ad1

Saturday, 17 October 2020


                              खिचडी गाथा





जे खाऊन आपण मोठे  (वय आणि आकाराने!) झालो त्याबद्दल दोन शब्द नं लिहावे, मग आपल्या लिखाणाला काय अर्थ हो? बॅचलर काळात एक-दोन नाही तर तब्बल १६ वर्ष जीच्या सेवनामुळे आपण या जीवनात तग धरू शकलो त्यासाठी एक लेख तर बनतोच!  विशेष म्हणजे आज सर्व पक्वान्न उपलब्ध असतांना 'एक हक्काचं आरोग्यवर्धक व्यंजन' म्हणून आजही माझं आणि तिचं ते 'पवित्र नातं' मी जपून आहे.

'बिरबल की खिचडी कब पकेंगी?'  या प्रश्नाने खिचडीला सतत प्रकाश झोतात ठेवलं. किंबहुना खिचडीला बिरबलमुळेच जास्तचं प्रसिद्धी मिळाली असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही. याचा अर्थ खिचडी हे व्यंजन अकबरच्या काळापासून सुरु झालं असं नाही. प्राचिन इतिहासात सन ३५० सालापूर्वी तशी नोंद आढळते. त्याला कारण ती तयार करावयाची सोपी, सहज पद्धत आणि तिचे फायदे. तांदूळ आणि दाळ (कोणतीही), एक पातेलं उपलब्ध झाले की खिचडी तयार!  जे आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत किंवा ज्यांना जिभेचे चोचले पुरवायचे ते त्यात आवडेल ते मसाले, जीवनसत्व वाढविणाऱ्या भाज्यांचा भरणा करू शकतात, बिचाऱ्या खिचडीचा त्यास विरोध नसतो. ती त्या वस्तूला आपलंसं करून घेते. काय तिची सहनशक्ती!

विभिन्न जाती, धर्म व पंथ असलेल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रांतात तिला वेगवेगळी नावं आहेत. नावाप्रमाणेच खिचडी तयार करण्याची पद्धत भिन्न असू शकते पण त्यामुळे तिची महती कमी होत नाही. मुंगाची खिचडी, तुरीची खिचडी, उडदाची खिचडी, मसालेदार खिचडी, आलू खिचडी, फोडणीची, रुग्णासाठी हलकी, साधी खिचडी असे शेकडो प्रकार आहेत. बऱ्याच खिचडीच्या स्वादिष्ट चवीने एखादया जुजबी हॉटेल ढाब्यावाल्याचं किंवा गावाचं नाव सर्वदूर प्रसिद्ध केलं आहे. जोडीला गरमागरम भज्जी, तूप आणि पापड असलं,  अहा..हा, तो फिर क्या कहेने ! एके काळी वारंग्याची (जिल्हा नांदेड ) खिचडी खूप प्रसिद्ध होती. किंवा खिचडीमुळेच वारंगा सारख्या छोटया बस फाट्याचं नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कालांतराने त्या खिचडीच लोन कळमनुरी, हिंगोलीमार्गे औंढा नतंर जिंतूरपर्यंत पोहचलं. तीस जोड मिळाली स्वादिष्ट भज्जाची! त्यामुळे खिचडी जास्तच प्रसिद्ध होत गेली. 

सर्व सुखसोयी पायाशी लोळणाऱ्या जमान्यात स्वतः स्वयंपाक करणारी 'बॅचलर जमात' आज दुर्मिळ होत चालली आहे.  पण आमच्या काळात उचशिक्षणासाठी (प्राथमिक पुढचं!) बाहेर गावी शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी खिचडी म्हणजे-'एक तुही सहारा' होती. भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या विद्यार्थांना सर्व काम स्वतः करावी लागायची. पैशाचे दर्शन दुर्लभ होतं. अभ्यास, गृहपाठ करून खोलीतील इतर कामं उरकणं कठीण जायचं. त्यामुळे झटपट पोट भरण्यासाठी खिचडी हा एकमेव पर्याय असायचा. पिठ मळून, गोल भाकरी-चपात्या थापणे, आणि विशेष म्हणजे त्या बिन भरवशाच्या पितळी स्टोव्हवर भाजणे दिव्य काम वाटायचं. मधूनच तो दळभद्री स्टोव्ह आमची सत्वपरीक्षा घ्यायचा. त्याची अग्निझोत मधूनच फर्रर्रर्रर्रर्रर्र करत एकीकडे वाकडं रूप धारण करायची. मधूनच बंद पडुन नीरव शांततेत मंदिराच्या गाभाऱ्यात छोटी ज्योती तेवत रहावी असं रूप धारण करायचा. पिन केल्यास भडका उडून रॉकेलचा उग्र वास सोडायचा. बऱ्याचदा त्यातलं रॉकेल संपलेलं असायचं. क्वचीत पिन बर्नरच्या छिद्रात तुटून अडकली तर बसा बोंबलत! मग खाणंपिणं बाजूला.  सायकलला स्टोव्ह टांगून ..फटलक...फटलक करत स्टोव्ह दुरुस्ती, रॉकेल आणण्यासाठी दुकान गाठावं लागायचं.

नवव्या वर्गात शिकत होतो. जिल्हा परिषद शाळेची वेळ सव्वा बाराची होती. दोन घास खिचडी खाऊन शाळेत जायचं ठरवलं होतं. पण स्टोव्ह जीव घेत होता. बारा वाजून दहाला शाळेसाठी निघायचं होतं. वेळे अभावी खाणं तर दूर ती शिजविणेसुद्धा शक्य नव्हतं. एक युक्ती सुचली- चालू स्टोव्हची पिन किंचितशी मोकळी करून मी तसाच शाळेसाठी निघालो. मधल्या सुट्टीत अडीच वाजता परत येणार होतोच तोपर्यंत खिचडी शिजून तो स्टोव्ह आपोआप बंद होईल अशी योजना होती. महत्वाचे तास चालू असतांना माझं मन मात्र चालू स्टोव्हवर शिजत ठेवलेल्या त्या खिचडीवर केंद्रित होतं. काय झालं असेल? मधूनच स्टोव्ह बंद पडला तर....? स्टोव्ह चालूचं राहून खिचडीचा कोळसा  तर झाला नसावा.... ? या प्रश्नापुढे वर्गात सर विचारत असलेले प्रश्न तुच्छ वाटू लागले. प्रतीक्षा होती मधल्या सुटीची. एकदाची घंटा वाजली. खोलीकडे धूम ठोकली. योजना सफल झाली होती. पोट भरून पुन्हा शाळेत.

दुसरा अनुभव अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा. स्ट्रगलचा काळ होता तो. धाकटा भाऊ किरणसोबत मी औरंगाबादला खोली करून राहत होतो.  नुकताच डे-नाईट क्रिकेट हा प्रकार  सुरु झाला होता. शेजारच्या कृष्णधवल टीव्हीवर साडे दहाला मॅच बघून आम्ही स्टोव्हवर खिचडीचा कुकर ( म्हणजे प्रगती!!) ठेवला. शिजण्याचा प्रतीक्षेत आम्ही बिछान्यावर पहुडलो होतो. एका तासाने आमची झोप उडाली ती काळ्या धुरांनी! खोलीभर काळाकुट्ट धूर पसरला होता. खिचडी पूर्णतः जळून खाक होऊन,उच्च दाबामूळे कुकरचा सेफ्टीव्हॉल्व्ह फाटला होता. अर्थात रात्री उपाशी झोपणे हा एकमेव पर्याय होता. शिवाय उद्या कुकर दुरुस्तीच काम....!

विद्यार्थी दशेत खिचडी हा एकमेव पर्याय होता. सर्व व्यवस्थित असेल तर दहा मिनिटाच्या आत ती शिजायची. आडकाठी आणायचा तर तो स्टोव्ह!  कधी  वॉशर, कधी बर्नर तर कधी पिन ऐन वेळी हात दाखवायचे. सर्व ठीक तर चक्क रॉकेल आमच्या जेवणात व्हिलन बनून हजर व्हायचा. बऱ्याचदा काही उकळ्या आल्या की भुकेमुळे शिजण्यापूर्वीच ती फस्त व्हायची. दाळ, लसूण, कांदे, चटणी, हळद, असो वा नसो काम थांबायचं नाही. पुढे पुढे आमच्या 'भोजनात' मोठी प्रगती झाली. सोबत वरण-टमाट्याचा 'शोरवा' तयार करायचो, त्यामुळे खिचडीला 'चार चांद' लागायचे.

आजही जमिनीत बोअर करणारी मशीन बघितली तर खिचडी आठवते. बोरिंगवर काम करणाऱ्या, कायम धुळीने माखलेल्या महान कारागिरांच बिऱ्हाड त्या गाडीवरंच असतं. बोरिंग-खिचडीचा 'चोली-दामन का साथ'. एकीकडे बोरिंगचा प्रचंड गोंगाट, कमालीची धूळ उडत असतांना थोड्याचं अंतरावर त्यांचे दोन सहकारी मात्र लसूण, कांदे, टमाटे चिरण्यात मग्न असतात. विशेष म्हणजे स्टोव्हपूरती सपाट जागा त्यांना मिळाली की सुरु.... . एका भल्या मोठया अल्युमिनियमच्या पातेल्यात गरमागरम खिचडी शिजत असते. एकीकडे ड्रीलचा जमिनीत दगड फोडून शिरत असतांनाचा ठन..ठंन.ठंन...फुस्स्स..फुस्स्स गोंगाट, धूळ तर दुसरीकडे फर्र्रर्र..र्रर्रर्र स्टोव्हवर खिचडी शिजत असते. काम संपन्न झालं की खिचडी झोडून ती मंडळी पुढच्या कामासाठी तयार!

वर्ष २०१७ मध्ये वृत्तमानपत्रात एक सुखद बातमी झळकली. माध्यमाने खिचडीला 'नॅशनल डिश' तर मायबाप सरकार दोन पाउले पुढे जाऊन या 'वन पॉट' मेन्यूला 'क्वीन ऑफ ऑल फूड' अशी उपमा देऊन जागतिक प्रसिद्धी देणार म्हणे, असं वाचलं.  त्यात म्हणे प्रोटीन, कार्बोहायड्रेट सह अमिनो ऍसिड, कॅलरी अशी आरोग्यवर्धक घटक असून शिवाय पचनासाठी ती हलकी वगैरे. देशातील प्रसिद्ध आहारतज्ञानी त्या बातमीस दुजोरा देऊन अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. वाचून सुखद धक्क्का बसला. मनमोराचा बिसारा फुलल्यासारखी माझी अवस्था झाली.  थोडक्यात प्रतिकूल परिस्थितीत जीने आम्हास जगवलं, तगवलं, ते व्यंजन काही साधंसुधं नव्हतं तर! कालांतराने कळालं कि त्यातसुद्धा प्रांतिय राजकारण शिरलं.  या बातमीने गव्हाचं प्रचंड उत्पादन करणाऱ्या उत्तर भारताचं महत्व कमी होऊन भात पिकविणाऱ्या दाक्षिणात्य प्रांताच महत्व वाढणार होतं. पंजाबच्या एका मंत्र्याने त्यास विरोध केला. शेवटी खिचडी विषयीची ती बातमी एक 'खयाली पुलावं' ठरली. असं असलं तरी शालेय विद्यार्थ्यांची गळती कमी होऊन उपस्थिती वाढावी, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून मध्यान्ह भोजन म्हणून खिचडीचा समावेश करण्यात आला. आज देशातील लाखो शाळेत मध्यान्ह भोजनात खिचडी दिली जाते. 

'तुम्ही चांगले स्वयंपाकी आहात' असं म्हणून कुणी माझी स्तुती केली तर त्यात 'खिचडी' चा मोठा वाटा आहे, असं मला वाटते. आजपावेतो मी किती तरी हजार वेळेस खिचडी तयार केली असेन. अर्थात बऱ्याचदा आजही हे व्यंजन तयार करण्याचं काम माझ्याच वाट्याला येत असते.  फक्त फरक एवढाचं - 'गॅसची ज्योत कमी कर' म्हणण्या ऐवजी तोंडातून सहज '. थोडी हवा कमी कर' असं निघतं! खिचडी तन-मनात भिनते ती अशी!!

खिचडीवर लिखाण करावं असं मनी येऊन माझ्या लिखाणाची खिचडी तर चांगलीच शिजली. पंचपक्वानाशी पैजा जिंकणारी तिची गाथा न संपणारी आहे, पण आता थांबतो.


© प्रेम जैस्वाल, पेडगावकर

ह. मु. औरंगाबाद 9822108775

(हि खिचडी सामायिक करण्यास माझी हरकत नाही.)






Thursday, 8 October 2020

ऑनलाईन शिक्षण,प्रशिक्षण, उद्योग-व्यवसायातील संधी

कालाय तस्मै नमः. बदल जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि या बदलाशी जुळवून घेण्यातच जीवनाचा अर्थ आहे.  देशात कोरोना महामारीचा शिरकाव होऊन सहा महिने उलटले. या कालावधीत सततच्या टाळेबंदीमध्ये दैनंदिन जीवनाप्रमाणे उद्योग-व्यवसायातसुद्धा आपण अनेक बदल अनुभवत आहोत. त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे -ऑनलाईन. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाईन मिटिंग, ऑनलाइन खरेदीविक्री व्यवहार, ऑनलाइन-शॉपिंग, ऑनलाईन कन्सल्टेशन आणि बरंच काही.

खरं तर ऑनलाइन व्यवहाराची सुरुवात कोरोनापूर्वीच झाली होती. संगणक, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट व्याप्तीमुळे सर्वच व्यवहार ऑनलाईन होत होते. पण कोरोनामुळे त्यासं मोठी उभारी मिळाली. कोरोनाबाबत सर्वच अनिश्चित आहे आणि यशस्वी लस येईपर्यन्त त्या विषाणूचा संसर्ग टाळणे हाच मोठा पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे मास्क लावणे, घराबाहेर न पडणे, सामाजिक अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण आणि संसर्ग होऊ नये म्हणून सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. पण थांबणे म्हणजेच संपणे,  'शो मस्ट गो ऑन' त्यामुळे प्रत्यक्ष संपर्क टाळून उद्योग-व्यवसायाचा गाडा पुढे ओढण्यासाठी ऑनलाइन शिवाय दुसरा पर्याय नाही.

कोरोना संसर्गाचं चक्र थांबावे म्हणून अंमलात आणलेल्या टाळेबंदीमुळे काही काळ जगातील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मनुष्यबळचं नाही त्यामुळे उद्योगाची चाक  थांबली होती. उद्योगावर मोठं संकट आल्यामुळे जीडीपीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत चक्क २३.९% घसरण झाली होती. विशेष म्हणजे हि आकडेवारी फक्त संघटित उद्योगक्षेत्राची आहे.  चित्र नकारात्मक दिसत असलं तरी या मंदीत दडलेल्या विविध संधीचा शोध घेऊन 'फिनिक्स' पक्षाप्रमाणे उद्योगात उभारी घेणे आवश्यक झालं आहे.

वेगाने वाढणाऱ्या शिक्षण क्षेत्रासाठी ऑनलाइनपद्धत नवीन नव्हती. किती तरी नावाजलेल्या उच्चशिक्षण संस्था पूर्वीपासून 'व्हर्च्युअल क्लासरूम्' शिक्षण देतच होत्या. कोरोनामुळे एकंदरीत सर्वच शैक्षणिक संस्थांना ऑनलाईनची रि ओढावी लागली. त्यामुळे उद्योगात नवीन संधी चालून आली. ऑनलाइनसाठी लागणाऱ्या हायस्पीड इंटरनेट, फायबर ऑप्टिक केबल, मोडेम, इंटरनेट सम्बंधित उपकरणे, संगणक, मोबाईल, मोबाईल ऍक्सेसरीज, हेडफोन, ट्रायपॉडसारख्या संलग्न उपकरणाची प्रचंड मागणी वाढत गेली. त्यामुळे ऑनलाइन संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे, विक्री पश्चात सेवा तसेच सुटे भाग निर्मिती उद्योगाला चालना मिळत आहे. बदल लक्षात घेऊन मोबाईल सेवा देणाऱ्या एयरटेल कंपनीने उच्चगती इंटरनेटसाठी लागणाऱ्या ऑप्टिक फायबरचे उत्पादन करणाऱ्या स्टारलाइट उद्योगसमूहाशी भागीदारी केली आहे. सर्वच क्लास ऑनलाइन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच एकंदरीत अध्यापनाची नोंद जशी उपस्थिती, होमवर्क, परीक्षा, मार्क, निकाल इ.याचा ताळमेळ लावण्यासाठी, फाईल स्टोअर करणाऱ्या विविध ऍप-सॉफ्टवेअर प्रणालीची प्रचंड मागणी वाढली आहे.  सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या तरुण उद्योजकांसाठी हि खूप मोठी संधी चालून आली आहे. ऑनलाइनची काम सहज सोपं करणाऱ्या सॉफ्टवेअरची नितांत गरज आहे. ज्यांना संगीत, पेंटिंग, कुकिंग, योगा, जिम, फोटोग्राफी, लेखन, ऍक्टिंग कला-कौशल्य आत्मसात आहे असे विविध क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक या ऑनलाईन युगात उत्तम प्रशिक्षण देऊन चांगली कमाई करू शकतात. शिवाय युट्युबवर चॅनलवर व्हिडीओ अपलोड करून जाहिरातीद्वारे चांगला रेव्हेन्यू कमवू शकतात. होतकरू उद्योजकांसाठी हि एक संधी आहे. एका सर्वेक्षणानुसार प्रशिक्षण उद्योगक्षेत्राची जागतिक उलाढालं वर्ष २०२१ पर्यन्त २४ हजार करोडच्या घरात जाणार आहे. एव्हढया अफाट गतीने वाढणाऱ्या प्रशिक्षण क्षेत्रामध्ये उद्योगाच्या शेकडो संधी दडलेल्या आहेत. उद्योजक त्या दिशेने वाटचाल करून यशस्वी होऊ शकतात.  शैक्षणिक वर्ग ऑनलाइन होत असले तरी प्रशिक्षणार्थींना पेन, पेन्सिल, नोटबुक,मार्कर, मार्करशाई, बोर्ड,  इत्यादी. स्टेशनरी वस्तूच्या मागणीत प्रचंड वाढ होणार आहे. 

अख्ख विश्व ऑनलाइन स्क्रीनसमोर आल्यामुळे जो नोकरवर्ग संगणक तंत्रज्ञानापासून दूर आहे त्यांना आता संगणक प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक होणार आहे. त्या शिवाय ते संगणक किंवा मोबाईलवर होणाऱ्या झूम मिटिंग, ऑनलाइन शॉपिंग, वेब मिटिंग, वेबिनार फाईल सेव/डाउनलोड इत्यादी गोष्टीशी समरस होऊ शकणार नाहीत. त्यामुळे पुढील काळात कंप्युटर प्रशिक्षण  घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीत निश्चित वाढ होणार आहे. थोडक्यात  कंप्युटर हार्डवेअर प्रमाणे कंप्युटर, सॉफ्टवेअर, कोडींग प्रशिक्षण व्यवसायात  मोठी मागणी वाढून या उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहे. होतकरू उद्योजक या व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. तसेच ऑनलाइन च्या युगात पारंपरिक बोर्ड, होर्डिंग, बॅनर जाहिरात प्रकार कुचकामी ठरत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हा उत्तम पर्याय आहे. हल्ली कंपन्या जास्तीत जास्त जाहिरात खर्च फेसबुक, गुगल, इन्स्टाग्राम, लिंकडींग, युट्युब सारख्या समाजमाध्यमामध्ये करत आहे.  नवीन उद्योजकांनी संगणक आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण घेऊन डिजिटल मार्केटिंग उद्योग सुरु करू शकतात. 

संशोधन होऊन जोपर्यंत कोरोना विषाणूवर लसीचा शोध लागत नाही तोपर्यंत सततचे निर्जंतुकीकरण, हात धुणे व सभोवतालची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.  नाक, तोंडाद्वारे विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, फेसशिल्ड, पीपीई किटसारख्या वस्तूची मागणी दिवसंदिवस वाढत आहे. फक्त देशापुरता विचार केला तर एकशे तीस कोटी जनसंख्येसाठी येणाऱ्या काळात किती मास्क, फेसशिल्ड इ. लागतील याचा अंदाज उद्योजक घेऊ शकतात. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन स्टीलबर्ड सारख्या हेल्मेटचं उत्पादन करणाऱ्या ब्रॅण्डने विविध प्रकारचे फेसशिल्ड विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं आहे. मागणी वाढतच जाणार आहे, तेंव्हा उद्योजक अशा उत्पादनाची माफक दरात ऑनलाइन विक्री करून चांगला नफा कमवू  शकतात. तसेच निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक सॅनिटायजर, साबण, डिटर्जंट, हॅन्डवॉश आणि सिल्व्हर हायड्रोजन पॅराक्साईड सारख्या वस्तूची पुढे प्रचंड मागणी वाढणार आहे. गरज आहे उद्योजकांनी या वस्तू सम्बंधित उद्योगात गुंतवणूक करुन उत्पादने ऑनलाइन विक्रीस उपलब्ध करून द्यावीत.

आज कोरोना संसर्गाचा भितीने सर्व जग त्रस्त आहे. कोव्हिड19 आजाराची पूर्वसूचना मिळावी म्हणून जनता जागरूक आहे. वाफेच मशीन, शरीराचे तापमान, पल्सऑक्सिमिटर, बीपी मीटर, ग्लुकोमीटर सारख्या वैद्यकीय उपकरणास प्रचंड मागणी आहे. त्यामुळे रुग्णालयाप्रमाणे घरोघरी अशी उपकरणे खरेदी केली जात आहे. कोव्हिड19 आजारामुळं अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. घरातील कर्त्या व्यक्ती गेल्यामुळे रुग्णालयाचा खर्च तसेच प्राणहानी यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. त्यामुळे आज जीवनविमा आणि मेडिक्लेम पॉलिसी हि काळाची गरज आहे. होतकरू उद्योजकांसाठी विमा-मेडिक्लेम पॉलिसी विक्री हा चांगला उद्योग ठरू शकतो. 'आरोग्य धन संपदा' आरोग्य सर्वोपरी हा मूलमंत्रावर कोरोनामुळे शिक्कामोर्तब झाले. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लागणाऱ्या व्हिटॅमिन ए, बी,सि,डी ज्या फळ, मेव्यात आहे अशा वस्तूची प्रचंड मागणी वाढत आहे. तसेच शरीराला मुबलक व्हिटॅमिन देणाऱ्या फळाचे उत्पादन करून ऑनलाइन विक्री हा सुद्धा एक चांगला उद्योग होऊ शकतो.

प्रसिद्ध कन्सल्टंसी एजन्सी मेकींसीच्या सर्वेनुसार येणाऱ्या काळात 'गिग एकोनॉमिक' हा प्रकार प्रचंड वाढणार आहे. अमेरीकेत ३०-४०% एकोनॉमि गिग पद्धतीची आहे. 'गिग इकॉनॉमिक्स'  म्हणजे एखाद्या उद्योगात पारंपारिक 'नऊ ते पाच'अशी बांधील नोकरी न करता ठराविक कामाचा कॉनट्रॅक्ट घेऊन फ्रिलांसिंग पध्द्तीने एखादं काम करणे. महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) कडून राज्यभर साधारण पाच हजार अधिकृत लर्निंग केंद्राद्वारे फ्रिलांसिंगसाठी उपयुक्त अतिशय उत्तम दर्जाचे अनेक कोर्सेसच प्रशिक्षण दिलं जातं.  ऑटोकॅड, टॅली, फोटोशॉप, वेब डिझायनिंग, सी, सी++ सारख्या संगणक कौशल्याच उपयोग करून फ्रिलांसिंग करू शकता. विशेष म्हणचे अशा कोर्सेससाठी ऑफलाईन आणि ऑननलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.  संगणकच्या जोडीने उद्योजक बनण्यासाठी लागणारी सर्व कठीण आणि मृदकौशल्याचा या कोर्सेसमध्ये समाविष्ट आहे. ते कौशल्य आत्मसात करून तरुण उद्योजक 'फ्रिलांसिंग उद्योग' सुरु करू शकता.

मग प्रश्न पडतो- हा बदल तात्पुरता आहे की कायमस्वरूपी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एक उदाहरण बघू.  काही वर्षांपूर्वी क्वचित एखाद्या उच्चभ्रू घरात शुद्ध पाण्यासाठी 'वॉटर फिल्टर' चा वापर होत होता. सिलबंद 'मिनरल वॉटर' ची मागणी अतिशय मर्यादित होती. डासदंश टाळण्यासाठी उदबत्ती, वडी, लिक्विडची एव्हडी मागणी नव्हती. आज घरोघरी वॉटर फिल्टरचा वापर होतो. सिलबंद पाण्याच्या बाटल्या पुरविणारे हजारो उद्योजक आहेत.  वाढते जीवनमान, संसर्गजन्य आजाराची भिती, न झेपणारा दवाखान्याचा खर्च यामुळे सर्वत्र वॉटर फिल्टर, सिलबंद मिनेरल वॉटर विक्री वाढत आहे.

मनुष्यजातीसाठी कोरोना हे काही पहिलं संकट नाही. या पूर्वी आपल्या पूर्वजांनी अनेक साथरोग, महामारी व दुष्काळ सारख्या मोठ्या संकटास तोंड दिलं.  येणाऱ्या संकटास दोन हात करून किंवा स्वतःला त्या संकटाशी जुळवून घेत जगरहाटी चालूच राहणार. मलेरिया, डेंग्यू, पोलिओ, चिकन गोनिया, स्वाइन फ्ल्यू सारख्या आजारामुळं आपण डासाचा त्रास कमी करणारी अगरबत्ती, लिक्विड, मच्छरदाणीचा वापर करू लागलो. कोरोनामुळे या वस्तूमध्ये सॅनिटायजर, मास्कची भर पडली. हळूहळू या नवीन जीवनशैलीचा अंगीकार करून मनुष्यजात निश्चितच या 'न्यू नॉर्मल' शी जुळवून घेईलं. असं म्हणतात कि, एखादी गोष्ट आपण सतत २१ दिवस नियमित करत गेलो तर ती आपल्या अंगवळणी पडून ती सवय होऊन जाते. गेल्या सहा महिन्यांपासून  आपण नियमित सॅनिटायजेशन, नियमित हात धुणे, मास्क लावणे, तापमान , ऑक्सिजन चेक करणे याची सवय लावून घेतली आहे. किंबहुना ती सवय आपल्या अंगवळणी पडली आहे. सांगायचं तात्पर्य की,  आज ज्या वस्तूची मागणी वाढली आहे ती तात्पुरती नसून पुढे तिचा खप वाढत जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी माफक दरात या वस्तूचं उत्पादन करून विक्रीस उपलब्ध करून देण्यास हरकत नाही. किंवा त्याच्या उत्पादन संलग्न उद्योगात गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

अर्थात उद्योग उभारणीसाठी शासनाचा मोठा हातभार आवश्यक आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींची 'आत्मनिर्भर भारत' हि कल्पना साकार करण्यासाठी शासनाने उद्योग सुरु करण्यासाठी लागणार इन्फ्रास्ट्रक्चर उद्योजकांना उपलब्ध करून दयावयास हवे.  खूप पूर्वी या बाबीचा विचार करून चीनसारखा देश इतर देशांच्या तुलनेत किती तरी पुढे गेला आहे.  उद्योजकासाठी आवश्यक रस्ते, पाणी, वीज आणि इतर प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीने उपलब्ध करून द्यावयास हवी.  शिवाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करून उद्योजकांना प्रोत्साहित करणे तेव्हढच आवश्यक आहे. देशातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा खेड्यात राहतो. तेंव्हा ऑनलाइन व्यवहाराची व्याप्ती वाढविण्यासाठी गावखेड्यात इंटरनेटबरोबरच अखंडविजेची तेव्हढीच गरज भासते. जो पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात अखंड वीजप्रवाह उपलब्ध होत नाही तोपर्यंत ऑनलाइन व्यवहारात वाढ होणार नाही.

एक अनुभवी प्रशिक्षणार्थी म्हणून सांगतो- महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उद्योग विकासात सिंहाचा वाटा आहे.  संस्थेच्या नावाला साजेसं कामं एमसीईडी करत असते. शासकिय असूनही दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात काहीच उणीवा राहू नये म्हणून एमसीईडी विविध क्षेत्रातील खाजगी अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून देत असते. या केंद्रातील प्रोजेक्ट ऑफिसर सर्व प्रशिक्षणार्थींना अतिशय तळमळीने उद्योगाची तसेच शासनाच्या योजनेची माहिती देऊन उद्योगनिर्मितीस प्रोत्साहित करत असतात. उद्योग हा देशाचा आर्थिक कणा आहे. गरज आहे, सर्व एमसीईडी सारख्या इतर शासकीय संस्थेने शासनाचं उद्योग विकासाच धोरण राबवताना फक्त ते औपचारिकता न ठेवता इमानेइतबारे राबविले पाहिजे जेणेकरून पुढे अनेक उद्योजक घडून देशाची पत वाढुन देशाच्या विकास प्रगतीत मोठा हातभार लागेल.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
(लेखक एस्पी अकॅडमी या संस्थेचे संचालक तसेच करियर मार्गदर्शक आहेत.)










Saturday, 15 August 2020

        

      शिक्षकाच्या पोटाचा विचार कधी ?

कोरोना विषाणूच्या विळख्यात अख्ख जगाचं जनजीवन आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. संसर्ग होऊन प्राणहानी होऊ नये, 'जान है तो जहाँ है' म्हणून आपल्या देशात ठिकठिकाणी टाळेबंदी लागू झाली. इतर उद्योगाप्रमाणे त्याचा परिणाम सर्व शासकीय, खासगी शैक्षणिक संस्थेवर होणे साहजिक होते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लाखो खासगी शिक्षक-नोकरवर्गावर भूखमारीची वेळ आली आहे. शासकीय मान्यता असलेल्या शाळा-महाविद्यालयातील शिक्षक-नोकरवर्गाना थोडी पगारकपात होऊन पगार मिळत असल्याने कदाचित त्यांना तेव्हडी झळ बसली नसावी. पण शैक्षणिक क्षेत्रात कंत्राटवर काम करणारे, आज ना उद्या शासनाची मान्यता मिळेलच या आशेवर काम करणारा प्रचंड मोठा शिक्षकवर्ग आहे ज्यांना या टाळेबंदीची मोठी झळ पोहचली आहे.  विद्यार्थ्यांचे प्रवेश नाही, अर्थात फिस नाही त्यामुळे खासगी शाळा, महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस संचालकांना नोकरवर्गांना देण्यासाठी पगार नाही.  

कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तूचे व्यवहार  वगळता सर्व व्यवहार उद्योग बंद करावे लागले होते.  तो निर्णय योग्यच होता. पण टाळेबंदी उठवितांना उद्योग-उद्योगात स्पष्ट भेदभाव करण्यात आलेलं निदर्शनात येत आहे. एकीकडे समाजमाध्यमामध्ये 'मद्य प्राशन केल्याने लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते' अशी माहिती प्रचंड व्हायरल होत असताना दुसरीकडे 'शासनाचा मोठा महसूल बुडतो आहे' या समस्येला तोडगा म्हणून सर्व देशी दारूची दुकाने चालू करण्यात आली. असे निर्णय घेताना अर्थात फायदा आणि नुकसान या समीकरनास फाटा मारण्यात आला. येथे मी नमूद करू इच्छितो की कोचिंग क्लास, संगणक संस्था आणि इतर तत्सम संस्था ह्या सुद्धा नियमित शासनास कररूपी महसूल देत असतात.  दुसरा किस्सा असा - केस कर्तनालय, ब्युटी पार्लर सारख्या व्यवसायामध्ये इतर ग्राहकास संसर्ग होण्याचा धोका किती तरी पटीने जास्त असतो. पण दुकान बंद, पैशाच्या चनचणीला वैतागून पहिल्या लाटे दरम्यान एका बिचाऱ्या व्यवसायिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी पोस्ट मागे समाजमाध्यमामध्ये व्हायरल झाली. आज दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र सलून व्यवसाय चालू आहेत.  झाला तो निर्णय चांगलाच, मला त्या व्यवसायिकाबद्दल काहीही आकस किंवा पूर्वग्रह मुळीच नाही. अशी किती तरी व्यवसाय, उद्योगावरची बंदी शासनाने टप्याटप्याने उठविली आहे.  अशा बऱ्याच औद्योगिक उद्योगात ५० पेक्षा जास्त कर्मचारी साधारण ८-१० तास सोबत काम करत असतात. मग सोशल डिस्टनसिंगच काटेकोर पालन करून ३०-४० विद्यार्थी ४५ मिनिटे का सोबत बसू शकत नाही?  मग प्रश्न पडतो की समाज आणि देशाच भवितव्य घडविणाऱ्या पवित्र शैक्षणिक संस्थेनं कुणाचं घोडं मारलं? फक्त शिक्षक क्षेत्रंच बंद का? आज औरंगाबाद शहरात सर्व दवाखाने, हॉटेल, पान-ठेले, उद्योगासह सलून, ब्युटी पार्लर सर्वत्र सुरु असताना करियर घडविणाऱ्या शैक्षणिक संस्थाच बंद आहेत. त्या मुळे शिक्षकासह विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑनलाईन हा क्लासरूम शिक्षणाला मुळीच पर्याय नाही. सततच्या ऑनलाइन सवयीने लहान,कोवळ्या विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक तणाव येऊन ते इतर मानसिक, शारीरिक आजाराचे शिकार होऊ शकतात. आज किती तरी शाळा, कोचिंग क्लासेसकडे सोशल डिस्टनसिंग नियमाचं काटेकोर पालन करण्यासाठी मोठंमोठे हॉल उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित करून, बॅचेस वाढवून ते व्यवस्थित शिकवू शकतील. शिक्षकांना थोडे कष्ट पडतील पण ते कष्ट सहन करण्यासाठी ते तयार आहेत.  नियमित हँडवॉश, सॅनिटायझिंगसाठी सर्वांकडे तशी व्यवस्था आधीपासूनच आहे.  एव्हडच नाहीतर विद्यार्थ्यांना समाजात वागण्याची, नियम व शिस्तीच पालन करण्याच सामाजिक शिक्षण देणारे शिक्षकच असतात! त्यामुळे 'सोशल डिस्टनसिंग' ची नवीन सवय विद्यार्थ्यांच्या अंगी उतरविणे त्यांना जड जाणार नाही.

पहिल्या लाटेमूळे दहावी बोर्डाचा फक्त भूगोलाचा एक पेपर रद्द करावा लागला होता. दुसऱ्या लाटेमुळे मात्र चक्क दहावी बारावी बोर्डच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. एव्हडच नाही तर देश पातळीवर घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय, अभियांत्रीकीसाठीच्या नीट, जेईई व सीईटी सारख्या प्रवेश परीक्षा अजून व्हायच्या आहेत. त्याचा अभ्यास ऑन-लाईन, शिक्षकाविना करणे विद्यार्थ्यांना शक्यच नाही. सिलॅबस कमी करून किती कमी करणार? तसेच ऑनलाईन शिक्षण माध्यमाला खूपच मर्यादा असतात. शिवाय सततच्या डाउनलोड-अपलोड साठी सुरळीत वीज आणि इंटरनेटची गरज असते. तालुका, गाव पातळीवर हि समस्या खूप मोठी असते. थोडक्यात येणाऱ्या नीट, जेईई ह्या देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेत महाराष्ट्रीयन विद्यार्थाच जास्त नुकसान होऊ शकते, याचाही विचार व्हावा.

शैक्षणिक क्षेत्रात शासकीय संस्थेप्रमाणे खाजगी संस्थेचा मोठा वाटा आहे. किंबहुना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती तरी जास्त आहे.  शेकडो स्पर्धा परीक्षांचे शैक्षणिक शिकवणी फक्त खाजगी संस्थेतच दिली जाते. संगणक युगात सर्वच कामे  ऑनलाईन, पेपरलेस झाल्यामुळे संगणक कौशल्य शिकणे सर्वांसाठी अनिवार्य झाले आहे.  संगणक जीवनाचा अविभाज्य अंग झाला असून त्या शिकविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ५००० संस्था आज बंद आहेत.  त्यात काम करणारे हजारो कर्मचारी आज बेरोजगार झाले आहेत. लाखो रुपये गुंतवणूक करून तयार केलेला सेट-अप, जागेचे भाडे, बँकेचे न चुकणारा व्याज, नोकरांचा पगार या मुळे हा व्यवसाय गोत्यात आला आहे.   असंच चालत राहिलं तर उद्या शिक्षकासारखी संगणक केंद्र चालकांवरसुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते.  ज्यां कोचिंग सेंटरच्या इमारती भाड्याने घेतलेल्या आहेत अशा संचालकांना प्रॉपर्टीभाडे, वीज बिल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्यच नाही.

सध्या सर्वच प्रवेश प्रक्रिया ऑन लाईन करण्यात आली आहे पण ती किती फायदेशीर आहे? किती टक्के प्रवेश या पध्द्तीने होतील?  मेट्रो शहरात कदाचित ते शक्य होईल पण ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती गावखेड्यात वीज, इंटरनेट उपलब्ध आहे? किती पालक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संगणक साक्षर आहेत?  शासनाने या बाबीचा थोडा विचार करावा. आधीच दुर्लक्षित राहिलेली शिक्षणव्यवस्था कोरोनामुळे जास्तच मोडकळीस आली आहे.

तेंव्हा शासनास विंनती की शैक्षणिक क्षेत्रात 'आमुलाग्र' बदल होतील तेंव्हा होतील पण आज घडीला त्यामध्ये प्राण फुंकुन त्यास जीवन्त ठेवणे आवश्यक आहे.  शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा इतरांप्रमाणे  पोट असते असा मूलभूत विचार करून, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना 'योग्य कडक नियमावली'  आखून त्या लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मी विनंती करतो. कदाचित त्या टप्या टप्याने सुरु कराव्या लागतील, त्यास शिक्षकाची हरकत नसावी.  इथे हे सांगायची गरज नाही कि-  शिक्षकच समाज आणि देश घडवतो. शिक्षकच डॉक्टर, इंजिनियर, सीए, सीएस, उद्योजक घडवतात आणि आज शोकांतिका अशी की इतर सर्व काही व्यवस्थित चालू असतांना करियर घडविणाऱ्या शिक्षकावरच उपासमारीची वेळ आली आहे.  मग त्यांच्या उपजीविकेचा साधा विचार शासनाच्या ध्यानीमनी का येऊ नये? आणि होय, लवकर निर्णय घेण्यासाठी शासनाने खाजगी शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांची आत्महत्या होऊन त्याच कुटुंब रस्त्यावर येईल याची वाट पाहू नये!

© प्रेम जैस्वाल, 9822108775
[ संचालक व करियर ऍडव्हायजर-एस्पी अकॅडमी, औरंगाबाद] हा लेख नावासह शेअर करण्यास लेखकाची मुळीच हरकत नाही.

Saturday, 30 May 2020


        
 


 शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यक


कोरोना विषाणू वर मात करणाऱ्या लसीचा जो पर्यंत शोध लागत नाही तो पर्यंत या रोगापासून स्वतःचा बचाव करणे एव्हडच आपल्या हातात आहे. वाढत जाणारी टाळेबंदी हा काही कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. उलट या टाळेबंदीमुळे सर्व उद्योग बंद पडून देश आर्थिक संकटात लोटला जाण्याची भिती आहे. 'जान है तो जहाँन है' असं असलं तरी त्यामुळे जीवन जगणंच सोडून द्यावं का? सध्या देशाची प्राथमिकता फक्त आरोग्य असलं तरी देशाचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कोरोनाच्या निमित्ताने का होईना शेवटी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याची संधी स्वतःहून चालून आली. खरं म्हणजे 'शिक्षणाचे बाजारीकरण' 'शिक्षणाचा गोरख धंदा' 'पोकळ शिक्षणव्यवस्था' अशा विषयावर शेकडो वांझोत्या चर्चासत्र झडून हा विषय अगदी गुळगुळीत झाला आहे. पण प्रत्येक्षात पाहिजे तशी अंमलबजावनी झालीच नाही.  फक्त संस्थाचालक आणि शिक्षकांच्या उदरनिर्वाहनाच साधन बनलेल्या शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठीच ज्ञान दुय्यम स्थानी राहून त्यांच्या परीक्षा व पदव्या एव्हडच काय ते उरलं आहे.

गरज अविष्काराची जननी आहे. त्यामुळे या टाळेबंदीमध्ये पारंपरिक चॉक, बोर्ड, टॉक या पद्धतीला तात्पुरतं बाजूला करून कदाचित संपूर्ण ऑन-लाईन शिक्षण देण्याचा शासनाचा विचार होत असेल, पण ही पद्धत किती प्रभावी आहे याचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा. कालपर्यन्त मोबाईल सारख्या घातक सवयीला बेंबीच्या देठापासून ओरडून विरोध करणारे आपण आज छोट्या विद्यार्थ्यांना स्क्रीन-फ्रेंडली व्हायला सांगत आहोत. हे किती बरोबर होईल? चंचल वयाचे विद्यार्थी सतत मोबाईल वापरत असतांना त्यावर नियंत्रण कुनी करायचं? कदाचित पुढे चालून 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असं नको व्हायला!

सत्तर पेक्षा जास्त वर्ष झालीत या जगातील सर्वच गोष्टी बदलल्या. यंत्र बदललं, तंत्र बदललं.  पण आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेत पाहिजे तसे बदल घडलेचं नाही. ब्रिटिश शासनाचं कारकून बनवण्याचं कॉपी-पेस्ट शिक्षण आपण आहे तसेच पुढं चालू ठेवलं. भराभर पुस्तक घोकून आणि तेच परीक्षेत ओकून, घोकंपट्टी करून ९८% मार्क घेऊन उत्तीर्ण होणारी पिढी तयार होत गेली. व्यवहारशुन्य असलेल्या या शिक्षणात फक्त एक पोकळ पदवीधर तयार करण्याचीच क्षमता आहे. पदवी आणि स्नाकोत्तर शिक्षण घेऊनसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारीक ज्ञानाचा अभाव दिसतो. या पेक्षा मोठी ती शोकांतिका कोणती? 

आज उच्च शिक्षित पदवीधारक विध्यार्थ्यांना  जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस निरीक्षक सारख्या जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे कार्य माहित नाही. गरज पडल्यास त्यांना संबोधून एक पत्रही ते लिहू शकत नाही.  मोजमाप साहित्याचा वापर करून आपण ज्या घरात राहतो त्या घराचं एकूण क्षेत्रफळ ते मोजू शकत नाही.  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला कैंचीने काही कापता येत नाही की एखाद्या दोरीची गाठ मारता येत नाही. जीवनावश्यक असलेले योग-प्राणायाम आणि त्याचं महत्व किती विध्यार्थ्यांना माहित आहे?  किती विद्यार्थ्यांना पोटापूरता स्वयंपाक करता येतो? किती विद्यार्थ्याना आपल्या घरातील विजेच्या उपकरणाची ईतंभूत माहिती आहे. वीज बचत काय आणि वीजमीटरची नियमित रिडींग घेऊन ती बचत कशी करावी, याचं ज्ञान किती विद्यार्थ्यांना आहे. आपल्या घरात येणाऱ्या पाण्याचे स्रोत कोणते? घरात येणाऱ्या पैशाचे स्रोत कोणते, पैशाची काटकसर, बचत कशी करावी? किती विद्यार्थ्यांना त्यांच्या नातेवाईकांची संपूर्ण माहिती आहे?  किती विद्यार्थ्यांनी आणीबाणीच्या काळी कामी येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात? वरवरून स्मार्ट पण आतून पोकळ शिक्षण घेतलेले हे विद्यार्थी व्यावहारिक ज्ञानात अगदी 'बिग झिरो' असतात. दोन वर्षांपूर्वी  'एन्युअल स्टेट्स ऑफ़ एजुकेशन रिपोर्ट' प्रकाशित झाला. त्यानुसार देशातील विद्यार्थ्याची विदारक स्थिती अशी : २५% विद्यार्थ्याना मातृभाषेत वाचता येत नाही, ४३% विद्यार्थ्याना भागाकर येत नाही. ४४% विद्यार्थ्याना मोजमाप येत नाही. ३६% विद्यार्थ्यांना आपल्या देशाची राजधानी माहित नाही. ५८% स्वतःचे राज्य माहित नाही. आणि मुख्य म्हणजे 72.6% विद्यार्थी मोबाइलचा वापर करतात. अशी स्थिति असतानाही जगात विज्ञानं आणि इंजीनियरिंगमधे पदवी घेणार्यांची संख्या भारतात सर्वाधिक, हे विशेष.

आपत्ती व्यवस्थापनाची गरज आज सर्वांनाच आहे. जीवनात संकट येतील आणि जातील, पण अशा परिस्थितीला सक्षमपणे खंबिर तोंड देण्याची कला उद्याच्या नागरिकांना नको का यायला? गेल्या वर्षी सुरतमध्ये आगीची मोठी घटना घडली. एका कोचिंग क्लासमध्ये दहावीत ९० ते ९९% टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या आगीत दुर्दैवाने करून अंत झाला. ३० फुटाच्या उंचीवरून काही कल्पकता वापरून सुखरूप खाली कसं उतरावं याचा साधा विचार ते  विद्यार्थी करू शकले नाही. खरं तर पाच जीन्सला किचैन-चावीच्या रिंगणी एकमेकाला जोडून त्यांनी सहज खाली येण्याचा किमान प्रयत्न केला असता तर अनेक जीव वाचू शकले असते. असो.

थोडक्यात सांगायचे झाल्यास हि वेळ बदल करण्याची आहे.  ऑफ-लाईन घोकंपट्टीच्या जागी ऑन-लाईन घोकमपट्टी सुरु करुन काहीही साध्य होणार नाही. शेवटी विध्यार्थी हे पहिल्यासारखे परिक्षार्थीच राहतील. गरज आहे की विद्यार्थ्यांना त्याच्या घोकंपट्टीच्या चाकोरीतून बाहेर काढून जीवनावश्यक व्यवहारिक ज्ञान शिकविण्याची. त्यासाठी त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही. या टाळेबंदीमध्ये ते आपल्या घरात राहूनही ते ज्ञान संपादित करू शकतात. त्याला थोडं ऑन-लाईनशिक्षणाची जोड द्यावयास हरकत नाही. एक प्रयत्न म्हणून का होईना आगामी शैक्षणिक वर्षासाठी शासनाने हा प्रयोग करून बघावा. या शिक्षणात एकंदरीत सर्व जीवनावश्यक विषयाच्या प्रात्यक्षिक सह सर्व बाबीचा समावेश करावा. शासनाने सर्व इयतेसाठी चढत्या क्रमात योग्य असा सिलॅबस आखून तो सर्व शाळेना सोपवावा. सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्याचे १०-१० असे गट तयार करून त्यांच्या घरील कार्यावर नियमित मार्गदर्शक, निरीक्षक व शेवटी परीक्षक म्हणून कार्य करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान नं मिळता खरोखरंच ज्ञान मिळेल. प्रत्येक्ष कृतीमधून मिळणार ज्ञान हे पुस्तकी ज्ञानापेक्षा कधीही उत्तमच. साहित्यातील नोबेल प्राईज मिळालेले रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनमध्ये या प्रकारेच शिक्षण द्यायचे. तसे झाडावर चढण्याचे, पोहण्याचे किंवा सायकल चालविण्याचे प्रशिक्षण देणारं पुस्तक माझ्या ऐकिवात नाही. आणि हे जीवनावश्यक नाही असं कुणी म्हणणार नाही. या प्रक्रियेत विध्यार्थी फक्त घोकून परीक्षा देणारा परीक्षार्थी न बनता एक ज्ञानी शिष्य बनतील तर शिक्षक गुरुच्या रुपात येतील.

खरं तर हिच मोजपट्टी व्यावसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेसाठी उपयोगात आणावयास हरकत नसावी. एलएलबी, अभियांत्रिकी, वास्तूविशारद सारख्या व्यावसायीक शिक्षणाची बोंब या पलीकडची आहे. एलएलबीचं शिक्षणाची पदवी घेतलेल्या वकिलांना किमान पाच वर्षे ज्युनियरशिप करावी लागते, का? अभियांत्रिकी केलेले अभियंते एक घन फूट म्हणजे किती घन इंच हे साधं गणित विश्वासाने सांगू शकत नाहीत. अशा पोकळ शिक्षणाच्या पदवीची भेंडोळी घेतलेली उच्चशिक्षित बेकार मंडळी नोकरीसाठी वनवन फिरताना दिसतात. यासं कोण जबाबदार? विद्यार्थी की त्यांना पोकळ शैक्षणिक पदव्या देणाऱ्या गल्लेभरु शिक्षणसंस्था?

पुन्हा सांगावंसं वाटतं कोरोनामुळेचं का होईना शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची सुवर्ण संधी स्वतः होऊन चालून आली आहे.  शिक्षण क्षेत्राची भाकरी फिरवली नाही तर करपून जाईल. याला एक संधी समजून शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्राला बदलून टाकण्याची आज नितांत गरज आहे. शैक्षणिक धोरण ठरवताना सारासार संस्था-शिक्षकांच्या पोटापाण्याचा विचार न करता देशाचं भविष्य घडवणाऱ्या उद्याच्या नागरिकांचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा.  शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या मंडळींनी विद्यार्थ्यांना उद्याचे फक्त मतदार न बनवता ते देशाचं उत्तम मनुष्यसंसाधन कसं बनेल यावर गहन विचार करावा. असं जेंव्हा घडेल तेंव्हाच शिक्षणाला 'अच्छे दिन' आलेत असं आपण मानू.

© प्रेम जैस्वाल. मो.९८२२१०८७७५
(लेखक 'एस्पी अकॅडमी' औरंगाबाद या शैक्षणिक संस्थेचे संचालक असून करियर विषयक सल्लागार आहेत. नावासह हा लेख सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)

Friday, 22 May 2020


                  

           कोरोना  काय शिकवतोय?

नुकताच मधुमेह रुग्ण झालेल्या माझ्या मित्राला मी खूप आस्थेने विचारलं,  मधुमेहाने तुला खूपच त्रास होत असेल नाही? या आजारांने तुझ्या जीवनावर खूपच निर्बन्ध लावले असतील. त्यावर त्याच उत्तर होतं- मुळात मधुमेह हा आपल्याकडे मित्र म्हणून येतो. माझी आत्तापर्यंतची जीवनशैली खूपच चुकीची होती म्हणून मी मधुमेही रुग्ण झालो. आता हा मित्र माझ्या सोबत राहणार आहे त्यामुळे माझं जीवन आता अतिशय शिस्तबद्ध झालं. मी नित्य नियमाने योगा-प्राणायाम, व्यायाम करतो. प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून शरीरासाठी जे योग्य तेच खातो. शरीराच्या प्रत्येक अवयवाची योग्य काळजी घेतो, इत्यादी इत्यादी. यदा कदाचीत माझ्या मधुमेहाच निदान झालं नसतं तर माझ्या जगाण्यात शिस्त आली नसती. पुढे कदाचित मोठ्या संकटाला मला तोंड द्यावं लागलं असतं. हे एकूण मी चाट पडलो. या मधुमेहामुळे खचून न जाता माझ्या मित्राने त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने बघितलं होतं. म्हणजे हा मधुमेह त्याच्या जीवनात एक गुरु होऊन आला आणि त्याने त्याला सुतासारखं सरळ करून टाकलं. जे काम इतर कुणीला जमणार नव्हतं, ते त्या मधूमेहानं केलं! थोडक्यात जीवनातील संकट आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी आलेली असतात.  अर्थात हा लेख कोरोना विषाणूमुळे झालेल्या आपल्या जीवनातील बदला बद्दल आहे.

तसं कोरोना पूर्वीच आपलं जीवन खरोखरच खूप शिस्तप्रिय होतं का? किती जण आपले घाणेरडे हात  नित्य नियमाने स्वच्छ धुवायचे? किती कुटुंब आपलं घर स्वच्छ ठेवायचे?  आज कोरोना वगळता देशात इतर आजाराचे रुग्ण अत्यल्प आहेत. कारण आहे- आपलं सततच निर्जंतुकीकरण,शुद्ध हवा, सात्विक घरचं जेवण आणि उत्तम जीवनशैली. 'आरोग्यम धन संपदा' हे आता आपल्याला कळून चुकलं, किंबहुना कोरोनाने ते आपल्याला शिकवलं!     नाहीतर पोटात थोडी कळ आली की आपण इस्पितळ गाठायचो.  मग सुपर-स्पेशियालिस्ट, टेस्ट, सोनोग्राफी आणि शस्त्रक्रिया अशा त्या खर्चिक दुष्टचक्रात अडकुन पडायचो. मग या चक्रातून तुम्हाला कुणी मुक्त केलंय? यापुढे शासनाच्या बजेटमध्ये आयोग्यविषयीचा खर्चात मोठी वाढ होईल. तसं देशाची आरोग्यव्यवस्था सुुुधारन्याचं श्रेय कोरोना विषाणूलाच जातं.

कोरोना हा कुणालाही सहज होणारा आजार नाही. जर तुम्ही शिस्तबद्ध आयुष्य जगत आहात, नियमाच काटेकोर पालन करत आहात तर तो विषाणू तुमच्याजवळ फ़िरकनारच नाही. तो स्वतः होऊन शरीरात शिरत नाही. नित्य व्यायाम, प्राणायाम, आहार-विहारात बदल केल्यास आपण त्यापासून मुक्त राहू. आणि यदा कदाचित तो शरीरात शिरला तर उत्तम प्रतिकारशक्तीने तुम्ही त्यावर सहज मात करू शकता.

भौतिक सुख आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या मोहात अनेक कुटुंब गाव-खेड्यातूंन शहराकडे वळली. एकत्रित कुटुंब व्यवस्था काळात जमा होऊन विभक्त कुटुंब तयार झाली. घरची सुखाची भाकर सोडून, वृद्ध माता-पित्याला आहे त्या अवस्थेत सोडून ती शहराकडे वळली. 'माझं मौतीलं येणं होत नाही, मला फक्त अंत्यविधीचा व्हिडिओ पाठवा' येथंपर्यंत या नवीन पिढीची मजल गेली होती. अशा वाया गेलेल्या पिढीचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी एखाद्या विद्वान गुरूची समुपदेशन विद्या कमी पडली असती.  आज कोरोनामुळे का होईना अशा कुटुंबातील सदस्याना गावाची आठवण झाली. मुलं-सुना शेकडो मैलाची पायपीट करून गावाकडे वळली. चटणी-भाकर खाऊनच पण आज माय-बाप, मुलं-सुना, आणि नातवंड एकत्र जेवताना दिसत आहे. गांधीजी आणि आताच्या काळात सर अब्दुल कलाम नेहमी सांगत,'खरा भारत खेड्यात आहे'. पण लोकांचे कान बधिर झाले होते. चांगली बागायती वहितीची जमीन विकून लोंढा शहराकडे वाहत होता. गावात शेतंकामासाठी मजूर मिळत नव्हते. शहरी मंडळी मूळ गावाकडे वळल्यामुळे पुन्हा गाव-खेड्याला तसेच शेतीला 'अच्छे दिन' येण्याचे चिन्हे दिसत आहे. कुणामुळे हे घडलं 
सार ?

'आजी, आमच्या उठण्या आधीच सकाळी बाहेर जाणारे आणि खूप उशिरा घरी परत येणारे ते पुरुष व महिला कोण गं? 'बेटा ते तुझे ममी-पप्पा आहेत' हा मार्मिक संवाद आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या कुटुंबाचा. असं म्हणतात,  मुंबईमध्ये तर पुढचा पाय मागच्या पायासाठी थांबत नाही. या मायानगरीत मुंबईचे चाकरमाने म्हणजे चालते-बोलते यंत्रमानव. टार्गेट, कामाच्या तंद्रीत त्यांची संवेदनशीलता, भावना लोप पावून ते स्वकेंद्रित बनतात. पैसा आणि यशाचं शिखर हेच यांचं जीवन. खरं जीवन म्हणजे काय हे त्यांच्या ध्यानीमनी नसते. त्यांच्या विचारांची कक्षा स्वतःच कुटुंबासाठी नोकरी-व्यवसाय व पैसा याच्या पलीकडे वाढतच नाही. या टाळेबंदीमध्ये असे यंत्रपुरुष आज घरी असतील. मुलांना ममी-पप्पासोबत खेळण्याचा वेळ मिळाल्याचा आनंद होईल. मुंबईकराना घर काय असतं हे कोरोनाची समजावून दिलं.

या विश्वाचे आम्हीच स्वामी. अशा अविर्भावात मनुष्य या जगात वावरत होता. आपल्या स्वार्थासाठी आम्ही नद्या-जंगले सपाट करून शेती केली. मुक्या प्राण्यांना बंद कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या ठिकाणावर एसईझेडच्या नावावर लाखो किमी वर्ग जंगल नष्ट करून ते उद्योजकांचा घशात टाकलं.  प्रदूषण वाढवून वातावरण दूषित केलं.  स्वच्छ गंगेमध्ये, घाण पाणी, उद्योगाचं घाणपाणी, आणि कर्मकांडाच्या नावावर इतर घाण टाकत राहिलो.  गंगा स्वछतेच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला पण स्वच्छ गंगा हि फक्त कल्पनाच राहिली होती. आज ती स्वच्छ वाहती आहे.  या उपद्रव्यास रोकणाच्या शक्ती फक्त कोरोनातच होती. विमानाचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञानी पक्षाच्या उडण्याच्या तंत्राचा अभ्यास केला. कालांतराने मनुष्याच्या विमान उडान प्रवासात उंच उडणारे पक्षी हेच अडचण होऊ लागले. मग पक्षांना दूर करणारे यंत्र विमानात लावण्यात आले. किती हा स्वार्थीपणा. आज जगातील सर्व विमानं जमिनीवर आहेत!

स्वदेशीचा वापर केल्याशिवाय आपला देश पारतंत्र्यातून मुक्त होणार नाही म्हणून बाळ गंगाधर टिळक, वि.दा. सावरकर  आणि गांधीजीं सारख्या राष्ट्रपुरुषांनी जीवाचे रान केले. स्वातंत्र्य मिळताच आपण या राष्ट्रपुरुषांची शिकवण विसरून इंग्लिश ब्रँडच्या वस्तुकडे वळलो. कालांतराने स्वदेशी उद्योग बंद करावे लागले. परदेशी जाणाऱ्या पैशाचा ओघ वाढतच गेला.  प्रत्येक गोष्टीत आपण हिंदू संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीला जवळ केलं. आज कोरोनामूळे का होईना सगळीकडे आत्मनिर्भर व स्वदेशीचा नारा ऐकू येत आहे.

घरपण काय असतं हे कोरोनाने शिकवलं. बऱ्याच मुलांनी आपल्या आईंना स्वयंपाकात मदत करून स्वतःच स्वयंपाकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल. सर्व कुटुंबातील सदस्यानी मिळून मिसळून लाल-पान सत्ती, कॅरमचे डाव खेळले असतील. सतत जंकफूड खाणाऱ्या तरुण मंडळींना घरच्या जेवनाचं महत्व समजलं असेल. तंबाकू, मद्याची उपलब्धताच नसल्याने कितीतरी लोक नशेपासून दूर गेले असतील. आज देशात हजारो संस्था नशामुक्ती क्षेत्रात काम करत आहेत. जे त्यांना जमलं नसेल ते कोरोनामुळे साध्य झाले आहे.

मृत्यू अटळ आहे. पण जाणारा मागे राहणाऱ्याचा खर्च वाढवून जातो. गावातील गरीब मंडळी मृत्यू नंतरचे कर्मकांड करण्यासाठी कर्जबाजारी होते. किती तरी संत या विषयावर प्रवचन, जनजागृती करून गेलेत. आज तो प्रकार बंद झालाय. विवाह समारंभात आयुष्याच्या कमाईचा मंडळी एका दिवसात चुराडा करत होती. एका दिवसात १ कोटी रुपये खर्च करण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. आज २५-५० लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत आहेत. असंच पुढं चालत राहिलं तर लाखो कुटुंबाचा पैसा कर्मकांडात खर्च होवून ते कर्जबाजारी होणार नाहीत. शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील. कोरोनाची हि शिकवण आपण पुढे कायम स्मरणात ठेवायला हवी.

शेवटी आपण एव्हडच समजून घ्यायला पाहिजे की कोरोनाच्या किती तरी चांगल्याही बाजू आहेत ज्या सूक्ष्मपणे बघितल्या तर दिसतील. ' शतदा प्रेम करावं असं जीवन काय आहे' हे या काळात आपल्याला कळलं. हवेत उडणार आपलं महत्वकांक्षी विमान त्यानं चक्क जमिनीवर आणून उभं केलं. तो आपल्या वाईट सवयी सुधारण्यासाठी, जीवनशैली सुधारण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी आला आहे. जातांना किंवा सोबत राहताना कोरोना आपल्याला चांगल्या सवयी लावून देईल.  ज्याचा आपलं जीवनमान उंचावण्यासाठी फायदाच होईल.

आज माहिती तंत्रज्ञानाने अचाट प्रगती केली आहे. यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता व सॉफ्टवेअरची जोडजाड करून आपण किती तरी गोष्टी सोशल-डिस्टनसिंगच तंतोतंत पालन करू शकतो. मानवजातीला पर्याय म्हणून समोर आलेलं हे तंत्रज्ञान मानवजातीच्या बुद्धीचं महत्व कमी करणारं आहे, यात शंका नसावी.  कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मनुष्यजात बंदिस्त होऊन स्वयंनियंत्रित नसलेले सर्व उद्योग थांबले.  त्यामुळे येणाऱ्या काळात ऑटोमायझेशनच्या दृष्टीने या तंत्रज्ञानामध्ये प्रचंड विकास होईल, हे निश्चित. आणि हा मार्ग दाखविणारा दिपस्तंभ म्हणून पुढील काळात कोरोनाच नाव घेण्यात येईल. या तंत्रज्ञानाणे सज्ज मानवजात येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यास समर्थ राहील.

कोरोना हे नुसतं संकट नसून तो सुद्धा आपल्या जीवनात एक मार्गदर्शक गुरु बनून आला आहे. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, दृष्टिकोन बदलला की ती दिसते. आज कोरोना संकटाशी मुकाबला करतानाच आपण एव्हडे मजबूत होऊ की उद्याच्या मोठ्या संकटाशी सामना करण्याची शक्ती आपल्याकडे असेन. माझे मित्र औरंगाबादचे वरिष्ठ बालरोगतज्ञ प्रा.डॉ.प्रशांत पाटिल यांच्याशी मनमोकळा संवाद साधताना हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मला जे समजलं उमजलं मी लिहिलं. आपलं मत भिन्न असू शकतं.

© प्रेम जैस्वाल, ९८२२१०८७७५
   पेडगावकर, ह.मु. औरंगाबाद
[नावासह हा लेख सामायिक करण्यास माझी हरकत नाही]



Wednesday, 20 May 2020


        
          

                        कोरोना व आर्थिक संकट

कोरोना विषाणूमूळे होणाऱ्या कोव्हिड-१९ आजाराने जगातील प्रत्येक व्यक्तींमध्ये भीतीच वातावरण निर्माण केलं आहे. सोबतच या अमर्याद संकटाने उद्याच्या अनिश्चित आर्थिक चिंतेलाही जन्म दिला आहे.  पाश्चिमात्य देशाची स्थिती बघता आपण कधी या संकटातून मुक्त होऊ या बद्दल कायम एक अनिश्चितता दिसत आहे.  जोपर्यंत एखाद्या देशात प्रभावी लसीचा शोध लागत नाही तो पर्यंत दिवसागणित आर्थिक चिंतेत भर पडत जाईल.  सततच्या टाळेबंदीमुळे छोटी दुकानं, लहान कुटीर उद्योग तसेच मोठे उद्योग संकटात सापडून त्यांच्यावर मंदी किंवा कायमची टाळेबंदी होण्याची टांगती तलवार आहे.  उद्योगधंदेच बंद झाल्यामुळे देशाच आर्थिक चक्र थांबल्यात जमा आहे. अर्थात याचा परिणाम समाजातील सर्वच स्तरावर होऊन जिण्या-मारण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेसाठी फक्त प्रश्नच आहे- उद्या काय होणार? किती काळ मंदी राहील? कसे दिवस काढायचे?

इतिहासात या पूर्वीसुद्धा अशी भीषण संकट येऊन गेलीत. दोन महायुद्ध, भीषण दुष्काळ, प्लेग सारख्या साथीरोगाबद्दल आपण वाचत आलोत. पण या संकटाचा सामना आपल्या पूर्वजांनी समर्थपणे केला. आपल्या जगण्याच्या सवयीत त्यांनी बदल केला. नवीन नियम लागू केले त्यामुळेच कदाचित आजचा दिवस बघण्यासाठी आपण जीवन्त आहोत. आपल्या नशिबात आलेलं कोरोना विषाणूचा संकट हे आपण वर्तमानात अनुभवत आहोत. हा जीवघेणारा कोरोना आपल्याला बरंच काही शिकविण्यासाठी आलेला आहे,  हे निश्चित. तसे 'हे हि दिवस निघून जातील' आणि या संकटाशी दोन हात करून उद्या आपणही पुढे निघून जाऊ.

मानवाने विज्ञानात कितीही प्रगती केली तरी निसर्ग आणि दैवापुढे त्याच काहीही चालत नाही, हे कोरोनाने पटवून दिलं. नियमाप्रमाणे गाडी चालवत असताना पुढील चालक तुम्हाला येऊन धडकतो, जख्मी करतो. तुमची काहीही चूक नसताना हे तुमच्या सोबत कसं घडतं, याला काय म्हणायचं? विज्ञान तंत्रज्ञानात झालेल्या अचाट प्रगतीमुळे  मनुष्यजातीचा दैववादापेक्षा विज्ञानवादावर जास्त विश्वास वाढला आहे.  या विज्ञानवादात एक स्वकेंद्री अहंकारपणा सुद्धा आहे. त्यामुळे मुलं जन्मल्याबरोबर तो शिकून काय होणार याच पूर्ण प्लॅनिंग आपण आधीच करून ठेवतो. काही लाखाची उलाढाल असलेले छोटे उद्योजक कोट्यवधींची कर्ज घेऊन बसतात. किती हा प्रचंड आशावाद!  जणू उद्याच्या सर्व घटना ह्या आपल्या मनासारख्याच घडणार आहेत. अनिश्चित भविष्याबाबत मनुष्य एव्हडा गाफील कसा राहू शकतो? आशावादी असणे ठीकच त्यामुळे जीवनात एक सकारात्मकता येते. पण उद्या काहीही घडू शकतं या बद्दल मनुष्य कधीच विचार का करत नाही?  कदाचित त्याच्या सभोवतालची स्पर्धा, तुलना व  वातावरण त्यास तस करू देत नसावं का?  विमा विकणाऱ्या कंपन्या नको त्याच्या गळ्यात मोठा हप्ता असलेल्या पॉलिसीज विकून टाकतात. कर्ज देणाऱ्या कंपन्या नको त्याला भलं मोठं कर्ज देऊन टाकतात. ज्यांच नुकतंच छोटं दुकान टाकलेलं आहे ते मोठं कर्ज घेऊन बसतात या आशेवर की धंदा वाढवायचा आहे.  ज्यांच उद्योगाच एक युनिट आहे तो पुढील पाच वर्षात डिमांड लक्षात घेऊन कर्ज घेऊन अजून दोन युनिटसाठी कर्ज घेऊन ठेवतो.  ज्यांना नुकताच जॉब लागलेला असतो ते नोकरीच्या भरवश्यावर घर-गाडीसाठी प्रचंड कर्ज घेऊन ठेवतात.   सर्वांचा उद्याच्या प्रगतीवर  पक्का विश्वास असतो म्हणुनच तर हे सर्व नियोजन केलेलं असतं. त्यामागे एक सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन असतो. पण हे करत असताना उद्याच्या अनिश्चिततेबद्दल आपण किंचितसा विचार का करत नाही.  उद्याचा दिवस आपला आणि आपण जे योजिले ते करणारच, यात भर पडते महान लोकांच्या सुविचाराची - 'काही भव्य-दिव्य करायचं असेल तर जोखीम तर घ्यावीच  लागेल.' नो रिस्क नो गेन', थिंक बिग! . एमबीए शिकलेले तरुण तर सर्व जोखमीच गणित करून कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन पुढील वीस वर्षाची प्लॅनिंग करून ठेवतात. जणू ठरवलेल्या प्रमाणे घडायला आपण ईश्ववरी वरदान मिळालेले अवतार पुरुषच आहोत ?

मुळात जगात भौतिक सुखाची स्पर्धा, विज्ञानवाद एव्हडा वाढलाय की दैववादाचा विचार कुणी करतच नाही.  त्यामुळे पुढील काळाची योजना करताना 'काहीही घडू शकत' हे कुणी गृहीत धरत नाही.  कोरोनामूळे निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्येचा सर्वात जास्त त्रास त्यांनाच होईल ज्यांनी भविष्याला गृहीत धरून योजना आखल्या होत्या. ज्यांच्या आर्थिक नियोजनत शिस्त नव्हती. उदाहरणार्थ- उद्याचा विचार न करता खाऊन-पिऊन घ्या अशी मानसिकता असलेला चैनी वर्ग, हातावर पोट असणारा मजूर वर्ग, अफाट कर्ज घेतलेला व्यापारी वर्ग, चुकीची विमा पॉलिसी/ गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता इतरांसाठी जगणारी दिखाऊ जनता, अनियंत्रित खर्च वाढवून ठेवणारे कुटुंब यांना या टाळेबंदीनंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो. अशा लोकांनी यापुढे तरी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करायला हवंय जेणेकरून पुढील आयुष्यात अशी वेळ येणार नाही. कोणतंही संकट हे दीर्घकाळ टिकत नसतं, कालांतराने त्यावर उपाय येतोच. 

कुठं तरी वाचलं होतं, एखादया उंचीवर दोर पकडून चढताना थोड्या थोड्या अंतरावर गाठ बांधत चढावे लागते. त्याचा फायदा असा की उंचावरून हात सैल झाला तर आपण एखाद्या गाठीवर अडकून थांबू शकतो. गाठ न बांधता सरळ वर चढत गेलो तर हात सैल होऊन सरळ 'फ्री-फॉल' होण्याची भीती असते. आर्थिक नियोजन करताना थोडी अशीच योजना केली तर कोरोनासारख्या एखाद्या संकटात मनुष्य सहज तग धरू शकतो आणि पुढील जीवन सुसह्य होऊ शकतं.

© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)

Sunday, 15 March 2020




                            सौरऊर्जेची उपकरणे


आज सौरऊर्जेच सर्वत्र गुणगान होत असलं तरी आपल्यासाठी ती अगदीच नवीन नाही. पूर्वी वापरत असलेल्या घड्याली, कॅल्क्युलेटरमध्ये ती हमखास वापरल्या जायची. एव्हडेच नव्हे तर अवकाशातील कृत्रिम उपग्रहाला ऊर्जा पुरवण्यासाठी सौरऊर्जेचाचं उपयोग होत असतो. कोणत्याही तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी त्याची किंमत महत्वाची असते.  सततच भारनियमन, अफाट विजबिलामुळे हळूहळू का होईना देशात सोलारची मागणी वाढत आहे. वाढत्या वापरामुळे सोलारच्या किमती आज बऱ्याचा खाली आल्या आहेत. आज विजेवर चालणारी सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालत आहे. मग ती घरगुती उपकरणे असो की उद्योगात चालणारी उपकरणे असो. वाढत्या सोलार उद्योगामुळे आज घराच्या छतावर सोलार पॅनल चमकताना दिसत आहे. एव्हडच नाही तर बरीच उद्योगातील कंपन्यांची उपकरणे सोलारवर चालत आहेत.
देशातील टेस्टी फूड उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेले हल्दीराम लवकरच सौर उर्जेच्या सहाय्याने फूड प्रॉडक्टस तयार करणार आहेत.

राज्यात उद्योग आणि शेतीसाठी वाढत असलेली विजेची मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीचे पर्यायी, शाश्वत स्रोत निर्माण करणे व नैसर्गिक स्रोतांपासून वीजनिर्मिती करणे आवश्यक झाले आहे.  पारंपरिक वीज वापरात बचत करणे, हे लक्षात घेऊनच राज्यात 'अटल सौर कृषी पंप' योजने अंतर्गत सौर कृषी पंप वाटपास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्या. शेतकर्‍यांना सुमारे साडे पाच हजार सौर कृषीपंप प्रायोगिक तत्वावर देण्यात आले होते. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर आता सात हजार सौर कृपीपंप देण्यात येणार आहे. सौर कृषी पंपांपैकी 25 टक्के पंप हे 3 एचपी क्षमतेचे असून त्याची किंमत सुमारे 2 लाख 40 हजार रुपये आहे. पण यावर अनुदान देण्यात येणार असल्यामुळे शेतकर्‍यांना सुमारे 12 ते 12 हजार 500 रुपयांमध्ये देण्यात येईल. 75 टक्के पंप हे 5 एचपी क्षमतेचे असतील. त्याची किंमत सुमारे तीन लाख 25 हजार रुपये आहे. यावरही अनुदान देण्यात येणार असून हे कृषी पंप शेतकर्‍यांना सुमारे तीस हजार रुपयांना उपलब्ध होतील. त्यानुसार 3 अश्वशक्तीचे 1750 पंप व 5250 पंप 5 अश्वशक्तीचे देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत 5 टक्के हिस्सा लाभाथ्याला भरावा लागणार आहे. 95 टक्के निधी केंद्र आणि राज्य शासनाचा राहील.
सौरऊर्जा आपण दोन प्रकारे वापरू शकतो. बॅटरी न लावता सरळ घरातील उपकरण चालविण्यासाठी व दुसरा पर्याय म्हणजे दिवसा बॅटरीरीमध्ये वीज साठवून तिचा वापर रात्री करता येतो. अर्थात बॅटरीमुळे सौरऊर्जा संचाच्या किंमतीत वाढ होते.

भारत देशात तीन चतुर्थतांश ऊर्जा ही औष्णिक आहे. . देशात बहुसंख्य वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्यात येते. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमतीत सतत वाढ होत असते. वीज निर्मितीसाठी पुरविला जाणारा कोळशाची उपलब्धता हा एक प्रश्न असतो. तयार झालेली विजेचे वितरण, गळती त्यामुळे दर वाढतच जातात. औष्णिक विजनिर्मितीमुळे वातावरणात होणारा प्रदूषण ही मोठी समस्या आहे. तेंव्हा पर्यायी, प्रदूषणरहित, सौरऊर्जेचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या देशापुरता विचार केल्यास लक्षात येतं कि भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. त्यामुळे या काळातही सूर्याकडून येणारी सूर्यकिरणे भारतावर पडताना लंबरूप असतात. त्यामुळे या किरणांची कार्यक्षमता अधिक असते. ढगाळ, प्रदूषित वातावरणाचा सौरऊर्जानिर्मितीवर परिणाम होत असते. थोडक्यात आपल्या देशातील हवामान सौरऊर्जेस अत्यन्त पोषक आहे.  पावसाळ्याचे ६५ दिवस वगळता इतर ३०० दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने त्याचा सदुपयोग केला पाहिजे. दर दिवशी सूर्याकडून 1 चौ.मी. क्षेत्रफळावर 1 किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते.  या ऊर्जेत १० वॉटचे १० एलईडि दिवे १० तास चालू शकतील. सौरऊर्जेचा फक्त वीजनिर्मितीकरिताच होत नाही तर पाणी तापविण्यासाठी, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता होतो. औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर  ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे.

सौरऊर्जा सुरुवातीस महागडी वाटत असली तरी भविष्याचा विचार करता ती खूप फायदेशीर आहे.  नवीन तंत्रज्ञानामुळे त्याची कार्यक्षमता वाढून भरपूर बचत होते. इतर फायदे :

1. अक्षय व नविकरनक्षम ऊर्जास्रोत :  भूतलावर कुठेही सहज उपलब्ध सौरऊर्जा अखंड व न संपणारी आहे. इतर ऊर्जास्रोत प्रमाणे संपणारी नाही.
2. आपल्या विजबिलात भरपूर कपात होते. अधिक ऊर्जा आपण 'पॉवर ग्रीड' शी जोडून (विकून) पैसेही कमवू शकतो.
3. कमी देखभाल : सौरऊर्जेचा देखभालचा खर्च खुप कमी असतो.  कोणताही फिरणारा पार्ट नसल्याने, फक्त पॅनेलची नियमित साफसफाई करावी लावते. हल्ली उत्पादक पॅनेलची ,२०-२५ वर्षाची वॉरंटी देतात. पाच-सहा वर्षे इन्व्हर्टरला दुरुस्त करण्याची गरज पडत नाही.
4. दुर्गम ठिकाणी वापर : जेथे पारंपारिक वीजेचं वितरण शक्य नाही अशा ठिकाणी सौरऊर्जा चांगला पर्याय आहे. भारतात अनेक ठिकाणी स्वयंचलित सोलार-लाईट बघायला मिळतात.
5. नविन तंत्रज्ञान: नॅनोटेक्नॉलॉजिसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेचे पॅनल कितीतरी पटीने जास्त ऊर्जा तयार करतील त्यामुळे जास्त फायदा होईल.
6 कमी प्रदूषण : काहीही वेस्ट निघत नसल्याने वातावरणाच प्रदूषण होत नाही.

असे असले तरी सौरऊर्जा वापरण्यात काही अडचणीसुद्धा आहेत. सुरुवातीचा खर्च हा सर्वांना झेपेलच असा नाही. शासनाकडून घरगुती उपयोगासाठी सबसिडी मिळत असली तरी सोलार पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी आणि वायरिंगचा खूप जास्त येतो. तसेच सौरऊर्जा पूर्णतः सूर्यप्रकाशावर अवलंबुन असल्यामुळे वातावरणाचा बदल एक मोठी अडचण असते. पावसाळ्यात, आभाळ असताना पाहिजे तेव्हडी ऊर्जा तयार होत नाही. सोलार पॅनेलमध्ये तयार होणारी ऊर्जा आपण सरळ वापरू शकतो किंवा साठविण्यासाठी मोठ्या बॅटरी लागतात, त्या महाग असतात. शिवाय सोलार पॅनल आणि बॅटरीसाठी खूप जागा लागते. एखादं छत छोटं असेल तर अडचण होते.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेत सतत बदल होत आहे. त्यामुळे उच्च तंत्रज्ञान, अधीक कार्यक्षमता असलेला आधुनिक सोलार थोड्या कमी किमतीत आज उपलब्ध आहे. किंमत कमी होऊन ते सर्वांच्या आवाक्यात यावं म्हणून त्यासंबंधित सतत  संशोधन चालू आहे. जसेकी रिमोट किंवा मोबाईल द्वारे सोलार पॅनेलची दिशा सूर्याकडे वळवण्याच तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सौरऊर्जेचा जोडीला वाय-फाय, इंटरनेट आल्यामुळे आपल्या मोबाईलवर बॅटरी चार्जिंग व इतर सर्व गोष्टीची माहिती मिळणे सोपे झाले आहे. सौरऊर्जा दोन भागात विभागून वीज तसेच त्याच्या उष्णतेचा उपयोग एखाद्या हिटर किंवा टर्बाईन साठी होत आहे.  सोलारमूळे घराच्या छताची शोभा कमी होऊ नये म्हणून 'सिस्टीन सोलार'या बॉस्टनच्या कंपनीनं घराच्या रंगसंगतीला मिळत्याजुळत्या रंगाच पण त्याच कार्यक्षमतेचा पॅनल तयार करत आहे. त्यामुळं गच्चीवर सोलार पॅनलची अडचण होणार नाही. यालाच 'सोलार-स्किन' हे नाव देण्यात आलं. अमेरिकेच्या एका बर्फाळ महामार्गावर तर एक भन्नाट प्रयोग झाला. त्याला सोलार पावर्ड रोड म्हणचे 'सौरउर्जित महामार्ग' असं नाव देण्यात आलं.  भर महामार्ग रस्त्यावर आपल्याकडं पेव्हरब्लॉकचा उपयोग करतात तशी २० बाय १२ फुटचे सोलार पॅनल अंथरून त्याचा दोहेरी उपयोग केला गेला. निर्माण होणारी सौरवीज रात्री एलईडी दिव्यासाठी तर उष्णतेचा उपयोग रस्त्यावरील बर्फ वितळण्यासाठी होत असतो. फ्रांस सरकारचा येत्या पाच वर्षात ६२१ मैल रस्ता सौरउर्जित करण्याचा मानस आहे. तो दिवस जास्त दूर नाही जेंव्हा खूप छोटे छोटे सोलार पॅनल आपल्या वस्त्रातील कपड्यावर विणले जातील ज्यावर आपला प्रिय मोबाईल चार्ज होत राहील. मग घरातील पडदेसुद्धा सोलार पॅनलचं काम करतील. क्रोयोशियाचा शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांनी १९वया शतकात वायरलेस चार्जिंगच भविष्य वर्तवल होत. आज इंग्लडच्या नोटिझम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी खिशाला लागणारी छोटी वायरलेस सोलार 'चार्जिंग चिप' तयार केली आहे त्यामुळे प्रवासात आपला मोबाईल आपोआप चार्ज करणे शक्य होईल. यावर पावसाच्या पाण्याचा परिणाम होणार नाही. याशिवाय सौरऊर्जा साठवण्यासाठी आवश्यक बॅटरीची क्षमता वाढविण्या संबंधित संशोधन चालू आहेत. देशात सर्वात मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प तामिळनाडू मधील कामुठी येथे १० चौ. कि.मी. जागेवर विस्तारलेला आहे.   तब्बल ६४८ मेगावॉट वीजनिर्मिती करणारा ह्या सौरप्रकल्पाचा जगात दुसरा क्रमांक लागतो.  तर आशिया खंडातील 'पहिली सोलार युनिव्हर्सिटीचा' मान १६४.८ किलोवॉट वीजनिर्मिती करणाऱ्या हरीयाणा विद्यापीठाला जातो. संपूर्ण विद्यापीठ सौरऊर्जेवर कार्यान्वित करून जास्तीची सौरऊर्जा ग्रीडद्वारे विकुन विद्यापीठ वर्षाकाठी ८० लाख रुपये कमवतो. याच वर्षी संपूर्ण परिसरात सौरऊर्जेचा उपयोग करणारे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे महाराष्ट्रात पहिले ठरले. चौदा इमारतीवर सौरऊर्जा कार्यान्वित करून वर्षाकाठी विद्यापीठाला  ₹ ३५.५ लाखाची विजबचत होणार आहे. प्रदूषण, कार्बन उत्सर्जनाचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे १७ हजार ४२० वृक्षाची लागवड करण्यासारखं आहे. गुजरात व हरियाणामधील विद्यापीठात सौरऊर्जे संबंधित अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. पारंपरिक उर्जेला फाटा देऊन अक्षय सौरऊर्जेला चालना मिळावी म्हणून भारत देशाने पुढाकार घेऊन १२१ देशाची एक संघटना स्थापन केली त्याला इंटरनेशनल सोलार अल्लायन्स [ISA) असे नाव दिले.
पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच उजनी धरणावर एक हजार मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरप्रकल्प निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे.

पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त शहरी राहणीमान उंचावण्यासाठी होत असेल तर तो कितपत योग्य ?  माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांच्या मताप्रमाणे खरा भारत खेड्यात आहे. रोजच्या आत्महत्या बघता खेड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट आहे, हे सांगणं न लागे. एकाच वेळी त्यांना अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाला सामोरं जावं लागतं.  बेभरवशाची वीज आणि वाढत्या विजदरामुळे शेतीला पंपाने पाणी देणे परवडत नाही. कित्येकदा बिकट आर्थिक स्थितीत वेळीच वीजबिल न भरल्यामुळे भर मोसमात वीजजोडणी कापुण पिकाचे अतोनात नुकसान होते.  शासनाने शेतीसाठी उपयुक्त सौरऊर्जेचा संच घेण्यासाठी सबसिडी दिली आहे ज्यामुळे देशाच्या पोशिंद्या शेतकऱ्यांना ते विकत घेणं शक्य होईल. त्यामुळे बळीराजाचे 'अच्छे दिन' आलेत.  स्वतःच्या सौरऊर्जेने ते पाण्याचे पंप व इतर उपकरणे चालवू शकतील. अर्थात देशभर ग्राहकांची संख्या वाढून आपोआपच सौरऊर्जा प्रकल्पाच्या किमती खाली येतील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सौरउर्जेमुळं शेती उद्योगास चांगला हातभार लागेल, देश सुजलाम सुफलाम होईल.

© प्रेम जैस्वाल
(लेखक एस्पी अकॅडमी या संस्थेचे संचालक आहेत)
मो.९८२२१०८७७५
premshjaiswal@gmail.com