ओळखलं का....
नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस होता. नवीन वर्ष आणि रविवारची हक्काची सुट्टी असा 'सोने पर सुहागा..' योग क्वचितच येत असतो. यावर्षी तो योग जुळून आला होता. सुट्टीमूळे भरभरून शुभेच्छा द्यायला-घ्यायला सर्व हात मोकळे होते. 'आली त्याला पाठविली' शुभेच्छा शेअर फॉरवर्ड करण्याचा सोपा कार्यक्रम दिवस भर चालू होता.
आपण सर्व उत्सवप्रेमी. या वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकं जरा जास्तच उत्साही होते. सुट्टीमुळे लोकांनी निरनिराळे बेत आयोजित केले होते. नवीन वर्षाचे नवीन संकल्प करणाऱ्याचा आज पहिला दिवस! कुणी ट्रेकिंग, कुणी भेटीगाठी तर काही नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या पार्टीच्या तयारीला लागले होते. आमचं मात्र असं काही नियोजन नव्हतं. थोड पुस्तक वाचून दुपारची थोडी झोप एव्हढचं. सकाळपासून मोबाईलवर कॉल चालू होते अर्थात ते शुभेच्छा देणाऱ्याचे. अतिप्रिय लोकांना फॉरवर्डेड ग्रीटिंग पाठवणं कोरडी औपचारिकता पूर्ण केल्या सारखं वाटतं. त्यामुळे दुपारपर्यंत मोबाईलवर शुभेच्छाची देवान-घेवान चालू होती.
झोप लागणार तेव्हड्यात तीला एक कॉल आला. शुभेच्छा देणारं कुणी असेल म्हणून तीनं फोन उचलला. पलीकडला व्यक्ती "'मॅडम हैप्पी न्यू इअर, मला आज तुम्हांला भेटायचं आहे. मी तुषार, तुमचा खूप जुना विद्यार्थी. जरा आठवा मॅडम तुम्ही मला गणित शिकवलं. बघितलं तर नक्की ओळखसाल. माझं नाव तुषार...!"
पंचवीस वर्षात आमच्या अकॅडमीमध्ये बरेच विद्यार्थी शिकून गेलेत. वयानुसार चेहऱ्यात खूप बदल झालेले असतात. दहावीत शिकलेला मुलगा वीस वर्षानंतर शिक्षण, नोकरी आणि लग्न अशी प्रगती करून एक-दोन मुलांचा बाप झालेला असतो. त्यामुळे जास्त वर्षानंतर असे कुणी विद्यार्थी भेटले तर सहसा त्याच्या बालपणीचा चेहरा आम्हाला आठवनं शक्य नसतं. शाळेत जाणारे विद्यार्थी जेंव्हा ''कम्प्लिट मॅन' बनून सरळ 'ओळखलं का मॅडम/सर?' म्हणून समोर उभे राहतात तेंव्हा खूप पंचाईत होते. यावर एकमेव उपाय - 'हो रे ओळखलं तुला!' असं खोटं खोटं बोलायचं. त्यालाही थोडं बरं वाटतं. मग आपण बसायचं आठवत! थोड्या वेळाने लिंक लागून जाते. वयानुसार स्मृतीत फरक पडतो, तो असा.
काही महिन्यापूर्वी याचं तुषार व्यक्तीचा फोन आला होता. कुठे तरी गुजरातला चांगल्या कंपनीत नोकरीं करत आहे असं तो बोलला होता. तुषार असं आपलं नाव सांगून त्याने त्याचा थोडा परिचयसुद्धा दिला होता. कधी तरी येऊन भेटेन असही तो बोलला होता. पण आज तो औरंगाबादला होता त्यामूळे चार वाजता आम्ही त्याला घरी बोलावील. ठरल्याप्रमाणे तुषार घरी आला. नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आम्ही त्याचं स्वागत केलं. सोफ्यावर बसताच पानावलेले डोळे पुसत तो बोलत होता. त्याचे भावनिक अश्रू बघून आम्ही सुद्धा थोडं बुचकल्यात पडलो कि आम्ही असं काय केलं. भरलेला बांध फुटावा तसा तो सुरु झाला -
"खरं तर मॅडम मी तुषार नाही. मी माझी खरी ओळख तुमच्याकडून लपवून तुमच्याकडे शिकायला आलो होतो. तुमच्याकडे आलो तेंव्हा मी गावाकडे शाळेत सहावी शिकून मी शाळा सोडली होती. घरची परिस्थिती बरी नव्हती. पैशाचा चनचन होती. परिस्थिती बघून मला भावानी औरंगाबादला बोलावलं. बुद्धिमता आणि चुनुक ओळखून भावाने मला सरळ बाहेरून दहावीची परीक्षा देण्याचा सल्ला दिला. सहावी शिकून सरळ दहावीचा अभ्यास करून परीक्षा देने हे मला तरी दिव्य काम वाटत होतं. मी औरंगाबादला दोन-तीन ठिकाणी ट्युशनसाठी चौकशी केली पण जास्त फि मूळे शिकवणी लावू शकलो नाही. शेवटी तुम्ही मला शिकविण्याची तयारी दर्शविली. माझी पार्शवभूमी तुम्हांला कळू नये म्हणून मी ओळख लपवून तुमच्याकडे शिकायला येत होतो." यशाच उंच शिखर सर केल्यानंतर माणसात सत्य सांगायचं बळ निर्माण होतं. तसा तो बोलत होता. त्याच्या या बोलण्यामुळे आम्हाला थोड धक्का बसला.
"सहावी ते दहावी पास! हे कसं काय ?" हा प्रवास मला माहित करायचा होता.
"त्या वेळेस फॉर्म १७ भरून सरळ दहावीची परीक्षा देता येत होती. एका शिक्षणअधिकाऱ्याने त्या बाबतीत मला थोडी मदत केली. सातवी, आठवी आणि नववी हे तीन वर्ष मी शाळेत नं गेल्यामुळे मला दहावीचं गणित मुळीच जमत नव्हतं. अगदी उणे उणे अधिक सुद्धा जमत नव्हतं. तुमच्याकडे मी अगदी बेसिक पासून गणित शिकत दहावीचा पूर्ण गणित शिकुन गेलो. घरच्या परिस्थितीमूळे तुम्ही मला कधीही फि मागितली नव्हती. जसी जमेल तशी मी देत होतो."
" दहावी नतंर पुढं काय शिकलास ?"
"दहावी पास झाल्यामुळे मी डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकलो. पुन्हा नशिबी डिप्लोमाचं मॅथ आलं. त्यासाठी मी पुन्हा तुमच्याकडे यायचो. डिप्लोमा नतंर मला महिंद्रा, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यामध्ये नोकरी मिळाली. दोन कंपन्याच्या अनुभवानंतर अहमदाबाद जवळील मारुती सुझुकी ऑटोमोबाईल कंपनीमध्ये मला चांगली नोकरीं मिळाली. मागे वळून पाहिलं तर वाटतं तुम्ही त्या वेळी मॅथ शिकविल नसतं तर आज मी नोकरी न करता मला शेतात काम करावं लागलं असतं."
"आता तू शिक्षण सोडलं का ?"
" नाही. डिप्लोमाच्या आधारे मी बिट्स पिलानी मध्ये बी. टेक. इंजिनियरिंग शिकत आहे. साढे तीन वर्षात माझं बी. टेक. सुद्धा पूर्ण होईल." मला समजलं. एव्हड्यावरच तो थांबणार नव्हता पुढे शिकुण यशाच अजून उंच शिखर गाठण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात दिसत होती.
सहावी वर्गात शाळा सोडणारा विद्यार्थी आज चक्क बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि, पिलानी या देशात नावाजलेल्या प्रीमियर शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होता. त्याची जिद्द, मेहनत आणि धडपड कौतुकास्पद होती. अगदी रुळावरून घसरलेली शिक्षणाची गाडी त्याने आपल्या जिद्द आणि मेहनतीने पूर्वपदावर आणली होती. विशेष म्हणजे त्याच्या शैक्षणिक प्रवासात आमच्याकडून जो थोडाफार हातभार लागला त्याची त्याला जाण होती. आम्ही त्याला विसरलो होतो पण तो विसरला नव्हता. याची उतराई म्हणून तो खास भेटीला आला होता. घरातील चांगल्या संस्काराशिवाय हे शक्य नाही.
शिक्षण क्षेत्राची अवकळा आणि विद्यार्थ्यांवर होतं असलेले संस्कार याबद्दल जास्त लिहायची गरज नाही.
कृतज्ञता व्यक्त करने तर दूर हल्ली शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुचं नावसुद्धा माहित नसतं. तशी त्यांना गरजही वाटत नाही. भरपूर पैसा व सर्व सुखसोयी पायाशी लोळत असल्यामुळे गुरु-शिष्य हे नातं निर्माण होताना दिसत नाही. आपण जे कष्ट केले ते मुलांना नको म्हणून पालक त्यांच्या पंखात उंच उडण्याच बळसुद्धा निर्माण होऊ देत नाही. 'नवीन पिढी, जनरेशन गॅप' आपले विचार जुनाट आणि बदलाच्या नावावर पालक सर्व काही धकवून घेत असतात. अशात एखाद्या खेड्यातील विद्यार्थी शिक्षकांचा शोध घेत येतो तेंव्हा अंधारात एक आशेचा किरण चमकल्यासारखा भास होतो. आपल्या चांगल्या कामाची ती पावती असते. या सारखा दुसरा आनंद नसतो जो पैशात मोजण्यासारखा नसतो.
"तू आमच्याकडून ओळख लपविली, मग तुझं खरं नाव किंवा ओळख आता तरी सांग?" माझी उत्सुकता त्याचं खरं नाव माहित करण्यात होती.
चहाचा कप टेबलावर ठेवत त्याने लगेच खिशातून नोकरी करत असलेल्या कंपनीचा आय-कार्ड काढला. त्यावर नाव प्रिंट केलं होतं - शिवाजी धुपे ! ती एक ग्रेट भेट होती. नवीन वर्षाचा हा अनुभव येणाऱ्या काळात आम्हाला चांगले कार्य करण्याचे बळ देणारा होता. एक आठवण म्हणून त्यांनी आनलेल्या मोठया पुष्पगुच्छासोबत आम्ही फोटो काढला.
"आमच्यामुळे तुझं भलं झालं असं तुला वाटत असेल तर तू सुद्धा तूझ्या जीवनात सभोवतालच्या लोकांना अशीच मदत कर बाबा" मी सल्ला दिला. प्रगतीचा आलेख असाच चढता रहावा म्हणून पुढील वाटचालीबद्दल थोडं मार्गदर्शन आणि शुभेच्छा घेऊन त्याने निरोप घेतला.
© प्रेम जैस्वाल पेडगावकर
ह. मु. औरंगाबाद
९८२२१०८७७५
Very good information mama
ReplyDelete