अस्खलित भाषा आणि शिष्टाचार
खरं तर आज लिखानासाठी माझ्याकडे विषयच नव्हता. कोणता विषय निवडावा सुचत नव्हतं. आज लिखाणात 'खाडा' पडतो की काय अशी भिती होती. पण सकाळीच एक छान पोस्ट आली. ती गावरान शब्दाविषयी होती. गावखेड्यातील गावठी 'खुरपणे, डवरने, इतवार, मोट.....इत्यादी शब्द आज लोप पावत आहेत, कुठेही ते उच्चारले जात नाही असा त्या लिखाणाचा सूर होता. ज्या लेखकांनी (नाव नव्हतं) लिहिला निश्चितच त्यांची नाळ गाव-खेड्याशी जुळलेली असणार. त्याच पोस्टचं विरजण घेऊन मी आजचा लेख लिहीत आहे. अर्थात माझ्या लिखानाच बरंच श्रेय त्यांना जातं.
मानव उत्क्रांती आणि विकासाचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की आदिवासी हे येथील मूळ निवासी आहेत. ते जंगलात वस्ती करून राहत तेंव्हा सुद्धा त्यांची एक बोलीभाषा होती. जगण्याचे साहित्यच कमी होते त्यामुळे त्यांच्या शब्दाला मर्यादा होती. कालांतराने मानवजात गाव खेड्यात वस्ती करून शेती करू लागली. शेतीसाठी लागणारे पशुजीव, अवजार, साहित्य त्यामुळे नवनवीन शब्दाची उत्पत्ती झाली. वखरने, जुंपणे, नागरने या शब्दाची निर्मिती शेतीमुळेच. ज्यांची नाळ गाव शेतीशी जुळलेली आहे त्यांना असे शब्द रोजचेच आहेत, नवीन नाहीतच. शहरात अशा साहित्याची गरज पडत नाही त्यामुळे ते उच्चारण्याची गरज नाही.
आता प्रश्न पडतो की गावखेड्यात बोलली जाणारी भाषा शुद्ध की अशुद्ध? माझ्या मते भाषा ही भाषाच असते ती शुद्ध किंवा अशुद्ध नसते. 'कोस-कोस पर पानी बदले, चार कोस पर वाणी' प्रमाणे वीस-तीस मैलावर ती बदलत जाते. इतर ठिकाणी ती अशुद्ध वाटत असली तरी त्या त्या ठिकाणी ती भाषा शुद्धच असते. महान संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम किंवा संत तुलसीदास, कालिदास या महान संताच साहित्य वाचलं तर शब्द आणि भाषेतील भिन्नता लक्षात येईल. विविध संस्कृतीने नटलेल्या भारत देशात साधारण सतराशे बोली भाषा आहेत. ज्या समाजात आपण रमतो, जगतो त्या ठिकाणच्या भाषेशी, व्याकरणाशी जुळवून घेत असतो. शेती आणि त्यावर पोसणारा आदिवासी, कुणबी समाज यांच्यापासून आपण दूर गेल्यामुळे आज हे शब्द ऐकावयास मिळत नाही.
आधुनिकीकरणामुळे नांगरने, वखरने, पाण्याची मोट ची जागा आधुनिक सॉफ्टवेर बेस्ड ट्रॅकटरसारख्या उपकरनाने घेतली आहे त्यामुळे नांगराच्या फाळाची आणि बैलाच्या कासऱ्याची गरज उरली नाही. उत्तम शेतीपासून उत्तम चाकरमाण्याच्या जगात गेलेल्या लोकांच्या चर्चेत त्या शब्दाचा अंतरभाव नसतो.
खेड्यातील गावरान, अस्सल 'जनरीक' शब्द सहसा शहरी चर्चेत नसतात. याच दुसरं मोठं कारण म्हणजे दिखावा. 'लुकिंग गुड, लुकिंग बॅड' च्या नादात काही लोकं अशा शब्दाचा प्रयोग करनं टाळतात. 'लोकं हसतील, खेडूत म्हणतील' अशी धाकधूक असते. आपण खूपच सॉफिस्टीकेटेड आहोत, सुसंस्कृत असण्याचा उसन अवसान आणतात. अस्सल शब्दाऐवजी ते संभाषणात दोन 'विंग्रजी' शब्द घुसाडून आपण मॉडर्न आहोत असा आव आणतात.
वापरात नसलेली लोखंडी वस्तू गंज चढून जशी नाहीशी होते त्याच प्रमाणे भाषा जर वापरात नसेल तर ती लोप पावते. भाषा टिकून राहण्यासाठी तिचा वापर आवश्यक आहे. कितीही उलथापालथं झाली तरी चिनी, जपानी किंवा रशियन लोकांनी स्वतःची बोलीभाषा सोडली नाहीत. किंवा आपल्याप्रमाणे इंग्रजीला जवळ केल नाही. त्यामुळे त्या त्या देशाची संस्कृती आणि भाषा टिकून आहे. आपल्या देशापुरत बोलायचं झाल्यास गुजराथी, राजस्थानी समाज कितीही प्रगत झाला तरी ती लोकं आपली भाषा बोलणे सोडत नाहीत. त्याच मोठं कारण म्हणजे हा समाज प्रगत आहे त्यांचं आर्थिक स्तर उंच आहे! त्या उलट जो समाज आज गरीब आहे, इतर समाजाच्या तुलनेत विकसित नाही ते स्वतःची बोलीभाषेत बोलणे टाळतात. या वरून एकच निष्कर्ष निघतो - खूप प्रगती करून तुम्ही विकसित झालात तर तुमच्या सोबत तुमच्या भाषेचा दर्जा सुद्धा उंचावतो, त्याला जगात मान्यता मिळते. चीन, जर्मन, रशिया आणि जापनीज सारख्या देशांनी हेच केलं. ते एव्हडे विकसित आणि स्वावलंबी झाले की त्यांनी देशांची व भाषेची अस्मिता टिकवून ठेवली.
आता थोडं शिष्टाचार विषयी -
'हमाम में सब नंगे....' प्रमाणे शिष्टाचार हा एक दिखावाच असतो. सेन्ट्रल एसी असलेल्या हॉटेलच्या गार हवेत काट्या-सुऱ्यांची मेळ घालत सॉफिस्टीकेटेट डिनर घेणारे खरोखरच घरी असे जेवत असतील का? अर्थात नाही. शिष्टाचाराचा तंतोतंत पालन करून घेतलेल्या जेवनाणे पोट भरून, मन तृप्त होईलच याची शास्वती कमीच. कारण जेवताना बरंच लक्ष शिष्टाचार पाळण्यात खर्ची होत असतं. भाषेप्रमाणे शिष्टाचारच्या पध्द्तीसुद्धा बदलत जातात. इंग्रजी शिष्टाचार वेगळे, जापनी वेगळे तर रशियन वेगळे! काही वेळेपुरतं एक सामायिक मंचावर जुळवून घेण्यासाठी ते पाळण्यास हरकत नाही. थोडक्यात शिष्टाचारचं पालन करतांना आपण अस्सल सोडून कुणाची तरी नकल करत असतो, चांगलं दिसण्यासाठी!
कार्पोरेट शिष्टाचार किंवा एटिकेट्स हा डूप्लिकेटपणा त्या त्या ठराविक वेळापूरते पुरे. आणि समजा जमतच नसेल तर त्यांनी तुमचं खूप मोठं नुकसान होईल असं काही नसतं. निखळ आनंदी जीवन जगण्यासाठी आपलं बोलणं, वागणं, अस्सल असावयास हवं. उगीच प्रा. लक्ष्मीकांत देशपांडे सरांच्या 'वऱ्हाड निघालाय लंडनला' प्रमाणे स्वतःच मोकळं चाकळ सोडून इंग्रजांची नक्कल करण्यात काहीच अर्थ नाही. कारण ठराविक वेळेपुरतं तुम्ही एटिकेट्स पाळू शकता किंवा तसा अभिनय करू शकता कालांतराने तुमचा अस्सलपणा उघडा पडतोच! रियालिटी शो 'बिग बॉस' मध्ये हेच घडतं. सुरुवातीच्या काही काळापर्यन्त बिग बॉसच्या घरातील व्यक्ती टिव्हीच्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्यावर आहे, काय म्हणतील, नावं ठेवतील.. म्हणून कॉन्शस असतात आणि थोडी ऍकटिंग करतात. 'लुकिंग गुड, लुकिंग बॅड' हे नाटकं जास्त काळ टिकत नाही. कालांतराने त्यांच खरं रूप, मूळ स्वभाव किंवा इतरांशी वागणं बाहेर पडतंच.
खेड्यातील एका अस्सल शेतकरी कुटुंबात वाढून तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेऊन मी नोकरी निमित्त सहा-सात वर्षे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये काढली. बराच काळ देश-विदेशातील उच्च-शिक्षित उद्योजक, डॉक्टर मंडळींच्या संपर्कात होतो. बऱ्याचदा व्यवसायानिमित्त अमेरिकन, इज्राईल, चिनी किंवा कोरियन अशी भिन्न कार्पोरेट कल्चर असलेल्या उच्चपदस्थ लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूपदा पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबण्याची किंवा जेवण्याची संधी मिळायची. सर्वांची भाषा, संस्कृती आणि इतर शिष्टाचार वेगळे होते. अर्थात सर्वांशी जुळवून घेण्यात थोडी पंचाईत व्हायची. असं असलं तरी शेतात झाडाखाली खालेल्या ज्वारीच्या भाकरीची, मिरचीच्या ठेच्याची आणि गावरान भाषेची चव वेगळीच!
आधुनिकीकरणामूळे सुखवस्तूत प्रचंड वाढ झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जीवन सुसह्य झालं असलं तरी अस्सल जगण्यापासून आपण फार दूर जात आहोत. हुबेहूब मानवासारखी बुद्धिमता, भाषा बोलणारा कृत्रिम रोबो निर्मिती पर्यत आपली मजल गेलेली आहे. पण कोणत्या किमतीवर? बऱ्याच अस्सल गोष्टीला आपण मुकत आहोत हे निश्चित. सिमेंटच्या जंगलात वातानुकूल खोलीत अस्सल शुद्ध हवा देणारे वृक्ष नकोसे झाले आहेत. त्यांच्या वाळलेल्या पानाचा कचरा होतो म्हणे! मग हार-फुलांसाठी आम्ही पैसे मोजू किंवा त्याला फोन पे करू! अस्सल काळजी घेणारे आई-बाप किंवा मुके प्राणी नको कारण ते आपल्या दिनचर्येत व्यतेय आणतात. मोबाईलमुळे तर जग जवळ होऊन शेजारी दूर झालेत. अस्सल भाषा दूर होऊन 'इमोजी लोल' सारख्या संक्षिप्त शब्दांना आपण जवळ केलंय. बोलणं कमी आणि 'टेक्स्ट ओन्ली' मुळे बोलीभाषेचं महत्व कमी तर होणार नाही ना अशी भिती वाटते. काही वर्षापूर्वी प्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजलीच्या ओली आठवतात -
जिसे भी देखीये वो अपने आप में गुम है,
जूबां मिली है मगर हम जूबां नही मिलता।
खरा आनंद अस्सल जगण्यात, अस्सल भाषा बोलण्यात आणि अस्सल वागण्यात आहे. तुम्ही जसे आहात परिपूर्ण आहात.
©प्रेम जैस्वाल, औरंगाबाद
९८२२१०८७७५ (नावासह लेख सामायिक करण्यास हरकत नाही)

खूप छान लिहिलं आहेस. अभिनंदन. तुझी एक वेगळी आणी पटणारी विचार सरणी बघायला मिळाली. 🙏👌 शेवटी इमोजीचा मोह टाळता नाही आला.
ReplyDelete