गेमिंगचं दुष्टजाळ
वैधानिक इशारा : धूम्रपान करने आरोग्यासाठी धोकादायक आहे. तंबाकू, विडी, सिगारेटमूळे कॅन्सर होतो.
सिगारेट, बिडी, गुटख्याचे पाकिटावर असे वैधानिक इशारे लिहिने कायद्याने सक्तीचं असतं. चित्रपट किंवा जाहिरातीमध्ये कुणी सिगारेट ओढत असल्याचं दृश्य असेल चित्रपट सुरु होण्याआधीच 'धूम्रपान करने धोकादायक आहे' अशी चेतावणी लिहिणे बंधनकारक असतं. असे कडक इशारे वाचून सामान्य जनतेला वाटतं आपलं सरकार जनतेच्या आरोग्याविषयी किती जागरूक आहे, नाही का? तर दुसरीकडे जनतेला प्रश्न पडतो कि आरोग्यासाठी एव्हढ घातक असेल तर मग शासन त्याचं उत्पादन का बंद करत नाही? तर याचं उत्तर असं कि- ते शक्य नसतं. तंबाकू आणि सिगारेटच्या उत्पादनामागे शासनाला मोठा महसूल मिळत असतो. शासनाचा पसारा आणि शासकीय योजना चालविण्यासाठी पैसा हवा असतो त्यामुळे घातक असूनही शासन त्याचं उत्पादन बंद करू शकत नाही.
हल्ली गेमिंगमूळे तरुण पिढी बरबाद होत आहे.
गेमिंगचे समाजावर होणारे दुष्परीनाम माहित असूनही शासनाचे गेमिंग क्षेत्रावर नियंत्रण नाही. उलट गेमिंग उत्पादनावर लागणारा कर कमी करुन एक प्रकारे ऑनलाईन गेमिंगला चालणाचं दिली आहे. मागील काही वर्षात दहाव्या क्रमांकावरुन आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला असेल. पण त्याचं तंत्रज्ञानाचा दुसरीकडे दुरुपयोग होऊन देशाचं मोठं नुकसान होत आहे.
निरोगी मनुष्यबळ देशाची संपती असते. उत्तम शारीरिक मानसिक आणि आर्थिक आरोग्य असल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. खरं तर कॉम्पुटर, मोबाईल व इंटरनेट सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी व्हायला हवा. पण हल्ली त्याचा गैरवापरचं जास्त होताना दिसत आहे. घरोघरी मोबाईल आणि जोडीला फ्री इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे लहान वयातच मुलांवर मोबाईलचे वाईट संस्कार होत आहेत. गेमिंगच्या फसव्या जाहिरातीला बळी पडून ते सहज ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढले जात आहे. ज्यांच्या हातात देशाचं भवि्तव्य असे तरुण गेमिंगच्या आहारी गेल्याने कुटुंबाचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. गेमिंगमूळे देशभर अनेक कुटुंबं उध्वस्त झाल्याच्या बातम्या आपण वृतमानपत्रात वाचत असतो त्यापैकी काही घटना पुढील प्रमाणे -
वर्ष २०१९ ची हिंगोली शहरातील घटना. पब्जी खेळणाऱ्या दोन मुलांचा रेल्वे ट्रेकवर करुण अंत होतो. या घटनेने संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरुन गेला होता. कोवळ्या वयाच्या दोन मुलांना पब्जी खेळण्याच व्यसन जडलं. खेळता खेळता ती मुलं कानाला हेडफोन लावून रेल्वे पटरीवर जाऊन बसली. खेळाच्या गुंगीत त्यांच्याकडे येणाऱ्या आगगाडीकडे त्याचं लक्ष नव्हतं. अपघातात त्यांचा अंत होतो.
दुसरी घटना ठाणे शहरातील. पब्जी गेमच्या आहारी गेलेल्या चार मुलांमध्ये आपापसात वाद घडतो. वादाचं रूपांतर भांडनात होतो. भांडणानंतर तिघे मिळून चौथ्याचा भोसकून खून करतात. ज्या तिघांनी खून केला त्यापैकी दोन मुलं हि अल्पवयीन म्हणजे 'मायनर' असतात.
तिसरी बातमी कर्नाटक राज्याच्या मंगळूरूची. दोन मुलं पब्जी गेम खेळत होती. त्यात एक मुलगा फक्त बारा वर्षाचा होता जो सतत जिंकत होता. मोठया मुलाला हा लहान मुलगा जिंकतोच कसा, इतर कुणी तरी याच्याकडून खेळत असाव म्हणून त्याला शंका आली. त्याला तो समोरासमोर पब्जी खेळायला सांगतो. लहान मुलगा त्याच्या सोबत 'चीटिंग' करत आहे म्हणून दोघात वादविवाद होऊन त्याचं रूपांतर भांडणात होतं. १२ वर्षाच्या मुलाचा तो दगडाने ठेचून खून करतो.
उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहरातील ही घटना. सोळा वर्षाचा मुलगा पब्जी गेमच्या आहारी जातो. आई खेळण्यास मनाई करते. मुलगा वडिलांच्या पिस्तूलाने आईचा खून करतो. मेलेल्या आईचा मृतदेह दोन दिवस घरातच कुजत पडलेला असतो. वास येऊ नये म्हणून तो रूम फ्रेशनर मारतो. नऊ वर्षाच्या बहिणीने कुणास सांगू नये म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी देतो.
एका मोठ्या दुःखद घटनेमुळे शेजारील पाकिस्तान देश अक्षरशः हादरुन जातो. हि घटना लाहोर शहरात घडलेली आहे. पब्जी गेममूळे एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा खून करण्यात आला होता. पिस्तूलाने खून करणारा दुसरा कुणी नसून त्याचं कुटुंबाचा चौदा वर्षाचा मुलगा होता ज्याला ऑनलाईन पब्जी गेमचं व्यसन जडलं होतं. मृतामध्ये त्याचे आई-वडील, मोठा भाऊ आणि दोन कोवळ्या बहिणीचा समावेश होता.
आंध्र प्रदेशातील पब्जी घटना. सोळा वर्षाच्या मुलाचा शरीरातील पाणी कमी (डीहायड्रेशन) झाल्यामूळे मृत्यू होतो. तपासात माहित पडतं कि तो अन्न-पाण्याविना किती तरी तास सतत पब्जी खेळत होता. भूक तहान विसरून पब्जी खेळतांना त्याला चक्कर आली, रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
उत्तराखंड मध्ये पब्जी खेळणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाने शेजाऱ्याचा काचेच्या तुकड्याने खून केला. राजस्थान मध्ये मित्राने पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही १३ वर्षाच्या मुलाने मित्राचा खून केला.
पब्जी गेममूळे असे किती तरी खूनाच्या घटना जगभर घडल्या आहेत. वरील सर्व घटना प्रातिनिधीक आहे. पब्जी आणि त्यासारख्या इतर गेममूळे देशात अशा हजारो घटना घडून किती तरी कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. गेममध्ये गुंगून गेलेल्या मुलांना वेळोवेळी काही चॅलेंजस दिली जातात. ती पूर्ण केल्यास त्यांना पैसे मिळणार असतात. ब्ल्यू वेल असाच एक गेम होता नंतर तो बंद करण्यात आला. पोकेमॉन गेममूळे किती तरी अपघात होऊन मुलांनी जीव गमावला. स्थळ, वेळ, जेवण, झोप याचं भान न ठेवता गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलांच्या वागणुकीवर आणि मानसिकतेवर खूप परिणाम होतो.
एखाद्या मुलाला गेम खेळण्याची सवय (एडिक्शन) लागलेलं असेल तर ते कसं ओळखायचं?
प्रथमता ऑनलाईन गेमचा मुलाच्या एकूण वागणुकीवर मोठा परिणाम झालेला असतो. मोबाईलवर दिसणार आभासी जग हेच खरं जग आहे, असं त्यांना वाटत असतं. गेमिंगच्या एडीक्शन मुळे ते डिप्रेशन, एंझायटीचे शिकार होतात. कुणी रागावू नये म्हणून ते खोटं बोलायला सुरुवात करतात. अभ्यासाला वेळ देऊ शकत नसल्याने शाळेय अभ्यास व इतर बाबतीत ती मागे पडतात. पालकांनी काही प्रश्न विचारले तर ते चिड चीड करतात. वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलतात. गेम खेळण्यासाठी पैसे नसतील तर चोरतात किंवा इतरांकडून उसने मागण्यासाठी पुढे मागे बघत नाही. सतत स्क्रीनवर बसल्यामूळे त्यांचे डोळे, कान, मान, पाठी मणक्याचे आजार प्रचंड वाढतात. शरीराची हालचाल होत नसल्याने हृदयरोग, डिव्हीटी (डीप वेन थ्रोम्बोसिस) सारखे आजार उद्भभवतात. मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन निद्रानाश, वैफल्यग्रस्तता वाढून क्रयशक्ती कमी होते. अशी लक्षणे जर मुलामध्ये आढळत असतील तर पालकांनी त्वरित जागरूक व्हायला हवं. शक्य तेव्हड्या लवकर मुलाचं समुपदेशन करुन ते पुढील नुकसान टाळू शकतात.
ऑनलाईन गेमिंग वर उपाय काय?
इंग्रजीत म्हणं आहे 'स्टिच ऑन टाईम सेव्ह द नाईन!' पालकांनी मुलांवर लक्ष ठेवून वेळीचं उपाययोजना केल्यास गेमिंगच्या चक्रव्यहातून त्याची सुटका होऊ शकते. कुटुंबात पालक हे पहिले गुरू असतात. त्यामुळे गेमिंग व त्याच्या दुष्परीनामा बाबतच प्रशिक्षण प्रथम पालकांना द्यायला हवं. त्याच प्रमाणे समाजातील विविध स्तरावरील लोकांना गेमिंगबाबतची माहिती द्यायला हवी. मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात पालकांना मुलासाठी वेळ नसतो. हौसिंग सोसायटीमध्ये बैठक घेऊन गेमिंगच्या बाबतीत सर्वांना जागरूक करायला हवं. शाळा असे ठिकाण आहे जेथे विद्यार्थी दररोज भेटतात, मित्र बनवतात, सोबत खेळतात. तेंव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून त्यांना गेमिंगच्या दुष्परीनामाबाबत संबंधित जागृत करायला हवं. शक्य झाल्यास सर्व वर्गशिक्षकांकडून विध्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी. पालक आणि शालेय शिक्षकांची ही जबाबदारी आहे कि त्यांनी विध्यार्थ्यांना अभ्यास, होमवर्क आणि परीक्षेत गुंतवून ठेवावं जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल. शाळेने मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं. तरुण वर्ग कायम सोशल मीडियावर असतो. जागरूकता वाढविण्यासाठी सोशल मीडियात गेमच्या वाढत्या धोक्याबाबत माहिती/जाहिरात द्यावी. जिम, फिटनेस सेंटर, कॅफे अशा ठिकाणी तरुणवर्ग जात असतो अशा ठिकाणी गेमच्या दुष्परीनामविषयी जाहिरात लावावी.
डिजिटल युगात कोणत्याही ऍप्पवर काम करतांना तुमच्या वयाचा अंदाज बांधून कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे गेमिंगच्या अनेक जाहिराती आपोआप तुमच्या समोर येत असतात. मुद्दामहून डिजिटल मार्केटिंगमध्ये तसं नियोजन केलेलं असतं. बरीच आमिष दाखवून तरुणाना आपल्या जाळ्यात ओढण्याचा अतोनात प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे तरुणवर्ग ज्यांना आपला आदर्श मानतो अशा खास व्यक्तीकडून खेलो रम्मी सारख्या गेमची जाहिरात केली जाते. क्रीडा, चित्रपटातील प्रतिष्टीत व्यक्ती जेंव्हा गेमिंग आणि गुटक्याची जाहिरात करतात तेंव्हा खूप वाईट वाटतं. पैशापुढे मूल्यांची घसरण होती ती अशी. तेंव्हा देशातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवूनच जाहिरात करायला हवी.
गेमिंगचे काही फायदेसुद्धा आहेत. आज घडीला वेगवेगळ्या गेमिंगचे हजारो प्रकार खेळणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. अर्थात हे तयार करण्यासाठी, त्यात नावीन्य आणण्यासाठी कल्पक सॉफ्टवेअर प्रोग्रामर, 3डी ऍनिमेशन, ऑडिओ एडिटर सारख्या कुशल प्रोग्रामर, आर्टिस्ट आणि डिजिटल मार्केटिंग एक्सफर्ट याची गरज पडते. कोडींग प्रोग्रामिंगचं कौशल्य असणाऱ्यांसाठी गेमिंगमध्ये रोजगाराची मोठी संधी चालून आली आहे.
गेमिंगचा आवाका खूप मोठा आहे. गरज आहे पालकांनी मुलांना वेळीच विश्वासात घेण्याची. मुलांना मोबाईल विश्वातील धोके समजवून सांगण्याची. मुलांना इतर खेळात गुंतवून ठेवण्याची. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्याची. जबाबदारी शासनाची सुद्धा आहे. ऑनलाईन गेमिंगमूळे शासनाला कर स्वरूपात भरपूर रेव्हेन्यू मिळत असेल, पण कोणत्या किमतीवर? देशातील करोडो युवकांना गेमिंगच्या जाळ्यात ओढून, त्यांच्या कुटुंबाच आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणून देशाची अर्थव्यवस्था जर जगात पहिल्या क्रमांकावर येत असेल तर त्याचा काय फायदा?
© प्रेम जैस्वाल पेडगावकर
९८२२१०८७७५
छ संभाजीनगर
No comments:
Post a Comment