ad1

Friday, 7 December 2018

                 





             इंटरनेट ऑफ थिंग्ज

                                    
काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणीवर येणारी 'वाय-फाय इन्व्हर्टर एसी' ची जाहिरात आपण कदाचित पाहिली असणार. या जाहिरातीत महानायक अमिताभ बच्चन दूर कुठे फिरायला गेलेले असतात. त्यांच्या घरी आलेल्या पाहुणे मंडळीना खूपच उकडत असतं. एसीचा रिमोट काही सापडत नाही. मग अमिताभजी शेकडो मैल दूरवरून  आपल्या मोबाईलच्या साह्याने घरच्या एसीच तापमान कमी करतात आणि घरात 'खुशियां' येते. अशी ती जाहिरात होती. या जाहिरातीतील गारवा आणनारा ' वाय-फाय इन्व्हर्टर एसी' हा फक्त विजेवर चालणारा एसी नसून तो वाय-फायद्वारे इंटरनेटलाही जोडलेला असतो. त्यामुळेच अमिताभजी त्याच नियंत्रण दूर मोबाईलवरून करू शकतात.  ही जाहिरात म्हणजे 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' च उत्तम उदाहरण आहे. पुढील काळ हा अशाच 'आयओटी'  क्रांतीचा असणार आहे.

आजच्या दैनंदिन जीवनात आपण सहजरीत्या करत असलेली कामे जसेकी बँकेचे व्यवहार, चित्रपट-नाटकाचे बुकिंग, फूड ऑर्डर, पाहिजे त्या वस्तूची खरेदी किंवा जीपीएसद्वारे प्रवास हे इंटरनेटमूळ शक्य आहे. कारण जगभरातील सर्व संगणक आता इंटरनेटच्या एकाच जाळ्याने जोडल्या गेल्यामुळे सर्व व्यवहार ऑन-लाईन करणे अगदी सोपे आहे.  या जाळ्यालाच आपण 'इंटरनेट ऑफ कॉम्प्युटर' असं म्हणू शकतो.  यापुढच्या टप्यात ह्या इंटरनेटच जाळं अजून दाट विणल्या जाऊन फक्त संगणक, मोबाईल नव्हे तर आपण कधी विचारही केला नसेल अशा सभोवतालच्या सर्व वस्तू एकमेकांना जोडल्या जाणार आहेत.  आणि हे नेटवर्क म्हणजेच  'इंटरनेट ऑफ थिंग' किंवा 'आयओटि' असणार आहे. नजीकच्या भविष्यात आयओटि आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनणार आहे. तशी इंटरनेट ऑफ थिंगची चाहूल ब्रिटिश उद्योजक केविन अष्टोनला 1999 मध्येच लागली होती.  आणि त्याच काळी संगणक क्षेत्रातील जाणकारांनी भविष्य वर्तविले होते कि वर्ष 2020 पर्यन्त जगातील शेकडो करोडो उपकरण ही इंटरनेटला जोडल्या जाऊ शकतील.

मग या 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' कोणत्या? ह्या थिंग्स म्हणजेच आपल्या सभोवताली उपलब्ध सर्वच उपकरण जसेकी संगणक, मोबाईल, सीसीटीव्ही, कार, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, ओव्हन, किचन उपकरणे, पाण्याचा पंप, टीव्ही, डुअर-बेल, म्युझिक सिस्टम, लाईट, पंखे तसेच  कार्यालयातील सर्व उपकरणे इत्यादी.  अर्थात ही सर्व उपकरणे एकमेकांशी जोडण्यासाठी सर्व विजेच्या उपकरणाला वेगवेगळे सेन्सर, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट असणार. सेन्सर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फ्रिजसारखी उपकरनं इतर उपकरणाशी सहज जोडल्या जाऊन त्याशी संवाद साधू शकेल. इंटरनेटला जोडल्या गेल्यामुळे हातातील मोबाईलच्या तालावर सर्व उपकरनाचे नियंत्रित आपल्याकडं असणार आहे. या नेटवर्कमुळे उपकरण एक दुसऱ्याला माहिती पाठवू शकतील. मानवाचा यंत्राशी होणारा संबंध कमी होऊन विविध यंत्र एकमेकांशी समनवय साधतील. एखादा रूमचा एसी त्या रूममधील व्यक्तीला आवश्यक तेव्हडाचं तापमान  आपोआप सेट करू शकेल. फ्रिजमधील शीतपेयाची बॉटल कमी झाल्यास फ्रिज तुमच्या मोबाईलवर तसा संदेश पाठवेल किंवा नेहमीच्या मॉलला आपोआप शितपेयाची मागणी करेन.  रुग्णालयात न जाता घरीच शरीराला काही उपकरण लावून रुग्णालयातील डॉक्टर रुग्णाची संपूर्ण शारीरिक अवस्था जाणून  त्याला ऑन-लाईन औषध लिहून देऊ शकतील. शेती उपकरणांचे आधुनिकीकरण होऊन हवामानाचा अंदाज घेऊन पाण्याचा पंप आवश्यक तेंव्हा आपोआप चालू आणि बंद होतील. हे इंटरनेट ऑफ थिंग्जच तंत्रज्ञान आपल्याकडे येण्यास जास्त वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या 'इंटरनेट ऑफ थिंग' चे काही उदाहरन -

1. कारमधील आयोटि : हल्ली सर्वच कारच्या डॅशबोर्डमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. यापुढे कार स्वतःच्या मायलेज, गती, तापमान, इंधन इ. नियंत्रणासह बाहेरील जगाशी सहज संपर्क करू शकणार आहे. चालत्या कारमधूनच भोजनसाठी योग्य ठिकाण निवडणे शक्य होईल. तेथे कसं पोहचायचं?  तिथे प्रतीक्षा करावी लागणार का? वाहनतळमध्ये जागा मिळेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॅशबोर्ड देत राहील. संगणक क्षेत्रातील ऍपल आणि गुगलने तर त्यासाठी ऑटोमोबाईल उत्पादक करणाऱ्या कंपन्यांशी आधीच भागीदारी करून  आयपॅड किंवा अँड्रॉइडसारखे उपकरण कारमध्ये बसवण्याचे ठरविले आहे. स्मार्टफोनचे सर्व काम आता कारचा डॅशवोर्ड करू शकेल.  चालकाचा आवाज ओळखूनच डॅशबोर्ड सुरु होईल. चालकाला  रहदारी, हवामान, वादळ आणि रस्त्यासंबंधीत प्रत्यक क्षणाचा अहवाल डॅशबोर्ड न विचारता देणार आहे. मागील आसनावर बसलेली मंडळी पुढील सीटच्या मागे लावलेल्या स्क्रीनवर इंटरनेटचा भरपूर स्वाद घेऊ शकतील. चालत्या कारमध्ये आवडीच्या गाण्यासह डॅशवोर्ड चालकाला इ-मेल, व्हाट्सप्प संदेश व आजच्या बातम्या वाचून दाखवेल. सर्व सुरळीत घडत गेलं तर पुढील दहा वर्षात चालकरहीत कार रस्त्यावर धावू लागेल.

2.  घरामध्ये 'आयोटी' : घरातील सर्व उपकरनं एका नियंत्रण मॉनिटरशी जोडल्या जाऊन घरात तापमान, आद्रता, धूर-प्रदूषण किती याची माहिती व नियंत्रण होईल. या 'स्मार्टहोम' मध्ये अनोळखी व्यक्तीचा प्रवेश झाल्यास लगेच अलार्म वाजून त्याची सूचना घरमालकाच्या मोबाईलवर मिळेल. टीव्ही आणि म्युझिक सिस्टम आपल्याला नेहमी आवडणारी वाहिनी, गाण्याची  नोंद करून तीच गाणी लावण्यास मदत करतील.  इलेक्ट्रिक उपकरण व लाईटिंगच उत्पादन करणारी जगविख्यात फिलिप्स कंपनी त्यानुसार लाईटमध्ये बदल करत आहे. आता मोबाईलवर विजेच्या दिव्याच्या प्रखरतेच नियंत्रण असणार आहे. अर्थात त्यासाठी दिव्यामध्ये सेन्सर लावलेले असतील जेणेकरून आवश्यक तेव्हडाचं उजेड पडून विजेची बचत होईल. मोबाईलचे बटन दाबून संपूर्ण घराची पाहिजे तशी प्रकाश योजना करता येईल. ' स्मार्ट मिरर' असाच एक प्रकार आहे. 'आयोटि' वर आधारित या आरस्यात बघत असताना तो आपल्याशी संवाद साधून आजचा दिनांक, वार,  तापमान, बदलत्या वातावरनाची माहिती देणार. तसेच ताज्या घडामोडीबद्दल माहिती देईल.

3. वैद्यकीय क्षेत्रात आयओटि : यापुढे एखाद्या आजाराचा इलाज करण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासणार नाही.  कारण डॉक्टर रुग्णाच्या घरी रुग्णाच्या शरीराला विविध सेन्सर असलेली उपकरण लावून त्याद्वारे रुग्णाची अंतरबाह्य स्थिती जाणून घेतील. ईसीजी, हृदयाची गति,  श्वसोश्वासची गती, तापमान, रक्ताचा दाब आणि रुग्णाच्या हालचाली टिपून त्याच्या नोंदी डॉक्टरला आपोआप पाठविल्या जातील.  त्या नोंदी बघून रुग्णाच्या आजाराचे निदान होवून डॉक्टर ऑन-लाईन औषध लिहून देतीलं. आवश्यकता पडल्यास आपोआप रुग्णवाहिकेस संदेश मिळून ती रुग्ण असलेल्या पत्त्यावर येऊन उभी दिसेन. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णाला तातडीची सेवा मिळून कितीतरी लोकांची हेळसांड न होता त्यास त्वरित उपचार मिळतील.

4. उद्योग क्षेत्रात आयओटी :  उद्योग क्षेत्रात आयओटी हे एक मोठे वरदान ठरणार आहे. उद्योगातील यंत्रासह सर्व विभाग इंटरनेटनी जोडल्यामुळे एखाद्या कारखान्यात प्रत्यक्ष उपस्थित न राहता तेथील व्यवस्थापन, यंत्रावर नियंत्रण शक्य होईल. कच्या मालाच्या खरेदी पासून तयार माल विक्री करणाऱ्या वितरकापर्यन्त सर्व टप्पे आयोटिने जोडल्या जाईल. त्यामुळे एखाद्या वस्तूची विक्री झाल्याबरोबर तेव्हढा माल कमी झाला आहे अशी माहिती माहिती वितरक, स्टोकिस्ट आणि ती वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपनीला होऊन त्याच पुन्हा उत्पादन सुरू करण्याचा संदेश मिळेल.  त्यामुळे जास्त माल संचयित न करता फक्त विक्रीलायक मालच कमी मनुष्यबळ वापरून उत्पादित करता येईल. थोडक्यात मागणी तेव्हडाचं पुरवठा हे गणित साधलं जाईल. आजही मॉलमध्ये जेंव्हा आपण एखाद रेडिमेड सदरा खरेदी करतो तेंव्हा बिलिंग झाल्याबरोबर उत्पादन करणाऱ्या त्या ब्रॅण्डला आणि वितरकाला लगेच संदेश जातो की अमुक अमुक मॉलमधून एव्हडा स्टॉक कमी झाला आहे.

5. दळण-वळणामध्ये आयओटि: हल्ली आपण कुरियरवर एखादी वस्तू ट्रॅक करू शकतो. मालाची ने-आन करणाऱ्या कुरियर किंवा मालवाहतूक कंपन्यांचे देशभर कार्यालय आणि गोडाऊन असतात. अनेक जडवाहन रस्त्यावर मालवाहतुकीची काम करत असतात. अशा वेळेस अनेक गोडाऊन, ट्रक आणि मनुष्यबळ याचा योग्य समनवय साधने आवश्यक असते. 'आयओटि' मुळे वाहतुकीची साधन, वाहतुकीचे कार्यालय, मनुष्यबळ एकमेकांशी जोडल्या जावून दळणवळण आणि मालाची साठवण सोपं होईल. कुठे माल पाठविण्याआधी त्या मार्गाची स्थिती, वातावरण, गोडावूनमध्ये पुरेशी जागा, आवश्यक मनुष्यबळ, पार्किंगव्यवस्था आहे किंवा नाही ही सर्व माहिती माल पाठविणाऱ्यास आपल्या मोबाईलवर आधीच माहित पडेल.

6. क्रीडाक्षेत्रात आयओटि :   राल्फ लॉरेन,  अमेरिकेत कपडे उत्पादन करणारी ही पहिली कंपनी ज्यांनी आयओटिची संकल्पना अत्यंत खुबीने वापरून ऍथलेटसाठी एक स्मार्ट शर्ट तयार केला आहे.  ह्या शर्टमध्ये लावल्या गेलेल्या सेन्सरमुळे खेळाडूच्या हृदयाची गती, श्वासोश्वासची गती, रक्ताचा दाब, कॅलरी बर्न माहित पडून खेळामध्ये सुधारणा करता येतील. शर्टमध्ये रेकॉर्ड झालेली ती माहिती आयफोन किंवा अँपलवॉचशी जोडून नंतर पाहता येईल. थोडक्यात फिटनेस ट्रेनरच बरंच काम कमी होईलं.

आयओटिचे हे काही उदाहरण आहे. पुढील काही वर्षात जगातील विविध क्षेत्रातील करोडो उपकरण  हायस्पीड इंटरनेटला जोडल्या जाऊन हि उपकरण एक दुसऱ्याशी संवाद साधून एक मोठी क्रांती घडणार आहे. मानवी जीवन अधिकच सुसह्य होऊन शरीराच्या हालचालीला मर्यादा येतील.  मनुष्यजातीला करण्याजोगं असं जास्त काम उरणार नाही. हळूहळू हि उपकरण आपल्या जीवनाचं नियंत्रण आपल्या हातात घेतील.  कोणतंही नवीन तंत्रज्ञान आपल्या अनेक फायद्यासह सोबत काही तोटेही घेऊन येतं असतं.  आयओटीमुळे सर्वच उपकरण सॉफ्टवेअरवर आधारित असल्याने हॅकिंग, सायबर क्राईमच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ होऊन 'असुरक्षितते'च्या नवीन संकटाला आपण सामोर जावू. मग चालती कार हॅक होणे, स्पर्धक कंपनीची गोपनीय माहिती चोरी करणे, उद्योजकामध्ये सायबर वॉर घडून एक दुसऱ्याच उत्पादन बंद पाडणे, हॅकिंग करून विमान पाडणे, वैद्यकीय उपकरण हॅक करून हत्या, घरातील उपकरण हॅक करून खंडणी मागणे असे 'हायटेक' गुन्हे घडतील.

मानवाच्या भौतिक सुखाला अंत नाही. आयओटी म्हणजे तंत्रज्ञानाच शेवट नसणार, पुढ अजूनही नवनव्या गोष्टी घडतील. मानवता बाजूला राहून यंत्रांच्या आहारी गेलेला मनुष्य स्वतः एक हाडा-मांसाचा यंत्र बनून राहील. सभोवतालची यंत्र मानवाला नियंत्रित करतील.   म्हणूनच     'द ग्रेट डिक्टेटर' मध्ये चार्ली चॅप्लिन म्हणतो, ' लोभाने मानवाचे आत्मे पोखरलेत. जगभर द्वेष पसरलाय. आपण गति वाढवली, पण स्वतः त्यात कैद झालो.भरपूर उत्पादन करणारी यंत्र आपली सततचा हाव वाढवत बसली. ज्ञानामुळे आपण 'सिनिकल' झालो. आपण खूप विचार करायला लागलो आणि आपल्या खूप कमी जाणीवा उरल्या. आज आपल्याला यंत्रापेक्षा जास्त मानवतावादाची गरज आहे. हुशारीपेक्षा दयाळूपणाची जास्त गरज आहे. या शिवाय आयुष्य आणि पर्यायानं मनुष्यजात संपून जाईन. मनुष्याला करायला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल असं जग आपल्याला हवंय. जिथे विज्ञान आणि मानवाचा विकास हातात हात घालून जाईल. असं जग घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, एकत्र येऊ'.

© प्रेम जैस्वाल,  9822108775

(औरंगाबाद येथील एस्पी इन्फोटेक  सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करिअर एडव्हायझर आहेत.)

No comments:

Post a Comment