ad1

Sunday, 5 August 2018

संजूबाबत.....





प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

*समाजात तुम्ही कोणासोबत राहता त्यापेक्षा* 
*कोणासोबत राहत नाही हे तेव्हडच महत्वाचं*

हे ज्यांना पटत त्यांनी संजू हा सिनेमा बघायला हरकत नाही. कारण यापूर्वीही दहशतवादी, देशद्रोही, माफिया, इनकाउंटर, आणि इतर गुन्हेगारी जगतावर आधारित भरपूर चित्रपट आले आणि बरेचसे आपण पाहिले आहेत. उदा. सत्या, कंपनी,अबतक छप्पन, इ. एरव्ही गुन्हेगारी जगतावर आधारित कितीतरी पुस्तक आपण वाचतच असतो. या वाचण्यामागील कारण आणि हेतू वेगळा असतो. हे गुन्हेगारी अंडरवर्ल्ड विश्व कस चालत असावं, कशी सुपारी घेतल्या जाते, गेम कसा करतात, एन्काऊंटर म्हणचे काय याची उत्सुकता सामान्य जनतेला असते. कित्येकांना तर ही अंडर्वल्डची लोक कशी दिसतात, भाई कसा राहतो, तो कसा वागतो, भाईचा खालच्या लोकांशी वागणे कसे, पोलिसांशी कसा व्यवहार असतो, जेलमधलं जीवन कस असत, आणि मुख्य म्हणजे हे निर्दोष कसे सुटतात हे कळायला दुसरा मार्ग नसतो म्हणून असे चित्रपट बघून त्यांची ही भूक शमते.
बॉलिवूडतर्फे ऑस्करसाठी पाठवलेल्या आणि चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'मदर इंडिया' ह्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रमुख नायक-नायिका नर्गिस आणि सुनील दत्त या दिग्ग्ज कलाकाराचा संजय हा मुलगा. नर्गिस-सुनील दत्त हे हिंदी चित्रपटाचे उत्कृष्ट कलाकार. चित्रपटसृष्टीत सुनील दत्त एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पुढे काँग्रेसच्या तिकिटावर सुनील दत्त खासदारही झाले. बहीण प्रिया दत्तही खासदार म्हणून सर्वपरिचित. कोणतीही गुन्हेगारी घराण्याची पार्श्वभूमी नसताना, समाजातील आदर्शव्यक्ती पालक असताना संजय दत्तसारखा मुलगा गुन्हेगारी जगात ओढल्या जातो आणि त्या चक्रव्यूहात एव्हडा आत शिरतो कि देश बरबाद करणाऱ्या गुंडांचा तो साथीदार बनतो. त्याचे नाव अंडरवर्ल्ड आणि देशद्रोह्यांसोबत जोडले जाते. तसे चित्रपट आणि अंडर्वर्ल्डचे घनिष्ट संबंध खूप जुने आहेत. सत्तरच्या दशकात जेंव्हा चित्रपटसृष्टी बहरात आली तेंव्हापासून हाजीमस्तानसारखे तस्कर चित्रपटसंबंधीत लोकांच्या संपर्कात असत. जिथे अडमाप पैसा तिथे अंडरवर्ल्ड असणे साहजिक. नेहमी देश-विदेशातील कार्यक्रमात, प्रोग्रॅम-इव्हेंटच्या निमित्ताने या लोकांच्या भेटीगाठी होत असतात. कित्येक आघाडीच्या कलाकारांच्या अंडरवर्ल्डच्या संबंधाच्या बातम्या फोटो आपण वृत्तपत्रात बघत असतो. पण आजही अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जे अशा गोष्टींच्या आहारी गेली नाहीत. त्यांनी थोडा दुरावा ठेवला. कदाचित त्यामुळे त्यांना चांगले चित्रपट मिळाले नसतील, कारकीर्द बहरली नसेल, पण तत्वांशी तडजोड मात्र त्यांना जमली नाही. *कळत ना कळत जीवनात कधी कधी वाईट व्यक्तीच्या, व्यसनाच्या सान्निध्यात आलोच तर आपण कुठे थांबायचे हे आपल्याला कळले पाहिजे.* संजय दत्तला हे जमले नाही आणि तो फसला. चित्रपटसृष्टीच ग्लॅमर , कलाकारसोबत वावरणं हे अंडरवर्ल्डनाही खूप आवडतं. चित्रपट निर्मात्यांना लागणारा पैसा तसेच स्पर्धकाला धाक, दडपण्यासाठी गुंडांची गरज असते त्यामुळे ते अंडरवर्ल्डचा सहारा घेत असतात. याची परतफेड म्हणून चित्रपटात कोणते नायक-नायिका घेण्यापासून तो कुठे कसा रिलीज करायचा, आपली भागीदारी किती हे सर्व गणित अंडर्वर्ल्डच ठरवत. त्यांच्या मनासारखे घडले नाही तर खास बातम्या आपल्याला आयकू येतात, उदाहरण द्यायचे असतील तर गुलशनकुमारचा खून, एका अभिनेत्रीची आत्महत्या, राकेशरोशनवर झालेला हमला आणि काही कलाकाराचे बरबाद करियर! थोडक्यात लॉगीन जरी चित्रपटसृष्टीच असेल पण ओटीपी हा अंडरवर्ल्डकडूनच यायचा असतो, अर्थात याला काही अपवादही आहेच. 
हा चित्रपट परवा रिलीज झाला. ठरल्याप्रमाणे गुन्हेगारी जीवनावर आधारित 'संजू' वर टिकेची झोड उठणे साहजिकच होते. 'बायोपिक' आणि तोही एका सराईत गुन्हेगारावर आधारित! अस कोणतं गुन्हेगारी क्षेत्र जे संजयने पादाक्रांत नाही केलं असेल. खरं म्हणजे चित्रपट किंवा टीव्ही मालिका ह्या समाजाच्या आरशासारख्या असतात आणि समाजात काय घडतंय हे त्या दाखवत असतात. प्रत्येक चित्रपटामध्ये एक संदेशही असतो. खलनायक चूक असेल तर त्यास शिक्षा, ज्याने पाप केलं त्याच वाईट होणे, नायकाने काही चूक केली तर त्यास शिक्षा, शिक्षणाने भलं होणे, अशिक्षिताच नुकसान होणे, वगैरे वगैरे. 
पण चित्रपटाचा हेतूच फक्त गल्ला भरण्याचा असेल तर मग नितीमत्ता, मूल्य बाजूला राहतात. आणि ह्या चित्रपटातही हिरानीनेही वेगळं काही केलं नाही. त्यामुळे स्वतःचा गल्ला भरण्यासाठी देशद्रोहीसारख्या गुन्हयात अडकलेल्या गुन्हेगारांचे उद्दातीकरन करणे चूकच. चित्रपट निर्मात्याला खरोखरच समाजाचीच काळजी असती तर एखादा बायोपिक समाजाला नवी दिशा देणाऱ्या क्रांतिकारकावर, खेळाडू, पत्रकार, समाजसेवक, साहित्यकावरही तयार झाला असता, आणि तसे बायोपिक आपणे पाहिलेही आहेत उदा.एमएसधोनी, भाग मिल्खा भाग इ. आजही बऱ्याचशा मोटिवेशनल प्रोग्रॅम मध्ये या चित्रपटाचे उदाहरण दिल्या जातात. समाज घडवण्यामध्ये चित्रपट, मालिका, साहित्य आणि समाजातील जबाबदार व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते. कारण समाज यांचेच अनुकरण करत असतो. मागील काही दिवसात घडलेल्या भय्यूमहाराज, हिमांशू रॉययावर होणाऱ्या नकारात्मक टीका याचेच उदाहरण आहे. कारण त्या समाजाच्या जबाबदार व्यक्ती होत्या, त्याकडून हे कृत्य अपेक्षित नव्हते.
प्रक्षेपित होणारा चित्रपट प्रेक्षकासाठी चांगले कि वाईट हे ठरवण्यासाठी आपल्याकडे सेंसारबोर्ड आहे. चित्रपटसृष्टीतील नामांकित मंडळी या बोर्डाचे सदस्य असतात. पण मागील काही घटना बघता या बोर्डाची विश्वासहर्ता राहीली नाही. निवडून दिलेल्या राजकर्त्याचे हस्तक आता बोर्डाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे पक्षाचा खिसा भरला तर सर्वकाही साध्य होत. तसेच चित्रपटउद्योगात एकमेकांचे एव्हडे संबंध आणि हेवेदावे असतात की ते आपल्या आप्तमंडळीचे चित्रपट अडवू शकत नाही. एके काळी फक्त सलवार-कमीज परिधान केलेल्या नायिकेने दुपट्टा घेतला नसल्यामुळे ते दृष्य कापणारा सेंसार, नायकाच्या तोंडून 'साले' हि शिवी निघाली म्हणून चित्रपट प्रक्षेपित न होऊ देणारा सेंसारची भूमिका आज वादातीत आहे. आज साले आणि त्यापुढील शिवी असल्याशिवाय चित्रपट आणि गाण्यात थ्रिल येत नाही. बदल मान्य पण तो कुठे? जर पैसा कमवणे हाच चित्रपटाचा हेतू असेल मान्य पण समाजाने या चित्रपटातून काय शिकायचंय हा उद्देश असेल तर खरच कठीण आहे. कारण समाज हे चित्रपटाचे अनुकरण करतच असतो.
दुसरं म्हणजे, या चित्रपटाचा उदोउदो करणारी काही मंडळी असे बोलून हात झटकु शकते कि चित्रपटनिर्मात्याने जे दाखवायच ते दाखवलं त्यातून काय घ्यायचं, काय शिकायचं आणि काय सोडायचं ते प्रेक्षकांने ठरवावं. काही दिवसापूर्वी टीव्ही मालिकावरील अश्लील, भडक दृशाबद्दल टीकेची झोड उडाली होती तेंव्हा एका गाजलेल्या मराठी नायकेने (कदाचित रेणुका शहाणे), 'रिमोट तुमच्या हातात आहे' असे बोलून अकलेचे तार तोडले होते. जर हिच भूमिका चित्रपटसृष्टीच्या लोकांची असेल तर मग सेंसारबोर्डची गरजच काय? चला मान्य करू कि 'चहा गाळताना पिण्यासाठी योग्य चहा खाली पडतो पत्ती मागे उरते आणि सुफात धान्य पाखडताना उपयोगी धान्य मागे राहून कचरा निघून जातो, मग चाळणी वापरावी कि सुफ हे प्रेक्षकांने ठरवावे'! पण चित्रपट पाहताना सर्व प्रेक्षकमंडली हे सुफच वापरतील हे ग्राह्य धरणे चूक. थोडक्यात समाजाच्या नित्तीमुल्याचा ऱ्हास होतो तो असा. गुन्हेगारी वाढते ती अशी. 
थोडक्यात मूल्याचे रक्षकच भ्रष्ट झाले तर वेगळं काही घडने कठीण आहे, असो.

No comments:

Post a Comment