वेब सिरीज
आपल्या पैकी अनेक जणांनी आपल्या आवडत्या नटाचा चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी वाटेल ते उपदव्याप केले असतील. प्रसंगी जास्त पैसे मोजून 'ब्लॅक टिकेट' खरेदी करणारे अतिउत्साही महाभाग होतेच. किंबहुना ब्लॅक टिकेट हा प्रकार 'फर्स्ट डे फर्स्ट शो' मुळेच सुरु झाला असावा. बदलत्या काळात चित्रपटाचं तिकीट खरेदी करणं खूपच सोप झालं. आज नवीन चित्रपट एकाच दिवशी अख्या देशातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे चित्रपटग्रहासमोरच्या रांगा बघायला मिळत नाही. डिजिटल क्रांतीमुळे चित्रपट प्रदर्शित झाल्या बरोबर त्याची तिकीट ऑन-लाईन उपलब्ध होतात. ना रांगेत ताटकळत उभे राहण्याचा त्रास ना योग्य आसन मिळण्याची कटकट. ज्या प्रमाणे मनोरंजन क्षेत्रात बदल घडत आहेत त्यावरून असे भासते कि भविष्यकाळात नवीन चित्रपटचा आनंद घेणे अजूनही सोपे होणार आहे. वाढत्या स्मार्टफोन, लॅपटॉपच्या वापरामुळे आगामी काळात चित्रपट सिनेमाग्रहाच्या पडद्यावर प्रदर्शित न होता तो सरळ आपल्या प्राणप्रिय स्मार्टफोन, कंप्युटरवरील नेटवरच प्रदर्शित केला जाईल. त्यामुळे नवीन चित्रपट सहज आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध होतील, मग ना तिकीट ना बाहेर कुठे जायची गरज. आजच्या डिजिटल युगात 'वेब सिरीज' नावाचा असाच प्रकार चालू आहे, त्याबद्दल हा लेख.
दूरचित्रवाणीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिका आपण किती तरी वर्षांपासून बघत आलो आहोत. त्याला 'डेली सोप' असेही म्हणतात. या मालिकेचे ठराविक एपिसोड असतात. काही मालिका मात्र वर्षोनवर्ष चालत राहतात. या दूरचित्रवाणी मालिकेचा एकही एपिसोड पुन्हा प्रसारित होतनसल्याने ठराविक दिवशी ठराविक वेळेवर आपण दूरचित्रवाणीसमोर हजर राहणं आवश्यक आहे. त्यामुळे एखादी क्रिकेटचा सामना बघण्यासाठी बऱ्याचदा हातातलं काम सोडून आपण टीव्ही समोर हजर होतो. घरातील सर्व सदस्यांच्या आवडी-निवडी वेगळ्या असल्या तर मग कठीणच. रिमोटसाठी घरातील सदस्यामध्ये वाद होतात. पण आजच्या डिजिटल युगात या समस्येचंही निराकरण झालं आहे. हल्ली आपण सर्व नेटकरी झालो आहोत. आपण जास्तीत जास्त वेळ नेटवर असतो. त्यामुळे आपल्या मनोरंजनाच साधन 'स्मार्टफोन' नेहमी आपल्या सोबत असतं. त्यामुळे टीव्हीची फारशी गरज उरली नाही. हीच गोष्ट हेरून जगातील अनेक मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांनी 'वेब सिरीज' हा प्रकार सुरू केला आहे. नावाप्रमाणे नेटवर चालणाऱ्या शेकडो सिरीयल आज नेटवर उपलब्ध आहे. टीव्ही सिरीयल प्रमाणे वेब सिरियलचेही ठराविक भाग असतात. ऑन-लाईन पेमेंट करून आपण तो बघू शकतो. वाढत्या नेट मुळे दिवसंदिवस वेब सिरीजची लोकप्रियता वाढत आहे. टीव्हीसाठी केबल किंवा डिश आवश्यक आहे परंतु या वेब सिरीजचा आनंद आपण जगात कुठेही कधीही घेऊ शकता. फक्त गरज आहे इंटरनेटची. आगामी काळात आपल्याकडे 5जी नेटवर्क सुरु होणार त्यामुळे जलदगतीच नेट उपलब्ध होऊन हाय डेफिनेशन (एचडी) च्या सिरीयल आपण बघू शकू. या वेब सिरीजचे एपिसोड दोन मिनीटापासून 30 मिनीटापर्यंत असतात. आपण वेब सिरीजचे एपिसोड डाउनलोड करून पाहिजे तेंव्हा 'ऑफ-लाईन' बघू शकता. आज हाय-स्पीड नेटमुळे शहरी भागात वेब सिरीयल तर नेट नसल्या कारणाने ग्रामीण भागात टीव्ही सिरीयल लोकप्रिय आहेत. हल्ली जास्तीत जास्त वेब सिरीज ह्या कॉमेडी किंवा सस्पेन्स-थ्रिलर प्रकारच्या आहेत.
वेब सिरीज कुणी सुरु केली ?
वेब सिरीज आपल्याकडे आता लोकप्रिय होत असली तरी या मनोरंजन तंत्रज्ञानाची सुरुवात १९९० मध्येच झाली.
१९९५ मध्ये स्कॉट झकेरीनने स्पॉट.कॉमवर टाकलेला 'द स्पॉट' हि कथा म्हणजे पहिला वेब एपिसोड आहे. सुरुवातीच्या काळात कलाकारांना न घेता हे एनिमेटेड व्हिडीओ असायचे. त्यामुळे वेब एपिसोड निर्मितीसाठी जास्त खर्च येत नसे. एखादा वेबएपिसोड तयार करून तो नेटवर टाकल्या जात असे. जस जसे इंटरनेटच जाळं दाट आणि विस्तीर्ण होत गेलं तस तशी वेब सिरीज बघणाऱ्याची संख्या वाढत गेली. हल्ली आपण फेसबुकवर नेटफलिक्सची जाहिरात बघतो तो वेब सिरीजचाच प्रकार आहे. आपल्याकडे पूर्वी फक्त चित्रपटसंबंधित सिनेअवॉर्डचे सोहळे साजरे व्हायचे. नंतर यामध्ये टीव्ही सिरीयल अवॉर्डचा समावेश झाला. आगामी काळात निश्चितच याआपल्याला वेब सिरीज अवॉर्डचे नॉमिनी आणि अवॉर्डस बघायला मिळतील. परदेशात वेब सिरीज खूपच लोकप्रिय आहेत. आपल्या देशातसुद्धा मेट्रो शहरी भागातील तरूण वर्ग वेब सिरीजचा दिवाना आहे. काही गाजलेल्या भारतीय वेब सिरीज पुढील प्रमाणे :
1.द पिचर्स - टीव्हीएफ
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हेल्ली या वेब सिरीजकडून प्रेरणा घेऊन द व्हायरल फिवर ने तयार केलेली ही वेब सिरीज आहे. ती आयटी क्षेत्रात काम करून स्टार्ट-अप सुरु करणाऱ्या चार मित्राबद्दल आहे.
2. मॅन'स वर्ड-वाय फिल्म्स
पुरुषप्रधानसमाजातील पुरुष-महिला लैंगिक विषमतेवर आधारित या सिरीजमध्ये महिला सबलीकरण, स्त्रियांच्या सामाजाकी समस्यांच चित्रण केलं आहे.
3. परमानण्ट रुममेट्स – टिव्हीएफ
द व्हायरल फिवरचीच एक रोमँटिक आणि वस्तुस्थितीवर आधारित वेब सिरीज आहे ज्यामध्ये एका जोडप्याची कथा चित्रित केली आहे.
4. ट्रिपलिंग- वेब सिरीज
हि एक मनोरंजक वेब सिरीज आहे.
5. व्हॉट दी फोक्स
जुन्या चालीरीती झुगारून मॉडर्न कुटुंब नव्या पद्धतीने कसं जीवणाचा आनंद घेतात, याबद्दल हि सिरीज आहे.
6.आम आदमी फॅमिली वेब सिरीज: हि एक कुटुंबासोबत पाहण्याची वेबसिरीज आहे
7. बँग बाजा बारात – वाय फिल्म्स (यशराज फिल्म)
8. ट्विस्टेड - बाय विक्रम भट्ट
9. माया : सलेव्ह ऑफ डिजायर - बाय विक्रम भट्ट
अशा किती तरी वेब सिरीज प्रसिद्ध आहेत.
वेब सिरीज निर्मात्याला उत्पन्न जाहिरातीपासून मिळत असतं. अनेक कंपन्या वेब सिरीजवर जाहिराती करतात. जाहिरातीतून त्यांना प्रचंड उत्पन्न मिळतं. शिवाय उपयोगी वस्तूचे कन्टेन्ट जाणूनबुजून वेब सिरीजमध्ये सामील केले जातात. ते बघून दर्शक जेंव्हा ती वस्तू विकत घेतो तेंव्हा त्या व्यवहारातील काही रक्कम वेब सिरीजला मिळते. हा एक प्रकारचा 'आफिलीयेटेड मार्केटिंग' चाच प्रकार आहे. थोडक्यात 'डिजिटल मार्केटिंग' साठी वेब सिरीज एक प्रभावी माध्यम आहे.
हल्ली समाजात इंटरनेट टीव्ही पेक्षा जास्त लोकप्रिय आहे. दिवसातील कितीतरी तास आपण नेटवर असतो. गेम, ताज्या घडामोडी, व्हिडीओ,मेसेजिंग, चॅटिंग आणि सर्वच मनोरंजन स्मार्टफोनवर उपलब्ध असताना टीव्ही बघायची गरज राहत नाही. नेटफ्लि, हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईम वर आपण दोन प्रकारे मनोरंजन बघू शकतो. प्रिमियम आणि नॉर्मल. प्रीमियम मध्ये जे कालच प्रदर्शित, अत्यन्त लोकप्रिय एपीसोड पैसे मोजूनच बघावे लागते. तर नॉर्मलमध्ये आपल्याला पूर्वीचे एपिसोड निःशुल्क बघायला मिळतात. बहुतेक खासगी टीव्ही कंपन्या वेब सिरीजच्या क्षेत्रात उतरत असल्यामुळे हुकलेल्या मालिकेचा भाग आता आपण इंटरनेटवर बघू शकणार. त्यामुळे भविष्यात वेब सीरिजचीच चलती राहील. दररोज नवीन अप्लिकेशन जसेकी नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम व हॉटस्टार सारखे वेब सिरीज स्पेस सुरु होत आहेत जिथे आपण वेब सिरीज पाहू शकतो. आज तळागाळात वेब सिरीजचा प्रसार झाला नसला तरी तरुण वर्गात वेब सिरीज बघण्याचं मोठं क्रेझ आहे आणि आगामी काळात अजून वाढणार आहे.
हळूहळू का होईना वेब सिरीज टीव्ही सिरीयलला चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. वर्षोनवर्ष चालणाऱ्या सासू-सुनेच्या षडयंत्राच्या मालिका आता युथ वर्गांना कंटाळवाण्या वाटतं आहे. भारतातील साधारण ७०% लोकसंख्या युवकवर्गाची आहे आणि हा वर्ग कायम ऑन-लाईन असतो. त्यातच सेन्सार बोर्डची कटकट नसल्याने युवकांना आवडेल असं वेब कन्टेन्ट मनोरंजक उद्योगातील कंपन्या टाकत आहेत. आताच उदाहरण बघा, लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांचा कल झुकेल म्हणून निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी वरील चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं. पण त्यांच्याच जीवनावर आधारित वेब सिरीज ते थांबवू शकले नाही, वेब सिरीज चालू आहे आणि देश-परदेशातील नेटकरी युवकवर्ग ती बिनरोक बघत आहे.
अक्षरशः साध्या स्मार्टफोनचा उपयोग करून कमी खर्चात एक चांगली सिरीज आपण शूट करून इंटरनेटवर लोड करू शकतो. पण चांगल चित्रण, संगीत, कलाकार आणि गुणवत्ता असलेल्या सिरीज तरुणांना आवडतात. सरसगट सर्वच जनतेला याच प्रसारण होत नसल्यामुळे वेब सिरीजचा आज घडीला तरी चित्रपट बोर्डासारखी सेन्सार बोर्डची रोकटोक नाही. त्यामुळे निर्माते तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी आवडेल असा मसाला टाकून झटपट वेब सिरीज तयार करून नेटवर टाकत आहेत. शेवटी काय बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
वेब सिरीजमुळे करियरच्या अनेक संधी चालून आल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकार, निर्माते, दिगदर्शक, संगीतकार यांना या निमित्ताने आपली प्रतिभा दाखविण्याची संधी चालून आली आहे. वेबसिरीजमध्ये चमकून पुढे त्यांना चित्रपटात काम मिळू शकतं. बऱ्यास वेब सिरीजमध्ये एनिमेशन, वेब डिजाईन सारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग होत असल्याने संगणक क्षेत्रातील युवकांनाही चांगली संधी आहे.
© प्रेम जैस्वाल, 9822108775
(लेखक ESPEE INFOTECH, औरंगाबाद या सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करियर अडव्हाझर आहेत)

No comments:
Post a Comment