ad1

Friday, 22 May 2020


                  

           कोरोना  काय शिकवतोय?

नुकताच मधुमेह रुग्ण झालेल्या माझ्या मित्राला मी खूप आस्थेने विचारलं,  मधुमेहाने तुला खूपच त्रास होत असेल नाही? या आजारांने तुझ्या जीवनावर खूपच निर्बन्ध लावले असतील. त्यावर त्याच उत्तर होतं- मुळात मधुमेह हा आपल्याकडे मित्र म्हणून येतो. माझी आत्तापर्यंतची जीवनशैली खूपच चुकीची होती म्हणून मी मधुमेही रुग्ण झालो. आता हा मित्र माझ्या सोबत राहणार आहे त्यामुळे माझं जीवन आता अतिशय शिस्तबद्ध झालं. मी नित्य नियमाने योगा-प्राणायाम, व्यायाम करतो. प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून शरीरासाठी जे योग्य तेच खातो. शरीराच्या प्रत्येक अवयवाची योग्य काळजी घेतो, इत्यादी इत्यादी. यदा कदाचीत माझ्या मधुमेहाच निदान झालं नसतं तर माझ्या जगाण्यात शिस्त आली नसती. पुढे कदाचित मोठ्या संकटाला मला तोंड द्यावं लागलं असतं. हे एकूण मी चाट पडलो. या मधुमेहामुळे खचून न जाता माझ्या मित्राने त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने बघितलं होतं. म्हणजे हा मधुमेह त्याच्या जीवनात एक गुरु होऊन आला आणि त्याने त्याला सुतासारखं सरळ करून टाकलं. जे काम इतर कुणीला जमणार नव्हतं, ते त्या मधूमेहानं केलं! थोडक्यात जीवनातील संकट आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी आलेली असतात.  अर्थात हा लेख कोरोना विषाणूमुळे झालेल्या आपल्या जीवनातील बदला बद्दल आहे.

तसं कोरोना पूर्वीच आपलं जीवन खरोखरच खूप शिस्तप्रिय होतं का? किती जण आपले घाणेरडे हात  नित्य नियमाने स्वच्छ धुवायचे? किती कुटुंब आपलं घर स्वच्छ ठेवायचे?  आज कोरोना वगळता देशात इतर आजाराचे रुग्ण अत्यल्प आहेत. कारण आहे- आपलं सततच निर्जंतुकीकरण,शुद्ध हवा, सात्विक घरचं जेवण आणि उत्तम जीवनशैली. 'आरोग्यम धन संपदा' हे आता आपल्याला कळून चुकलं, किंबहुना कोरोनाने ते आपल्याला शिकवलं!     नाहीतर पोटात थोडी कळ आली की आपण इस्पितळ गाठायचो.  मग सुपर-स्पेशियालिस्ट, टेस्ट, सोनोग्राफी आणि शस्त्रक्रिया अशा त्या खर्चिक दुष्टचक्रात अडकुन पडायचो. मग या चक्रातून तुम्हाला कुणी मुक्त केलंय? यापुढे शासनाच्या बजेटमध्ये आयोग्यविषयीचा खर्चात मोठी वाढ होईल. तसं देशाची आरोग्यव्यवस्था सुुुधारन्याचं श्रेय कोरोना विषाणूलाच जातं.

कोरोना हा कुणालाही सहज होणारा आजार नाही. जर तुम्ही शिस्तबद्ध आयुष्य जगत आहात, नियमाच काटेकोर पालन करत आहात तर तो विषाणू तुमच्याजवळ फ़िरकनारच नाही. तो स्वतः होऊन शरीरात शिरत नाही. नित्य व्यायाम, प्राणायाम, आहार-विहारात बदल केल्यास आपण त्यापासून मुक्त राहू. आणि यदा कदाचित तो शरीरात शिरला तर उत्तम प्रतिकारशक्तीने तुम्ही त्यावर सहज मात करू शकता.

भौतिक सुख आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या मोहात अनेक कुटुंब गाव-खेड्यातूंन शहराकडे वळली. एकत्रित कुटुंब व्यवस्था काळात जमा होऊन विभक्त कुटुंब तयार झाली. घरची सुखाची भाकर सोडून, वृद्ध माता-पित्याला आहे त्या अवस्थेत सोडून ती शहराकडे वळली. 'माझं मौतीलं येणं होत नाही, मला फक्त अंत्यविधीचा व्हिडिओ पाठवा' येथंपर्यंत या नवीन पिढीची मजल गेली होती. अशा वाया गेलेल्या पिढीचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी एखाद्या विद्वान गुरूची समुपदेशन विद्या कमी पडली असती.  आज कोरोनामुळे का होईना अशा कुटुंबातील सदस्याना गावाची आठवण झाली. मुलं-सुना शेकडो मैलाची पायपीट करून गावाकडे वळली. चटणी-भाकर खाऊनच पण आज माय-बाप, मुलं-सुना, आणि नातवंड एकत्र जेवताना दिसत आहे. गांधीजी आणि आताच्या काळात सर अब्दुल कलाम नेहमी सांगत,'खरा भारत खेड्यात आहे'. पण लोकांचे कान बधिर झाले होते. चांगली बागायती वहितीची जमीन विकून लोंढा शहराकडे वाहत होता. गावात शेतंकामासाठी मजूर मिळत नव्हते. शहरी मंडळी मूळ गावाकडे वळल्यामुळे पुन्हा गाव-खेड्याला तसेच शेतीला 'अच्छे दिन' येण्याचे चिन्हे दिसत आहे. कुणामुळे हे घडलं 
सार ?

'आजी, आमच्या उठण्या आधीच सकाळी बाहेर जाणारे आणि खूप उशिरा घरी परत येणारे ते पुरुष व महिला कोण गं? 'बेटा ते तुझे ममी-पप्पा आहेत' हा मार्मिक संवाद आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या कुटुंबाचा. असं म्हणतात,  मुंबईमध्ये तर पुढचा पाय मागच्या पायासाठी थांबत नाही. या मायानगरीत मुंबईचे चाकरमाने म्हणजे चालते-बोलते यंत्रमानव. टार्गेट, कामाच्या तंद्रीत त्यांची संवेदनशीलता, भावना लोप पावून ते स्वकेंद्रित बनतात. पैसा आणि यशाचं शिखर हेच यांचं जीवन. खरं जीवन म्हणजे काय हे त्यांच्या ध्यानीमनी नसते. त्यांच्या विचारांची कक्षा स्वतःच कुटुंबासाठी नोकरी-व्यवसाय व पैसा याच्या पलीकडे वाढतच नाही. या टाळेबंदीमध्ये असे यंत्रपुरुष आज घरी असतील. मुलांना ममी-पप्पासोबत खेळण्याचा वेळ मिळाल्याचा आनंद होईल. मुंबईकराना घर काय असतं हे कोरोनाची समजावून दिलं.

या विश्वाचे आम्हीच स्वामी. अशा अविर्भावात मनुष्य या जगात वावरत होता. आपल्या स्वार्थासाठी आम्ही नद्या-जंगले सपाट करून शेती केली. मुक्या प्राण्यांना बंद कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या ठिकाणावर एसईझेडच्या नावावर लाखो किमी वर्ग जंगल नष्ट करून ते उद्योजकांचा घशात टाकलं.  प्रदूषण वाढवून वातावरण दूषित केलं.  स्वच्छ गंगेमध्ये, घाण पाणी, उद्योगाचं घाणपाणी, आणि कर्मकांडाच्या नावावर इतर घाण टाकत राहिलो.  गंगा स्वछतेच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला पण स्वच्छ गंगा हि फक्त कल्पनाच राहिली होती. आज ती स्वच्छ वाहती आहे.  या उपद्रव्यास रोकणाच्या शक्ती फक्त कोरोनातच होती. विमानाचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञानी पक्षाच्या उडण्याच्या तंत्राचा अभ्यास केला. कालांतराने मनुष्याच्या विमान उडान प्रवासात उंच उडणारे पक्षी हेच अडचण होऊ लागले. मग पक्षांना दूर करणारे यंत्र विमानात लावण्यात आले. किती हा स्वार्थीपणा. आज जगातील सर्व विमानं जमिनीवर आहेत!

स्वदेशीचा वापर केल्याशिवाय आपला देश पारतंत्र्यातून मुक्त होणार नाही म्हणून बाळ गंगाधर टिळक, वि.दा. सावरकर  आणि गांधीजीं सारख्या राष्ट्रपुरुषांनी जीवाचे रान केले. स्वातंत्र्य मिळताच आपण या राष्ट्रपुरुषांची शिकवण विसरून इंग्लिश ब्रँडच्या वस्तुकडे वळलो. कालांतराने स्वदेशी उद्योग बंद करावे लागले. परदेशी जाणाऱ्या पैशाचा ओघ वाढतच गेला.  प्रत्येक गोष्टीत आपण हिंदू संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीला जवळ केलं. आज कोरोनामूळे का होईना सगळीकडे आत्मनिर्भर व स्वदेशीचा नारा ऐकू येत आहे.

घरपण काय असतं हे कोरोनाने शिकवलं. बऱ्याच मुलांनी आपल्या आईंना स्वयंपाकात मदत करून स्वतःच स्वयंपाकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल. सर्व कुटुंबातील सदस्यानी मिळून मिसळून लाल-पान सत्ती, कॅरमचे डाव खेळले असतील. सतत जंकफूड खाणाऱ्या तरुण मंडळींना घरच्या जेवनाचं महत्व समजलं असेल. तंबाकू, मद्याची उपलब्धताच नसल्याने कितीतरी लोक नशेपासून दूर गेले असतील. आज देशात हजारो संस्था नशामुक्ती क्षेत्रात काम करत आहेत. जे त्यांना जमलं नसेल ते कोरोनामुळे साध्य झाले आहे.

मृत्यू अटळ आहे. पण जाणारा मागे राहणाऱ्याचा खर्च वाढवून जातो. गावातील गरीब मंडळी मृत्यू नंतरचे कर्मकांड करण्यासाठी कर्जबाजारी होते. किती तरी संत या विषयावर प्रवचन, जनजागृती करून गेलेत. आज तो प्रकार बंद झालाय. विवाह समारंभात आयुष्याच्या कमाईचा मंडळी एका दिवसात चुराडा करत होती. एका दिवसात १ कोटी रुपये खर्च करण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. आज २५-५० लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत आहेत. असंच पुढं चालत राहिलं तर लाखो कुटुंबाचा पैसा कर्मकांडात खर्च होवून ते कर्जबाजारी होणार नाहीत. शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील. कोरोनाची हि शिकवण आपण पुढे कायम स्मरणात ठेवायला हवी.

शेवटी आपण एव्हडच समजून घ्यायला पाहिजे की कोरोनाच्या किती तरी चांगल्याही बाजू आहेत ज्या सूक्ष्मपणे बघितल्या तर दिसतील. ' शतदा प्रेम करावं असं जीवन काय आहे' हे या काळात आपल्याला कळलं. हवेत उडणार आपलं महत्वकांक्षी विमान त्यानं चक्क जमिनीवर आणून उभं केलं. तो आपल्या वाईट सवयी सुधारण्यासाठी, जीवनशैली सुधारण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी आला आहे. जातांना किंवा सोबत राहताना कोरोना आपल्याला चांगल्या सवयी लावून देईल.  ज्याचा आपलं जीवनमान उंचावण्यासाठी फायदाच होईल.

आज माहिती तंत्रज्ञानाने अचाट प्रगती केली आहे. यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता व सॉफ्टवेअरची जोडजाड करून आपण किती तरी गोष्टी सोशल-डिस्टनसिंगच तंतोतंत पालन करू शकतो. मानवजातीला पर्याय म्हणून समोर आलेलं हे तंत्रज्ञान मानवजातीच्या बुद्धीचं महत्व कमी करणारं आहे, यात शंका नसावी.  कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मनुष्यजात बंदिस्त होऊन स्वयंनियंत्रित नसलेले सर्व उद्योग थांबले.  त्यामुळे येणाऱ्या काळात ऑटोमायझेशनच्या दृष्टीने या तंत्रज्ञानामध्ये प्रचंड विकास होईल, हे निश्चित. आणि हा मार्ग दाखविणारा दिपस्तंभ म्हणून पुढील काळात कोरोनाच नाव घेण्यात येईल. या तंत्रज्ञानाणे सज्ज मानवजात येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यास समर्थ राहील.

कोरोना हे नुसतं संकट नसून तो सुद्धा आपल्या जीवनात एक मार्गदर्शक गुरु बनून आला आहे. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, दृष्टिकोन बदलला की ती दिसते. आज कोरोना संकटाशी मुकाबला करतानाच आपण एव्हडे मजबूत होऊ की उद्याच्या मोठ्या संकटाशी सामना करण्याची शक्ती आपल्याकडे असेन. माझे मित्र औरंगाबादचे वरिष्ठ बालरोगतज्ञ प्रा.डॉ.प्रशांत पाटिल यांच्याशी मनमोकळा संवाद साधताना हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मला जे समजलं उमजलं मी लिहिलं. आपलं मत भिन्न असू शकतं.

© प्रेम जैस्वाल, ९८२२१०८७७५
   पेडगावकर, ह.मु. औरंगाबाद
[नावासह हा लेख सामायिक करण्यास माझी हरकत नाही]



No comments:

Post a Comment