ad1

Monday, 15 July 2024

लगीन करणार पण अंबानी सारखं!

लगीन करणार, पण अंबानी सारखं!
हुश्श! एकदाचा अंबानी विवाह सोहळा पार पडला. मागील काही दिवसात मीडियाने या विवाह सोहळ्याचे क्षणचित्र टाकून अक्षरशः कहर केला होता. 'एकदाच लगीन लावा आणि आम्हाला मुक्त करा'  तर 'हे लग्न नाही सर्कस' ' किती हा देखावा', 'किती हा भम्पकपणा' 'संपत्तीचं ओंघळ प्रदर्शन' अशी बरीच टिका माध्यमातून ऐकावयास मिळाली. आंतर्देशीय कलाकार त्यांनी कोटीने घेतलेली रक्कम, बॉलिवूडची हजेरी, राजकीय मंडळीची उपस्थिती ते रामदेवबाबाचं नृत्य अशा या ना त्या कारणाने हा विवाह सोहळा खुपचं गाजला. 'अति सर्वत्र वर्जयेत' प्रमाणे कोणतीही गोष्ट जेंव्हा प्रमाणाबाहेर होत असेल तर त्याचा विट येण साहजिक आहे .

लोकसभा निवडणुकीनंतर देशात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली ती घटना म्हणजे - रिलायन्स इंडस्ट्रिचे सर्वेसर्वा मुकेश अंबानीच्या चिरंजीवाच लग्न. विवाहसोहळा आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी एव्हडी भव्य होती कि भविष्यात २०२४ या वर्षाच्या विशेष घटनेत या विवाहाची नोंद निश्चित होईल. अगणिक उद्योगामूळे उद्योग जगत, मीडिया हाऊस, राजकीय संबंध त्यामुळे देशाच्या मीडिया हाऊसने या सोहळ्याला लार्जर देन इमेज कव्हरेज देऊन या लग्न सोहळ्याला अक्षरशः उचलून धरलं होतं. लग्नाच्या एकूण एक क्षणाची रनिंग कॉमेन्ट्री, व्हिडीओ क्लिप इन्स्टासारख्या इतर समाज माध्यमावर पोस्ट, व्हायरल होत होती.  विविध क्षेत्रातील मान्यवरांची पाहुण्याची एंट्री, त्यांचा पेहेरावा,  फिल्मी नृत्य,  स्वागत, महागडे रिटन गिफ्ट इ. क्षणोक्षणी दाखविली जात होती. देशाच्या उच्चप्रतिष्टीत अतिश्रीमंत घराण्याचं लग्न अर्थात तिथे आमंत्रित निमंत्रित सुद्धा त्याच स्तरावरची मंडळी असणार.  अमिताभ पासून रजनीकांत पर्यंत सर्वच फिल्म स्टार इव्हेंटमध्ये आले म्हणजे इव्हेंटला चार चांद लागणारच. एरव्ही प्रोटोकोल वगैरे पाळणारी मंडळींनी कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात त्यांनी काही कसर सोडली नाही.  त्यामुळे सर्व फिल्मी कलाकाराची हजेरी लोकांनी पाहिली. एकंदरीत या लग्नसोहळा 'नं भूतो नं भविष्यती' ठरवण्यात अंबानी परिवारांनी काहीच कसर सोडली नाही, असो. 

देशात एव्हडा भव्य विवाह सोहळा साजरा होत असतांना याची चर्चा समाजात होणे साहजिक आहे.  लग्न संपन्न झाल्यानंतर खर्चाचे नेमके आकडे समोर येतात. तो पर्यंत लोक त्या खर्चाचे अंदाज बांधत असतात. हौसेला मोल नाही आणि लग्न एकदाच होतं, हे वाक्य सर्वासाठी लागू होतं. असं म्हणतात कि या लग्नात अंबानी परिवाराने ५००० कोटी रुपये खर्च केले जे कि त्यांच्या एकूण संपतीचा हिशोब लावता ती रक्कम फक्त संपतीच्या ०. ५% टक्के रक्कम असू शकते. 

मग अंबानीने एव्हडा खर्च करावा का? याबदल समाज माध्यमात दोन सुर वाचावायस मिळतात.  पहिला अंबानी हे जगातील प्रतिष्ठीत उद्योगपती पैकी एक आहेत. ते त्यांच्या विविध उद्योगाद्वारे संपती कमवून, शासनाचा कर भरून आणि गरिबांना दानधर्म करुन  आपल्या मुलाच्या हौसे खातीर भव्य लग्नसोहळा साजरा करत असतील तर त्यात वावगं काय ? तर दुसरा सुर असा कि - असतील ते श्रीमंत पण संपतीच असं ओंघळ प्रदर्शन त्यांनी का करावं? पैसा आहे ठीक पण दाखवायची काय गरज? समाजातील व्यक्ती सर्वच बाबतीत श्रीमंत लोकांचं अनुकरण करत असतात. संस्कृती वरून खाली झिरपत येते असं म्हणतात. आज अंबानी लग्नावर ५००० करोड खर्च करत आहेत उदया इतर धनाड्य उद्योगपती त्यांचा कित्ता गिरवतील. आणि अशा महागड्या लग्नाचं लोन खालपर्यंत झिरपत आलं तर लोकांना ते परवडेल का?

देशात या पूर्वी अशी लग्न संपन्न झाली नाहीत असं मुळीच नाही.  हल्ली समाजात जे विवाह सोहळे संपन्न होतात ते अशाच 'बिग फॅट' लग्नाची कॉपी असते. किंवा एखाद्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटाच अनुकरण केलेलं असतं.   चित्रपट चालावा यासाठी बॉलिवूड मंडळी आवास्तव असं लग्नाचं डेकोरेशन, कपड्याची फॅशन, मेजवानी,  मेकअप, डीजे असा 'शावा शावा' शो ऑफ दाखवतात. चित्रपट सृष्टीचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. समाजातील नवे श्रीमंत मंडळी मग त्याचं आणि तशाच स्टाईलचं मुकाट अनुकरण करत बसतात. चित्रपट आणि वास्तविक जीवनातला फरक त्यांना कळत नाही. अंबानी मुळात श्रीमंत म्हणून त्यांनी उच्च दर्जाचे डेकोरेशन, मेजवानी, किंमती पेहराव, इत्यादि खर्च केलेत. ते बघून समाजातील लोकं जर तशीच सजावट, पेहेरावं किंवा इतर गोष्टीची नकल मारण्याचा प्रयत्न केला तर कठीण आहे. आणि ह्या संसर्ग रोगाची बाधा होण्यास जास्त वेळ लागणार नाही.  असंच घडलं गेलं तर उदया स्थळ जुळवताना मुली किंवा मुलाकडील मंडळी एक दुसऱ्याकडून अशाच 'चांगल्या लग्नाची' अपेक्षा करणार नाही का? मग ज्याची कुवत नाही अशा गरीबानी आपल्या मुलांची लग्ने कशी लावायची? बरं ज्यांच्याकडे आहे त्यांचं ठीक पण जे गरीब आहेत त्यांनी आपल्या मुलांची लग्न कशी करावी ?  ज्यांची आयपत नाही अशा कुटुंबाला पतपेढी किंवा हातउसने पैसे उचलून लग्न करावी लागतील ज्यामुळे समाज कर्जबाजारी होऊन समाजाचं आर्थिक आरोग्य धोक्यात येण्याची संभावना उदभवेल.

आज श्रीमंत लोकांनी लग्नाची व्याख्याच बदलुन टाकली आहे. लग्नात लग्नविधी आणि मंगलआष्टके अगदी दुय्यम स्थानी असतात.  पाहुण्याची राहण्याची व्यवस्था, भव्य मेजवानी,  डेकोरेशन, पेहेराव आणि संगीत डीजे यावरच सर्वांच लक्ष केंद्रित असतं. त्यातच आपली धम्मक दाखविण्यासाठी राजकीय नेते बोलविले असतील तर सर्व विधी बाजूला ठेवून प्रथम त्याची सरबराईस केली जाते.  लग्न आता विवाहविधी पुरती मर्यादित न रहाता कुटुंबाची 'आर्थिक शक्ती' दाखविण्याचे सोहळे झाले आहेत. पूर्वी घरासमोर किंवा शेतामध्ये मांडव टाकून लग्न उरकली जायची.  कोणत्याही प्रकारची भम्पकबाजी बघावयास मिळत नसे.  कुणी जास्तच करत असेल तर त्यास नावं ठेवली जायची.  जसं जसा समाजाचं आर्थिक स्तर सुधारत गेल तसं त्यात आपल्या सोयीनुसार बदल होत गेले.  त्याला तडका दिला बॉलिवूडच्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम आपके है कौन आणि करण जोहरच्या 'कभी ख़ुशी कभी गम' सारख्या चित्रपटानी! चित्रपटाचं अनुकरण करत लग्नाचा खर्च किती तरी पटीने वाढत गेला. हा संसर्ग रोग समाजाला एव्हडा गतीने लागला कि आज खेड्यातील लग्न सुद्धा शहरातील मोठंमोठ्या मंगल कार्यालयात साजरी होतात. पैसा नसेल तर वेळ प्रसंगी कर्ज किंवा हातउसने पैसे उचलून ती साजरी केली जातात. बऱ्याच सोयरीक जुळवतानाचं  'लग्न शहरात करावं लागेल बरं का, हॉल उत्तम हवा!' अशी अट टाकली जाते. किंवा 'तुम्हांला झेपत नसेल तर लग्न आमच्याकडे होईल' अशी मुलाकडील कुटुंबाकडून अट टाकली जाते. एकंदरीत मुलीच्या पालकांना कमी लेखण्याचा हा प्रकार असतो. ना ईलाजाने मुलाकडच्या मागण्या पूर्ण करण्यात मुलीचा बाप कोणतीही कसर सोडत नाही.  बऱ्याच लग्नात आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मंडळी वर-वधूची भेट न घेता परत जातात. कारण दोन्ही मंडळीकडील फोटोग्राफरचं फोटोशेशन संपता संपत नाही. ताटकळत बसलेल्या लोकांना वधू-वराच दर्शनपण होऊ देत नाहीत. मंगलाष्टकच्या वेळी तर पाच-सहा फोटोग्राफर नवंदम्पत्यांना घेरून उभे राहतात.  अमाप खर्च करून विवाहमुहूर्ताची वेळ न पाळता  ३-४ तास पाहुण्यांना अक्षरशः वेठीस धरलं जातं. २५ ते ५० लाख रुपये खर्च केलेल्या लग्नात पाहुण्यांच्या जेवण व इतर व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतात.  समाजात आधीच लग्नाच्या नावाखाली असे अनिष्ट प्रकार चालू असतांना अंबानीने अफाट खर्च करुन आधीच बिघडलेल्या लग्न चालरीतीला डबल तडका दिला असा ही सूर निघत आहे.  

चर्चेचा दुसरा सुर असा कि - विवाह सोहळ्यावर अंबानी ५००० खर्च करतात यात गैर काहीच नाही.  त्यांच्याकडे आहे त्यांनी खर्च केलेत.  संबंधित लोकांना रोजगार व पैसा मिळाला.  लग्न सोहळा हा एक मोठा उद्योग झाला आहे.  देशातील किती तरी उद्योग हे लग्न आणि लग्नाच्या संबंधित खरेदीवर अवलंबून आहेत.  फक्त कपडे उद्योगाचाचं विचार केल्यास लग्नसराईत हा उद्योग भयंकर तेजीत असतो.  देशात वर्षाला किती तरी हजार लग्न होतात. शहरी लग्नाचा खर्च साधारण १५ ते ३० लाखा पर्यंत जातो तर गावखेड्यात हा खर्च साधारण १० लाखापर्यंत जातो.  अर्थात त्यामुळे १५-३० लाख रुपये परत चलनात येत असतात. मुळात करन्सीचा अर्थ चलन,  थांबला तो पैसा काय कामाचा? शेवटी पैसा कमवायचा कशासाठी? कमविलेला पैसा कर देऊन तो विवाह खर्चाद्वारे पुन्हा चलनात येत असेल तर त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगाची भरभराट होईल.  त्याचीही पोटं भरतील.  त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे हातभारच लागणार.  

कोरोना काळात या गोष्टीची प्रचिती झाली होती. शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विवाह सोहळ्यावर बंदी घातली होती.  त्यामुळे विवाह साहित्याचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजक मंडळीचे व्यवहार ठप्प होऊन त्यांच्यावर  उपासमारीची वेळ आली होती. त्यात मंडप डेकोरेशन, कॅटरिंग, फुल रांगोळी सजावट, पूजेचे साहित्य, बँड-डीजे, प्रकाशयोजना, मेकअप कपडे, सोने चांदीचे व्यापारी यांचा समावेश होतो.  विशेष म्हणजे लग्नसमारंभात मोठा खर्च हा विवाह कार्यालयासाठी होतो. कोरोना काळात करोडो रुपये खर्च करुन बांधलेले भव्य विवाह कार्यालयं लग्न समारंभाविना ओस पडून बंद पडली होती.  मग त्यांनी कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, नोकरांना पगार कसा दयायचा? थोडक्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत इतर वस्तू प्रमाणे लग्न सोहळ्याचासुद्धा मोठा हातभार लागतो.

'हौसेला मोल नसतं'. लग्न एकदाच होतं तेंव्हा ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी अवश्य खर्च करावा. मुकेश अंबानिकडे अफाट पैसा खर्च करण्याची क्षमता होती त्यांनी पैसे खर्च करुन हौस केली पण इतरांनी मात्र त्याचं मूकाट अनुकरण करू नये.  'अंथरून पाहूनच पाय पसरावे.' कारण विवाह हा शक्ती प्रदर्शनासाठी नसून वधू-वर आणि समाजातील दोन कुटुंबांना जवळ आणणारी संस्कारविधी आहे.   


©प्रेम जैस्वाल पेडगावकर (ह मु छ. संभाजीनगर)
9822198775 

No comments:

Post a Comment