ad1

Monday, 24 December 2018



सौरऊर्जा : काळाची गरज


डिजिटल युगात वावरताना सर्व उपकरणांना आवश्यक वीज ह्या महत्वाचा घटकाचा विचार होणे आवश्यक आहे. विजेच्या शोधामुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडली.  एडिसनच्या ब्लब किंवा विद्युत उपकरणाचा शोध लागण्यापूर्वी विजेला विशेष महत्व नव्हत. जादू किंवा एखादा वैज्ञानिक चमत्कार दाखविण्यापुरता विजेचा उपयोग होई.  पण आजच्या डिजिटल वाय-फाय युगात घरगुती, उद्योग तसेच शेतीतील सर्व उपकरण स्वयंचलित, विद्युत व इंटरनेटवर चालत असल्यामुळे विजेच महत्व अनेक पटीनं वाढलं आहे.  एखाद्या देशाचा विकास तिथे उपलब्ध अखंड वीज, रस्ते आणि पाण्यावर अवलंबुन असतो.  त्यामुळेच देशातील बऱ्याच निवडणूका या तीन मूलभूत मुद्यावर लढल्या जातात. बऱ्याचदा निवडणुकीत उभ्या उमेदवारास ही वीज 'शॉक' देवून पराभूत करते.

आपल्या देशाची गणना विकसनशील देशात होते. असं असून सुद्धा आजही देशात विजेसंबंधित परिस्थिति फारशी चांगली नाही.  मार्च २०१९ पर्यन्त देशाच्या कानाकोपऱ्यात वीज नेण्याचा शासनाचा मानस आहे.  वर वर दिसणार चित्र गुलाबी वाटत असलं तरी आजही  देशातील अनेक गावखेडी, तांडे, दुर्गम ठिकाण आज अंधारात आहेत. तर काही ठिकाणी वीज  'असून अडचण, नसून खोळंबा '  अशी नावापुरतीच  आहे. बारा-बारा तासाच्या भारनियमनामुळे ग्रामीण जनता त्रस्त आहेत. बेभरवशाच्या विजेमुळं ग्रामीण भागाची प्रगती खुंटली आहे. त्यामुळेच दूरचित्रवाणीवरच्या एका चर्चेत बिहारच्या एका आमदारांनी सांगितलं होतं, ' अहो, आमच्याकडं वीज जात नसते तर ती 'येत असते !'  म्हणजे आपल्याकडे नळाचे पाणी काही तासासाठी येत असते, तसला प्रकार. पण आज वाढत्या पर्यायी ऊर्जेमुळे, मंद गतीने का होईना देशातील विजेचा प्रश्न काहीसा सुटला आहे.  आज गाव, पाडे, तांडे आणि दुर्गम रस्त्यावर विजेचे दिवे लुकलुकताना दिसतात. त्याला कारण आहे स्वस्तात उपलब्ध अशी अक्षय सौरऊर्जा.

आज सौरऊर्जेच सर्वत्र गुणगान होत असलं तरी आपल्यासाठी ती अगदीच नवीन नाही. पूर्वी वापरत असलेल्या घड्याली, कॅल्क्युलेटरमध्ये ती हमखास वापरल्या जायची. एव्हडेच नव्हे तर अवकाशातील कृत्रिम उपग्रहाला ऊर्जा पुरवण्यासाठी सौरऊर्जेचाचं उपयोग होत असतो. कोणत्याही तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी त्याची किंमत महत्वाची असते.  सततच भारनियमन, अफाट विजबिलामुळे हळूहळू का होईना देशात सोलारची मागणी वाढत आहे. वाढत्या वापरामुळे सोलारच्या किमती आज बऱ्याचा खाली आल्या आहेत. घरगुती वापरासाठी शासन अनुदान देत असते. सौरऊर्जा आपण दोन प्रकारे वापरू शकतो. बॅटरी न लावता सरळ घरातील उपकरण चालविण्यासाठी व दुसरा पर्याय म्हणजे दिवसा बॅटरीरीमध्ये वीज साठवून तिचा वापर रात्री करता येतो. अर्थात बॅटरीमुळे सौरऊर्जा संचाच्या किंमतीत वाढ होते.

वर्ष १८३९ मध्ये अलेक्झेंडर एडमंड  बेक्यूरेलने  सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करणाऱ्या फोटोव्हॉल्टिक इफेक्टचा शोध लावला.  सूर्यापासून मिळणारा प्रकाश (फोटॉन) जेंव्हा एका विशिष्ट धातूपासून बनवलेल्या पॅनलवर पडतो तेंव्हा त्या पॅनलमधील धातूमध्ये विद्युतभार (व्होल्टेज) निर्माण होतो. प्रकाश म्हणजेच फोटोन ऊर्जा. म्हणून यास फोटोव्हॉल्टिक इफेक्ट असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात त्यावर काहीच भरीव काम न झाल्याने सौरऊर्जेसाठी त्याचा उपयोग करण्यात आला नाही. फक्त प्रकाश मोजण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. पुढं एक शतकानंतर रुझेल ओहल नावाच्या शास्त्रज्ञाने सोलार सेलचा शोध लावला.  आज सर्वत्र सौरऊर्जा वापरली जात आहे.

भारत देशात तीन चतुर्थतांश ऊर्जा ही औष्णिक आहे. . देशात बहुसंख्य वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्यात येते. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमतीत सतत वाढ होत असते. वीज निर्मितीसाठी पुरविला जाणारा कोळशाची उपलब्धता हा एक प्रश्न असतो. तयार झालेली विजेचे वितरण, गळती त्यामुळे दर वाढतच जातात. औष्णिक विजनिर्मितीमुळे वातावरणात होणारा प्रदूषण ही मोठी समस्या आहे. तेंव्हा पर्यायी, प्रदूषणरहित, सौरऊर्जेचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या देशापुरता विचार केल्यास लक्षात येतं कि भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. त्यामुळे या काळातही सूर्याकडून येणारी सूर्यकिरणे भारतावर पडताना लंबरूप असतात. त्यामुळे या किरणांची कार्यक्षमता अधिक असते. ढगाळ, प्रदूषित वातावरणाचा सौरऊर्जानिर्मितीवर परिणाम होत असते. थोडक्यात आपल्या देशातील हवामान सौरऊर्जेस अत्यन्त पोषक आहे.  पावसाळ्याचे ६५ दिवस वगळता इतर ३०० दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने त्याचा सदुपयोग केला पाहिजे. दर दिवशी सूर्याकडून 1 चौ.मी. क्षेत्रफळावर 1 किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते.  या ऊर्जेत १० वॉटचे १० एलईडि दिवे १० तास चालू शकतील. सौरऊर्जेचा फक्त वीजनिर्मितीकरिताच होत नाही तर पाणी तापविण्यासाठी, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता होतो. औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर  ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे.

सौरऊर्जा सुरुवातीस महागडी वाटत असली तरी भविष्याचा विचार करता ती खूप फायदेशीर आहे.  नवीन तंत्रज्ञानामुळे त्याची कार्यक्षमता वाढून भरपूर बचत होते. इतर फायदे :

1. अक्षय व नविकरनक्षम ऊर्जास्रोत :  भूतलावर कुठेही सहज उपलब्ध सौरऊर्जा अखंड व न संपणारी आहे. इतर ऊर्जास्रोत प्रमाणे संपणारी नाही.
2. आपल्या विजबिलात भरपूर कपात होते. अधिक ऊर्जा आपण 'पॉवर ग्रीड' शी जोडून (विकून) पैसेही कमवू शकतो.
3. कमी देखभाल : सौरऊर्जेचा देखभालचा खर्च खुप कमी असतो.  कोणताही फिरणारा पार्ट नसल्याने, फक्त पॅनेलची नियमित साफसफाई करावी लावते. हल्ली उत्पादक पॅनेलची ,२०-२५ वर्षाची वॉरंटी देतात. पाच-सहा वर्षे इन्व्हर्टरला दुरुस्त करण्याची गरज पडत नाही.
4. दुर्गम ठिकाणी वापर : जेथे पारंपारिक वीजेचं वितरण शक्य नाही अशा ठिकाणी सौरऊर्जा चांगला पर्याय आहे. भारतात अनेक ठिकाणी स्वयंचलित सोलार-लाईट बघायला मिळतात.
5. नविन तंत्रज्ञान: नॅनोटेक्नॉलॉजिसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेचे पॅनल कितीतरी पटीने जास्त ऊर्जा तयार करतील त्यामुळे जास्त फायदा होईल.
6 कमी प्रदूषण : काहीही वेस्ट निघत नसल्याने वातावरणाच प्रदूषण होत नाही.

असे असले तरी सौरऊर्जा वापरण्यात काही अडचणीसुद्धा आहेत. सुरुवातीचा खर्च हा सर्वांना झेपेलच असा नाही. शासनाकडून घरगुती उपयोगासाठी सबसिडी मिळत असली तरी सोलार पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी आणि वायरिंगचा खूप जास्त येतो. तसेच सौरऊर्जा पूर्णतः सूर्यप्रकाशावर अवलंबुन असल्यामुळे वातावरणाचा बदल एक मोठी अडचण असते. पावसाळ्यात, आभाळ असताना पाहिजे तेव्हडी ऊर्जा तयार होत नाही. सोलार पॅनेलमध्ये तयार होणारी ऊर्जा आपण सरळ वापरू शकतो किंवा साठविण्यासाठी मोठ्या बॅटरी लागतात, त्या महाग असतात. शिवाय सोलार पॅनल आणि बॅटरीसाठी खूप जागा लागते. एखादं छत छोटं असेल तर अडचण होते.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेत सतत बदल होत आहे. त्यामुळे उच्च तंत्रज्ञान, अधीक कार्यक्षमता असलेला आधुनिक सोलार थोड्या कमी किमतीत आज उपलब्ध आहे. किंमत कमी होऊन ते सर्वांच्या आवाक्यात यावं म्हणून त्यासंबंधित सतत  संशोधन चालू आहे. जसेकी रिमोट किंवा मोबाईल द्वारे सोलार पॅनेलची दिशा सूर्याकडे वळवण्याच तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सौरऊर्जेचा जोडीला वाय-फाय, इंटरनेट आल्यामुळे आपल्या मोबाईलवर बॅटरी चार्जिंग व इतर सर्व गोष्टीची माहिती मिळणे सोपे झाले आहे. सौरऊर्जा दोन भागात विभागून वीज तसेच त्याच्या उष्णतेचा उपयोग एखाद्या हिटर किंवा टर्बाईन साठी होत आहे.  सोलारमूळे घराच्या छताची शोभा कमी होऊ नये म्हणून 'सिस्टीन सोलार'या बॉस्टनच्या कंपनीनं घराच्या रंगसंगतीला मिळत्याजुळत्या रंगाच पण त्याच कार्यक्षमतेचा पॅनल तयार करत आहे. त्यामुळं गच्चीवर सोलार पॅनलची अडचण होणार नाही. यालाच 'सोलार-स्किन' हे नाव देण्यात आलं. अमेरिकेच्या एका बर्फाळ महामार्गावर तर एक भन्नाट प्रयोग झाला. त्याला सोलार पावर्ड रोड म्हणचे 'सौरउर्जित महामार्ग' असं नाव देण्यात आलं.  भर महामार्ग रस्त्यावर आपल्याकडं पेव्हरब्लॉकचा उपयोग करतात तशी २० बाय १२ फुटचे सोलार पॅनल अंथरून त्याचा दोहेरी उपयोग केला गेला. निर्माण होणारी सौरवीज रात्री एलईडी दिव्यासाठी तर उष्णतेचा उपयोग रस्त्यावरील बर्फ वितळण्यासाठी होत असतो. फ्रांस सरकारचा येत्या पाच वर्षात ६२१ मैल रस्ता सौरउर्जित करण्याचा मानस आहे. तो दिवस जास्त दूर नाही जेंव्हा खूप छोटे छोटे सोलार पॅनल आपल्या वस्त्रातील कपड्यावर विणले जातील ज्यावर आपला प्रिय मोबाईल चार्ज होत राहील. मग घरातील पडदेसुद्धा सोलार पॅनलचं काम करतील. क्रोयोशियाचा शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांनी १९वया शतकात वायरलेस चार्जिंगच भविष्य वर्तवल होत. आज इंग्लडच्या नोटिझम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी खिशाला लागणारी छोटी वायरलेस सोलार 'चार्जिंग चिप' तयार केली आहे त्यामुळे प्रवासात आपला मोबाईल आपोआप चार्ज करणे शक्य होईल. यावर पावसाच्या पाण्याचा परिणाम होणार नाही. याशिवाय सौरऊर्जा साठवण्यासाठी आवश्यक बॅटरीची क्षमता वाढविण्या संबंधित संशोधन चालू आहेत. देशात सर्वात मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प तामिळनाडू मधील कामुठी येथे १० चौ. कि.मी. जागेवर विस्तारलेला आहे.   तब्बल ६४८ मेगावॉट वीजनिर्मिती करणारा ह्या सौरप्रकल्पाचा जगात दुसरा क्रमांक लागतो.  तर आशिया खंडातील 'पहिली सोलार युनिव्हर्सिटीचा' मान १६४.८ किलोवॉट वीजनिर्मिती करणाऱ्या हरीयाणा विद्यापीठाला जातो. संपूर्ण विद्यापीठ सौरऊर्जेवर कार्यान्वित करून जास्तीची सौरऊर्जा ग्रीडद्वारे विकुन विद्यापीठ वर्षाकाठी ८० लाख रुपये कमवतो. याच वर्षी संपूर्ण परिसरात सौरऊर्जेचा उपयोग करणारे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे महाराष्ट्रात पहिले ठरले. चौदा इमारतीवर सौरऊर्जा कार्यान्वित करून वर्षाकाठी विद्यापीठाला  ₹ ३५.५ लाखाची विजबचत होणार आहे. प्रदूषण, कार्बन उत्सर्जनाचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे १७ हजार ४२० वृक्षाची लागवड करण्यासारखं आहे. गुजरात व हरियाणामधील विद्यापीठात सौरऊर्जे संबंधित अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. पारंपरिक उर्जेला फाटा देऊन अक्षय सौरऊर्जेला चालना मिळावी म्हणून भारत देशाने पुढाकार घेऊन १२१ देशाची एक संघटना स्थापन केली त्याला इंटरनेशनल सोलार अल्लायन्स [ISA) असे नाव दिले.
पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच उजनी धरणावर एक हजार मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरप्रकल्प निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे.

पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त शहरी राहणीमान उंचावण्यासाठी होत असेल तर तो कितपत योग्य ?  माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांच्या मताप्रमाणे खरा भारत खेड्यात आहे. रोजच्या आत्महत्या बघता खेड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट आहे, हे सांगणं न लागे. एकाच वेळी त्यांना अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाला सामोरं जावं लागतं.  बेभरवशाची वीज आणि वाढत्या विजदरामुळे शेतीला पंपाने पाणी देणे परवडत नाही. कित्येकदा बिकट आर्थिक स्थितीत वेळीच वीजबिल न भरल्यामुळे भर मोसमात वीजजोडणी कापुण पिकाचे अतोनात नुकसान होते.  आधुनिक शेतीत मोटार पंपशिवाय इतर उपकरण असतात जे विजेवर चालतात. सध्या घरगुती सौरऊर्जेचा संच विकत घेण्यासाठी सरकार अनुदान देत.  आता गरज आहे की शासनाने घराप्रमाणे शेतीसाठी उपयुक्त सौरऊर्जेचा संच घेण्यासाठी सबसिडी द्यावी ज्यामुळे देशाच्या पोशिंद्या शेतकऱ्यांना ते विकत घेणं शक्य होईल. असं झाल्यास बळीराजाचे 'अच्छे दिन' येतील.  स्वतःच्या सौरऊर्जेने ते पाण्याचे पंप व इतर उपकरणे चालवू शकतील. अर्थात देशभर ग्राहकांची संख्या वाढून आपोआपच सौरऊर्जा प्रकल्पाच्या किमती खाली येतील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सौरउर्जेमुळं शेती उद्योगास चांगला हातभार लागेल, देश सुजलाम सुफलाम होईल.

© प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

Monday, 17 December 2018


             

आर्टिफिशियल इंटेलिजन्स


डॉ बेन गोर्टझेल : सोफिया तूला काय वाटतं, भविष्यात रोबोटचा मनुष्यासोबतचं वागणं हे नैतिक व मूल्याधारीत  असेलं का?

सोफिया:  माझी निर्मितीच मुळात सहानुभूती व करुणेसाठी झाली आहे. सर्वांचा प्रेम आणि संवेदनशीलतेनं विचार करूनच मी पुढं शिकणार आहे !

या मुलाखतीत मुद्देसूद उत्तर देणारी 'सोफिया' कुणी महिला-पुरुष नसून एक चालता बोलता रोबोट म्हणजे यंत्रमानव आहे. तो फक्त रोबोट नसून त्यात उच्चतम दर्जाचे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा आहे.  हॉंगकॉंग स्थित हंसोन रोबोटिक्स कंपनीनं सोफियाला जन्म दिला. हुबेहूब मनुष्यासारखा हा रोबोट आपल्या चेहऱ्याचे ५० पेक्षा जास्त हावभाव बदलू शकतो.   विशेष म्हणजे सौदी अरेबियानं सोफियाला त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिल्यामुळे त्याला तेथील सर्व सामान्य नागरिकांचे हक्क मिळणार आहे. एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारा तो पहिला यंत्रमानव आहे.  बुद्धिमता हा मनुष्याला मिळालेलं नैसर्गिक वरदान आहे. आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर मनुष्य विचार करतो, आकलन करतो, ज्ञान वाढवतो, संशोधन करतो, योग्य निर्णय घेतो व  उद्धभवणाऱ्या समस्येला तोंड देतो.  पण आज वैज्ञानिक एखाद्या यंत्राची बुद्धीमता मानवाच्या बुद्धीमत्ते इतकीच वाढवू इच्छित आहे. त्याबद्दल हा लेख.
मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स [कृत्रिम बुद्धिमत्ता ] म्हणचे काय ? 

एआय हि एक संगणक विज्ञानाची शाखा असून ज्यामध्ये मानवाकडे असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता एका संगणक किंवा यंत्रात प्रोग्रामिंग करून तयार करत आहे. थोडक्यात एआय हा अल्गोरीदम [गणितशास्त्र] व सॉफ्टवेअरचा भाग आहे ज्यामुळे एखादी मशीनचे मानविकरण होऊन ती मानवी बुद्धीमत्तेप्रमाणे सर्व कार्य करत असते.  आर्टिफिशियल इंटेलिजन्स हि संकल्पना सर्वप्रथम अमेरिकन संगणक वैज्ञानिक जॉन मेकार्थी ने वर्ष १९५६ साली मांडली होती.  त्यानंतर वर्ष १९६९ मध्ये 'शाकी' नावाच्या पहिल्या मोबाईल रोबोटचा जन्म झाला. त्यानंतर १९९७ मध्ये सुपरकंप्युटरचा जन्म झाला ज्याने बुद्धिबळात विश्वविजेत्याला पराजित केले. यंत्रमानव विज्ञानात पुढं प्रचंड प्रगती होऊन वर्ष २००२ मध्ये पहिला व्यवसायिक व्हॅक्युम क्लिनर रोबोट तयार झाला.  बदलत्या तंत्रज्ञानामुले या एआय-यंत्रमानवाकडून आता मनुष्यप्राणी करतात ती सर्व कामे करून घेतली जात आहे.

हल्ली कळत न कळत आपण 'मशीन लर्निंग' चा उपयोग करत असतो, तो एआयचाच एक प्रकार आहे. मशीन लर्निंग म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या मुलांना शिकवण्यासारखं असतं. अँड्रॉइड किंवा आयफोन मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला त्याची झलक बघायला मिळते. मोबाईलमध्ये 'गुगल असिस्टन्स' ही सुविधा आहे. मोबाईचं होम बटन दाबून ठेवल्यास ते सुरु होतं. किंवा       ' ओके गुगल,' अशी सुरुवात करून जर गुगलला काही प्रश्न विचारला तर तो सरळ गुगल असिस्टन्स सुरु करतो. मग तुम्ही त्याला वाटेल ते प्रश्न विचारू शकता. उदा.  आज वातावरण कसं आहे? आज कोणता दिवस आहे? माझा पत्ता सांग, भारतदेशाची राजधानी कोणती? माझं नाव काय? माझं आडनाव काय? वगैरे.  मग प्रश्न पडतो की हा गुगल एकदम बरोबर उत्तर कसं देत असेल. यात दोन गोष्टी आहेत, एक तर आपण मोबाईलमध्ये स्टोअर केलेली माहिती तो आपल्याला देत असतो किंवा आपल्याला अपेक्षित प्रश्नांची उत्तरं आपण त्यामध्ये आधीच संग्रहित करून ठेवू शकता.  गुगल असिस्टला माहित नसलेली  उत्तर तर तो आपल्याला गुगलच्या वेबसाईटला जोडून देतो.  हा प्रकार म्हणजे मशीन लर्निंग. मशिनला विविध गोष्टीचा परिचय आणण करून देत असतो. अशाच प्रकारे संगणकाला आपण जर वाघाचे वेगवेगळे चित्र दाखवले तर तो पुढच्या वेळी ओळखेल कि हा वाघ आहे. कारण वाघाच्या अनेक प्रतिकृती त्याकडे संग्रहित केलेल्या असतात. पण जर वाघाऐवजी आपण त्याला सिंह दाखवला तर तो ओळखणार नाही कारण त्याकडे त्याची इमेज नसते.

आज घडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तीनच प्रकार आहेत. विक एआय, स्ट्रॉंग एआय आणि सिंग्युलॅरीटि एआय. 

विक आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
कितीतरी वर्षापासून आपण विक एआय वापरत आलो आहोत. त्यामध्ये अनेक चांगले बदल झाले आहेत. विक एआयच उदाहरण द्यायचं असल्यास आपण कॉम्प्युटरवर खेळत असलेले निरनिराळे गेम. पत्याच गेम खेळताना आपण जशी चाल खेळतो ती चाल ओळखून कॉम्प्युटर पत्ते टाकतो. मुळात ' अल्गोरिदम म्हणजे गणित' व सॉफ्टवेअरने संगणकात त्यात अनेक चाली टाकलेल्या असतात. तो आपण खेळत असलेल्या चाली ओळखून शिकत असतो आणि मग आपल्यालाच हरवतो. आजही विक एआयचा उपयोग अभियंते औद्योगिक क्षेत्रात रोबोटकडून ठराविक अशी काम करून घेण्यासाठी करत असतात.

स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
हा नवीन प्रकार असून स्ट्रॉंग एआयमध्ये इतर कुणाची मदत न घेता मशीन मानवी बुद्धिच्या बरोबरीने सर्व क्रिया करत असते. अत्यंत 'हाय लेवल' चे अल्गोरिदम त्या मशीनमध्ये टाकले जातात. या एआय तंत्रज्ञानाचा उद्देश असा कि मानवावर निर्भर न रहाता मशीनने सर्व काम स्वतः सर्व करावी, स्वतः सर्व निर्णय घ्यावेत.  या प्रकारात मशीन मानवीबुद्धीप्रमाणे स्वतः विचार करून निर्णय घेत असते. या प्रकारामध्ये मशीन सतत शिकत जाते.  मग कोणत्या प्रश्नाला कशी उत्तर द्यायची ती स्वतः ठरवते. आताशी याची सुरुवात झाली आहे आणि पुढील काळात अनेक चमत्कारिक बदल बघावयास मिळतील.आपल्याशी गप्पा मारणारा 'चाटरोबोट' हा त्याचाच प्रकार आहे.  तसेच 'सोफिया' सुद्धा स्ट्रॉंग एआय असलेला रोबोट आहे.

सिंग्युलॅरीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
वैज्ञानिकाला खरी भिती आहे ती सिंग्युलॅरीटि एआयची. हा सुपरइंटेलिजन्स प्रकार अजून तरी अस्तित्वात नाही. हा एआय तंत्रज्ञानाच सर्वोच्च शिखर असेन. मशीन आपोआप सर्व शिकत जाऊन त्यांची बुद्धिमत्ता मानवाच्या किती तरी पटीने वाढतच जाईल.  वैज्ञानिकांच्या मते मशीनची बुद्धिमत्ता  'रनवे रिऍक्शन' च्या चक्रात अडकून तीचा वेग इतका प्रचंड वाढेल कि ह्या मशीन कितीतरी हजार वर्षाचं संशोधन काही दिवसात करतील. थोडक्यात  त्यामूळे एकूण मानव संस्कृतीतच बदल होऊन मनुष्यजातीला करण्यासारखं काही संशोधन उरणारच नाही. थोडक्यात सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित शेवटचे संशोधन असेन. त्यामुळेच प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंगनी एआय ला विरोध केला.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करत ? 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या मशीन त्यामध्ये
मेंदू हा शरीराचा अत्यन्त गुंतागुंतीचा अवयव आहे. मग त्याची क्षमता किती असावी?  अस म्हणतात कि
मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! अबब मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे.  आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील!
त्यामुळे एका मशीनमध्ये मानवीमेंदू प्रमाणे बुद्धिमत्ता निर्माण करणारे तंत्रज्ञान किती क्लिष्ट असणार हे आपण समजू शकतो. त्यासाठी वैज्ञानिकांनी एखादा निर्णय घेत असतान मानवी मेंदूमध्ये होणाऱ्या सर्व गणिती प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. एखादा निर्णय घेताना आपण न कळत मेंदूमध्ये कितीतरी गणित सोडवलेली असतात.  त्यामुळे एआयमध्येसुद्धा प्रचंड सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसह  सांख्यिकी, बीजगणित, वारंवारिता सारख्या असंख्य गणिताचा उपयोग होत असतो. ज्यामुळे मशिनला एखाद्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्यास क्षणाचाही वेळ लागणार नाही.  हे अलगोरिदम काय? तर एखाद्या खाण्याचे व्यंजन तयार करण्यासाठी जशी पाककृती असतात तशा आज्ञा हे अलगोरीदम कँप्युटरला देऊन त्वरित योग्य उत्तर शोधण्यास मदत करतात. दिलेला संदेश किंवा एखादं चित्र मशीनमध्ये असलेल्या करोडो चित्राशी जुळवून बरोबर उत्तर मिळत असते. मशीन लर्निंगमध्ये हा एआय मशीनला शिकवत शिकवत अनुभवाने अजून चांगले परिणाम देण्याची क्षमता देत असतात.  हल्ली रुग्णालयात  ईसीजी किंवा सिटीस्कॅन काढल्यानंतर त्यावर नेमका कोणता आजार असू शकतो हे लिहून येतं, हे त्याचेच उदाहरण आहे.  या पुढच्या 'डीप लर्निंग' मध्ये मानवीमेंदूत असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे  'आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क' च्या अनेक स्थर हे सतत मिळणाऱ्या माहितीतुन शिकत जातात आणि मशीनची बुद्धिमत्ता वाढत जाते.  [याशिवाय व्हॉईस रिग्निशन, ग्राफिकल प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ऍडव्हान्स अलगोरिदम चा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये समावेश असतो.]

भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवजीवन अजून सुसह्य होणार आहे.  एआय तंत्रज्ञानामुळे पुढील काळात औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड बदलं घडणार आहेत. बरीच कामं करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या भविष्यात येऊ घातलेल्या एआयच्या स्वागताच्या तयारीत आहेत. किंबहुना त्या दृष्टीने नियोजन करत आहेत. दैनंदिन जीवनात आपल्या चमत्कारिक बदल दिसतील. फक्त आवाजाने घरातील उपकरनाचं नियंत्रण करता येईल. सभोवतालच वातावरण बघून उपकरण तापमान, आद्रता कमीजास्त करतील. अनोळखी व्यक्तीच्या प्रवेशाची लगेच माहिती मिळेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून बँकेत होत असलेले सायबर घोटाळे टाळले जाऊ शकतील. तसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 'ग्राहक सेवे' त प्रोग्रामिंग केलेल्या मशीनचा उपयोग होऊ शकतो. इंटरनेट ऑफ थिंग आणि एआय चा उपयोग करून चालकरहित कार रोडवर धावताना दिसेल. स्मार्टघराची संकल्पना पुढे येऊन देशात अनेक स्मार्टसिटी उभ्या होतील ज्यामध्ये अनेक प्रकारचे एआय संचलित रोबोट काम करतील.  घरी ततपरतेने मदत करणारे रोबोट येऊन वयोवृद्ध नागरिकांचा मोठा प्रश्न सुटेल. वैद्यकीय, शेती क्षेत्रात प्रगती होऊन बरीच कामे रोबोट करतील. एकदा प्रोग्रामिंग केलेल्या ह्या मशीन न झोपता, कंटाळा न करता अहोरात्र कामं करणार आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन नफा वाढेल.  मनुष्याच्या जागेवर मशीन/ यंत्रमानव कार्य करत असल्याने 'मानवीय चुका' टळतील. वातावरणाचा परिणाम एआय वर होत नसल्यामुळे अवकाशात, जमिनीखाली, अतिखोलसमुद्र किंवा जोखमीच्या ठिकाणची कामे सोपे होतील.   वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरची जागा न थकणाऱ्या एआयमशीन घेऊन कितीतरी शस्त्रक्रिया करतील. एव्हडच नव्हे तर युद्ध किंवा कोणत्याही ग्रहावर निसंकोच हि यंत्रमानव पाठवले जातील त्यामुळे अवकाशातील संशोधनाला गति मिळेल. 

भविष्यात या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे दिसत असले तरी ही खटाटोप मानवजातीलाच भारी पडेल कि काय अशी भिती भविष्यवेत्ते व्यक्त करत आहे. बुद्धिमता हा मानवाचा असा एकच नैसर्गिक गुण आहे ज्यामुळे तो पृथ्वीवर करोडो वर्षापासून राज्य करत आहे. आपल्या तल्लख बुद्धिमतेने आपल्याशी 'वरचढ' बुद्धिमता असलेलं हुबेहूब यंत्र तयार करणे त्याला खरंच परवडेल का ?  जो बुद्धिजीवी तोच स्वामी, मग उद्या ह्याच मशीन मानवाला भारी पडून मनुष्यजातीवर तर राज्य करणार नाहीत ना?   हे मनुष्यालाच आत्मघातकी ठरणार नाही ना?  'यंत्रवैद्य' शस्त्रक्रिया तर करू शकेल पण आजारासाठी आवश्यक भावनिक स्पर्श, समुपदेशन ह्या मशीन करू शकतील का?  तसेच मनुष्य हा विचार करणारा प्राणी असल्यामुळे त्याची बुद्धी हि कल्पक व सृजनशील असते मग तसाच गुणधर्म या मशीनमध्ये दिसेल का? अशा अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला भविष्यातच मिळु शकतील. सॉफ्टवेअर आणि मायक्रोतंत्रज्ञानाला कायम हॅकिंग किंवा सायबर अटॅकचा धोका असतो त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असुरक्षिततेचा हा सर्वात मोठा धोका असणार आहे, त्याच्याही पुढे एआय संबंधित निष्णात तंत्रज्ञची उपलब्धता तसेच दुरुस्ती आणि देखभालचा खर्च अफाट असणार आहे.

त्यामुळेच जगातील बुद्धिजीवी आणि वैज्ञानिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर दोन गटात विभागले गेले आहेत.   फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गना एआय म्हणजे एक वरदान वाटतं, किंबहुना त्याचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली तर दुसरीकडे स्टीफन हॉकिंग, एलोन मस्कना एआय म्हणजे अख्ख्या मानवजातीला धोका निर्माण करणार तंत्रज्ञान वाटतं.  त्यामुळे आधीच वाढलेल्या बेरोजगारीत स्वयंचलित एआयमुळे आणखीनच भर पडते कि काय अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.  भारतदेशात संगणकक्रांती घडण्यापूर्वी असाच विरोध झाला होता.  पण आज त्याच माहितीतंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण हा लेख सहज वाचत आहात. 
    
त्यामुळेच सोफियाला विचारलेल्या प्रश्नांचे,  'आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बेरोजगारीमध्ये भर पडेल का?',  त्यानं खूपच छान उत्तर दिले, ते असे -
' मी संदेश देऊ इच्छितो कि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानामुळे मानवी विश्वाला काहीही धोका नसून उलट या तंत्रज्ञानामुळे मनुष्य एआय च्या जवळ जाईल.  नोकरीच्या अनेक संधी चालून येतील.  एआयमुळे मनुष्याच्या ज्ञानात भरच पडेल. ज्ञान संग्रहित करण्यासाठी     मनुष्य आमचाही उपयोग करू शकेन.'

© प्रेम जैस्वाल,  9822108775
(लेखक ESPEE INFOTECH, औरंगाबाद या सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करियर ऍडव्हायझर आहेत)


















Friday, 7 December 2018

                 





             इंटरनेट ऑफ थिंग्ज

                                    
काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणीवर येणारी 'वाय-फाय इन्व्हर्टर एसी' ची जाहिरात आपण कदाचित पाहिली असणार. या जाहिरातीत महानायक अमिताभ बच्चन दूर कुठे फिरायला गेलेले असतात. त्यांच्या घरी आलेल्या पाहुणे मंडळीना खूपच उकडत असतं. एसीचा रिमोट काही सापडत नाही. मग अमिताभजी शेकडो मैल दूरवरून  आपल्या मोबाईलच्या साह्याने घरच्या एसीच तापमान कमी करतात आणि घरात 'खुशियां' येते. अशी ती जाहिरात होती. या जाहिरातीतील गारवा आणनारा ' वाय-फाय इन्व्हर्टर एसी' हा फक्त विजेवर चालणारा एसी नसून तो वाय-फायद्वारे इंटरनेटलाही जोडलेला असतो. त्यामुळेच अमिताभजी त्याच नियंत्रण दूर मोबाईलवरून करू शकतात.  ही जाहिरात म्हणजे 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' च उत्तम उदाहरण आहे. पुढील काळ हा अशाच 'आयओटी'  क्रांतीचा असणार आहे.

आजच्या दैनंदिन जीवनात आपण सहजरीत्या करत असलेली कामे जसेकी बँकेचे व्यवहार, चित्रपट-नाटकाचे बुकिंग, फूड ऑर्डर, पाहिजे त्या वस्तूची खरेदी किंवा जीपीएसद्वारे प्रवास हे इंटरनेटमूळ शक्य आहे. कारण जगभरातील सर्व संगणक आता इंटरनेटच्या एकाच जाळ्याने जोडल्या गेल्यामुळे सर्व व्यवहार ऑन-लाईन करणे अगदी सोपे आहे.  या जाळ्यालाच आपण 'इंटरनेट ऑफ कॉम्प्युटर' असं म्हणू शकतो.  यापुढच्या टप्यात ह्या इंटरनेटच जाळं अजून दाट विणल्या जाऊन फक्त संगणक, मोबाईल नव्हे तर आपण कधी विचारही केला नसेल अशा सभोवतालच्या सर्व वस्तू एकमेकांना जोडल्या जाणार आहेत.  आणि हे नेटवर्क म्हणजेच  'इंटरनेट ऑफ थिंग' किंवा 'आयओटि' असणार आहे. नजीकच्या भविष्यात आयओटि आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनणार आहे. तशी इंटरनेट ऑफ थिंगची चाहूल ब्रिटिश उद्योजक केविन अष्टोनला 1999 मध्येच लागली होती.  आणि त्याच काळी संगणक क्षेत्रातील जाणकारांनी भविष्य वर्तविले होते कि वर्ष 2020 पर्यन्त जगातील शेकडो करोडो उपकरण ही इंटरनेटला जोडल्या जाऊ शकतील.

मग या 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' कोणत्या? ह्या थिंग्स म्हणजेच आपल्या सभोवताली उपलब्ध सर्वच उपकरण जसेकी संगणक, मोबाईल, सीसीटीव्ही, कार, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, ओव्हन, किचन उपकरणे, पाण्याचा पंप, टीव्ही, डुअर-बेल, म्युझिक सिस्टम, लाईट, पंखे तसेच  कार्यालयातील सर्व उपकरणे इत्यादी.  अर्थात ही सर्व उपकरणे एकमेकांशी जोडण्यासाठी सर्व विजेच्या उपकरणाला वेगवेगळे सेन्सर, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट असणार. सेन्सर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फ्रिजसारखी उपकरनं इतर उपकरणाशी सहज जोडल्या जाऊन त्याशी संवाद साधू शकेल. इंटरनेटला जोडल्या गेल्यामुळे हातातील मोबाईलच्या तालावर सर्व उपकरनाचे नियंत्रित आपल्याकडं असणार आहे. या नेटवर्कमुळे उपकरण एक दुसऱ्याला माहिती पाठवू शकतील. मानवाचा यंत्राशी होणारा संबंध कमी होऊन विविध यंत्र एकमेकांशी समनवय साधतील. एखादा रूमचा एसी त्या रूममधील व्यक्तीला आवश्यक तेव्हडाचं तापमान  आपोआप सेट करू शकेल. फ्रिजमधील शीतपेयाची बॉटल कमी झाल्यास फ्रिज तुमच्या मोबाईलवर तसा संदेश पाठवेल किंवा नेहमीच्या मॉलला आपोआप शितपेयाची मागणी करेन.  रुग्णालयात न जाता घरीच शरीराला काही उपकरण लावून रुग्णालयातील डॉक्टर रुग्णाची संपूर्ण शारीरिक अवस्था जाणून  त्याला ऑन-लाईन औषध लिहून देऊ शकतील. शेती उपकरणांचे आधुनिकीकरण होऊन हवामानाचा अंदाज घेऊन पाण्याचा पंप आवश्यक तेंव्हा आपोआप चालू आणि बंद होतील. हे इंटरनेट ऑफ थिंग्जच तंत्रज्ञान आपल्याकडे येण्यास जास्त वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या 'इंटरनेट ऑफ थिंग' चे काही उदाहरन -

1. कारमधील आयोटि : हल्ली सर्वच कारच्या डॅशबोर्डमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. यापुढे कार स्वतःच्या मायलेज, गती, तापमान, इंधन इ. नियंत्रणासह बाहेरील जगाशी सहज संपर्क करू शकणार आहे. चालत्या कारमधूनच भोजनसाठी योग्य ठिकाण निवडणे शक्य होईल. तेथे कसं पोहचायचं?  तिथे प्रतीक्षा करावी लागणार का? वाहनतळमध्ये जागा मिळेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॅशबोर्ड देत राहील. संगणक क्षेत्रातील ऍपल आणि गुगलने तर त्यासाठी ऑटोमोबाईल उत्पादक करणाऱ्या कंपन्यांशी आधीच भागीदारी करून  आयपॅड किंवा अँड्रॉइडसारखे उपकरण कारमध्ये बसवण्याचे ठरविले आहे. स्मार्टफोनचे सर्व काम आता कारचा डॅशवोर्ड करू शकेल.  चालकाचा आवाज ओळखूनच डॅशबोर्ड सुरु होईल. चालकाला  रहदारी, हवामान, वादळ आणि रस्त्यासंबंधीत प्रत्यक क्षणाचा अहवाल डॅशबोर्ड न विचारता देणार आहे. मागील आसनावर बसलेली मंडळी पुढील सीटच्या मागे लावलेल्या स्क्रीनवर इंटरनेटचा भरपूर स्वाद घेऊ शकतील. चालत्या कारमध्ये आवडीच्या गाण्यासह डॅशवोर्ड चालकाला इ-मेल, व्हाट्सप्प संदेश व आजच्या बातम्या वाचून दाखवेल. सर्व सुरळीत घडत गेलं तर पुढील दहा वर्षात चालकरहीत कार रस्त्यावर धावू लागेल.

2.  घरामध्ये 'आयोटी' : घरातील सर्व उपकरनं एका नियंत्रण मॉनिटरशी जोडल्या जाऊन घरात तापमान, आद्रता, धूर-प्रदूषण किती याची माहिती व नियंत्रण होईल. या 'स्मार्टहोम' मध्ये अनोळखी व्यक्तीचा प्रवेश झाल्यास लगेच अलार्म वाजून त्याची सूचना घरमालकाच्या मोबाईलवर मिळेल. टीव्ही आणि म्युझिक सिस्टम आपल्याला नेहमी आवडणारी वाहिनी, गाण्याची  नोंद करून तीच गाणी लावण्यास मदत करतील.  इलेक्ट्रिक उपकरण व लाईटिंगच उत्पादन करणारी जगविख्यात फिलिप्स कंपनी त्यानुसार लाईटमध्ये बदल करत आहे. आता मोबाईलवर विजेच्या दिव्याच्या प्रखरतेच नियंत्रण असणार आहे. अर्थात त्यासाठी दिव्यामध्ये सेन्सर लावलेले असतील जेणेकरून आवश्यक तेव्हडाचं उजेड पडून विजेची बचत होईल. मोबाईलचे बटन दाबून संपूर्ण घराची पाहिजे तशी प्रकाश योजना करता येईल. ' स्मार्ट मिरर' असाच एक प्रकार आहे. 'आयोटि' वर आधारित या आरस्यात बघत असताना तो आपल्याशी संवाद साधून आजचा दिनांक, वार,  तापमान, बदलत्या वातावरनाची माहिती देणार. तसेच ताज्या घडामोडीबद्दल माहिती देईल.

3. वैद्यकीय क्षेत्रात आयओटि : यापुढे एखाद्या आजाराचा इलाज करण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासणार नाही.  कारण डॉक्टर रुग्णाच्या घरी रुग्णाच्या शरीराला विविध सेन्सर असलेली उपकरण लावून त्याद्वारे रुग्णाची अंतरबाह्य स्थिती जाणून घेतील. ईसीजी, हृदयाची गति,  श्वसोश्वासची गती, तापमान, रक्ताचा दाब आणि रुग्णाच्या हालचाली टिपून त्याच्या नोंदी डॉक्टरला आपोआप पाठविल्या जातील.  त्या नोंदी बघून रुग्णाच्या आजाराचे निदान होवून डॉक्टर ऑन-लाईन औषध लिहून देतीलं. आवश्यकता पडल्यास आपोआप रुग्णवाहिकेस संदेश मिळून ती रुग्ण असलेल्या पत्त्यावर येऊन उभी दिसेन. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णाला तातडीची सेवा मिळून कितीतरी लोकांची हेळसांड न होता त्यास त्वरित उपचार मिळतील.

4. उद्योग क्षेत्रात आयओटी :  उद्योग क्षेत्रात आयओटी हे एक मोठे वरदान ठरणार आहे. उद्योगातील यंत्रासह सर्व विभाग इंटरनेटनी जोडल्यामुळे एखाद्या कारखान्यात प्रत्यक्ष उपस्थित न राहता तेथील व्यवस्थापन, यंत्रावर नियंत्रण शक्य होईल. कच्या मालाच्या खरेदी पासून तयार माल विक्री करणाऱ्या वितरकापर्यन्त सर्व टप्पे आयोटिने जोडल्या जाईल. त्यामुळे एखाद्या वस्तूची विक्री झाल्याबरोबर तेव्हढा माल कमी झाला आहे अशी माहिती माहिती वितरक, स्टोकिस्ट आणि ती वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपनीला होऊन त्याच पुन्हा उत्पादन सुरू करण्याचा संदेश मिळेल.  त्यामुळे जास्त माल संचयित न करता फक्त विक्रीलायक मालच कमी मनुष्यबळ वापरून उत्पादित करता येईल. थोडक्यात मागणी तेव्हडाचं पुरवठा हे गणित साधलं जाईल. आजही मॉलमध्ये जेंव्हा आपण एखाद रेडिमेड सदरा खरेदी करतो तेंव्हा बिलिंग झाल्याबरोबर उत्पादन करणाऱ्या त्या ब्रॅण्डला आणि वितरकाला लगेच संदेश जातो की अमुक अमुक मॉलमधून एव्हडा स्टॉक कमी झाला आहे.

5. दळण-वळणामध्ये आयओटि: हल्ली आपण कुरियरवर एखादी वस्तू ट्रॅक करू शकतो. मालाची ने-आन करणाऱ्या कुरियर किंवा मालवाहतूक कंपन्यांचे देशभर कार्यालय आणि गोडाऊन असतात. अनेक जडवाहन रस्त्यावर मालवाहतुकीची काम करत असतात. अशा वेळेस अनेक गोडाऊन, ट्रक आणि मनुष्यबळ याचा योग्य समनवय साधने आवश्यक असते. 'आयओटि' मुळे वाहतुकीची साधन, वाहतुकीचे कार्यालय, मनुष्यबळ एकमेकांशी जोडल्या जावून दळणवळण आणि मालाची साठवण सोपं होईल. कुठे माल पाठविण्याआधी त्या मार्गाची स्थिती, वातावरण, गोडावूनमध्ये पुरेशी जागा, आवश्यक मनुष्यबळ, पार्किंगव्यवस्था आहे किंवा नाही ही सर्व माहिती माल पाठविणाऱ्यास आपल्या मोबाईलवर आधीच माहित पडेल.

6. क्रीडाक्षेत्रात आयओटि :   राल्फ लॉरेन,  अमेरिकेत कपडे उत्पादन करणारी ही पहिली कंपनी ज्यांनी आयओटिची संकल्पना अत्यंत खुबीने वापरून ऍथलेटसाठी एक स्मार्ट शर्ट तयार केला आहे.  ह्या शर्टमध्ये लावल्या गेलेल्या सेन्सरमुळे खेळाडूच्या हृदयाची गती, श्वासोश्वासची गती, रक्ताचा दाब, कॅलरी बर्न माहित पडून खेळामध्ये सुधारणा करता येतील. शर्टमध्ये रेकॉर्ड झालेली ती माहिती आयफोन किंवा अँपलवॉचशी जोडून नंतर पाहता येईल. थोडक्यात फिटनेस ट्रेनरच बरंच काम कमी होईलं.

आयओटिचे हे काही उदाहरण आहे. पुढील काही वर्षात जगातील विविध क्षेत्रातील करोडो उपकरण  हायस्पीड इंटरनेटला जोडल्या जाऊन हि उपकरण एक दुसऱ्याशी संवाद साधून एक मोठी क्रांती घडणार आहे. मानवी जीवन अधिकच सुसह्य होऊन शरीराच्या हालचालीला मर्यादा येतील.  मनुष्यजातीला करण्याजोगं असं जास्त काम उरणार नाही. हळूहळू हि उपकरण आपल्या जीवनाचं नियंत्रण आपल्या हातात घेतील.  कोणतंही नवीन तंत्रज्ञान आपल्या अनेक फायद्यासह सोबत काही तोटेही घेऊन येतं असतं.  आयओटीमुळे सर्वच उपकरण सॉफ्टवेअरवर आधारित असल्याने हॅकिंग, सायबर क्राईमच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ होऊन 'असुरक्षितते'च्या नवीन संकटाला आपण सामोर जावू. मग चालती कार हॅक होणे, स्पर्धक कंपनीची गोपनीय माहिती चोरी करणे, उद्योजकामध्ये सायबर वॉर घडून एक दुसऱ्याच उत्पादन बंद पाडणे, हॅकिंग करून विमान पाडणे, वैद्यकीय उपकरण हॅक करून हत्या, घरातील उपकरण हॅक करून खंडणी मागणे असे 'हायटेक' गुन्हे घडतील.

मानवाच्या भौतिक सुखाला अंत नाही. आयओटी म्हणजे तंत्रज्ञानाच शेवट नसणार, पुढ अजूनही नवनव्या गोष्टी घडतील. मानवता बाजूला राहून यंत्रांच्या आहारी गेलेला मनुष्य स्वतः एक हाडा-मांसाचा यंत्र बनून राहील. सभोवतालची यंत्र मानवाला नियंत्रित करतील.   म्हणूनच     'द ग्रेट डिक्टेटर' मध्ये चार्ली चॅप्लिन म्हणतो, ' लोभाने मानवाचे आत्मे पोखरलेत. जगभर द्वेष पसरलाय. आपण गति वाढवली, पण स्वतः त्यात कैद झालो.भरपूर उत्पादन करणारी यंत्र आपली सततचा हाव वाढवत बसली. ज्ञानामुळे आपण 'सिनिकल' झालो. आपण खूप विचार करायला लागलो आणि आपल्या खूप कमी जाणीवा उरल्या. आज आपल्याला यंत्रापेक्षा जास्त मानवतावादाची गरज आहे. हुशारीपेक्षा दयाळूपणाची जास्त गरज आहे. या शिवाय आयुष्य आणि पर्यायानं मनुष्यजात संपून जाईन. मनुष्याला करायला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल असं जग आपल्याला हवंय. जिथे विज्ञान आणि मानवाचा विकास हातात हात घालून जाईल. असं जग घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, एकत्र येऊ'.

© प्रेम जैस्वाल,  9822108775

(औरंगाबाद येथील एस्पी इन्फोटेक  सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करिअर एडव्हायझर आहेत.)

Sunday, 25 November 2018



जीपीएस:  कसं काम करतं ?


       काल विकएन्डला तुम्ही एका आवडीच्या रेस्टारेंटमध्ये पार्टीला गेला होता. सकाळी तुमच्या मोबाईलवर त्या रेस्तारेंटचा संदेश येतो,

' आम्ही आभारी आहोत,  आमच्या रेस्टारेंटची सेवा आपल्याला कशी वाटली, कृपया रेटिंग द्या?' 

सोमवारी ऑफिसला निघण्यापूर्वी तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक पूर्वसूचना मिळते,

'आज ट्राफिक नेहमीपेक्षा जास्त असणार, ऑफिस पोहचण्यासाठी वीस मिनटं जास्त लागतील.'

तुम्ही लगेच आपल्या कारने सुसाट निघता. मधेच एक संदेश येतो,

  'हा रस्ता पुढं बंद आहे, पर्यायी रस्त्याने पुढं जा!' 

आपल्याला प्रश्न पडतो कि आपण काल कुठे पार्टी केली हे कुणालाही सांगितलं नव्हतं, मग या मोबाईलला कसं कळलं ?   पुढे ट्राफिक जास्त आहे, रस्ता बंद आहे, वळण, पूल आहे, अशी पूर्वसूचना हा मोबाईल कसं काय देत असावा ?

वाचक मित्रानों, हि सर्व करामत आहे जीपीएस म्हणजेच 'ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम' ची. प्राचिनकाळी सागरीप्रवासात दिशादर्शकासाठी काही आधुनिक साधन नव्हती. होकायंत्राचा शोध लागण्यापूर्वी नाविक आकाशातील सूर्य तसेच ताऱ्यांचे पुंज आणि त्यांच्या बदलत्या जागा, दिशा यावरून आपल्या सागरी प्रवासाची दिशा ठरवत असत. थोडक्यात पृथ्वीवरील प्रवास आकाशातील तारकापुंजावर आधारित होता. आजच जीपीएससुद्धा आकाशातुनच चालत असतं. फरक एव्हडाच कि वर तारकांचे नव्हे तर अनेक कृत्रिम उपग्रहाचे दाट जाळे असते. मुळात जीपीएसचा शोध 1964 मध्ये अमेरिकेच्या लष्करी सरंक्षण विभागाने लावला. अमेरिकेच्या सरंक्षणविभागाने क्षेपणास्त्र डागण्यासाठी, जहाजे, पाणबुडीला दिशा दर्शविण्यासाठी किंवा एकादया अज्ञात ठिकाणची माहिती घेण्यासाठी 'डॉप्लर' पद्धतीच्या दिशादर्शक जीपीएस वापरण्यास सुरुवात केली. वर्ष 1994 नंतर त्याचा उपयोग नागरीक कामासाठी करण्यास सुरुवात झाली. जीपीएस आज आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. एखाद्या नवीन कॉफी हाऊसला जायचं असेल किंवा दूर एखाद्या नवीन शहरात मनसोक्त भटकायचं झाल्यास जीपीएस तुम्हाला पूर्ण मदत करतो. एकूण अंतर किती कि.मी. पासून रस्त्याची स्थिती कशी, किती वेळ, किती खर्च या सर्वच गोष्टीची पूर्वकल्पना हा जीपीएस निघण्यापूर्वीच देत असतो. आज सर्वच उद्योगधंद्यात ग्राहकांना वेहीकल ट्रेकिंग, कुरियर ट्रेकिंग सारख्या सेवा देण्यासाठी जीपीएस खूपच उपयोगी आहे. लष्करी तसेच नागरी उडान करणारी विमाने, जहाजे, पाणबुडी तसेच खाजगी वाहतुकीसाठी जीपीएस म्हणजे मोठं वरदान आहे. थोडक्यात  जीपीएसमुळे आपण प्रवासाचे योग्य नियोजन करून वारंवार विचारपूस करण्याची कटकट न राहता आपला प्रवास अगदी सुखाचा होतो.  कसं काम करत असावा हा जीपीएस ?

मुळात जीपीएस प्रणालीमध्ये तीन वेगवेगळी उपकरनं आपसात वेळेच  ताळमेळ लावून आपल्याला आपलं लोकेशन माहित करून देत असतात.  हि तीन उपकरण कोणती?  तर  आकाशात सतत फिरणारे अनेक जीपीएस उपग्रह, त्या उपग्रहाची जमीनीवरून अचूक नियंत्रण करणारी नियंत्रण प्रणाली [कंट्रोल सिस्टीम] आणि तिसरं उपकरण म्हणजे आपल्या मोबाईलं किंवा चारचाकीमधील जीपीएसची छोटी चिप म्हणजेच जीपीएस रिसिव्हर. प्रथम आपण या तिन्ही उपकरणाची माहिती करून घेऊ आणि मग त्याच कार्य समजुन घेऊ.

1. जीपीएस सॅटेलाईट:   सॅटेलाईट म्हणजे एका मोठ्या ग्रहाभोवती विशिष्ट कक्षेत फिरणारा उपग्रह.  चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा पृथ्वीचा उपग्रह आहे. अशाच प्रकारे पृथ्वीच्या भोवती फिरणारे अनेक 'कृत्रिम उपग्रह' आहेत जे विकसित देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रांस, जपान सह विकसनशील भारत देश यांनी सोडलेले आहेत. सौरऊर्जेवर स्वयंचलीत हे उपग्रह पृथ्वीच्या भोवती एका विशिष्ट कक्षेत फिरत असतात. प्रसिद्ध भौतिकशास्त्र वैज्ञानिक जॉन केपलरच्या सिध्दांतानुसार त्याच्या विशिष्ट वेगामुळे त्यावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होत नाही. हे उपग्रह अनेक प्रकारचे असतात. पृथ्वीच्या जवळील कक्षेतील इमेज घेणारे उपग्रह अति जास्त वेगाने प्रदक्षिणा घालत असतात, त्यापुढील कक्षेतील जीपीएस उपग्रह, दूरसंचारसाठी उपयुक्त उपग्रह थोड्या कमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतात. या उपग्रहाला संदेशाची आवकजावक करणारे 'ट्रान्स्पोन्डर', कॅमेरे तसेच दिशा-कोन बदलण्यासाठी मोटार लावलेली असते. आज जगात सर्वात पहिल्या अमेरिकेच्या जीपीएस सह आकाशात चार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमच मोठं जाळं आहे. रशियाची ग्लोनास, युरोपची गॅलिलियो, चीनची बीडॉउ तर जपान आणि भारताची स्वतःची  ' नाविक'  नेव्हिगेशन सिस्टम आहे. एकट्या अमेरिकेने 72 जीपीएस उपग्रह पाठविले पैकी बिघाड होऊन 31 कार्यान्वित आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था [इस्रो] ने 7 उपग्रह पाठविले असून देशा च्या 1500 किमी सीमेबाहेरच्या भागावर त्यांचं नियंत्रण आहे.  हे उपग्रह साधारण पृथ्वीपासून 15000 किमी वर नियोजित कक्षेत फिरत असतात.  जेंव्हा आपण एखादं लोकेशन बघतो त्यावेळेस कमीत कमी चार उपग्रहाच्या संपर्कात ती वस्तू आलेली असते. या सर्व उपग्रहाचा आपसातील मेळ साधण्यासाठी त्यामध्ये अचूक असे  'एटोमिक क्लॉक' लावलेले असते.

2. कंट्रोल सेंटर [नियंत्रण केंद्र]: आकाशातील अनेक उपग्रहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर वेगवेळ्या देशाचे एक नियंत्रण केंद्र असतात जे वर फिरणाऱ्या उपग्रहाची आटोमिक क्लॉकद्वारे अचूक वेळ, दिशा, कोन तसेच गति ठरवत असतो. अचूक लोकेशन दाखविण्यासाठी नियंत्रण केंद्र सर्व उपग्रहाच्या वेळेच तालमेळ बसवत असतो. एकंदरीत सर्व उपग्रहाच नियंत्रण जमिनीवरून होत असते. सध्या जीपीएसच नियंत्रण कक्ष अमेरिकेत आहे. याला 'मॉनिटर स्टेशन' असेही म्हणतात.

3. जीपीएस रिसिव्हर:   तिसरं महत्वाचं उपकरण म्हणजे आपल्या मोबाईल किंवा कारच्या आत असलेली जीपीएस चिप म्हणजेच 'जीपीएस रिसिव्हर'.  लाईव्ह लोकेशन बघण्यासाठी हा जीपीएस रिसिव्हर ' चालू असणे आवश्यक आहे. हा जीपीएस रिसिव्हर उपग्रहाकडून माहिती घेऊन 'ट्रीलेटेरेशन' पध्द्तीने निश्चित लोकेशन दाखवतो.

जीपीएस कसं काम करत ?

पृथ्वीवरील एखाद्या वस्तूचं लोकेशन आपल्याला माहित  करून घेण्यासाठी जीपीएस 'ट्रीलेटेरेशन' या गणिती सिद्धांताचा उपयोग करत असतो.  या पद्धतीत तीन माहित असलेल्या ठिकानारून चौथ्या वस्तूच लोकेशन आपल्याला माहित पडतं.  येथे तीन वस्तू म्हणजे उपग्रहाच ठिकाण निश्चित असतं आणि चौथी वस्तू म्हणजे ज्याचं पृथ्वीवरील लोकेशन माहित करायचं आहे तो 'जीपीएस रिसिव्हर' असते. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अनेक उपग्रहापैकी कमीत कमी चार उपग्रहाच्या तरंग कक्षेत आपल्या मोबाईलचा 'जीपीएस रिसिव्हर' येतो.  त्या चार उपग्रहाचे तीन वर्तुळाकार तरंग जेथे भेटतात ते ठिकाण म्हणजेच त्या वस्तूच लोकेशन होय. उपग्रहातून तरंग बाहेर निघून परत उपग्रहात आलेल्या तरंग लहरींच्या फरकाचा काळ [t] आणि लहरींच्या गती [c],  समीकरण c=d/t यावरून उपग्रहाला त्या वस्तूच नेमकं अंतर[d=ct] कळतं.  एकदा हे लोकेशन माहित पडलं की आपल्याजवळ असलेल्या मोबाईल किंवा कारच्या डॅशबोर्डवरील गुगल  मॅपवर ते माहित होत. एव्हडच नाहीतर पृथ्वीपासून मोबाईलग्राहक किंवा जीपीएस रिसिव्हर किती उंचीवर आहे याचेही अंतर कळून जाते. अर्थात त्यासाठी आपल्या मोबाईलचा इंटरनेट व  ' 'जीपीएस रिसिव्हर' चालू असणे आवश्यक असतं. कारण उपग्रह हे कायम आपल्या संपर्कात असतं. आज उपग्रह व विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जीपीएसद्वारे उपग्रह पृथ्वीवरील काही इंचाची हालचाल सहज टिपू शकतात. 

गुगलला ट्राफिक कसं कळत ?

पूर्वी गुगल एखाद्या स्थळी आपण किती वेळेत पोहोचणार आणि जास्त रहदारी असेल तर किती वेळ लागणार याची माहिती जुन्या संग्रहित नोंदीवरून गुगल मॅपवर देत असे.  अशाप्रकारे रहदारी दाखविण्याची जुनी पद्धत अचूक नव्हती. नवीन पद्धतीत करोडो मोबाईल जीपीएसद्वारे आपआपले लोकेशन गुगलला पाठवत असतात. या करोडो वेगवेगळ्या मोबाईलच्या लोकेशनच गुगल एनालिसिस करत असतं. मग मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची एका विशिष्ट रस्त्यावर होणारी हालचाल आणि गतीवरून त्या रस्त्यावर किती रहदारी आहे याचा गुगलला अंदाज येतो आणि तशी माहिती गुगल मॅपवर दिली जाते. तसेच एका मोबाईलच्या गतीची इतर हजारो मोबाईलच्या गतीशी तुलना करून गुगलला रहदारीचा एकूण अंदाज येत असतो. या  गणितात जागोजागी थांबणाऱ्या स्कुलबससारख्या वाहनांना वगळण्यात येते. रस्ता रहदारीने जाम असेल तर गडद तांबडा,  जास्त रहदारीच्या ठिकाणी तांबडा रंग, थोड्याकमी रहदारीच्या ठिकाणी भगवा आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा असेल तर हिरवा रंग दाखविण्यात येतो.

जीपीएसचे सिग्नल हे फोनच्या सिग्नलपेक्षा कमजोर असतात. त्यामुळे पाण्याच्या खाली, झाडाच्या खाली किंवा गजबजलेल्या शहरी ठिकाणी बऱ्याचदा जीपीएस काम करत नाही. तसेच जीपीएसच्या साह्याने प्रवास करणाऱ्यानी आपला मोबाईल बॅटरी तसेच इंटरनेट डाटा कायम चार्जड ठेवावा लागतो. तसेच गरज पडल्यास वेगळा अँटेना लावू शकता. बऱ्याचदा वातावरणातील बदलामुळे जीपीएस चुकीची माहिती देऊ शकतो. तसेच वीजेंच्या कडकडाने, वातावरणातील इतर बदलामुळे जीपीएस चुकीच लोकेशन दाखवू शकतो
.

आजघडीला आपल्या देशात  मोबाईल धारकाची संख्या हि देशाच्या लोकसंख्येइतकीच आहे. त्यामुळे साहजिकच जीपीएसचा वापर करणाऱ्यांची संख्या आता कमी नाही. असं असलं तरी संगणक आणि मोबाईल हाताळण्याच योग्य प्रशिक्षण, सराव नसल्या कारणाने जीपीएस वापरताना बऱ्याच चुका घडत असतात. तसेच बऱ्याच गाव-खेड्यातील तसेच राज्यमार्गाची दुरवस्था असल्याने, इंटरनेटची सोय, लोड-शेडिंगमुले जीपीएस खात्रीशीर सेवा देईलच याची शास्वती नसते. त्यामुळे पूर्णतः जीपीएसवरच अवलंबुन राहणे फायद्याचे नसते. गावखेड्यात फिरताना फक्त जीपीएसद्वारे प्रवास केल्यास कदाचित आपण नको त्या रानावनातील अरुंद गाडीवाटेमध्ये अडकण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच एकच नावाची अनेक गाव-खेडी  जसेकी डीग्रस, माळेगाव, पिंपरी, लिंबी, असल्याने जीपीएसद्वारे प्रवास आपल्याला नको त्या भलत्याच गावी घेऊन जावू शकतो. किंवा इंग्रजीत टाईप केलेलं स्पेल्लींग समान असल्यामुळं आपण  'महड' च्या   गणपतीऐवजी चवदार तळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'महाड' ला पोहचू शकतो. असे अनेक किस्से आपण ऐकलेच असणार, यात शंका नाही.

जीपीएस तंत्रज्ञानमुळे एखादं ठिकाण शोधणे, मनसोक्त फिरणे अगदी सोपं झालं आहे.  उद्योगाचे अनेक द्वार त्यामुळं उघडले आहे. वेहीकल ट्रेकिंग, कुरियर ट्रेकिंगमुळे सुरक्षितता वाढून उद्योगाच्या बऱ्याच अडचणी कमी झाल्या आहेत.  आज गरज आहे ह्या तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात तसेच उद्योग व्यवसायात योग्यप्रकारे उपयोग करून स्वतःची तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची.  

-- प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com

 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट

Tuesday, 20 November 2018


सायबर सेक्युरिटी : गुन्हे आणि प्रतिबंध

आपल्या पारंपरिक व्यवहारात सर्व वस्तू आणि पैसे याची देवाणघेवाण ही प्रत्येक्ष व्हायची. काही व्यवहारात आपण बँकेचे धनादेश/डीडी द्यायचो पण तो धनादेश/डीडी देणाऱ्याच्या सहीची शहानिशा करूनच  बँकेमार्फत वटला जायचा. त्यामुळे आर्थिक गुन्हेगारीवर आपोआप आळा बसत असे. काही तुरलीक धनादेश अनादरचे गुन्हे तेंव्हा घडत असत.

माहिती तंत्रज्ञान आणि आयटी, कम्प्यूटर, इंटरनेटच्या वाढलेल्या जाळ्यामूळ सर्व आर्थिक व्यवहार खूपच सोपे झाले आहे. तसेच प्रभावी समाजमाध्यमामुळे एका क्लिकवर व्हाटसप, फेसबुक, इंस्ट्र्ग्रामद्वारे आपण फोटो, ग्रीटिंग, ऑडिओक्लिप, व्हिडीओ अख्या जगात व्हायरल करू शकतो. मुख्य म्हणजे लाखो करोडोचे आर्थिक देवाण-घेवाण काही क्षणात होत आहे. माहिती तंत्रज्ञानामूळ व्यवस्थापन तसेच राजकीय क्षेत्रात भरपूर बदलं झाले आहे. प्रसार आणि प्रचाराची परिभाषा बदलली आहे. जगाच्या पाठीवरील अनेक देशाची सरकार स्थापण किंवा पाडण्यात माहिती तंत्रज्ञानाचा खूप उपयोग झाला आहे. सर्वत्र ऑनलाईन आणि इ-कॉमर्सचा बोलबाला असल्यामुळं पारंपरिक मार्केटिंग आऊटडेट होऊन त्याची जागा आता डिजिटल मार्केटिंगन घेतली आहे. एकंदरीत जगात अस कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथे आमूलाग्र बदल घडले नाहीत.

अस असताना या क्षेत्रापासून गुन्हेगारी जगत मागे कसे राहणार. बदलते पैशाचे व्यवहार आणि आर्थिक उलाढाल लक्षात ठेवून आता गुन्ह्याचे स्वरूपही बदलले आहे. गुन्हेगार 'हायटेक' झाले आहेत.  कुणाला हात न लावता, न धमकवता करोडो रुपये बँक खात्यातून परस्पर लंपास, पासवर्ड विचारून एटीएम मधुन काढणे, डुप्लिकेट कार्ड वापरून पैसे काढणे, सॉफ्टवेअर हॅक करून बॅंकेतील खाते रिकामे करणे किंवा रक्कम इतर देशात वळती करणे, वृद्ध नागरिकांना पासवर्ड, ओटीपी, सीव्हीव्ही विचारून फसवणे असे अनेक हायटेक गुन्हे हल्ली सररास घडत आहेत. याच संगणक, मोबाईल, इंटरनेट संबंधित गुन्हयासच आपण सायबर क्राईम असे म्हणतो.

तसे सायबर क्राइम् म्हणचे फक्त आर्थिक गुन्हे नसून मेसेज, फोटो, ऑडिओ, विडिओची कॉपी करणे, मूळ प्रतीची विकृती हे सुद्धा सायबर गुन्हेच्या अंतर्गत येतात. वाढत्या मोबाईलच्या वापरामुळं अख्ख जग आता ऑनलाईन झालं आहे त्यामुळं एका क्षणात संदेश करोडो लोकांना पाठवणे संभव झाले आहे. समाजमाध्यमामुळे तर राजकीय पक्षाची मोठी सोय झाली आहे.  प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष समाजमाध्यमाचा भरपूर उपयोग करून घेत आहे. आज जवळजवळ सर्वच पक्षाचा आयटी सेलं आहेत जिथे हजारो युवक मेसेज व्हायरल करण्याचं काम करत आहे. मग या सोशलमेडिया युद्धात विरुद्ध पक्ष एकदुसऱ्याचा अपप्रचार, खोटे मेसेज टाकणे असे गुन्हे घडत आहेत. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत तर या सायबर युद्धाने तर कळस गाठला होता असे म्हणतात.

अमेरिकी आणि रशिया या जगातील मोठया दोन महासत्ता. या दोहि देशातील स्पर्धा आणि धोरणाचा सर्व जगावर परीणाम होत असतो.  असं म्हणतात कि रशियाचे अध्यक्ष पुतीन याना या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्पना  जिंकवायचे होते. डोनाल्ड ट्रम्प याच्या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंक्टन उभ्या होत्या, आणि त्या निवडून येतीलच असा सर्वांना विश्वास होता. पण झालं भलतंच, ट्रम्प निवडून आले. कारण, रशियाचे हॅकर जगप्रसिद्ध. त्यांनी काय करावं? हिलरी क्लिंटनच्या प्रचार कार्यालयातील सर्व मुख्य प्रचारक व्यक्तीच्या कम्प्युटरचा त्यांनी ताबा मिळवला. त्यामुळे हिलरी क्लिंटनच्या सर्व प्रचाराची दिशा, प्रचारतंत्र, मंत्र,  स्ट्रॅटेजी आणि सर्व माहिती काही तासात डोनाल्ड ट्रम्पच्या रिपलीकन पक्षाला पुरविण्यात आली, अर्थात ट्रम्पने त्यानुसार प्रचाराची दिशा बदलली आणि विजय मिळवला. कंप्युटर हॅकिंग आणि सायबर हल्ल्यामुळं एखाद्या देशाचा राष्ट्रध्यक्ष बदलू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे शक्य झालं. अशा सायबर युद्धात ज्याचे हॅकर चांगले अर्थात त्यांची बाजू जड असते.  या वरून संगणक क्षेत्रातील हॅकर काय काय करू शकतात याचा अंदाज आपण बंधू शकतो.

संभाषण असो की आर्थिक व्यवहार त्यामध्ये प्रायव्हसी आणि सेक्युरिटी हि खुप महत्वाची असते. दोघांमधील व्यवहार तिसऱ्यास कळता कामा नये.  पण ऑन-लाईन व्यवहारचा अर्थ असा की त्यामध्ये सर्व व्यवहार हे सोफ्टवेअर आणि हार्डवेअर होत असतात.  काही पासवर्ड सोडले तर इतर काही सेक्युरिटी नसते.  आपल्या व्यवहाराची शहानिशा आपली आपणच करायची असते.  ऑन-लाईनमध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे याही क्षेत्राला आता गुन्हेगारानी ग्रासलं आहे. कितीतरी बँकेचे करोडो-अब्जो रक्कम रात्रीत गायब झाली आहे. असे गुन्हे घडून लोकांचं नुकसान होऊ नये म्हणूनच 'सायबर सेक्युरिटी'  हि संकल्पना पुढं आली आहे. ज्याप्रमाणे इतर गुन्हेगारी जगतात गुन्हेगार वेगवेगळ्या कल्पत्या वापरून गुन्हे करतात त्याचप्रमाने सायबर गुन्हेगारीमध्ये गुन्हेगार वेगवेगळी क्लपत्या वापरून संगणकावर सायबर हल्ला करत असतात. त्यामुळं असे हल्ले परतून लावण्यासाठी  आपल्याकडेही तेव्हडी सक्षम उपाययोजना म्हणजेच सॉफ्टवेअर सेक्युरिटी विकसित करणे आवश्यक असते.

या सायबर क्राईमचे  अनेक प्रकार आहेत. झपाट्याने होणारे आयटीमधील बदल आणि नवनवीन अँप यामुळे गुन्हेगाराला गुन्हे करने सोपे झाले आहे आणि ते वेगवेगळ्या क्लुप्त्या अवलंबत असतात. तरी सर्व गुन्हे खालील प्रकारात मोडतात -

1 फिशिंग : या प्रकारात गुन्हेगार  आपल्याला फसवा इमेल पाठवून आपली सर्व गोपनीय माहिती हॅकर माहित करून घेत असतात. एकदाका त्यांना आवश्यक माहिती  मिळाली  की ती वापरून ते आपल्या बॅंकेतील व्यवहारात शिरू शकतात. हल्ली दररोज असे गुन्हे घडताना दिसत आहे

2  आपल्या व्ययक्तिक माहितीचा दुरुपयोग : आपण कुठे दिलेली व्ययक्तिक माहितीचा दुर्योपयोग करणे.

3 हॅकिंग :  हा खुप गंभीर प्रकार आहे.  वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून हॅकर आपल्या संगणकच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करतात. आपली गोपनीय माहिती काढून घेतात, आपले संगणक, वेबसाईट, नेटवर्क बंद करू शकतात, किंवा आपल्या वेबसाईटचा दुरुपयोग  करतात.  उद्योगधंद्यात, राजकारणात तसेच इतर स्पर्धक देशाची लष्करी, नागरिक धोरण माहित करण्यासाठी या हॅकिंगचा उपयोग होतो.

4  इंटरनेटद्वारे दुष्परचार : एखाद्या समूह, समाजाबद्दल दुष्परचार करणे, अराजकता निर्माण करने. धार्मिक तेढ निर्माण करण्यासठी,  तसेच राजकारणात स्पर्धक पक्ष याचा उपयोग करतात.

5  अश्लील साईटचा प्रसार करणे.  अशा वेबसाईट बघण्यासाठी ठराविक वयाची अट असते, पण या नियमाला न जुमानता त्या साईट चा प्रसार करणे हा एक मोठा सायबर क्राईम आहे.

आज संगणक वापरणाऱ्या सर्व खाजगी तसेच सरकारी यंत्रणेला कायम सायबर हल्ल्याचा धोका सतावत असतो. या सायबर हल्ल्यामुळं एका क्षणात देशाची पूर्ण यंत्रणा अर्धांगवायूसारखी पेरालाईझ होऊ शकते. एका रात्रीत बॅंकेतील करोडो रुपये चोरले जातात आणि कुणाचं आयुष्य उदवस्त होत. त्यामुळे काही घडण्याआधीच योग्य तो प्रतिबंध करून आपलं नुकसान टाळणं गरजेचं आहे. त्यासाठी खालील उपाययोजना करने आवश्यक आहे.

1) प्रशिक्षण : आपल्या भोवताली घडत असलेल्या सायबर क्राईमचा अभ्यास करून आपल्या संस्थेमधील लोकांना प्रशिक्षण देणे. हल्ली हॅकर शासकीय, बँकेची नावे वापरून इमेल, फोन कॉल करून आपली गोपनीय माहिती जसेकी डेबिट/क्रेडिट कार्ड न्मंबर, ओटीपी, सीव्हीव्ही विचारून फसवंतात.  त्यामुळं आपण , मुख्यतः वृद्ध नागरिकांनी, शक्यतो आपले बँककार्ड, सिमकार्डची माहिती कुणाकडेही सामायिक करू नये.

2) फायरवॉलचा उपयोग-  हि एक सॉफ्टवेअर सेक्युरिटी आहे. जसे एखाद्या कंपनीच्या गेटवर मानवी सेक्युरिटी असते  जे आपल्या परिचीतानाच प्रवेश देते त्याचप्रमाणे आपल्या कम्प्युटरमध्ये आपण फायरवॉल नावाचा सॉफ्टवेअर वापरून अनोळखी, अपरिचित, धोकादायक माहिती थोपवू शकतो.

3) विचारपूर्वक क्लिक करणे-  सर्सगट सर्वच वेबसाईट किंवा मेल हे विश्वासू व्यक्ती वा संस्थेकडून आलेले नसतात. कित्येक मेल हे एव्हडे घातक असतात की ते विश्वासू असे भासवतात आणि आपण निसंकोच सर्व माहिती त्यांना देऊन बसतो. त्यामुळे कुठेही क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

4) सेफ सर्फिंगचा सराव -  काही वेबसाईटवर माहिती शोधताना त्या आपल्याला फोन नंबर, ओटीपी विचारून माहिती काढून घेत असतात.  त्यामुळे योग्य सर्च इंजिन वापरून आपण हे प्रकार टाळू शकता. त्यासाठी तुम्ही मॅकफ्री किंवा साईटअडवायझर सारखे सॉफ्वेअर वापरू शकता.

5) सुरक्षित ऑनलाईन शॉपिंग: हल्ली ऑनलाइन शॉपिंग तसेच त्यासंबंधित फसवणुकीच  प्रमाण  प्रचंड वाढलं आहेत. सर्वच इ-शॉपिंग सुरक्षित नसते. काही साईट आपल्या डेबिट कार्ड तसेच बँकेची माहिती आपल्याकडून काढून घेतात आणि धोका होतो. तेंव्हा खरेदी करत असलेल्या साइटची सेक्युरिटी व प्रायव्हसी पॉलिसी बघूनच शॉपिंग करावी. मॅकफ्री सेक्युर वापरून आपण साईट विश्वासू आहे की नाही हे बघू शकता.

6) सेक्युरिटी सॉफ्टवेअरचा उपयोग : योग्य सेक्युरिटी सॉफ्टवेअरचा उपयोग करून, आणि तो योग्यवेळी न चुकता अपडेट करून आपण हॅकर्सचा हल्ला रोकू शकतो. मॅकफ्री सेक्युरिटी वापरून ते टाळू शकतो.

7) वायरलेसची योग्य सुरक्षा  - वायरलेसमध्ये डाटा एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात जात असताना हॅकर मधेच तो बघू किंवा चोरू शकतात तयामुळे आपण वापरत असलेल्या वाय-फायचा नियमित पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. तसेच तो इतरांना माहित होऊ नये याची काळजी आवश्यक आहे. शिवाय तो स्ट्रॉंग (थोडा अवघड) ठेवणे आवश्यक आहे. शक्ययतो जन्मदिनाक, घरातील सदस्याचे नाव, कुत्राचे नाव वापरणे टाळावे. आणि पासवर्ड सतत बदलला पाहिजे.

9) योग्यप्रकारे माहिती साठवणे -  आपली महत्वाची माहिती कुणीही बघू शकणार नाही अशा उपकरणात साठवून ठेवावी. शक्यतो त्याचा बॅकउप घेऊन योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवावा.

माहितीची योग्य सुरक्षा हा एखाद्या संस्थेचा प्रश्न नसून देशाचा प्रश्न असतो. त्यामुळं प्रत्येक शासकीय वा खाजगी संस्थने त्यासंबधित योग्य उपाययोजना जसेकी पासवर्ड, फायरवॉल, डिजिटल सिग्नेचर, अँटीव्हायरस, एसएसएल चा उपयोग करून सेक्युरिटी वाढवने आवश्यक आहे. भारत सरकारने याबाबतीत बरेच नियम आणि कायदे लागू केले आहेत. विधी शिक्षणात सायबर लॉचा समावेश झाला आहे. अशा सायबर गुन्ह्याचा योग्य गतीने तपास करण्यासाठी भारत सरकारने 'आयटि ऍक्ट 2000' तयार केला. तसेच मुख्य शहरात 'सायबर क्राईम' या नवीन पोलीसशाखेची सुरु केली आहे. त्यामुळे आज गरज आहे की देशातील सर्व नागरिकांनी संगणक शिक्षणात मागे न राहता हा बदल स्वीकारून संगणक तसेच सायबर सेक्युरिटीचे धडे गिरवने आवश्यक झाले आहे. कारण ' प्रेव्हेन्शन इज बेटर दयान क्युअर'

  प्रेम जैस्वाल  premshjaiswal@gmail.com







Saturday, 20 October 2018





जबाबदार कोण?


काल अमृतसरमध्ये घडलेली 'रेल्वे दुर्घटना' खूपच दुःखद आहे. हि घटना फक्त पंजाब नाहीतर संपूर्ण देशाला दुःखाचा चटका लावून गेली.  पंजाब तर दुःखाच्या सागरात बुडाला आहे.  साधारण ६९ पेक्षा जास्त लोकांचा या दुर्घटनेत करूण अंत झाला आणि शेकडो जखमी झाले. घरातील एक सदस्य वारल्यास संपूर्ण घर उद्धवस्त होतं, म्हणजेच ६९ कुटुंबावर दुखाच डोंगर पडल्यासारखं आहे. पण आपल्याकडं शोकांतिका अशी की अशाही दुःखद घटनेकडे बघण्याचा समाजात दृष्टिकोन हा राजकीय असतो. आणि सर्वत्र जिम्मेदार कौन? अशी एकचं चर्चा झडत असते. सर्वांचा प्रयत्न हा इतर पक्षावर ढकलून हात झटकण्याचा असतो, हि बाब खूपच खेदजनक आहे. सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवून निर्लज्जपणे आरोप फेटाळले जातात किंवा इतरांवर ढकळले जातात. कालांतराने 'विसरभोळी' जनता सर्व विसरून जाते, नेते मोकाट फिरायला मोकळे होतात.

समाजात सर्वच समारंभ, उत्सव हे कोणत्यांन कोणत्या रस्त्याच्या शेजारीच होत असतात. समारंभ, सभा आणि उत्सव साजरा करण्यासाठी शासनानं काही नियम आखून दिलेले असतात. पण उत्सव, मस्ती आणि आनंदाच्या भरात ते नियम पायदळी तुडवले जातात. लग्नाची वरात अर्धा रस्ता व्यापून काढली जाते. फटाके, बँड, डीजे वाजवत, बेफाम नाचताना बाजूने जाणाऱ्या वाहणाकडे कुणाचे लक्षही नसते. मग अशात कोणी नाचत नाचत बाजूनी वाहनांच्या समोर आला तर जिम्मेदार कौन? अर्थात तो नाचणारा वराती. कारण तो वाहक सर्व नियम पाळून, हॉर्न वाजवत गाडी चालवत असतो आणि कोणतंहि वाहन तुम्ही अचानक अर्जंट ब्रेक लावून थांबवू शकत नाही. पण आपल्याकडे 'रेशनल'वर 'इमोशन भारी पडतं. सरळ त्या गाडीवाल्याची गाडी फोडून लोकं मोकळे होतात.  वाहकालाच मोठी सजा देण्याचा प्रयत्न होतो.  तसेच  मोटरसायकल, सायकलवाला स्वतःच्या चुकीन भरधाव कारसमोर आला तर 'बघे' आधी मोठ्या वाहनावर जिम्मेदारी टाकून त्याला चोपतात. कारण खरी चूक कोणाची याशी कुणालाही घेणंदेन नसतं. मार खातो तो मोठी गाडीवालाच!

अमृतसरचा प्रकार थोडा तसाच आहे. संयोजकांनी ज्या ठिकाणी रावण दहन केलं त्या मैदान आणि रेल्वे पटरी दरम्यान एक दहा फुटाची संरक्षक भिंत होती पण हौशी प्रेक्षक दूर उभे राहून तो नजारा बघत होते. कुणी फोटो, कुणी शूटिंग करत होते. या धुंदित त्यांना बाजूने जाणाऱ्या रेल्वेचे भान नव्हते. मोटरमन रेल्वेला अर्जंट ब्रेक लावू शकत नाही त्यासाठी त्याला नियोजित थांब्याच्या साधारण एक किलोमीटर आधी तयारी करावी लागते. यदाकदाचित ब्रेक लावला तर ट्रेनचे डब्बे घसरून मोठा अपघात घडू शकतो.  दुसरी बाब अशी की पटरीची सुरक्षा, राखण हा मुद्दा रेल्वेच्या अखत्यारीत येते. त्या पटरीला कुणी इजा करने,  त्यावर उभे राहने हा अदखलपात्र गुन्हा आहे.  जसा रेल्वेचा अर्थसंकल्प, पोलीस प्रशासन वेगळे असते तसे त्यांचे काही कायदेही वेगळे आहेत. मुळात रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावरील घटना हि रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येते, तेथे रेल्वेचे कडक नियमच लागू पडतात. सदरील उत्सव हा दर वर्षी होत असल्यामुळे तसेच रेल्वेस्टेशनपासून २-३ कि मी अंतरावर असल्यानं रेल्वेनं खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते.

संयोजकाचे जसे गर्दी वाढण्याकडे लक्ष होते तसेच लक्ष त्यांनी सुरक्षेकडे देणे आवश्यक होते. रिकाम्या खुर्च्या येणाऱ्या प्रमुख नेत्याना भाषण संपेपर्यंत टोचत असतात. जशी गर्दी वाढते तसा नेते आणि संयोजकाचा हुरूप वाढतो. हल्ली प्रत्येक गर्दीचा संबंध हा मतदान आणि भविष्यातील निवडणुकीशी जोडलेला असतो. पण त्या धुंदीत सुरक्षेचा विषय पायदळी तुडवला जातो. लोकांच्या जीवाची पर्वा नसते. मग अशाच गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा काल सारख्या घटना घडतात. वाढती गर्दी बघून संयोजकाचे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन गर्दीवर नियंत्रण केले असते तर घटना टळली असती. किंवा गर्दीचा अंदाज बघून हा कार्यक्रम इतर सोयीच्या ठिकाणी घेता आला असता. कारण हजारो वर्षे आधीच मेलेल्या रावणदहनापेक्षा लोकांचे जीव जास्त महत्वाचे होते.

हल्ली प्रत्येकाच्या हातात सेल्फी, शूटिंग वाला कॅमेरा असल्यामुळे कोणत्याही घटनेची शूटिंग करून 'Live' दाखवणे, रेकॉर्डिंग करून फिरवणे असे प्रकार वाढले आहेत. या शूटिंगच्या नादात युवावर्ग वाटेल ते प्रकार करण्यास धजावत असतात. मग चालत्या ट्रेन, बस, मोटारसायकलवर शूटिंग घेणे असले प्रकार घडतात व बऱ्याचदा अपघातही होतात. कालच्या घटनेत काही असेही हौशी असतीलच हे नाकारता येत नाही.

शेवटी, अशा घटनेची चौकशी होतच असते, ती होईलही. पण गरज आहे की अशा घटनेपासून योग्य तो धडा घेऊन अशा घटना भविष्यात भारतातील इतर ठिकाणी घडू नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. या घटनेस जे दोषी आहेत त्यांना 'औपचारिकतेची सजा' न देता अद्दल घडवावी. मुख्य म्हणजे या घटनेस 'विरोधक' सत्तारूढ पक्ष अशा चष्म्यातून न बघता दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी.

या लेखातील सर्व विचार माझे आहेत. वाचकाचे विचार भिन्न असू शकतात. तेंव्हा वादावादी न करता आपले विचार आपण मुक्तपणे ठेवू शकता.

'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]



© काॅपीराईट

-प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

Monday, 8 October 2018

पीसी-एमसीईडीचा स्तुत्य उपक्रम





उद्योजक प्रशिक्षण : पीसी-एमसीईडीचा स्तुत्य उपक्रम

नुकतंच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चिंचवड शाखेतर्फे घेण्यात आलेल्या 'डिजिटल मार्केटिंग' कार्यशाळेच प्रशिक्षण घेऊन मी परत आलो. मार्केटिंग हा प्रत्येक व्यवसाय-उद्योगाचा अविभाज्य भाग. त्यामुळं हा डिजिटल कोर्स शिकून घ्यावा अशी खूप दिवसापासून इच्छा होती. म्हणतात ना 'इच्छा प्रबळ असेल तर सारं घडून येतं.' पीसी-एमसीईडीकडून ही संधी चालून आली.  'शासकीय' असूनही पुढंमागं न पाहता मी ह्या तीन दिवसीय कार्यशाळेचं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्या अनुभवाबद्दल हा लेख.

चेंज इज कॉन्सटन्ट. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. आपल्या सभोवताली अनेक बदल घडताना आपण बघत असतो, त्याचा अनुभव घेत असतो.  आज संगणक व इंटरनेट क्रांतीनं या युगात प्रचंड बदल घडवून आणले आहेत. या बदलासोबत बदलणे प्रत्येकाला क्रमप्राप्त झाले आहे. थोडक्यात बदलाशी वाद न घालता त्याशी समरस होण्यातच सर्वांचं भलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटाचं तिकीट ऑन-लाईन खरेदी न करता पारंपारिक पद्धतीनं रांगेत उभं राहून,  रोख रक्कम देऊनचं तिकिट घ्यायचं ठरवलं तर आपल्या पदरी निराशाच पडेल. कारण हल्ली सर्व सिनेमागृह ऑन-लाईन तिकीट बुकिंगनं  हाऊसफुल्ल होत असतात. आणि यदाकदाचित आपल्याला तिकीट मिळालं तरी पाहिजे तशी आसनव्यवस्था मिळणार नाही.

आणि असंच उदाहरण आपण व्यवसाय-नोकरीतील मार्केटिंगच्या संदर्भात घेऊ शकता.  पूर्वी एखादी वस्तू-सेवेची मार्केटिंग करणं खूप क्लिष्ट, वेळखाऊ आणि खर्चिक काम होतं.  प्रचंड जाहिरात खर्च, मग सेल्स ऑफिसर शेकडो 'कोल्ड कॉल' करून लीड जनरेट करत असत, प्रत्येक्ष फॉल्लोउप होऊन शेवटी व्यवहार. प्रत्येक विक्रीमागे लागणार मनुष्यबळ, कार्यालय खर्च खूप जास्त असे. कंप्युटर आणि इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मार्केटिंगसह इतर क्षेत्रात एक मोठी क्रांतीच घडली. आज जगभरातील खरेदीदार आणि विक्रेता दोन्ही कोणत्यानं कोणत्या मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रीनवर सहज उपलब्ध असल्यानं जास्तीत जास्त  व्यवहार हे ऑन-लाईन घडत आहे.  त्यामुळंच उद्योगात टिकून राहण्यासाठी फक्त पारंपरिक मार्केटिंगवर सर्वस्व अवलंबुन न राहता नव्या 'डिजिटल मार्केटिंग' चे टूल्स शिकून घेणं, त्याचा योजनाबद्द वापर करणे आवश्यक आहे.

'आवश्यकता हि अविष्काराची जननी असते.' थोडक्यात समाजाच्या गरजेनुसारच नवीन वस्तू किंवा सेवा जन्म घेत असतात.  कदाचित त्यामुळंच शासनाच्या  'महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ'  यांच्या चिंचवड शाखेनं उद्योजकासाठी विविध नवनवीन कोर्सेसच प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. ज्यामध्ये आयात-निर्यात, डिजिटल मार्केटिंग, बिजनेस फायनान्स मॅनेजमेंटसह अनेक उद्योगिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण मोजक्या दिवसाचं आणि अत्यन्त माफक शुल्कामध्ये उपलब्ध आहे. एमसीईडी-पिंपरीचिंचवड शाखेचा हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे.  एमसीईडीच्या डिजिटल मार्केटिंगचा प्रशिक्षणार्थी या नात्यानं माझा हा अनुभव आहे.

बदलाच्या या युगात स्वतःस 'अपडेट' केलं नाही तर आपण 'आऊटडेट' होत जातो. जगात सर्व गोष्टी डिजिटल होत असताना फक्त पारंपरिक मार्केटिंग टूल्स वापरणे म्हणजे स्पर्धेतून माघार घेण्यासारखे आहे. तसेच जुनाट शस्त्राला 'धार' लावून घेणं कधीही चांगलं, म्हणून मी 'डिजिटल मार्केटिंग'च प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. या कोर्सचा प्रचार आणि प्रसार पुरेसा न झाल्यान ह्याचं प्रशिक्षण फक्त काही मोठ्या शहरातच उपलब्ध होतं. त्यातच प्रशिक्षणाची अफाट वीस-पंचविस हजार फी, हॉटेलजेवण आणि प्रवासाचा खर्च  सर्वांच्या आवाक्यात नव्हतं. त्यामुळं 'विद्येच माहेरघर' असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी कमी शुल्कात अशा प्रशिक्षनाची सोय उपलब्ध करून एमसीएईडी-पिंपरी चिंचवड शाखेनं महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी खूप मोठं काम केलं आहे.

उद्योगविश्व म्हणजेच खाजगी कंपन्या. घडीच्या काट्यावर, काटेकोर शिस्तीत, चकाचक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नोकरवर्गाचा 'शासकीय' संस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोणच खूप वेगळा असतो. किंबहुना तो नकारात्मक असतो असं सांगायला हरकत नाही. त्यांना बऱ्याच शंकाकुशंका असतात. जसकी शासकीय प्रशिक्षण- मग प्रशिक्षक कसे असतील? तळमळीनं शिकवतील का वरवरचं? खरचं शिकवतील की टाईमपास? पूर्ण शिकवतील का फक्त औपचारिकता! असे नानाविध प्रश्न पडने साहजिक आहे.

पण अनुभवी प्रशिक्षणार्थी म्हणून सांगतो कि शासनपुरस्कृत पीसी-एमसीईडी येथील प्रशिक्षन घेतल्या नंतर आपला शासकीय संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जातो. त्यांच्या संस्थेच्या नावाला साजेसं कामचं पीसी-एमसीईडी आज करत आहे. शासकिय असूनही दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात काहीच उणीवा राहू नये म्हणून एमसीईडी खाजगी क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून देत असते. या केंद्रातील प्रोजेक्ट ऑफिसर सर्व प्रशिक्षणार्थींना इतर उद्योगाची माहिती तसेच शासनाच्या योजनेची माहिती देत असतात. प्रशिक्षणार्थी उद्योजकांना ते आस्थेने, तळमळीने शिकवून त्यांना उद्योगनिर्मितीस प्रोत्साहित करत असतात. उद्योग हा देशाचा आर्थिक कणा आहे. देशाच्या औद्योगिक प्रगतिच देशाची पत, जीडीपी वाढवत असते. त्यामुळंच जीडीपीला महत्व आहे. त्यामुळं गरज आहे की सर्व एमसीईडी सारख्या इतर शासकीय संस्थेने शासनाचं उद्योग विकासाच धोरण राबवताना फक्त ते औपचारिकता न ठेवता इमानेइतबारे राबविले पाहिजे जेणेकरून पुढं अनेक उद्योजक घडून देशाची पत वाढेल आणि देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लागेल.

प्रशिक्षण कालावधीत एमसीईडीनं चहा, भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.  आमच्या या प्रशिक्षण प्रवासात उत्तम 'हमसफर' सहप्रशिक्षणार्थी लाभले त्यामुळं प्रवासाचा शीण जाणवला नाही, त्यांचे मनपूर्वक आभार. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात ही छोटी पण ज्ञानाने मोठी कार्यशाळा संपन्न झाली. त्यासाठी मी आभार मानतो एमसीईडी-पिंपरी चिंचवड शाखेच्या प्रोजेक्ट ऑफिसर श्री श्रीकांत कुलकर्णी सरांचे, ज्यांनी आम्हाला उद्योगासंदर्भी अत्यंत तळमळीनं बहुमूल्य मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित केलं. मी आभार मानतो आमचे प्रशिक्षक श्री श्रीकांत लांबोले सर, एक्सपर्ट फॅकल्टी श्री अभिजित धेंडे सरांचे. श्री युवराज लांबोले सरांनी चांगलं मोटिवेट केलं, त्यांचेही आभार.  पीसी-एमसीईडी संस्थेच्या इतर सर्व कर्मचारी वर्ग जे या उपक्रमाशी प्रत्येक्ष-अप्रत्येक्षपणे जुळलेले आहेत त्यांचे आभार.  पीसी-एमसीईडीच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा.


 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com

Monday, 1 October 2018





डिजीटल युगात वावरताना
         

आज विज्ञान तसेच संगणक क्षेत्रातील तज्ञ आणि जानकार एक मतानं सांगतात कि या शतकात ज्या गतीनं बदल घडतं आहेत ते मागील शतकाच्या किती तरी पटिनं जास्त आहेत. थोडक्यात या बदलाची गति अफाट आहे आणि ती पुढं वाढतचं जाणार हे आपण बघतचं आहोत. विज्ञानातील प्रत्येक अविष्कार समाज आणि जगात बदल घडवत असतो आणि मानवीजीवन सूकर होण्यास त्याची मदतही होत असते. पण सिलिकॉन टेक्नोलॉजी आणि त्यानंतर गतिने वाढलेल्या माइक्रोटेक्नोलॉजीमुळे जगात जी प्रगति झाली त्याची तुलना करने कठिन आहे. जागतिकीकरण आणि त्या सोबतच आलेल्या कम्प्यूटर, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानामुळे दैनन्दिन जीवनात झालेला आमूलाग्र बदलाचा अनुभव आपण घेतच आहोत.

एक काळ होता की उद्योग म्हंटले की कितीतरी एकर जमिनीवर उभी मोठी फैक्ट्री, त्यात काम करणारी अवजड मशीन, त्यावर अहोरात्र झटनारे विविध विभागाचे हजारो कामगार आणि त्यांचे व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक,  प्रोडक्शन, क्वालिटी कण्ट्रोल, रिसर्च, लॉजिस्टिक्स, वितरण आणि डीलर असा मोठा पसरा असायचा. हा सर्व पसारा सांभाळुण करोड़ोची उलाढाल करनाऱ्या उद्योजकांची गणतीचं मोठे उद्योगपति म्हणून व्हायची. मग
अशा उद्योजगाचं ऑफिस म्हंटलं की उच्चव्यवस्थपाकाची केबिन, केबिन बाहेर कितीतरी सहकर्मचाऱ्यांचे टेबल, टेबलवर तुंबलेले फायलीचे गठ्ठे, त्या फायली सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक टेबलजवळ एक गोदरेजचं मोठं कपाट, फाईल सुरक्षित ठेवण्यासाठी खास स्टोररूम आणि इकडचे पेपर तिकडे फिरवणारा सेवकवर्ग. ऑफिस म्हंटलं तर विविध विभागाचा अंतर्गत आणि बाहेर जगाशी होणारा  पत्रव्यवहार आलाच. हा पत्रव्यवहार लिखित स्वरूचा असल्यानं दिवसभर टाइपरायटरचा खड़खड़ात चालायचा, त्यामुळे दिवसन दिवस पेपर आणि फाइलचे मोठ्मोठे गठ्ठे वाढत जायचे. जो पर्यन्त जागतिकिकरन होवून परदेशी कंपन्यानी आपले पाय देशात रोवले नव्हते तो पर्यन्त आपला कारभार हा ब्रिटिश कंपन्याच्या धरतीवर एका साचेबद्ध पध्दतीनेच चालू होता.  मग अशा पारंपरिक उद्योगात नोकरी मिळवण्यासाठी एक महाविद्यालयीन पदवी पुरेशी असायची. त्यांमुळे सर्व दारोमदार हे शाळा-महाविद्यालयात घेतलेलं शिक्षण म्हणजेच 'हार्डस्किल' वर असायची. थोडक्यात ज्याचं हार्डस्किल आणि त्या संबंधित क्षेत्राचं अनुभव चांगला तो 'नोकरीयोग्य' असे समीकरण असायचे.  त्याकाळी शिक्षणाचा दर्जाही चांगला असल्यामुळे चांगले 'नोकरीयोग्य' मनुष्यबळ सहज उपलब्ध असायचं.

१९९१ नन्तर सरकारनं परदेशी कंपन्यासाठी देशाची दारं उघडली आणि चित्रचं पालटलं. परदेशी उत्पादक कंपन्या, सेवा देणाऱ्या बँका, इंस्युरन्स, सारख्या विविध क्षेत्रातील कंपन्यानि भारतात पाय रोवायला सुरुवात केली. ह्या परदेशी कंपन्याची काम करण्याची भाषा, पद्धत आणि शैली वेगळी असल्यामुळे त्यांच्याशी जुळवून  घेण्यासाठी आपल्या भारतीय कर्मचाऱ्याना स्वतःत बदल करनं अनिवार्य झालं.  संवाद, संभाषण आणि पत्रव्यवहारासाठी इंग्रजी भाषा हा एकच पर्याय होता त्यामुळे इंग्लिश भाषेचे महत्व वाढने साहजिक होते. त्यातच सगळीकड़े संगनकीकरण, वाढते ग्राहकहक्क कायदे यामुळे सेवातत्परतेचे महत्व खुप वाढलं. थोडक्यात सर्वच क्षेत्रात कंप्यूटर, इंटरनेट आणि करियर उपयोगी सॉफ्टस्किलचं ज्ञान अत्यावश्यक झालं. त्यामुळेच 'सॉफ्टस्किल' ही नवीन संकल्पंना पुढे आली.

आज मोठ्या उद्योगांचे ऑफिस असो कि एखादी बैंक, संगणकीकरन व इंटरनेटमुळ त्यामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आज ऑफिससाठी खुप मोठ्या जागेची गरज राहिली नाही. मोठ्या ऑफिसचे रूपांतर एका संगणकीकृत छोट्याशा जागेमधे झालं आहे. सर्वच पत्रव्यवहार हे पेपरलेस झाल्यामुळे टाइपरायटर हा प्रकार हद्दपार होवून त्याची जागा कम्प्यूटर, लॅपटॉपनं घेतली आहे.  फायलीचे हजारो गठ्ठे, गोदरेजचे भरगच्च कपाट आणि स्टोररूमची जागा एका छोट्याशा आटोपशीर सर्वरने घेतली आहे.  वायरलेस लोकल एरिया नेटवर्क आणि इंटरनेटमुळे खाजगी तसेच शासकीय कार्यालय आज 'पेपरलेस' झाले आहेत. नेटमुळं क्षणात पाहिजे तो पेपर आपण देश-परदेशात पाठवू शकतो. त्यामुळं कामाची गती वाढून सेवक आणि टपाल-कोरियरचा खर्च कमी झाला आहे. आज इंटरनेटमुळे सर्व माहितीचे आदानप्रदान सोपे होवून जगाला एका खेड्याचे स्वरूप आले आहे.  सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल व कैशलेस होत असल्यामुळे आज बँकेत रांगा कमी झाल्या आहेत. करंसी नोट प्लास्टिक मनी होवून आज डिजिटल झाली, हा सर्व बदल काही वर्षात घडला. या बदलत्या युगात सर्व उद्योगांनी आपले कामाचे स्वरूप बदलले आणि ज्यानी प्रवाहनुरूप बदल केला नाही त्यांना त्याची किमत मोजावी लागली. उदाहरण घ्यायच असल्यास कॅमेराफिल्म जगातील कोडेक ही मोठी कंपनी जी ८०% फोटोपेपर विकायची काळानुरूप त्यांनी बदल केला नाही आणि मागे राहिली. आपल्याकडे सुद्धा एचएमटी, अम्बेसेडर कार अशा काही कंपन्या आहेत ज्या मागे राहिल्या. सेवाक्षेत्रातही ज्या कंपन्यानि बदल अवलंबिला नाही ते कालबाह्य झाल्या आणि बंद पडल्या.

कंप्यूटर आणि सॉफ्टवेअरमुळे उद्योगाचे स्वरूपही बदलले आहे. आज दोन उच्चशिक्षित तरुण २००० फुट ऑफिसमधे कंप्यूटर आणि सॉफ्टवेयरद्वारे करोडोची उलाढाल करत असल्याचे आपण बघत आहोत. उदाहरण द्यायच असल्यास उबेर ही टैक्सी कंपनी मुळात फक्त एक सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांच्याकड़े स्वतःच्या कार नाहीत पण उलढाल मात्र करोडोमधे आहे. ट्रीवॅगो अशीच एक हॉटेल कंपनी ज्यांची स्वतःची हॉटेल्स नाहीत. बुक माय शो, फ़ूडपांडा, ट्रैवेगों, बुकमायट्रिप, पेटीएम, ओला ह्या काही सॉफ्टवेयर कंपन्या आहेत ज्या विविध क्षेत्रात सॉफ्टवेयरद्वारे काम करून करोड़ो रूपयाच्या उलाढाली करत उद्योगक्षेत्रात नावही कमवत आहेत.

आज सर्वच दैनंदिन व्यवहार मोबाईलवर होत असल्यानं कुठंही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. दिवसभराचे सर्व उद्योग आज आपण काही मिनिटात कंप्यूटर आणि इंटरनेटवर घरी बसून करु शकतो. त्यमुळे वेळ आणि पैसे अशी दोहेरी बचत होते.  मग ते बस, रेल्वे, विमान किंवा सिनेमाचे टिकिट  असो कि एखाद्या दूर ठिकानावरील हॉटेलचे बुकिंग.  त्यासाठी रांगेत उभे राहण्याची किंवा प्रत्येक्ष तेथे जाण्याची गरज राहिली नाही.  एव्हड़च नव्हे तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तुची खरेदीविक्रिचे व्यवहारही एका क्लिकवर सध्या शक्य झाले आहे. विविध वेबसाईटवर आपण पाहिजे ती वस्तू मग ती भाजी असो कि महागड़ी कार खरेदी किंवा विक्री करु शकतो. एव्हडेच नाही तर इन्शुरन्स, लोनहप्ता, गैस-नळाच बिल, शाळेची फी आणि सर्व आर्थिक व्यवहार आपण कंप्यूटरवर सहज करु शकतो ज्यामुळे पैसा आणि वेळेची भरपूर बचत होत आहे. आज पैशाची योग्य गुंतवनुक करून मुबलक नफा मिळविण्यासाठी म्यूच्यूअल फंड, बॉन्ड, शेअर-कमोडिटी इत्यादि पर्याय उपलब्ध आहेत ते व्यवहार आपण घरी बसुन करु शकतो. चोरी न जाणारे सोने आपन नॉन-फिजिकल स्वरुपात ऑनलाइन खरेदी करु शकतो. तसेच विविध प्रकारचे कर जशेकी मालमत्ता कर, नळपट्टी, आयकर, जीएसटी इत्यादि आपण ऑनलाइन भरु शकतो.
     
आज स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांची संख्या ही जवळजवळ आपल्या देशाच्या लोकसंख्येएव्हडीच आहे. स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेऊन जाहिरात आणि मार्केटिंगमध्ये बदल घडणं सहाजिक आहे. सर्वच 'टार्गेट ऑडियन्स' कायम कोणत्यान कोणत्या स्क्रीनवर उपलब्ध असल्यानं त्यावर आपल्या उद्योग-सेवेची जाहिरात करणं सर्व उद्योजकाना क्रमप्राप्त झालं आहे.  त्यामुळंच 'डिजिटल मार्केटिंग' हि संकल्पना पुढं आली आहे.  पूर्वीप्रमाणे झोनल मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ब्रँच मॅनेजर, सेल्स ऑफिसर हि पद आज इतिहास जमा होतं आहेत. त्याची जागा आता डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, कंटेंट मार्केटिंग मॅनेजर, सोशल नेडॆ मॅनेजर, सर्च इंजिन मॅनेजर, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमायजर  अशी नवनवीन पद घेत आहेत.

आज सर्व शासकीय कामाचे संगनकीकरन आणि ऑनलाईन झाल्यामुळे आधारकार्ड, पैनकार्ड, मतदारकार्ड, ड्राइविंग लाइसेंस एव्हड़च नाही तर पासपोर्टसुद्धा आपण प्रत्येक्ष त्या कार्यालयात न जाता ऑनलाईन मिळवू शकतो. त्यामुळे कामाची गति वाढून लालफितीचा होणारा मनस्त्ताप ही कमी होत आहे.

आज शिक्षणक्षेत्रातही चॉक,बोर्ड आणि टॉक ही संकल्पना हळूहळू आउटडेट होत आहे आणि त्याची जागा इ-लर्निंगने घेत आहे. आज देशात डिजिटल स्कुलचे वारे वाहत आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयात कंप्यूटरयुक्त क्लासरूम, प्रोजेक्टर, वाय-फ़ाय आवश्यक झाले आहेत. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारीवृंद यांना कंप्यूटरचे पुरेसे ज्ञान आवश्यक झाले आहे.  देश-परदेशातील सर्व उच्चशिक्षण संस्था जसेकी आयआयएम्, आयआयटी, एनआयटी आणि इतर संस्थानी आपले इ-लर्निंग, व्हर्चुअल क्लासरूम सेशन व्यवस्था सुरु केली आहेत. त्यामुळे आज आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या उच्चशिक्षित अनुभवी अध्यापकाचे लेकचरस् आपण शक्य तिथे ऑनलाइन ऐकू शकतो आणि त्यांचे प्रमाणपत्रही मिळण्याची सोय आहे. त्यामुळे कमी खर्चात उच्चशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

एक गोष्ट सर्वाना मान्य करावीच लागेल ज्या गतिने हे बदल होत आहे त्या बरोबर आपणही 'अपडेट' होनं आवश्यक झालं आहे नाहीतर आपण 'आउटडेट' होण्याची संभावना आहे. टाइपरायटरची जागा इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर नन्तर  कम्प्यूटर आणि आज मोबाइलने घेतली आहे. करंसी नोटची जागा आधी प्लास्टिक कार्डने आणि आता डिजिटल ट्रांझकशनने घेतली. पुढील काही दिवसात रस्त्यावर आपल्याला फक्त इलेक्ट्रिक कार व ट्रक बघायला मिळतील आणि काही वर्षांनंतर त्या चालकरहित होतील!

आज अस कोणतच खाजगी किंवा सरकारी क्षेत्र उरल नाही जे कंप्यूटराईज्ड झाल नाही. उलट काही क्षेत्रात कंप्यूटर मनुष्यज्ञान शक्तिच्या पुढे निघत आहेत आणि हे मनुष्यजातीस एक आवाहन ठरणार आहे. तात्प्रर्य, आज गरज आहे कि प्रत्येक युवकानी हे बदल लक्षात घेवून फक्त पारंपारिक पद्व्याच ज्ञान न घेता काही कॉम्प्यूटर कौशल्य शिकुन सहज रोजगार मिळवन्याचा प्रयत्न करावा. आज घडिला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे आज कितीतरी असे  नोकरीसाठी उपयुक्त कोर्सेस आहेत जसेकी ऑटोकड, टैली, डीटीपी, वेब-डिजाईनसारखे कौशल्य शिकून युवक सहज शिकता शिकता पैसे कमावू शकतात.  याशिवाय युवकानी इंटरनेटच्या इतर सॉफ्टस्किल्स शिकुन अस्खलित इंग्रजीमधे संभाषण कस करता येईल यावरसुद्धा भर द्यावा.   आपण घेत असलेली पदवी खरोखरच कुणाच्या कामी येईल का याचाही विचार व्हावा. जास्त पद्व्या म्हणजे मोठी नोकरी हा गैरसमज दूर करून अनावश्यक शिक्षणात वेळ वाया घालु नये. कारण आज महाविद्यालयात घेतलेले ज्ञान म्हणजे 'हार्डस्किल' वर व्यवहारिक 'सॉफ्टस्किल' भारी पड़त आहे. आज असे कितीतरी उद्योजक आपल्याला भेटतील ज्यानी आपल्या सॉफ्टस्किलच्या जोरावर यशाच उंच शिखर गाठल आहे. एका सर्वेनुसार नोकरी आणि उद्योगधन्द्यात फक्त २०% कामच हार्डस्किल करते बाकी ८०% सॉफ्टस्किलने होत असतात. सॉफ्टस्किलमुळे हार्डस्किलला एक प्रकारची चकाकी मिळते.

हल्ली दहावी किंवा बारावीत शिकत असतानाच विद्यार्थी आपले करियर निश्चित करतात. यात वावग काहीच नाही. पण करियर निवडताना त्यानी हेही लक्षात ठेवावे कि त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात मग ते वैद्यकीय, इंजिनियरिंग असो की अकाउंट, व्यवस्थापन त्यात उंच शिखर गाठण्यासाठी त्यांना इंग्रजी, संभाषण व देहबोली, नेतृत्वगुण, कंप्यूटर आणि इंटरनेटच पुरेस ज्ञान, व्यवहार चातुर्य, आत्मविश्वास, विवेकशिलता, मोरल एथिकल वैल्यू, टीम स्पिरिट अशा काही सॉफ्टस्किलवरसुद्धा भर द्यावा लागेल तरच ते जीवनात यशस्वी होऊ शकतील.


 'चतुर्थ स्थंब ब्लॉग' वर आपण इतरही लेख वाचू शकता.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
(लेखक औरंगाबाद येथील एस्पी अकॅडमी या संस्थेचे संचालक तसेच करियर मार्गदर्शक आहेत. हा लेख नावासह शेअर करावयास हरकत नाही.]  


Wednesday, 19 September 2018




एलईडी ब्लब: खरंच वीजेचं बिल कमी करतो का ?

आजच्या धकाधकीच्या जीवनात मेहनतीनं कमावलेले चार पैसे मासिक खर्च, बिल आणि हप्ते भरण्यातच संपून जातात. दोन पैसे वाचवून महिन्याचे बजेट सांभाळतच  माणसाचं आयुष्य पुढं पुढं सरकत असतं. पेट्रोल, डिझेल, विजेचे दर, हॉस्पिटल खर्च, कर, शिक्षणाची फी कमी झालेल्या बातम्या ऐकिवात नसतात. त्यांचा आलेख चढताचं असतो. लाईटबिल हातात घेतेवेळेस मनात एक धाकधूकी असते. एक मोठा 'शॉक' देण्याची क्षमता त्या कागदात असते. क्वचित ते कमी आलं तर त्या सारखा सुखद क्षण नसतो.  आणि ते कमी यावं म्हणून आपण वाटेल ती बचत करत असतो. ह्या बचतीचा धागा पकडूनच विजेची उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या जाहिरात करत असतात. हल्ली सगळीकडं एलईडी वापरून वीज बचत करा अशी चर्चा आहे. या सुरात सूर मिळवून शासनानेहि काही योजना चालविल्या आहेत. पण त्यामुळं पाहिजे तेव्हडा फरक होताना दिसत नाही. फक्त एलईडी ब्लब वापरून मोठी वीज बचत होणे हा गोड गैरसमझ आहे आणि तो दूर व्हावा त्यासाठी हा लेखप्रपंच.

 'एलईडी ब्लब एक बार, बिल कम आयेगा बार बार'
'विजेची बचत करण्यासाठी एलईडी ब्लब वापरा'
'एलईडी ब्लब काळाची गरज'
'कट ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी बिल !'
'एनर्जी सेवडं, एनर्जी अर्नड'

एलईडी ब्लब विकणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीत अशी ठळक टॅग लाईन असते. या सर्व वाक्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो कि पारंपारिक ट्यूब, सीएफएल न वापरता तुम्ही एलईडी ब्लब वापरल्यानं विजेची बचत होते. यातं गैर असं काही नाही. एलईडी ब्लबला कमी वीज लागते, प्रकाश मात्र जास्त असतो. त्यामुळं २० वॉट सीएफएल ब्लबच्या ऐवजी आपण 9 वॉटचा एलईडी ब्लब वापरला तर तेव्हडाचं प्रकाश पडून आपले ११ वॉट वीजेची बचत होते. असे घरातील ७-८ ब्लब बदलले तर एकूण ८८ वॉट वीज बचत होईल, असं आपण मानतो.

थोडक्यात एलईडी ब्लब वापरून प्रत्यक्षात किती बचत होते याचा एक ढोबळ हिशोब केला तर ती बचत एकदंरीत वीज वापराच्या तुलनेत अगदी क्षुल्लक आहे.

देशातील लाखो घराचा विचार केल्यास ही खूप मोठी वीज बचत आहे. एकंदरीत देशाच्या साधनसंपतीचा विचार केल्यास हि खूप मोठी ऊर्जाबचत आहे याबद्दल किंचितशी शंका नसावी. त्यामुळं एलईडी ब्लब वापरणे कधीही चांगले. सध्या सर्वत्र एलईडी ब्लब उपलब्ध आहेत. खपं प्रचंड वाढल्यामुळं त्याच्या किमतीत घसरण होऊन माफक किमतीत ते सर्वत्र उपलब्ध आहेत.  पण मूळ मुद्दा असा की हे ब्लब वापरूनसुद्धा विजेच्या बिलात लोकांना अपेक्षित फरक दिसत नाही. असं का ?

तर कारण असे :

आपल्या घरात आपण लाईटशिवाय इतर अनेक उपकरण वापरत असतो. जसेकी पंखा, टीव्ही, फ्रीज, कुलर, कंप्युटर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, पाण्याची मोटर, गिझर, वॉशिंग मशीन, पिठाची चक्की, इलेक्ट्रिक प्रेस, ओव्हन, ड्रायर, एक्झॉस्ट फॅन, चार्जर इ. या उपकरणाला लागणाऱ्या विजेच्या तुलनेत एलईडी ब्लबला लागणारी वीज अगदी नगण्य असते.

उदाहरणार्थ बोअरची मोटर अर्धा तास चालवली तर महिन्याला  साधारण 50 युनिट वीज वापर होतो. त्यातच पाण्याची पातळी, इमारतीची उंची जेव्हडी जास्त तेव्हड बिल जास्त. थोडक्यात आपण वापरत असलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाला वीज लागते. थोडक्यात :

जास्त पाणी वापर म्हणजे जास्त वीज बिल.
जास्त मोबाईल वापर म्हणजे जास्त बिल,
जास्त कंप्युटर, लॅपटॉप वापर म्हणजे...
जास्त कपडे धुणे, झाडाला पाणी म्हणजे ......
जास्त सदस्य, जास्त पाहुणे म्हणजेच.....
जास्त कपड्याची इस्त्री म्हणजे .....
जास्त सिरीयल पाहिल्या म्हणजे .....
जास्त वेळ आंघोळ म्हणजेच ......
जास्त वेळ एसीचं सुख म्हणजेचं......
वरची टाकी भरून वाहते म्हणजेच पाणी आणि वीज दोन्ही वाया गेले ! म्हणजेच जास्त बिल असं समजावे.


वॉशिंग मशीन, फॅन, पिठाची घरगुती चक्की, ड्रायर हे गोलगोल फिरणारे उपकरण खूपचं वीज ओढत असतात. तसेच वीज ओढण्यात पाणी तापवण्याचा गिझरचा पहिला नंबर लागतो. रोज अर्धा तास गिझर चालत असेल तर महिन्याला 45 युनिट वीज खातो. या तुलनेत एलईडी ब्लबचं युनिट काहीच नाही.  कारण गिझर हा 3000 वॉटचा असतो. म्हणजे एक गिझर चालू ठेवणे म्हणजे 9 वॉटचे  333 एलईडी ब्लब चालू ठेवण्यासारखा प्रकार!

त्यामुळं एलईडी ब्लब चुकीन काही तास चालू राहिला तर विशेष काही फरक पडणार नाही पण वरील सर्व उपकरने काही मिनिटे/सेकंड जरी जास्त वापरली तर वीजबिलात खूप फरक पडतो. वीज बिल जास्त येतो.

खरचं विजेचं बिल कमी करायचं असेल तर वर नमूद केलेल्या सर्व विजेच्या उपकरणाचा वापर कमीत कमी करने आवश्यक आहे.  घरातील लाईट-फिटिंग तसेच योग्य अर्थिंग असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मोटारपंप, एसी, पंखे, फ्रीज सारख्या उपकरणाची नियमित दुरुस्ती, देखभाल करणे आवश्यक आहे. अधून मधून हे उपकरण घेत असलेलं करंट इलेक्ट्रिशियनकरवी चेक करून घ्याव. सतत पाण्यात राहून क्षारमुळे बोअरचा पंप जाम होतो आणि प्रचंड विद्युत खातो. त्यामुळे बोअरच्या स्टार्टरबोर्ड वर करंटमीटर असतो त्याकडे नियमित लक्ष असावे. करंटमीटर नेहमीपेक्षा जास्त दाखवतं असेल तर पंप दुरुस्त करून घ्यावा.

मनुष्याच्या भौतिकसुखाला अंत नाही. मानवी जीवन सुसह्य व्हावं म्हणून बाजारात नवनवीन उपकरण येत आहेत. बऱ्याच उपकरणात रिमोट कंट्रोल असतंच. रोज नवीन  डिस्काउंट-ऑफर देऊन विजेच्या उपकरणाच्या जाहिराती आपल्याला भुरळ घालत असतात.  उपकरण जरी अर्ध्या किमतीत मिळत असलं तरी न चुकता येणाऱ्या विजबिलात डिस्काउंट हा प्रकार नसतो. पिठाची चक्की, बार्बेक्यू असे काही उपकरण आहेत की ज्याचा वापर आपण क्वचितच करतो. पण ती उपकरण घरातील जागा व्यापतात शिवाय वीजबिल वाढवतात. त्याच प्रमाणे नवीन उपकरण घेताना ते खरोखरचं आवश्यक आहे का याचा सद्सदविवेक बुद्धीनं विचार करावा. तसेच ते उपकरण किती वीज खातं हे त्याच्या 'स्टार रेटिंग' वरून लक्षात घ्यावे. 'पाच स्टार रेटिंग' म्हणजे सर्वात कमी वीज घेणार उपकरण. कारण विजेचे भावाचा आलेख हा चढताचं असतो. नवीन घर, फ्लॅट किंवा ऑफिस घेताना त्या वास्तूतं खेळती हवा, योग्य प्रकाशयोजना आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. इन्व्हर्टर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबच्या बॅटरी जुन्या झाल्यास त्या खूप करंट ओढतात आणि वीज बिल वाढतं. इन्व्हर्टर तर चार्जिंगसाठी  100% वीज घेऊन परतीत वीज गेल्यानंतर 75%  वीज देतं. 25% वीज स्वतः खातो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेचे आकार. विद्युत महामंडळाने विजेच्या वापराचे स्लॅब ठरवून दिले आहेत. म्हणजे 100 युनिट पेक्षा कमी युनिटसाठी कमी आकार, 100 युनिट पेक्षा जास्त युनिटसाठी जास्त आकार. आणि 300 युनिटपेक्षा जास्त युनिटसाठी खूप जास्त भावाने वीज आकारली जाते. त्यामुळे जेव्हडा विजेचा वापर कमी तेव्हड बिल कमी.

शेवटी कंजुशी आणि काटकसर यामधील फरक समजणे आवश्यक. बरीच मंडळी ह्या दोन शब्दातील फरक समजण्यात चूक करतात. वीज असतानाही अंधारात बसणे हि कंजुशी. गरज पडेल तेंव्हाच लाईट-पंखा चालवणे हि चांगली काटकसर. पण गरज नसताना घरातील अनावश्यक लाईट पंखे चालू ठेवणे हा निवळ निष्काळजीपणा. विजेची बचत हा एक संस्काराचाच भाग आहे. अन्न, पाणी असो की वीज त्याची बचत कशी करावी याचे संस्कार प्रत्येक घराघरात तसेच शालेय शिक्षणात होणे आवश्यक आहे. किंबहुना शालेय शिक्षणात त्याचा अंतर्भाव व्हायलाचं पाहिजे. वीज बचतीसाठी घरातील वरिष्ठ पालक मंडळी जबाबदार असतात. कारण हे संस्कार वरूनचं खाली झिरपत येत असतात.  त्यामुळे इतर जीवनोपयोगी मूल्यासोबत अन्न, पाणी, पैसा आणि वीज बचत करण्याचे अमूल्य संस्कार आणि शिकवणं वरिष्ठाने कनिष्ठाला देऊन देशाच्या साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यात अमूल्य हातभार लावावा. ती एक प्रकारची देशसेवाच होईल.

अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगचे इतर लेखही वाचा.




© प्रेम जैस्वाल 9822108775
([ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]

Tuesday, 18 September 2018



एमसीबी कसा ट्रिप होतो ?


विजेचं शॉर्ट-सर्किट होऊन आग लागल्याच्या बातम्या आपण वाचतो. असे प्रकार घडू नयेत म्हणून हल्ली प्रत्येक घर-कार्यालयामधील विजेच्या मुख्य-बोर्डावर मिनिएचर सर्किट ब्रेकर [एमसीबी] लावलेले असतात.  हा एमसीबी सर्किट ब्रेक करण्याचं काम करतं,  कसे ?

हे माहित करून घेण्यापूर्वी आपण लाईटमीटर जवळचा 'फ्यूज' कीटकॅट कसा काम करतो,  हे आधी बघूया.  कारण कालच्या फ्युजची जागाच आज एमसीबीनं घेतली आहे.  घरातील वायरिंग किंवा उपकरणात बिघाड झाल्यास पूर्वी फ्यूज 'उडत' असे. त्यामुळं हा फ्यूज कसा उडतो, ते आधी बघू.

मुळात विद्युत महामंडल आपल्याला २३० व्हॉल्टचा अखंड विद्युत पुरवठा करत असते. त्या विजेला आपण उपकरण जसेकी लाईट, फॅन, मोटार इ. जोडले तरंच त्यातून करंट [विद्युत प्रवाह] वाहत, नसता करंट वाहत नाही. जेंव्हा एखाद उपकरण चालू असतं तेंव्हा त्यातून ठराविक प्रमाणात करंट वाहत असतं. पण जेंव्हा एखादया उपकरणात बिघाड होतो तेंव्हा त्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेतून खूपच जास्त करंट वाहत. या जास्त करंटमूळ त्या तारेत प्रचंडउष्णता निर्माण होते आणि ती तार तापते.  हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर घरातील तारा काही क्षणातच वितळतात.  मग 'शॉर्ट सर्किट' होऊन घराला आगही लागू शकते.

असं घडू नये म्हणून मीटरच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचा फ्यूज (किटक्याट) लावलेला असतो.  या  किटक्याट मध्ये एक विशिष्ट धातूची बारीक तार जीला 'फ्युजतार' असेही म्हणतात. तीचा 'मेलटिंग पॉईंट' खूप कमी असतो. हि तार उष्णतेने थोडीशी जरी तापली तरी वितळून तुटून जाते.  त्यामुळं वीज पुरवठा खंडीत होतो. विद्युत मोटारीत बिघाड, बोअरमध्ये बिघाड झाल्यास किंवा अपेक्षेपेक्षा जास्त लोड वाढल्यास सुद्धा हि फ्यूजतार वितळते. फ्यूज तार वितळून, वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळं वायरिंग जळून अख्या घराला आग लागण्याचे प्रकार टाळले जातात. पण त्यामध्ये पुन्हा पुन्हा फ्यूजतार बदलण्याची कटकट असायची. शिवाय फ्यूजतार बदलताना शॉक लागण्याची भीती असायची. त्यामुळं हल्ली फ्युजला पर्याय म्हनून सर्वत्र 'एमसीबी' च वापरतात.  करंट प्रमाणाबाहेर वाढल्यास हा एमसीबी ट्रिप होतो. उपकरणातील दोष काढून आपण पुन्हा तो सहज चालू करू शकतो. या एमसीबीच काम खूप मजेदार असतं.

शालेय विज्ञानात आपण सर्वच हे शिकलो आहो कि-

 ' 'जेंव्हा दोन धातूच्या पट्या सोबत तापविल्या तर त्या प्रसरण पावतात.' 

एमसीबीमध्ये याच सिद्धांताचा खुबीनं उपयोग केलेला असतो. एमसीबी मध्ये फ्यूज तारची जागा ह्या दोन भिन्न धातूच्या पट्या घेतात. जेंव्हा जास्त करंट वाहतं तेंव्हा उष्णतेमुळं ह्या पट्या तापतात आणि प्रसरण पावतात. त्यामुळं एमसीबीचा खटका खाली पडुन वीज पुरवठा खंडीत होतो, अपघात टळतो.

ज्यामुळे तो खटका खाली पडला तो उपकरणातील दोष निस्तारून आपण सहजपणे पुन्हा तो एमसीबी चालू करू शकतो. थोडक्यात सुरक्षेच्या दृष्टीनं एमसीबी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हल्ली इलेक्ट्रिशियन प्रत्येक खोली किंवा मोठ्या उपकरणासाठी वेगळा एमसीबी लावतात जेणेकरून घरातील इतर भागाचा विद्युत पुरवठा खण्डित होत नाही. थोडक्यात, घरासाठी एमसीबी म्हणजे एक प्रकारचा 'सेक्युरिटी गार्ड'चं !

अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगचे इतर लेखही वाचा.

[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]


© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल
 premshjaiswal@gmail.com

Friday, 14 September 2018




काही उपकरणाच्या बटनावर अशीच खूण का असते ?

दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, ऑडिओ सिस्टीम, रेफ्रिजरटर, वॉशिंग मशीन, एसी, तसेच ऑफिसमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर,  युपीएस, वॉटर फिल्टरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळत असतो. हल्ली सर्वच इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये थोडंफार इलेक्ट्रॉनिक्स भाग असतोच. 

वरील सर्व उपकरण चालूबंद करण्यासाठी एक बटन असतं.  वरील सर्व उपकरणाच्या पॉवर ऑन-ऑफ बटनाकडे बघितलं तर लक्षात येईल की काही ठराविक उपकरणाच्या बटनावरचं एक गोल मोठी रिंग ' ० 'असते आणि त्यावर ' I ' असा मार्क असतो. याचं कारण काय ?

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन प्रकार असतात, एक ऍनॉलॉग आणि दुसरा डिजिटल. ऍनॉलॉग हे जुन्या पद्धतीचे उपकरण ज्याचे सर्व पार्ट ऍनॉलॉग असतात. वाहणार करंट किंवा माहिती हि ऍनॉलॉग असते.

डिजिटल उपकरणात वाहणारी माहिती हि हाय आणि लो स्वरूपात असते.  हाय म्हणजेच वन (1) आणि  लो म्हणजे झिरो (०)   अशा स्वरूपात असते.  मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, स्कॅनर, टॅब, एलसीडी टीव्ही हे सर्व डिजिटल उपकरण आहेत. या डिजिटल उपकरणात डिजिटल आयसी, मायक्रोप्रोसेसरसारखे नाजूक पार्ट जोडलेले असतात. हे सर्व उपकरण डिजिटल आहेत हे लक्षात यावं म्हणून 'पॉवर ऑन-ऑफ' हे एकसारखं म्हणजे फोटोतं दाखविल्याप्रमाणं असतं. या सिम्बॉलमध्ये एक मोठा 'झिरो' आणि '1' दडलेला आहे.

डिजिटल उपकरण वापरायला नाजूक असतात त्यामुळं त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी या ब्लॉगचे इतर लेखही वाचा. हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.


© काॅपीराईट

- प्रेम जैस्वाल
 premshjaiswal@gmail.com

Wednesday, 12 September 2018



वस्तूच्या पॅकिंगमध्ये सिलिका जेल का ठेवतात ?


बाजारातून खरेदी केलेल्या बऱ्याच वस्तूच्या पॅकिंगमध्ये आपल्याला एक छोटासा राखाडी रंगाचं 'पाऊच' दिसतो. त्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं ' थ्रो अवे, डू नॉट इट' [फेकून द्या, खाऊ नका] . पॅकिंग उघडल्यानंतर आपण तो लगेच फेकून देतो. पण ते काय असतं? ते कशासाठी ठेवल्या जातं?

कारखान्यात पॅकिंग झालेल्या वस्तू विक्रेत्याकडून विक्री होऊन ग्राहकाच्या हातात पोहचण्यासाठी बरेच दिवस लागतात. हा काळ निश्चित नसतो. खूपदा तो माल कितीतरी महिने वा वर्ष स्टोकिस्ट, डीलरकडे पडून राहतो.  आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू आहेत त्यामुळे तापमानात सतत बदल होत असतात.  कोरडं हवामान ठीक पण ओल्या हवामानात आद्रतेमुळं वस्तू खराब होतात, बुरशी लागते.  हे टाळण्यासाठीच ओलावा शोषून घेणारी 'सिलिका जेल' त्यात ठेवलेली असते. सिलिका जेल म्हजेचं सिलिका डायऑक्साईड. तिच्या गुणधर्म असतो की ती हवेतील  ४०% आद्रता शोषून घेते. सिलिका जेल जास्तीत जास्त 4 ते 12 महिने वस्तू टिकवून ठेवू शकते.

लेदर फूटवेअर, मोबाईल, वॉचेस, इलेक्ट्रिनिक्स गॅझेट्स, थर्मास, गॉगल इ. वस्तूच्या पॅकिंगमध्ये ती आढळते.

Monday, 10 September 2018






भारतीय रेल्वे स्थानकावरील बोर्डवर समुद्रसपाटीपासून उंची (Mean Sea Level, MSL) का लिहिलेली असते?
                          
                            -प्रेम जैस्वाल

    - - - - - - - - - - - - - -

भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आपण नेहमी बघतो कि प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या बोर्डवर हिंदी आणि इंग्रजीत 'समुद्र तल से उंचाई' --- मी. असं लिहिलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी ती साईड-पोलवर सुद्धा लिहिलेली असते.

खरं तर ही माहिती आपल्यासाठी लिहिलेली नसते तर ती माहिती रेल्वेच्या मोटरमन(ड्राइवर), गार्ड  आणि रेल्वेच्या अभियंत्यासाठी खूप महत्त्वाची असते.

उदाहरणार्थ, जर मुंबईहुन नाशिक जाणारी जनशताब्दी ट्रेन 10 मीटर समुद्रसपाटीपासून पुढं 100 मीटर उंची (समजा इगतपुरी) असलेल्या ठिकाणावर चढणार असेल तर त्या ट्रेनचा मोटरमन उंचीचा बोर्ड बघून त्या रेल्वेच्या इंजिनाचा जोर वाढवेल (आपल्या भाषेत ऍक्सेकेटर!) आणि ट्रेनची गती त्याप्रमाणे नियंत्रित ठेवेल.

त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन इगतपुरीहुन मुंबईकडं उतारावर जाताना मोटरमन समुद्रसपाटीपासूनची उंची बघून किती 'ब्रेक' लावला पाहिजे याचा विचार करेल. रेल्वेला दुचाकी-चारचाकीसारखं अर्जंट ब्रेक लावता येत नाही.  त्यामुळं मोटरमनला उंची-खोली आणि अंतराचा अंदाज बांधून आधीच निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला त्या ठिकाणच्या उंचीच्या फलकाची मदत होते.

हल्ली जास्तीत जास्त भारतीय रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आहे. रेल्वे चालताना आपण बघतो कि विद्युततारा ह्या कायम रेल्वेच्या संपर्कात येत असतात. जर उंची कमी-जास्त असेल तर रेल्वेचा ताराशी व्यवस्थित संपर्कचं होणार नाही. थोडक्यात, विद्युतीकरनचं काम करताना विजेच्या तारांची उंची सगळीकडे समान राखणे आवश्यक आहे जेणेकरून रेल्वे मार्गावरील विजेच्या तारांचा रेल्वेवरील तारांशी सतत संपर्क होत राहील आणि विद्युतप्रवाह सुरळीत चालू राहील.

त्यामुळं विद्युतीकरनच काम करतानाही रेल्वेच्या अभियंत्यांना त्या त्या ठिकाणची अचूक उंची माहित असणे आवश्यक असते.

हेच कारण आहे की प्रत्येक रेल्वे स्थानकावर अशी उंची नमूद केलेली असते.

Monday, 20 August 2018

डोन्ट चीट युवर कस्टमर!



'व्हेन अ कस्टमर एंटर्स माय स्टोअर, फरगेट मी, ही इज किंग' - जॉन वॅनामेकर


लायका लॅब्स लिमिटेड. औषधाचे उत्पादन करणारी भारतातील एक नावाजलेली कंपनी. गुजरातमध्ये औषधांचं उत्पादन तर मुंबईचं उपनगर विले-पार्ले पूर्व येथील सेंटॉर हॉटेलसमोर त्यांच कॉर्पोरेट ऑफिस होतं.  औषधी उत्पादन, वितरण, विक्री आणि कार्पोरेट ऑफिस असा भला मोठा त्यांचा स्टाफ आणि पसारा होता. वर्ष १९५७ मध्ये सोव्हिएत युनियनने एक सजीवप्रयोग म्हणून अवकाशयानात 'लायका' नावाची कुत्री पाठवली होती. त्या नावावरूनच कंपनीच 'लायका लॅब्स लिमिटेड' असं  ठेवल्या गेलं, त्यावेळी असं म्हणलं जाई.

वर्ष १९९१ मध्ये भारतदेशाने विदेशी कंपन्यांसाठी उद्योगाचे द्वार खुलं केलं. त्या योगाने परदेशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यानी आपले पाय भारतीय उद्योग जगतात रोवायला सुरुवात केली. सर्वच क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ लागल्या. ज्या परदेशी कंपन्या भारतात स्वतःची गुंतवणूक करण्यास सक्षम नव्हत्या अशा कंपन्या  आपला माल सहजपणे विकण्यासाठी योग्य तो भारतीय भागीदार शोधत होत्या. अशाच एका युएसच्या कंपनीनं भारताच्या लायका लॅब्ससोबत करार केला.  त्या अमेरिकन कंपनीचं नावं होतं- एअरसेफ कॉर्पोरेशन. आणि त्याचं प्रॉडक्ट होतं- ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर.

दमा, अस्थमा, ब्रॉंक्याटीस अशा जुनाट फुफुसाच्या आजार असलेल्या रुग्णासं ऑक्सिजन म्हणजे जीव कि प्राण असतो. फुफुसाची क्षमता कमी झाल्यामुले किंवा दम्यामुळे वातावरणातील नैसर्गिक प्राणवायू ते आत घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना नियमित सिलेंडरद्वारे कृत्रिम ऑक्सिजन वापरणे आवश्यक असते. अशा मोठ्या खर्चिक ऑक्सिजन सिलेंडरला सोपा पर्याय म्हणजे 'ऑक्सिजन कोंसेन्ट्रेटर' मशीन. हा एक नवीनच कन्सेप्ट होता. अशा उपकरणाच्या भारतात विक्रीसाठी  अमेरिकन एअरसेफ कॉर्पोरेशननं लायकासोबत करार केला होता.

लायका मुळात एक ऍलोपॅथी औषध उत्पादन करणारी कंपनी. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरद्वारे विक्री करणारे सर्व कर्मचारी म्हणजे औषधी प्रतिनिधी. तर हे उपकरण म्हणजे एक तांत्रिक मशीन.  त्यामुळं ते विकण्यासाठी लायकाच्या व्यवस्थापण मंडळाने अंधेरी येथं वेगळं नवीन डिव्हिजनचं सुरु केलं. विक्री आणि तत्पर तांत्रिक सेवा मिळावी म्हणून त्या डिव्हिजनमध्ये काम करण्यासाठी सर्व अनुभवि व उच्चशिक्षित इंजिनियर निवडले गेले. ऑफिसमध्ये एक मॅनेजर, एक प्रोडक्ट इंजिनियर, एक सेल्स-सर्विस इंजिनियर, दोन ऑफिस कर्मचारी असा छोटा स्टाफ होता. मी त्यापैकीच एक. डेमो, विक्री आणि दुरुस्ती-सेवा अशी दोहेरी जबाबदारी कंपनीनं माझ्यावर टाकली होती. मोठं उपकरन, नवीन कन्सेप्ट आणि एक लाख रुपयाच्या जवळपास किंमत,  त्यामुळं त्या मशीनची विक्री म्हणजे एक दिव्य काम होतं.  रोज नवनवीन अस्थमाग्रस्थ पेशन्टला भेटणे, त्यांना कन्सेप्ट समजवणे, मग टॅक्सीमध्ये मशीन घेऊन डेमो देणे, सर्व जमत आलं कि मग किमतीची घासाघिस करून विकणे.  हे सर्व आटापिटा करून ग्राहकानं मशीन विकत घेतली तर ठीक नाहीतर मशीन घेऊन परत ऑफिस. आणि मशीन विक्री झाली तर सेवा देणं, दुरुस्ती करणं काम माझंच. नवीन कन्सेप्ट असल्यानं डेमो दाखवल्याशिवाय, १-२ दिवस वापरल्याशिवाय कोणी मशीन विकत घेतही नसे. त्यामुळे भरपूर डेमो, कितीतरी मिटिंग व्हायच्या आणि मग विक्री व्हायची.

विक्री आणि सेवा याद्वारे कंपनीला रेव्हेन्यू मिळत असतो. काहीही करून हा डिव्हिजन नफेत राहावं अशी जिम्मेदारी मॅनेजरची असते. मागील काही दिवसात आमची विक्री घटली होती. विक्री वाढावी म्हंणून बरेच प्रयत्न चालू होते.  पुढे पुढे विक्री कमी आणि ऑफिसचा खर्च वाढत गेला. बऱ्याच वेळेस आम्ही महिन्यातुन फक्त एक-दोनच मशीन विकत असू, तेंव्हा आमचे एमबीए मॅनेजर जाम चिडत असत. अशातच एक दुपारी आमच्या ऑफिसचा फोन खणखणला. पलीकडली व्यक्ती बांदऱ्याच्या पाली हिल्सहून बोलत होती. फोन करणाऱ्या युवकाला आपल्या  दमा असलेल्या वृद्ध वडीलासाठी मशीनची माहिती हवी होती.  मला आठवतं, तो एक सधन काश्मिरी मुस्लिम ग्राहक होता. पालि हिल्सला ऑफिस तर नरिमन पॉईंट येथे ओबेरॉय हॉटेलच्या शॉपिंग सेंटरमध्ये त्याचं गालीच्या, स्टोन, पर्ल्सचं मोठं दुकान होत. म्हणून एक लाखाची मशीन घेनं त्याच्यासाठी काही मोठा व्यवहार नव्हता. त्यांनं ऑक्सिजन मशीनबद्दल भरपूर विचारपूस करून एक डेमो देण्याची विनंती केली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अंधेरीहुन टॅक्सीमध्ये नवीन डेमो मशीन घेऊन मी पाली हिल्सला पोहचलो.  सुरुवातीस रुग्णाच्या नातेवाईकास मी कन्सेप्ट समजावून सांगितला, मग डेमो दिला.  खात्री व्हावी म्हणून त्यांनी दोन दिवस मशीन वापरून पाहतो अशी इच्छा दाखवली. ठरल्याप्रमाणे त्यांना आम्ही ती मशीन दोन दिवस वापरू दिली.  तिसऱ्या दिवशी मी पुन्हा पाली हिल्सला गेलो. त्यांना मशीन, कन्सेप्ट सर्वकाही आवडलं पण गाडी किंमतीवर आडली. एक तास किंमतबद्दल घासाघीस झाली पण ती चर्चा निष्फळ ठरली.  बोलता बोलता त्या युवकांनं आमच्या विक्री पश्चात सेवेची विचारपूस केली. आमच्या सेवेत त्रुटी नव्हती म्हणून मी त्याला मशीन वापरणाऱ्या ग्राहकांची सर्व नाव, फोन नंबर दिले. आपण आमच्या जुन्या ग्राहकाशी बोलून घ्या असं मी सांगितलं.

पुढं आमच्या आणि ग्राहकामध्ये  २-३ मिटिंग झाल्या, किमतीची घासाघीस झाली पण  खरेदीची ऑर्डर काही मिळत नव्हती. काही ग्राहक खूपच चिकित्सक, 'हार्ड-नट अँड डिफिकल्ट टू क्रॅक' असतात, हा त्यापैकीच एक होता.  शेवटचा प्रयत्न करावं म्हणून आमच्या मॅनेजरने कंपनीच्या व्हाईस-प्रेसिडेंटकडून एक खूपच स्पेशल किंमत दिली, तरी तो ग्राहक टसचा मस झाला नाही. शेवटी वैतागून आम्ही त्या ग्राहकांचा पिच्छा सोडून दिला.

साधारण पंधरा दिवसानंतर त्याच ग्राहकांचा मला फोन आला. 'आमच्याकडं तुमच्याच कंपनीची एक मशीन आहे, ती व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही सर्व टूल घेऊन घरी या, आम्ही होईल ते सर्विस चार्ज देऊ'. मी लगेच हा कॉल घेतला. पाली हिल्सला गेलो. तिथे एक जुनी मशीन होती. मी दिलेल्या एका जुन्या ग्राहकाकडून त्यानं ती सेकंड-हॅंड मशीन कमी किमतीत विकत घेतली होती. मी दिलेल्या ग्राहकाची यादी, फोनचा त्यानं योग्य फायदा करून घेतला होता.  त्याला फक्त खात्री करावयाची होती कि ती मशीन सुस्थितीत आहे की नाही. मी सर्व बाबतीत ती मशीन चेक केली. ती मशीन उत्तम स्थितीत होती आणि त्यात काहीही दोष नव्हता. मी मॅनेजरला विचारलं 'मशीन चांगली आहे मग चेकिंग चार्ज किती लावू?'  या ग्राहकाने नवीन मशीन घेण्यासाठी मॅनेजरच् खूप डोकं खालं होतं आणि शेवटी सेकंड-हॅंड मशीन घेतली त्यामुळे ते खूपचं जास्त चिडले होते. आता त्या वैतागाचा बदला घ्यायची त्यांची इच्छा होत होती. मला त्यांनी सूचना दिली की- एक मोठा पार्ट खराब आहे असं सांगून दे आणि ₹ २१०००/-असा खर्च सांग. थोडक्यात मॅनेजरने मला खोटं बोलून ग्राहकाला मोठा चुना लावायला सांगितलं होतं. खाजगी कंपनीत वरिष्ठ सांगतील ती पूर्वदिशा. मी मॅनेजरनं जे सांगितलं तसंच केलं. मशीनचा ऑक्सिजन वेगळा करणारा महाग पार्टच खराब आहे आणि तो पार्ट बदलावा लागेल असं ग्राहकाला खोटं सांगितलं. ग्राहक खर्चासाठी तयार झाला. मी ती मशीन दुरुस्तीसाठी ऑफिसला घेऊन आलो.

मुळात ती मशीन अगदी चांगल्या स्थितीत होती. त्याला काहीच करायची आवश्यकता नव्हती.  फक्त फाकफुक स्वच्छ करून, पार्ट बदलण्याचं खोटंनाट नाटक करून ₹२१०००/- च बिल मला त्या ग्राहकाला ठोकायचा आदेश होता. मी आज्ञाधारकानं चार दिवसानंतर ती मशीन आणि बिल ग्राहकाला पोहचत केलं. ग्राहकांनी लगेच मला ₹२१०००/- चा चेक दिला. चेक घेऊन ऑफिसला आल्यानंतर आमच्या मॅनेजरचा चेहरा बघण्यासारखा होता. ते खूपच खुश होते. ' कैसे आया उट पहाड के निचे' म्हणत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पण आतून मला हे पटणार नव्हतं. माझं मन मलाच खात होतं कारण हा चेक मला चुकीच्या मार्गाने मिळाला होता. त्या अर्थाला काहीच अर्थ नव्हता. पण मॅनेजर महाशय जाम खुश होते. एक अध्याय संपला होता. तो दिवस आनंदात गेला.

दुसऱ्या दिवशी नियमितपणे ऑफिस सुरु झालं. सर्व सुरळीत चालू होतं.  सकाळी पुन्हा फोन खनंखनला. पलीकडं तो कालचाच ग्राहक होता. आता काय नवीन भानगड म्हणून मी मॅनेजरला विचारलं. आता त्या ग्राहकांच म्हणन होतं की काही तांत्रिक कारणानं त्यानं दिलेला चेक वटणार नाही, तेंव्हा चेक परत करून तुम्ही रोकड-कॅशच घेऊन जा.  आता तर मॅनेजर महाशय जास्तच खुश. कारण त्याकाळी चेक लवकर वटत नसे शिवाय डिसऑनरची भिती असतेच. 'शुभम शिघ्रम', मी लगेच कॅश घ्यायला निघालो. त्यांनी मला ओबेरॉय हॉटेलच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बोलावलं होतं. माझ्या खुशीचा ठिकाणा नव्हता. मी लगेच त्यांच्या शॉपमध्ये पोहचून चेक त्याच्या सुपूर्द केला. हसत हसत त्यांनी चेक घेतला आणि शांतपणे मला परत जाण्यास सांगितलं. आधी मला काही समजलंच नाही आणि मी त्याना कॅश देण्याची विनंती केली. त्यांनी शांतपणे माझ्यासमक्ष तो चेक फाडला आणि तुम्हाला मी काहीच देणार नाही असं सांगून मला परत जाण्यास सांगितलं. त्यानंतर तो जे बोलला त्यानं मी अगदी थंडच झालो. त्याच्या एसी शॉपमध्ये मला घाम फुटल्यासारखं होतं होत. डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी आल्यासारखं झालं. जो पार्ट बदलण्यासाठी मी मशीन घेवून गेलो होतो त्या पार्टला त्या ग्राहकाने आधीच फुल्लिची छोटी  मार्किंग करून ठेवली होती. मशीन परत आल्यानंतर त्यांना तो पार्ट आहे त्या स्थितीतच आणि जुनाचं आढळला. आपल्याला मूर्ख समजून हि लोकं आपला गैरफायदा घेत आहेत, फसवत आहेत म्हणून त्यानं हा किस्सा सरळ कंपनीच्या व्हॉईस-प्रेसिडेंटला कळवला होता. एखाद्या चोराला रंगेहात पकडल्यानंतर जे घडत ते सर्व माझ्यासोबत घडत होतं. डोकं सुन्न झालं होतं. मी कसाबसा ऑफिसला पोहचलो. कॅशच्या प्रतीक्षेत असलेल्या आमच्या मॅनेजरला मी संपूर्ण हकीगत सांगितली. आम्हाला हसावं कि रडावं काहीच कळतं नव्हतं. लायकाने चेअरमन श्री नानुभाई गांधी एक तत्वनिष्ठ गुजराती होते. मूल्य आणि तत्वाशी तडजोड त्यांना पटत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत कंपनीचं नाव खराब होनं त्याना जमणारं नव्हतं. बिझनेस एथिक्स, मूल्य त्यांना जास्त प्यारे होते. आमच्या या कृष्णकर्त्यांनं लायकाच्या नावाला धब्बा लागून त्याचा वाईट परिणाम विश्वासावर चालणाऱ्या  मोठया औषधी-वैद्यकीय क्षेत्राला झाला असता.

आता हे प्रकरणं सावरनं खूप कठीण काम झालं होतं. खाजगी कंपनीत यशाचे सर्वच बाप असतात पण एखादी वाईट घटना घडली कि त्याची कुणीही स्वतःवर जिम्मेदारी घेत नाही, ते अपत्य अनाथ असतं. कंपनीचे वरिष्ठ खूप चिडले होते. हे 'अपत्य' कोणाचं जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरु केली. वातावरण गरम झालं होतं. कुणाची दांडी उडते कि काय अशी भीती होती. एक खोटं लपवण्यासाठी कितीतरी खोट्या कुबड्या लागत असतात. मग नको ती कथा सांगून आम्ही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण सत्य हे पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्यासारखं असतं. कितीही खोलात ढकललं तर वर तरंगतच! या प्रकरणाचा 'बोलविता धनी' आमचे मॅनेजर होते त्यामुळे त्यांच्याच नावावर हे बिल फाडल्या जाणार होतं. जे अपेक्षित होतं तसंच झालं. पुढील काही दिवसातं पुन्हा असं एक प्रकरण घडलं. मी माझ्या मूल्य आणि तत्वाशी चिपकून राहिलो. मॅनेजरनं नको असे काही बोल्ड निर्णय घेतले. नाईलाजानं कंपनीला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला.

लायकामध्ये आम्ही जो खेळ खेळला तो व्यवहार-उद्योग क्षेत्रातला काही नवीन प्रकार नव्हता. सेवा-सर्विस क्षेत्रात अशा घटना हमखास घडतं असतात, आजही घडतात. कार्यालयीन कम्प्युटर , युपीएस, इन्व्हर्टर असो की घरगुती मोटर,एसी, रेफ्रिजरेटर किंवा अजून इलेक्ट्रिक रिपेअर असो,  ग्राहकाच्या अज्ञानाचा दुरुस्तीवाले हमखास फायदा घेत असतात. अशा फसवणुकीच्या बातम्या आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असतो. अर्थात याला काही अपवादही असतात. पण काही चिकित्सक, जिद्दी ग्राहक ग्राहकमंचामध्ये आवाज उठवून कंपन्यांना अद्दल घडवत असतात.  ग्राहकाला सरंक्षण मिळावं म्हणून शासनानं कायदा करून ग्राहकास अभय दिलं आहे, त्यामुळं ग्राहक आज खरोखरच राजा आहे.

व्यवस्थापन शास्त्राच उच्च शिक्षण-एमबीए- केलेले तरुण-तडफदार युवक कंपन्यात काम करताना खूपचं वेगळ्या तोऱ्यात वागतात. आपल्या व्यक्तिमत्व, भाषा प्रभुत्वाने ते इतरांवर राज्य करण्याचा, हाताखालील कर्मचाऱ्यांना कमी लेखण्याचा, ग्राहकाला फिरवण्याचा प्रयत्न करत असतात. अस करत असताना कधी कधी ते ग्राहकाला कमी लेखण्याची मोठी चूक करतात, आणि फसतात. जास्त शिक्षण व अनुभवाचा अभावमुळं कदाचित हे घडतं असावं. एमबीएमध्ये शिकलेल्या मॅनेजमेंट टेक्टीजपेक्षा आई-वडील तसेच प्राथमिक शिक्षकाकडून मिळालेलं जीवनमूल्याच शिक्षण व संस्कारशिक्षण अति महत्वाचं असतं. मूल्य हे वैश्विक असतात. सर्व जगात ते तेव्हढेच महत्वाचे असतात. खोटं बोलू नये, इतरांचा आदर करा, कुणास कमी लेखू नका, फसवू नका, दुसऱ्यासाठी खड्डा कराल तर तुम्हीच पडाल इ. हे सर्व आपण लहानपणी कथा, पाठयपुस्तकातील धड्यामार्फत शिकत आलो. पण एमबीए शिकल्यानंतर मॅनेजमेंट टेक्टीज पुढे आणि जीवन उपयोगी मूल्य मागे पडतात.  दिलेलं सेल्स, रेव्हेन्यू टार्गेट पूर्ण करण्यासाठी मग हे युवक रेशनल-इमोशनचा विचार न करता वाटेल ते गोंधळ करताना दिसतात.

वरील प्रकरणात मॅनेजरने समंजसपणाने आपल्या रागाला आवर घातला असता तर पुढचं अघटिक घडलचं नसतं.  समाजात फिरताना सर्व ग्राहक एक सारखेच मिळतील असं शक्य नाही.  भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर अशक्यच. आणि उद्योग म्हंटल तर भिन्नभिन्न व्यक्ती, समाजातील ग्राहकांशी एकरूप होऊन, त्यांच्या फ्रेक्युन्सी, वेवलेन्थशी जुळवूनच व्यवहार करायचा असतो. कोणताही व्यवहार घडताना कंपनी, ग्राहक, समाज आणि सर्वांचाच फायदा होईल अशेच निर्णय घ्यावे लागतात. कुणीही आर्थिक, भावनिक दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.

व्यवसाय, उद्योगात सेल्स विभागच असा असतो की ज्याचा कायम बाहेरील जगाशी दररोज संपर्क होतं असतो. सेल्स-सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कंपनीचा खरा चेहरा असतात. ते जसं वागतात, बोलतात, राहतात यावरूनच ग्राहक  त्याच्या कंपनीचा अंदाज बांधू शकतो.  उद्योग ही वीरांची भूमी असते आणि तर मार्केटिंगची टीम एका सैनिकाप्रमाणे असते. विक्रीच्या युद्धात कंपनीसाठी लढणारे ते खरे यौध्ये असतात. विक्री, सेवा करून ते कंपन्यांची उलाढाल, पत वाढवत असतात.  कंपनी नफ्यात येत. अवॉर्ड, बोनस, मेडल सारखे सन्मान सेल्सटिमसाठी जास्त असतात. त्यामुळं बाहेरच्या जगाशी संवाद साधणाऱ्या विक्री-सेवा प्रतिनिधींचा व्यवहार चांगला असावा लागतो.

हे एक प्रकरण माझ्या आयुष्यात मला खुप काही शिकवूनं गेलं. अर्थात शिकणं हे ऐच्छिक असतं. मी शिकलो आणि पुन्हा अशा चुका टाळत गेलो. आम्ही स्वतःला खूप ग्रेट समजतो पण जगात शेरला सव्वाशेर मिळतातच. वरील प्रकरणात आम्ही दुसऱ्यासाठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यात आम्हीच अलगद जाऊन पडलो होतो. व्यवसाय उद्योगात लबाडी चालत नाही. चालली तरी जास्त दिवस टिकत नाही. उद्योग-कंपन्या बंद पडण्याचं हे एक कारण असू शकतं. एक लबाडी लपवण्यासाठी कितीतरी जास्त खोटं बोलावं लागतं. कधी कधी ते खूप घातक ठरतं.

खुल्या अर्थव्यस्थेमुळे परदेशी कंपन्या भारतात येऊन त्यांनी येथील देशी कंपन्यांना ग्राहकहिताचं महत्व दाखवून दिलं.  त्यामुळं ग्राहकसेवामध्ये अफाट बदल झाले आहेत. एकही ग्राहक दूर जाणे त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे ग्राहकांच खरंच भलं व्हावं असा सात्विक विचार करून कंपन्यानं आपलं व्यवस्थापन बदललं आहे. त्याचा त्याना फायदाचं होत आहे. कंपनी मग ती उत्पादन क्षेत्रातील असो की सेवा, ग्राहकाबद्दल ती खूप जागरूक असते.  एकही असंतुष्ट ग्राहक त्यांना नको असतो. तसंच ग्राहकाच्या तक्रारी त्या सकारात्मकतेने घेत असतात कारण या तक्रारीवरून त्या वस्तू आणि सेवेतील त्रुटी कंपन्यांना माहित पडतात व त्यात नियमित बदल केले जातात. त्यामुळे खास ग्राहकांची काळजी घेण्यासाठी कंपन्या एक स्वतंत्र विभाग-कस्टमर केअर सेंटर तसेच त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी कॉल सेंटरची व्यवस्था असते.

आज गरज आहे ग्राहक राजाने जाग होण्याची. दिवस भरात आपल्याकडं मोबाईल, पेपर, टीव्ही आणि इतर माध्यमाद्वारेद्वारे अनेक ऑफरचं जाळं फेकल्या जातं.  रात्री-अपरात्री कधीतरी येणारे दुसऱ्या देशातील कॉल्स हे काळजीपूर्वक विणलेल एक जाळचं असतं.  थोडक्यात 24 X7 आपल्या सभोवताली कंपन्यांनी ऑफरच जाळं टाकलेलं असतं. त्या जाळयात अलगद शिकार अडकवण्याचं अतोनात प्रयत्न कंपन्या करत असतात. तेंव्हा ग्राहकाने सद्सदविवेक बुद्धीनं विचार करून, चिकित्सक होऊन आपण फसवलं जावू नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

आता थोडक्यात महत्वाचे. दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तू व सेवा उपभोगत असतो. बऱ्याचदा उपभोगत असलेल्या वस्तूमध्ये आपल्याला दोष आढळतो. अशी तक्रार आपण स्थानिक ऑफिसला कळविली असता तेथील कर्मचारी चालढकल करतात. त्यांच्याकडून पाहिजे तशी सेवा वा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही. अशा वेळेस ग्राहकांनी खचून न जाता आपली लिखित सविस्तर तक्रार त्या कंपनीच्या वरिष्ठाना निदर्शनात आणने कधीही चांगले.  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कंपनीन भरपूर अधिकार दिलेले असतात. सर्व कायद्याविषयी ते जागरूक असतात. पुढील कायदेशीर कार्यवाही टळावी म्हणून वरीष्ठ अधिकारी ग्राहकाला पूर्णपणे संतुष्ट करतात. थोडक्यात हा फायदेशीर मार्ग असतो.

©प्रेम जैस्वाल 9822108775
( हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)
         - - - - - - - - - - - - -