ad1

Thursday, 9 January 2025

फ्रि लांसिंग आणि गिग एकोनॉमिक्स

फ्री लांसिंग व गिग इकॉनॉमिक्स 


डिजिटल क्रांतीमूळे सर्वच क्षेत्र ऑनलाईन होऊन नोकऱ्यामध्ये कपात होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमूळे तर डिजिटल क्षेत्राने कळसंच गाठला आहे. यापुढे सर्वांना  कायमस्वरूपी शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणे कठीण होणार आहे. उद्योजकाच्या बाजूने विचार करता स्पर्धेच्या युगात कायमस्वरूपी नोकरवर्ग उद्योजकांना सुद्धा परवडणार नाही. अशा परिस्थितीत उरतो तो एकचं पर्याय - फ्री लांसिंग.  आपल्याकडे म्हणं आहे 'कामापुरता मामा'.  या पुढे उद्योजकांना सवडीनुसार उपलब्ध, तात्पुरत्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सेवा पुरविणाऱ्या 'फ्री लांसर' लोकांची सेवा घ्यावी लागणार आहे. उद्योजक तसेच नोकरवर्गासाठी हा पर्याय उत्तम  राहणार आहे.   अशा फ्रि लांसिंग पद्धतीवर अवलंबुन असलेल्या अर्थव्यवस्थेला गिग इकॉनॉमि असं नाव मिळालं आहे.

मध्ययुगीन काळात प्रत्येक राजाला आपल्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी पगारी सैन्याचा खर्च झेपत नसे. असे राजे युद्ध लढण्यासाठी वेळोवेळी भाडोत्री सैनिकांची मदत घ्यायचे. अशा भाडोत्री भालेधारी सैनिकांची कोणत्याही राजाशी बांधीलकी नसायची. जास्त पैसे देणार त्या बाजूने ते लढायचे. अशा भाडोत्री भालेधारी सैनिकांना त्या काळी free launcer ( लाँसर म्हणजे भाला फेकणारे )आणि  नंतर याचं शब्दाचा अपभ्रन्श होऊन फ्रि लांसर झालं. युद्धकाळातील हा संज्ञा कालांतराने उद्योग व्यवसायात आली.

एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात शिक्षित पदवीधरांचा वानवा नाही. दर वर्षी देशाच्या विविध विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थेतून हजारो इंजिनियर, डॉक्टर, बीएड, डीएड, वाणिज्य, आर्टिस्ट आणि विविध कला क्षेत्रातील डिझायनर पदवी घेऊन बाहेर पडतात. शिक्षणानंतर सर्वांचीच मोठ्या पॅकेजची नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. काहींना ते मिळतंही असते पण हे सर्वासाठी शक्य नाही. त्यामुळे बदलत्या डिजिटल क्षेत्रात फक्त नोकरीच्या आशेवर न राहता पारंपारीक पदवीसह कॉम्पुटरचे विविध स्किल्स शिकून विद्यार्थी विविध क्षेत्रात फ्रि लांसर म्हणून करियर घडवू शकतात.   एआय सारख्या तंत्रज्ञानामुळे निश्चितच काही नोकऱ्यात कपात झाली असली तरी फ्रि लांसिंग हे करियरचे नवीन द्वार उघडले गेले आहे.

मोठ्या उद्योजकांचा व्याप मोठा असल्यामुळे  कायम स्वरूपी विभाग आणि नोकरवर्गाचा खर्च त्यांना झेपतो.  पण छोटे किंवा मध्यम उद्योजकांना आर्थिक दृष्टीने ते परवडत नाही.  अशा कामासाठी पाहिजे तेंव्हा उपलब्ध व बांधील नसलेल्या फ्रि लांसरची सेवा घेणे अगदी उत्तम.  हेच कारण कि हल्ली बरीच कामे आऊटसोर्स करुन उद्योजक उत्पादन खर्च कमी करत असतात. त्यामुळे बांधील नोकरासाठीचा खर्च जसे की जागेचा खर्च, पगार, विविध भत्ते, पीएफ, मेंटेनन्स इतर खर्च कमी होऊन उद्योजक कॉस्ट कटिंग करत असतात. 

काही वर्षांपूर्वी आलेल्या कोविड महामारीमूळे उद्योग जगात मोठे बदल घडले आहेत.  देशाची अर्थव्यवस्था ठप्प्प झाल्याने नोकरांनी घरी बसून काम केले.  कोव्हीड नंतर पुढे हा प्रघातचं पडला.  कामगारांना ऑफिसला न बोलविता ऑनलाईन पद्धतीने काम करुन कपंनीचे बराचं खर्च टाळता येतो हे लक्षात आलं. हेच कारण कि आयटी क्षेत्रात वर्क फ्रॉम होम हा प्रकार 'न्यू नॉर्मल' म्हणून उदयास आला. यातूनच पुढे फ्रि लांसिंगला थोडी चालना मिळाली. नोकरीच्या तणावग्रस्त वातावरणात न रहाता वर्क फ्रॉम होम करूनही आपण आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो हे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.  फ्रि लांसिंग वाढण्याचे हे एक कारण आहे.   वायफाय, संगणक आणि झूम मिटिंगमूळे  ऑफिसची कामे घरी बसून करने अगदी सहज शक्य झालंय. केलेलं काम तुम्ही क्लाईंटला ऑनलाईन पाठवून, झूम मिटिंगवर चर्चा करुन व्यवहार पूर्ण करू शकता. नवीन तंत्रज्ञानामूळे कुठे काहीच अडत नाही. महिलांना वर्क लाईफ बॅलन्स करतांना खुपचं सर्कस करावी लागते. जॉब सोबतच कुटुंबाच्या दैनंदिन कामाकडे लक्ष देणे, मुलांचं शिक्षण संगोपन करने सोपे नसते. आता गिग इकॉनॉमिमध्ये त्या आपल्या सवडीनुसार काम करुन त्या सुद्धा कुटुंबाचा आर्थिक भार तोलू शकतात.

डिजिटल क्रांतीनंतर फ्रि लांसिंगची नवनवीन क्षेत्र उदयास येत आहे. त्यापैकी काही - 

१ फ्रि लांस रायटर किंवा ब्लॉगर :
डिजिटल उद्योग विश्वात कॉपी रायटिंग, कन्टेन्ट रायटिंग, कॅटलॉग रायटिंग, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, बायोडाटा रायटिंग या किंवा अशा कामासाठी भाषेच उत्तम ज्ञान असलेल्या लेखकांची गरज पडते. ज्यांचा लिखान क्षेत्रात हातखंडा आहे असे लेखक फ्रि लांसर किंवा ब्लॉगर म्हणून आपली सेवा देऊ शकतात.  अख्ख जग स्क्रीन रीडर झाल्याने फ्रि लांसर लेखक आपलं लिखान ब्लॉग स्वरूपात उपलब्ध करुन जाहिरातीच्या द्वारे चांगली कमाई करू शकतात. 


2. फ्रि लांस वेब डेव्हलपर 
उद्योग विश्वात आपल्या वस्तू किंवा सेवा उद्योगाची सविस्तर माहिती व जाहिरात करणारी आकर्षक वेबसाईट सर्वांना हवी असते. अशी कामे उद्योजक किंवा व्यावसायीक आऊटसोर्स करत असतात. उत्तम डिजाईनिंग स्किल असलेल्या फ्रि लांसरला या क्षेत्रात खूप वाव आहे.


3. फ्रि लांस ग्राफिक डिजायनर 
कोणत्याही वस्तू-सेवा ब्रँडला आपलं वेगळंपण किंवा नावीन्य दाखवून देण्यासाठी उत्तम ग्राफिक डिजाइन हवे असतात. तसेच त्या ब्रँडची मार्केटिंग, प्रोमोशन पब्लिसिटी करण्यासाठी निष्णात डिजायनर हवा असतो. कंप्युटर सॉफ्ट स्किल्स जसेकी फोटोशॉप कोर्लड्रॉव, एल्यूस्ट्रेटर सारखे स्किल्स शिकून तुम्ही ग्राफिक फ्रि लांसर म्हणून काम करू शकता 

4. फ्रीलांस फोटोग्राफर 
डिजिटल युगात प्रेझेन्टेशनला खूप महत्व आहे. आकर्षक छायाचित्र असेलेली वस्तू किंवा सेवा ग्राहकांच्या नजरेत लवकर भरते. उत्पादीत वस्तू किंवा सेवा उठून दिसण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी चांगल्या छायाचित्राची गरज असते. हल्ली सर्वांकडे मोबाईल कॅमेरा असूनही 'हाय पिक्सल' फोटोग्राफी क्षेत्रात खूप वाव आहे. लग्न समारंभात, कॉन्फ्रेन्स, मिटिंग आणि इव्हेंटमध्ये फ्रि लांसर फोटोग्राफरला खूप मागणी आहे.

5. डिजिटल मार्केटिंग कन्सलटन्ट 
डिजिटल युगात आपल्या वस्तू किंवा सेवेची कमीत कमी खर्चात जाहिरात करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा उत्तम पर्याय आहे. अख्ख जग स्क्रीनवर आल्याने सर्व समाजमाध्यमात जाहिरात करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग फ्रि लांसरला खूप मागणी आहे.

हल्ली डिजिटल मीडियात जाहिरात करण्यासाठी छोट्या रिल्सची गरज असते.  त्यासाठी फोटोग्राफर सोबतच व्हिडीओ, ऑडिओ एडिटर, अनिमेशन एक्सफर्ट, 3डी मॉडेलिंग सोबतच प्रोग्रामरची सुद्धा गरज भासते. या सारख्या अशा बऱ्याच सेवा आहेत ज्याचं कौशल्य आत्मसात करुन फ्रि लांसर सेवा देऊ शकतात. किंवा उद्योजक त्या सेवा घेऊ शकतात. एव्हडंच नाही तर अकौंटिंग, बिजनेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डाटा एंट्री, सर्वे अँड प्लॅनिंग, जॉब कन्सल्टन्सी, इन्शुरन्स, टिचिंग किंवा कोचिंग क्षेत्रात सुद्धा फ्रि लांसिंगला खूप मागणी आहे.

फ्रि लांसिंग मध्ये करियर घडविण्यासाठी काही टिप्स :

डिजिटल विश्वात आपली माहिती पुरविण्यासाठी स्वतःचा छानसा पोर्टफोलिओ तयार करुन तुम्हाला येत असलेल्या स्किल्सचा त्यामध्ये उल्लेख करा. गुगल किंवा त्यासारख्या अनेक वेबसाईटवर तुमचा पोर्टफोलिओ टाका जेणेकरून ज्यांना तुमची सेवा हवी असेल ते तुम्हांला ऑनलाईन संपर्क करतील.  हल्ली समाज माध्यम खुपचं प्रभावी आहेत. त्याचा उपयोग करुन अगदी कमी खर्चात तुम्ही लाखो लोकांपर्यंत सहज  पोहचू शकता. वेबसाईट किंवा ब्लॉगमार्फतसुद्धा तुमची माहिती टार्गेट ऑडिन्स पर्यंत पोहचवू शकता. हल्ली मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात उद्योजकांचे कॉन्फ्रेन्सेस किंवा इव्हेंट्स होत असतात. तेथे भेट देऊन तुम्ही तुमच्या सेवेची जाहिरात करु शकता.
गुगलवर काही फ्रि लांसिंग साईटस जसेकी 
एपवर्क (Upwork)
99डिजाईन(99service)
फ्रीलन्सर .(freelancer)
गुरू (Guru)
पीपलपरआवर (Peopleperhour)
फाईव्हरर  (Fiverr)
फ्लेक्सजॉब्स (FlexJobs)  आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कौशल्याची माहिती देऊन सेवा पुरवून आर्थिक कमाई करू शकता 

फ्रि लांसिंग चे फायदे/तोटे 

फ्रि लांसिंगचे बरेच फायदे आहेत. तुम्ही आपल्या सवडीनुसार घरी बसून काम करू शकता. त्यामूळे ऑफिसचा ताणतणाव कमी होऊन तुम्ही वर्क-लाईफ बॅलन्स करू शकता बऱ्याच क्षेत्रात फ्रि लांसर पगारी नोकरापेक्षा जास्त पैसे कमवत असतात. कारण एकाच वेळेस ते अनेक क्षेत्रात कामे करू शकतात. वरिष्ठाच्या दबावात न रहाता तणावरहित वातावरणात फ्रि लांसर चांगले जाम करू शकतात.  फ्रि लांसिंगच्या फायदयाप्रमाणे काही तोटेसुद्धा आहेत. कायम स्वरूपी नोकरीमध्ये मिळणारा मासिक पगार मिळत नाही.  इतर सुविधा जसे की वैद्यकीय विमा, रजा, भत्ते आणि निवृत्तीनंतरची पेन्शन मिळत नाही.  नोकरी म्हणजे फिक्स पगारचं नसेल तर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. 

एका सर्वेनुसार फ्रि लांसिंग जॉब क्षेत्राची उलाढाल आपल्या देशात ५० ०० कोटीची आहे.आज घडीला देशातील काही फ्रि लांसरच सरासरी वार्षिक उत्पन्न २० लाखापेक्षा जास्त आहे. तर काहीनी वर्षाला ४० लाखापर्यंतची मजल गाठली आहे.  एकूण संख्येतील ६०% भारतीय फ्रि लांसर हे ३० वयोगटातील आहे.  बदलत्या जॉब मार्केटमध्ये फ्रि लांसिंग वाढतचं जाणार आहे. स्वमर्जीने काम करुन आर्थिक गरजा पूर्ण होत असेल इतरांच्या बंधनात अडकून काम करने कुणास आवडेल?

गिग इकॉनॉमि 
ज्या गतीने डिजिटल तंत्रज्ञानात क्रांती होत आहे त्यानुसार येत्या काळात जगातील बरीच अर्थव्यवस्था ही 'गिग इकॉनॉमि' कडे शिफ्ट होईल. या अर्थव्यवस्थेत कर्मचाऱ्यांना कोणत्याच बंधनात न बांधता फ्रि लांसिंग, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांच्या सवडी आणि आवडीनुसार काम करुन त्यांना कामाचा मोबदला दिल्या जातो. हल्ली उद्योग जगात हा शब्द बऱ्याचदा ऐकावयास मिळतो. हे दुसरी तिसरी काही नसून फ्रि लांसिंगवर आधारित अर्थव्यवस्थाचं आहे. गिग अर्थव्यवस्थेवर नीती आयोगाने  दिलेल्या रिपोर्टनुसार वर्ष २०२९-३० पर्यंत देशातील २.३५ कोटी कर्मचारी हे गिग अर्थव्यवस्थेत काम करतील.

आज घडीला अमेरिकेच्या एकूण कामगारांपैकी ४० % कामगार गिग अर्थव्यवंस्थेचा भाग आहे. येणाऱ्या काळात या संख्येत निश्चित वाढ होणार आहे. एका सर्वेनुसार येणाऱ्या काळात अमेरिकेच्या बऱ्याच  नोकरवर्गाला फ्रि लांसिंगला शिफ्ट व्हावं लागेल आणि 2027 पर्यंत निम्मा नोकरवर्ग हा फ्रि लांसर असेल. अमेरिका चीन, ब्राझील आणि जपान नंतर भारत हा गिग इकॉनॉमिमध्ये पाचवा देश आहे. ज्यामध्ये फ्रि लांसर, कॉन्ट्रॅक्ट वर्करचा समावेश होतो जे स्वतंत्र काम करत असतात.

तेंव्हा देशातील तरुणांनी फक्त नोकरी एक नोकरी अशी आवास्तव अपेक्षा न ठेवता झालेल्या बदलाचा स्विकार करुन फ्रि लांसिंगच्या क्षेत्रात पदार्पण करावे. 

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर 
   ९८२२१०८७७५









No comments:

Post a Comment