बार जो दशरथ कहे कोटी बचन फल होय ll

राम नाम की लूट है लुटन वाले लूट l
अंत समय पश्चतायेगा प्राण जायेंगे छुट ll

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |; धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत l अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll

काकांच असं लिहणं चालू असतांना दुसरीकडे आई, काकी, बहिणी महिलामंडळ स्वयंपाक घरात मात्र दिवाळीचं मिष्ठान, पुरणाच गोड जेवण तयार करण्यात गुंग असायचं. लोखंडी कढईमध्ये भलंमोठं पूरनं खदखद तयार व्हायचं. कुरडई, पापड बुंदीचे गरम लाडू सर्व 'याची देही याची डोळा' आम्ही फक्त बघायचो.  स्वयंपाक घरातून पकवानाचा सुगन्ध आणि धुरच धूर बाहेर पडायचा.  खायची परवानगी लक्ष्मीपूजा संपन्न झाल्यानंतर! हा कडक नियम.  यापेक्षा मोठा ताप हा की भूक शमविण्यासाठी त्या दिवशी मुद्दाम भल्यामोठया जर्मलच्या भगोन्यात बेचव उडदाची खिचडी असायची. संध्याकाळपर्यंत ती पांचट खिचडी कडक होऊन तिचे दर्शन सुद्धा नकोसे वाटायचे. खायला काही गोड मागितलं की आमच्या मोठया बहिणी एक तर भगोन्याकडे अंगुलीनिदर्शन करायच्या नाही तर काकांना सांगते म्हणून भिती दाखवायच्या, बसा बोंबलत!

संध्याकाळ होता पूजेच्या ठिकाणी भिंतीवर कमळाचं फूल काढल्या जायचं. बऱ्याचदा हे काम माझ्या वाट्याला यायचं. घरात दिवे-वात्या लावन्याची व पूजेची एकचं गडबड सुरु व्हायची. घरातील सर्व फोटो सहित जुन्या नवीन वह्या जमा केल्या जायच्या. हार तयार केला जायचा.  यातील क्वचित एखादं काम जसेकी हार वगैरे आमचे वडील करायचे. हा त्यांचा प्रांत नव्हता. पूजेच्या ठिकाणी बसलेले कडक काका ऐकामागून ऑर्डर सोडायचे. त्यांचं बोलणं असं होतं कि, बऱ्याचदा त्यांनी काय मागितलं हे आम्हाला नाही कळायचं. आम्ही 'हो समजलं'  म्हणून कटायचो, मग मागे जाऊंनं काकीना चुपचाप विचारायचो 'काकांनी आता काय मागितलं?' अर्थात काकींना त्यांच्या भाषेची सवय झाली होती. तर अशा कर्फ्यू वातावरनात वह्या पुस्तक, खाते वही चोपडी वही यांची पूजा करुन लक्ष्मीपूजन संपन्न व्हायचं. सर्व वडील मंडळीचे पाय पडले जायचे. 

एकीकडे पूजा चालू असतांना आम्हाला मात्र फटाक्याचे वेध लागायचे. फटाके मिळतील या आशेवर सर्व कामं होऊन जायची पण ते फटाके सहजासहजी हाताला लागत नसत.  जेवणाप्रमाणे फटाके सुद्धा पूजेनंतरचं असा ठरलेला नियम होता. थोडक्यात प्रत्येक गोष्टीच्या आड पूजा यायची. पूजा संपली की आता आधी जेवण मग फटाके! हा जरा अतिरेक व्हायचा. मधूनच सर्व देव देवतांना,  आजी-बाबांना नैवेद्य दाखवायला जावं लागायचं.  या सर्व गडबडीत आमचे फटाक्याकडे कुणी लक्ष देत नसे.  पण नंतर फटाके वाटप व्हायचं. पण काही टिकल्याच्या डब्ब्या, सुरसुरी, लवंगी फटाके आणि काळ धुरचं धूर करणारी सापाच्या गोळीवर आमची बोळवण व्हायची. फटाक्यापुढं भूक विसरून आधी फटाके उडवूनच नंतर जेवण करायचो.  फटाके उडवीताना आमच्या आनंदात गावातील ग्रामस्थसुद्धा सामील होऊन दिवाळीचा आनंद घ्यायचे. 

प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी होते.   पण कालांतराने त्या उत्सवात खूपच बदल झालेत. आता ती तुडवनारी अभ्रक नाही की खडी नाही की बॉर्डर नाही.  दहा वर्षात एकदा भिंतीला रंग मिळतो कारण प्रत्येक वर्षी ते शक्य नाही. आता रोजचं पक्वानाचा आनंद मिळत असतांना दिवाळी पक्वाणाचं महत्व नाहीसं झालं. समोर वाढलं तर कुणी खात नाही, बीपी, शुगर, हृदयविकाराची भिती वाटते. रोजचं छान कपडे त्यामुळे नवीन कपड्याचं महत्व राहिलं नाही. दिवाळी खरेदीच्या वस्तू बदलल्या. आता मानसिक सुखा ऐवजी लोकांचा कल दुचाकी, चारचाकी, फ्रिज सारख्या भौतिक सुख देणाऱ्या वस्तूकडे वळला आहे.  समाजाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता ऑनलाईन ऑर्डर करुन  आकाशादीवा हरपोच मिळतो. इलेक्ट्रिसीयन तो लटकवून देतो.  सर्वच रेडिमेड, मग फराळ घरी का करावा? तेही ऑनलाईन ऑर्डर केल्या जातं. काही दिवसानंतर घरासमोर फटाके उडविण्याची गरज पडणारं नाही.  फटाके उडवून देणाऱ्या एजेन्सी उपलब्ध होतील. फक्त मनी ट्रान्सफर केलं कि झालं. डिजिटल तंत्रज्ञान  लोकांचा अस्सल आनंद हिरावून त्यांना आभासी जगात रमविण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.  

सततचे संस्कार अंगात भिनतात किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडतात. बालपणी मनावर झालेले संस्कार वाया जात नाही. सिमेंटच्या भिंतीतूनही एखादं हिरवं रोपटं उगवून बाहेर यावं, असे कधी ना कधी ते बाहेर पडतातचं. आजही आम्ही दिवाळी  तेव्हड्याच उत्सवाने साजरी करतोच. शक्य तेव्हढे नियमाचे पालन करतोच. मागील काही दिवसात मी पेंटच्या रिकाम्या डब्ब्याना छानसा रंग देऊन सजवलं. त्यावर काय लिहावं म्हणून गुगलवरून काही छानसे संस्कृत सुभाषित शोधून काढले, ते लिहिले. शेवटी 'वळणाचं पाणी वळनावरचं जातं' हे ही तेव्हढंच खरं. 

बाकी काही नाही 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!' साजरी करा दिवाळी. हार्दिक शुभेच्छा.

©प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह. मू. छ. संभाजीनगर, 9822108775







Saturday, 11 October 2025

उडी बाबा! कोलकत्ता




पर्यटन हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. जग जाणून घेण्यासाठी पर्यटनाशिवाय पर्याय नाही. पूर्वी वृद्ध अवस्थेत गेलेली व्यक्ती हिमालय प्रवासासाठी जायची. असे म्हणतात, संपूर्ण आयुष्य चढउत्ताराशी सामना करत जीवन जगलेली लोकं शेवटी कौटुंबिक कटकटीपासून मुक्त होउन मानसिक समाधानासाठी हिमालय गाठत. आजही बोलाचालीत आपण ‘एकदा का हे झालं की जातो मी हिमालयाला’ अशी म्हण ऐकावयास मिळते. कालांतराने परिस्थिती बदलली. समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने हल्ली बरीच मंडली वर्षातून एकदा का होईना पर्यटननिम्मातेने घराबाहेर पडतात. पर्यटनाचे अनेक कारणे असू शकतात. काही देव देव करण्यासाठी, कुणी एतिहासिक स्थळ बघण्यासाठी, कुणी गडकिल्ले बघण्यासाठी तर कुणी दुसऱ्या ठिकाणाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन करत असतात. हल्ली गुगुल चाटजीपीटीमुळे सर्व नियोजित ठिकाणाची माहिती काही क्लिकवर उपलब्ध असते. हल्ली ओनलाईन टूर गाईड, हॉटेल बुकिंग आणि सर्वच गोष्टीच सहज नियोजन होत असल्यामुळे पर्यटन करणे अगदी सोपं झालं आहे. सततच्या कटकटीतून काही दिवस दूर होवून मुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनशिवाय दुसरा पर्याय नाही.  

बऱ्याच गोष्टीला योग जुळून यावा लागतो. असाच योग कलकत्ता फिरण्याचा सहज चालून आला. निमित्त होतं मुलाच्या पदवीदान समारंभाचा. एकेकाळी देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या या शहराबद्दल बरंच वाचून होतो. पण कधी फिरण्याचा योग येईल असं कधी वाटलं नाही. पश्चिम बंगाल प्रांतात कम्युनिस्ट पक्षाचं सरकार तर केंद्रात बीजेपीचं सरकार त्यामुळे समाज माध्यमात कोलकत्ताबद्दल बराच द्वेष मी वाचून होतो. अर्थात केंद्रीय शासनाची सुपारी घेतल्याप्रमाणे गोदी मिडिया कोलकत्ताबद्दल सतत दुष्प्रचार करत आला आहे. प्रत्यक्ष कोलकत्ता शहर आणि येथील परिस्थिती बघून ‘दुध का दुध आणि पाणी का पाणी’ होणारा होतं. बऱ्याच वर्षापूर्वी काश्मीरबद्दल पाच पुस्तकं वाचल्यानंतर मी स्वत: काश्मीर फिरून आलो. तेथील लोकांशी सवांद साधला. फक्त गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम असे अतिसुंदर प्रसिद्ध पर्यटन स्थळ न फिरता चक्क तेथील एका गावात जाऊन लोकांशी संवाद साधला. त्यामुळे काश्मीर विषयी बरेच गैरसमज दूर झाले. काश्मीरकडे आणि फेक मिडियाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोण बदलला. प्रत्यक्ष परिस्थितीत आणि व्हाटस्प विद्यापीठाच्या माहितीत किती फरक आहे हे कळाल. समाज माध्यमातील फेक पोस्ट किती हानिकारक आहे हे कळालं. शिवाय दरबारी लेखक स्वताच्या स्वामीला खुश करण्यासाठी कोणत्या स्ताराला जाऊ शकतात, कसा दुष्प्रचार करू शकतात, हे सुद्धा माहित पडलं.

मुंबई कोलकत्ता हवाई प्रवासात आपण ‘बाबूमोशाय’ प्रांतात चाललोय याची चाहूल लागली. एअरपोर्ट डिपारचर गेटजवळ बाजूच्या सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांच ‘बोंगाली’ भाषेतील संवाद मी एकत होतो. बंगाली भाषा समजण्यासाठी अगदी सोपी. त्यातील किमान तीस टक्के शब्द मराठी भाषेतील असतात. कोठाय, भीषण , खूप, जोल हे मराठीसारखेच. फरक एवढाच की प्रत्येक शब्दाला ओ जोडायचा असतो. अमित च्या जागी ओमित आणि गणेशच्या जागी गोनेश. बस्स एवढाच फरक. तेव्हड्यात एक व्यक्ती काळ्या पठाणी झबल्यामध्ये झापझाप माझ्या समोरून चालत गेला. कुणी तरी व्हीआयपी सारखा तो वाटला. सोबत त्यांचं लगेज घेवून इंडिगोचे अधिकारी होते. त्यावरून निश्चितच तो व्हीआयपी असणार याचा अंदाज आला. नंतर कळालं तो क्रिकेटर युसुफ पठाण होता. त्याला आमच्यासोबत न बसवता ईन्डीगो अधिकारी दुसरीकडे घेवून गेले. मला तो फालतूपणा आवडला नाही. पण असो. अर्थात विमानात तो बिजनेस क्लासमध्ये आणि मी इकोनोमी क्लासमध्ये. प्रवासात कोणत्या दर्जाचे प्रवासी प्रवास करत आहेत यावरून डेस्टिनच्या ठिकाणाचा अंदाज आपण बांधु शकतो. हवाई प्रवासात बरेच सूटबुटातील प्रवासी होते. बहुदा ते कॉर्पोरेट क्षेत्राचे उच्च पद्द्स्त अधिकारी असावेत.

दोन तासाची फ्लाईट लँड झाल्यानंतर लगेज घेवून मी बाहेर आलो. एअरपोर्टच्या बाहेर पडताच माझी नजर इकडे तिकडे फिरत होती. हे नवीन शहर कसं वेगळ आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. असं म्हणतात की आपण डोळे उघडे ठेवून या जगाकडे बघितलं तर आपल्याला बरच काही शिकायला मिळतं. भारत देशात कोणत्याही एअरपोर्टच्या बाहेर जा, रिक्षावाले, भाड्याच्या कारवाले तुमच्या सेवेत हजर असतात. आपली फसवणूक होऊ नये म्हणून मी आधीच ओला बुक केली होती. ओलाशी संबंधित गाड्या ह्या तुलनेने स्वच्छ असतात असा माझा समज होता. पण तो समज येथे चुकीचा निघाला. गाडी बरीच अस्वछ होती. खाकी युनिफोर्म नेसलेला चालकसुद्धा अस्वछ आणि त्याने तोंडात पान कोंबलेला होता. पान खात खात तो माझ्याशी संवाद करत होता, ‘किधोर जाना है?’. मधूनच तो खिडकीतून पचकन थूकत होता. आम्ही दोघे हिंदी या समान भाषेत बोलत होतो. दोन किलोमीटर गाडी चालवताच त्याने मला खुणवत गाडी उभी करतोय म्हणून सांगितलं. मला काही कळण्याआधी तो पटकन बाजूला जाऊन लघवी करून आला. मी या सर्व गोष्टीच निरीक्षण करत होतो. विचार केला की याला महाशयाला लघवी करायची होती तर तो एअरपोर्टवर का गेला नाही? पान खाऊन बाहेर थुंकणे हे येथे एव्हढ सामान्य आहे. काही वेळात त्याने मला सोल्टलेक परिसरातील आयआयटी खडकपूरच्या होस्टेलवर आणून सोडलं.

आयआयटी खडकपूर येथून साधारण १०० किमी दूर आहे. कोलकत्ता येथे सर्व सुविधा असल्यामुळे आयआयटीने येथे एक छोटसं होस्टेल ठेवल आहे. व्हिजिटिंग प्रोफेसर किंवा बाहेर देशातून येणार व्हिजिटर, विध्यार्थ्याना इलाजासाठी, मुकामासाठी या होस्टेलचा उपयोग होतो. शिवाय विध्यार्थीनचे पालक या ठिकाणी थांबू शकतात. तसं माझं काम आयआयएम कोलकत्ता येथे होतं. पण ते ठिकाण खूपच दूर असल्याने मी आयआयटी विध्यार्थ्यांचा नातलग म्हणून येथे थांबनार होतो.

होस्टेलवर फ्रेश होताच मी शहर फिरून घेण्यासाठी बाहेर पडलो. संध्याकाळचे साडे पाच वाजले होते. मुद्दामहून भाड्याची कार न घेता मी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याच ठरवलं. मुंबईत मी शेकडो वेळेस बस, डबलडेकर बसने प्रवास केला होता. कोलकत्ता शहर मला बरचं मुंबईसारखं वाटलं. थोडी गरीब मुंबई. बसमध्ये चढताच मला जागा मिळाली. बसचा कंडकटर तिकीट फाडत अगदी पुढे गेलेला होता. पाठीमागे प्रवासी चढताच तो मागे आला. त्याच्या डाव्या हाताच्या बोटामध्ये वेगवेगळ्या चलनी नोटा खूपसलेल्या होत्या. चिल्लर मात्र खिशात होती. सांगितलेल्या ठिकाणासाठी त्याने रु १३/- देण्यास सांगितले. एक छोटसं बोटाएव्हड रुंद चिरकुट तिकीट त्याने माझ्या हातात दिलं. कदाचित जास्त पेपर वापरून वृक्षतोड नको यासाठी तिकिटाचा आकार लहान केलेला असावा. तिकीट काढल्यानंतर मला कळलं की माझा स्टोप बराच पुढ आहे आणि मी त्या अलीकडच्या स्टोपचं तिकीट काढलं. त्यावर बाजूचा प्रवासी म्हणाला सर गरज नाही. . तेरा रुपयात तुम्ही त्याही पुढे प्रवास करू शकता. मला खूपच आश्चर्य वाटलं. स्टोप येताच ड्रायवरने आहे त्याचं लेनमध्ये बस थांबविली. त्याने बस रस्तेच्या कडेला सुद्धा घेतली नाही, हे विशेष. उतरणारे भरभर खाली उतरले. मीही त्यात शामिल झालो. बाहेर पडताच मी कोलकोत्याच्या मार्केटकडे बघत होतो. आपल्याकडे कोणतीही वस्तू घ्या, किंवा भाजीसुद्धा त्याची किमत पाचच्या पटीणे असते. मेथीची जुडी स्वस्त असेल तर पाचला, किमत वाढली तर सरळ दहा किंवा पुढे पंधरा होते. येथे मात्र तिकीट तेरा रुपये, चहा सहा रुपये असे प्रकार मी बघितले. मार्केटमधील वस्तू सुद्धा आपल्या तुलनेने बरयाच स्वस्थ होत्या. दोनशे रुपयात मी पोट भर सुकी फिश खाली. त्यासाठी इकडे मला किमान पाच-सहाशे रुपये मोजावे लागले असते. कपड्यांची आणि जीवन उपयोगी बऱ्याच वस्तूंची छोटी छोटी दुकाने मी येथे पाहिली आणि त्याचे भाव जाणून घेतले.

मार्केटच्या थोडे पुढे जाताच त्या ठिकाणी युवा वर्गाची प्रचंड गर्दी दिसली. क्रिकेट युनिफोर्ममधेय हजारो युवकांचे टोळके इकडे तिकडे भटकत होते. सगळीकडे गोंगाट होता. कित्येकांनी आपल्या तोंडावर हातावर भारत देशाचा तिरंगा रंगविला होता. फुटपाथवर अति कमी किमतीत टी शर्टसं विकले जात होते. त्यावर देशाच्या झेंड्याचे चिन्ह होते. विचारल्यानंतर कळालं की येथे बाजूलाच इडन गार्डन स्टेडियम आहे. आणि तिथे ‘डे अंड नाईट’ क्रिकेटचा सामना चालू आहे. सर्वत्र गोंगाट होता. त्यामुळेच मुंबई – कोलकत्ता प्रवासात मला विमानात युसुफ पठाण दिसला होता. कदाचित तो हा सामना बघण्यासाठी किंवा कॉमेंट्री करण्यासाठी आला असावा. आता मी थकलो होतो. भाड्याची कार घेवून मी परत होस्टेला परत आलो. इडन गार्डन ते माझं होस्टेल बरच लांब होतं. पण ठरविलेलं भाड बरच कमी होतं. कारच्या चालकाशी मी सतत प्रश्न विचारत होतो. त्यामुळे माझ्या ज्ञानात बरीच भर पडत होती. तुम्ही एका दिवसात साधारण किती कमावता? घर कसं चालतं? त्यांच्या म्हणण्यानुसार कोलकत्तासारख्या मेट्रो शहरात फक्त अठरा रुपयात एका व्यक्तीचं पोट भरतं. कसे तर मासे आणि भात खाऊन. दिवसात शंभर दीडशे जरी मिळाले तरी आम्हाला खूप होतात. तेव्हड्यात कुटुंबाच धकून जातं, असं तो म्हणाला. बिहार प्रांत या ठिकाणापासून जवळ त्यामुळे मुंबई प्रमाणे कोलकतामध्ये बरेच कार चालक हे बिहारी दिसले. येथिल स्वस्ताई बघून आपण मुंबई, पुणे आणि कोलकत्ता शहराची तुलना करून शकतो.

होस्टेलवर पोहोचताच तेथील सेवकानी उद्या ब्रेकफास्टमध्ये आपण काय खाणार? हे आधीच विचारून ठेवलं. दुसऱ्या दिवशी वीस रुपयात भरपूर पोहे, दोन अंडी आणि एक केळ वाढण्यात आलं. त्यासोबत चहासुद्धा. यापेक्षा स्वस्थ अजून काय असू शकतं. ‘दाढीसाठी येथे जवळ सलून आहे का?’ यावर त्या सेवकाने डावीकडे थोड्या अंतरावर एक झाड आहे. तेथे एक सलूनवाला खुर्ची लावतो तेथे तुम्ही दाढी करू शकता. दहा वाजता तो न्हावी हजर झाला. त्याने वीस सुपयात दाढी आणि लगेच थोडी मसाजसुद्धा. येतांना मी एका चौकात थांबलो. येथे चौकाला आयलंड म्हणतात. थोड्या वेळात पांढरया साड्या नेसलेल्या दोन जेष्ठ महिला आल्या. त्यांच्याकडे वृतपत्र होती आणि सोबत एक डिंकाचा डब्बा घेतलेला सहकारी होता. त्या चौकात एक मोठा लोखंडी स्टेन्ड होता. त्यावर त्यांनी डिंक लावून त्यावर लगेच वृतपत्राची पान चिपकिवली आणि ते निघून गेलेत. आजूबाजूच्या लोकांनी लगेच ते चिपकिवलेलं वृतपत्र वाचायला सुरुवात केली. मला ती कल्पना खूपच आवडली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकाना वृतपत्र विकत घेण्याचा खर्च वाचला. शिवाय रहदारीची जनता चालता चालता ते वृतपत्र वाचू शकता.

दुसऱ्या दिवशी मुलासोबत मी विक्टोरिया मेमोरियल बघून घेतला. इंग्र्जानी भारतात इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापना कोलकत्ता येथेच केली. त्यांच्या पावूनखुणा येथे स्पष्ट दिसतात. विक्टोरिया मेमोरियल येथे लॉर्ड कर्झनचा भव्य पुतळा आहे. येथील वास्तूचा नमुना बघून पूर्वी येथे इंग्रजांनी राज केल आहे हे स्पष्ट जाणवतं. रस्त्यावर फिरतांना इंग्रजांच्या काळातील जुन्या बऱ्याच इमारती येथे दिसतात. हे शहर बरचसं मुंबईसारख भासतं. रस्त्याची रचनासुद्धा मुंबईसारखीच आहे. एकेकाळी अख्ख बॉलीवूडचं केंद्र कोलकत्ता होतं. त्यामुळेच जुन्या चित्रपटात सर्व कथामध्ये कोलकत्ता शहराची झलक बघायला मिळते. या ठिकाणचं विशेष म्हणजे – अम्बेसेडर कार. आपल्याकडे हिंदुस्तान कंपनीची अम्बेसेडर कार बघायला मिळत नाही. सर्व इतिहास जमा झालेल्या आहेत. क्वचित वर्षातून एखादी दिसते. कारण ते तंत्रज्ञान खूपच जून झालं आहे. सगळीकडे एआय, इंटरनेटनी सज्ज कार उपलब्ध आहे. मॉडर्न कारमध्ये नवीन नवीन फिचर उपलब्ध आहेत. पण कोलकत्ता येथे आजही ही पिवळ्या रंगाची अम्बेसेडर कार रस्त्यावर बिनधास्त फिरतांना दिसते. या कारची संख्या खूपच जास्त असल्यामुळे कदाचित इतर कंपन्या त्यांना सुटे भाग तयार करून देत असतील कारण ह्या कारच उत्पादन कधीच थांबलेलं आहे. काही दिवसापूर्वी अम्बेसेडर कार नवीन रुपात पुन्हा अवतरणार आहे असं मी कुठ तरी वाचल्यासारखं आठवतं. असो.

कोलकत्ता येथील ट्रामबद्दल मी बरचं आयकून होतो पण त्यामध्ये बसण्याचा योग आला नाही. आदल्या रात्री मी या ट्रामबद्दल विचारला असता ठराविक मार्गावर ठराविक वेळी ती चालते असं ऐकल. पण त्या ट्रामचे लोखंडी ट्रेक मला बऱ्याच जागी दिसल्या.  

विक्टोरिया मेमोरियल बघून नंतर आम्ही ‘सायन्स सिटी’ बघण्यासाठी गेलो. विज्ञान तंत्रज्ञान जाणून घेणाऱ्याना कोलकत्ता येथील सायन्स सिटी नक्कीच आवडेल. भारतीय अंतरीक्ष प्रवास, प्रकाशाचा परावर्तन, लोंगीट्युडीनल वेव, ट्रान्सवर्स वेव सारखे शेकडो वैज्ञानिक प्रयोगाचा येथे उलगडा करून दाखविला आहे. वोल्व्हकॅनो कसा तयार होतो इत्यादी. तीन तास येथील विज्ञानाचे प्रयोग बघून मी परत होस्टेलला परतलो. कोलकत्त्यामध्ये फिरतांना १९९० च्या मुंबईत फिरल्यासारखा भास होतो. दक्षिण मुंबईसारखे येथील रस्ते, रस्त्याच्या कडेच्या उंचच उंच इमारती. त्याचं आर्किटेकचर हे बरच मुंबईसारख वाटत. एवढचं नाही तर येथील वातावरणसुद्धा मुंबईसारख दमट वाटलं. फक्त फरक एवढाच की येथे मुंबईसारखी गर्दी आणि धावपळ करत फिरणारी जनता मात्र दिसत नाही.

आपल्याकडे हल्ली ब्रिज तयार होतात आणि उद्घाटनापूर्वी किंवा काही दिवसांनी ते पडतात. अर्थात त्यात चूक ब्रिज तयार करणाऱ्यांची नसते. हल्ली धरतीतून निघणार खनिज मटेरियल, वाळू, सिमेंटचा दर्जा बरोबर नसावा, असो. पण शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेला हावरा ब्रिज आजही दिमाखात उभा आहे. या लोखंडी पुलाबद्दल मी बरच वाचलं होत. किती तरी लिखाणामध्ये मी या ब्रिजचा उलेख केलेला आहे. त्यामुळे सरळ होस्टेलला जाता टक्सी चालकाला गाडी हावरा ब्रिजवरून घेण्यास सांगितली. या ब्रिज लोखंडाचा. खरं तर सतत वाहणाऱ्या हुगळी नदीच्या पाण्यामुळे लोखंड गंजून या ब्रिजचं नुकसान व्हायला पाहिजे होतं पण आजही तो ब्रिज शाबूत आहे आणि सतत त्यावरून वाहतूक होत असते. कोलकत्ता आणि हावरा या दोन शहराला जोडण्यासाठी इंग्रजांनी हा पूल तयार केला होता. या पुलाची विशेषता अशी हा पूल उभा करण्यासाठी कोणत्याही नट किंवा बोल्ट वापरल्या गेलं नाही. सर्व जोडण्या ह्या रिबीट लावून केलेल्या आहेत. वर्ष १८७१ मध्ये इंग्रजांनी हा पूल तयार करण्याचा कायदा तयार केला. हा पूलचं डिजाइन सर ब्रेडफोर्ड लेस्ली या इंग्रज डिजाईनर केलं होत. हा पूल १५२८ फुट लांब आणि रुंदीला ६२ फुट आहे. १९०६ मध्ये हावडा स्टेशन तयार झाल्यानंतर आधीचा पूल तात्पुर्त्ता ब्रिजच्या जागी न्विईन मोठा पूल तयार करण्यात आला. दुसरी विशेष बाब अशी की या पुलासाठी लागणार लोखंड प्रसिद्ध उद्योगपती टाटा यांनी पुरवलं होतं. तब्बल २५ कोटी खर्च करून तयार झालेल्या हावडा ब्रिजचं काम १९४२ मध्ये पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी सज्ज झाला. सन १९६५ या ब्रिजला रविंद सेतू असं नाव देण्यात आलं पण आजही तो हावरा ब्रिज नावानेच ओळखला जातो. हा ब्रिज एव्हढा प्रसिद्ध आहे कि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या नावानी एक चित्रपट सुद्धा आहे.       

माझा एक अत्येंत जवळचा मित्र नितीन राठी, माझा कॉलेज ज्युनियर सध्या कोलकत्ता येथे स्थायिक झाला आहे. बरीच वर्ष कोलकत्त्यामध्ये काढल्यामुळे तो अस्खल बंगाली भाषा बोलतो. करियरच्या सुरुवातीची बरीच वर्ष त्यांने मुंबईला काढली. मार्केटीगमध्ये असल्यामुळे तो सतत फिरतीवर असायचा. त्यामुळे ‘जीवाची मुंबई’ काय असते हे त्याने चांगल अनुभवल होतं. नोकरी बदलताना त्याला कोलकत्ता हेड ऑफिस मिळालं आणि तो तिथे जो रुळला तो कायमचाच. आता त्याला मुंबई नकोशी वाटत्ते. कारण विचारलं तर त्याचं म्हणन पडतं – ज्या लक्झुरुयीस फ्लट मध्ये मी राहतो तसा मुंबईला घ्यायचा झाल्यास मला चार करोड रुपये खर्च करावे लागतील. आणि तो फ्लटसुद्धा मुंबईपासून जवळ नसणार. मग कशाला उगीच जीवाची मुंबई करायची. हवाई प्रवासाने कोलकत्ता ते नागपूर फक्त दोन तास लागतात. मला त्याचं म्हणन पटलं. मी सुद्धा एक दोन नाही तर तब्बल साडे सहा वर्ष जीवाची मुंबई करून घेतली आहे. 

उन्हाचा त्रास टाळण्यासाठी जेव्हड जमेल तेव्हडा कोलकत्ता मी एक्सप्लोर केला. दिवसा कमी आणि रात्री जास्त फिरलो. कोलकत्ता येथील रोसगुल्ला जरा जास्तच प्रसिद्ध आहे. जागोजागी असलेल्या मिठाइच्या दुकानात रोसगुल्ला, सोन्देश, कलाकन प्रसिद्ध आहे. हे तिन्ही मिष्टान दुधाला फोडूनचं तयार केलेले असतात. आपल्याकडे हा प्रकार तेव्हडा प्रसिद्ध नाही. संध्याकाळी आयआयएम कोलकत्ता येथे पदवीदान समारंभला मला उपस्थित व्हायचे होते. दुपारी चारलाच मी नियोजित ठिकाणी पोहचलो. मुलाच्या निमित्ताने का होईना आयआयएमसारख्या देशाच्या उच्च संस्थेचा पदवीदान सोहळा कसा पार पडतो हे मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहू शकलो. देशभरातील पालक मंडली या अद्भुत सोहळ्याला जातीने हजर होती. बऱ्याच सभागृहात फिरतांना आणि भोजन करतांना बऱ्याच विध्यार्थ्यांच्या पालकाशी मी संवाद साधला. योग असा की मी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे माझ्या शेजारी बसलेलं कुटुंब हे जैस्वाल निघालं. रात्री परत होस्टेल गाठलं.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. दर दोन तीनशे किलोमीटरवर येथील संस्कृती बदलते. संस्कृती म्हणट की त्यात राहणीमानासह खानपान आलच. कोलकत्त्याच्या खानपान विषयी सांगायचं झाल्यास येथे सर्व मांसाहारी व्यंजनामध्ये मांसासोबतच बटाटा म्हणजे आलू असतोच. होस्टेलच्या जेवणात तसेच आयआयएम कोलकत्त्याच्या मांसाहारी डिशमध्ये मला बटाटा दिसलाच. हा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता. देशात कोणत्याही राज्यात फिरण्यासाठी गेलो असता तेथील प्रेक्षनिय, एतेहासिक आणि अध्यात्मिक स्थळाऐवजी तेथील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बघण्यात मला जास्त आनंद होतो. एकंदरीत कोलकत्ता शहर इतर शहराच्या तुलनेत मला खूपच स्वस्त वाटलं. राहण्यासाठी, फिरण्यासाठी, खाण्यासाठी हे शहर मला जास्त खर्चिक वाटलं नाही. परंतु प्रसारमाध्यमातील भाटांनी या राज्य आणि शहराविषयी अपप्रचार करून या शहराची प्रतिमा मलीन करण्याची कोणतीही कसर सोडली नाही हे निश्चित. अर्थात त्यामागे राजकीय पक्षाचा स्वार्थ आहेच.

 © प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह. मू. छ संभाजीनगर, 9822108775

----------------------------