गुजरा हुवा जमाना.......
"मुस्सा मामू सायकील होना"
" कित्ते टेम के लिए होना? पछान बताव?"
"एक घंटा, बडेभाई हमेशाच ले जाते, मैं भी लेगया पहले तुमारेसे."
लोखंडाच्या गंजलेल्या टपरीवर मलकट पांढरा कुर्ता पायजामा नेसलेले, दाढी, चेहऱ्यावर वण व कायम वैफल्यग्रस्त दिसणारें मूस्साभाई कधी अंथरलेल्या पोत्यावर तर कधी लोखंडी खुर्चीवर विराजमान असायचे. समोर एक छोटा लाकडी टेबल, त्यावर जुनं फाटकं रजिस्टर, दोऱ्याने बांधलेला पेन किंवा रिफील असे. त्यापुढे आठ-दहा जुन्या सायकली ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभ्या असत. चैनीच कव्हर व मागच्या मडगार्डवर ठळक अक्षरात नंबर पेंट केलेलं असायचा. टपरीच्या आत सायकल रिपेरिंगसाठीचे हत्यार, जुन्या चाकांच्या रिंग, सायकल सीट घंट्या व इतर सुटे भाग अस्ताव्यस्त पडलेले असे. टपरीच्या बाजूला मळकट बादलीत पाणी, हवेचा पम्प, पंपचरचं सामान आणि अस्ताव्यस्त पडलेले सायकलचे ट्यूब-टायर दिसे. मुस्साभाईच्या बाजूला चहा-भज्जेच्या एक-दोन हाटेली आणि पान-टपऱ्या होत्या. लहान मुलं ढुंकूनही त्या टपऱ्याकडे वळत नसत. तिकडे वयस्कर मंडळीं, मोंढ्याचे व्यापारी, कर्मचारी वर्ग तेथे चहा-पान व धूर सोडतांना दिसायची.
सकाळी मूसाभाई दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून बसलेले असायचे. गावखेड्यात मुक्कामी असलेल्या बसेस साधारण आठ वाजता वडाच्या झाडाजवळ धूळ उडवत थांबायच्या. बाजार, खरेदी, शेतमाल व कापूस विक्रीसाठी आलेली ग्रामस्थ मंडळीसाठी हा थांबा सोयीचा होता. कपडे झटकत प्रवासी बसमधून उतरायचे. कच्च्या रस्त्याने उडणाऱ्या धुळीने ते माखलेले असायचे. बाहेर गावी जाणारे प्रवासी मात्र मुख्य बसस्टँडला जात. येथूनच सायकल भाड्याने घेऊन बाजारात, कापूस विकत घेणाऱ्या जिनिंग मिल कडे लोकं जायची. भाड्याने घेतलेल्या सायकलमुळे कामं पटपट व्हायची. जातांना सायकल परत करुन लोकं बसस्टँड गाठायची. नाहीतर 'नाईटचार्ज' लागत असे.
त्याकाळी मोजक्या लोकांकडे सायकली असायच्या. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात खोली घेऊन राहणाऱ्या तरुणानां भाड्याच्या सायकलीशिवाय पर्याय नसे. अशी काही 'शहरी' तरुण मंडळी राजेश खन्ना, अमिताभ सारखी हिप्पी वाढवून सायकल चालवीतांना, कट मारतांना दिसायची. सायकल विकत घेण्याची आयपत नसल्यामुळेच भाड्याने सायकली घेतल्या जायच्या. किंवा दोन तीन मित्रामध्ये एक सायकल असायची. संपूर्ण गावामध्ये क्वचित एखाद्या कुटुंबाकडे ही चैनीची वस्तू असायची. एखादा पाहुणा सायकलने गावात आला तर त्या सायकलभोवती चकरा मारून ती मालकीची आहे की भाड्याची, लोकं याची खात्री करून घेत. रस्तेच नव्हते तेंव्हा दिवसात एक एसटी बस असे. इतर वेळेसाठी पर्याय एकच होता - भाड्याची सायकल.
मला आठवतं, ८वीत असतांना झेंडावंदन करुन आम्ही सायकल शिकण्याचं ठरवलं. मुस्साभाईला ओळख सांगून त्याकडून दोन सायकली घेतल्या. सोबत मोठे बंधू जयभैय्या आणि मीत्र अशोक ठाकूर होता. अंगुठ्याने टायरची हवा चेक करत त्याने आम्हांला दोन सायकली दिल्या. पोलीस मैदानावर शिकतांना मी ब्रेक दाबायचं विसरलो. सायकल सरळ पोलीस कार्यालयाच्या फेंसिंगला जाऊन धडकली. सायकल समोरचा एसएस स्टीलचा लोगो 'H' वाकला व मलाही थोडं लागलं. माझ्या जखमेपेक्षा मला त्या वाकलेल्या H लोगोची चिंता वाटू लागली. मुस्साच्या लक्षात आलं तर काय करायचं? ते आधीच तसं होतं 'हमने कुछ नही किया' असं सांगायचं का? पण आमचं नशीब, त्याचं लक्ष त्याकडे गेलंच नाही. भाडं भरून आम्ही सुटलो.
'संपूर्ण भारत देशात हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध होता. खरं तर आमचा तो भ्रम होता. आमचे पाऊल कधी हिंगोलीबाहेर पडलेच नसल्याने आम्हालासुद्धा ते खरंच वाटायचं. एकदा दसऱ्यात एक प्रसिद्ध सायकल कलाकार आला. त्याच्या नावावर 'अखंड सात दिवस' सायकल चालविण्याचा विक्रम होता म्हणे. अशी सर्वत्र चर्चा झाली. रामलीला मैदानावर, आम्रपालीजवळ त्याने 'शो' सुरु केला. राजेश खन्नासारखी हेअरस्टाईल असलेला तो कलाकार गोलाकार मैदानात अखंड सायकल चालवतांना दिसला. मधेच तो चालत्या सायकलीवर शर्ट बदलयाचा तर मधूनच पाणी पीत होता तर कधी दोन्ही हात सोडून हळूहळू गोलाकार सायकल फिरवत होता. आत एका कपड्यावर प्रेक्षक पैसे टाकत होती. एक तास हा प्रकार बघून आमच्यासारख्या नवशिक्याना खूपच आश्चर्य वाटायचं. तो कसा झोपत असेल? थकल्यानंतर विश्रांतीचं काय? जेवन आणि हो प्रात:विधि? पण असे प्रश्न आमच्या बालबुद्धीत येण्याचा प्रश्नच नव्हता.
आठवीचं वर्ष संपता संपता मी सायकल शिकलो. अधून मधून मी सायकलने टायपिंग क्लासला जात असे. ऐके दिवशी आम्ही एसटी बसने बाहेर गावी जाणार होतो. पेडगाव ते हिंगोली आणि एक तासानंतर बाहेर गावी जाणारी एसटी बस होती. त्या एक तासात काम करून मला परत बसस्टॅन्डला यायचं होतं. मी भाड्याची सायकल घेतली. वळनावर वाळूवर चाक जाताच स्लिप होऊन मी पडलो. खुराणा बंगल्याच्या दक्षिणेला खाली खोलगट जमिनीवर चौधरीची लॉउंड्री होती. नेहमीचा ग्राहक त्यामुळे चौधरीने मला उचलून घरी आणलं. एक तासात माझ्या गळ्यात फ्रॅक्चरचा पट्टा आला. उजव्या हाताला प्लास्टर चढविण्यात आलं होतं. ऐन परीक्षेच्या काही दिवसाआधी हा अपघात घडला होता. चिंता दोन परीक्षेची होती, टायपिंग व आठवी वार्षिक. कंदी रुग्णालयातून पैंडल रिक्षाने वर्गशिक्षक खिल्लारे सराचं घर गाठलं. 'सामायिक परीक्षेच्या मार्कांवरून वार्षिक परीक्षेचे मार्क मिळतील, चिंता करू नकोस' सरांनी असं आश्वासन दिलं. आठवी पास झालो. 30 WPM ऐवजी सरळ 40 WPM परीक्षेला बसून टायपिंग परीक्षा पास झालो.
दहावीला गणिताच्या पडोळे सरांची ट्यूशन अगदी सकाळी सहाला असायची. फटलक फटलक कव्हरला घासणाऱ्या चैनचा आवाज आणि घंटीचा गजर करत आम्ही गल्याबोळ्या पार करत ट्यूशन गाठायचो. जैन मंदिराच्या भोंग्यातून 'मैं नही माखन खायो...' अनुप जलोटाची प्रभातभजन कानी पडायचे. मधूनच ते 'हिरे मोतीsssss.ईईई ' असा लांब आलाप घ्यायचे. त्या लांब आलाप दरम्यान आपण किती सायकल चालविली ते मी मोजत असे. आता तो फालतू प्रकार आठवून माझं मलाचं हसू येतं. हिंगोली आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची झुंड सायकलने ये-जा करतांना दिसायचे. त्याकाळी महाविद्यालयाचा दर्जा नावाला साजेसा होता. याच काळात शहरापासून दूर असलेल्या शेतात पहिल्यांदाच मी एक जेन्टस आणि एक लेडीज सायकली जोडीने उभ्या बघितल्या!
कालांतराने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पगारी वाढून रस्त्यावर स्वतःची सायकल, लुना, एम-80 सुद्धा दिसू लागल्या. पण त्या 'भाड्याच्या सायकली' इतिहास जमा झाल्या. पुढे इंजिनियरिंगला असतांना विद्यार्थी आणि बरेच प्राध्यापकसुद्धा सायकलने महाविद्यालयात यायचे. आज देशातील मोठया शहरात स्वतः चालविण्यासाठी सायकलीप्रमाणे कार भाड्याने मिळतात. पुढे एआय तंत्रज्ञानावर आधारित चालकरहित कारसुद्धा मिळतील. पण आमच्यासाठी त्या भाड्याने मिळणाऱ्या सायकली कायम आठवणीत राहणार - पचास पैसे एक घंटा!
©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
मो. 9822108775