गावची जत्रा जशी आठवते - भाग १
बऱ्याच वर्षांपासून पेडगावच्या जत्रेला मी गेलो नाही किंवा असं समजा की तसा योग आला नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की पेडगावच्या जत्रेचा मी कधीच आनंद घेतला नाही. बालपणापासून साधारण दहावीपर्यंत मी प्रत्येक वर्षी जत्रेला गेलो आणि मनसोक्त आनंदही लुटला आहे.
आनंदाची व्याख्या व्यक्तिप्रमाणे बदलत जाते. शहरात राहणारे उच्चशिक्षित पुरोगामी उच्चभ्रू लोकं आनंद मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. माया कमवून जस जशी श्रीमंती वाढते तसा आनंदही महाग होत जातो. एखादं मोठं पर्यटन स्थळ पाहिल्याशिवाय किंवा एखादी परदेश वारी केल्याशिवाय त्यांना चैन, मजा येत नाही. पण तेव्हडाचं आनंद एका गावखेडयातील गरीब शेतकऱ्याला गावयात्रेत मिळत असतो. कारण त्याच्या मजेचा कक्षा जत्रेच्या पलीकडे गेलेल्या नसतात. थोडक्यात त्यांचं विश्वच छोटं असतं. आजही गावातील जनता वर्तमानात जगत असताना दिसते त्यांना उद्याची जास्त चिंता नसते. छोटया छोटया गोष्टीत त्यांचं मन आनंदी होतं. पेडगावची जत्रा म्हणजे सर्व गावकऱ्यांच्या आनंदाचा एक उत्सवच. वर्षभर शेतातील काम आणि रोजरोजच्या कंटाळवाण्या कटकटीतुन सुटका मिळून थोडा आनंद भरणारा तो आनंदोत्सव आहे.
वाघामायच्या जत्रेला 'जगदंबादेवीची यात्रा' म्हंटलं तर त्यातील अस्सलपणा निघून जाईल. हल्ली शहरी जीवन दिखाव्याचं झालं आहे. जगण्यातील अस्सलपणाच त्यात राहिला नाही. आजूबाजूचं जग दिखाव्याने भरलेलं वाटतं. पण आजच्या या लेखात मी 'वाघामायच्या जत्रे' चं अस्सल म्हणजे खरंखुरं वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे माझे समकालीन म्हणजे १९६९ च्या पुढेमागे जन्मलेले असतील त्यांना हा लेख ३५-४० वर्षांपूर्वीच्या वाघामायची यात्रा फिरवून आणेलं. 'कालाय तस्मै नमः' प्रमाणे कालांतराने गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनातं बरेच बदल घडले आहे. जीवनमान बरंच उंचावलं आहे, त्यामुळे सध्याच्या जत्रेत आणि मी किंवा आम्ही अनुभवलेल्या जत्रेत बरेच बदल घडले असतील, असं मला वाटतं.
रूढी, परंपरा आणि विश्वास या पुढे तत्वज्ञान, तर्क, विज्ञान आणि विवेकवाद याच काही चालत नसतं. त्यामुळे गावखेड्यात जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते पुढे हि असंच चालत राहणार. वाघमायची जत्रा त्याला अपवाद नाही. वाघामायच्या जत्रेच्या काही दिवस आधीच गावाकऱ्यांना जत्रेचे वेध लागायचे. शेतकरी शंकरपटात धावण्याजोग्या चांगल्या गोऱ्ह्याची निवड करत असत. धावणाऱ्या जोडीच्या ,' खुराक' खाण्यापिण्याची जरा जास्तच सोय व्हायची. हौशी शेतकरी सुताराकडून शंकरपटासाठी वजनानी हलका-फुलका खासरा किंवा छकडा, कासरा, टोकदार पुराणी याची तयारी करायचे किंवा त्याची दुरुस्ती करायचे. सर्व तयारी जोरात चालायची. मग ज्यांना वाघामायचे नवस फेडायचे अशी मंडळी आधीच आपल्या आयपतीप्रमाणे लहान-मोठं बकरं 'बुक' करून ठेवायची. परिस्थिती असो वा नसो गावच्या वाघामायचा नवस लोकं चुकवत नसत, नाहीतर वाघामाय कोपेल अशी भीती. ज्यांना घडतं नसे ते ' पैशे मुंगा-उडदावर नखंर कापसावर देईन, मी कुठं पळून चाललो का ?' असं वचन देऊन सावकाराकडून उधारउसनवारीने नवस पूर्ण करत. त्यासोबत आधीच दारूची सोय केल्या जाई. मग पिणारे हौशी ओढ्या-नाल्यात मोहादारू काढून आधीच 'पहिल्या धारेच्या' बाटल्या भरून ठेवत. नव्यानं उजवलेल्या सासुरवासण्या पोरींना माहेरच्या जत्रेचे वेध लागे. जत्रे निमित्त चार दिवस का होईना एक परम सुखाची माहेरची वारी होईल अशी त्यांना आशा असे. मग कधी बाप सासरी येईल आन जत्रसाठी माहेरी घेऊन जाईन असं वाटे.
लहान असल्यामुळे जत्रेची पूर्वतयारी आमच्या समजण्या पलीकडची असायची. फक्त एव्हड समजायचं की ढगळवगळ पायजमा सदरा, डोक्यावर रुमाल गुंडाळलेला गाव-हवालदार लगबघीने गावातील गल्ल्यात फिरून गावातील प्रतिष्टीत मंडळींना कुठे तरी जमवायचा. थंडीच्या दिवसात सकाळचं कोवळं ऊन खात हि चर्चा मारुतीच्या पारावर किंवा इतर कुठेतरी व्हायची. आता वाटतं ते जत्रेच काही तरी नियोजन करत असावे. पण आम्हाला जत्रेबद्दल कळायचं ते फक्त 'हिंद प्रिंटिंग प्रेस' मध्ये छापलेल्या अतिपातळ गडद गुलाबी, पिवळे, लाल व जांभळे पाम्प्लेट हातात आल्यावरच. त्यावेळी आजच्या सारखे 'फास्ट कम्युनिकेशन' ची साधन नव्हती. पोस्ट नव्हतं की फोन नव्हते. त्यामुळे 'फणाल्या गावच्या यात्रेला कुणी जात असंल तर पाम्प्लेट पाठवा रे' असं करून पाम्प्लेट पाठवले जायचे. त्याकाळी एसटी बस बेभरवशाची होती त्यामुळे इतर गावाचे पाम्प्लेट पाऊलवाटेंने कुणीतरी गावात घेऊन यायचे. पेडगावच्या पुढे मागेच ढोलम्बरी, भटसांवगी सारख्या सभोवतालच्या गावाच्या जत्रा असायच्या. हल्ली जसे आयपीएलचे सामने होतात तशी एका मागून एक सभोवतालच्या गावच्या जत्रा भरायच्या. मग गावातील बाया, लहान मोठी पोरं जत्रेची मजा लुटण्यासाठी किंवा खर्चासाठी आधीच पै पै जमवून ठेवायची. कुणी 'कापूस इकुन'कुणी थोडं धान्य इकून, मोलमजुरी करून जत्रेच्या तयारीत जुंपायची. आम्ही पाच पाच दहा दहा पैसे जमा करून ते एखाद्या डब्यात, उतरंडीच्या एखादया मटक्यात लपवून ठेवत असू. जत्रेत काय काय खरेदी करायचं ते आधीच ठरलेलं असायचं. परिस्थिती कशीही असू दया, कर्ज उसनवारी करून का होईना गाव-खेड्यात सण साजरे होतातच, मग जत्रा तर गावातला मोठा उत्सव त्यामुळे कुठेही कसर सोडली जात नसे.
अशा तयारीत गाव असताना जत्रेचा तो पहिला दिवस उगवत असे. वाघामायचे नवस. 'देवावर भार ठेवोनिया' प्रमाणे गावातील सुखदुःखे जनता वाघामायच्या हवाली करायची. चांगलं झालं ते वाघामायच्या नवसं कबूल केल्यामुळं. ग्रामीन भागात नवस करण्यात महिला खूप पुढे असतात. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मापासून मरेपर्यंत महिला आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. संसारिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना अनेक दुःखाचा सामना करावा लागतो. ती एक अस्थिर तारेवरची कसरतचं. सासरी नांदणाऱ्या महिलांना आपल्या पती, मुलाबाळासह आपल्या माहेरच्या लहान भाऊ-बहीण, आई-वडिलांची आणि एकंदरीत सर्वांचीच काळजी लागलेली असे. काही आयाच्या चिंतेचा 'कव्हरेज एरिया' एव्हडा दूर पर्यन्त पसरलेला असायचा की त्या आज्याना आपल्या नातवाच्या कुटुंबाचीसुद्धा फिकीर लागलेली असे. मग त्या नातेच सासर कुठं का असेना, ती आजी तिला पेडगावच्या वाघामायचा नवस कबूल करायला बोलवत असे. 'माय म्हया पोरीलं पोरगं होउदे, 'म्हया भावाचं दुखन बरं कर,' 'माय म्हया पोरीच्या पोरील लई पोरी झाल्या,एक पोरगं होउदे' असा नवस कबूल करायच्या. यात गावातील कोणताच समाज मागे नव्हता. मग तो बंजारा असो की हटकर, आदिवाशी असो की मराठा, कलाल असो की राजपूत, वाघामाय सर्वांचीच. मग गावातील बंजारा महिला 'वाघायाडी मार छोरीनं आजी एक छोरा व्हेयद याडी' 'मारं भियार घणो दुःखरंच, घणे पिसा लागगे याडी' या बिचाऱ्या भाबड्या बायकांना हे नाही कळायचं की उद्या हा भाऊ बरं झाल्यानंतर तुला विचारणारसुद्धा नाही. पण आई-बहिणीची माया वेडी असते. माझ्या आईनं भारतात कुठे तरी भूकंप झाल्याचं ऐकलं होतं. तिला माझी फिकीर. तिनं लगेच नवस कबूल केला की 'वाघामाय मला पोराला काय होऊ देऊ नको, मी त्याच्या भारोभार गूळ वाटिन आन एक गाईचं गोऱ्ह दान करीन.' नवस तर कबूल केला पण काही कारणाने बरेच वर्ष तिचा हा नवस पूर्ण करायचा राहूनच गेला. मग माझ्या लग्नानंतर तिनं तो नवस फेडण्याचा ठरवलं. मग काय, वाघामाय मंदिरासमोर एका तराजूत मी आणि दुसऱ्यात ६७ किलो गूळ. माझ्या भारोभार गूळ गावभर वाटण्यात आलं. तसंच एक गोऱ्ह मोकाट सोडून देण्यात आलं. मला मात्र आईचा तो अहिंसक, शाकाहारी नवस फार आवडला. नंतर कळालं की त्यासाठी नवस झाला तो भीषण भूकंप गुजरातच्या भुजमध्ये झाला होता, मी राहत असलेल्या मुंबईपासून ८५० किमी दूर! तर असं, या ना त्या कारणाने लोकं वाघामायला नवस करायचेच. लोकांच्या सर्व बिकट समस्येवर एकच उपाय असायचा - वाघामायची पूजा किंवा नवस.
जत्रेचा पहिल्या दिवस म्हणजे वाघामायचे नवस. नवसाच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर गावातील उत्सवाला उधाण यायचं. गावभर जाणकू-सटवाच्या डफड्याचा आवाज येई. गावातील वातावरण बदलून जायचं. ज्यांच्या घरी नवसाच बकरं कापणार अशा घरी जवळच्या पाहुण्यारावळ्यांची रेलचेल असायची. जवळचे सग्गेसोयरे, खास करून पोरी-जवाईबापू, 'इव्हाही' हजर असायचे. मग ही सर्व मंडळी हातात लाल झेंडे घेऊन सोबत दावणीला बांधलेला बोकडं घेऊन वाजत गाजत निघायची. जाळावर तापवलेलं जानकूच डफडं 'डंगलंग व्हकलंन्ग डंगलंग व्हकलंन्ग करत पुढं चालायचं. लहानसहान पोरं लाल झेंडे, निशाण घेऊन पूड पुढं मिरवायची. मागे म्यांss म्यांss करणार बकरं घेतलेली पुरुष मंडळी, नवीन नऊवारी साड्या, हातभार बांगड्या आन आणि डोक्यावर पदर, पूजेची थाळी घेतलेल्या महिला व पोरंसोर असायची. उगीच इतर देवाची नाराजी नको म्हणून वाघामायच्या वाटेवर सत्यामाय व सैलानीची पूजा व्हायची. कदाचित बोकड्याला त्याच्या भविष्याची जाणीव व्हायची म्हणून त्याचे पाय पुढं पडत नसंत, बऱ्याचदा तो म्यांss म्यांss ओरडत पाय जमिनीला रोवल्यावाणी जागेवरुन हालत नसे. सत्यामाय पासून वाघामाय पर्यन्त रस्त्यावर सर्वत्र लालझेंडे घेतलेली पोर माणसं अशी गर्दी दिसायची.
सैलाणीच्या थोडं पुढं 'गाडा ओढण्यासाठी' गावातील काही बैलगाड्या एकमेकाला बांधून ठेवलेल्या असत. लहानपणी आम्ही त्या गाड्यात बसायचो. मग ज्याची गाडे ओढण्याचा नवस केला तो गाडा ओढत असे. त्याला थोडं सोपं जावं म्हनून इतर लोकं थोडा हातभार लावायची. हर हर महादेव, हर हर महादेव गाडे ओढणार गाडे ओढत. आमची थोडी पाळी व्हायची, शिरणी-गुळाचा प्रसाद खायला मिळे. जानकूच्या डफड्याचा 'डंगलंग व्हकलंन्ग डंगलंग व्हकलंन्ग' असा आसमांत गुंजनारा आवाज, दोरीला बांधलेले अनेक बोकडं, हातात लाल निशाणी झेंडे घेतलेले पोरं, नवीन कपडे घातलेली नवसा घरची मंडळी, त्यात कुंकुनी माखलेली त्यांची कपाळ अशी जत्रा निघायची.
आमच्या घरासमोर बैठक म्हणजे गावाच्या पश्चिम दिशेचं प्रवेशद्वारचं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जत्रा आम्हाला दिवसभर बघायला मिळायची. गावातील वृद्ध, प्रतिष्ठीत मंडळी कायम त्या जोत्यावर बसून असायची. बिडया फुकतं, तंबाकू-सुपारी चघळत विविध विषयांवर गप्पा मारत बसायची. मोहनसिंगकाका, मेंबर हरसिंगकाका, नथुभैया रेखा, किसन आमरुकाका, आमचे वडील-दादा, काका, गना गव्हाळेमामा, द्वारकामामा, गंगाभैया अशी अनेक प्रतिष्ठीत मंडळी बैठकीच्या जोत्यावर बसलेली असायची. आदिवासी समाजातील तसेच दोन्ही तांड्यातिल बायकांचे घोळके धुरडा उडवत वाघामायच्या दर्शनाला निघायचे. बंजारा समाजाच्या आयाबहिणी कचोली-घागरा, गळ्यात काळी पोत, हातात पाटल्या व पायात कडे डोक्यावर रोवलेले दोन शींगे, त्यावर खालपर्यंत लोंबलेली चुनरी किवा ओढनी असा त्यांचा पेहराव असायचा. अशी पारंपारिक वेशभूषा करून लगबघिने जत्रेला निघायच्या. त्यात लहान मोठया सर्वच पोरीसोरी असायच्या. बैठकीजवळ आल्याबरोबर त्या आवाज न करत लाजून भरभर चालत निघायच्या. जोत्यावर बसलेले आमचे दादा तांबडा पटका सावरत मोठ्या आवाजात विचारायचे, 'इ दी छोरी तारं कांई बेटा ? त्यावर ती बया हसून म्हणायची,' हवं काका, इ दी मार छ,इ दी नानक्या वरलील, ये दी छोरा परलीलं छ'. मग कोणीतरी नवसाबद्दल विचारालं तर त्यावर ती बाई म्हणायची, ' दी वरस वेगे काका, मारं छोरारं पेटे मांई घन्नो दुकरचं हिंगोली नांदेड से वेगे, घणे पिस्सा खर्च व्हेगे, कांयी फरक छेयी, जेती आब से वाघायाडीरे हातेमं आन उच् टाळेवाळ!' अज्ञानात सुख असतं ते असं.
तर अशी ही गर्दी उत्साहात वाघामायच्या मंदिरासमोर जमा व्हायची. सर्व लोकं वाघामायची पूजा करून मनोभावे पाया पडतं. माया नववारी साडीचा पदर हातात घेऊन, 'वाघामाय, लेकराबाळालं सुखी ठेवं' असं म्हणून पाया पडायची. मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात खाटीक पाणी टाकत टाकत चाकू घासत बसलेला असे. दुसरीकडे नारळ फोडले जायचे. मग बोकड्याची पूजा करून त्यावर पाणी शिपडलं जाई. अर्थात त्या थंड पाण्याला तो 'रिस्पॉन्स' म्हनून अंगावरून उडवून देण्यासाठी बोकड आपलं अंगाची कातडी हलवत असे. या प्रकारालाच ' बोकड्याने 'झडती' दिली, नवस कबूल झाला!' असं समजत खाटीक लगेच बोकडयावर सूरी चालवत असे.
कापलेल्या बोकडाचं रक्त देवीला वाहून मग त्याचे चारही पाय एका दोरीने उलटे लाकडाला बांधून दोन माणसं मोठ्या लगबघीने त्याला घरी आनत. ते दोघे एव्हडया लगबघीने का चालंत असावे? याच उत्तर मला अजूनही कळलं नाही. बरीचशी 'देशी' प्रिय मंडळी दुपारपासूनच 'रिचार्ज' मारत 'फुल्ल' असायची. एखाद्या ओसरीत नाहीतर जनावरांच्या कोठयात त्या नवसाच्या बोकड्याची चिरफाड होई आणि गावात वाटण्यासाठी मटणाचे काही हिस्से पाडले जात. एखादा मांसाचा तुकडा- हाडुक मिळलं या आशेनं गावातील कुत्रे सतत जीभ काढत त्या कोठ्याजवळ उभी राहत.
इकडे मटणाची तयारी होत असताना तिकडे बाया 'कोडड्यास' करण्यासाठी शिळवटावर तिखटमसाला काळमीरे वाटण्याची घाई करत. त्या दिवशी गावभर सर्व गल्ली-बोळीत मटण शिजण्याचा सुवास येई. जवळजवळ सर्वच घरात मटण शिजत असे. मग पिणारी मंडळी आपल्या 'उद्योगात' गुंग होत असे. कोणी मोहा-हातभट्टीची कुणी देशी घेत. मग या खाण्यापिण्याच्या उत्सवात न पिणारी पोरंसुद्धा कधी कधी बाटली जायजी. 'आरं उलुकशी पी काय व्हतं नाही' असा आग्रह करत न पिणाऱ्यालाही सराईत मंडळी थोडी दारू पाजत. पूर्वी आमचं देशीच दुकान होतं. नवसाच्या दिवशी सर्व वयस्कर गावकरी दुकानात गर्दी करत असत. त्यात डफडं वाजविणाऱ्या पासून सर्वच पिणारी मंडळी दुकानात येत. आलेल्या पाहुण्याला गावकरी मोठया आग्रहाने दारू दुकानात घेऊन यायचे. जत्रेसाठी आलेली फुटानेवाली नवसाच्या दिवशी गावात पाराजवळ फुटाणे विकायची. मग पिणारे पेपर,धोतरात गुंडाळलेले फुटाणे, भारत-बबूलालाचे नरडे, चिवडा किंवा क्वचीत सुक्का बोंबिल आणत. मनसोक्त गप्पा मारत, चिल्लमी-बिडीचा धूर काढत एक मेकाला आग्रह करत हि मंडळी दारू ढोसत. खूप चढल्यानंतर पाहुण्याला आग्रहाना पाजण्याचा कार्यक्रम होत असे. लोकं जावईबापु आनं 'इव्हायी' च्या खातीरदारीमध्ये काही कमी पडू देत नसत. कंदील चिमण्यांच्या मिनमिनत्या अंधुक प्रकाशात फुरके मारत मटणाच्या कोड्ड्यास-भाकरीच जेवण होई. बऱ्याचदा नवसाला आलेल्या पाहुण्याला 'फुल्ल' पाजून, मटणाचा पावणचार करून गावातील एखादी सोयरीक जुळविली जायची.
एकंदरीत, जत्रेचा पहिला दिवस भरपूर दारू पिऊन मटण खाण्याची चंगळ यातच जात असे. कधी कधी दारू पिणारे आपसात भांडण-तंटा करीत पण असली प्रकरण गावातच मिटवल जाई. काही प्रकरण घडून गावाची शांतता भंग होऊ नये म्हणून बासंबा पोलीस स्टेशनहून दर वर्षी एक-दोन पोलीस शिपाई गावात येत. बऱ्याचदा बंदोबस्त करून थकलेले पोलीस गावच्या रंगामध्ये रंगून गेलेली मी पाहिली आहे. कधी कधी तेसुद्धा 'फुल्ल' होत. अर्थात त्यानंतर पोलीस पाटलाला गावातील शाळेवर त्यांच्या कोंबड्याची व्यवस्था करावी लागे. अशा प्रकारे - देवीची पूजा करून, नवस फेडून, मनसोक्त खाऊनपिऊन तृप्त होऊन लोकं जत्रेचा पहिला दिवस साजरा करत. दुसऱ्या दिवशी लोक उरलेल्या खुर-मुंडीचा समाचार घेत. पुढील चार दिवस गावात अशीच धूम असे.
ज्याप्रमाणे धगधगत्या मातीच्या चुली-निखाऱ्यावर भाजलेल्या 'भाकरी' ची सर गॅसवरच्या 'ज्वारीच्या रोटी ला येऊच शकत नाही त्याचप्रमाणे गावाच्या यात्रेची सर शहराच्या आनंदनगरीला येणे शक्य नाही. १९७८ च्या काळात बोटावर मोजावे एव्हडयाच लोकांच्या 'पोटावर हात' असायचा बाकी सर्वांची 'हातावर पोट' असायची. मोलमजुरी कष्ट करून कमवणे आणि मगच खाणे. दैनंदिनच्या गरजांच पूर्ण न होत असल्याने मागे काही शिल्लक ठेवणे शक्य नव्हते. गावात सर्वत्र कुडानं-तुरहाट्याची माती शेणाने सारवलेली बसकी घरं होती. गावातील कित्येक घरांना कुलूपच नसायचे. गावात लाईट नव्हती, रेडिओ नव्हता की सायकल. धोतर पांढरा कुर्ता किंवा चिकनी सुताची बनियन हाच पुरुषी पोषाख होता. क्वचीत एखाद्या शिकल्या गडीकडे 'बेळफाटी' म्हणजे पायजामा असायचा. आर्थिक परिस्थिती गरीब असूनही गावात एकोपा होता. शिक्षणाचा दर्जा उत्तम होता.
आज सर्वत्र दारूबंदीची चर्चा आहे. त्या काळी अशा बंदीची गरजच पडली नाही. 'अति सर्वत्र वर्जयेत' प्रमाणे जर अति होत असेल तर वेळीच पाऊल उचलणे योग्य. कारण पूर्वी गावात खूप कमी कष्टकरी लोक दारू पित. शेतावर, रानमाळावर काबाडकष्ट करून, दिवसभर विहीर खोदून, खंटी खोदून काम करून थकलेले गावकरी शिन घालविण्यासाठी दोन घुट पोटात टाकायचे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसाच नसल्यामुळे त्याकाळी कुण्याही पोरांसोराना चैनीखातिर दारू पिताना मी तरी पाहिलं नाही. कदाचीत त्यामुळे आज गावातील बरीच मुलं उच्चशिक्षण घेऊन चांगली नोकरी करत असावी. हल्ली गाव सधन झालंय. भौतिक सुख घराघरात लोटांगण घालत आहेत. आधुनिकीकरनामुळे सर्व शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध असल्यामुळे कष्ठाची कामे उरली नाहीत. पण ती आधुनिकता विचारात आली नाही त्यामुळे गावात चैनीखातीर पिणारी युवा मंडळी वाढली आहे, असं मी ऐकून आहे. त्यातच मोबाईलच्या 'फ्री डेटा' ने त्यांना निष्क्रिय केलं आहे. पुढे येणाऱ्या काळासाठी हि एक धोक्याची चाहुल आहे. त्यामुळे 'उद्या गावाचं म्हणजेच देशाच भविष्य ज्यांच्या हातात' अशा युवकांनी वेळीच त्यातून सावरने आवश्यक आहे. माझे हे वैयक्तिक मत.
©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह मु औरंगाबाद ९८२२१०८७७५

Superb
ReplyDeleteप्रेम भैया यांनी लहानपणाच्या आठवणीला उजळणी करून दिली खूप छान पद्धतीने गावातील जत्रा जशीच्या तशी उभेहोक मांडणी केली मी जत्रेमध्ये फिरत आहे असंच वाटतं होतं प्रेम भयाने एवढं जुन्या आठवणी मनामध्ये साठवून ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे शेलूट करतो आपल्या या लिखाणाला आठवणीला
Delete