ad1

Thursday, 3 April 2025

सायकल पंप



                       सायकल पंप 

१९९६ ची घटना. नुकताच चार दिवसांचा बिजनेस टुर करून मी ऑफिसला पोहचलो होतो.  रिपोर्टींग करून आता टूर वर नं जाता काही दिवस लोकल(मुंबई) मध्येच काम करायचं असं ठरवलं होतं. थकलेलो असलो तरी ऑफिस स्टाफ सोबत टुरबद्दल गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात आमच्या मार्केटिंग मॅनेजरनी मला कॅबिनमध्ये बोलावलं. आत जाताच -

"तुला आताच्या आता टुरवर जावं लागेल", एखादा मोठा बॉम्ब पडावा तसे त्यांचे शब्द माझा कानावर पडले!

"पण... सर मी आताच टुरवरनं आलोय... थकलोय आनं कपडे...., सर उद्या गेलं तर चालेल का?"

" ते मला काही माहित नाही, व्हॉईस-प्रेसिडेंट साहेबांचा फोन आला आहे, एक पेशन्ट ऑक्सिजनवर आहे आणि त्याच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं कॉम्प्रेसर बंद पडलंय, रुग्ण दगावू शकतं, तुला जावंच लागेल. कपडे, ट्रेन तिकीट वगैरे ते सर्व बघून घे...वाटल्यास... टुर खर्च क्लेम करतांना तू थोडं जास्तीचं क्लेम कर, मी मंजूर करीन!" थोडं गोडगोड बोलत त्यांनी मला पटवलंच.

आता विचार करण्यासाठी वेळ नव्हता. सर्विस इंजिनियर असल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. लायका लॅब या मुंबई स्थित फार्मा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण विभागात मी नोकरीला होतो. भारतात वातावरणापासून ऑक्सिजन तयार करणाऱ्या 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन' चा मी पहिला सर्विस इंजिनियर, असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.  त्या काळी आम्ही फक्त ५ लिटर/मिनिट देणाऱ्या मशीन विकायचो. सीओपीडी म्हणजे जुनाट फुफुस दम्याचे आजार असलेले रुग्ण ते मशीन वापरायचे. त्यांच्यासाठी ऑक्सिजन हेच जीवन असतं. किंमत थोडी जास्त असल्याने फक्त श्रीमंतचं ती मशीन घेत असत. सततची सिलेंडरची कटकट नको म्हणून हा उत्तम पर्याय होता. वीज जोडल्याबरोबर हवेतील ऑक्सिजन वेगळं करून हि मशीन रुग्णाला देते, एव्हड इन्स्टंट, सोपं!

अशीच एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुरत जवळच्या खेड्यातील एका पटेल कुटुंबाने आमच्याकडून खरेदी केली होती. त्यांच्या पत्नीला चाळीशीच्या आतच फुफुसाचा मोठा आजार झाला होता. फुफुसतज्ञ डॉक्टरांनी त्यांना या पुढील जीवनात नेहमीसाठी २४ तास २ लिटर ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला होता. सिलिंडरची उपलब्धता, अदलाबदलीची कटकट टाळण्यासाठी त्यांनी आमच्याकडून विजेवर चालणारी हि मशीन घेतली होती. तरी असे रुग्ण आणीबाणी काळात लागेल यासाठी एक सिलेंडर ते घरी ठेवतातच.

आका का हुकूम सरआंखोपे!  समजून एक वजनदार कॉम्प्रेसर रिक्षमध्ये घेऊन मी अंधेरी ऑफिस ते गोरेगाव रूमवर, तेथून लोकलने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहचलो. आरक्षित तिकीट नसल्यामुळे हमालाला पैसे देऊन जुगाड करत सुरत ट्रेन पकडली. एक कॉम्प्रेसर, सर्विस बॅग आणि स्वतःची बॅग अशी सर्कस सांभाळत रात्री १२ ला सुरतला पोहचलो. बाहेर तुफान पाऊस पडत असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशाने तुफान गर्दी केली होती. कसाबसा त्यातून मार्ग काढत स्टेशन बाहेर पडलो.

धो धो पावसात बाहेर पडताच ऑटोरिक्षावाल्यानी मला घेरलं. माझ्याकडील सामान, चेहऱ्यावरील हावभाव बघून एक ' मोटा ग्राहक' मिळतोय असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण ज्या ठिकाणी मी जाणार त्या ठिकाणच नाव घेताच ती रिक्षाड्रायव्हर मंडळी दूर दूर होत गेली.  काही ' भाई बद्दा दूर छे, नथी जवानू' असं काही म्हणतं तोंड वाकडं करू लागली. पण त्यापैकी एका म्हाताऱ्या रिक्षावाल्याला माझी किव आली, '८० रुपिया देना पडेगा, है तो बोलो' मी घासाघीसच्या भानगडीत न पडता सरळ होकार दिला आणि निघालो.

सुरत स्टेशन पासून ते गाव साधारण १४-१५ किमी लांब असावं. तुफान पावसामुळे सुरत शहराच्या रस्त्यावर खच्च पाणी साचलं होतं. त्यातच पाणी रिक्षाच्या फुटरेस्टवरून वाहत असल्याने सामानाची सर्कस होतं होती. रिक्षावाला गुजराती भाषेत काय बडबड करत होता, काहीच कळत नव्हतं. पावसातचं गाव गाठलं. मध्य रात्रीची वेळ असल्याने फक्त एक घर सोडून संपूर्ण गाव गाढ झोपी गेलं होतं.  पाऊस, वीज बंद झाल्यामुळे अंधारात घरचा पत्ता विचारत कसाबसा रात्री १ ला आम्ही त्यांच्या घरी पोहचलो. मी आलो बघून पटेल कुटुंबाला हायसं वाटलं. घरातील एका वृद्ध महिलेने हात जोडून गुजराती भाषेत माझं स्वागत केलं, नंतर कळालं की ती रुग्णाची सासू होती. ती काय बोलली ते मला नाही कळालं पण त्यांच्या भावना मी समजू शकत होतो. एक मुलगा माझी बॅग आणि कॉम्प्रेसर घेऊन मला आत रुग्णाजवळ घेवून गेला. घरातील रुग्णाची अवस्था बघून मी चक्रावून गेलो.

मशीन तर बंदच होतं आणि स्टॅन्डबाय सिलिंडरचं ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनवायू मिळत नव्हता. ऑक्सिजन अभावी  ती महिला 'पाण्याविन माशा'  सारखी तडफडत होती.  तिला ऑक्सिजन नितांत गरज होती. थोडा तरी प्राणवायू मिळून ती मी येईपर्यंत जिवंत राहावी म्हणून त्याच्या जीवनाचा जोडीदार पतीने एक युक्ती केली. सायकलच्या चाकात हवा भरणाऱ्या पम्पला एक रबरी नळी जोडून त्याद्वारे तो पत्नीच्या नाकात हवा ढकलण्याचा प्रयत्न करत होता.  बाबाचा हा प्रयत्न त्यांची छोटी छोटी मुलं कावऱ्या-बावऱ्या केविलवाणी नजरेने बघत होती.  ते दृश्य खूपच ह्रदयद्रावक होतं. नाव 'पटेल' असं गर्भश्रीमंत असलं तरी त्यांची परिस्थिती अत्यन्त बेताची होती. 

मी क्षणाचाही विलंब न करता कंदिलाच्या उजेडात दहा मिनिटात ऑक्सिजन मशीनचं कॉम्प्रेसर बदललं आणि विजेची वाट बघत बसलो. आता रात्रीचे २ वाजले होते. जाम थकल्यामुळे मी क्षणात झोपी गेलो असतो पण  रुग्णाची अवस्था आणि तिला वाचविणाऱ्या पतीची धडपड बघून माझी झोपंच उडाली. वीज येईपर्यंत त्याचा तो सायकलमध्ये हवा मारण्याचा पंप चालूच होता.  लवकरात लवकर वीज यावी म्हणून मी प्रार्थना करत होतो. माझी थकलेली अवस्था बघून रुग्णाचा पती पटेल मला  'भाई, तमे अंय्या सोजावं' म्हणत होता. पण मी न झोपता बसल्याजागी गुंगत होतो.

तेव्हड्यात चमत्कार व्हावा तसा ओसरीतला विजेचा पिवळा ब्लब चमकला.  विज आल्याचा आनंद त्या 'पती' च्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मी कव्हर पॅक न करता लगेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन चालू केली आणि रुग्णाच्या नाकाला रबरी 'नोजल कॅनुला' लावला. आता 99% शुद्ध प्राणवायू रुग्णाच्या शरीरात धावत होता. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता, आभार प्रगट करण्यासाठी शब्दाची गरज नव्हती.

टेस्टिंगसाठी मशिनचं कव्हर मी मुद्दाम उघडं ठेवलं होतं. मशीन चालू, त्यामुळे थोडं अंग टाकण्यासाठी मी आता मोकळा झालो होतो.  कशी तरी २-३ तास झोप घ्यावी म्हणून बाहेर ओसरीत आंथरलेल्या गोदडीवर मी झोपी गेलो. सकाळी सहा वाजता उठून मशीनचं कव्हर लावलं. चहा पित सर्विस रिपोर्ट व बिल तयार करून मी चालता झालो. 

वैद्यकीय उपकरण नोकरी-व्यवसायात असताना अशा किती तरी सीओपीडी, अस्थमा रुग्णांशी माझा जवळून संबंध आला आणि अनेक बरेवाईट अनुभव आले. डॉ नितु मांडके, डॉ उडवाडियासारख्या किती तरी निष्णात तज्ञ डॉक्टर्स,  पॅराशूट ऑइलचे मालक श्री मरिवाला, हेक्स्टचे डायरेकटर सारखे किती तरी उद्योगपतीकडे आमच्या मशीन्स होत्या. त्या मशिनच्या सर्व्हिसिंग निमित्ताने मी त्यांना भेटत असे.  आज कोरोना महामारीत ऑक्सिजनच्या भिषण टंचाईला पर्यायी व्यवस्था म्हणून जगभर ऑक्सिजन मशीन किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सर्वत्र वापरल्या जात आहे. खरं तर ऑक्सिजन सिलेंडरला उत्तम पर्याय म्हणून हे वैद्यकीय उपकरण मागील २५ वर्षापूर्वी देशात उपलब्ध होतं आणि देशातील सर्व मिलिटरी रुग्णालयं ती वापरत होती.  वर्ष १९९७ मध्ये या मशीनची विस्तृत माहिती देणारा  'मोडॅलिटीज ऑफ ऑक्सिजन इनरीचमेन्ट' हा माझा लेख 'बायो-मेड' या  प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाला होता.  त्यावेळी मी 'कोअर हेल्थकेअर' या गुजरातमधील उद्योगसमूहात टेरियरी मॅनेजर या पदावर कार्यरत होतो.

एक अनुभव म्हणून मी हा लेख शेअर केला आहे. 

- प्रेम जैस्वाल,  छ संभाजीनगर (औरंगाबाद)
9822108775 

No comments:

Post a Comment