ad1

Sunday, 25 May 2025


                  





लाल पटका ( आमचा बाप )

काही व्यक्तींची देहबोली खूप प्रभावी असते. त्यांच्या चेहऱ्यावरीलं हावभाव, देहबोली सतत संवादाचे काम करत असतात. आमचे पिताश्री शंकरलाल म्हणजे 'दादा', असंच एक व्यक्तिमत्व होतं. साडे-पाच फुटापेक्षा जास्त उंची, मध्यम कडक आंगकाठी. पांढरा सदरा-धोती, डोक्यावर लाल फेटा चढवल्यानंतर त्यांचा गोरापान चेहरा भलताच उठून दिसायचा. तशी आमच्या भितीत वाढ व्हायची. जोरात चालतांना करsss करsss असा आवाज करणारे चामडीजोडे त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावायचे. सभोवतालच्या चार गावातील लोकांत त्यांच्याविषयी आदरयुक्त भिती होती. एका हाताने बंद छत्री टेकवत जेंव्हा हि स्वारी झप झप झोकात चालायची तेंव्हा आदराने लोकांचे हात 'राम राम ठोकण्यासाठी' वर व्हायचे. त्यांना बघताच गल्लीबोलीत पत्ते, पैशाचे डाव खेळणारी पोरंसोर मंडळी धूम ठोकून पसार व्हायची. कारण चालत चालता चामडीजोडे सैल करून मारण्याच खास कसब त्यांच्याकडे होतं! शिवाय त्यांच्या भारदस्त आवाजात एक दरारा होता.  लहानपणापासून आम्ही वडिलांना 'दादा'च म्हणायचो ?  कदाचित गावातील इतर समाजातील मंडळी त्यांना 'दादा' नावांनी हाक मारत असावी, तेच पुढे चालत गेलं. हा लेेेख खास त्यांंच्या विषयी.

निजामच्या काळात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांच शिक्षण मोडी वाचण्या-लिहिण्यापूरतच झालं होतं. पण जीवनाच्या विद्यापीठातलं त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि जीवनमूल्याचे संस्कार एखाद्या पदवीधराला लाजवणारे होते. 'मग स्वतः जुजबी शिकून तुम्ही आमच्या शिक्षणाच्या पाठी का लागलात?'  या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एका घटनेची आठवण करून सांगितलं- त्याकाळी क्वचितच गावात, पोलीस निरीक्षक(चीफ साहेब), तहसीलदार, बीडीओ अशी अधिकारी मंडळी भेट द्यायची. अशा दुययम, तृतीय वर्ग कर्मचाऱ्यांचा खेडेगावात प्रचंड दरारा असायचा. गावकरी आपल्या परीने त्यांची चांगली सोयसाय करायचे. सर्व गाव त्यांना बघायला गोळा व्हायचा.  मग ती अधिकारी मंडळी जास्तीच ऐटीत येऊन बाजेवर चहाचे फुरके मारत लोकांवर इंग्रजी शब्दफेक करायची. बिचाऱ्या गावकऱ्यांना त्या शब्दातलं अ कि ढं कळत नसे. पण साहेबांच्या विंग्रजीने ते खूपच प्रभावित होतं.  बाप रे, साहेब खूपच हुशार आहेत असं त्यांना वाटे. इंग्रजी म्हणजे हुशार हा गैरसमझ तसा जुनाचं.  साहजिकच अशा घटनेने आमचे दादा बेचैन होतं. या घटनेने दादाच्या मनात शिक्षणाविषयी जिद्द निर्माण केली. शिक्षण सर्वोपरी आहे हे ते समजून गेले. दूरदृष्टी निर्माण होते ती अशी. मग काय, आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत आम्हा भावंडाना शिकविण्याची जिद्द सुरु झाली. गावातून तालुकाच्या ठिकाणी मग औरंगाबाद असं आम्ही सर्व शिक्षण घेत गेलो. त्यांच्या या ध्यासामुळे कठीण परिस्थितीत चुलत-सख्खे असे आम्ही सात भावंड उच्चशिक्षित झालो. एक जिल्हा न्यायाधीश, दोन प्राध्यापक, एक डॉक्टर, एक एम.ए., मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर सर्वात लहान भाऊ कृषी अभियांत्रिकी पदवीधर झाला. शिकलेल्या सुना येऊन 'एक उच्चशिक्षित कुटुंब' अशी समाजात वेगळी ओळख निर्माण झाली. अर्थात हजार वस्तीच्या छोट्या पेडगावासाठी हा बदल खूपच मोठा होता. समाज आणि सभोवतालच्या चार गावाला प्रेरित करणारं एक ऊर्जास्रोत होतं. अर्थात, मुलांना पारंपरिक शेती-धंद्यास न जूपता उच्च शिक्षण दिल्याचा दादांना प्रचंड अभिमान होता आणि तसं ते मोकळं बोलूनही दाखवायचे. विशेष म्हणजे , खूप शिकलेले मुलं म्हणजे मोठया पदावर नोकरी म्हणजेच अफाट पैसा, असे त्यांचे संकुचित विचार मुळीच नव्हते. धनसंपत्तीमुळे नाही तर कुटुंबाच्या उच्चशिक्षणातील प्रगतीमुळे दादांचा दरारा वाढतंच गेला. आज हा शिक्षणरूपी वटवृक्ष खूप बहरला आहे. पारंब्या फुटाव्या तसे कुटुंबातील अनेक मुलं-मुली डॉक्टर, इंजिनियर होऊन फक्त अर्थार्जनच्या पाठी न धावता समाजसेवा करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने घरातील मुलांनी फक्त सामान्य महाविद्यालयात प्रवेश नं घेता  आयआयटी, एम्स, आयआयएम, ऐनआयटी, बिट्स पिलानी सारख्या संस्थेत गरुड झेप घेतली आहे. मग या वृक्षाच्या कलमा इतर ठिकाणी लावल्या गेल्या, त्याही वृक्षात रूपांतर होऊन वाढल्या.

असं घडत असताना आमच्या कुणाच्याही शाळेत त्यांनी भेट दिलेली मला आठवत नाही. मी चौथ्या इयतेत शिकत असतानाच फक्त एक प्रकरण मला आठवतं - घटक चाचणीत भरपूर लिहूनही आमच्या मुख्याध्यापकांनी मला कमी गुण दिले होते. माझं हे गाऱ्हाणं कुठून तरी दादांना कळालं. दुसऱ्या दिवशी मोठे गुरुजी (मुख्याध्यापक) आणि दादाची सहज भेट झाली. गप्पाच्या ओघात दादाने माझं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडलं. तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी माझी कान उघाडणी केली,  'प्रेम्या, एक पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर गेला' या एका वाक्याच्या उत्तरा ऐवजी तू त्या पक्षास इतरत्र फिरवून पाच वाक्य लिहिलेत म्हणजे जास्त गुण मिळत नाहीत'!  ललीत लेेेखन म्हणजे 'वित भर जीवाला हातभर झगा!' कदाचित माझ्या लिखानाच बीज बालपणीच पेरलं गेलं असावं.

दादा वैद्य नव्हते पण गावी-परगावी कुणी आजारी आहे असं माहित होताच हातातील काम बाजूला सारून ते आधी धावायचे. त्यासाठी नात्याचे बंधन नव्हते. लगेच 'तू घाबरू नकोस तुला काही होणार नाही. वेडा आहेस का, थोडी हिम्मत राख' असा हक्काचा धीर देत त्यांचा हेकळणी, तुळस, सारख्या औषधी झाडपाल्याचा इलाज सुरु व्हायचा. पूर्वी गावात डॉक्टर-दवाखाने नव्हते. शेत-घरकाम करताना गावकऱ्यांना मार लागायचा, जख्म व्हायची.  कधी केसतोड तर कधी हाड टीचायचे. गरीब गावकऱ्यांना शहरात जाऊन इलाज करणे शक्य नसायचे त्यामुळे ते दुखणे अंगावर काढीत. दादाला हे माहित पडलं की ते स्वतः रोग्याकडे धावायचे. लगेच एखादी काच फोडून ते त्यातील पु काढून, स्वच्छ करून त्यावर झाडपाला लावून जख्म बांधून टाकायचे. बघणाऱ्याला ते किळसवानं वाटायचं पण दादांसाठी ते नेहमीच काम होतं. अशा रुग्णसेवेत त्यांचा हातखंडा होता. तूटलेलं हाड बांबूच्या कम्बड्या बांधून ते जोडलं जायचं. कालांतराने तो रोगी बरा होऊन कामाला जायचा. काय मिळत असावं त्यांना अशा सेवेत? पण ते करायचे.

त्यांचं हे रुग्णप्रेम फक्त मनुष्यजातीपुरत मर्यादित नव्हतं. एखादी गाय, म्हैस किंवा बैल प्राणि आजारी आहे हे माहित पडलं की ते जिद्दीने पेटून उठायचे. मग इतर कामे आपोआप बाजूला, प्राथमिकता फक्त तो रोगी. माझ्या बालपणीची ती घटना. भर दुपारी शेतातून वाघा गडी धावत आला होता. कंठया बैलाला पान लागला होता. आमच्या गावच्या भाषेत पान लागने म्हणजे सर्पदंश. बातमी एकूण दादाला चलबिचल होताना मी पाहिलं होतं. दुपारी गड्यानी कंठयाला बैलगाडीत टाकून घरी आणलं. धोतर खोसून गड्याला सोबत घेऊन दादाचा झाडपाल्याचा इलाज सुरु झाला. हळूहळू गावातील लोक जमा झाले. खंडीभर गुरात लाल्या-कंठया सर्वांची आवडती जोडी. बालपणी मी सुद्धा ती जोडी हाकली होती.  कंठया गेला तर जोड फुटणार होतं. धांदीन पाय बांधलेल्या कंठयाच तोंड जबरीने फाकवून त्यात काढे, औषध टाकले जात होते. कंठया दुःखाने तडफत होता. शेवटी जे नको होतं ते झालं.  विष कंठ्याच्या अंगात भिनत गेलं.  सूर्य मावळला होता, कंठयाने शेवटचा श्वास घेतला. कंठया गेला. बैलाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत दादा हरले.  दुःख अनावर होऊन दादा ढसढसा रडले. तो दिवस मला आजही आठवतो. मनाने पाषाणासारखा कठोर मनुष्य रडू शकतो, मी ते पहिल्यांदा पाहिलं होतं.

शेतीची कामं आणि इतर व्यवसायामुळे ते कधीही घरी बसलेले आम्हाला आठवत नाही. सुर्योदयापूर्वी बांड्या घोड्यावर ती स्वारी परगावी निघून जायची. ते परत येईपर्यंत आम्ही झोपी जायचो.  बालपणीचे आम्हा भावंडाचे तंटे प्रकरण 'दादाला सांगू का?' या एका वाक्याने संपायचे. त्यामुळे त्यांच्यासमोर बसून मनमोकळं बोललेलं मला आठवत नाही. दोन वेळेस मार खाल्याचं मला नक्की आठवतं. ते घरात तर आम्ही बाहेर किंवा ते परगावी तर आम्ही घरात.  गावपंचायत वगळता त्यांना गावातील राजकारणात विशेष रुची नव्हती. क्वचीत गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच नेमणुकीविषयी ते आपलं मत मांडायचे. 

त्यांना सर्वात जास्त तिटकारा होता तो अंधश्रद्धा, कर्मकांड आणि त्यायोगे होणाऱ्या भक्तांच्या लुटीचा. देव मंदिराच्या नावाखाली होणारी लुट त्यांना आवडत नसे. काम सोडून रामाच्या पाठीमागे धावणारी जनता त्यांना आवडत नसे. 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' किंवा 'काय काशी करिती गंगा। भीतरी चांगा नाहीं तो।।’  असंच त्यांचं म्हणणं होत. पंढरपुर, तिरुपती बालाजी सारख्या दर्शनात लोकांना लुबाडणारी मंडळी, तेथील अस्वच्छता बघून त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर ते अध्यात्मापासून थोडं दूरचं गेले.

कर्तृत्त्ववान पूर्वजांची महती काही ओळीत सामावने कठीण जाते.  दोन ओळीच्या मध्ये सुद्धा बरंच काही बोलण्यासारखं असतं. खूप खस्ता खालेल्या असतात त्यांनी. प्रसंगी अपमान सहन केलेला असतो. अशिक्षित वातावरणात 'शिक्षण' असा चाकोरी बाहेरचा विचार करणे तसं सोपं नव्हतं. एक प्रकारचा जोखीम पत्करल्यासारखा तो प्रकार होता. क्वचीत थोडे मागे ओढण्याचे प्रयत्न झालेले असतात. शोकांतिका अशी की हे सर्व जोपर्यंत आपल्यावर तशी वेळ येत नाही तो पर्यंत कळत नाही! 

आज त्याच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गावात किती तरी तरुण मंडळी उच्चशिक्षित होऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात नोकरी करत आहेत. साहजीकच त्यामुळे आज गाव शिक्षित होऊन सुधारणा होत आहे. गरज आहे की गावातील तरुण मंडळींनी इतरांना उच्चशिक्षण घेण्यास मदत व मार्गदर्शन करण्याची. जेंव्हा केंव्हा गावात शिक्षणाविषयी चर्चा होईल, स्व. शंकरलाला म्हणजे आमच्या दादाच नाव आवर्जून घेतल्या जाईल. थोडी का होईना, 'मागे कीर्ती उरावी' ती अशी.   त्यांच्या पालखीचे भोई होऊन त्यांनी शिकविलेल्या जीवनमूल्यावर आणि दाखविलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली.

© प्रेम जैस्वाल, पेडगावकर,
    ह.मु. औरंगाबाद, मो. ९८२२१०८७७५

26 comments:

  1. खरंच दादाची आठवण येते ...

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांकण, मी त्यांना 1974/76 या काळात पाहिले.ओमप्रकाशजी ( न्यायाधिश ) व दत्तप्रकाशजी( प्राध्यापक) माझे मित्र.आजही मैत्री कायम आहे. त्यांच्या रूमवर असतांना काका आले की आम्ही पसार व्हायचो.त्यांच्या दरडावून केलेल्या चौकशीला आम्ही भीत असू.मुल वाया जाऊ नयेत यापोटी ते खूप काळजी घेत.जबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्व.
    त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
    ---नरेंद्र गावडे.निवृत्त मुख्य व्यवस्थापक, स्टेट बॅक.

    ReplyDelete
  3. श्री ओमप्रकाश जैस्वाल सरांनी ही लिंक पाठवली..आवर्जून ही पोस्ट वाचली..
    शब्दात किती सामर्थ्य आहे.. जज साहेबांच्या वडिलांचे व्यक्तिमत्त्व मार्मिक पणे मांडले आहे..
    जीवनाचे सोने करण्यासाठी कर्त्या पुरुषाला झिजावे लागते, हेच खरे..
    श्री शंकरलाल जयस्वाल यांच्या पवित्र स्मृतीस माझा नमस्कार..

    राजेंद्र श्रीरंग बडे
    अंधेरी, मुंबई..

    ReplyDelete
  4. �� khup Chan lihile.

    ReplyDelete
  5. आजोबांच्या आठवणी अस्मरणीय आहेत त्यांच्या विचारावर चालणारे अथवा त्यांच्या विचाराला आत्मसात करून आपल्या गावाचा अथवा आपल्या परिसराचा विकास आणि माझ्या परिसराचा नावलौकिक झाले पाहिजे असे विचार करणारे लाल पटका यांना खऱ्या अर्थाचे विनम्र अभिनंदन म्हणजे आपल्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीला सामान्य मिळाला पाहिजे न्याय हक्क अधिकारासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे स्वर्गीय शंकरलाल जयस्वाल आजोबा यांना त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेखन. वडील खरेच स्तुतीस पात्र आहेत.

    ReplyDelete
  7. Awesome personality. I never seen him, but by reading this I must say, he was very much aware about education and its importance. His efforts change the complete life of his next generation. ��������

    ReplyDelete
  8. मामाजी लेख वाचून मला अश्रुअनावरण झालं खरंच नानांची आज खूप आठवण येतेय,आम्ही लहानपणी शाळा सुटली की पैसे खेळायचो तेवढ्यात नानानी पाहिलं की आहे तेथूनच बुट फेकून मारायचे एक वेळ तर त्यांनी चक माझे वडील(नामदेवराव गोपा राठोड)यांच्याकडे तक्रार केली अन् माझे पैसे खेळणंच बंद झालं. नाना च आदर्श घेऊन आमच्या वडिलांनी रोजमजुरी करून शाळा शिकवली त्याचाच फलित म्हणून मी आज रयत शिक्षण संस्था सातारा येथे शिक्षक म्हणून नोकरी करतोय. नाना इज ग्रेट पर्सन 🌹🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  9. ग्रेट सर 🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. विनम्र अभिवादन नानाजी 🙏🙏
    मामा आपका लिखाण बहोत अच्छा लगा 🙏

    ReplyDelete
  11. सही बात लिखी आपने मामा जी

    ReplyDelete
  12. खूप छान लिहल

    ReplyDelete