ad1

Friday, 16 August 2024

राजकारण नको, न्याय हवा!


राजकारण नको, न्याय हवा!

कोलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयात घडलेली घटना अत्यन्त घृणास्पद असून त्याची करावी तेव्हढी निंदा कमी आहे. देशात एकीकडे महिला सबलीकरण व लैंगिक समानतेचे (Gender Equality) वारे वाहत असतांना देशाच्या नावाजलेल्या वैद्यकीय संस्थेत महिला डॉक्टरसोबत घडलेली ही घटना खूपचं दुर्दैवी आहे.  आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या डॉक्टरांसाठी अशा घटना मनोबल खच्चीकरण करणाऱ्या आहेत. मुळात उच्च वैद्यकीय संस्थेत असा प्रकार घडतोच कसा ? यावर राजकारणाची पोळी न भाजता निपक्ष, सखोल चौकशी होऊन संबंधित आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. त्याशिवाय अशा घटना पुढे थांबणार नाहीत.  

समाजात वावरतांना पदोपदी लोकांना कायद्याची भिती असणे अपेक्षित असते. आणि जेंव्हा ही भिती कमी होते तेंव्हाच अशा घटना घडत असतात. थोडक्यात घटनेच्या मुळाशी गेल्यास लक्षात येते की देशाची ढासळती कायदा व्यवस्था व न्यायव्यवस्थाच यास जबाबदार आहे. आरोपींना कायद्याची भिती राहिली नाही. कितीही मोठा गुन्हा केला तरी आपण त्यातून सुटून जाऊ असा दांडगा आत्मविश्वास असल्याशिवाय असे गुन्हे घडतंच नाही.  अर्थात अशा आरोपीच्या पाठीशी पैसा, पद आणि एखाद्या राजकीय पक्षाच वरदहस्त असतोच.

कालच्या घटनेतील आरोपीचा हा पहिला गुन्हा नसणार. या पूर्वी त्याने बरेच गुन्हे पचविलले असणार.  लहान सहान गुन्ह्यात न पकडल्या गेल्यामुळे किंवा त्यातुन निर्दोष सुटका झाल्यामुळेच त्याने हा मोठा गुन्हा केलेला असणार. गुन्ह्यात निर्ढावलेले आरोपीच असे मोठे कृत्य करू शकतात. त्यातच एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाचा वरदहस्त असेल तर असे लोक न्यायव्यवस्था आमच्या खिशात  आहे, अशा आविर्भावात फिरत असतात. 

पैसा, पद, प्रभूत्व आणि प्रतिष्ठेची नशा इतर कोणत्याही अंमली पदार्थाहून थोडी जास्तचं असते.  या नशेत वावरणाऱ्या लोकांची नशा उतरता उतरत नाही.  कोणत्याही गुन्ह्यातून आपण निर्दोष सुटून जाऊ अशा मस्तीत ते वावरत असतात.  गर्भश्रीमंती असलेला गुन्हेगार महागड्या निष्णात वकीलाची फौज कोर्टात उभी करतो. गुंडाकरवी तो फिर्यादीला नामोहरम करतो, धमक्या देण्यासारखे प्रकरण घडतात.  कायद्याची तोडमोड करुन काही महिन्यांत तो निर्दोष सुटतो.  पहिल्या प्रकरणाचा अनुभव त्याला दुसरा मोठा गुन्हा करण्याचं बळ देतो.  हे चक्र मग थांबता थांबत नाही.  विशेष म्हणजे असेच निर्ढावलेले आरोपी पुढे एखाद्या निवडणुकीला उभी राहतात.  किंबहुना काही राजकीय पक्षाची पात्रता ते पूर्ण करत असतात. विशेष म्हणजे अशाच लोकांना पक्षाचे तिकीट मिळतात.  धार्मिक रंग, पैसा आणि ताकतीच्या जोरावर ते निवडूनसुद्धा येतात.  मग अशाच एके काळी गुंड, सराईत गुन्हेगार असलेला आरोपीच्या पुढे मागे पोलिसांचा ताफा सायरन वाजवत चाललेली गाडी आपण पाहतो.  ही खूप मोठी शोकांतिका आहे.

मागील ७५ वर्षात देशात प्राकृतिक,  सामाजिक, आर्थिक, वैचारिक आणि भौगोलिक असे बरेच बदल घडले झालेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एव्हढी प्रगती केली आहे की मानवजातीच्या वस्तीसाठी वैज्ञानिक इतर ग्रहाचा पर्याय शोधत आहे.  जगात एव्हढे बदल होत असतांना आपल्या देशातील बुरशी लागलेले कायदे मात्र जुनेच आहे. इंग्रजाच्या काळापासून चालत आलेली न्यायसंस्कृती, नियम व कायदे साहेब जाऊन किती तरी वर्ष झालीत तरी आपण काही बदलायला तयार नाहीत.

देशातील न्यायालयात न्याय मिळणं एव्हडं सोपं नाही. गुन्हेगार कोण यावर सर्व अवलंबून असतं. आणि प्रत्येक प्रकरणात देशातील न्यायलयात न्यायदानचं होतं असं नाही तर बऱ्याच प्रकरणात 'अपेक्षित न्याय' घेतला जातो.  बऱ्याचदा 'जस्टीस बरीड' करण्यासाठी जस्टीस हरिड' सारखे प्रकार घडतात.  तर दुसरीकडे 'तारीख पे तारीख' मूळे 'जस्टीस डिले' होत असेल तर सरळ न्यायाधिशाची बदली करुन धार्जिणा व्यक्ती त्या पदावर बसविला जातो. वेळ प्रसंगी पदाचा वापर करुन सरळ सरळ न्यायाधीशालाच धमकी देण्याचे प्रकार देशात घडलेले आहेत.  हेच कारण की लोकशाहीच्या संसदेत बसलेले अनेक नेते आज जामिनावर आहेत. थोडक्यात ज्यांची जागा तुरुंगात आहे अशी मंडळी देशाच्या संसदेत लोकांचे प्रतिनिधी म्हणून बसलेले दिसतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय व न्यायव्यवस्थे सारख्या गहन विषयावर ते चर्चा करत असतात. यापेक्षा मोठी शोकांतिका नाही.

'कायदा सर्वांसाठी सारखा आहे' असं वरवर बोलल्या जात. पण प्रत्येक्षात तसं नसतं. एखाद्या पाकीटमार गुन्ह्याचा सामान्य आरोपी वकीलाची फि देण्यास समर्थ नसल्यामुळे वर्षोन वर्ष तुरुंगात खितपत पडलेला असतो. तर किती तरी खूनाचे गुन्हे पचविलेले सराईत आरोपी देशाचे मंत्रीपद भूषवीत असतात. त्यामुळे गुन्हेगार कोण?  यावर न्याय मिळत असतो असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

कोलकत्ता प्रकरणासारख्या घटना या पुढे टाळायच्या असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.  या प्रकरणाचं पक्षीय राजकारण  करणे म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला सारखा प्रकार होईल.  तेंव्हा हे प्रकरण राजकीय आखाड्यात न ओढता कायद्याच्या चौकटीतं बसवून आरोपीस कठोर शिक्षा द्यायला हवी.  सोबतच लोकांमध्ये कायद्याची भिती निर्माण करायला हवी. त्यासाठी गरज आहे की बदला सोबत बदलण्याची.  कायदा व न्यायव्यवस्थेची करपती भाकर फिरवायची. बुरसटलेले कायदे बदलण्याची. जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्या स्तंभाला अजून मजबूत करायची निकड निर्माण झाली आहे.

© प्रेमप्रकाश जैस्वाल 
छ संभाजीनगर 
9822108775

No comments:

Post a Comment