खिचडी गाथा
जे खाऊन आपण मोठे (वय आणि आकाराने!) झालो त्याबद्दल दोन शब्द नं लिहावे, मग आपल्या लिखाणाला काय अर्थ हो? बॅचलर काळात एक-दोन नाही तर तब्बल १६ वर्ष जीच्या सेवनामुळे आपण या जीवनात तग धरू शकलो त्यासाठी एक लेख तर बनतोच! विशेष म्हणजे आज सर्व पक्वान्न उपलब्ध असतांना 'एक हक्काचं आरोग्यवर्धक व्यंजन' म्हणून आजही माझं आणि तिचं ते 'पवित्र नातं' मी जपून आहे.
'बिरबल की खिचडी कब पकेंगी?' या प्रश्नाने खिचडीला सतत प्रकाश झोतात ठेवलं. किंबहुना खिचडीला बिरबलमुळेच जास्तचं प्रसिद्धी मिळाली असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही. याचा अर्थ खिचडी हे व्यंजन अकबरच्या काळापासून सुरु झालं असं नाही. प्राचिन इतिहासात सन ३५० सालापूर्वी तशी नोंद आढळते. त्याला कारण ती तयार करावयाची सोपी, सहज पद्धत आणि तिचे फायदे. तांदूळ आणि दाळ (कोणतीही), एक पातेलं उपलब्ध झाले की खिचडी तयार! जे आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत किंवा ज्यांना जिभेचे चोचले पुरवायचे ते त्यात आवडेल ते मसाले, जीवनसत्व वाढविणाऱ्या भाज्यांचा भरणा करू शकतात, बिचाऱ्या खिचडीचा त्यास विरोध नसतो. ती त्या वस्तूला आपलंसं करून घेते. काय तिची सहनशक्ती!
विभिन्न जाती, धर्म व पंथ असलेल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रांतात तिला वेगवेगळी नावं आहेत. नावाप्रमाणेच खिचडी तयार करण्याची पद्धत भिन्न असू शकते पण त्यामुळे तिची महती कमी होत नाही. मुंगाची खिचडी, तुरीची खिचडी, उडदाची खिचडी, मसालेदार खिचडी, आलू खिचडी, फोडणीची, रुग्णासाठी हलकी, साधी खिचडी असे शेकडो प्रकार आहेत. बऱ्याच खिचडीच्या स्वादिष्ट चवीने एखादया जुजबी हॉटेल ढाब्यावाल्याचं किंवा गावाचं नाव सर्वदूर प्रसिद्ध केलं आहे. जोडीला गरमागरम भज्जी, तूप आणि पापड असलं, अहा..हा, तो फिर क्या कहेने ! एके काळी वारंग्याची (जिल्हा नांदेड ) खिचडी खूप प्रसिद्ध होती. किंवा खिचडीमुळेच वारंगा सारख्या छोटया बस फाट्याचं नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कालांतराने त्या खिचडीच लोन कळमनुरी, हिंगोलीमार्गे औंढा नतंर जिंतूरपर्यंत पोहचलं. तीस जोड मिळाली स्वादिष्ट भज्जाची! त्यामुळे खिचडी जास्तच प्रसिद्ध होत गेली.
सर्व सुखसोयी पायाशी लोळणाऱ्या जमान्यात स्वतः स्वयंपाक करणारी 'बॅचलर जमात' आज दुर्मिळ होत चालली आहे. पण आमच्या काळात उचशिक्षणासाठी (प्राथमिक पुढचं!) बाहेर गावी शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी खिचडी म्हणजे-'एक तुही सहारा' होती. भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या विद्यार्थांना सर्व काम स्वतः करावी लागायची. पैशाचे दर्शन दुर्लभ होतं. अभ्यास, गृहपाठ करून खोलीतील इतर कामं उरकणं कठीण जायचं. त्यामुळे झटपट पोट भरण्यासाठी खिचडी हा एकमेव पर्याय असायचा. पिठ मळून, गोल भाकरी-चपात्या थापणे, आणि विशेष म्हणजे त्या बिन भरवशाच्या पितळी स्टोव्हवर भाजणे दिव्य काम वाटायचं. मधूनच तो दळभद्री स्टोव्ह आमची सत्वपरीक्षा घ्यायचा. त्याची अग्निझोत मधूनच फर्रर्रर्रर्रर्रर्र करत एकीकडे वाकडं रूप धारण करायची. मधूनच बंद पडुन नीरव शांततेत मंदिराच्या गाभाऱ्यात छोटी ज्योती तेवत रहावी असं रूप धारण करायचा. पिन केल्यास भडका उडून रॉकेलचा उग्र वास सोडायचा. बऱ्याचदा त्यातलं रॉकेल संपलेलं असायचं. क्वचीत पिन बर्नरच्या छिद्रात तुटून अडकली तर बसा बोंबलत! मग खाणंपिणं बाजूला. सायकलला स्टोव्ह टांगून ..फटलक...फटलक करत स्टोव्ह दुरुस्ती, रॉकेल आणण्यासाठी दुकान गाठावं लागायचं.
नवव्या वर्गात शिकत होतो. जिल्हा परिषद शाळेची वेळ सव्वा बाराची होती. दोन घास खिचडी खाऊन शाळेत जायचं ठरवलं होतं. पण स्टोव्ह जीव घेत होता. बारा वाजून दहाला शाळेसाठी निघायचं होतं. वेळे अभावी खाणं तर दूर ती शिजविणेसुद्धा शक्य नव्हतं. एक युक्ती सुचली- चालू स्टोव्हची पिन किंचितशी मोकळी करून मी तसाच शाळेसाठी निघालो. मधल्या सुट्टीत अडीच वाजता परत येणार होतोच तोपर्यंत खिचडी शिजून तो स्टोव्ह आपोआप बंद होईल अशी योजना होती. महत्वाचे तास चालू असतांना माझं मन मात्र चालू स्टोव्हवर शिजत ठेवलेल्या त्या खिचडीवर केंद्रित होतं. काय झालं असेल? मधूनच स्टोव्ह बंद पडला तर....? स्टोव्ह चालूचं राहून खिचडीचा कोळसा तर झाला नसावा.... ? या प्रश्नापुढे वर्गात सर विचारत असलेले प्रश्न तुच्छ वाटू लागले. प्रतीक्षा होती मधल्या सुटीची. एकदाची घंटा वाजली. खोलीकडे धूम ठोकली. योजना सफल झाली होती. पोट भरून पुन्हा शाळेत.
दुसरा अनुभव अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा. स्ट्रगलचा काळ होता तो. धाकटा भाऊ किरणसोबत मी औरंगाबादला खोली करून राहत होतो. नुकताच डे-नाईट क्रिकेट हा प्रकार सुरु झाला होता. शेजारच्या कृष्णधवल टीव्हीवर साडे दहाला मॅच बघून आम्ही स्टोव्हवर खिचडीचा कुकर ( म्हणजे प्रगती!!) ठेवला. शिजण्याचा प्रतीक्षेत आम्ही बिछान्यावर पहुडलो होतो. एका तासाने आमची झोप उडाली ती काळ्या धुरांनी! खोलीभर काळाकुट्ट धूर पसरला होता. खिचडी पूर्णतः जळून खाक होऊन,उच्च दाबामूळे कुकरचा सेफ्टीव्हॉल्व्ह फाटला होता. अर्थात रात्री उपाशी झोपणे हा एकमेव पर्याय होता. शिवाय उद्या कुकर दुरुस्तीच काम....!
विद्यार्थी दशेत खिचडी हा एकमेव पर्याय होता. सर्व व्यवस्थित असेल तर दहा मिनिटाच्या आत ती शिजायची. आडकाठी आणायचा तर तो स्टोव्ह! कधी वॉशर, कधी बर्नर तर कधी पिन ऐन वेळी हात दाखवायचे. सर्व ठीक तर चक्क रॉकेल आमच्या जेवणात व्हिलन बनून हजर व्हायचा. बऱ्याचदा काही उकळ्या आल्या की भुकेमुळे शिजण्यापूर्वीच ती फस्त व्हायची. दाळ, लसूण, कांदे, चटणी, हळद, असो वा नसो काम थांबायचं नाही. पुढे पुढे आमच्या 'भोजनात' मोठी प्रगती झाली. सोबत वरण-टमाट्याचा 'शोरवा' तयार करायचो, त्यामुळे खिचडीला 'चार चांद' लागायचे.
आजही जमिनीत बोअर करणारी मशीन बघितली तर खिचडी आठवते. बोरिंगवर काम करणाऱ्या, कायम धुळीने माखलेल्या महान कारागिरांच बिऱ्हाड त्या गाडीवरंच असतं. बोरिंग-खिचडीचा 'चोली-दामन का साथ'. एकीकडे बोरिंगचा प्रचंड गोंगाट, कमालीची धूळ उडत असतांना थोड्याचं अंतरावर त्यांचे दोन सहकारी मात्र लसूण, कांदे, टमाटे चिरण्यात मग्न असतात. विशेष म्हणजे स्टोव्हपूरती सपाट जागा त्यांना मिळाली की सुरु.... . एका भल्या मोठया अल्युमिनियमच्या पातेल्यात गरमागरम खिचडी शिजत असते. एकीकडे ड्रीलचा जमिनीत दगड फोडून शिरत असतांनाचा ठन..ठंन.ठंन...फुस्स्स..फुस्स्स गोंगाट, धूळ तर दुसरीकडे फर्र्रर्र..र्रर्रर्र स्टोव्हवर खिचडी शिजत असते. काम संपन्न झालं की खिचडी झोडून ती मंडळी पुढच्या कामासाठी तयार!
वर्ष २०१७ मध्ये वृत्तमानपत्रात एक सुखद बातमी झळकली. माध्यमाने खिचडीला 'नॅशनल डिश' तर मायबाप सरकार दोन पाउले पुढे जाऊन या 'वन पॉट' मेन्यूला 'क्वीन ऑफ ऑल फूड' अशी उपमा देऊन जागतिक प्रसिद्धी देणार म्हणे, असं वाचलं. त्यात म्हणे प्रोटीन, कार्बोहायड्रेट सह अमिनो ऍसिड, कॅलरी अशी आरोग्यवर्धक घटक असून शिवाय पचनासाठी ती हलकी वगैरे. देशातील प्रसिद्ध आहारतज्ञानी त्या बातमीस दुजोरा देऊन अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. वाचून सुखद धक्क्का बसला. मनमोराचा बिसारा फुलल्यासारखी माझी अवस्था झाली. थोडक्यात प्रतिकूल परिस्थितीत जीने आम्हास जगवलं, तगवलं, ते व्यंजन काही साधंसुधं नव्हतं तर! कालांतराने कळालं कि त्यातसुद्धा प्रांतिय राजकारण शिरलं. या बातमीने गव्हाचं प्रचंड उत्पादन करणाऱ्या उत्तर भारताचं महत्व कमी होऊन भात पिकविणाऱ्या दाक्षिणात्य प्रांताच महत्व वाढणार होतं. पंजाबच्या एका मंत्र्याने त्यास विरोध केला. शेवटी खिचडी विषयीची ती बातमी एक 'खयाली पुलावं' ठरली. असं असलं तरी शालेय विद्यार्थ्यांची गळती कमी होऊन उपस्थिती वाढावी, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून मध्यान्ह भोजन म्हणून खिचडीचा समावेश करण्यात आला. आज देशातील लाखो शाळेत मध्यान्ह भोजनात खिचडी दिली जाते.
'तुम्ही चांगले स्वयंपाकी आहात' असं म्हणून कुणी माझी स्तुती केली तर त्यात 'खिचडी' चा मोठा वाटा आहे, असं मला वाटते. आजपावेतो मी किती तरी हजार वेळेस खिचडी तयार केली असेन. अर्थात बऱ्याचदा आजही हे व्यंजन तयार करण्याचं काम माझ्याच वाट्याला येत असते. फक्त फरक एवढाचं - 'गॅसची ज्योत कमी कर' म्हणण्या ऐवजी तोंडातून सहज '. थोडी हवा कमी कर' असं निघतं! खिचडी तन-मनात भिनते ती अशी!!
खिचडीवर लिखाण करावं असं मनी येऊन माझ्या लिखाणाची खिचडी तर चांगलीच शिजली. पंचपक्वानाशी पैजा जिंकणारी तिची गाथा न संपणारी आहे, पण आता थांबतो.
© प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह. मु. औरंगाबाद 9822108775
(हि खिचडी सामायिक करण्यास माझी हरकत नाही.)

No comments:
Post a Comment