ad1

Wednesday, 4 September 2024

शिक्षक दिना निमित्त..

            
               शिक्षक दिनानिमित्त छोटासा लेख 
                

जीवनमूल्यांची अदभूत शिकवण ❤🌻🦋

बागेच्या बाकडावर निवांत बसलेल्या वृद्धास अचानक एक तरुण विचारतो, 
“आपण मला ओळखल का?”
वृद्ध व्यक्ती, "नाही"
मग तो तरुण आदराने सांगतो कि तो त्यांचा विद्यार्थी आहे. त्यावर  वृद्ध शिक्षक विचारतात,
"काय करत आहात सध्या?”
विध्यार्थी म्हणतो, “सर, मी सुद्धा आता शिक्षक झालो ”.
“अरे व्वा, तुम्ही सुद्धा शेवटी शिक्षकचं, माझ्या सारखे!” 
त्यावर विध्यार्थी म्हणतो, “खरं तर सर शिक्षक व्हायची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळाली ”.
"कसं काय?" सरांची उत्सुकता आता शिगेला पोहचते.
त्यावर तो तरुण त्यांना शाळेय जीवनात घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करुन देतो.

“सर, तुम्हाला आठवत असेल,  शाळेत असतांना माझ्या एका मित्राची घड्याळ चोरीला गेली होती. त्याची तक्रार त्याने तुमच्याकडे केली.  मग तुम्ही वर्गात येऊन सर्वांना ताकीद दिली कि ज्यांनीही त्याची घड्याळ चोरली असेल त्यांनी ती लवकरात लवकर परत करावी.  कुणीच ती घड्याळ परत केली नाही.  तुम्ही लगेच खोलीचा दरवाजा बंद करुन सर्वांना गोल रिंगणात उभं केलं. सर्वांनी डोळे मिटा असं सांगितलं. जो पर्यंत घड्याळ सापडत नाही तोपर्यंत कुणीही डोळे उघडायचे नाहीत असं सांगितलं. एक एक करुन तुम्ही सर्वांचे खिसे तपासले. शेवटी 'घड्याळ सापडली आहे' असं सांगून सर्वांना डोळे उघडण्यासाठी सांगितलं. 

अहो सर, ती घड्याळ माझ्याच तर खिशात सापडली होती !  ती घड्याळ कुणाच्या खिशात सापडली याची वाच्यता तुम्ही वर्गात केलीच नाही. त्या दिवशी माझी मान शरमेने झुकली होती. माझी मलाच खूप लाज वाटत होती. पण सर, भर वर्गात तुम्ही माझा अपमान करण्याचं टाळलं, माझी इज्जत राखली.  या घटनेबद्दल तुम्ही मला एकांतात बोलवून रागावला असता.  पण खरं सांगू, त्या घटनेनी मला खूप काही शिकविलं.  त्याच दिवशी मी ठरवलं आयुष्यात कधीही मी चोरी करणार नाही. त्या घटनेबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे सर.
तुम्हांला ती घटना आठवत असेल ना सर?" 

त्यावर शिक्षक म्हणतात, "होय, हरवलेल्या घड्याळीची ती घटना मला आता नक्की आठवते. सर्वांचे खिसे मी तपासले होते हे सुद्धा मला आठवतं. पण ती घड्याळ कुणाच्या खिशात सापडली ते मला नाही आठवत. कारण विद्यार्थ्यांचे खिसे तपासतांना माझे डोळेसुद्धा बंदच होते!".

जीवनमूल्यांच शिक्षण हे आरडा ओरड, दाब दपट मारझोड किंवा भर वर्गात विद्यार्थ्यांना अपमानीत करूनच द्यायचं असतं असं मुळीच नाही.  शिक्षकांनी त्यासाठी योग्य मार्गाची निवड करायची असते. आणि हे जर शिक्षकांना जमतं नसेल तर त्यांना शिक्षक तरी कसं म्हणायचं?

                  HAPPY TEACHERS DAY 

(लेखकांच नाव माहित नाही. मूळ लेख इंग्रजी भाषेत होता, वाचकांसाठी मी फक्त तो मराठी भाषेत अनुवादित केला आहे... प्रेम जैस्वाल पेडगावकर  ९८२२१०८७७५)


1 comment:

  1. शिक्षक हा देशाचा खरंच आधारस्तंभ असतो एका नवीन पिढीला घडवण्याचा कार्य सातत्याने करत असतो परंतु आज वर्तमान काळामध्ये तो शिक्षक हरवलेला दिसून येतो. खरंतर शिक्षकाबद्दल आदर आज दिसून येत नाही आपल्याला अजूनही जुन्या काळाचे शिक्षक आठवतात त्यांची प्रेरणा त्यांची ती तळमळ या सर्व गोष्टी सरकारमध्ये दिसून येत होती आणि तो विद्यार्थीही तसाच होता आज मल्टीमीडियाच्या युगामध्ये आपण संगणक मोबाईल यांनाच गुरु मानलेला आहे म्हणून शिक्षकाचे स्थान कुठेतरी हरवत चाललेला आहे पण आपण या लेखातून जो चांगला संदेश दिला तो अप्रतिमच

    ReplyDelete