ad1

Sunday, 1 December 2024






ड्रोन तंत्रज्ञान

'जीवनातील कला ह्या निसर्गाच्या नकला असतात.' तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा हे वाक्य लागू पडतं. असं म्हणतात की विमानाचं शोध लावण्यापूर्वी राईट बंधूनी आकाशात उडणाऱ्या पक्षांचा अभ्यास केला होता. पक्षी कशा प्रकारे हवेत झेपावतात, ते परत जमिनीवर कसे उतरतात आणि या क्रियेत ते कोणकोणत्या बळाचा उपयोग करतात याच सूक्ष्म निरीक्षण करूनच त्यांनी विमानाचा शोध लावला होता.  पण शोकांतिका अशी कि आज विमानाजवळ आकाशात उडणारे पक्षी जवळही फिरकू नये यासाठी विमानाला एक खास प्रणाली जोडलेली असते!  असो.  युद्धजन्य परिस्थितीमुळे आज सगळीकडे मानवरहीत ड्रोनची चर्चा आहे.  अगदी पक्षाप्रमाणे दिसणारे ड्रोन आकाशात उडताना आपण बघत असतो.  डिजिटल युगातील या अविष्काराबद्दल हा लेख.

२०१६ मध्ये उरी येथे लष्करतळावर झालेल्या हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ज्याने मौलाची कामगिरी निभावली ते हवाई उपकरण म्हणजे 'ड्रोन'.  त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ड्रोनचा उपयोग अतिरेक्याची नेमकी ठिकाण शोधून काढण्यासाठी  झाला. मानवरहीत एखाद्या पक्षी किंवा भुंग्यासारखं उडणार तंत्रज्ञान हल्ली सर्वत्र पाहावयास मिळतं. खास करून लग्न समारंभात, गर्दीच्या ठिकाणी जिथे छायाचित्र काढणे अवघड असते अशा ठिकाणी हमखास ड्रोन वापरल्या जातं. ड्रोनचं प्रथम दर्शन आपल्याला आमिर खानच्या खूपच गाजलेल्या 'थ्री-इडियट' या चित्रपटात झालं होतं. पण ड्रोनचा शोध लावून कितीतरी वर्ष होत आहेत.

ड्रोन म्हणजे पायलट नसलेलं छोटं पण अगदी हलकं विमानचं.  त्याला 'अनमॅनड एअरक्राफ्ट' असेही संबोधतात.  हवेत उडणार ड्रोन एखाद्या रोबोट सारखं काम करतो. यामध्ये विविध सेन्सर आणि जीपीएस असल्यामुळे त्याकडून आपण अनेक कामं करून घेऊ शकतो. ड्रोनमध्ये असलेल्या इलेक्टरोनिक सर्किट व सॉफ्टवेअरमुले अतिदूर अंतरावरून त्याला नियंत्रित करता येत.   पूर्वी  शत्रू राष्ट्राच्या भागात टेहळणी करण्यासाठी, त्यांच्या हालचाली टीपण्यासाठी अनुभवी पायलट असलेली विमानं वापरल्या जायची. हे काम खुप जोखमीच होतं. कारण शत्रूराष्ट्राच्या रडारवर ही विमान दिसली की ती पाडली जायची. त्यामुळे महागड्या विमानासह पायलटचा जीव जात असे. आवश्यकता हि अविष्काराची जननी आहे असे म्हणतात ड्रोनमुळे हि समस्या दूर झाली.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या वायुदलाने शत्रू राष्ट्रावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच एक ड्रोन आपल्या सीमेवर फिरत होतं.  अर्थात पाकिस्तानच्या सैन्यानी भारताची युद्ध तयारीचा अंदाज घेण्यासाठी ते पाठविलं होतं. वायुदलाच्या रडारवर येताच ते पाडण्यात आलं.

ड्रोन तंत्रज्ञानची सुरुवात
डिजिटल तंत्रज्ञान जसेकी इंटरनेट, जीपीएसचा शोध आणि वापर सर्वात आधी अमेरिकासारख्या पाश्चिमात्य देशाच्या संरक्षण विभागात झाला आहे.  त्याचप्रमाणे ड्रोनचा वापर सुद्धा सुरुवातीला सरंक्षण क्षेत्रातच झाला आहे. पहिलं मानवरहित ड्रोन तयार करण्याचं श्रेय पहिल्या विश्वयुद्धात ब्रिटिश रॉयल फ्लायइंगच्या रेजिनॉल्ड डेनीला जातं. त्यानंतर इज्राईलचा ज्यू वैज्ञानिक अब्राहम करीमने पहिला मानवरहित ड्रोन तयार केला. त्यामुळे त्याला फादर ऑफ ड्रोन असे म्हणतात. अमेरिकेच्या वर्ल्ड टॉवरवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यातील कुविख्यात मास्टरमाइन्ड ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तसेच अफगाणिस्तानातून नेमक्या तालिबान दहशदवाद्याचे तळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अनेक बॉम्बहल्ले केले.  पण त्या बॉम्बहल्यात काही निष्पाप सामान्य नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर मात्र दहशदवाद्याची अचूक ठिकानं शोधण्यासाठी अमेरिकन गुप्त अजेंसी सीआयएने अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग केला.  आज भारतासह सर्व देशाच्या सैन्याकडे  अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध आहेत त्यामुळे शत्रूच्या नेमक्या ठिकाणावर ते अचूक हल्ला करू शकतात.

ड्रोन कसं काम करतं?
ड्रोन म्हंटल तर लोकांना फक्त कॅमेरा असलेला ड्रोन आठवतो, पण असं नाही.  खेळण्यातील हलके ड्रोन, फोटोग्राफी आणि देखरेखीसाठी उपयोगात येणारे वेगळे ड्रोन,  तर संरक्षण क्षेत्रात उपयोगी पडणारे आणि वेळप्रसंगी मिसाईल वाहू शकणारे अत्याधुनिक ड्रोन. हे रिमोटवर नियंत्रित करणारे उपकरण आहे. या मध्ये विविध प्रकारचे मोटर आणि रोटर असतात जे त्याला वर उडण्यासाठी मदत करतात. वजन कमीत कमी ठेवण्यासाठी त्यामध्ये हार्ड-प्लास्टिक किंवा कार्बन फायबरचा उपयोग केला जातो. ड्रोनला विविध ऍक्सिसला फिरवून दृश्य टिपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बोर्डामध्ये गिम्बल, गायरोस्कोप, अकॅसेलोमीटर आणि बॅटरी जोडलेली असते. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ड्रोनची दिशा, गती, उंची नियंत्रित केल्या जाते.

विविध क्षेत्रात ड्रोनचा उपयोग ?
संरक्षण क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातही उपयोग खूप वाढला आहे. दुर्गम ठिकानी घडलेली घटना, आगीची घटना, पूरस्थिती किंवा इतर जोखमीच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी, साहित्य पोहचवण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.  एखादया उंच ठिकाणचे तापमान माहीत करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. एखाद्या जमिनीचे सर्च रिपोर्ट काढण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. मोठ्या बांधकाम क्षेत्रात कामाची पाहणी करण्यासाठी तसेच टोलेजगं इमारतीचे कामाचे निरीक्षण, धोक्याच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी, ग्राहकांना कामाची गती दाखविण्यासाठी, इमारतीचे 3-डी फोटो काढण्यासाठी ड्रोनचा चांगला उपयोग होतो. कृषी क्षेत्रासाठी ड्रोन एक वरदान ठरलं आहे.  पिकाची देखरेख करण्यासाठी पिकावर खत, फवारणी करण्यासाठी, उंच ठिकाणावर बीज फेकण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.

ड्रोनबदल सरकारचे काही नियम
आज बाजारात काही हजार रुपयात ड्रोन उपलब्ध आहेत. असे असले तरी भारतीय हवाई हद्दीत ते उडवताना काही नियमावली आहे. आपल्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या उंचीपर्यंतच आपण ते उडवू शकतो.  हवाई वाहतुकीच्या दृष्टीने तो नियम योग्यच आहे.  सुरक्षिततेच्या कारणामूळे काही ठराविक ४०० फूट उंचीपर्यन्तच आपण ड्रोन उडवू शकतो. तर हवाईतळाच्या जवळ, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, राष्ट्रपती भवन, मंत्रालय, सचिवालय, संरक्षण विभागाची ठिकाण आणि इतर महत्वाच्या परिसरात ड्रोन उडवू शकत नाही. त्याला 'नो ड्रोन एरिया' म्हणतात. वजनानुसार ड्रोनचे वेगळे प्रकार आहेत. नॅनो (२५० ग्रॅम), मायक्रो (२किलोपर्यन्त), स्मॉल (२५ किलोपर्यंत), मेडीयम (१५० किलो), लार्ज (१५० कि.पेक्षा जास्त वजनी)    नॅनो आणि मायक्रो ड्रोनला २०० फूट उंचीपर्यन्त उडवण्यासाठी परवानगीची गरज नाही.
ड्रोन क्षेत्रात करियर ?

येत्या काही वर्षात ड्रोनला प्रचंड मागणी वाढणार आहे आणि त्यासोबत नोकरीच्या अनेक संधी चालून येतील. कृषी, इ-कॉमर्स, वाहतूक नियमन, अग्निशमन, वन्यजीव निगराणी, पोस्टल डिलिव्हरी आणि हवेचे नमुने आदी क्षेत्रात नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. त्यासाठी युएव्ही प्रमाणपत्र आणि ड्रोन नियमांची संपूर्ण माहिती असलेल्या युवकांना नोकऱ्या मिळू शकतील. तसेच ड्रोनच्या संशोधनात, उत्पादन क्षेत्रात, ड्रोनच्या मार्केटिंग आणि सेवा क्षेत्रात तसेच ड्रोनच प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित लोकांची गरज भासणार आहे. त्यामुळे नोकरीच एक नवीन दालन उघडलं आहे. तसेच स्वतःकडे ड्रोन असेल तर आपण कंत्राट पद्धतीने कामे घेऊ शकाल. हे लक्षात घेऊन भारतातील अनेक विद्यापीठात एव्हीएशन इंजिनियरिंग, ड्रोन टेक्नॉलॉजिचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तेंव्हा पारंपरिक पदवीच्या मागे न लागता ज्या क्षेत्रात संधी आहेत असे क्षेत्र निवडलेले कधीही उत्तमच.

स्वतःच्या स्वार्थ आणि सुरक्षिततेसाठी  मानवजातीने वृक्षतोड करून जंगल नष्ट केली. त्याची जागा आता उंचच उंच सिमेंटच्या जंगलानी घेतली.  मग या सिमेंटच्या जंगलात कुठे पक्षी बघायला मिळत नाही. पक्षाच्या किलबिलाटास आपण मुकलो. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात वाढता ड्रोनचा उपयोग बघता कदाचित पक्षाची जागा आता कृत्रिम पक्षीच म्हणजे 'ड्रोन' घेतील, असं म्हणन वावगं ठरणार नाही.

-© प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com

No comments:

Post a Comment