'व्हेन अ कस्टमर एंटर्स माय स्टोअर, फरगेट मी, ही इज किंग' - जॉन वॅनामेकर
लायका लॅब्स लिमिटेड. औषधाचे उत्पादन करणारी भारतातील एक नावाजलेली कंपनी. गुजरातमध्ये औषधांचं उत्पादन तर मुंबईचं उपनगर विले-पार्ले पूर्व येथील सेंटॉर हॉटेलसमोर त्यांच कॉर्पोरेट ऑफिस होतं. औषधी उत्पादन, वितरण, विक्री आणि कार्पोरेट ऑफिस असा भला मोठा त्यांचा स्टाफ आणि पसारा होता. वर्ष १९५७ मध्ये सोव्हिएत युनियनने एक सजीवप्रयोग म्हणून अवकाशयानात 'लायका' नावाची कुत्री पाठवली होती. त्या नावावरूनच कंपनीच 'लायका लॅब्स लिमिटेड' असं ठेवल्या गेलं, त्यावेळी असं म्हणलं जाई.
वर्ष १९९१ मध्ये भारतदेशाने विदेशी कंपन्यांसाठी उद्योगाचे द्वार खुलं केलं. त्या योगाने परदेशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यानी आपले पाय भारतीय उद्योग जगतात रोवायला सुरुवात केली. सर्वच क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ लागल्या. ज्या परदेशी कंपन्या भारतात स्वतःची गुंतवणूक करण्यास सक्षम नव्हत्या अशा कंपन्या आपला माल सहजपणे विकण्यासाठी योग्य तो भारतीय भागीदार शोधत होत्या. अशाच एका युएसच्या कंपनीनं भारताच्या लायका लॅब्ससोबत करार केला. त्या अमेरिकन कंपनीचं नावं होतं- एअरसेफ कॉर्पोरेशन. आणि त्याचं प्रॉडक्ट होतं- ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर.
दमा, अस्थमा, ब्रॉंक्याटीस अशा जुनाट फुफुसाच्या आजार असलेल्या रुग्णासं ऑक्सिजन म्हणजे जीव कि प्राण असतो. फुफुसाची क्षमता कमी झाल्यामुले किंवा दम्यामुळे वातावरणातील नैसर्गिक प्राणवायू ते आत घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना नियमित सिलेंडरद्वारे कृत्रिम ऑक्सिजन वापरणे आवश्यक असते. अशा मोठ्या खर्चिक ऑक्सिजन सिलेंडरला सोपा पर्याय म्हणजे 'ऑक्सिजन कोंसेन्ट्रेटर' मशीन. हा एक नवीनच कन्सेप्ट होता. अशा उपकरणाच्या भारतात विक्रीसाठी अमेरिकन एअरसेफ कॉर्पोरेशननं लायकासोबत करार केला होता.
लायका मुळात एक ऍलोपॅथी औषध उत्पादन करणारी कंपनी. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरद्वारे विक्री करणारे सर्व कर्मचारी म्हणजे औषधी प्रतिनिधी. तर हे उपकरण म्हणजे एक तांत्रिक मशीन. त्यामुळं ते विकण्यासाठी लायकाच्या व्यवस्थापण मंडळाने अंधेरी येथं वेगळं नवीन डिव्हिजनचं सुरु केलं. विक्री आणि तत्पर तांत्रिक सेवा मिळावी म्हणून त्या डिव्हिजनमध्ये काम करण्यासाठी सर्व अनुभवि व उच्चशिक्षित इंजिनियर निवडले गेले. ऑफिसमध्ये एक मॅनेजर, एक प्रोडक्ट इंजिनियर, एक सेल्स-सर्विस इंजिनियर, दोन ऑफिस कर्मचारी असा छोटा स्टाफ होता. मी त्यापैकीच एक. डेमो, विक्री आणि दुरुस्ती-सेवा अशी दोहेरी जबाबदारी कंपनीनं माझ्यावर टाकली होती. मोठं उपकरन, नवीन कन्सेप्ट आणि एक लाख रुपयाच्या जवळपास किंमत, त्यामुळं त्या मशीनची विक्री म्हणजे एक दिव्य काम होतं. रोज नवनवीन अस्थमाग्रस्थ पेशन्टला भेटणे, त्यांना कन्सेप्ट समजवणे, मग टॅक्सीमध्ये मशीन घेऊन डेमो देणे, सर्व जमत आलं कि मग किमतीची घासाघिस करून विकणे. हे सर्व आटापिटा करून ग्राहकानं मशीन विकत घेतली तर ठीक नाहीतर मशीन घेऊन परत ऑफिस. आणि मशीन विक्री झाली तर सेवा देणं, दुरुस्ती करणं काम माझंच. नवीन कन्सेप्ट असल्यानं डेमो दाखवल्याशिवाय, १-२ दिवस वापरल्याशिवाय कोणी मशीन विकत घेतही नसे. त्यामुळे भरपूर डेमो, कितीतरी मिटिंग व्हायच्या आणि मग विक्री व्हायची.
विक्री आणि सेवा याद्वारे कंपनीला रेव्हेन्यू मिळत असतो. काहीही करून हा डिव्हिजन नफेत राहावं अशी जिम्मेदारी मॅनेजरची असते. मागील काही दिवसात आमची विक्री घटली होती. विक्री वाढावी म्हंणून बरेच प्रयत्न चालू होते. पुढे पुढे विक्री कमी आणि ऑफिसचा खर्च वाढत गेला. बऱ्याच वेळेस आम्ही महिन्यातुन फक्त एक-दोनच मशीन विकत असू, तेंव्हा आमचे एमबीए मॅनेजर जाम चिडत असत. अशातच एक दुपारी आमच्या ऑफिसचा फोन खणखणला. पलीकडली व्यक्ती बांदऱ्याच्या पाली हिल्सहून बोलत होती. फोन करणाऱ्या युवकाला आपल्या दमा असलेल्या वृद्ध वडीलासाठी मशीनची माहिती हवी होती. मला आठवतं, तो एक सधन काश्मिरी मुस्लिम ग्राहक होता. पालि हिल्सला ऑफिस तर नरिमन पॉईंट येथे ओबेरॉय हॉटेलच्या शॉपिंग सेंटरमध्ये त्याचं गालीच्या, स्टोन, पर्ल्सचं मोठं दुकान होत. म्हणून एक लाखाची मशीन घेनं त्याच्यासाठी काही मोठा व्यवहार नव्हता. त्यांनं ऑक्सिजन मशीनबद्दल भरपूर विचारपूस करून एक डेमो देण्याची विनंती केली.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अंधेरीहुन टॅक्सीमध्ये नवीन डेमो मशीन घेऊन मी पाली हिल्सला पोहचलो. सुरुवातीस रुग्णाच्या नातेवाईकास मी कन्सेप्ट समजावून सांगितला, मग डेमो दिला. खात्री व्हावी म्हणून त्यांनी दोन दिवस मशीन वापरून पाहतो अशी इच्छा दाखवली. ठरल्याप्रमाणे त्यांना आम्ही ती मशीन दोन दिवस वापरू दिली. तिसऱ्या दिवशी मी पुन्हा पाली हिल्सला गेलो. त्यांना मशीन, कन्सेप्ट सर्वकाही आवडलं पण गाडी किंमतीवर आडली. एक तास किंमतबद्दल घासाघीस झाली पण ती चर्चा निष्फळ ठरली. बोलता बोलता त्या युवकांनं आमच्या विक्री पश्चात सेवेची विचारपूस केली. आमच्या सेवेत त्रुटी नव्हती म्हणून मी त्याला मशीन वापरणाऱ्या ग्राहकांची सर्व नाव, फोन नंबर दिले. आपण आमच्या जुन्या ग्राहकाशी बोलून घ्या असं मी सांगितलं.
पुढं आमच्या आणि ग्राहकामध्ये २-३ मिटिंग झाल्या, किमतीची घासाघीस झाली पण खरेदीची ऑर्डर काही मिळत नव्हती. काही ग्राहक खूपच चिकित्सक, 'हार्ड-नट अँड डिफिकल्ट टू क्रॅक' असतात, हा त्यापैकीच एक होता. शेवटचा प्रयत्न करावं म्हणून आमच्या मॅनेजरने कंपनीच्या व्हाईस-प्रेसिडेंटकडून एक खूपच स्पेशल किंमत दिली, तरी तो ग्राहक टसचा मस झाला नाही. शेवटी वैतागून आम्ही त्या ग्राहकांचा पिच्छा सोडून दिला.
साधारण पंधरा दिवसानंतर त्याच ग्राहकांचा मला फोन आला. 'आमच्याकडं तुमच्याच कंपनीची एक मशीन आहे, ती व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही सर्व टूल घेऊन घरी या, आम्ही होईल ते सर्विस चार्ज देऊ'. मी लगेच हा कॉल घेतला. पाली हिल्सला गेलो. तिथे एक जुनी मशीन होती. मी दिलेल्या एका जुन्या ग्राहकाकडून त्यानं ती सेकंड-हॅंड मशीन कमी किमतीत विकत घेतली होती. मी दिलेल्या ग्राहकाची यादी, फोनचा त्यानं योग्य फायदा करून घेतला होता. त्याला फक्त खात्री करावयाची होती कि ती मशीन सुस्थितीत आहे की नाही. मी सर्व बाबतीत ती मशीन चेक केली. ती मशीन उत्तम स्थितीत होती आणि त्यात काहीही दोष नव्हता. मी मॅनेजरला विचारलं 'मशीन चांगली आहे मग चेकिंग चार्ज किती लावू?' या ग्राहकाने नवीन मशीन घेण्यासाठी मॅनेजरच् खूप डोकं खालं होतं आणि शेवटी सेकंड-हॅंड मशीन घेतली त्यामुळे ते खूपचं जास्त चिडले होते. आता त्या वैतागाचा बदला घ्यायची त्यांची इच्छा होत होती. मला त्यांनी सूचना दिली की- एक मोठा पार्ट खराब आहे असं सांगून दे आणि ₹ २१०००/-असा खर्च सांग. थोडक्यात मॅनेजरने मला खोटं बोलून ग्राहकाला मोठा चुना लावायला सांगितलं होतं. खाजगी कंपनीत वरिष्ठ सांगतील ती पूर्वदिशा. मी मॅनेजरनं जे सांगितलं तसंच केलं. मशीनचा ऑक्सिजन वेगळा करणारा महाग पार्टच खराब आहे आणि तो पार्ट बदलावा लागेल असं ग्राहकाला खोटं सांगितलं. ग्राहक खर्चासाठी तयार झाला. मी ती मशीन दुरुस्तीसाठी ऑफिसला घेऊन आलो.
मुळात ती मशीन अगदी चांगल्या स्थितीत होती. त्याला काहीच करायची आवश्यकता नव्हती. फक्त फाकफुक स्वच्छ करून, पार्ट बदलण्याचं खोटंनाट नाटक करून ₹२१०००/- च बिल मला त्या ग्राहकाला ठोकायचा आदेश होता. मी आज्ञाधारकानं चार दिवसानंतर ती मशीन आणि बिल ग्राहकाला पोहचत केलं. ग्राहकांनी लगेच मला ₹२१०००/- चा चेक दिला. चेक घेऊन ऑफिसला आल्यानंतर आमच्या मॅनेजरचा चेहरा बघण्यासारखा होता. ते खूपच खुश होते. ' कैसे आया उट पहाड के निचे' म्हणत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पण आतून मला हे पटणार नव्हतं. माझं मन मलाच खात होतं कारण हा चेक मला चुकीच्या मार्गाने मिळाला होता. त्या अर्थाला काहीच अर्थ नव्हता. पण मॅनेजर महाशय जाम खुश होते. एक अध्याय संपला होता. तो दिवस आनंदात गेला.
दुसऱ्या दिवशी नियमितपणे ऑफिस सुरु झालं. सर्व सुरळीत चालू होतं. सकाळी पुन्हा फोन खनंखनला. पलीकडं तो कालचाच ग्राहक होता. आता काय नवीन भानगड म्हणून मी मॅनेजरला विचारलं. आता त्या ग्राहकांच म्हणन होतं की काही तांत्रिक कारणानं त्यानं दिलेला चेक वटणार नाही, तेंव्हा चेक परत करून तुम्ही रोकड-कॅशच घेऊन जा. आता तर मॅनेजर महाशय जास्तच खुश. कारण त्याकाळी चेक लवकर वटत नसे शिवाय डिसऑनरची भिती असतेच. 'शुभम शिघ्रम', मी लगेच कॅश घ्यायला निघालो. त्यांनी मला ओबेरॉय हॉटेलच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बोलावलं होतं. माझ्या खुशीचा ठिकाणा नव्हता. मी लगेच त्यांच्या शॉपमध्ये पोहचून चेक त्याच्या सुपूर्द केला. हसत हसत त्यांनी चेक घेतला आणि शांतपणे मला परत जाण्यास सांगितलं. आधी मला काही समजलंच नाही आणि मी त्याना कॅश देण्याची विनंती केली. त्यांनी शांतपणे माझ्यासमक्ष तो चेक फाडला आणि तुम्हाला मी काहीच देणार नाही असं सांगून मला परत जाण्यास सांगितलं. त्यानंतर तो जे बोलला त्यानं मी अगदी थंडच झालो. त्याच्या एसी शॉपमध्ये मला घाम फुटल्यासारखं होतं होत. डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी आल्यासारखं झालं. जो पार्ट बदलण्यासाठी मी मशीन घेवून गेलो होतो त्या पार्टला त्या ग्राहकाने आधीच फुल्लिची छोटी मार्किंग करून ठेवली होती. मशीन परत आल्यानंतर त्यांना तो पार्ट आहे त्या स्थितीतच आणि जुनाचं आढळला. आपल्याला मूर्ख समजून हि लोकं आपला गैरफायदा घेत आहेत, फसवत आहेत म्हणून त्यानं हा किस्सा सरळ कंपनीच्या व्हॉईस-प्रेसिडेंटला कळवला होता. एखाद्या चोराला रंगेहात पकडल्यानंतर जे घडत ते सर्व माझ्यासोबत घडत होतं. डोकं सुन्न झालं होतं. मी कसाबसा ऑफिसला पोहचलो. कॅशच्या प्रतीक्षेत असलेल्या आमच्या मॅनेजरला मी संपूर्ण हकीगत सांगितली. आम्हाला हसावं कि रडावं काहीच कळतं नव्हतं. लायकाने चेअरमन श्री नानुभाई गांधी एक तत्वनिष्ठ गुजराती होते. मूल्य आणि तत्वाशी तडजोड त्यांना पटत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत कंपनीचं नाव खराब होनं त्याना जमणारं नव्हतं. बिझनेस एथिक्स, मूल्य त्यांना जास्त प्यारे होते. आमच्या या कृष्णकर्त्यांनं लायकाच्या नावाला धब्बा लागून त्याचा वाईट परिणाम विश्वासावर चालणाऱ्या मोठया औषधी-वैद्यकीय क्षेत्राला झाला असता.
आता हे प्रकरणं सावरनं खूप कठीण काम झालं होतं. खाजगी कंपनीत यशाचे सर्वच बाप असतात पण एखादी वाईट घटना घडली कि त्याची कुणीही स्वतःवर जिम्मेदारी घेत नाही, ते अपत्य अनाथ असतं. कंपनीचे वरिष्ठ खूप चिडले होते. हे 'अपत्य' कोणाचं जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरु केली. वातावरण गरम झालं होतं. कुणाची दांडी उडते कि काय अशी भीती होती. एक खोटं लपवण्यासाठी कितीतरी खोट्या कुबड्या लागत असतात. मग नको ती कथा सांगून आम्ही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण सत्य हे पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्यासारखं असतं. कितीही खोलात ढकललं तर वर तरंगतच! या प्रकरणाचा 'बोलविता धनी' आमचे मॅनेजर होते त्यामुळे त्यांच्याच नावावर हे बिल फाडल्या जाणार होतं. जे अपेक्षित होतं तसंच झालं. पुढील काही दिवसातं पुन्हा असं एक प्रकरण घडलं. मी माझ्या मूल्य आणि तत्वाशी चिपकून राहिलो. मॅनेजरनं नको असे काही बोल्ड निर्णय घेतले. नाईलाजानं कंपनीला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला.
लायकामध्ये आम्ही जो खेळ खेळला तो व्यवहार-उद्योग क्षेत्रातला काही नवीन प्रकार नव्हता. सेवा-सर्विस क्षेत्रात अशा घटना हमखास घडतं असतात, आजही घडतात. कार्यालयीन कम्प्युटर , युपीएस, इन्व्हर्टर असो की घरगुती मोटर,एसी, रेफ्रिजरेटर किंवा अजून इलेक्ट्रिक रिपेअर असो, ग्राहकाच्या अज्ञानाचा दुरुस्तीवाले हमखास फायदा घेत असतात. अशा फसवणुकीच्या बातम्या आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असतो. अर्थात याला काही अपवादही असतात. पण काही चिकित्सक, जिद्दी ग्राहक ग्राहकमंचामध्ये आवाज उठवून कंपन्यांना अद्दल घडवत असतात. ग्राहकाला सरंक्षण मिळावं म्हणून शासनानं कायदा करून ग्राहकास अभय दिलं आहे, त्यामुळं ग्राहक आज खरोखरच राजा आहे.
व्यवस्थापन शास्त्राच उच्च शिक्षण-एमबीए- केलेले तरुण-तडफदार युवक कंपन्यात काम करताना खूपचं वेगळ्या तोऱ्यात वागतात. आपल्या व्यक्तिमत्व, भाषा प्रभुत्वाने ते इतरांवर राज्य करण्याचा, हाताखालील कर्मचाऱ्यांना कमी लेखण्याचा, ग्राहकाला फिरवण्याचा प्रयत्न करत असतात. अस करत असताना कधी कधी ते ग्राहकाला कमी लेखण्याची मोठी चूक करतात, आणि फसतात. जास्त शिक्षण व अनुभवाचा अभावमुळं कदाचित हे घडतं असावं. एमबीएमध्ये शिकलेल्या मॅनेजमेंट टेक्टीजपेक्षा आई-वडील तसेच प्राथमिक शिक्षकाकडून मिळालेलं जीवनमूल्याच शिक्षण व संस्कारशिक्षण अति महत्वाचं असतं. मूल्य हे वैश्विक असतात. सर्व जगात ते तेव्हढेच महत्वाचे असतात. खोटं बोलू नये, इतरांचा आदर करा, कुणास कमी लेखू नका, फसवू नका, दुसऱ्यासाठी खड्डा कराल तर तुम्हीच पडाल इ. हे सर्व आपण लहानपणी कथा, पाठयपुस्तकातील धड्यामार्फत शिकत आलो. पण एमबीए शिकल्यानंतर मॅनेजमेंट टेक्टीज पुढे आणि जीवन उपयोगी मूल्य मागे पडतात. दिलेलं सेल्स, रेव्हेन्यू टार्गेट पूर्ण करण्यासाठी मग हे युवक रेशनल-इमोशनचा विचार न करता वाटेल ते गोंधळ करताना दिसतात.
वरील प्रकरणात मॅनेजरने समंजसपणाने आपल्या रागाला आवर घातला असता तर पुढचं अघटिक घडलचं नसतं. समाजात फिरताना सर्व ग्राहक एक सारखेच मिळतील असं शक्य नाही. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर अशक्यच. आणि उद्योग म्हंटल तर भिन्नभिन्न व्यक्ती, समाजातील ग्राहकांशी एकरूप होऊन, त्यांच्या फ्रेक्युन्सी, वेवलेन्थशी जुळवूनच व्यवहार करायचा असतो. कोणताही व्यवहार घडताना कंपनी, ग्राहक, समाज आणि सर्वांचाच फायदा होईल अशेच निर्णय घ्यावे लागतात. कुणीही आर्थिक, भावनिक दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
व्यवसाय, उद्योगात सेल्स विभागच असा असतो की ज्याचा कायम बाहेरील जगाशी दररोज संपर्क होतं असतो. सेल्स-सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कंपनीचा खरा चेहरा असतात. ते जसं वागतात, बोलतात, राहतात यावरूनच ग्राहक त्याच्या कंपनीचा अंदाज बांधू शकतो. उद्योग ही वीरांची भूमी असते आणि तर मार्केटिंगची टीम एका सैनिकाप्रमाणे असते. विक्रीच्या युद्धात कंपनीसाठी लढणारे ते खरे यौध्ये असतात. विक्री, सेवा करून ते कंपन्यांची उलाढाल, पत वाढवत असतात. कंपनी नफ्यात येत. अवॉर्ड, बोनस, मेडल सारखे सन्मान सेल्सटिमसाठी जास्त असतात. त्यामुळं बाहेरच्या जगाशी संवाद साधणाऱ्या विक्री-सेवा प्रतिनिधींचा व्यवहार चांगला असावा लागतो.
हे एक प्रकरण माझ्या आयुष्यात मला खुप काही शिकवूनं गेलं. अर्थात शिकणं हे ऐच्छिक असतं. मी शिकलो आणि पुन्हा अशा चुका टाळत गेलो. आम्ही स्वतःला खूप ग्रेट समजतो पण जगात शेरला सव्वाशेर मिळतातच. वरील प्रकरणात आम्ही दुसऱ्यासाठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यात आम्हीच अलगद जाऊन पडलो होतो. व्यवसाय उद्योगात लबाडी चालत नाही. चालली तरी जास्त दिवस टिकत नाही. उद्योग-कंपन्या बंद पडण्याचं हे एक कारण असू शकतं. एक लबाडी लपवण्यासाठी कितीतरी जास्त खोटं बोलावं लागतं. कधी कधी ते खूप घातक ठरतं.
खुल्या अर्थव्यस्थेमुळे परदेशी कंपन्या भारतात येऊन त्यांनी येथील देशी कंपन्यांना ग्राहकहिताचं महत्व दाखवून दिलं. त्यामुळं ग्राहकसेवामध्ये अफाट बदल झाले आहेत. एकही ग्राहक दूर जाणे त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे ग्राहकांच खरंच भलं व्हावं असा सात्विक विचार करून कंपन्यानं आपलं व्यवस्थापन बदललं आहे. त्याचा त्याना फायदाचं होत आहे. कंपनी मग ती उत्पादन क्षेत्रातील असो की सेवा, ग्राहकाबद्दल ती खूप जागरूक असते. एकही असंतुष्ट ग्राहक त्यांना नको असतो. तसंच ग्राहकाच्या तक्रारी त्या सकारात्मकतेने घेत असतात कारण या तक्रारीवरून त्या वस्तू आणि सेवेतील त्रुटी कंपन्यांना माहित पडतात व त्यात नियमित बदल केले जातात. त्यामुळे खास ग्राहकांची काळजी घेण्यासाठी कंपन्या एक स्वतंत्र विभाग-कस्टमर केअर सेंटर तसेच त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी कॉल सेंटरची व्यवस्था असते.
आज गरज आहे ग्राहक राजाने जाग होण्याची. दिवस भरात आपल्याकडं मोबाईल, पेपर, टीव्ही आणि इतर माध्यमाद्वारेद्वारे अनेक ऑफरचं जाळं फेकल्या जातं. रात्री-अपरात्री कधीतरी येणारे दुसऱ्या देशातील कॉल्स हे काळजीपूर्वक विणलेल एक जाळचं असतं. थोडक्यात 24 X7 आपल्या सभोवताली कंपन्यांनी ऑफरच जाळं टाकलेलं असतं. त्या जाळयात अलगद शिकार अडकवण्याचं अतोनात प्रयत्न कंपन्या करत असतात. तेंव्हा ग्राहकाने सद्सदविवेक बुद्धीनं विचार करून, चिकित्सक होऊन आपण फसवलं जावू नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
आता थोडक्यात महत्वाचे. दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तू व सेवा उपभोगत असतो. बऱ्याचदा उपभोगत असलेल्या वस्तूमध्ये आपल्याला दोष आढळतो. अशी तक्रार आपण स्थानिक ऑफिसला कळविली असता तेथील कर्मचारी चालढकल करतात. त्यांच्याकडून पाहिजे तशी सेवा वा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही. अशा वेळेस ग्राहकांनी खचून न जाता आपली लिखित सविस्तर तक्रार त्या कंपनीच्या वरिष्ठाना निदर्शनात आणने कधीही चांगले. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कंपनीन भरपूर अधिकार दिलेले असतात. सर्व कायद्याविषयी ते जागरूक असतात. पुढील कायदेशीर कार्यवाही टळावी म्हणून वरीष्ठ अधिकारी ग्राहकाला पूर्णपणे संतुष्ट करतात. थोडक्यात हा फायदेशीर मार्ग असतो.
©प्रेम जैस्वाल 9822108775
( हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)




