कल चाचणी का करावी?
प्रत्येक विध्यार्थी हा युनिक व परिपूर्ण असतो. कोणत्याच बाबतीत तो कमी नसतो. सर्व विध्यार्थ्यामध्ये उपजतच काही विशेष कला गुण असतात. एक विध्यार्थी गणितामध्ये तर दुसरा विज्ञानामध्ये तर तिसरा कलेमध्ये पुढे असतो. काहींना वाणिज्य शिकून उद्योग-व्यापाराचं क्षेत्र पादाक्रांत करायचं असतं तर काहींना आकाशातील विमान 'पायलट हो' असं खुणावत असतं. पालक व शिक्षकांनी मुलांचे हे सुप्त गुण ओळखून त्याला पूरक अशी मदत केल्यास निश्चितच ते त्या क्षेत्रात नाव, पद, प्रतिष्ठा आणि पैसा कमावू शकतात. हेच कारण सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे जगप्रसिद्ध क्रिकेटर तर गानकोकिळा लतादिदी विश्वप्रसिद्ध गायिका झाल्यात. थोडक्यात संगीत,खेळ, कला, लेखन, सामाजिक कार्य असे किती तरी क्षेत्र आहेत ज्यामध्ये देशातील युवक यशाचं शिखर सर करू शकतात. गरज आहे त्यांच्या जिद्दीची, योग्य गुरू आणि मार्गदर्शनाची.
आपल्या घरामध्ये छोटसं झाडं असतं. वाढीसाठी आपण नित्यनियमाने त्यास खत-पाणी देत असतो. सोबतच त्याच्या सभोवती वाढणारं तण आपण वाढू देत नाही. तसं नाही केल्यास खत-पाण्याची शक्ती, ऊर्जा तणामध्ये विभागली जाते व झाडाची वाढ खुंटते. मुलांचं तसंच असतं. अंगी पेंटिंगची कला ठासून भरलेला विध्यार्थी सकाळी बॅडमिन्टन, दुपारी गिटार आणि संध्याकाळी अबॅकस क्लासला उपस्थित राहत असेल तर त्याच्या आवडत्या पेंटिंग कलेचं काय होणार? गरज आहे पालकांनी ही गोष्ट समजून घेण्याची.
हल्ली दहावीत शिकणाऱ्या विध्यार्थी व पालकांना दोनच पारंपारिक क्षेत्राची माहिती असते. किंबहुना सभोवतालच्या मंडळीकडून त्यांच्या मनात ती ठासवली जाते. ते क्षेत्र म्हणजे - इंजिनियरिंग आणि मेडिकल! दोन पिढ्यापूर्वी पालकांची हिच मानसिकता होती आणि शोकांतिका अशी की अजूनही त्या मानसिकतेत बदल झाला नाही. मागील तीस वर्षात विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड बदल घडलेत. त्यानुसार व्यापार, उद्योग बदलले. सेवा क्षेत्रातील उद्योग प्रचंड प्रमाणात वाढले. आपण आज डिजीटल क्षेत्रात वावरत आहोत ज्यामुळे पारंपारिक उद्योग-नोकऱ्या मागे पडून देश-परदेशात करियर व व्यवसायाचे हजारो नवीन क्षेत्र खुले झाले आहेत. आता डॉक्टर व इंजिनियरपेक्षा किती तरी उत्तम नोकरी व व्यवसायाच्या नवनवीन संधी सध्या उपलब्ध आहेत. वीस-पंचेविशीतील युवक लाखो पॅकेजची नोकरी, बिजनेस स्टार्ट-अपमध्ये नाव व पैसा कमवत असल्याचे आपण बघतच आहोत. आणि हे सर्व डॉक्टर- इंजिनियर आहेत का? मुळीच नाही!
ज्यांचा इंजिनियरिंग-मेडिकलकडे कल आहे, बौद्धीक आर्थिक क्षमता आहे अशांनी ती क्षेत्र निवडायला मुळीच हरकत नाही. पण विज्ञान, गणिताची आवड नसतांना 'मित्र जात आहेत म्हणून मी' हा प्रकार चुकीचा होईल. त्यांच प्रमाणे गणित जमत नाही म्हणून मेडिकल आणि बायोलॉजी आवडत नाही म्हणून इंजिनियरिंग कडे वळने किती योग्य? कारण जगात करियर करण्यासारखे फक्त दोनच क्षेत्र नाहीत. सेवावृत्ती नसलेले विध्यार्थी मेडिकलला आणि तंत्रज्ञानाची आवड नसलेले विध्यार्थी इंजिनियरिंगकडे वळून फसतात. बरेच असे विध्यार्थी आवड व क्षमता नसतांना भलत्या क्षेत्राकडे वळून स्वतःच नुकसान करतात. त्या चुकीच्या करियर मार्गात त्यांच्या पैशासह अमूल्य वेळही वाया जातो.
गरज आहे पालक व गुरूजनांनी आपल्या विध्यार्थ्यांशी मनमोकळी चर्चा करण्याची. त्यांचा एकूण कल जाणून घेण्याची. गरज पडल्यास एखाद्या निष्णात मानसोपचारतज्ञाकडून त्याची विज्ञाननिष्ठ कल चाचणी करुन घेण्याची. इंग्रजीत एक म्हण आहे,
A stitch on time saves the nine!
दहावीत शिकणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
©प्रेम जैस्वाल, पेडगावकर, 9822108775.
(लेखक एस्पी इन्फोटेक या छ. संभाजीनगर येथील
शैक्षणिक संस्थेचे संचालक व करियर मार्गदर्शक आहे.)
No comments:
Post a Comment