वेल्लो 'वॉटर व्हील': गावाकडचे जलचक्र
माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम सांगत कि मानवी शरीर निरोगी आहे किंवा नाही याचा तपास करण्यासाठी डॉक्टर प्रथम ह्रदयाची तपासणी करतात त्याच प्रमाणे एखाद्या देशाचं आरोग्य तपासायचं झाल्यास सर्वप्रथम गाव-खेड्यातील लोकांच जीवनमान बघावयास हवं. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि खरा भारत खेड्यातच आहे. ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी अनेक शासकीय योजना असतात पण त्या कागदोपत्रीच पूर्ण होत असतात, गावातील गरीब जनतेपर्यंत त्या पोहचतातच असं नाही. बदलते हवामान आणि बेभरवशाच्या पावसामुळे गाव-खेड्यात पाण्याचा प्रश्न अत्यन्त बिकट होतो. स्वातंत्र्य मिळून आपल्याला ७० वर्ष झालीत. विज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे मानवाच्या भौतिक सुखात वाढ होऊन देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. आज शहरातील राहणीमान सदाबहार वाटत असलं तरी गावखेड्यातील जनतेला २-३ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यासाठी त्यांचा दिवसातील बराच वेळ आणि शारीरिक श्रम खर्च होतात. कमी पावसामुळे पाण्याची पातळी दिवसंदिवस खाली जाते. शासकीय योजनेमुळे गावोगावी शौचालयाच बांधकाम तर पूर्ण होतं पण त्यासाठी आवश्यक पाणी मात्र नसतं. गावाकाठी विहीर असते पण सततच्या भारनियमनामुळे वीज खंडीत होऊन पाणी पुरवठा खंडीत होतो. खास करुन उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या अधिकच बिकट होऊन दुष्काळासारखी परिस्थिती उदभवते. पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी आवश्यक असते. गावा जवळील पाण्याचा साठा संपल्यामुळे २-३ किमी अंतरावरून पाणी आणावं लागतं. त्यासाठी गावातील लहान-मोठे महिला-पुरुष सकाळीच उठून पाणी वाहत असतात. डोक्यावर, कडेवर पाणी वाहून त्यांना मानेचा, पाठीच्या मणक्याचे आजार उदभवतात. आजार, गरोदरपणी डोक्यावर जड पाण्याचे भांडे वाहने अधिकच धोकादायक असतं. राजस्थानसारख्या राज्यात तर दूर ठिकाणाहुन पाणी आणण्याची सोय व्हावी म्हणून नाईलाजाने काही व्यक्ती दोन लग्न करतात.
पण म्हणतात ना, गरज अविष्काराची जननी असते. एमबीए'च शिक्षण घेत असलेल्या अमेरिकेच्या सिंथिया कोयिंग यांनी भारतासह बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशात पाणी टंचाई समस्येचा सखोल अभ्यास केला. अर्थातच 'जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे.....'. प्रमाणे त्यांनी बरेच दिवस ज्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे अशा ठिकाणाचे निरीक्षण केलं. विविध देशात पाण्यासाठी डोक्यावर जड ओझं घेऊन वाहणारा कळप बघून त्यासाठी काही तरी करावं म्हणून वेल्लो 'वॉटर व्हिल' चा जन्म झाला. मग या वॉटर व्हिलचा जगभरात लवकर प्रसार व्हावा म्हणून त्यांनी भारतातील जगविख्यात प्लास्टिक मोल्डिंग उद्योजक 'नीलकमल'शी संपर्क साधून भारतासाठी या वॉटर व्हीलच्या उत्पादन आणि वितरणाचे हक्क त्यांना दिले.
आज नीलकमल आणि अमेरिकन वेल्लो संस्थांच्या मदतीने पाणी वाहण्यासाठी सुलभ अशा प्लास्टिक 'वॉटर व्हील' सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कॉर्पोरेट जगातल्या उद्योजक कंपन्या सामाजिक जबाबदारी म्हणून या वॉटर व्हील खेडोपाडी वाटप करत आहेत. वेल्लो या पाणीवाहक वॉटर व्हीलच्या संशोधनामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक खेड्यातील लोकांचे जीवन सुकर झाले आहे. वेल्लो या गोलाकार प्लास्टिक भांड्यामध्ये साधारण ४५ लिटर पाणी असते. यासाठी वापरण्यात आलेलं प्लास्टिक फूडग्रेडचं आहे. या भांड्याला लोखंडी हॅन्डल लावून आपण त्यास सहज ढकलू शकतो. त्यामुळे कडेवर, खांद्यावर किंवा डोक्यावर पाणी वाहायची गरज पडत नाही. वर्ष २०१५ मध्ये हॅबीटट फॉर हुमानीटी या संस्थेच्या मदतीने सर्वप्रथम हा प्रयोग औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात करण्यात आला. साधारण ३००० गावकऱ्यांना या वॉटर व्हीलचं वाटप करण्यात आलं. आता ही योजना महाराष्ट्राच्या औरंगाबादसह उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड आणि रायगड जिल्ह्यामध्येही सूरु झाली आहे. देशातील बँकिंग क्षेत्रात नावाजलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या सीएसआर निधीतून १२००० पेक्षा जास्त कुटुंबाला या वॉटर व्हीलच वाटप केलं. या वॉटरव्हील मुळे खेड्यातील जनतेच्या वेळेची बचत होऊन, अनेक आजार कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे. पाण्याची ने आन अगदी सोपं झाल्यामुळं बांधकाम किंवा इतर ठिकाणी या व्हीलचा खूप वापर होत आहे. हा एक खरा सामाजिक विकासच म्हणायला हवा.
उद्योगातील सीएसआर निधीचा योग्य उपयोग व्हावा :
सामाजिक जबाबदारी आपल्या हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिली आहे. आपल्या मिळकतीचा थोडा भाग का होईना तो समाजातील गरजू साठी दान करने ही आपली संस्कृतिच. प्राचीनकाळी मौर्यांच्या इतिहासात प्रसिद्ध तत्वज्ञानी कौटिल्यांनी व्यवसायात सामाजिक जबाबदारीचे महत्व पटवून दिले होते. उद्योग व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आपल्या वस्तू-सेवेची विक्री करून प्रचंड नफा कमवत असतात. तो कमवत असलेला नफा त्यांना समाजातूनच मिळत असतो. त्यामुळे त्यांनाही एक सामाजिक जबाबदारी असतेच, त्यास कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी [सीएसआर] असे म्हणतात. प्रसिद्ध उद्योजक घराणे टाटा, बिर्ला, सिंघानिया आणि बजाज यांनी आपला उद्योग वाढवत असताना सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक धर्मदाय संस्था सुरु केल्या आहेत. ज्यात शैक्षणिक तसेच आरोग्य संस्था सामील आहेत.
वर्ष २०१२ च्या कंपनी कायद्याप्रमाणे साधारण एक उद्योग आपल्या सरासरी त्रेवार्षिक उत्पनाचा २% पैसा सीएसआर वर खर्च करत असतात. प्रत्येक उद्योगाकडे दर वर्षी काही सीएसार बजेट असतं. यातील बराच निधी शहरी काम जसेकी शहरातील चौकांची रंगरंगोटी, बागेतील खेळणी, रस्ते दुभाजक अशा कामासाठी खर्च होतो. काही उद्योजक नको ती कटकट म्हणून चक्क तो निधी एखाद्या समाजिक संस्थेला दान करून मोकळे होतात. तेंव्हा आज गरज आहे कि उद्योजक तसेच सामाजिक संस्थेनी गाव-खेड्यातील समस्येकडे जातीने लक्ष देऊन ग्रामीण जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करावा. तसेच कॉर्पोरेट उद्योजकांनी आपला सीएसआर निधी इतरत्र खर्च न करता गाव-खेड्यातील जनतेसाठीच खर्च करावा. असे झाले तर खरोखरच गरीब जनतेचं कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही.

No comments:
Post a Comment