ad1

Wednesday, 4 September 2024

शिक्षक दिना निमित्त..

कापलेला रस्ता जर ओबड-खाबड असेल तर त्या रस्त्यावरील चढ उतार, दगडधोंडी आणि खाच खळगे सर्वच  कायम स्मरणात राहतात. माझ्या बाबतीत थोडं तसंच होतं. विद्यार्थी दशेतील बऱ्या-वाईट आठवणी माझ्या स्मरणात आहेत. भूतकाळात रमायचं कशाला, भविष्याची चिंता कशाला, फक्त वर्तमानात जगा, आनंदी रहा. असं प्रवचन देणारे पुष्कळ मिळतील. पण मी म्हणतो, भूतकाळाच्या पोटातूनचं तर वर्तमान जन्म घेतो ना, मग त्यास विसरून कसं चालेल? आज ५ सप्टेंबर, 'शिक्षक दिन', मला घडवणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना वंदन करून काही शिक्षकांविषयींच्या आठवणी मी येथे मांडतो.

आदरणीय श्री पडोले सर म्हणजे गणित! असं एक समीकरणचं होतं. इयत्ता आठवी नववी धकून जायचं पण दहावी मॅट्रिक उत्तीर्ण होण्याच्या मार्गावर गणित आणि इंग्रजी हे दोन खलनायक आडवे यायचे. ज्यांचे पस्तीस मिळविण्याचे वांधे होते असे विद्यार्थी हमखास गणित आणि इंग्रजीची ट्युशन लावायचे.  पण जे 'हुशार', त्यांचं वेगळं दुखणं, असे महाभाग जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी ट्युशन लावायचेच.

मला आठवतं. भल्या सकाळी डोळे चोळत आमची सायकल 'फटलक फटलक' करत पडोले सरांच्याट्युशन दिशेने निघायची. कधी रामलीला मैदान मार्गे तर क्वचित भारतीय विद्यामंदिर मार्गे सायकलच्या घंन्टीचा घनघानात करत आम्ही सुसाट निघायचो. बऱ्याचदा माझ्या सोबत दिलीप गावडे आणि त्याच्या पाठीमागे बसलेला पण पायाला जरा त्रास असलेला 'दत्तू' देवदत्त देशपांडे असायचा. (आज देशपांडे मोठा गायक व त्याचा सारथी गावडे असिस्टंट कमिशनर!)  प्रभात काळी स्नान करून हातात पंचीपात्र घेऊन पूजा अभिषेकसाठी निघालेली जैन मंडळी दिसायची. त्याचं वेळेस मंदिराच्या भोंग्यातून कवी प्रदीप, श्रीओम शरण किंवा अनुप जलोटाची भक्तीगीत कानी पडायची. कधी 'दुसरो का दुखडा दूर करनेवाले तेरे दुःख दूर करेंगे राम....' तर कधी 'बंदे किस पर करे गुमान तू है दो दिन का मेहमान...' तर कधी 'मैया मोरी मैं नही माखन खायो... अशी भक्तीगीत कानी पडायची. मधूनच गायक अनुप जलोटा 'हिरे-मोती S S SS..... असा लांबलचक मोठा आलाप घ्यायचे. मग त्या लांब आलापात आपन किती मीटर सायकल चालवली याचं मी गणितं लावायचो! आता अशा गोष्टीच हसू येतं, असो.

आमची दुसरी बॅच असायची. प्रश्न-उतराचा ताप नको म्हणून शक्यतो मी मध्यभागी किंवा मागे बसायचो. एक बरं होतं, चालू ट्युशनमध्ये पडोले सर क्वचितचं प्रश्न विचारायचे त्यामुळे ट्युशनबद्दल भिती नसायची आणि सर्वांची उपस्थिती १००% असायची. आमच्या चेहऱ्यावर सहामायी किंवा सराव परीक्षेची भिती त्यांना स्पष्ट जाणवायची. मग ते मधूनच हसत, 'काय जैस्वाल परीक्षा जवळ आली ना? पोटात कसकूनं होतं, नाही का?' आता कळतं कि ते 'कोर्टिसॉल हार्मोन्स' होतं ज्याच्यामूळे आमच्या भितीत वाढ व्हायची. ग्रे बॅगी ट्राऊझर, हाफ असतीनचा पांढरा शर्ट आणि हातात नायलॉनची पिशवी घेतलेले धीपाड देहयष्टी असलेले पडोळे सर जेंव्हा शाळेत यायचे तेंव्हा त्यांची चाल एखादा शांत गजराज झूलत यावा अशी असायची. 

काल हिंगोली येथे संपन्न झालेल्या स्नेहमिलनात कविता हि आदरणीय खिल्लारे सरांची कन्या आहे हे मला माहित पडलं. एका क्षणात मला सर आठवले. मला राहून राहून खिल्लारे सरांची आठवण येत होती. खुपचं दयाळू आणि शांत स्वभावाचे सर आमच्या 'ड' तुकडीचे वर्गशिक्षक होते. ऐन परीक्षेच्या काळात सायकलवरून पडून माझ्या उजव्या हाताचं हाड मोडलं तेंव्हा हाडापेक्षा मला परीक्षेच काय होईल याची चिंता होती. कंदीच्या दवाखान्यातुन पायन्डल रिक्षेत बसून मी सरळ सरांच्या घरी गेलो. अगदी शांत शब्दात सरांनी 'परीक्षेची चिंता करू नकोस, लवकर बरा हो' असा धीर दिला. सहामायीच्या मार्कांच्या आधारे मला उत्तीर्ण करण्याचं आश्वासन दिलं. परीक्षा न देता मला त्यांनी फर्स्ट क्लास मध्ये पास केलं!

मला विशेष आठवण येते ती कुरील सरांची! ते आम्हाला हिंदी भाषा विषय शिकवायचे. स्नेहमिलनात माहित पडलं कि ज्यांची मी कुरेशी म्हणून आठवण काढत होतो ते आदरणीय कुरील सर होते. बऱ्याच जणांना हे माहित नसेल कि सर एक हि रुपया न घेता कृष्णा टॉकीजच्या तलाब कट्ट्याजवळ त्यांच्या घरी हिंदी विषयाची ट्युशन घायचे. त्या काळी शिक्षकाने भाषा विषयात मोकळ्या हाताने गुण देणे निषीध्द होतं, थोडक्यात पापचं म्हणा ना! संपूर्ण मार्कांसाठी हवे असणारे लांब लचक उत्तर लिहिणे विद्यार्थ्यांना जमायचं नाही. कुरील सरांनी आम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण कसं लिहावं हे शिकवलं. माझ्यात ते जरा जास्तच भिनलं. आज जेंव्हा कुणी माझ्या हिंदी लिखाणाची तारीफ करतात, मला आदरणीय कुरील सर आठवतात.

कधी एखादं चित्र किंवा मूर्ती तयार करतांना चित्रकलेच्या जाधव सरांचा गुरुमंत्र मला आठवतो. 'चित्र रेखाटतांना प्रथम डाव्याबाजूने सुरुवात करावी मग उजवी बाजू काढावी.' दोन डोंगर, त्यामधून उगवता कि मावळता सूर्य, समोर एक झोपडी, त्या समोर वाहणारी नदी, आणि त्या नदीत विहार करणारा पण आमच्या सोईनुसार आकार असलेला बदक! हिच काय ती आमची चित्रकला होती. याच्या पुढे सुद्धा काही चित्रकला असते हे आम्हाला माहित नव्हतं. अधून मधून आमचा चित्रकलेचा तास असायचा. थोडी का होईना जाधव सरांनी आमच्या जीवनात चित्रकला उतरवली. त्याचा आजही फायदा होता. 

हातात कनेरीच बेत घेऊन आम्हाला शिस्त लावणारे आदरणीय मोरे सर, अगदी  शांत आणि संयमी स्वभावाचे  तळमळीने शिकविणारे आदरणीय कुलकर्णी सर, एक तासा आधी पूर्ण झोप घेऊन आल्यासारखा, शांत पण गंभीर चेहरा असलेले आदरणीय धांडे सर मला अजूनही आठवता. एनसीसीचे कडक शिस्तीतले पण किंचित अस्पष्ट बोलणारे आदरणीय जाधव सरांना कोण विसरू शकेल? पांढरा शुभ्र ढगळ-वगळ नेहरू शर्ट-पायजमा घातलेले कडक आदरणीय कालिदासरावजी देशपांडे सरांचं गणित कुणीही नं विसरण्यासारखं आहे.

सात समंद की मसि करौं, लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं, तऊ गुरु गुण लिख्या न जाइ॥

किती किती लिहावं. कबीर म्हणतात तसं,'सात समुद्राची शाई, सर्व वनातील लाकडाची लेखणी करून गुरु गुन लिहिताना अख्खी धरती कमी पडेल असा गुरूंचा महिमा काही वाक्यात लिहिणे शक्य नाही.

मित्रांनो, जीवनात वावरतांना फक्त गुरूच आपल्याला शिकवतात असं मुळीच नाही.

जो जो जयाचा घेतला गुण ।
तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण ।
जग संपूर्ण गुरु दिसेll

ऐकून सर्वच गोष्टीचे आपल्यावर कळत नं कळत संस्कार होत असतात. त्यात कुटुंबं, मित्र परिवार, वर्गमित्र, नातेसंबंधित लोकं, न शिकवणारा कर्मचारी वर्ग, शालेय- महाविद्यालयीन मित्र, पुस्तकं,वास्तू, तेथील झाडं इ सर्वच गोष्टी आपल्याला काही नं काही शिकवत असतात. थोडक्यात ते सुद्धा आपले गुरूच कि! आज मी त्या सर्व महान गुरूंचे सुद्धा आभार मानतो ज्यांचे आमच्यावर संस्कार झालेत. जे थोडे वाईट होते त्यांनीसुद्धा आम्हाला 'वाईट काय असते' याची शिकवण दिली, तेंव्हा ते सुद्धा गुरूच!

पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

©प्रेम जैस्वाल पेडगावकर
9822108775 ह मु औरंगाबाद.




No comments:

Post a Comment