कोरोना व आर्थिक संकट
कोरोना विषाणूमूळे होणाऱ्या कोव्हिड-१९ आजाराने जगातील प्रत्येक व्यक्तींमध्ये भीतीच वातावरण निर्माण केलं आहे. सोबतच या अमर्याद संकटाने उद्याच्या अनिश्चित आर्थिक चिंतेलाही जन्म दिला आहे. पाश्चिमात्य देशाची स्थिती बघता आपण कधी या संकटातून मुक्त होऊ या बद्दल कायम एक अनिश्चितता दिसत आहे. जोपर्यंत एखाद्या देशात प्रभावी लसीचा शोध लागत नाही तो पर्यंत दिवसागणित आर्थिक चिंतेत भर पडत जाईल. सततच्या टाळेबंदीमुळे छोटी दुकानं, लहान कुटीर उद्योग तसेच मोठे उद्योग संकटात सापडून त्यांच्यावर मंदी किंवा कायमची टाळेबंदी होण्याची टांगती तलवार आहे. उद्योगधंदेच बंद झाल्यामुळे देशाच आर्थिक चक्र थांबल्यात जमा आहे. अर्थात याचा परिणाम समाजातील सर्वच स्तरावर होऊन जिण्या-मारण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेसाठी फक्त प्रश्नच आहे- उद्या काय होणार? किती काळ मंदी राहील? कसे दिवस काढायचे?
इतिहासात या पूर्वीसुद्धा अशी भीषण संकट येऊन गेलीत. दोन महायुद्ध, भीषण दुष्काळ, प्लेग सारख्या साथीरोगाबद्दल आपण वाचत आलोत. पण या संकटाचा सामना आपल्या पूर्वजांनी समर्थपणे केला. आपल्या जगण्याच्या सवयीत त्यांनी बदल केला. नवीन नियम लागू केले त्यामुळेच कदाचित आजचा दिवस बघण्यासाठी आपण जीवन्त आहोत. आपल्या नशिबात आलेलं कोरोना विषाणूचा संकट हे आपण वर्तमानात अनुभवत आहोत. हा जीवघेणारा कोरोना आपल्याला बरंच काही शिकविण्यासाठी आलेला आहे, हे निश्चित. तसे 'हे हि दिवस निघून जातील' आणि या संकटाशी दोन हात करून उद्या आपणही पुढे निघून जाऊ.
मानवाने विज्ञानात कितीही प्रगती केली तरी निसर्ग आणि दैवापुढे त्याच काहीही चालत नाही, हे कोरोनाने पटवून दिलं. नियमाप्रमाणे गाडी चालवत असताना पुढील चालक तुम्हाला येऊन धडकतो, जख्मी करतो. तुमची काहीही चूक नसताना हे तुमच्या सोबत कसं घडतं, याला काय म्हणायचं? विज्ञान तंत्रज्ञानात झालेल्या अचाट प्रगतीमुळे मनुष्यजातीचा दैववादापेक्षा विज्ञानवादावर जास्त विश्वास वाढला आहे. या विज्ञानवादात एक स्वकेंद्री अहंकारपणा सुद्धा आहे. त्यामुळे मुलं जन्मल्याबरोबर तो शिकून काय होणार याच पूर्ण प्लॅनिंग आपण आधीच करून ठेवतो. काही लाखाची उलाढाल असलेले छोटे उद्योजक कोट्यवधींची कर्ज घेऊन बसतात. किती हा प्रचंड आशावाद! जणू उद्याच्या सर्व घटना ह्या आपल्या मनासारख्याच घडणार आहेत. अनिश्चित भविष्याबाबत मनुष्य एव्हडा गाफील कसा राहू शकतो? आशावादी असणे ठीकच त्यामुळे जीवनात एक सकारात्मकता येते. पण उद्या काहीही घडू शकतं या बद्दल मनुष्य कधीच विचार का करत नाही? कदाचित त्याच्या सभोवतालची स्पर्धा, तुलना व वातावरण त्यास तस करू देत नसावं का? विमा विकणाऱ्या कंपन्या नको त्याच्या गळ्यात मोठा हप्ता असलेल्या पॉलिसीज विकून टाकतात. कर्ज देणाऱ्या कंपन्या नको त्याला भलं मोठं कर्ज देऊन टाकतात. ज्यांच नुकतंच छोटं दुकान टाकलेलं आहे ते मोठं कर्ज घेऊन बसतात या आशेवर की धंदा वाढवायचा आहे. ज्यांच उद्योगाच एक युनिट आहे तो पुढील पाच वर्षात डिमांड लक्षात घेऊन कर्ज घेऊन अजून दोन युनिटसाठी कर्ज घेऊन ठेवतो. ज्यांना नुकताच जॉब लागलेला असतो ते नोकरीच्या भरवश्यावर घर-गाडीसाठी प्रचंड कर्ज घेऊन ठेवतात. सर्वांचा उद्याच्या प्रगतीवर पक्का विश्वास असतो म्हणुनच तर हे सर्व नियोजन केलेलं असतं. त्यामागे एक सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन असतो. पण हे करत असताना उद्याच्या अनिश्चिततेबद्दल आपण किंचितसा विचार का करत नाही. उद्याचा दिवस आपला आणि आपण जे योजिले ते करणारच, यात भर पडते महान लोकांच्या सुविचाराची - 'काही भव्य-दिव्य करायचं असेल तर जोखीम तर घ्यावीच लागेल.' नो रिस्क नो गेन', थिंक बिग! . एमबीए शिकलेले तरुण तर सर्व जोखमीच गणित करून कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन पुढील वीस वर्षाची प्लॅनिंग करून ठेवतात. जणू ठरवलेल्या प्रमाणे घडायला आपण ईश्ववरी वरदान मिळालेले अवतार पुरुषच आहोत ?
मुळात जगात भौतिक सुखाची स्पर्धा, विज्ञानवाद एव्हडा वाढलाय की दैववादाचा विचार कुणी करतच नाही. त्यामुळे पुढील काळाची योजना करताना 'काहीही घडू शकत' हे कुणी गृहीत धरत नाही. कोरोनामूळे निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्येचा सर्वात जास्त त्रास त्यांनाच होईल ज्यांनी भविष्याला गृहीत धरून योजना आखल्या होत्या. ज्यांच्या आर्थिक नियोजनत शिस्त नव्हती. उदाहरणार्थ- उद्याचा विचार न करता खाऊन-पिऊन घ्या अशी मानसिकता असलेला चैनी वर्ग, हातावर पोट असणारा मजूर वर्ग, अफाट कर्ज घेतलेला व्यापारी वर्ग, चुकीची विमा पॉलिसी/ गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता इतरांसाठी जगणारी दिखाऊ जनता, अनियंत्रित खर्च वाढवून ठेवणारे कुटुंब यांना या टाळेबंदीनंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो. अशा लोकांनी यापुढे तरी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करायला हवंय जेणेकरून पुढील आयुष्यात अशी वेळ येणार नाही. कोणतंही संकट हे दीर्घकाळ टिकत नसतं, कालांतराने त्यावर उपाय येतोच.
कुठं तरी वाचलं होतं, एखादया उंचीवर दोर पकडून चढताना थोड्या थोड्या अंतरावर गाठ बांधत चढावे लागते. त्याचा फायदा असा की उंचावरून हात सैल झाला तर आपण एखाद्या गाठीवर अडकून थांबू शकतो. गाठ न बांधता सरळ वर चढत गेलो तर हात सैल होऊन सरळ 'फ्री-फॉल' होण्याची भीती असते. आर्थिक नियोजन करताना थोडी अशीच योजना केली तर कोरोनासारख्या एखाद्या संकटात मनुष्य सहज तग धरू शकतो आणि पुढील जीवन सुसह्य होऊ शकतं.
© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)

No comments:
Post a Comment