ad1

Thursday, 10 August 2023

गुजरा हुवा जमाना आता नही दोबारा...

 गुजरा हुवा जमाना..

सोपं गणित आहे मित्रांनो, चालू वर्ष २०२३ मधून  दहावीचं वर्ष १९८५ वजा केले तर ३८ वर्षाचा काळ मागे पडतो!  एक तप म्हणजे बारा वर्ष या हिशोबाने तब्बल तीन तपापेक्षा जास्त काळ लोटला आहे आपण सर्वांची ताटातूट होऊन !

शाळा सोडते वेळीस आपण सर्वच दहावीत होतो.  त्या काळची दहावी आजच्या सारखी ९९% गुण देणारी नव्हती. डिस्टिन्शन तर दूर ऑल क्लियर उत्तीर्ण होण्याचे वांधे होते. दहावी परीक्षेच्यापूर्वी आपल्याला 'पुढील दिवे' लावण्यासाठी मोकळा करणारा ' निरोप समारंभ' झाला होता कि नाही मला नेमकं आठवत नाही. मानवी मेंदूने किती आठवणी साठवून ठेवायच्या शेवटी त्यालाही मर्यादा आहेतचकी.  नुकतच टळलेलं करोना सारखं मोठं संकट झेलून, त्यातून शाबूत वाचून आठवणीचा उजाळा करण्यासाठी आपण पुन्हा भेटत आहोत हे ही काही कमी नाही.  आपले बरेच वर्गशिक्षक आणि वर्गमित्र आज हयात नाहीत याच मला दुःख होतं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी पुढे लिहितो. 

दहावीनतंर एखाद्या माळेचा धागा तुटून मणी विखरून पांगून जावे तसं या जगात आपण विखरलो गेलो होतो.  आणि त्या विखूरलेल्या काही मोत्यापैकी काहींना पुन्हा एका माळेत ओवण्याचं मोठं काम आपल्यापैकी काही मित्र करत आहेत. त्यांच्या या कार्यास माझा सलाम व शुभेच्छा.

थोड्या आठवणी.....

आमची तुकडी दहावी-ड होती. एक तर जिल्हा परिषद शासकीय शाळा त्यात 'ड' तुकडी त्यामूळे हिंगोली शहरात वावरतांना किंवा ट्यूशनमध्ये आम्हाला कुणी जास्त भाव देत नसे.  जनमानसात ड म्हणजे ढ काही असाचं एक समज होता. आणि तो गैरसमज मुळीच नव्हता. दहावी बोर्डात फक्त ११ विद्यार्थी पूर्ण विषयात उत्तीर्ण झाले होते! मित्र हो, या रेकॉर्ड ब्रेक निकालावरूनच आपण अंदाज बांधू शकता कि आम्ही आणि आमचे प्रिय वर्गमित्र किती अभ्यासू होते! थोडक्यात आमची माळ फक्त मोत्याची नव्हती तर त्यात 'हिरे, मानके, पाचू'  सारख्या मौल्यवान खड्यांचा समावेश होता.

मला आठवतं, मराठी (कि इंग्लिश) भाषेचा क्लास होता. आमचे वर्गशिक्षक सर नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते.  काही वेळातच आमच्या क्लासच्या बॅकबेंच मंडळीने वेगवेगळ्या प्राण्याचे आवाज काढायला सुरुवात केली. सर जाम चिडले रागावले कि काही वेळ मुलं गप्प बसायची. शिकवायला सुरुवात केली कि पुन्हा विविध प्राण्याचे आवाज सुरु. मग सर रागावून दात खाली ओठ दाबून 'मूर्ख, गटाराचे किडे' असं बरंच काही बोलायचे. एव्हडं बोलुनही काही फरक पडत नसे. विद्यार्थी मनावर घेत नाहीत म्हणून ते आमची भविष्यवाणी सांगायचे , 'मूर्खांनो, बोर्डाच्या परीक्षेत बघेणं मी काय दिवे लावतात ते! पस्तीस पस्तीस पस्तीस पस्तीस बावन बावन, घ्या पेढे! असंच घडणार आहे तुमच्या सोबत!' काही मिनिटे क्लास शांत व्हायचा कि पुन्हा पाठीमागून बारीक वेगवेगळ्या प्राण्याचे आवाज! विशेष म्हणजे कुणाचंही नाव कुणी सांगत नसे.

रोजचाचं वैताग म्हणून एके दिवशी देशमुख सरांनी आमच्या ड वर्गाची तक्रार हेडमास्टर श्री सेवेकर सराकडे केली. थोड्याच वेळात ते हेडमास्टर  सराना वर्गात घेऊन आले. काही मिनिटे पिन ड्रॉप सायलेंस! अगदी काहीच घडलं नाही असं. रागावलेले हेड-मास्टर किंचितशः नाकात बोलल्या सारखं आमच्या क्लासवर बरसले,'कोणं रे तो मूर्ख? तुम्ही शिकायला येता कि गोंधळ घालायला? ' असं म्हणत त्यांनी सर्वांना केनचा प्रसाद वाटला. अर्थात तो आमच्याही वाट्याला आला, काहीही उपदव्याप नं करता. तसं उपदव्याप करण्यासाठी  लागणार धाडस आमच्यात नव्हतंच. 'पुन्हा आवाज केल्यास मी केनने खूप मारीन' अस दम देऊन ते बाहेर गेले. दोनच मिनिटात 'खिखीखी...' पुन्हा तोच प्रकार सुरु झाला. थोडक्यात अशा भन्नाट वर्गमित्रासोबत आम्ही तीन वर्ष शिकलो. त्यामुळे  मी आधीच नमूद केलं कि आमच्या क्लासमध्ये फक्त हिरे नव्हते.

आजही हिंगोली शहरामध्ये फिरतांना बऱ्याचदा बहूविध शाळेसमोरून जावं लागतं. थोडी दुरावस्था झालेली ती इमारत, प्रांगण आणि  फाटक बघून काही क्षणासाठी का होईना मन भुर्रकनं भूतकाळात जातं. त्या काळी खूप मोठी वाटणारी ती वास्तू आज खूप छोटी वाटते. कधी काळी लांब वाटणारं अंतर आता अगदी जवळ वाटतं. फ्लॅशबॅक बघावा तशा एक एक करून अनेक आठवणी चित्ररूपात डोळ्यासमोर येतात. मग ती दुपारची सुट्टी आठवते.  मधल्या सुट्टीतील दहा-वीस पैशाचे खरमुरे-बटानेसुद्धा त्या आठवणीतून सुटत नाही. अगदी वीस पैशाची मीठ टाकलेली ती एक माप जांभळं किंवा ती गोडआंबट बोरं सुद्धा आठवतात.  ढगळा कुर्तापायजमा घातलेला 'खरमुरे-बटाने, बटाने-खरमुरे'  म्हणतं विकणारा तो लंगडा मामू मला आजही आठवतो.

दहावीनंतरच्या ताटातुटीनतंर काही ठराविक वर्गविद्यार्थी मित्रांची कुठनं कुठे भेट व्हायची. मग त्या वर्गमित्राकडून इतर काही मित्राची तुटकशी माहिती मिळायची, पण ती सांगोपांगी. मधल्या काळात इंटरनेट फेसबुकमूळे काही जण संपर्कात आलेत.  प्रचंड उत्सुकता असूनही या मधल्या काळात काहीच कळायला मार्ग नव्हता.  पण मित्रांनो आता असं नाही. ' कालाय तस्मै नमः' फक्त नाव जरी माहीत पडलं तरी गुगलच्या कृपेनें काही क्षणात त्याची किंवा तीची कुंडली समोर येते ती सुद्धा फोटो सहित!  खरं तर आपण सर्वांनी आपल्याला पुन्हा जोडण्यास मदत करणाऱ्या इंटरनेट फेसबुक व्हाट्सअप सारख्या नवीन तंत्रज्ञानाचे आभार मानायला हवे.

या 'गेट टुगेदर'च्या निमित्ताने सर्वांना एक दुसऱ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे साहजिक आहे. वयानुसार प्रश्नाचं स्वरूपसुद्धा बदलतं.  या ३८ वर्षाच्या काळात काय काय घडलं असेल? दहावीनतंर कोण वर्गमित्र कुठं स्थायिक झाला? त्याचा पुढील  शैक्षणिक प्रवास कसा झाला असेल?  तो पुढं शिकला कि काही कारणाने त्याचा शैक्षणिक प्रवास खुंटला? तो 'खूपच अभ्यास' करायचा मग त्याने किती दिवे लावले? आणि शेवटी त्यांची मुलं काय करत असतील अशा अनेक प्रश्नाची उकलं होईल.  अर्थात शिक्षणाचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा काहीही संबंध नसतो हे सर्वांना समजलंच असेल. 

आता थोडं स्वतःबद्दल...

मी एक साधारण निरूपद्रवी विद्यार्थी होतो. आमचं वर्गातील अस्तित्व हजेरीच्या वेळीस 'यस सर' एव्हडं म्हणण्यापूरतं काय ते इतरांना जाणवायचं. वर्गात इतर वर्गमित्राप्रमाणे मस्ती किंवा गोंधळ घालण्या इतकी डेअरिंग किंवा धाडस माझ्यात नव्हतं.  दहावीला जेमतेम ६८ टक्क्यानी मी उत्तीर्ण झालो.  नतंर अकरावी सायन्संसाठी सरस्वतीभुवन महाविद्यालय औरंगाबादला प्रवेश घेतला. हिंगोलीहुन एसबी औरंगाबादशी जुळवून घेतांना बराच त्रास झाला. आम्ही आधीच बुजरे, धाडस कमी असल्याने तालुक्याचा ठिकाणाहून औरंगाबादसारख्या शहरात शिकतांना बरंच दडपण यायचं. हॉस्टेलमधील बरेच विद्यार्थी विविध ठिकाणाहून दहावीला मेरिटमध्ये उत्तीर्ण होऊन आलेले होते.  महाविद्यालयात वावरतांना कॉन्व्हेंट मधून आलेली मुलं-मूली, इंग्लिशमध्ये शिकविणारे उच्चशिक्षित प्राध्यापक, मोठया बिल्डिंग्स इत्यादी गोष्टीच प्रचंड दडपण यायचं. भाषा सोडता सर्वच प्राध्यापक इंग्लिशमध्ये शिकवायचे त्यामुळे सुरुवातीचे किती तरी तास सर भौतिकशास्त्र शिकवत आहेत का गणित कि रसायनशास्त्र हे आम्हांस नाही कळायचं.  वर्गमित्रांशी संवाद साधतांना चेमिस्ट्री, टॉरक्यू अशी आमची तारांबळ उडायची. काही मराठी मिडीयमचे विद्यार्थी आमच्याही पुढं होते. ते सरळ सरळ माले (male), फेमाले(female) असा उच्चार करायचे. इतरांच्या शुद्ध इंग्लिशपुढं आमच्या अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी मेडीयमचा टीकाव लागत नसे. पुढं डिक्शनरीने आमचं काम सोपं केलं.

एसबी सायन्स कॉलेजचा पहिला तास मला अजूनही आठवतो.  आमची 'सी' तुकडी होती. मुला-मुलींनी खचाखच भरलेला क्लासमध्ये सर शिकवत होते. चालू तासात थोडा भितभीत मी आत शिरलो.  कोणत्या तरी मागच्या डेस्कवर जाऊन पटकन बसावं म्हणून मी पाठीमागे जात होतो. पुढं बसावं तर आपल्याला सर प्रश्न विचारतील ही भिती होती. थोडं मागे जाऊन डावीकडे नजर फिरविली तर एका डेस्कच्या खिडकी जवळच्या कोपऱ्यात माझाच दहावी 'ड' वर्गाचा मित्र हुसेन बसलेला दिसला. बघून खूपचं आश्चर्य आणि आनंद झाला. आता कुणी तरी आपल्या शाळेचा, अगदी जवळचा भेटल्यामूळे बरीच भिती कमी झाली. तो पहिला तास कोणत्या विषयाचा होता आणि सर काय शिकवत आहे हे मला इतरांना विचारावं लागलं होतं.

आता थोडं फास्ट फॉरवर्ड. बारावी सायन्स नतंर पीसीबी मध्ये ठीकठाक गुण मिळुन मी पास झालो.  शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचा फॉर्म भरण्यास उशीर केल्यामुळे शेवटी पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग केली. चार वर्षाच्या इंजिनियरिंग नतंर दोन वर्ष पुन्हा औरंगाबादला व्यवसाय केला आणि त्यानंतर सात वर्ष मुंबईच्या कंपन्यामध्ये जॉब केला. जॉबच्या निम्मिताने बऱ्याचदा इज्राईल किंवा अमेरिकन लोकांसोबत काम करण्याचा योग आला.  दोन वर्ष औरंगाबादला असतांना मी पार्टटाईम एमपीएस्सीची परीक्षा दिली होती. माझ्यासोबतचे तीन बॅचमेट डेप्युटी कलेक्टर झालेत. त्यापैकी एक -वर्षा ठाकूर आज लातूरची कलेक्टर आहे. सतत बदलीवर असणारे आयएएस तुकाराम मुंढेचे वडीलबंधू ऍडिशनल कलेक्टर श्री अशोक मुंढे(निवृत्त) हे माझे एमपीएससी बॅचमेट होते, असो. 

नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने हिंगोलीला नेहमी चक्कर व्हायची, आजही होते. त्यामुळे हिंगोलीच्या काही मित्राबद्दल थोडी फार  माहिती मिळायची. वैद्यकीय उपकरणाच्या विक्री-सेवा व्यवसायाच्या निम्मिताने मी महाराष्ट्रभर फिरलो. व्यवसायानिमित्त देशाच्या बऱ्याच मिलिटरी हॉस्पिटल जसेकी चंदीमंदिर, दिल्ली, पुलगाव, देवळाली, डिआरडिओ ला सेवा देण्याचा योग आला. काही दिवस जवानासोबत राहण्याचा योग आला. सात वर्ष जीवाची मुंबई करून १९९८ नतंर मी मुंबईला 'गुड बाय' करून औरंगाबादला स्थायिक झालो.थोडक्यात पेडगावसारख्या छोटया खेड्यातून निघून हिंगोली-औरंगाबाद-पुसद-औरंगाबाद-मुंबई-औरंगाबाद असा प्रवास करत माझं जहाज औरंगाबादच्या बंदरावर स्थिरावलं.

कुणाचंही जीवन 'संथ वाहे कृष्णामायी...' प्रमाणे संथ नसतं. आणि तसं असायलाही नको. उंच लाटांना तोंड देत नाही तो पर्यंत आपल्याला संथ पाण्याचं महत्वसुद्धा कळत नाही.  माझ्या या छोट्याशा प्रवासात बरीच मंडळी भेटली तसे बरे-वाईट अनुभव आलेत. त्याचा हिशोब काही पानं खरडून मांडता येणार नाही. 

जो पर्यंत पोटा-पाण्याचा प्रश्न मिटत नाही तो पर्यंत  माणसाला इतर उद्योग सुचत नाही . कुणी म्हंटल आहे 'भुके पेट न होवे गोपाला'. औरंगाबादला स्थायिक झाल्यानंतर वाचन्याची आवड निर्माण झाली. सततच्या वाचनानतंर वाचनाच्या पेरणीतून पुढं लिहिण्याचं पिक बहरलं आणि ते बहरत गेलं.  काही दिवस ब्लॉगर आणि नतंर विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर एका मराठी दैनिकांसाठी मी स्तंभलेखन केलं. हल्ली 'स्मार्ट उद्योगमित्र' या एमसीईडी च्या उद्योगाविषयींच्या मासिकामध्ये मी अधून मधून लिहीत असतो, असो. शेवटी एव्हढच सांगावं वाटतं -

 ‘‘जो जो जयाचा घेतला गुण। तो तो गुरु म्यां केला जाण। गुरुसी आले अपारपण। जग संपूर्ण गुरु दिसे।।ज्याचा गुण घेतला। तो सहजें गुरुत्वा आला। ज्याचा गुण त्यागरूपें घेतला। तोही गुरु झाला अहितत्यागें॥

आता पर्यंतच्या प्रवासात ज्या गुरूंनी आम्हाला शिकवलं किंवा ज्या वर्गमित्राच्या सहवासात आम्ही घडलो किंवा न बिघडलो त्यांचे मानावे तेव्हढे आभार कमीच!

या व्हाटसप ग्रुपमध्ये आपल्या जुन्या फोटोला जोडूनच एक नवीन फोटो पोस्ट केला तर इतरांना समजण्यास थोडी मदत होईल.  त्यासोबतचं थोडी स्वतःविषयी माहिती दिली तर अजून चांगलं. त्याचा फायदा असा कि २६/२७ ला  'भेटणारा किंवा भेटणारी' विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही 'तीच किंवा तोच' याची इतरांना खात्री होईल. तीन तपानंतरची ती भेट, उगीच गोंधळ उडायला नको!


प्रेम बडपसरिया(जैस्वाल) दहावी -ड 
ह.मु. औरंगाबाद, मो.९८२२१०८७७५
[ ESPEE INFOTECH & ACADEMY]

No comments:

Post a Comment