ad1

Monday, 28 August 2023


        
           

                                 जीवनमूल्य

जीवनमूल्य वैश्विक असतात. मग भारतात असो की जगात चोरी न करणे, खोटे न बोलणे, वरिष्ठांचा आदर करणे, भ्रष्टाचार न करणे, कुणाला न फसवणे किंवा प्रामाणिक वागणे इत्यादी मूल्य सर्वथा सारखेच असतात. सर्व धर्म हि चांगली शिकवण देत असतात. पण काही लोक टोकाची भूमिका घेऊन 'माझा धर्म चांगला तुझा अत्यन्त वाईट' असा फरक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं थोडं चूकतचं.  सर्व धर्मात माणुसकीचे, जीवनमूल्याचे संस्कार असतातच कदाचित त्यामुळेच आज सर्व धर्म टिकून आहेत. 

दोन वर्षापूर्वीची गोष्ट. कार दुरुस्तीसाठी मी गाडी घेऊन एका गॅरेजमध्ये गेलो होतो. गॅरेजचे चाऊसभाई माझ्या नेहमीच्या परिचयाचे आणि मनमोकळे इसम. त्यांच्याकडे माझी गाडी तर चांगली दुरुस्त होतेच शिवाय त्यांच्या सोबत गप्पा मारण्यात मला खुप आनंद होतो असं ते म्हणतात, तसा त्यांनाही आनंद होतो असं ते म्हणतात.

 'अरे साब गाडी होती रहेगी आप मेरे साथ बैठो' मग कटिंग चहा पीत आमच्या गप्पा रंगतात. गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक मजेदार किस्सा सांगितला, तो असा-

भल्या पहाटे एक धनाड्य व्यापारी आपल्या सामानासह रेल्वेस्टेशनवर उतरतो. एक ऑटोरिक्षावाला त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडतो. ऑटोवाला जेंव्हा परत फिरतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की त्या व्यापाऱ्यांची एक बॅग तर ऑटोरिक्षातच मागे पडून आहे. तो म्हातारा ऑटोवाला ती बॅग घेऊन परत त्या व्यापाऱ्याच्या घरी जातो. ती बॅग बघून त्या व्यापाऱ्याला खूपच मोठा धक्का बसतो. धक्क्यातून सावरत तो ऑटोवाल्याचे खूप खूप आभार मानतो. 'किती इमानदार आहेस तू'  म्हणून त्याच्या समोरच तो ती बॅग उघडून त्यात किती नोटा आहेत ते त्याला दाखवतो. शिवाय त्याच्या इमानदारीचा इनाम म्हणून त्याला तो नोटांचे एक बंडल देऊ करतो. ऑटोवाला त्या बंडलाला शिवतही नाही आणि म्हणतो की 'मी मेहनतीचं खातो आणि फुकटाची कुणाची काही दमडीही घेत नाही.' तो व्यापारी खूप आग्रह करतो पण तो ऑटोवाला रुपयांचे बंडल घेतच नाही. शेवटी तो व्यापारी त्या रिक्षा ड्रायव्हरला विनंती करतो 'पैसे घेऊ नको पण थोडा नाष्टा तरी करून जा '  तो आपल्या नोकरांना सांगतो की मी आंघोळीला जात आहे आणि तुम्ही या ऑटोवाल्याला छान पोटभर नाष्टा, चहा करूनच पाठवा.

आंघोळ करून काही वेळाने तो सेठ बैठकीत परततो. तो पर्यंत ऑटोवाला निघून गेलेला असतो. नेहमीप्रमाणे तयार होताना हाताला बांधण्यासाठी तो सेठ घडी शोधतो पण त्याला ती घडी सापडत नाही. आताच ठेवलेलं एव्हडं महाग घड्याळ कुठं गेलं म्हणून तो शोधाशोध सुरु होते. शेवटी न राहून तो घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करतो. फुटेज पाहून त्याला मोठा धक्काचं बसतो. त्या फुटेजमध्ये तोच इमानदार ऑटोवाला त्याचं सेठची किमती घडी उचलताना दिसतो. आता तर तो सेठ जाम बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न पडतो- मी स्वतःहून त्याला बक्षीस म्हणून एक लाखच बंडल देत होतो तो घेण्यास त्याने चक्क नकार दिला, एव्हडी इमानदारी आणि माझ्या माघारी हे फक्त तीस हजाराचं जूनं घड्याळ त्याने का बरं चोरलं असेल? मटका, जुगार सारख्या अनेक दोन नंबरच्या धंद्यात गुंतलेल्या त्या सेठला गेलेल्या घड्यालाच काहीच दुःख होत नव्हतं पण त्या इमानदार ऑटोवाल्याच्या विकृत स्वभावाबद्दल जाणून घेण्याची त्याची इच्छा झाली. त्याने लगेच नोकराकरवी शोधा शोध करून त्याला पकडून आणलं. 'रोख रक्कमेच मोठं बक्षीस न घेता तू माझी घडी का उचललीस, चोरी का केलीस? पूर्ण बॅगच हाडपली असती तर उरलेलं आयुष्य तू ऐषोआरामात जगला असता! का हाथीप्रमाणे तुझेसुद्धा दाखवायचे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत?'  अशा अनेक तीक्ष्ण प्रश्नाचा त्यावर भडिमार केला.

न राहून शेवटी त्या ऑटोवाल्याने घड्याळ  उचलण्यात कारण सांगितलं - 'सेठ, मैं ठहरा एक मामुली गरीब ऑटोवाला. मेरे भी कुछ वसूल है, मैने कभी किसिके मुफ्तके पैसे नही लिये। आपके यहां आने तक मैं पाक इमानदार हि था।  लेकीन जैसेही मैने आपके घरका खाना खाया मेरी नियत बदल गयी! शायद ये खाने मे ही कुछ दोष होंगा? असं सांगून तो सेठच्या पाया पडला आणि घडी परत करून माफी मागितली. 'मी तुला माफ केलं आता जा.'  परत जाण्यासाठी त्याने आपला ऑटो गर्रकन फिरवला. ऑटोच्या पाठीमागे स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं,

       किसिके हराम के कमाये पैसे का खाओगे तो
       वो हरामीपणा तुम्हारे अंग में भी उतर जायेगा।

हे वाक्य वाचून तो सेठ थंड पडला. जे सांगायची त्या ड्रायव्हरची हिम्मत होत नव्हती ते ऑटोने सांगून टाकलं होतं. त्याच्या 'अर्थाला अर्थ नव्हता' हरामाच्या कमाईचं अन्न खाल्याने ऑटोवाल्याच्या मनातसुद्धा बेईमानी आली होती. असंच तो सुचवून गेला. त्यामुळेच किती पैसा कमावला पेक्षा कसा कमावला याला खूप महत्व आहे. 

मग या कथा किंवा घटनेपासून काय बोध घ्यायला हवा ? अन्न हे पूर्णब्रम्ह, पण त्यावर त्या त्या ठिकाणचे बरे वाईट संस्कार होत असतात. फक्त अन्न नाहीतर आपल्या सभोवतालच्या सर्वच लोकांचे, वातावरणाचे संस्कार आपल्यावर होत असतात.  यालाच तर संगतगुन म्हणतात. स्वच्छ मंदिर किंवा देवालयात गेलो तर मन प्रसन्न होऊन आपल्या मनात चांगले विचार येतात. काही ज्ञानी लोकांच्या सहवास लाभला तर आपण बरंच चांगलं शिकतो. या उलट काही वाईट संगत लागली की त्याचा परिणाम आपल्यावर होतोच. आपला स्वभाव, विचार करण्याच्या पद्धतीत त्यामुळे बदल घडतो. याच कारणामुळे समाजात वाईट, चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांचे गट निर्माण होतात.

एखाद्या लग्न-समारंभात हे बघून आश्चर्य होईल की, सारख्या प्रवृतीची लोकं एका समूहात जमलेली असतात.  वाईट प्रवृत्तीची माणसं एक वेगळा ग्रुप करून एखाद्या वस्तूबद्दल चर्चा करत असतात. राजकारणी लोकांचा वेगळा ग्रुप,  तर थोडे शिक्षित लोकं एका वेगळ्या समूहात बसून आपल्या हिताच्या गप्पा मारत असतात तर चांगले विचारवंत असतील तर ते एखाद तत्वज्ञान, सामाजिक किंवा आर्थिक  समस्येवर आपली मत मांडताना दिसतात.  इंग्रजीत एक सुंदर म्हण आहे,

         'बर्डस ऑफ लाईक फेदर, फ्लॉक टुगेदर'

© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)









1 comment:

  1. Very true. You are identified by the people you are surrounded with.

    ReplyDelete