जबाबदार कोण?
काल अमृतसरमध्ये घडलेली 'रेल्वे दुर्घटना' खूपच दुःखद आहे. हि घटना फक्त पंजाब नाहीतर संपूर्ण देशाला दुःखाचा चटका लावून गेली. पंजाब तर दुःखाच्या सागरात बुडाला आहे. साधारण ६९ पेक्षा जास्त लोकांचा या दुर्घटनेत करूण अंत झाला आणि शेकडो जखमी झाले. घरातील एक सदस्य वारल्यास संपूर्ण घर उद्धवस्त होतं, म्हणजेच ६९ कुटुंबावर दुखाच डोंगर पडल्यासारखं आहे. पण आपल्याकडं शोकांतिका अशी की अशाही दुःखद घटनेकडे बघण्याचा समाजात दृष्टिकोन हा राजकीय असतो. आणि सर्वत्र जिम्मेदार कौन? अशी एकचं चर्चा झडत असते. सर्वांचा प्रयत्न हा इतर पक्षावर ढकलून हात झटकण्याचा असतो, हि बाब खूपच खेदजनक आहे. सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवून निर्लज्जपणे आरोप फेटाळले जातात किंवा इतरांवर ढकळले जातात. कालांतराने 'विसरभोळी' जनता सर्व विसरून जाते, नेते मोकाट फिरायला मोकळे होतात.
समाजात सर्वच समारंभ, उत्सव हे कोणत्यांन कोणत्या रस्त्याच्या शेजारीच होत असतात. समारंभ, सभा आणि उत्सव साजरा करण्यासाठी शासनानं काही नियम आखून दिलेले असतात. पण उत्सव, मस्ती आणि आनंदाच्या भरात ते नियम पायदळी तुडवले जातात. लग्नाची वरात अर्धा रस्ता व्यापून काढली जाते. फटाके, बँड, डीजे वाजवत, बेफाम नाचताना बाजूने जाणाऱ्या वाहणाकडे कुणाचे लक्षही नसते. मग अशात कोणी नाचत नाचत बाजूनी वाहनांच्या समोर आला तर जिम्मेदार कौन? अर्थात तो नाचणारा वराती. कारण तो वाहक सर्व नियम पाळून, हॉर्न वाजवत गाडी चालवत असतो आणि कोणतंहि वाहन तुम्ही अचानक अर्जंट ब्रेक लावून थांबवू शकत नाही. पण आपल्याकडे 'रेशनल'वर 'इमोशन भारी पडतं. सरळ त्या गाडीवाल्याची गाडी फोडून लोकं मोकळे होतात. वाहकालाच मोठी सजा देण्याचा प्रयत्न होतो. तसेच मोटरसायकल, सायकलवाला स्वतःच्या चुकीन भरधाव कारसमोर आला तर 'बघे' आधी मोठ्या वाहनावर जिम्मेदारी टाकून त्याला चोपतात. कारण खरी चूक कोणाची याशी कुणालाही घेणंदेन नसतं. मार खातो तो मोठी गाडीवालाच!
अमृतसरचा प्रकार थोडा तसाच आहे. संयोजकांनी ज्या ठिकाणी रावण दहन केलं त्या मैदान आणि रेल्वे पटरी दरम्यान एक दहा फुटाची संरक्षक भिंत होती पण हौशी प्रेक्षक दूर उभे राहून तो नजारा बघत होते. कुणी फोटो, कुणी शूटिंग करत होते. या धुंदित त्यांना बाजूने जाणाऱ्या रेल्वेचे भान नव्हते. मोटरमन रेल्वेला अर्जंट ब्रेक लावू शकत नाही त्यासाठी त्याला नियोजित थांब्याच्या साधारण एक किलोमीटर आधी तयारी करावी लागते. यदाकदाचित ब्रेक लावला तर ट्रेनचे डब्बे घसरून मोठा अपघात घडू शकतो. दुसरी बाब अशी की पटरीची सुरक्षा, राखण हा मुद्दा रेल्वेच्या अखत्यारीत येते. त्या पटरीला कुणी इजा करने, त्यावर उभे राहने हा अदखलपात्र गुन्हा आहे. जसा रेल्वेचा अर्थसंकल्प, पोलीस प्रशासन वेगळे असते तसे त्यांचे काही कायदेही वेगळे आहेत. मुळात रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावरील घटना हि रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येते, तेथे रेल्वेचे कडक नियमच लागू पडतात. सदरील उत्सव हा दर वर्षी होत असल्यामुळे तसेच रेल्वेस्टेशनपासून २-३ कि मी अंतरावर असल्यानं रेल्वेनं खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते.
संयोजकाचे जसे गर्दी वाढण्याकडे लक्ष होते तसेच लक्ष त्यांनी सुरक्षेकडे देणे आवश्यक होते. रिकाम्या खुर्च्या येणाऱ्या प्रमुख नेत्याना भाषण संपेपर्यंत टोचत असतात. जशी गर्दी वाढते तसा नेते आणि संयोजकाचा हुरूप वाढतो. हल्ली प्रत्येक गर्दीचा संबंध हा मतदान आणि भविष्यातील निवडणुकीशी जोडलेला असतो. पण त्या धुंदीत सुरक्षेचा विषय पायदळी तुडवला जातो. लोकांच्या जीवाची पर्वा नसते. मग अशाच गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा काल सारख्या घटना घडतात. वाढती गर्दी बघून संयोजकाचे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन गर्दीवर नियंत्रण केले असते तर घटना टळली असती. किंवा गर्दीचा अंदाज बघून हा कार्यक्रम इतर सोयीच्या ठिकाणी घेता आला असता. कारण हजारो वर्षे आधीच मेलेल्या रावणदहनापेक्षा लोकांचे जीव जास्त महत्वाचे होते.
हल्ली प्रत्येकाच्या हातात सेल्फी, शूटिंग वाला कॅमेरा असल्यामुळे कोणत्याही घटनेची शूटिंग करून 'Live' दाखवणे, रेकॉर्डिंग करून फिरवणे असे प्रकार वाढले आहेत. या शूटिंगच्या नादात युवावर्ग वाटेल ते प्रकार करण्यास धजावत असतात. मग चालत्या ट्रेन, बस, मोटारसायकलवर शूटिंग घेणे असले प्रकार घडतात व बऱ्याचदा अपघातही होतात. कालच्या घटनेत काही असेही हौशी असतीलच हे नाकारता येत नाही.
शेवटी, अशा घटनेची चौकशी होतच असते, ती होईलही. पण गरज आहे की अशा घटनेपासून योग्य तो धडा घेऊन अशा घटना भविष्यात भारतातील इतर ठिकाणी घडू नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. या घटनेस जे दोषी आहेत त्यांना 'औपचारिकतेची सजा' न देता अद्दल घडवावी. मुख्य म्हणजे या घटनेस 'विरोधक' सत्तारूढ पक्ष अशा चष्म्यातून न बघता दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी.
या लेखातील सर्व विचार माझे आहेत. वाचकाचे विचार भिन्न असू शकतात. तेंव्हा वादावादी न करता आपले विचार आपण मुक्तपणे ठेवू शकता.
'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट
-प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

No comments:
Post a Comment