ad1

Monday, 24 November 2025

आर्ट ऑफ गिव्हिंग


'आर्ट ऑफ लिव्हिंग' सर्वाना परिचित आहे. आपल्या अवतीभवती कितीतरी लोक त्यांचे साधक असतील. 'जीवन जगण्याची कला' असा त्याचा अर्थ होतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सुदर्शनक्रिया, प्राणायाम, योग इ. त्यामध्ये शिकविले जाते. ज्यांच उदर भरलेले आहे त्यांच्यासाठी ते आवश्यकही आहे. पण समाजातील उपेक्षित, पिडीत, अनाथ घटकांचा विचार करता जगण्यासाठी अध्यात्म आणि योगा एव्हड़च पुरेस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा अशा मुलभुत गरजा पूर्ण झाल्याशिवाय योग आणि आध्यात्माला अर्थ नाही. 'भूके पेट न होये गोपाला....!' त्यामुळे आजही समाजाच्या तळागाळातील लोकांच्या मुलभुत गरजांचा विचार करता 'आर्ट ऑफ गिव्हिंग' हि तेव्हडेच महत्वाचे वाटते.

प्राचिन काळापासून मनुष्य हा कळपात राहणारा प्राणि होता. जेंव्हा शेती व्यवसाय विकसित नव्हता आणि मनुष्य परावलंबी होता, तेंव्हा जंगलात शिकार करण्यासाठी मनुष्य कळपात फिरायचा आणि मिळालेल्या शिकारीवर त्याची उपजीविका चालायची. अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय, हिंस्र प्राण्यापासून रक्षण, संकटकाळी धावून जाण्यासाठी, सुखदुःखात एकमेकाला मदत आदी कारणामुळे मनुष्याला कळपात राहणे आवश्यक होते. अड़ीअडचणीत एक दुसऱ्यांना देवून-घेवून लोक मदत करायचे. अनेक सण-उत्सवात धान्य, कपड्यांची देवान-घेवान व्हायची. त्यामुळे आपापसतील प्रेम-संबंध, नाते वृंदिगत व्हायचे. अडचणीत त्याचा फायदा होता. आणि त्यातुनच पुढे वेगवेगळ्या समाजाची निर्मिति झाली. गावखेड्यात आजही शेतातिल दूध,भाज्या-फळे, हुरड़ा, आंबे इ. शेजाऱ्याना वाटण्याची प्रथा आहे. कदाचित त्यामुळेच गावात भिक्षुक कमी आढळतात. शहरात यदा कदाचित असे कुणी केलेच तर त्याला 'शेअरिंग' असे 'सोफिस्टिकेटेड' नाव आहे. परंतु विज्ञानातील शोध आणि आर्थिक प्रगतिमुळे मनुष्य आता एव्हड़ा स्वावलंबी झाला आहे कि त्याला आता कळपात राहण्याची गरज उरली नाही. भौतिक सुखात तो गुरफटून गेल्यामुळे त्याला इतरांशी काही देने-घेणे, कुणाच्या सुखदुःखात, अडचणीत जाण्याची गरज वाटत नाही. जन्मदाते आई-वडील, जवळचे नातेसंबन्धी आणि समाजाचा येण्याजाण्याचा 'त्रास' नको म्हणून आज उच्चशिक्षित नोकरदार दूर नोकरी शोधत आहे. अशा असंवेदनशील आत्मकेंद्री वर्गाची संख्या दिवसंदिवस वाढून एक आत्मकेंद्री, चंगळवादी समाजाची निर्मिति होत आहे. ज्या समाजात राहून मनुष्य लहानाचा मोठा होतो, ज्या समाजाकडून संस्कार, जीवनमूल्य शिकलो तोच समाज आता त्यास नकोस वाटन, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पाऊस संपल्यानंतर छत्री अडचणीची होते, असा तो प्रकार आहे. सामाजिक बांधीलकी आणि संवाद फक्त व्हाट्सप आणि फेसबुकपुरते मर्यादित झाले आहे. हल्ली व्हाट्सप्प फेसबुकवरील हजारो मित्रातच मनुष्य मशगूल आहे. त्याला शेजारच्या 'व्हाट्सप' मित्राशी दोन मिनिटे बोलण्यासाठी वेळ नाही आणि गरजही वाटत नाही. थोडक्यात कळपात राहनारा प्राणि आज कुलुपात राहणे पसंद करत आहे. आपल्या गरजा पूर्ण होऊन स्वावलंबी झाल्याचा हा परिणाम आहे. विज्ञानाच्या प्रगतिमुळे जग जरी अगदी एका खेड्यासारखे वाटत असले तरी ह्या प्रगतिमुळे मनुष्य एकमेकापासून दुरावला गेला आहे, हेही तितकेच खरे. असो, 'कालाय तस्मै नमः' 


काळानुरूप मनुष्यात कितीही बदल झाले तरी त्यामुळे 'आर्ट ऑफ गिव्हिंग' चे महत्व कमी झालेले नाही. पण हल्ली धावपळीच्या युगात मनुष्य आपले काम आणि अर्थार्जनामध्ये खुप व्यस्त आहे. कुणास काही देणे तर दूर पण घेण्यासाठीही त्याच्याकड़े वेळ नाही. व्हाट्सप, फेसबुकवरील 'मित्रांना' गुड़ मॉर्निंग, गुड़ नाईट आणि मोठमोठे अवजड सुविचार (जे इतरांचे असतात) देण्याघेण्यामध्येच धन्यता मानतो. खऱ्या आर्ट ऑफ गिव्हिंगला आपल्या धनाच्या श्रीमंतीपेक्षा 'मनाशी श्रीमंती' लागते. याची प्रचिती घ्यायची असेल तर एक वेळेस हे करून तर बघा. त्यासाठी अगदी गावखेड्यातच जाण्याची गरज नाही. आपल्या शहरी जीवनात राहूनही 'आर्ट ऑफ' गिव्हिंग' चा अनुभव घेऊ शकता. 


औरंगाबादला माझा वैद्यकीय उपकरणाचा व्यवसाय होता तेंव्हाची ही घटना.  प्रसूतिनंतर बालरुग्णाना लागणारे वार्मर, फोटोथेरपी ज्याना सामान्यजनता 'काचेची पेटी' म्हणतात अशा उपकरणाची हॉस्पिटलला विक्री आणि दुरुस्ती आम्ही करायचो. कमी वजनाच्या, जन्मताच काविळ झालेल्या नवजात बाळाना ह्या उपकरणामध्ये उपचारासाठी ठेवल्या जाते. त्यावेळेस आमचं ऑफिस नव्हतं म्हणुन सर्व कामकाज घरूनच चालायच. मला आठवते सकाळची कामे, हॉस्पिटल-व्हिजीट आटोपूण मी दुपारी आरामात पहुडलो होतो. तेव्हड्यात कुणीतरी बेल वाजवून माझी झोपमोड़ केली. बाहेर बघतो तर एक नीटनेटक्या ड्रेसमध्ये ऑफिस एग्जीक्यूटिव वाटावे असे गृहस्थ उभे होते. अवकाळी पावसात ते थोड़े भिजलेही होते. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघता ते खुप घाबरलेले आणि गोंधळलेले वाटत होते. विचारपूस केल्यानंतर कळाल कि त्यांच नवजात बाळ शासकीय रुग्णालयाच्या अतिव दक्षता विभागात भरती होत. त्या बाळाला काविळ झाला होता आणि शासकीय रुग्नालयाच्या काविळ कमी करणाऱ्या फोटोथेरपी मशिनीची निळी ट्यूब काम करत नव्हती त्यामुळे इलाज होत नव्हता. अशा रुग्णालयात एखादा सुटाभाग खरेदी करायचा असल्यास एका वेळखाऊ दिव्यचक्रातुन जावे लागते. म्हणून ते स्वतः डॉक्टराकडून माझा पत्ता घेवून स्वखर्चाने माझ्याकडे ती ट्यूब खरेदी करण्यासाठी आले होते. इमर्जन्सी व त्यांची आर्थिक परिस्थिति बघून मी त्यांना ती ट्यूब मला आली त्या किमतीत देवून टाकली. पण पुढचा प्रश्न ती ट्यूब मशीनमध्ये बसवनार कोण? शासकीय रुग्णालयात काम करायच म्हणजे त्यांच्या लांबलचक, वेळखाऊ नियमाने जावे लागते. सर्विस चार्जेस तर मिळनार नव्हतेच, परन्तु नवजात बाळ आणि त्यांची अड़चन लक्षात घेवून पड़त्या पावसात मी ते उपकरण चालू करून दिले. फोटोथेरपी चालू झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आंनद बघण्यासारखा होता. पूर्ण व्यवहारात सरकारी नियम बाजूला ठेवून 'सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड' या भावनेने मी त्यांना निस्वार्थ मदत केली. कालांतराने मी ते सर्व विसरूनही गेलो होतो.


तीन वर्षानंतर औरंगाबादच्या रामा इंटरनेशनल या पंचतारांकित हॉटेलमध्ये बालरोगतज्ञानची कॉन्फ्रन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये आमच्या कंपनीचाही स्टॉल होता. पहिल्याच दिवशी स्टॉलची व्यवस्थित मांडणी करताना एक हॉटेल स्टाफ मला स्वतः येऊन विचारतो, 'साहब आपको कुछ ठंडा, पेप्सी कुछ चाहिये तो आप मुझे जरूर कहेना?', मला थोड़ आश्चर्यच वाटल की येथे कुणाशी माझा काही परिचय नसताना अस अचानक कुणी मला असं का विचाराव. मग त्याने मला स्वतःहुन आठवण करून दिली कि मी तोच व्यक्ती आहे ज्याच बाळ आजारी असताना तुम्ही भर पावसात मदत केली होती. ते महाशय रामा इंटरनेशनल पंचतारांकित हॉटेलचे 'कॅॅप्टन' होते.


कॉन्फ्रन्सच्या शेवटच्या रात्री रामा हॉटेलच्या लॉनवर बैंक्वेट होती. कंपनीस्टाफ व डिलरचे मिळून आम्ही आठजण होतो. आयोजकाने प्रत्येक स्टॉलला जेवणाच्या फक्त दोनच पासेस दिल्या होत्या. नियमानुसार आमच्यापैकी दोन जण बेंकवेटला जावू शकत होतो बाकी आम्ही बाहेर जेवन्याचं ठरवत होतो. कारण इतर सहा जणाना पंचतारंकित हॉटेलमध्ये पैसे देवून जेवने परवडणारे नव्हते. कोण बेनक़्वेट ज्वाइन करणार आणि बाहेर कोण जेवनार या द्विधेत असताना तेच रामा हॉटेलचे कैप्टन माझ्याकड़े येवून मला आस्थेने विचारतात की आपणास काही प्रोब्लेम आहे का. मी त्यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बैंकवेटच्या पासेसचा अख्खा गठ्ठाच माझ्या पुढे आणून ठेवला. 'सर, तुम्हाला हव्या तेव्हडया पासेस बिनधास्त घ्या!' मी त्यांच्याकडून बैंकवेटच्या सहा पासेस घेतल्या. शासकीय नियम आणि पैशाचा विचार न करता मी त्याला मदत केली होती आणि विसरून गेलो होतो पण त्याच्या ते पक्क लक्षात होत. 'रिटर्न गिफ्ट' म्हणून तेही पंचतारांकित हॉटेलचे सर्व नियम बाजूला करून किंवा आपले अधिकार वापरून आम्हास मदत करत करण्यास तयार होते. 'आर्ट ऑफ गिव्हिग' चा तो परिणाम होता. असं म्हणतात कि 'जे आपण इतराना देतो ते व्याजासहित परत मिळतं '.


निसर्गही आपल्याला भरभरुन देत असतो. प्रकाश, पाणी, हवा, पाऊस, ऊन, वारा, माती, जमीन, सावली, फूल, फळे, वृक्ष, इंद्रधनुष्य, पक्ष्यांची किलबिल अशा कितीतरी गोष्टी तो आपल्याला फुकटात घेतो. एखाद्या फळाचे बी चुकीने जरी शेतात पडल तर काही वर्षानी तिथे रसाळ फळाचे झाड़ उभे दिसते. सर्वच फळ-फुलांचे झाड़ आपण लावत नाही. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी निसर्गाकडून काहीही घेत नाही. मग निसर्गाकडून सर्वच गोष्टी फूकटात घेत असताना आपण फुकटात इतराना काय देतो, हे महत्वाचे आहे. म्हणूनच 'घेता' या कवितेत प्रसिद्ध कवि विन्दा करंदिकर म्हणतात -

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।।

©    -प्रेम जैस्वाल पेडगावकर
        9822108775

Tuesday, 21 October 2025

एक वो भी दिवाली....



                एक वो भी दिवाली थी! 

आज समाजमाध्यमात एक पोस्ट वाचली, " आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मोबाईलचा डाटा कधीच समाप्त न होवो. तुमचा वाय-फाय अखंडीत चालत राहो, वगैरे." या शुभेच्छामध्ये एक विनोद आणि हल्लीच्या परिस्थितीवर टीका सुद्धा होती. मग प्रश्न पडतो, कुठून कोठे आलो आपण? हा लेख वीज नसलेल्या काळातील दिवाळीबद्दल आहे. 

दसरा संपताच काही दिवसांनी दिवाळीचे वेध लागायचे. शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या. कोजागिरी पौर्णिमेंनंतर गावात फक्त आमच्या घरावर आकाशदिवा लावल्या जायचा.  लहाने काका कलाकार होते. आकाशदिवा किंवा गणपती ते घरीच तयार करायचे. किंबहुना रेडिमेड प्रकार उपलब्ध नसावा. बांबूच्या कमड्या तयार करुन त्याचा षटकोनी आकाराचा आकाशदिव्याचा सांगडा तयार करायचे. चिक्की तयार करुन त्या सांगड्यावर रंगीत पेपर चिपकविल जायचं. त्याकाळी रेडिमेड डिंक, फेव्हीकोल असं काही नसायचा. एक वेळेस मी तो आकाशदिवा बनविण्याचा  अयशस्वी प्रयत्न केला होता. मोठया खांबाला वर अजुन एक खांब बांधून साधारण ३० फुटावर तो दिवा लावला जायचा. रोज संध्याकाळी त्याला खाली उतरवून त्यातील दिव्याची ज्योत  व्यवस्थित करुन, तेल टाकलं जायचं. झेंड्याप्रमाणे हळुवार दोर ओढून तो आकाश कंदील वर चढविण्यात भलतीच मजा यायची. तिस फुटाची ती उंची बालपणी खूपच जास्त वाटायची. गावातील दूरवरच्या शेतातील मंडळींना तो लाल दिवा लुकलूकतांना दिसायचा. १९८३ पूर्वी पर्यंत गावामध्ये वीज नव्हती.

दिवाळीची खरी तयारी रंगरंगोटीने व्हायची.  तीन भावाचं एकत्र कुटुंब बरंच मोठं होतं.  तेव्हढाच मोठा घराचा पसारा होता.  मातीच्या जुन्या घरासह नंतर बांधलेली विटा सिमेंटची भिंत असलेली जोडणीची मोठी बैठक होतीच. त्याकाळी गावातील फक्त दोन तीन घरचं सिमेंट आणि जोडणीचे असावे.  जोडणीच घर म्हणजे त्याकाळी वैभवाच प्रतिक.   दिवाळीत सर्वात मोठं काम म्हणजे संपूर्ण 'घर रंगविणे' हेच होतं. घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न असेल तरचं घरात लक्ष्मी येणार, असं त्यामागचं कारण. त्यामुळे दसऱ्यानंतर हे काम सुरु व्हायचं. 

दिवाळी काही दिवसावर येताचं गावभर मातीच्या भिंतीची डागडुगी सुरु व्हायची. पावसाने भिंतीचे पापुद्रे निघायचे तर कधी भिंती पडायच्या. गावभर भिंती दुरुस्ती करुन त्याला शेनाने सावरण्यांची काम चालू व्हायचे. लहानमोठं काम लोकं घरच्या घरीच निपटून घ्यायचे पण मोठं असलं तर मात्र गडी लागायचा. गावात चिखलाचा गारा करुन भिंत दुरुस्त करण्यासाठी 'शिरपा गारा स्पेशालिस्ट' होता.   जेवण भाकरी आणि थोडंफार धान्याचा मोबदला ठरवून त्या करवी लोकं गारा तयार करुन भिंती दुरुस्त करुन घ्यायचे. शिरपा जसा उंचीला तसा अंगानीही धीपाड जाडजूड होता. त्यामुळे मोठा चिखलाचा गारा तुडवनं त्याला सहज जमायचं. 

शेनाने सारवल्यामूळे भिंतीला नवीन जीवन मिळायचं. हिरव्या शेणामुळे भिंतीला एक प्रकारचा नवीन 'कलर शेड' यायचा. हाच प्रकार आमच्या घरी घडायचा.  महिलावर्ग 'फ्री स्टाईल' ने भिंतीचे खड्डे भरून,  सारवून भिंतीला मजबूत करायचे. दिवाळी जवळ येता कामाला गती मिळायची. बालपणी आजच्या सारखे एशियन, बर्जर सारखे विविध तयार पेंट नव्हते की ब्रश नव्हते. मातीच्या भिंतीला चुनखडी कालवून लावल्या जायची. ठराविक भिंतीला अभ्रक लावली जायची. हा रंगरंगोटीचा विभाग आमच्या लहान काकाकडे होता. हिंगोलीच्या शॉपिंग लिस्ट मध्ये 'अभ्रक'खडी,गेरू, इतर रंगाचा समावेश करायचे. ऐका मोठ्या कापडी पिशवीत ती अभ्रक आणि थोडया गारगोट्या टाकून त्या पिशवीला पाणी टाकून सतत तुडवलं जायचं.  तुडवल्यामूळे  अभ्रकच्या पापुद्र्या अगदी बारीक होऊन तिचा चमकणाऱ्या नेलपेंट सारखा पेस्ट तयार व्हायचा. अशी अभ्रक जेंव्हा मातीच्या रुक्ष भिंतीवर चढायची तेंव्हा भिंतीला चारचांद लागायचे. ती चमचम चमकायची. पूर्वी आजच्या सारखी सरसकट भिंत एकाच रंगात न रंगवता खाली साधारण दीड फुटाची लाल रंगीत बॉर्डर मारली जायची. बॉर्डरमूळे ती भिंत जास्तच उठून दिसायची. तागापासून तयार केलेले लहान मोठे 'कुच्चे' वापरून संपूर्ण घराची रंगरंगोटी व्हायची. पेंटर हा प्रकार आम्हाला माहित नव्हता, आम्हीच पेंटर होतो. सर्व रंगाची कामं घरातील करण्याजोगी मंडळी आमच्यासारख्या लहानांना हाताशी धरून पार पाडायची. भिंतीचा वरचा भाग मोठे भाऊ तर  खालचा भाग आम्ही मारायचो. 

भल्या मोठ्या घराच्या खोल्याच्या रंगोटीचं काम लक्ष्मीपूजन दिवसापर्यंत चालायचं. घरासोबतचं मोठी बैठक, पिठाची गिरणीला रंगवावं लागायचं. काही ठिकाणी चुना तर काही ठिकाणी अभ्रक. नंतर नंतर ठराविक रंगाचे डिस्टेम्परचे पॅकेट बाजारात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे रंगवन्याच काम बरंच सोपं झालं.  शेवटी तो लक्ष्मीपूजनाचा दिवस उगवायचा.  या दिवशी छोटे काकाचं आध्यात्म शिगेला पोहचलेलं असायचं.  पोथी पुरानातून त्यांनी चांगले दोहे शोधून काढलेले असायचे.  दिवसभर वाटीमध्ये गडद लाल रंग आणि बारीक कुच्चा घेऊन ते कोणत्या नं कोणत्या खोलीत उंच स्टूलवर उभं राहून दोहे लिहायचे. आज 'कर्फ्यू दिवस' असायचा.  नेहमीप्रमाणे आज आम्ही काकांच्या 'कव्हरेज क्षेत्रा'त येणं टाळायचो. नोकराचं आज काही खरं नसायचं, त्यांचं काकांची बोलणी खानं ठरलेलं असायचं.  चूक झाली की 'बैल बैल, तुझे समजता नही ' ही त्यांची ओरड कायम असायची. आम्ही ती मुकाट ऐकून ते क्षेत्र टाळायचो. हेच आमचं 'बचाव तंत्र' होतं. दुपार होता होता लहान मोठ्या बैठकीसहित सर्व ठिकाणच्या भिंतीवर त्यांचे दोहे लिहून घराला 'अध्यात्मिक टच' लाभायचा. प्रत्येक प्रवेशद्वारावर 'शुभ लाभ' तर चौकटीवरच्या भिंतीवर 'ॐ' किंवा 'श्री' लिहिलं जायचं. 'शुभ-लाभ' चा अर्थ कमविलेलं लाभ किंवा धनाचा शुभ मार्गाने घरात प्रवेश व्हावा , वाईट मार्गाने नको हा त्यामागील अर्थ! भिंतीवर लांबलचक दोहे लिहिले जायचे. सतत वाचून ते आम्हाला मुखोदगत व्हायचे. काहीचा अर्थ स्पष्ट कळायचा तर काही फक्त वाचल्या जायचे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे -

चलो सखी अब जायीये जहाँ बसे ब्रिजराज l
गोरस बेचत हरी मिले एक पंथ दो काज l l 

पद पखारी जलू पान करी आप सहित परिवार l
पितर पारू करी प्रभू हिपूनी मुदित गये लेहूपार ll

राम नाम अंकितग्रह शोभा बरणीन जाय l
गो तुलसीका बंधतर देख हर्ष कपिलाय ll

राम नाम सब कोई कहे दशरथ कहे ना कोय 
एक बार जो दशरथ कहे कोटी बचन फल होय ll

राम नाम की लूट है लुटन वाले लूट l
अंत समय पश्चतायेगा प्राण जायेंगे छुट ll

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |; धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत l अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll

काकांच असं लिहणं चालू असतांना दुसरीकडे आई, काकी, बहिणी महिलामंडळ स्वयंपाक घरात मात्र दिवाळीचं मिष्ठान, पुरणाच गोड जेवण तयार करण्यात गुंग असायचं. लोखंडी कढईमध्ये भलंमोठं पूरनं खदखद तयार व्हायचं. कुरडई, पापड बुंदीचे गरम लाडू सर्व 'याची देही याची डोळा' आम्ही फक्त बघायचो.  स्वयंपाक घरातून पकवानाचा सुगन्ध आणि धुरच धूर बाहेर पडायचा.  खायची परवानगी लक्ष्मीपूजा संपन्न झाल्यानंतर! हा कडक नियम.  यापेक्षा मोठा ताप हा की भूक शमविण्यासाठी त्या दिवशी मुद्दाम भल्यामोठया जर्मलच्या भगोन्यात बेचव उडदाची खिचडी असायची. संध्याकाळपर्यंत ती पांचट खिचडी कडक होऊन तिचे दर्शन सुद्धा नकोसे वाटायचे. खायला काही गोड मागितलं की आमच्या मोठया बहिणी एक तर भगोन्याकडे अंगुलीनिदर्शन करायच्या नाही तर काकांना सांगते म्हणून भिती दाखवायच्या, बसा बोंबलत!

संध्याकाळ होता पूजेच्या ठिकाणी भिंतीवर कमळाचं फूल काढल्या जायचं. बऱ्याचदा हे काम माझ्या वाट्याला यायचं. घरात दिवे-वात्या लावन्याची व पूजेची एकचं गडबड सुरु व्हायची. घरातील सर्व फोटो सहित जुन्या नवीन वह्या जमा केल्या जायच्या. हार तयार केला जायचा.  यातील क्वचित एखादं काम जसेकी हार वगैरे आमचे वडील करायचे. हा त्यांचा प्रांत नव्हता. पूजेच्या ठिकाणी बसलेले कडक काका ऐकामागून ऑर्डर सोडायचे. त्यांचं बोलणं असं होतं कि, बऱ्याचदा त्यांनी काय मागितलं हे आम्हाला नाही कळायचं. आम्ही 'हो समजलं'  म्हणून कटायचो, मग मागे जाऊंनं काकीना चुपचाप विचारायचो 'काकांनी आता काय मागितलं?' अर्थात काकींना त्यांच्या भाषेची सवय झाली होती. तर अशा कर्फ्यू वातावरनात वह्या पुस्तक, खाते वही चोपडी वही यांची पूजा करुन लक्ष्मीपूजन संपन्न व्हायचं. सर्व वडील मंडळीचे पाय पडले जायचे. 

एकीकडे पूजा चालू असतांना आम्हाला मात्र फटाक्याचे वेध लागायचे. फटाके मिळतील या आशेवर सर्व कामं होऊन जायची पण ते फटाके सहजासहजी हाताला लागत नसत.  जेवणाप्रमाणे फटाके सुद्धा पूजेनंतरचं असा ठरलेला नियम होता. थोडक्यात प्रत्येक गोष्टीच्या आड पूजा यायची. पूजा संपली की आता आधी जेवण मग फटाके! हा जरा अतिरेक व्हायचा. मधूनच सर्व देव देवतांना,  आजी-बाबांना नैवेद्य दाखवायला जावं लागायचं.  या सर्व गडबडीत आमचे फटाक्याकडे कुणी लक्ष देत नसे.  पण नंतर फटाके वाटप व्हायचं. पण काही टिकल्याच्या डब्ब्या, सुरसुरी, लवंगी फटाके आणि काळ धुरचं धूर करणारी सापाच्या गोळीवर आमची बोळवण व्हायची. फटाक्यापुढं भूक विसरून आधी फटाके उडवूनच नंतर जेवण करायचो.  फटाके उडवीताना आमच्या आनंदात गावातील ग्रामस्थसुद्धा सामील होऊन दिवाळीचा आनंद घ्यायचे. 

प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी होते.   पण कालांतराने त्या उत्सवात खूपच बदल झालेत. आता ती तुडवनारी अभ्रक नाही की खडी नाही की बॉर्डर नाही.  दहा वर्षात एकदा भिंतीला रंग मिळतो कारण प्रत्येक वर्षी ते शक्य नाही. आता रोजचं पक्वानाचा आनंद मिळत असतांना दिवाळी पक्वाणाचं महत्व नाहीसं झालं. समोर वाढलं तर कुणी खात नाही, बीपी, शुगर, हृदयविकाराची भिती वाटते. रोजचं छान कपडे त्यामुळे नवीन कपड्याचं महत्व राहिलं नाही. दिवाळी खरेदीच्या वस्तू बदलल्या. आता मानसिक सुखा ऐवजी लोकांचा कल दुचाकी, चारचाकी, फ्रिज सारख्या भौतिक सुख देणाऱ्या वस्तूकडे वळला आहे.  समाजाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता ऑनलाईन ऑर्डर करुन  आकाशादीवा हरपोच मिळतो. इलेक्ट्रिसीयन तो लटकवून देतो.  सर्वच रेडिमेड, मग फराळ घरी का करावा? तेही ऑनलाईन ऑर्डर केल्या जातं. काही दिवसानंतर घरासमोर फटाके उडविण्याची गरज पडणारं नाही.  फटाके उडवून देणाऱ्या एजेन्सी उपलब्ध होतील. फक्त मनी ट्रान्सफर केलं कि झालं. डिजिटल तंत्रज्ञान  लोकांचा अस्सल आनंद हिरावून त्यांना आभासी जगात रमविण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.  

सततचे संस्कार अंगात भिनतात किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडतात. बालपणी मनावर झालेले संस्कार वाया जात नाही. सिमेंटच्या भिंतीतूनही एखादं हिरवं रोपटं उगवून बाहेर यावं, असे कधी ना कधी ते बाहेर पडतातचं. आजही आम्ही दिवाळी  तेव्हड्याच उत्सवाने साजरी करतोच. शक्य तेव्हढे नियमाचे पालन करतोच. मागील काही दिवसात मी पेंटच्या रिकाम्या डब्ब्याना छानसा रंग देऊन सजवलं. त्यावर काय लिहावं म्हणून गुगलवरून काही छानसे संस्कृत सुभाषित शोधून काढले, ते लिहिले. शेवटी 'वळणाचं पाणी वळनावरचं जातं' हे ही तेव्हढंच खरं. 

बाकी काही नाही 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!' साजरी करा दिवाळी. हार्दिक शुभेच्छा.

©प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह. मू. छ. संभाजीनगर, 9822108775







Saturday, 11 October 2025

उडी बाबा! कोलकत्ता




पर्यटन हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. जग जाणून घेण्यासाठी पर्यटनाशिवाय पर्याय नाही. पूर्वी वृद्ध अवस्थेत गेलेली व्यक्ती हिमालय प्रवासासाठी जायची. असे म्हणतात, संपूर्ण आयुष्य चढउत्ताराशी सामना करत जीवन जगलेली लोकं शेवटी कौटुंबिक कटकटीपासून मुक्त होउन मानसिक समाधानासाठी हिमालय गाठत. आजही बोलाचालीत आपण ‘एकदा का हे झालं की जातो मी हिमालयाला’ अशी म्हण ऐकावयास मिळते. कालांतराने परिस्थिती बदलली. समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने हल्ली बरीच मंडली वर्षातून एकदा का होईना पर्यटननिम्मातेने घराबाहेर पडतात. पर्यटनाचे अनेक कारणे असू शकतात. काही देव देव करण्यासाठी, कुणी एतिहासिक स्थळ बघण्यासाठी, कुणी गडकिल्ले बघण्यासाठी तर कुणी दुसऱ्या ठिकाणाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन करत असतात. हल्ली गुगुल चाटजीपीटीमुळे सर्व नियोजित ठिकाणाची माहिती काही क्लिकवर उपलब्ध असते. हल्ली ओनलाईन टूर गाईड, हॉटेल बुकिंग आणि सर्वच गोष्टीच सहज नियोजन होत असल्यामुळे पर्यटन करणे अगदी सोपं झालं आहे. सततच्या कटकटीतून काही दिवस दूर होवून मुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनशिवाय दुसरा पर्याय नाही.  

बऱ्याच गोष्टीला योग जुळून यावा लागतो. असाच योग कलकत्ता फिरण्याचा सहज चालून आला. निमित्त होतं मुलाच्या पदवीदान समारंभाचा. एकेकाळी देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या या शहराबद्दल बरंच वाचून होतो. पण कधी फिरण्याचा योग येईल असं कधी वाटलं नाही. पश्चिम बंगाल प्रांतात कम्युनिस्ट पक्षाचं सरकार तर केंद्रात बीजेपीचं सरकार त्यामुळे समाज माध्यमात कोलकत्ताबद्दल बराच द्वेष मी वाचून होतो. अर्थात केंद्रीय शासनाची सुपारी घेतल्याप्रमाणे गोदी मिडिया कोलकत्ताबद्दल सतत दुष्प्रचार करत आला आहे. प्रत्यक्ष कोलकत्ता शहर आणि येथील परिस्थिती बघून ‘दुध का दुध आणि पाणी का पाणी’ होणारा होतं. बऱ्याच वर्षापूर्वी काश्मीरबद्दल पाच पुस्तकं वाचल्यानंतर मी स्वत: काश्मीर फिरून आलो. तेथील लोकांशी सवांद साधला. फक्त गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम असे अतिसुंदर प्रसिद्ध पर्यटन स्थळ न फिरता चक्क तेथील एका गावात जाऊन लोकांशी संवाद साधला. त्यामुळे काश्मीर विषयी बरेच गैरसमज दूर झाले. काश्मीरकडे आणि फेक मिडियाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोण बदलला. प्रत्यक्ष परिस्थितीत आणि व्हाटस्प विद्यापीठाच्या माहितीत किती फरक आहे हे कळाल. समाज माध्यमातील फेक पोस्ट किती हानिकारक आहे हे कळालं. शिवाय दरबारी लेखक स्वताच्या स्वामीला खुश करण्यासाठी कोणत्या स्ताराला जाऊ शकतात, कसा दुष्प्रचार करू शकतात, हे सुद्धा माहित पडलं.

मुंबई कोलकत्ता हवाई प्रवासात आपण ‘बाबूमोशाय’ प्रांतात चाललोय याची चाहूल लागली. एअरपोर्ट डिपारचर गेटजवळ बाजूच्या सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांच ‘बोंगाली’ भाषेतील संवाद मी एकत होतो. बंगाली भाषा समजण्यासाठी अगदी सोपी. त्यातील किमान तीस टक्के शब्द मराठी भाषेतील असतात. कोठाय, भीषण , खूप, जोल हे मराठीसारखेच. फरक एवढाच की प्रत्येक शब्दाला ओ जोडायचा असतो. अमित च्या जागी ओमित आणि गणेशच्या जागी गोनेश. बस्स एवढाच फरक. तेव्हड्यात एक व्यक्ती काळ्या पठाणी झबल्यामध्ये झापझाप माझ्या समोरून चालत गेला. कुणी तरी व्हीआयपी सारखा तो वाटला. सोबत त्यांचं लगेज घेवून इंडिगोचे अधिकारी होते. त्यावरून निश्चितच तो व्हीआयपी असणार याचा अंदाज आला. नंतर कळालं तो क्रिकेटर युसुफ पठाण होता. त्याला आमच्यासोबत न बसवता ईन्डीगो अधिकारी दुसरीकडे घेवून गेले. मला तो फालतूपणा आवडला नाही. पण असो. अर्थात विमानात तो बिजनेस क्लासमध्ये आणि मी इकोनोमी क्लासमध्ये. प्रवासात कोणत्या दर्जाचे प्रवासी प्रवास करत आहेत यावरून डेस्टिनच्या ठिकाणाचा अंदाज आपण बांधु शकतो. हवाई प्रवासात बरेच सूटबुटातील प्रवासी होते. बहुदा ते कॉर्पोरेट क्षेत्राचे उच्च पद्द्स्त अधिकारी असावेत.

दोन तासाची फ्लाईट लँड झाल्यानंतर लगेज घेवून मी बाहेर आलो. एअरपोर्टच्या बाहेर पडताच माझी नजर इकडे तिकडे फिरत होती. हे नवीन शहर कसं वेगळ आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. असं म्हणतात की आपण डोळे उघडे ठेवून या जगाकडे बघितलं तर आपल्याला बरच काही शिकायला मिळतं. भारत देशात कोणत्याही एअरपोर्टच्या बाहेर जा, रिक्षावाले, भाड्याच्या कारवाले तुमच्या सेवेत हजर असतात. आपली फसवणूक होऊ नये म्हणून मी आधीच ओला बुक केली होती. ओलाशी संबंधित गाड्या ह्या तुलनेने स्वच्छ असतात असा माझा समज होता. पण तो समज येथे चुकीचा निघाला. गाडी बरीच अस्वछ होती. खाकी युनिफोर्म नेसलेला चालकसुद्धा अस्वछ आणि त्याने तोंडात पान कोंबलेला होता. पान खात खात तो माझ्याशी संवाद करत होता, ‘किधोर जाना है?’. मधूनच तो खिडकीतून पचकन थूकत होता. आम्ही दोघे हिंदी या समान भाषेत बोलत होतो. दोन किलोमीटर गाडी चालवताच त्याने मला खुणवत गाडी उभी करतोय म्हणून सांगितलं. मला काही कळण्याआधी तो पटकन बाजूला जाऊन लघवी करून आला. मी या सर्व गोष्टीच निरीक्षण करत होतो. विचार केला की याला महाशयाला लघवी करायची होती तर तो एअरपोर्टवर का गेला नाही? पान खाऊन बाहेर थुंकणे हे येथे एव्हढ सामान्य आहे. काही वेळात त्याने मला सोल्टलेक परिसरातील आयआयटी खडकपूरच्या होस्टेलवर आणून सोडलं.

आयआयटी खडकपूर येथून साधारण १०० किमी दूर आहे. कोलकत्ता येथे सर्व सुविधा असल्यामुळे आयआयटीने येथे एक छोटसं होस्टेल ठेवल आहे. व्हिजिटिंग प्रोफेसर किंवा बाहेर देशातून येणार व्हिजिटर, विध्यार्थ्याना इलाजासाठी, मुकामासाठी या होस्टेलचा उपयोग होतो. शिवाय विध्यार्थीनचे पालक या ठिकाणी थांबू शकतात. तसं माझं काम आयआयएम कोलकत्ता येथे होतं. पण ते ठिकाण खूपच दूर असल्याने मी आयआयटी विध्यार्थ्यांचा नातलग म्हणून येथे थांबनार होतो.

होस्टेलवर फ्रेश होताच मी शहर फिरून घेण्यासाठी बाहेर पडलो. संध्याकाळचे साडे पाच वाजले होते. मुद्दामहून भाड्याची कार न घेता मी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याच ठरवलं. मुंबईत मी शेकडो वेळेस बस, डबलडेकर बसने प्रवास केला होता. कोलकत्ता शहर मला बरचं मुंबईसारखं वाटलं. थोडी गरीब मुंबई. बसमध्ये चढताच मला जागा मिळाली. बसचा कंडकटर तिकीट फाडत अगदी पुढे गेलेला होता. पाठीमागे प्रवासी चढताच तो मागे आला. त्याच्या डाव्या हाताच्या बोटामध्ये वेगवेगळ्या चलनी नोटा खूपसलेल्या होत्या. चिल्लर मात्र खिशात होती. सांगितलेल्या ठिकाणासाठी त्याने रु १३/- देण्यास सांगितले. एक छोटसं बोटाएव्हड रुंद चिरकुट तिकीट त्याने माझ्या हातात दिलं. कदाचित जास्त पेपर वापरून वृक्षतोड नको यासाठी तिकिटाचा आकार लहान केलेला असावा. तिकीट काढल्यानंतर मला कळलं की माझा स्टोप बराच पुढ आहे आणि मी त्या अलीकडच्या स्टोपचं तिकीट काढलं. त्यावर बाजूचा प्रवासी म्हणाला सर गरज नाही. . तेरा रुपयात तुम्ही त्याही पुढे प्रवास करू शकता. मला खूपच आश्चर्य वाटलं. स्टोप येताच ड्रायवरने आहे त्याचं लेनमध्ये बस थांबविली. त्याने बस रस्तेच्या कडेला सुद्धा घेतली नाही, हे विशेष. उतरणारे भरभर खाली उतरले. मीही त्यात शामिल झालो. बाहेर पडताच मी कोलकोत्याच्या मार्केटकडे बघत होतो. आपल्याकडे कोणतीही वस्तू घ्या, किंवा भाजीसुद्धा त्याची किमत पाचच्या पटीणे असते. मेथीची जुडी स्वस्त असेल तर पाचला, किमत वाढली तर सरळ दहा किंवा पुढे पंधरा होते. येथे मात्र तिकीट तेरा रुपये, चहा सहा रुपये असे प्रकार मी बघितले. मार्केटमधील वस्तू सुद्धा आपल्या तुलनेने बरयाच स्वस्थ होत्या. दोनशे रुपयात मी पोट भर सुकी फिश खाली. त्यासाठी इकडे मला किमान पाच-सहाशे रुपये मोजावे लागले असते. कपड्यांची आणि जीवन उपयोगी बऱ्याच वस्तूंची छोटी छोटी दुकाने मी येथे पाहिली आणि त्याचे भाव जाणून घेतले.

मार्केटच्या थोडे पुढे जाताच त्या ठिकाणी युवा वर्गाची प्रचंड गर्दी दिसली. क्रिकेट युनिफोर्ममधेय हजारो युवकांचे टोळके इकडे तिकडे भटकत होते. सगळीकडे गोंगाट होता. कित्येकांनी आपल्या तोंडावर हातावर भारत देशाचा तिरंगा रंगविला होता. फुटपाथवर अति कमी किमतीत टी शर्टसं विकले जात होते. त्यावर देशाच्या झेंड्याचे चिन्ह होते. विचारल्यानंतर कळालं की येथे बाजूलाच इडन गार्डन स्टेडियम आहे. आणि तिथे ‘डे अंड नाईट’ क्रिकेटचा सामना चालू आहे. सर्वत्र गोंगाट होता. त्यामुळेच मुंबई – कोलकत्ता प्रवासात मला विमानात युसुफ पठाण दिसला होता. कदाचित तो हा सामना बघण्यासाठी किंवा कॉमेंट्री करण्यासाठी आला असावा. आता मी थकलो होतो. भाड्याची कार घेवून मी परत होस्टेला परत आलो. इडन गार्डन ते माझं होस्टेल बरच लांब होतं. पण ठरविलेलं भाड बरच कमी होतं. कारच्या चालकाशी मी सतत प्रश्न विचारत होतो. त्यामुळे माझ्या ज्ञानात बरीच भर पडत होती. तुम्ही एका दिवसात साधारण किती कमावता? घर कसं चालतं? त्यांच्या म्हणण्यानुसार कोलकत्तासारख्या मेट्रो शहरात फक्त अठरा रुपयात एका व्यक्तीचं पोट भरतं. कसे तर मासे आणि भात खाऊन. दिवसात शंभर दीडशे जरी मिळाले तरी आम्हाला खूप होतात. तेव्हड्यात कुटुंबाच धकून जातं, असं तो म्हणाला. बिहार प्रांत या ठिकाणापासून जवळ त्यामुळे मुंबई प्रमाणे कोलकतामध्ये बरेच कार चालक हे बिहारी दिसले. येथिल स्वस्ताई बघून आपण मुंबई, पुणे आणि कोलकत्ता शहराची तुलना करून शकतो.

होस्टेलवर पोहोचताच तेथील सेवकानी उद्या ब्रेकफास्टमध्ये आपण काय खाणार? हे आधीच विचारून ठेवलं. दुसऱ्या दिवशी वीस रुपयात भरपूर पोहे, दोन अंडी आणि एक केळ वाढण्यात आलं. त्यासोबत चहासुद्धा. यापेक्षा स्वस्थ अजून काय असू शकतं. ‘दाढीसाठी येथे जवळ सलून आहे का?’ यावर त्या सेवकाने डावीकडे थोड्या अंतरावर एक झाड आहे. तेथे एक सलूनवाला खुर्ची लावतो तेथे तुम्ही दाढी करू शकता. दहा वाजता तो न्हावी हजर झाला. त्याने वीस सुपयात दाढी आणि लगेच थोडी मसाजसुद्धा. येतांना मी एका चौकात थांबलो. येथे चौकाला आयलंड म्हणतात. थोड्या वेळात पांढरया साड्या नेसलेल्या दोन जेष्ठ महिला आल्या. त्यांच्याकडे वृतपत्र होती आणि सोबत एक डिंकाचा डब्बा घेतलेला सहकारी होता. त्या चौकात एक मोठा लोखंडी स्टेन्ड होता. त्यावर त्यांनी डिंक लावून त्यावर लगेच वृतपत्राची पान चिपकिवली आणि ते निघून गेलेत. आजूबाजूच्या लोकांनी लगेच ते चिपकिवलेलं वृतपत्र वाचायला सुरुवात केली. मला ती कल्पना खूपच आवडली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकाना वृतपत्र विकत घेण्याचा खर्च वाचला. शिवाय रहदारीची जनता चालता चालता ते वृतपत्र वाचू शकता.

दुसऱ्या दिवशी मुलासोबत मी विक्टोरिया मेमोरियल बघून घेतला. इंग्र्जानी भारतात इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापना कोलकत्ता येथेच केली. त्यांच्या पावूनखुणा येथे स्पष्ट दिसतात. विक्टोरिया मेमोरियल येथे लॉर्ड कर्झनचा भव्य पुतळा आहे. येथील वास्तूचा नमुना बघून पूर्वी येथे इंग्रजांनी राज केल आहे हे स्पष्ट जाणवतं. रस्त्यावर फिरतांना इंग्रजांच्या काळातील जुन्या बऱ्याच इमारती येथे दिसतात. हे शहर बरचसं मुंबईसारख भासतं. रस्त्याची रचनासुद्धा मुंबईसारखीच आहे. एकेकाळी अख्ख बॉलीवूडचं केंद्र कोलकत्ता होतं. त्यामुळेच जुन्या चित्रपटात सर्व कथामध्ये कोलकत्ता शहराची झलक बघायला मिळते. या ठिकाणचं विशेष म्हणजे – अम्बेसेडर कार. आपल्याकडे हिंदुस्तान कंपनीची अम्बेसेडर कार बघायला मिळत नाही. सर्व इतिहास जमा झालेल्या आहेत. क्वचित वर्षातून एखादी दिसते. कारण ते तंत्रज्ञान खूपच जून झालं आहे. सगळीकडे एआय, इंटरनेटनी सज्ज कार उपलब्ध आहे. मॉडर्न कारमध्ये नवीन नवीन फिचर उपलब्ध आहेत. पण कोलकत्ता येथे आजही ही पिवळ्या रंगाची अम्बेसेडर कार रस्त्यावर बिनधास्त फिरतांना दिसते. या कारची संख्या खूपच जास्त असल्यामुळे कदाचित इतर कंपन्या त्यांना सुटे भाग तयार करून देत असतील कारण ह्या कारच उत्पादन कधीच थांबलेलं आहे. काही दिवसापूर्वी अम्बेसेडर कार नवीन रुपात पुन्हा अवतरणार आहे असं मी कुठ तरी वाचल्यासारखं आठवतं. असो.

कोलकत्ता येथील ट्रामबद्दल मी बरचं आयकून होतो पण त्यामध्ये बसण्याचा योग आला नाही. आदल्या रात्री मी या ट्रामबद्दल विचारला असता ठराविक मार्गावर ठराविक वेळी ती चालते असं ऐकल. पण त्या ट्रामचे लोखंडी ट्रेक मला बऱ्याच जागी दिसल्या.  

विक्टोरिया मेमोरियल बघून नंतर आम्ही ‘सायन्स सिटी’ बघण्यासाठी गेलो. विज्ञान तंत्रज्ञान जाणून घेणाऱ्याना कोलकत्ता येथील सायन्स सिटी नक्कीच आवडेल. भारतीय अंतरीक्ष प्रवास, प्रकाशाचा परावर्तन, लोंगीट्युडीनल वेव, ट्रान्सवर्स वेव सारखे शेकडो वैज्ञानिक प्रयोगाचा येथे उलगडा करून दाखविला आहे. वोल्व्हकॅनो कसा तयार होतो इत्यादी. तीन तास येथील विज्ञानाचे प्रयोग बघून मी परत होस्टेलला परतलो. कोलकत्त्यामध्ये फिरतांना १९९० च्या मुंबईत फिरल्यासारखा भास होतो. दक्षिण मुंबईसारखे येथील रस्ते, रस्त्याच्या कडेच्या उंचच उंच इमारती. त्याचं आर्किटेकचर हे बरच मुंबईसारख वाटत. एवढचं नाही तर येथील वातावरणसुद्धा मुंबईसारख दमट वाटलं. फक्त फरक एवढाच की येथे मुंबईसारखी गर्दी आणि धावपळ करत फिरणारी जनता मात्र दिसत नाही.

आपल्याकडे हल्ली ब्रिज तयार होतात आणि उद्घाटनापूर्वी किंवा काही दिवसांनी ते पडतात. अर्थात त्यात चूक ब्रिज तयार करणाऱ्यांची नसते. हल्ली धरतीतून निघणार खनिज मटेरियल, वाळू, सिमेंटचा दर्जा बरोबर नसावा, असो. पण शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेला हावरा ब्रिज आजही दिमाखात उभा आहे. या लोखंडी पुलाबद्दल मी बरच वाचलं होत. किती तरी लिखाणामध्ये मी या ब्रिजचा उलेख केलेला आहे. त्यामुळे सरळ होस्टेलला जाता टक्सी चालकाला गाडी हावरा ब्रिजवरून घेण्यास सांगितली. या ब्रिज लोखंडाचा. खरं तर सतत वाहणाऱ्या हुगळी नदीच्या पाण्यामुळे लोखंड गंजून या ब्रिजचं नुकसान व्हायला पाहिजे होतं पण आजही तो ब्रिज शाबूत आहे आणि सतत त्यावरून वाहतूक होत असते. कोलकत्ता आणि हावरा या दोन शहराला जोडण्यासाठी इंग्रजांनी हा पूल तयार केला होता. या पुलाची विशेषता अशी हा पूल उभा करण्यासाठी कोणत्याही नट किंवा बोल्ट वापरल्या गेलं नाही. सर्व जोडण्या ह्या रिबीट लावून केलेल्या आहेत. वर्ष १८७१ मध्ये इंग्रजांनी हा पूल तयार करण्याचा कायदा तयार केला. हा पूलचं डिजाइन सर ब्रेडफोर्ड लेस्ली या इंग्रज डिजाईनर केलं होत. हा पूल १५२८ फुट लांब आणि रुंदीला ६२ फुट आहे. १९०६ मध्ये हावडा स्टेशन तयार झाल्यानंतर आधीचा पूल तात्पुर्त्ता ब्रिजच्या जागी न्विईन मोठा पूल तयार करण्यात आला. दुसरी विशेष बाब अशी की या पुलासाठी लागणार लोखंड प्रसिद्ध उद्योगपती टाटा यांनी पुरवलं होतं. तब्बल २५ कोटी खर्च करून तयार झालेल्या हावडा ब्रिजचं काम १९४२ मध्ये पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी सज्ज झाला. सन १९६५ या ब्रिजला रविंद सेतू असं नाव देण्यात आलं पण आजही तो हावरा ब्रिज नावानेच ओळखला जातो. हा ब्रिज एव्हढा प्रसिद्ध आहे कि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या नावानी एक चित्रपट सुद्धा आहे.       

माझा एक अत्येंत जवळचा मित्र नितीन राठी, माझा कॉलेज ज्युनियर सध्या कोलकत्ता येथे स्थायिक झाला आहे. बरीच वर्ष कोलकत्त्यामध्ये काढल्यामुळे तो अस्खल बंगाली भाषा बोलतो. करियरच्या सुरुवातीची बरीच वर्ष त्यांने मुंबईला काढली. मार्केटीगमध्ये असल्यामुळे तो सतत फिरतीवर असायचा. त्यामुळे ‘जीवाची मुंबई’ काय असते हे त्याने चांगल अनुभवल होतं. नोकरी बदलताना त्याला कोलकत्ता हेड ऑफिस मिळालं आणि तो तिथे जो रुळला तो कायमचाच. आता त्याला मुंबई नकोशी वाटत्ते. कारण विचारलं तर त्याचं म्हणन पडतं – ज्या लक्झुरुयीस फ्लट मध्ये मी राहतो तसा मुंबईला घ्यायचा झाल्यास मला चार करोड रुपये खर्च करावे लागतील. आणि तो फ्लटसुद्धा मुंबईपासून जवळ नसणार. मग कशाला उगीच जीवाची मुंबई करायची. हवाई प्रवासाने कोलकत्ता ते नागपूर फक्त दोन तास लागतात. मला त्याचं म्हणन पटलं. मी सुद्धा एक दोन नाही तर तब्बल साडे सहा वर्ष जीवाची मुंबई करून घेतली आहे. 

उन्हाचा त्रास टाळण्यासाठी जेव्हड जमेल तेव्हडा कोलकत्ता मी एक्सप्लोर केला. दिवसा कमी आणि रात्री जास्त फिरलो. कोलकत्ता येथील रोसगुल्ला जरा जास्तच प्रसिद्ध आहे. जागोजागी असलेल्या मिठाइच्या दुकानात रोसगुल्ला, सोन्देश, कलाकन प्रसिद्ध आहे. हे तिन्ही मिष्टान दुधाला फोडूनचं तयार केलेले असतात. आपल्याकडे हा प्रकार तेव्हडा प्रसिद्ध नाही. संध्याकाळी आयआयएम कोलकत्ता येथे पदवीदान समारंभला मला उपस्थित व्हायचे होते. दुपारी चारलाच मी नियोजित ठिकाणी पोहचलो. मुलाच्या निमित्ताने का होईना आयआयएमसारख्या देशाच्या उच्च संस्थेचा पदवीदान सोहळा कसा पार पडतो हे मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहू शकलो. देशभरातील पालक मंडली या अद्भुत सोहळ्याला जातीने हजर होती. बऱ्याच सभागृहात फिरतांना आणि भोजन करतांना बऱ्याच विध्यार्थ्यांच्या पालकाशी मी संवाद साधला. योग असा की मी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे माझ्या शेजारी बसलेलं कुटुंब हे जैस्वाल निघालं. रात्री परत होस्टेल गाठलं.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. दर दोन तीनशे किलोमीटरवर येथील संस्कृती बदलते. संस्कृती म्हणट की त्यात राहणीमानासह खानपान आलच. कोलकत्त्याच्या खानपान विषयी सांगायचं झाल्यास येथे सर्व मांसाहारी व्यंजनामध्ये मांसासोबतच बटाटा म्हणजे आलू असतोच. होस्टेलच्या जेवणात तसेच आयआयएम कोलकत्त्याच्या मांसाहारी डिशमध्ये मला बटाटा दिसलाच. हा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता. देशात कोणत्याही राज्यात फिरण्यासाठी गेलो असता तेथील प्रेक्षनिय, एतेहासिक आणि अध्यात्मिक स्थळाऐवजी तेथील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बघण्यात मला जास्त आनंद होतो. एकंदरीत कोलकत्ता शहर इतर शहराच्या तुलनेत मला खूपच स्वस्त वाटलं. राहण्यासाठी, फिरण्यासाठी, खाण्यासाठी हे शहर मला जास्त खर्चिक वाटलं नाही. परंतु प्रसारमाध्यमातील भाटांनी या राज्य आणि शहराविषयी अपप्रचार करून या शहराची प्रतिमा मलीन करण्याची कोणतीही कसर सोडली नाही हे निश्चित. अर्थात त्यामागे राजकीय पक्षाचा स्वार्थ आहेच.

 © प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह. मू. छ संभाजीनगर, 9822108775

----------------------------

 

 

 

 


Tuesday, 16 September 2025

कॉर्पोरेट हॉस्पिटलचा विळखा


तीन वर्षांपूर्वीची घटना. डेंग्यूने आजारी मुलीच्या मृत्युची बातमी  कदाचित सर्वानी वाचलीच असावी. आजारी ७ वर्षाच्या मुलीचे पालक तिला दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम येथील पंच तारांकित कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एडमिट करतात. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर ती  दगावते.  हॉस्पिटलच नाव खराब होवू नये म्हणून तिला त्वरित घरी घेवून जा असे सांगण्यात येतं. सामान्य अशा 'डेंग्यू' आजाराचं १८ लाखाचं बिल त्या पालकांच्या हातात थोपवलं जातं. कळस म्हणजे ज्या शेवटच्या कपड्यात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो त्याचेसुद्धा बिल पालकाकडून वसूल केल्या जातं! विशेष म्हणजे हे बिल एकदम बरोबर कसं याचं सविस्तर विश्लेषण 'कॉर्पोरेट हॉस्पिटल' चा स्टाफ 20 लिखित पानात पटवून देतं!

या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघनं साहजिक होतं. सुपरसॉनिक गतीने ही बातमी जेंव्हा समाज माध्यमामधे व्हायरल झाली त्यामुळे आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांना चौकशीचे आदेश दयावे लागले. कैंसर, एखाद्या अपरीचित दुर्धर आजार, मल्टीपल सर्जरी किंवा दीर्घ काळासाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरी एकंदरित बिल एव्हड़ होवू शकत नाही, मग डेंग्यूसारख्या सामान्य आजाराच एव्हड़ अफाट बिल जनतेला खुप जास्त वाटनं साहजिक. आज गांव-तालुका पातळीवरील सामान्य दवाखान्यात शेकडो डेंग्यु रुग्ण उपचार घेताना आणि बरे होताना आपण पाहतो. क्वचितच, जेंव्हा पेशन्टला व्हेंटीलेटर गरज पड़ते तेंव्हा रुग्ण शहरातील मोठ्या किंवा शासकीय हॉस्पिटलमधे जातात किंवा त्याला 'रेफर' केल्या जातं. पण तेथील खर्च एव्हड़ झालेलं ऐकिवात नाही. विशेष म्हणजे फोर्टिसच्या बिलामधे वापरल्या गेलेल्या कन्झुमेबल्स आणि त्याचे भाव बघून कोणाचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. चौकशी अंती असं आढळलं कि या बिलामधील सर्वात मोठा हिस्सा हा 'सर्जीकल मटेरियल' चा होता. ज्यामधे एकूण ६६० डिस्पोजेबल इंजेक्शन, २७७६ हैण्डग्लोवचा खर्ज जोडण्यात आला होता. एका ₹१३/-च्या ग्लुकोस्ट्रीपसाठी त्या पालकाकडून ₹२००/- चार्ज घेण्यात आले होते.

यमो हरति प्रणान्‌, वैद्य प्राणन्‌धनानिच । सुभाषितावरून  वैद्यकीय व्यवसायावरील टीका नवीन नाही.  परंतु मागील काही दिवसात डॉक्टरावर होणाऱ्या टिका वाढत्या असून जीव घेण्या हल्ल्यानी डॉक्टर मंडली त्रस्त झाली आहेत. समाजात डॉक्टरप्रमाणे इतरही व्यवसायिक,उद्योजक किंवा राजकारणी आपन बघतो. फक्त दोन निवडणुकी दरम्यान त्यांची कमाई कितीतरी पटीने वाढलेली आपण वाचतो पण त्यांच्यावर लोकांनी हल्ले केले असे कुठेच ऐकीवात नाही पण डॉक्टर म्हंटले कि 'एक सॉफ्ट टारगेट'! रोज एक तरी बातमी वर्तमानपत्रात वाचावयास मिळते. आधीच अशा घटनेमुळे त्रस्त, अडचणीत आणि धाकधुकीत असलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाचे हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरांसाठी फोर्टिसची बातमी ऐकून 'भित्यापाठी वाघोबा' अशी स्थिति झाली.
आज मुम्बई दिल्लीसारख्या मेट्रो शहरामधे नोकरीस असलेल्या शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील नोकरवर्गाना भरपूर पगार, भत्ते, मेडिकलसुविधा आणि आरोग्यविमा इ. मिळतो. तसेच झपाट्याने वाढणाऱ्या आयटी क्षेत्रात काम करणारी सॉफ्टवेअर मण्डळी भरपूर मोठ्या पैकेजवर काम करत असते. प्रत्येक वस्तु ब्रैंडेड घेणारा पैकेजवाला हा नोकरवर्ग किरकोळ आजरासाठीसुद्धा कोर्पोरेट हॉस्पिटलमधे भरती होतात. आपल्या परिसरातील छोट्या हॉस्पिटल नर्सिंग होममधे इलाज होत असतानाही हा वर्ग एक ब्रेंड म्हणून कॉर्पोरेट हॉस्पिटलकड़ेच आकर्षित होतो. एकच छताखाली सर्व सुविधा,  'कैशलेस हॉस्पिटलायझेशन', राजीव गांधी योजना, महात्मा फुले योजनेमूळे पैशे भरायची गरज पडत नाही. पण अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमधे त्यांच्या आजारावर इलाज करणारे डॉक्टरा निष्णात आहेत कि नाही याचीही त्यांना कल्पना नसते. 

जनतेचा ओढा शहराकडे जास्त त्यामुळे आज शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच शहरी खानपान आणि प्रदूषणामुळे रुग्णाचे प्रमाण खेड्यापेक्षा शहरात जास्त त्यामुळे हेल्थकेयर इंडस्ट्रीला शहरात खुप डिमांड आहे. अजुन एक नफाखोरीचा उद्योग म्हणून प्रत्येक शहरात कितीतरी कॉर्पोरेट हाउस चैरिटी आणि समाजसेवेच्या नावाखाली हॉस्पिटल सुरु करत आहेत. ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचं कामकाज एखादया 'फाइव स्टार' व्यवसायिक हॉटेलसारखं असतं. ज्यामधे वेगवेगळे मैनेजमेंट डिपार्टमेंट आणि मोठा स्टाफ असतो ज्यांचा हॉस्पिटलला जास्तीत जास्त नफा कमवून देणे हाच मूळ हेतु असतो. कॉर्पोरेट म्हंटल तर तेथे खाजगी कंपनीचे सर्व नियम लागू पडतात. जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांच्या हाताखाली वेगवेगळे जनरल मैनेजर, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेप्यूटी मेनेजर आणि स्टाफ असा अफाट पसारा असतो. मग त्यांचा पगार, भत्ते, कमिशन आणि इतर खर्च एव्हड़ा असतो कि हॉस्पिटलची गाड़ी सुरळीत चालून भरपूर नफा व्हावा म्हणून एकीकडे जास्तीत जास्त कॉस्ट कटिंग आणि दुसरीकडे पेशंटचे 'अफाट बिल' अशी 'नफेखोरीची योजना' असते. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी दिलेलं टारगेट पूर्ण करणारे गल्लेलठ पगार असणारे 'एमबीए स्मार्ट मेनेजर' ची गरज असते. कदाचित याच कारणाने बऱ्याच नॉन-मेडिको स्टाफचा पगार अशा हॉस्पिटलमधे डॉक्टरापेक्षा जास्त असतो. अशा हॉस्पिटलचा प्रभावी 'मार्केटिंग व पब्लिसिटी' डिपार्टमेंट असतो ज्याना मंथली ठराविक पेशंट आणन्याचं टारगेट, कमीशन दिल्या जात. जवळ जवळ सर्वच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही धनाड्य आणि कोणत्यानं कोणत्या राजकिय पक्षाशी जवळीक असलेल्या उद्योजकाची आहेत. 'सेवा पेक्षा मेवा प्रिय' असलेल्या या उद्योजकात रुग्णसेवा ही फक्त तोंडाला लावण्यापूरती किंवा कागदावर दाखविण्यापुरती असते. 

प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल हे एक चैरिटेबल ट्रस्ट आणि 'रिसर्च सेंटर'ही असतात. गरीब रुग्णासाठी काही बेड येथे राखीव असावित, त्यांना कमी दरात सुविधा मिळावी तसेच मेडिकल क्षेत्रात या रिसर्च सेंटरनी नवनवीन संशोधन करावित अशी सरकारची अपेक्षा असते. पण तसे काही संशोधन किंवा प्रयोग होताना दिसत नाहीत कदाचित या उदासीनतेमुळे वैद्यकिय संशोधनात आपण इतर पाश्चात्य देशाच्या तुलनेत बरेच मागे आहोत. तसेच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही एक चैरिटेबल ट्रस्ट असते आणि नियमाप्रमाने कॉरपोरेट होस्पिटलची काही बेड गरीब पेशंटसाठी राखीव ठेवावे लागते, पण प्रत्यक्षात हे सर्व कागदावर दाखवले जाते. आज किती कॉर्पोरेट हॉस्पिटल हा नियम पाळतात? दूसरा मुद्दा असा की हॉस्पिटल जरी चैरिटेबल असेल तरी तेथील मेडिकल आणि सर्जीकल स्टोरला हे चैरिटीचे नियम लागू होत नाहीत. आणि हॉस्पिटलच्या एकन्दरीत बिलात मेडिकल, डिस्पोसजेबल, सर्जिकल आणि शेवटी टैक्सचा खुप मोठा वाटा असतो. मग १५ दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन मधे २७७६ हैण्डग्लोज, ६६० सिरिंज वापरले जाते. हे किंवा अशी ओषध आणि सर्जीकल अतिशय घासाघिस करून कमीत कमी दरात मोठ्या फार्मासूटिकल किंवा सर्जीकल कम्पन्याकडून खरेदी केली जातात. त्या मोठ्या खरेदीवर मिळनारी इतर 'स्किम'चा हिशोब लावला तर ज्या ग्लुकोस्ट्रिप साठी ₹200/- हॉस्पिटल चार्ज करतात ती त्यांना फक्त ₹ 13/-ला पड़ते! अशा प्रकारे रुग्णाला चार्ज करताना त्याची किंमत अवाच्या सव्वा लावली जाते. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पेशंटशी व्यक्तिगत सम्बन्ध नसते किंवा सम्बन्ध ठेवायची गरज नसते. त्यामुळे तो पेशंट गरीब आहे का आमिर याच्याशी त्यांचं काही देणेघेणे नसते. त्यामुळे बऱ्याचदा एकाच पेशन्टला किती तरी वेगवेगळे डॉक्टर बघून बिल वाढवत जातात, नको त्या टेस्ट, इन्वेस्टिगेशन सांगितले जाते आणि कन्झुमेबलच बिल चेपल्या जाते. उदा. एखाद्या पेशंटचा पाय दुखत असेल तर त्यास फिजिशियन,न्यूरो फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन विजिट देत बसतात. मग प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन, इन्वेस्टिगेशन आणि औषधि, कन्झुमेबल यामुळे बिल वाढत जातं. त्यातच पेशंट मेडिक्लेम पॉलिसीधारक असेल तर मग बघायची सोय नाही!

आता मुळ मुद्दा. 18 लाखाच्या या कॉर्पोरेट बिलामधे सर्व खर्च वजा जाता प्रत्येक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टराना फिस म्हणून किती रूपये मिळाले असतील? अर्थात इतर खर्चाच्या तुलनेत ही रक्कम खुपचं कमी असते. मग असे असताना प्रत्यक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राची का बदनामी व्हावी? ही फाइव स्टार हॉस्पिटल्स पेशन्टला पद्धतशिर लूटतात आणि बदनामी मात्र डॉक्टर आणि सम्पूर्ण वैद्यकिय क्षेत्राची होते. मग सर्वच डॉक्टरावर टिकेची झोड़ उड़ते. डॉक्टरविरुद्ध विचाराना हवा मिळते. खालच्या पातळीची विशेषणं लावली जातात. डॉक्टरकडून थोड़ी जरी चुक झाली तरी त्याचा 'पराचा कावळा' करण्यात जनता कसर सोडत नाही. मग अशात राजकारणीही मागे कसे राहणार, तेही आपली पोळी भाजुन घेतात. काही दिवसा अगोदर राजकारणी नेत्यांनी मुम्बई-पुण्याच्या डॉक्टरांना अशीच एक 'खळ..खटयानळ' धमकी दिली. 'डॉक्टरांनी पेशंटला वेठीस् धरु नये, गाठ आमच्याशी आहे'. त्यांचा रोख लहान हॉस्पिटल किंवा नर्सिंगहोमवर होता. कदाचित कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा तेथील 'चमत्कारिक बिल' आणि पद्दतशिर लूटीची त्याना कल्पना नसावी. 

मंगलयान, चंद्रयान, राफेल, गगनचुबी उंचच्या उंच पुतळे अशा बाबतीत देशाची प्रगती किंवा दिंडोरे पिटले जात असले तरी आरोग्यासारख्या मूलभूत क्षेत्रात पाहिजे तशी प्रगती देशाने केलेली नाही. आज जगातील सर्व प्रगत राष्ट्रे जीडीपीच्या साधारण ६% खर्च आरोग्यावर करत असताना तर आपला देश जीडीपीचा फक्त १.५% खर्च आरोग्य सेवेवर खर्च करत असतो. त्यातील ५०% रक्कमेचा भ्रष्टाचार वजा करता जीडीपीच्या साधारण ० .७५% रक्कमच आरोग्यावर खर्च होतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आरोग्यसेवेत शासनाचा सहभाग, म्हणजे सरकारी इस्पितळाचा सहभाग फक्त १७% आहे. म्हणजे देशाच ८३% आरोग्य हे खासगी डॉक्टरांच्या सेवेवर अवलंबुन आहे. आणि याचाच फायदा खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट उद्योजक घेत आहेत. कोरोनामुळे शासनाचं हे पितळ उघडं पडलं. देशात ठिकठिकाणी तात्पुरते इस्पितळं सुरु करावी लागत आहेत. आरोग्य क्षेत्रात शासनाचा टक्का वाढला तर आरोग्यावर होणारा जनतेचा खर्च , कॉर्पोरेट हॉस्पिटलची मनमानी कमी होईल.  

आज छोट्या आणि मध्यम स्वरूपच्या हॉस्पिटलमुळेच वैद्यकिय क्षेत्राची पत टिकून आहे जिथे आजही खेड्यापाड्या तील गरीब रुग्णाना कमी दरात सेवा देणारे डॉक्टर सेवाव्रती भावनेने सेवा देत आहेत. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या अशा प्रकारामुळे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कॉर्पोरेटच्या भंपक जाहिराती, त्यांचे रुग्ण ओढण्याचे प्रभावी मार्केटिंग नेटवर्क, तंत्र यामुळे उत्तम सेवा देवूनही त्यांच्याशी स्पर्धा करण्यात त्यांची दमछाक होत आहे. 

स्वतःचे हॉस्पिटल सुरु करायचे म्हन्टल तर योग्य जागा, भाड़े, मेन्टेनेन्स, स्टाफचा पगार, कीचकट शासकीय ना हरकत परवानगी, उपकरणें आणि एव्हड़ सर्व करून मोठ्या हॉस्पिटलसोबत स्पर्धा! या समस्येमुळे उच्चशिक्षित डॉक्टरमण्डली आपल्या देशात व्यवसाय सुरु न करता परदेशी जाणे पसन्द करत आहे. आयटी क्षेत्र किंवा इंजीनियरचे ब्रेनड्रेन आपन समजू शकतो पण उद्या देशाचे उच्चशिक्षित डॉक्टरच बाहेर जात असतील तर ही मोठी समस्या आहे.
आजही 70% गांव आणि तालुका जिल्ह्याचे पेशंटचा भार छोट्या शहरातील नॉन-कॉर्पोरेट आणि छोट्या-मोठ्या सरकारी हॉस्पिटलवर आहे. वैद्यकिय स्टाफ, उपकरणाची कमी आणि इतर मुलभुत सुविधा नसतानाही ते त्यांचे काम ईमानएतबारे करत आहेत. इतर लहान हॉस्पिटलमधे डॉक्टर स्वतः पेशन्टला वैयक्तिक जाणत असल्यामुळे कुठे तरी डॉक्टर-रुग्ण हे नातं टिकून आहे. भविष्यात महाराष्ट्र शासन बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार आहे त्याचा निश्चितच जनतेला होईल.

वाईट प्रवृती इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्य क्षेत्रात असतीलही पण त्यामुळे सरसगट सर्वांनाच दोषी समजणे चुक. थोडक्यात अशी लूट थांबावी म्हणून गरज आहे की अशा मोठ्या हॉस्पिटलसाठी शासनाने एक कठोर नियमावली आखुन द्यावी जेणेकरून रुग्णावर होणारा खर्च कमी होवून जनता बिलामुळे होरपळुन जाणार नाही किंवा कर्जबाजारी होणार नाही, त्यावर एक अंकुश राहील. तसेच शासनाच्या आरोग्य विभाग, मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडिया यानि वेळीच अशा प्रकाराची दखल घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून वैद्यकिय क्षेत्राबद्दल वाढती संभृमता, दुष्प्रचार कमी होईल, पेशंटचा डॉक्टर आणि हॉस्पिटलप्रती विश्वास वाढेल.


© प्रेम जैस्वाल पेडगावकर 9822108775
     ह. मु. औरंगाबाद 
 ( हा लेख नावासह सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)

Thursday, 11 September 2025

' डिजिटल उपवास' शक्य आहे का?

                'डिजिटल उपवास' शक्य आहे का?

'मानव हा सामाजिक प्राणी आहे'  समाज शास्त्राच्या पुस्तकातील पहिल्याचं परिच्छेदमध्ये ही व्याख्या  लिहिलेली असते. ही व्याख्या त्या काळची होती ज्या काळी खरोखरचं मानवा हा समूहात राहत असे. त्याचं जीवन इतरांवर अवलंबुन होतं. आता या व्याख्येत थोडा बदल म्हणजे 'अपडेट' करण्याची वेळ आलेली आहे.  हल्ली मानव हा 'चार्ज रिचार्ज' करुन एकांतात जीवन जगणारा प्राणी झाला आहे.  त्यासोबतच 'एकमेका सहाय करू अवघे धरू सुपंथ' ऐवजी "स्वमग्न डिजिटल युगातं, राहू मजेत एकांतात' हेच संयुक्तीत वाटत आहे. या लेखामध्ये आपण विजेआधीच्या आणि आत्ताच्या युगाविषयीं जाणून घेणार आहोत. 

हल्ली प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा चार्जिंगने होत असतो. मोबाईल चार्जिंग, लॅपटॉप चार्जिंग, पावर बँक चार्जिंग, हेडफोन चार्जिंग, ट्रिमर चार्जिंग, कारवा रेडिओ, स्पीकर चार्जिंग, स्मार्ट वॉच, मोस्कीटो बॅट अशी एक ना एक उपकरनं हे चार्जिंगला लावलेलं असतं. जेंव्हा आपण काहीच करत नसतो तेंव्हा एखादं तरी उपकरण चार्जिंगला जोडून टाकतो. आपल्याला सर्वकाही फुल्ल चार्ज हवं असतं. ज्यांच्याकडे ईव्ही (इलेक्ट्रिक वेहिकल) गाडया आहेत त्या बिचाऱ्यांचा ताप जरा अधिकच असतो.  मधूनच गाडी बंद पडून 'टोईंग' ची नौबत टाळण्यासाठी ते सतत चार्ज करतात. मग आर्थिक गणित बसविण्यासाठी पुढे ते सोलार घेतात.  प्रत्येक घराच्या टेबलावर तीन ते चार चार्जर, केबल पडलेल्या असतात. मोबाईलच्या बॅटरी सिंबलवर रेड खुण येताच तो बंद पडून या विश्वाशी आपलं नात तुटणार अशी भिती निर्माण होते.  यापुढे घरी आलेल्या पाहुण्यांना चहा ऐवजी आस्थेने प्रथम 'चार्जिंग' बद्दल विचारलं तर वावगं ठरणार नाही. 

दुसरा वैताग म्हणजे रिचार्ज.  रिचार्ज हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तो केला नाही जीवन जगणं कठीण होतं.  ऐका कुटुंबात महिन्यातून कमीत कमी सहा ते सात वेगवेगळे रिचार्ज होत असतात.  मोबाईल रिचार्ज, टिव्ही रिचार्ज, वाय-फाय रिचार्ज, ओटीटी रिचार्ज, ओटीटीवर येणाऱ्या जाहिरात थोपविण्यासाठी  वेगळा रिचार्ज.  ऑफिस असेल तर तेथील विविध रिचार्ज. महानगरात गॅस आणि इलेक्ट्रिक मीटर रिचार्ज.  कमाईचा मोठा हिस्सा हा ' रिचार्ज' खाऊन घेतो. आणि त्या शिवाय जीवन जगणं कठीन होत चाललं आहे. डिजिटल युगातील नवीन पिढी चार्ज रिचार्ज शिवाय बेचैन होते. 

नवीन पिढी स्क्रीनशिवाय राहू शकत नाही. तेच त्यांचं विश्व असतं. ऐका रुग्णालयात प्रसूतीनंतर  बाळाला आईपासून दूर अतिदक्षता विभागात ठेवलं जातं. बेडवर झोपलेली आई बाजूला हात फिरवते. दचकून जागी होते, बेचैन होऊन ती बेडवर काही तर शोधत असते.  स्टाफ नर्सला वाटतं ती बाळ शोधत असावी.  तिला ती सांगते  'ताई, घाबरू नका तुमचं बाळ काचेच्या पेटीत सुरक्षित आहे'. त्यावर बाळाची आई स्टाफला विचारते "माझा मोबाईल!"   

पूर्वी कोणत्याही घरी गेला असता एक सर्वसामान्य चित्र असायचं.  घरातील एक दोन महिला ओसरीमध्ये परात किंवा सुपामध्ये दळण, धान्य घेऊन त्या निसत बसलेल्या असायच्या. जेवणात खडा जाऊ नये याची त्यांना काळजी असायची. निसतांना त्यांची बोट सरसर पुढे मागे फिरायची, खडा दिसताच ती वेगळी करायची. दिवसभरात पाच-सात किलो धान्य निवडून त्या मोकळ्या व्हायच्या. आता त्याचं महिलांच्या हातात स्मार्ट मोबाईल दिसत आहे. दळनासाठी पुढे मागे फिरणारी बोट त्याच गतीने मोबाईलवर फिरतांना दिसत आहे. पुरुष मंडळी याबाबतीत मागे नाही.  तरुण मंडळी याही पुढे आहेत. कळपात खाली मान करुन 'गेम खेळणाऱ्या' मुलांचा दिवसाचा २ जीबी डाटा कधी संपून गेला हे कळत सुद्धा नाही.  

आता थोडं मागे जाऊ. तो काळ वीज नसलेला होता.  जास्तीत जास्त जनता अशिक्षित होती. आर्थिक परिस्थिती वाईट होती. संपूर्ण ग्रामीण जीवन एक दुसऱ्यावर अवलंबुन होतं. कुटुंबातील लोकं मजुरी, शेती व्यवसाय किंवा इतर काहींना काही कारणाने घराबाहेर पडलेली असायची. आजच्या सारखी घरात मोबाईलवर  गुंतलेली नव्हती. कुणीही स्वावलंबी नसल्याने कधीही कुणाशी काम पडू शकतं म्हणून गावात सर्वांशी संबंध टिकवून ठेवले जायचे.  मंदिराच्या पारावर,  चावडीवर, ओट्यावर  किंवा रस्त्यावर कुठेही गावातील मंडळी गप्पा ठोकत बसलेली असायची. त्यांच्या निखळ मनोरंजनासाठी कोणत्याही 'चार्ज रिचार्ज' ची गरज नव्हती. मी तेरा वर्षाचा होईपर्यंत गावात वीज नव्हती. १९८३ मध्ये गावात वीज आली. तो दिवाबत्ती आणि रॉकेलचा काळ होता. सकाळी झाडून स्वच्छ केलेलं घर सायंकाळी पुन्हा एकदा स्वच्छ करुन दिवाबत्तीची तयार करावी लागायची. दिवा कंदीलाचे काच स्वच्छ करुन त्याची ज्योत आणि रॉकेल भरलं जायचं. मोजक्याच घरात घड्याळ होतं.  वेळ बघण्याची गरजचं नव्हती.  रात्र झाली झोपले, झाकड(उजेड) झाली उठले.  बऱ्याच लोकांकडचे कोंबडे आरवले की सूर्योदयाचा संकेत मिळत असे. तर कुणी शाळा भरण्याची वेळ, सुटण्याच्या वेळेचा संदर्भ घेऊन वेळ ठरवत. शेतात काम करणारयाच्या वेळा ह्या सूर्याच्या स्थानावर अवलंबुन असायच्या. दिवस कलला की 'पारक' म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ. मावळला की काम बंद व्हायचं. हल्ली सर्व मजुराकडे मोबाईल असतो. बऱ्याचदा हा मोबाईल एक हात गुंतवून ठेवतो. महत्वाच्या कामात 'स्पीड ब्रेकर' चं काम करतो.

थोडक्यात डिजिटल युगात फक्त शहरी नाही तर ग्रामीण जीवनसुद्धा पूर्णतः बदलत चाललं आहे. पूर्वी रस्त्या रस्त्यावर फिरणारी ग्रामस्थ जनता हल्ली घराबाहेर फिरतांना दिसत नाही. त्यामुळे गाव ओस पडल्यासारखी भासत आहेत. स्वावलंबी जनतेची शॉपिंग आता 'ऑनलाईन' होत असते.  स्विगी झोमेटो, बलिंकिट, झेपटोनी गावागावात पोहचून गाव हाय-टेक होत आहेत.  गावात 'कळपात' राहणाऱ्या मंडळीची पावलं आता 'कुलूपात'  बंद शहरी संस्कृतीकडे वळत आहे. शहरी व्यक्ती घरात शिरताच 'खs चाss क' करुन मुख्यदाराचं लॅच बंद करतो. क्षणात जगाशी त्याचा संबंध तुटतो.  मग शेजारच्या बिल्डिंगमध्ये वारलेल्या व्यक्तीची बातमी त्याला 'ऑनलाईन' मिळते. तो लगेच इतरांच्या RIP RIP मध्ये आपला एक RIP लिहून टाकतो. हळू हळू ही असंवेदनशील, भावनारहित संस्कृती गावापर्यंत पोहोचणार हे निश्चित. 

यावर उपाय काय? डिजिटल उपवास! ज्याप्रमाणे अन्न त्याग करुन आपण पचनक्रियेला आराम देतो त्याचं प्रमाणे डिजिटल उपवास करुन तुम्ही मेंदूला थोडं विश्रांती देऊ शकता. थोडा 'स्क्रीन त्याग' करुन बघायचा. आठवड्यातून एक दिवस मोबाईलसारख्या उपकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. चार्जरिचार्ज करणे टाळायचं.  किंवा दिवसातून काही तास मोबाईलविना घालवीण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी स्वतःला एखाद्या छन्दात गुंतवून ठेवने हा सर्वोतम उपाय आहे. 

'व्हॉट गोज अप कम्स डाऊन'. एक वेळ अशी येणार, मोबाईल, एआयमूळे जग डिजिटलच्या विळख्यात सापडेल. हे रोजचं 'चार्ज रिचार्ज' जीवन लोकांना नकोस होईल. मग खऱ्या चार्जिंगसाठी लोकं पुन्हा त्या भूतकाळात जगलेल्या नैसर्गिक जीवनाकडे वळतील. पुन्हा त्या निसर्गाच्या सानिध्यात शिरण्याचा प्रयत्न करतील. पण खरोखरचं असं घडेल का? 

ग़म की अंधेरी रात में दिल को ना बेक़रार कर 
सुबह ज़रूर आयेगी  सुबह का इन्तज़ार कर l 


© प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह मु. छ. संभाजीनगर, 9822108775



Friday, 29 August 2025

पेडगावचा पोळा



                           पेडगावचा पोळा


काल गावाकडे आलो होतो. हिंगोली तालुक्यातील पेडगाव हे माझं मूळ गाव. जिथे मी सातवीपर्यंत शिकलो.  त्यानंतरचं शिक्षण हिंगोलीला झालं. नेहमी गावाकडे जात नसलो तरी गावाकडची ओढ कायम असते.   पण स्वतःला शहरात गुंतवून घेतलेल्या माणसाकडे एव्हढी कारण असतात जी त्याचं पाऊलं गावाकडे पडू देत नाहीत. 

'वेड्याच सोंग घेऊन पेडगावला जाणे' किंवा  'पेडगावचे शहाणे' या प्रसिद्ध म्हणीत असलेलं गाव आमचं नव्हे. ते ऐतिहासिक महत्व असलेलं पेडगाव अहिल्यानगर जिल्ह्यात आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा उपयोग करुन तेथील बहादूरगड (धर्मवीरगड) किल्यातील मोठा खजिना आणि २०० अरबी घोडे लुटले होते.  त्यानंतरची मोठी घटना अशी की छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना प्रथम याचं ठिकाणी आणलं होतं.  याच गडावर त्यांचा छळ सुरु झाला होता. तेंव्हापासून या दोन्ही म्हणीचा उगम झाला असावा. त्यामुळे वाचतांना वाचकांनी गल्लत करू नये, म्हणून हा खुलासा. 

पूर्वी ग्रामीण जीवन हे पूर्णतः शेतीवर आधारित असतं. शेतीचे सर्वच कामं मशागत लागवडी पासुन पिक काढणी आणि विकेपर्यंत सर्व काही बैलांच्या भरोशावर असायचं. त्यामुळे बैलजोडीशिवाय खेड्याच जीवनाची कुणी कल्पनासुद्धा करू शकत नव्हतं. त्यामुळे सर्व भूधारकांकडे किमान एक दोन तरी बैलजोडया असायच्या. वेळप्रसंगी इतरांचे बैलसुद्धा कामी यायचे. अशा वर्षभर शेतकऱ्याचे ओझे खांद्यावर वाहणाऱ्या बैलांची पूजा फक्त एकच दिवस व्हायची. एकाच दिवशी बळीराजा त्याला एखाद्या लग्नाच्या नवरदेवासारखा सजवायचा, घरोघरी त्याला सजवून मिरवायचा. त्यासोबत तो स्वतः ला सजवून मिरवायचा, तो एकमेव दिवस म्हणजे पोळा. काही ठिकाणी त्याला बैलपोळा म्हणतात. पण पोळा सण असतोच मुळात बैलाचा त्यामुळे बैल या शब्दाची जोड आवश्यक नाही. लग्नाला कुणी नवरा-नवरीचं लग्न असं म्हणतं का? नाही. कारण  मुळात लग्न हे असतं नवरा-नवरीच! असो. 

त्या एक दिवसाच्या पोळ्याची तयारी मात्र खूप दिवसापासून सुरु असते. बालपणापासुन मी ती तयारी बघत आलोय त्यामुळे भूतकाळातील त्या सर्व गोष्टी एखाद्या चित्रफिती प्रमाणे समोरून जातांना दिसतात. मग मनात विचार येतो आज तो उत्साह, ती सणाची धामधूम कुठे गेली? कुठून कोठे आलो आपण? यालाच प्रगती म्हणायची का? एक भरलेल्या आणि उत्साहाने भारलेल्या पेडगावच्या पोळ्याच वर्णन मी आज करणार आहे. वयानुसार उदया कदाचित सर्व गोष्टी आठवणार सुद्धा नाहीत म्हणून ही उठाठेव. 

आमचे थोरले काका ज्यांना आम्ही 'बडे दादा' म्हणायचो  यांच्याकडे पोळा सणाचा चार्ज असायचा. किंबहुना ते काम इतर भावाना जमायचं नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. बडे दादा खूपच हरहुन्नरी होते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्यांना पटायचा नाही. इंग्रजीत हैप्पी गो लक्की ज्याला म्हणतात असा त्यांचा स्वभाव होता. इतर भाऊ व्यवहार किंवा हिशोब बघत असले तरी जनावरांची सायसोय, त्यांना सजवनं, नागर भरन वखर डवरा भरन अशी सर्व किरकोळ पण अत्यन्त महत्वाच डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. बऱ्याचदा आमचे वडील (मधवे भाऊ) किंवा लहाने काका त्यांच्या कामात ढवळाढवलं करायचे तेंव्हा ते त्यांना झापायचे.  तेंव्हा यांनाही झापणारं कुणी आहे हे बघून थोडा आनंदही व्हायचा. त्यांचे वादविवाद बघून आम्ही मनातल्या मनात हसायचो. पण त्यांचा तो वाद त्या क्षणापुरताच मर्यादित असायचा. लहाने दोन्ही भाऊ नमतं घ्यायचे, बडे दादाचे उद्योग चालू रहायचे. तर बैल असो किंवा इतर जनावरं त्यावर बडे दादाचं प्रेम हे काखनभर जास्तच होतं. आणि ते अस्सल होतं. 

पोळ्याच्या किती तरी दिवस आधीपासून तयारी सुरु व्हायची. आम्ही शाळेत गुंतलेलो असलो आम्हांला ती तयारी दिसून यायची. साधारण महिन्या आधीपासून ती तयारी सुरु व्हायची.  अठरा जोड्या बैलासाठी लागणाऱ्या झुली, वेसन, कासरे,, इतर साज-श्रगार व्यवस्थित आहेत की नाही याची ते खात्री करुन घ्यायचे. वर्षेन वर्षे वापरून झुली मधूनच कुठे फाटलेल्या असल्या की त्याला ते शिवून घ्यायचे. प्रत्येक बैलाच्या गळ्यात घुंगरूच्या घुंगरमाळा किंवा घंट्या आहेत की नाही याची बडे दादा खात्री करून घ्यायचे. ज्या गोष्टी कमी पडत आहेत त्या ते हिंगोलीहून आवर्जून आणण्यासाठी सांगायचे. बऱ्याचदा बैलासाठी वेसन कासरे कमी पडायचे. त्यासाठी आधीपासूनच एक दोन गडी इतर कामे सोडून बैठकीच्या जोत्यावर दोरी वळत बसलेले असायचे. तागापासून दोन्ही हातांच्या तळव्यात तयार होणारी ती दोरी वळता वळता सारखी लांब होत जायची. मधूनच गडी त्यात ताग जोडून तो पुढं वळायचा.  ती दोरी वळण्याची कला आम्हासारख्याना भुरळ घालायची. मग आम्हीसुद्धा गड्याप्रमाणे दोरी वळण्याचा प्रयत्न करायचो पण ते जमायचं नाही. गुजराती भाषेमध्ये म्हणं आहे,'जेनो काम तेनो थाय बिजा करे सो गोतो खाय'  मधूनच ती दोरी एक तर पातळ व्हायची किंवा एकदम जाड! कंटाळून आम्ही सोडून द्यायचो. मग गडी आम्हाला 'तू तुपलं लिहायचं काम कर' म्हणून टोमणे मारायचे. 

एक एक साजश्रँगाराची जोड करता  करता पोळा दोन  दिवसावर यायचा. लग्नाआधी घरामध्ये जसा उत्सवाच उधान येतं तसं तयारीत जोर यायचा. अशात कुणाची हिंगोलीला वारी होत असेल तर त्याला बैलांची शिंग रंगविण्यासाठीच वारनीश आणि सजविण्यासाठीच्या बेगडी पट्या आणल्या जायच्या. आदल्या दिवशी गडी बैलांना अंघोळ घालण्यासाठी डोहात घेऊन जायचे. त्यासोबत गडीसुद्धा पोहून घ्यायचे. तसं ते जोखमीच काम असायचं. शिंग लागुन जखमी होण्याची भिती असायची. संध्याकाळी 'खांदमळन' असायची. वर्षभर ज्या खांद्याच्या भरवशावर शेतीची कामं उरकली जातात ती खांदी मळण्याचा तो कार्यक्रम. 

पोळ्याच्या दिवशी दुपारपासून बैल सजावटीला सुरुवात व्हायची. विविध रंगाच्या चमचमीत बेगड पेपर घडी करुन दोऱ्याच्या सहाय्याने त्याच्या पट्ट्या कापल्या जायच्या. एका परातीत कापलेल्या पट्या घेऊन त्या आम्ही बैलाच्या शिंगाला लावण्यासाठी घेऊन जायचो. शिंगाला लावलेल्या ओल्या वारनीशवर त्या बेगडपट्ट्या सहज चिपकून जायच्या. पाठीवर रंगबिरगी झुल, शिंगावर चमकणाऱ्या विविध रंगाच्या बेगडी पट्ट्या, गळ्यात घन्टी व घुंगराच्या माळा, नाकात रंगीन नवीन वेसन, लाल गुलाबी रंगाने रंगविलेले नवीन कासरे असा साज चढवून सजविलेले बैल पोळ्यात नेण्यासाठी तयार असायचे. वर्षेभर शेताची कामं ज्याच्या खांद्यावर त्या जनावराला आज पूर्णतः सजवीलं जायचं. 

एकीकडे पोळ्यासाठी बैल सजवीनं जोरात चालू असतांना दुसरीकडे घराच्या स्वयंपाकघरातून किती तरी व्यन्जनाचा सुगन्ध बाहेर दरवळायचा. १५-१६ शेताचे गडी, गिरणी चालवीणारा नोकर, घरातील लहान मोठे १५-२० सदस्य आणि सर्व देव-माताच्या पूजेचे आणि सर्व बैलासाठीचे नैवेद्य अशा मोठ्ठया पुरणपोळ्याच्या गोडधोड स्वयंपाक्काची घरात तयारी चालू असायची. पुरणपोळ्यासोबतच बुंदीचे लाडू, भजे, कुरडीपापड, तिखट वरण असा खास बेत असायचा. आमचं अर्ध लक्ष बैलाच्या सजावटीच्या कामात तर अर्ध लक्ष पाकगृहातून येणाऱ्या सुगंधाकडे असायचं. न कळत पाय पाकगृहाकडे वळायचे. पूजेपूर्वीच पुरन किंवा बुंदी लाडूवर डल्ला मारायची इच्छा व्हायची. एरव्ही न लागणारी भूक त्यादिवशी जरा जास्तच उफाळून यायची. पण आमच्याकडे एक दुष्ट परंपरा होती. ज्या दिवशी सणाच्या गोडधोड जेवणाचा खास बेत असायचा त्या दिवशी आमच्या बहिणी एका मोठ्या पातेल्यात(भगोन्यात) उडद डाळीची अगदी बेचव खिचडी करुन ठेवायच्या. भजे वड्याच्या घाण्याचा सुगन्ध आम्हाला पाकगृहाकडे आकर्षिक करू लागला की आमची भूक शमविण्यासाठी बहिणी आम्हाला ती दुष्ट खिचडी खायला सांगायच्या. जे की एखाद्याच्या प्रबल इच्छेवर अत्याचार करण्यासारखा प्रकार असायचा. नैवेद्याशिवाय आम्हाला एखाद्या व्येनंजनाचा स्पर्शसुद्धा करण्याची मुभा नसायची. पण बऱ्याचदा आईला तो 'अतिरेक' नाही पटायचा, आमची कीव येऊन नैवेद्य न दाखवताच एखादा पुरणाचा गोळा आम्हाला ती चुपचाप खाऊ द्यायची. आम्ही तो क्षणात गिळून घ्यायचो. एकाच बघून मग इतर भाऊ त्यांचा मोर्चा पाकगृहाकडे वळवायचे. पण त्यांच्या नशिबी नैवेद्य दाखविण्याचं काम यायचं.  खायचं असेल तर लवकर नैवेद्य दाखवा!

साधारण पोळ्याच्या पंधरा वीस दिवस आधी आमचे 'लहान काका' कुणाला तरी हिंगोलीहून गड्यासाठीच्या सदऱ्याचा कपडा आणायला पाठवायचे. 'कपडे' विभाग त्यांच्याकडे होता. वीस मीटरहून मोठा सुती कपड्याचा ठान आणून टेलरला सर्व गड्याच्या सदऱ्याचा माप दिला जायचा. हातात कैची, मापाचा टेप घेऊन डुलत डुलत साहेबरावमामाची पावलं आमच्या घराकडे वळायची. तोंडात विशिष्ट प्रकारे जीभ फिरवत ते काका समोर हजर व्हायचे. सर्व गड्यांची माप देतांना काका त्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दयायचे. टेलरमामा आमच्या काकाची बोलणी एकण्यासाठी सदैव तत्पर असायचे. काकासमोर त्यांची पुरती फजिती व्हायची. एव्हढं कडक बोलून आणि टेलरमामानी ते व्यवस्थीत ऐकून नको ते व्हायचंचं. एखाद्या शर्टाची बटणे तर इतर एखादा शर्ट काचेविनाचं यायचा. काही सदरे खूपच मोठी शिवून यायची. 

सारखे नेसलेले सदरे, गांधी टोपी, माथ्यावर गुलाल कुंकू लावलेले गडी सजविलेल्या बैलजोड्यासह घुंगराच्या आवाजात पोळ्याच्या तोरणाखाली हजर व्हायच्या. जोरजोरात डफड्याचा आवाज कांनी पडायचा. पोळा भारताच त्याला जास्तच चेव यायचा.  'मान' असलेली जोडी डफड्याच्या आवाजात पोळ्यासाठी हजर व्हायची. गावातील सर्व जोड्या तोरणाखाली येताचं 'हर बोला महाssदेव, हर बोला महाss देव' अशा घोषणानी वातावरण धुंद होऊन जायचं. पोळा म्हणजे बेधुंद शेतकरी हे समीकरण. त्यामुळे तोरणाखाली आलेल्या गावकऱ्यापैकी बरीच मंडळी 'रिचार्ज' मारून फुल्ल झालेली असायची. पोळ्यासाठी त्यांनी आधीपासूनच घरी तसा 'इंतजाम' करुन ठेवलेला असायचा.  वयाची अट जरा  क्षिथिल  व्हायची. गावात देशी मिळत असली तरी गावभर हातभट्टीच्या दारूचा सुकाळ असायचा. अशी 'पहिल्या धारेची' घेतलेली बेशुद्ध मंडळी मग पोळ्यात इतरांच मनसोक्त मनोरंजन करायची. अशा 'धुंद' धामधूमीत काही अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस स्टेशन बासंब्याहून एक दोन पोलीस गावात हजर व्हायचे. पोळा संपत संपत ते सुद्धा झुलायला लागायचे. 

पोळ्यात गावातील पाटलाची 'मानाची जोडी' असायची. पूर्वीपासून ती प्रथा चालत आलेली. त्यामुळे त्या जोडीचा मान प्रथम असायचा. विवाह मंडपात जसे मंगलआष्टक बोलले जातात तसे ब्राहमनातर्फे मंगलआष्टक झाल्यानंतर गावातील काही मंडळींना मंगलआष्टक बोलण्याचा चेव चढायचा. मग एकाने सुरु केलं की दुसरा त्याला तोड द्यायचा. दोन्ही मंगळाष्टक बोलणारे भिडले की उपस्थितीतांच भरपूर मनोरंजन होऊन पोळा सुटायचा.  'हर बोला महाssदेव, हर बोला महाssदेव' च्या घोषणा देत बैलाला हाकलत सर्वप्रथम मारुती मंदिराच दर्शन घेऊन बैलजोड्या पूजेसाठी घरी यायच्या. तोपर्यंत मोठया बैठकीच्या समोर एका बाजेवर एक चादर किंवा सतरंजि अंथरून त्यावर नैवेद्य आणि पूजेच सामान तयार असायचं. बैलजोडयासह गड्याला कुंकू लावलं जायचं.  जोड्या फिरवीनं झाल्यानंतर लगेचंच गावातील घरोघरी जाऊन वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यासाठी लोक गावभर फिरायची.  सर्व समाजातील मंडळी मिसळून जायची.   त्या काळी गावात बरीच डोक्यावर कोसल्याचा लाल, पांढरा फेटा नेसलेली मंडळी असायची. त्यांना विशिष्ट मान असायचा. या निमित्ताने आमचं अख्ख्या गावातील गल्ल्या फिरणं व्हायचं. नवीन कोरे धोती सदरा नेसलेले ग्रामस्थ 'रामराम रामराम' करत गावभर फिरतांना दिसायचे. त्यांचे नवे कोरे कपडे गुलाल कुंकूने माखलेले असायचे. धुंदीत टोपी फिरून  जायची, खाली पडायची. ऐकून ती संध्याकाळ काळ खूपच मंतरलेली वाटायची. शिक्षणानिमित्ताने बरीच वर्षे आम्ही गावापासून दूर असायचो. पाया पडत फिरतांना गावातील वृद्ध आया बहिणी आम्हाला आस्तेने विचारायच्या 'तू लहान का? तू किरण का प्रेम ? कोन लहान कोन मोठं? तू कुठं लिहायला? अशी विचारपूस करायचे. पाया पडताच हाती सोप सुपारी, कडदोरा मिळायचा. लहानपणी आम्ही ते मोजून त्याची इतरांशी तुलना करायचो. अनेक घरातून चहा किंवा जेवणाचा आग्रह व्हायचा. एक दुसऱ्याची आस्थेने विचारपूस व्हायची. गावाकडची जुनी मित्रमंडळी भेटायची. मधूनच एखादा 'फुल्ल रिचार्ज' घेतलेला गडी भेटला तर मग विचारायची सोय नसायची. 'ओहरडोज' झालेला तो गडी मग हात सोडायचा नाही. नाईलाजाने त्याचं पूर्ण 'भाषण' ऐकून घ्यावं लागायचा. त्याला दुखवून काही फायदा नसायचा. पूर्वी पिलेल्या आणि वायफळ बडबड करणाऱ्या लोकांबद्दल मला थोडी चीड यायची. पण आता वाटतं शेतात काबाडकष्ट करुन शिन घालविण्यासाठी त्यानं दोन घुट घेतली तर कुठं कोणाचं बिघडतं. समाजात दारूच्या नशेपेक्षा इतर किती तरी घातक नशा आहेतच की! पैशाची नशा, पदाची नशा, प्रतिष्ठेची नशा, धर्माची नशा. दारूची नशा तशी तात्पुरती असते जी साधारण सहा तासात उतरून मनुष्य पूर्णतः शुद्धीवर येतो. पण इतर नशा उतरता उतरत नाही. पैसा, पद, प्रतिष्ठा व धर्माच्या नशेतील व्यक्ती दारूच्या नशेपेक्षा किती तरी पटीने समाजासाठी घातक ठरतो, असं मला वाटतं. धर्माच्या नशेला तर अफूच्या गोळीची उपमा देण्यात आलेली आहे जी अख्ख्या देशासाठी घातक आहे, असो. 

मोठ्या धामधूमीत तर कधी रिमझिम पावसात पोळा संपल्यानंतर घरी गड्याची पंगत बसायची. रिचार्ज घेतलेली मंडळी काका दादापासून अगदी दूर बसायची. सर्वांना सर्व कळायचं. कळून न कळल्याच सोंग चालायचं. बऱ्याचदा जेवण वाढताना गडीचा 'फॉर्म' आम्हाला कळायचा. मधूनच बाहेर गल्लीत कुणी बडबडत चालण्याचा आवाज यायचा. पूर्वी शुगर, बीपी, थायरॉइड, हार्ट अटॅक म्हणजे काय हे डॉक्टरशिवाय कुणालाच माहित नसायचं. ग्रामस्थ अशा शब्दापासून शंभर नाही तर हजार कोस दूर होते. खाणारे गडी यथेच्छ भोजन करायचे. वाढणारे वाढत जायचे. कुठंही काही कमी पडायचं नाही, कमी पडू दयायचे नाही. गोडधोड पुरणपोळ्या खाऊन, जमेल तेव्हढे पिऊन, तृप्त होऊन सर्व पोळा साजरा व्हायचा. ढारढूर करत गाव झोपी जायचं.  दुसऱ्या दिवशी महादेव दर्शन असायचं. गावातील मोजक्याच जोड्या महादेव दर्शनासाठी चिंचोली महादेवाला जायच्या. पूर्वी मधल्या रस्त्याने तर नंतर रोडने जाणं व्हायचं. वाटेत वाघामायचे दर्शन व्हायचे. 

हे सर्व वर्णन भूतकाळातील साधारण ३०-४० वर्षापूर्वीच्या पोळ्याविषयीचं होतं. कालांतराने सर्व बदलत गेलं. वृक्षाची जुनी पाने गळून जशी नवी पाने फुटतात तशी जुनी पिढी निघून नवीन पिढी उदयास आली. अर्थात बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. डिजीटल युगात पेडगावचा पोळा कसा भरतो याबद्दल मला बरीच उत्सुकता होती.  नवीन पिढी मोबाईलमूळं कायम एंगेज असते. लाखो इन्स्टाच्या रिल्स, युट्युब आणि व्हिडिओ गेम्समूळे 2 GB डाटा कधी संपतो कळतसुद्धा नाही. पण विचारपूस केली असता गावात आज घडीला चाळीस एक बैलजोडया असतील असं कळालं. म्हणजे पोळा बघण्यासारखा असणार हे निश्चित झालं.

एक काळ होता जेंव्हा आमच्या एका कुटुंबात १८ बैलजोड्या होत्या. म्हणजे ३६ बैल! गावा सभोवताली चारी दिशाला पसरलेल्या शेत आणि घरकामासाठी तेव्हढे बैलं लागायची.  संपूर्ण ग्रामीण जीवन हे बैलांच्या भरवशावर असायचं. नागरनं, वखरनं, डवरनं. तसेच खळ्यात मळणीसाठी, शेतधान्याच्या वाहतुकीसाठी बैलं लागायची. तरुण गोऱ्ह्याचं जोड शंकरपटासाठी तर डंगर (रिटायरमेन्ट जवळ आलेलं) जोड पाण्याच्या टाकीसाठी वापरात यायचं. दिवसातून एकदा एसटी बस त्यामुळे गावी ये जा करण्यासाठी बैलगाडी किंवा डमनी लागायची. बैलगाडीच्या वरातीत मी गेलेलो आहे.  थोडक्यात शहरी लोकं गायीला गौमाता म्हणून मोठा दर्जा देत असतीलही पण सर्व कामं ज्यांच्या नशिबी येतात ती बैल!  आमच्या गोठ्यात बैलासोबतच इतर तीस एक गाई, गोऱ्हे आणि म्हशी असायच्या.  पूर्वी ज्यांच्याकडे  भरपूर शेती, गुरंढोर, धान्याची पोती आणि भरपूर दूधदुभेट्याची रेलचेल असायची अशा घराला सधन कुटुंब मानलं जायचं.   कालांतराने सधन कुटुंबाची व्याख्या बदलत गेली. हल्ली ज्याच्याकडे मोठं घर आणि घरासमोर दोन तीन  फोर्चूनरसारख्या लांब गाड्या उभ्या असतात अशा कुटुंबाला जनता सधन कुटुंब मानते. 

अलीकडच्या काळात शेतीत बदल झालीत.  सजीव बैलाची कामं निर्जीव यंत्र करू लागली. सर्वत्र ट्रॅक्टर, मळनियंत्र दिसू लागली. त्यामुळं बैलाचं महत्व कमी होत गेलं.  बैलं होती तर त्यासोबत इतर जनावर सुद्धा होती. अर्थात शेतीसाठी भरपूर शेंद्रीय खत मिळत होतं.  पिकाला शेणखत त्यामुळे शेत जमिनीला फायदा व्हायचा. आणि खाणाऱ्याला सुद्धा केमिकलरहित अन्न खायला मिळे.  आता शेन नाही, गॅसमूळे चुलीची राख नाही त्यामुळे उकरंडा प्रकार कुठं दिसत नाही.  काही वर्षानंतर येणाऱ्या पिढीला उकरंडा हा शब्द माहित नसणार.  शेंद्रीय खत इतिहास जमा होऊन त्याजागी  केमिकलयुक्त खत आलं आहे.  अर्थात त्याचा वाईट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.  खेड्यापाड्यात कॅन्सर सारखे रोग पसरत आहेत. शेतीत कमावलेला पैसा दवाखान्यात जात आहे.  

कष्टकरी बैलासोबत आपसूकच गड्याचेही कष्ट व्हायचे. खाल्लेलं अन्न जिरायची सोय व्हायची. बैलं जनावरं कमी झाली यंत्र आली तशी गावात शुगर, बीपी आणि इतर विकार वाढलेत.  पूर्वी  लग्न समारंभात एखादा शहरी श्रीमंत पाहूना असायचा ज्याच्यासाठी वाढपी 'एक कमी साखरेचा चहा करा'  असं म्हणायचा.  कष्टकरी शेतकरी दुरणात गुळवणी सोबत पाच-सहा पोळ्या सहज फस्त करायचे.  सोबत बुंदीचे लाडूसुद्धा. पण आता चित्र बदललं. जेवन वाढतांना आता त्यांचा हातसुद्धा आडवा येतो, 'गोड चालत नाही' म्हणतात. बीपी शुगरच्या १२०/८० अशा रिडींग त्यालाही कळू लागल्या आहेत. अंजिओप्लास्टि अंजिओग्राफी असे भयानक शब्द गाव खेड्यात सुद्धा ऐकावयास मिळतात. तालुक्यातील दवाखान्यात अंजिओप्लास्टि होत आहेत म्हणे, यालाच प्रगती म्हणायची का?

अशातही किती तरी वर्षानंतर मला पोळा बघण्याचा योग आला. काळ बदलला असला तरी पोळा संस्कृती टिकून आहे हे काय कमी आहे.  या वेळेस इतरांचे पाय पडण्यासाठी मी बाहेर पडलो पण माझे पाय पडणाऱ्याची संख्या मला वाढलेली दिसली.   जणु गावातील लोकं मला 'तुम्ही आता वयस्कर होत आहात'  याची जाण करुन देत होती.  गावात मोजकीच धोतर नेसणारी मंडळी उरलेली दिसली. फेटावाले एकही नाही. जुनी पानं गळून नवी पालवी फुटली होती. टी शर्ट जीन्समूळ तुम्ही स्वतःला तरुण दिसण्याचा आव आणू शकता, पण वय लपवू शकत नाही, हे सुद्धा या वेळी कळलं. 

काल पाय पडण्याच्या निमित्ताने का होईना पुन्हा गावच्या गल्याबोल्या फिरणं होऊन गेलं. बालपणी याच गल्याच्या फुफाडात आम्ही मुक्त खेळलो होतो. याच गल्लीबोळीतील दगडाच्या ठेचा खात आमचं उनाड बालपण गेलं. याचं गल्यात आमच्या घनगड्या घनानत आम्ही पळायचो.  त्या सर्व चाळीस वर्षापूर्वीच्या आठवणी काल ताज्या होत गेल्या.  गल्लीतील लोकं बदलली, मातीची घर सिमेंटची झाली.  राहिल्या त्या मातीच्या सावरलेल्या घराच्या आठवणी. हो फक्त आठवणी. 

डायटिंग करत का होईना,  कालचा पोळा पुरणपोळ्याहून गोड झाला.

©प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह. मु.छ.संभाजीनगर. 9822108775







हिंगोलीचे दिवस



                    हिंगोलीचे दिवस


माझ्या शिक्षणाचा प्रवास जरा खडतरचं होता.  हिंगोलीला आठवी ते दहावी शिकतांना स्थानिक विद्यार्थी टापटीप, नीटनेटके आणि आत्मविश्वासू दिसायचे. अर्थात त्यांची भाषा शुद्ध असायची. आमचं थोडं वेगळं होतं. खेड्यातून आल्यामुळे एक न्यूनगंड आणि भाषेचा फरक होताच, त्यात मी थोडा लाजरा-बुजराचं होतो. खोली घेऊन राहत असल्याने स्वयंपाक आणि सर्व काम आटोपल्यानंतर उरलेला वेळ अभ्यासासाठी मिळायचा.   समाधानासाठी वेळापत्रक तयार केलं तरी ते पाळल्या जाण्याची शक्यता धुसरच होती. खोली घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा स्थानिक विद्यार्थ्यांचे जीवन अर्थात  खुपचं सुसह्य होतं. 

दहावीला असतांना आधी पोटापाण्याची सोय, सकाळची श्री पडोले सरांची ट्युशन, अभ्यास आणि मग दुपारची शाळा असं वेळापत्रक होतं. शाळेत सर गणित शिकवताना आमच्या मनात मात्र संध्याकाळच्या जेवणाची लसावी मसावी चालायची. भल्या सकाळी उठून आम्ही स्वयंपाक करायचो.  कोणी बघु नये म्हणून  शेजारी जागे होण्याआधीचं दारासमोर आम्ही सडासुद्धा टाकत असू. प्रत्येक वेळी स्वयंपाकसाठी मदत करण्यासाठी जोडीदार भाऊ असेलच असं नव्हतं. कधी तेल नसायचं तर कधी पीठ तर कधी रॉकेल तर कधी पाणी! बऱ्याचदा आम्ही जवाहर रोडवरील 'बाबाजीका मंदिर ' हून सायकल हॅन्डलच्या दोन्ही बाजूला बकीटी अडकहून पाणी आणायचो. क्वचित रेल्वेपूलाअलीकडं डाव्या बाजूला असलेल्या सरकारी विहिरीतून पाणी आनलं जाई.  सर्व सामान उपलब्ध असूनही स्वयंपाक पूर्ण होईलच याची शास्वती नसायची. मध्येच फर्रर्रर्रर्र आवाज करत चालणाऱ्या स्टोव्हच्या 'अंगात' येई. नोजलमध्ये कचरा अटकून मधूनच तो बंद पडून आमची परीक्षा घेई. मंदिरात एक शांत दिपज्योत जळावी तेव्हडीच त्याची छोटीशी ज्योत जळताना दिसे. मध्येचं रॉकेलचा वास, भडका! म्हणून आम्ही प्लान 'बी' म्हणजे चूल तयार ठेवायचो.  गावाकडील गडी शेतातील मालटाळ मोंढ्यात विकायला आणायचे मग त्यांच्याही भाकरी आम्हाला थापाव्या लागायच्या. कितीदा शाळेत, ट्युशनमध्ये खाकी पॅन्ट किंवा सदऱ्याला हळद किंवा स्टोव्हची काळीख लागलेली दिसायची. बऱ्याचदा भुकेच्या बेचैनीने मी अर्धकच्ची खिचडी मी खाल्लेली आहे.

त्या काळी आमच्याकडे रोज सकाळी एक काका खास वृतपत्र घेण्यासाठी येत असतं.  आमच्याकडे ' दैनिक मराठवाडा'  वृतपत्र येतं असे.  वाचल्यानंतर काही तासांनी ते परत आणूनही देत असत. मी स्वयंपाक करत असतांना मध्येचं ते आले तर मला खूप त्रास होई.  अशाच एका वैतागलेल्या सकाळी मी पोळ्या करत असतांना त्यांनी आमचं दार वाजवलं.  तव्यावर पोळी आन हात पिठानं माखलेले अशा अवस्थेत मला त्यांचं येनं खटकलं. दार उघडताच रागाने मी त्यांच्या हातात वृतमाणपत्र दिलं आणि नकळत," काका तुम्ही स्वतः वृतमानपत्र विकत का घेत नाहित हो !" असे शब्द माझ्या तोंडून निघाले.  एका छोट्या मुलाचं असं असंस्कारी उद्धट बोलण्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनीही मला भयंकर शाप देऊन टाकला,  'तू मॅट्रिक पास होणारचं नाहीस, मी तुला हे लिहून देतो!' त्यांच्या बोलण्यात महर्षी दुर्वासाचा राग होता.  त्या काळी मॅट्रिकची परीक्षा पास होनं आजच्या सारखं 'बायें हात का खेल' नव्हती.

दार बंद केल्यानंतर माझं मलाच खूप वाईट वाटलं. माझ्यापेक्षा ते वयाने खूप मोठे होते. माझ्या कडून मोठी चूक झाली होती.  मी त्यांना तसं नको बोलायला पाहिजे होतं. पण पश्चाताप करून फायदा नव्हता, बाण सुटला होता. संध्याकाळी हे प्रकरण माझ्या वडील भावास सांगितल्यानंतर त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली.  खरंच त्यांचा शाप खरा ठरला आनं ऐन मॅट्रिकच्या कुरुक्षेत्रावर माझ्या घोडदौड स्वैर पळणाऱ्या रथाचा चाक धसला तर ! थोडी धाकधूक होतीच.

दहावीत असतांना माझी उठण्याची वेळ आणि शाळेच्या वेळामध्ये सात तासाचा फरक होता. भल्या सकाळी स्टोव्ह किंवा चुलीवर स्वयंपाक मग पडोले सरांची ट्युशन आटोपून सातला मी आमचं हिंगोलीचं शेत गाठत असे.  सकाळच्या शांत एकांतात धुऱ्यावरील बाभलीखाली बसून अभ्यास करायला मला खूप आवडे. सुट्टीच्या दिवशी मी दिवसभर शेतातचं असे. खाण्यासाठी गव्हाच्या ओंब्या कधी हरबरा आनं बाजूलाच विहीर होती. अकोला रोडवर त्याकाळी विशेष रहदारी नव्हती. मोंढ्यात माल घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या, क्वचित एखादा ट्रक, बस किंवा पैंडल रिक्षा खुळनंखुळनं जातांना दिसे. आदर्श महाविद्यालयाच्या कॉलेजकुमार-कुमारीचे झुंडच्या झुंड सायकलवर जोरजोरात हसत, बडबड करत जाताना नजरी पडे. त्यांच्या बोलण्या खिदडण्यात अभ्यासाच्या ताणतणावाचा लवलेशही दिसत नसे.  एकदा का दहावी झाली कि हुश.श...श आपण मोकळे! मग आपणही असंच रंगबिरंगी कपडे नेसून सायकलवर कॉलेजला जाणार,  मधूनच असं स्वप्न मी रंगवत असे. दहा वर्ष नेसत आलेली खाकी पॅन्टचा विट आला होता.  

शाळेत दुपारून सुट्टी होती. खोलीवर येऊन मी लगेच सायकलनी शेतात गेलो. माझ्या अभ्यासाच्या जागी जाणार तोच शेतातील धुऱ्यावर मला दोन सायकली दिसल्या पैकी एक लेडीज होती. शेतात दूरवर कुणीच दिसत नव्हते. थोडया वेळानी मी पाण्यासाठी विहिरीकडे गेलो तर तेथील झाडाखाली एकप्रेमीयुगल गप्पा मारताना दिसले. त्या जोडप्याला बघून मात्र मला एव्हडी खात्री पटली कि प्रेम फक्त आंधळं नसतं तर त्याला अनेक डोळ्याचे आजार असतात, किंबहुना डोळेच नसतात म्हणा की! बाजूच्या शेतगड्याला मी त्यांच्या येण्याबद्दल विचारलं तर तो काहीच बोलेना. परत जाते वेळी मी त्यांना मुद्दाम हटकलो.  त्यावर त्या जोडप्याने  'हे शेत आमचंच आहे' असं उद्धट लबाडी मारली.  नंतर ते कधी दिसले नाही. 

आमच्या शेताच्या उत्तर धुऱ्यावरून एक पायवाट ऍड. पंडितराव देशमुख साहेबांच्या शेताला जाते.  अधूनमधून साधारण अकरा वाजता ऍड. देशमुख साहेब आपल्या राजदूत फटफटीने खेताकडे येतं.  निळ घातलेला पांढरा शर्ट, बेलबॉटम आणि थोडे झूलत चालणारे देशमुख साहेब मेन रोडवर गाडी उभी करून झपाझप त्यांच्या शेताकडे जातं. त्याच्या पाठीमागे कायम एक गडी चालत असे.  त्याच पाऊलवाटेवर मुद्दाम रस्ता अडविल्यासारखा मी लांब पाय टाकून अभ्यास घोकत बसलेला असे. वकील साहेब आले कि मी थोडासा रस्त्याच्या बाजूला सरकून जाई.

एके दिवशी माझ्या जवळूनचं ते रस्त्याने पुढं गेले. मग थोडं थांबून मागे आले, मला माझं नाव आणि वर्ग वगैरे विचारलं. माझे मोठे बंधूसुद्धा वकील असल्यामुळे मला देशमुख वकिल साहेबांची ख्याती माहित होती. थोडी विचारपूस करून,'बाळा मी तुला नेहमी येथे अभ्यास करतांना बघत असतो, मॅट्रिक पास करून पुढं तू खूप मोठा होशील!' असे बोलून ते निघून गेले.  त्यांच्या शुभेच्छानी काही क्षणासाठी का होईना मी सुखावलो. 

त्या वेळेस 'मोठं होणं म्हणजे नेमकं काय' याची मला विशेष समज नव्हती.  पण त्यांनी मला माझ्या मॅट्रिकबद्दल चांगला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या एव्हडं मात्र मी समजलो होतो. अशा प्रकारे दहावीतचं एका काकांनी शाप तर ऍड देशमुखांकडून मला शुभेच्छा मिळाल्या होत्या. अशा ही परिस्थितीत दहावी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण करून मी औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. आज नसलं तरी त्याकाळी 'इंजिनियर' या शब्दाला भलतंच वलय होतं. शेवटी इंजिनियरचं झालो.

नवीन पिढीला आपण सोसलेले कष्ट, खालेल्या खस्ता सांगून काही उपयोग नाही. 'नको तुमच्या त्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाची कहाणी' म्हणून ते ऐकायचं टाळतील. जे कष्ट आपण सोसले तशी वेळ मुलांवर येऊ नये म्हणून पालक हाल अपेष्टा सहन करून त्यांचा मार्ग सुकर करतात. 

पाण्यातील मासा झोपणार कैसा,
जावे त्यांच्या वंशा, तेंव्हा कळे l 

म्हणतात कि, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः बाप झाल्याशिवाय त्यांना 'बाप' कळणारच नाही.

हल्ली हिंगोलीच्या त्या शेताचं प्लॉटिंगचं काम चालू आहे. रस्त्याची रुंदी वाढली, बैलगाडी, घन्टी वाजवत जाणाऱ्या सायकली जाऊनं आधुनिक वाहनाची वर्दळ वाढली. अधून मधून मोजणी आणि तत्सम कामानिमित्त मला शेतात जावं लागतं. शेतात फिरतांना धुऱ्यावरील अभ्यासाची जागा मला अजूनही आठवते.  काही दिवसांनी ती जागासुद्धा सिमेंटचे जंगल व्यापून घेईल, राहणार फक्त आठवणी!

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह. मु. छ. संभाजीनगर 

                     ooo ooo ooo ooo

Monday, 26 May 2025




जत्रा जशी आठवते - भाग २


'मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर'. कालानुरूपे काही गोष्टी विस्मरणात जायला हव्या. मेंदूची सुद्धा काही क्षमता असते ना! तसा भूतकाळात मन रमवून आणि भविष्याची चिंता करून वर्तमानात काहीच साध्य होणार नसतं. पण काळाच्या ओघात आपण किती जरी पुढे गेलो तरी बालपणीच्या काही आठवणी एखाद्या शिल्पावर कोरून ठेवाव्यात तशा त्या मनात घर करून बसलेल्या असतात. 
आपला पिच्छा त्या सोडत नाही. तूम्ही कुठून आलात, कशे होता अशा विविध प्रश्नाचं कल्लोळ उठतं, खूप काही आठवतं आणि लिहावंसं वाटतं.

जत्रेच्या पहिल्या दिवसाच महत्व आमच्यासाठी 'नवस आणि थोडं मटनाचं मांसाहारी जेवण' या पलीकडे विशेष काही नव्हतं. घरातील  अध्यात्मिक वातावरणामुळे ते सुद्धा अगदी लपूनछपून करावं लागायचं. ज्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून उत्सुक असायचो ती खरी जत्रा दुसऱ्या दिवशापासून सुरु व्हायची.

दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी नसायची. शाळेच्या खोल्या कमी म्हणून शिक्षक शाळेच्या मैदानात, कोवळ्या उन्हात गोल रिंगणातं बसून आमचे वर्ग घ्यायचे. नितनवरे गुरुजी, मस्के गुरुजी, डोके गुरुजी सारखी शिक्षक मंडळी जीव तोडून शिकवायचे पण त्या दिवशी आमचं मन लागत नसे. गावाच्या उत्तरेला गांगुचा माळ', त्या माळावरून जत्रेच्या व्यापाऱ्याच्या गाड्या धडधड करत आमच्या जवळून वाघामायकडे वळायच्या.  आमची जत्रा त्यात खचून भरलेली असायची. मग वर्गातील मुलं त्याची जोरात चर्चा करायची. डोके गुरुजी हसरा चेहरा करत यायचे आणि पाठीमागे धपकन एक धपाटा मारून निघून जायचे. संपूर्ण लक्ष आता शाळा सुटण्यावर असायचं. 

मग अचानक आमचे 'दयाळु' गुरुजी दुपारची सुट्टी 'डिक्लेअर' करायचे. झालं, शाळेच दप्तर एखाद्या कोपऱ्यात फेकून आम्ही जत्रेकडे धूम ठोकायचो. जत्रेचे काही दुकानदार आपली दुकान लावण्यासाठी खड्डे करण्यात गुंतलेले असायचे.  काही थकलेले व्यापारी चुलीवर स्वयंपाक करून पोटापाण्याची व्यवस्था करायचे. आकाशपाळनेवाला सुद्धा पाळणा उभा करण्याची खड्डे खोदून तयारी करत असलेला दिसायचा.  डोक्यावर दोन्ही हात ठेवून आम्ही त्यांची तयारी बघत बसायचो. हि इतंभूत माहिती आम्ही गावात सर्वांना सांगत बसायचो.  तिसऱ्या दिवशी मात्र जत्रा 'फुल्ल फॉर्म' मध्ये यायची. सर्व दुकानदार नियोजित जागी आपले शेड-कणाद ठोकून एखाद्या शेठ सारखे मळकट जॅकेट घालून आरामात बसलेले दिसायचे. विशेष म्हणजे त्यांच्या जागा दरवर्षी फिक्स असायच्या. आकाशपाळणा, घोड्याचा गोलचक्री पाळणा सर्व तयारीत असायचे. मग आमच्यासारखे काही बहाद्दर सकाळी झोपेतून उठून, तोंड न धुता, घरी कोणाला न कळता धावत एक चक्कर मारून यायचे. 

आता गावात जत्रेची लगबग सुरु व्हायची. मग काय, जमा केलेली १०,२० आणि एखादी ५० पैशाची नाणी खिशात घेत आम्ही जत्रेचा आनंद घेण्यासाठी निघायचो. वाटेत परत येणारे मुलं चेंडू उडवत, भवरे फिरवत, डोळ्याला प्लास्टिकचा चष्मा लावून फुगा-कम-पुंगीचा पौंsss आवाज काढत, बासरी फुकट परत यायची. कुणाच्या हातात ऊस, फुटाणे तर कुणाच्या हातात डमनी. आमच्या वेळेस 'डमनी' हा प्रकार खूपच फेमस होता. बूटपॉलिशच्या डब्बीची दोन चाक, वर पत्र्याची डमनी आणि ओढायला एक लांब काडी. बस, ती डमनी ओढत मुलं घरी यायची. 

सैलानीपासूनच जत्रेचा गोंगाट ऐकू यायचा तशी आमची पावलं जोरात पडायची. आकाश पाळणे फिरण्याचा सतत क्वायं क्वायं आवाज, बासरी विकणाऱ्याचा मधुर गाण्याचा आवाज, फुगेवाल्या पुंग्याचा आवाज, 'माय मल चेंडू, मल चष्मा दे' असं मायच्या पदराला पकडून रडणाऱ्या लेकराचा आवाज. ' याडी मन बुगडा दरा द'  'तोन आबच पिसा दिनीती, कांई किदो, अब पिसा छेयी?' मध्येच गरम गरम भजेवाल्याचा आवाज आणि एव्हड काय कमी की अचानक भोंग्याचा आवाज ,' आता आलेली जोडी ७ सेकंड ३ पॉईंट, पावती घेऊन येणे!' सर्वत्र गोंगाट.

खरेदीची उत्सुकता तात्पुरती बाजूला ठेवून थोड्या गडबडीने आम्ही 'वाघामाय' च्या पाया पडायचो. देवळाजवळच 'संतोष आणि फुटनेवाली मावशी' फुटाणे, लेवड्या विकत बसायचे. 'फुटाणे' म्हणजे थोड्या पैशात जास्त वेळ आनंद!  दोन दोन फुटाणे खात आम्ही जत्रेत फिरत असू.  आमची आवडती दुकानं म्हणजे कटलरी. चेंडू, पुंगी, चष्मा, प्लास्टिकच्या छोट्या जीप, ट्रक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्मी टाकून बघायचे सिनेमे. या सर्व वस्तू २५ पैसे ते १ रुपयाच्या रेंजमध्ये असायच्या. खिशात पैसे नसले की हल्ली मॉल मध्ये करतो तशी 'ये कित्तेकू हय, वो कित्तेकू है' अशी फुकटी 'विंडो शॉपिंग' करायचो. पण कोणाच्या खिशात पैसे आहेत ते त्या जॅकेट घातलेल्या वैफल्यग्रस्त दुकानदाराला आधीच माहित असायचं.  मग सर्व फिरून एखादा चेंडू आणि प्लास्टिकचा चष्मा घ्यायचो. त्या चष्म्यातून सर्व जत्रा रंगीतमय वाटायची, भन्नाट मज्जा यायची. ती चार-पाच दुकान पुढेमागे फिरत आम्ही बाहेर निघायचो. बाजूच्या हाटेलित पाणी प्यायचो. त्यावेळेस बिस्लरी हा प्रकार नव्हता त्यामुळे इन्फेक्शन काय हे आम्हाला माहित नव्हतं.  हॉटेलिसमोर मोठ्या कढईत मळकट बनियन घालून आचारी भजे-जिलेबी तळत बसायचा. पाणी पिऊन आम्ही खदाणीतूंन पडलेल्या रस्त्याने मेनरोडवर यायचो. मध्येच कुठे शाळेचे गुरुजी दिसायचे, आम्ही कट् मारून दूर पळून जायचो. रोडवर ऊसवाला 'साटा' विकत उभा असायचा. त्याचा तो पांढरा मिशावाला चेहरा कधीच बदलला नाही. ज्यांना घरी जायचं ते 'मांदा, ५० पिसार साटा द' ऊस घेऊन सुसू करून त्याचा रस पीत पीत घरी जायचे. उसाच्या गाडीच्या बाजूला एक सिनेमावाला आपला 'दिल्लीला कुतूबमिनार देखो, आग्राका ताजमहल देखो. . . ..' असं म्हणत उभा असायचा. मग १० पैसे देऊन तो आम्हाला ताजमहल, कुतुबमिनार, इंडिया गेट अशी ठिकाण फिरवून आणायचा. वर त्याची धपधप अशी बॅकग्राऊंड 'म्युसिक' चाललेली असायची.  खाली गुढघ्यावर बसून त्या चार गोल खिडकीतून आम्ही सिनेमे पाहायचो. चार आने दिले तर दोन जण सिनेमे बघायचे. मग त्याच्याकडे पाच पैसे चिल्लर नसायची म्हणून पाच पैशात एक जण पुन्हा सिनेमा बघायचा. मोठा डिस्काऊंट मिळाल्याचा आनंद व्हायचा. कधी कधी झटपट पैसे कमविण्यासाठी जत्रेत चक्री यायची, लालची लोकांचे खिसे त्यामुळे पटकन खाली व्हायचे. बाजूलाच लाल-पिवळ्या गारीगर विकणारा 'गारीगरवाले, गारीगरवाले' म्हणत थंडगार गारीगर विकायचा. खिशात चेंडू, डोळ्यावर पन्नास पैशाचा रंगीन चष्मा, पाच पैशाची गारीगर चोखत स्वर्गानन्द मिळायचा.  तेथून पुढे आकाशपाळने  क्वांयन, क्वांयन आवाज काढून नुसते गोंगाट करायचे. गळ्याला बांधलेली दस्ती, एक टांगती पर्स आणि दोन्ही बाह्या एकदम वर केलेला तो आकाशपाळनेवाळा दोन्ही हातानी तो पाळणा गरगर फिरवायचा. कधी कधी पाळन्याचे चारही झोके फुल्ल भरत नसत म्हणून पाळणा संतुलित करण्यासाठी तो एखाद्या मुलाला फुकटात बसवायचा. हा 'योग' आपल्या नशिबात यावा म्हणून बरीच मुलं त्या पाळण्याजवळ प्रतीक्षेत ताटकळत उभी रहायची.  आकाशपाळण्यात बसलेली मंडळी खाली दस्ती फेकायची, मग ती उचलायची, ओरडाओरड करायची, शिट्या मारायची, भन्नाट मजा यायची. आता बारी घोड्याच्या चक्रीची.  मुद्दाम जवळजवळच्या घोड्यावर बसून आम्ही गरगर फिरत असू, एक दुसऱ्याच्या हाताला हात मारत काही सेकंदात तोही चक्र थांबायचं. घोड्याच्या चक्रीच्या पलीकडे भांड्याची दुकान असायची. दुरूनच तांबे-पितळेच्या भांड्याची उन्हात चमकणारी उतरंड दिसायची. गावातील आया-माया आपल्या मुलींसाठी भांडी विकत घ्यायच्या. भांड्यावर नाव टाकण्याचा टँगटँग आवाज दूर पर्यन्त यायचा. तिकडं कुणीही मुलं फिरकायची नाही. ती भांडी आमच्या काय कामाची?  अशी मजा लुटताना मध्येच,'आता आलेली जोडी ६ सेकंड ३ पॉईंट, पावती घेऊन येणे'  असा भोंग्याचा आवाज यायचा. मग धसकट-माती तुडवत आमची पावलं शंकरपटा कडे पडायची. 

ज्या प्राण्याकडून काम करून घ्यायचं, त्याच प्राण्यांचा थोडा मनोरंजनासाठीसुद्धा उपयोग करायचा, हि जुनीच परंपरा आहे. अशी प्राण्याची शर्यत सर्व जगात घडत असते फक्त स्वरूप वेगळं असतं. गावातील सर्व हौशी शेतकरी मंडळी आपल्या आवडत्या जोडीसह हजर रहायची. प्रेक्षक मंडळीच पूर्ण लक्ष त्या जोरात धावत येणाऱ्या जोडीकडं असायचं. जोडी हाकणारा जिव तोडून, दोन्ही हातानी चापटा मारत, शेपूट मुरगाळत जोडी हाकायचा.  क्वचीत ओढाताण करत ती नामचीन जोडी फरार व्हायची, मग,' आता आलेली जोडी फरार!'  झालं, मग त्या गड्याला खूप राग येऊन तो गोर्ह्याला बदबद बदडायचा. कारण भर स्पर्धेत त्याच्या इज्जतीचा पंचनामा व्हायचा. मग अशात एखाद्या उमद्या जोडीची चर्चा चालायची.  काही जाणकार  ' त्याची लय सोय हय हो, पहिला इनाम हीच जोडी हाणनार' असं बिडया फुकत, पानतंबाकू चघळत लोकं चर्चा करायची. विशेष म्हणजे हा लाऊडस्पीकर घडीवाले केळकर साहेब अनेक वर्षे सारखेच दिसायचे. वयाचा त्याच्यावर काही परीणाम झालेला दिसत नसे. खाकी हाफपेंट, पांढरा बाह्याची घडी केलेले उत्तम शरीरयष्टी असलेले केळकर सदैव हसतमुख दिसत. आता वाटते ते कदाचित आरएसएस चे साधक असावे. 

बऱ्याचदा शर्यतीत वाद निर्माण व्हायचे मग ते निसतारण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी टेबल-खुर्च्या टाकून बसायची. जोडीने दोरा तोडल्या क्षणी त्या घडीचा काटा गर्रकन फिरायचा. केळकर भिंग घेऊन 'रिडींग' बघायचे आणि मग माईकमध्ये  'आता आलेली.........., ' केळकरचा अर्धा वेळ गावकऱ्यांना मागे सारण्यात जायचा. त्यात एखादा 'फुल्ल रिचार्जड' असला तर त्याची विशेष 'कॉमेंट्री' चालायची मग त्यातही थोडी मजा यायची.

तर अशा जत्रेत दिवसातून आमच्या २- ३ चकरा व्हायच्या. फक्त जेवणासाठी आम्ही घरी यायचो. तीन दिवस भरपूर मजा यायची. जत्रेत खरेदी केलेल्या वस्तूची 'व्हॅलेडीटी' जास्तीत जास्त आठवडाभर असायची. आजच्या चायनीज वस्तूप्रमाणे. काही वस्तू दोन दिवसातच तुटून जायच्या.  उंच उंच उसळणारा चेंडू अचानक फाटून निकामी व्हायचा. त्या सोबत आमची हवा निघून जायची. सिनेम्यासोबत छोटछोट्या फिल्म यायच्या. त्या टाकून बघून, मनसोक्त आनंद मिळायचा. 

पाचव्या दिवशी कुस्तीचे सामने व्हायचे. हा जत्रेचा शेवटचा खेळ असायचा. आम्हाला त्यात खास अशी मजा येत नसे. आम्ही आमच्या जत्रेत गुंग असायचो.  जत्रेचे व्यापारी जत्रा गुंडाळण्यात व्येस्त असायचे. त्यांचं बिऱ्हाड पेडगावहून हलून दुसऱ्या जत्रेसाठी जण्याची ते तयारी करायचे. अशा प्रकारे पाच दिवसाची धुमधाम यात्रा संपायची आणि व्यापारी गाठोडं बांधून निघून जायचे.  पाच दिवसात पाऊलांना रोज तीन वेळेस जत्रेकडे जायची सवयच पडुन जायची. त्यामुळे सहाव्या दिवशी सकाळी काही गावातील पोरं जत्रेच्या ठिकाणी जायची, जत्रा उठलेली असायची पण पोरं तेथे वनवन फिरून हाताला काही लागतं का ते बघायची. चार दिवस दणदणाट वाटणारी हीच ती जागा होती का?  यावर विश्वास् होत नसे.  एका हुरहूर शिवाय काहीच हाती लागत नसे. आठवणी मागे ठेवून जत्रा निघून जायची, पूर्ण एका वर्षासाठी !

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
   ९८२२१०८७७५
 
                               





            


  गावची जत्रा जशी आठवते -  भाग १

बऱ्याच वर्षांपासून पेडगावच्या जत्रेला मी गेलो नाही किंवा असं समजा की तसा योग आला नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की पेडगावच्या जत्रेचा मी कधीच आनंद घेतला नाही. बालपणापासून साधारण दहावीपर्यंत मी प्रत्येक वर्षी जत्रेला गेलो आणि मनसोक्त आनंदही लुटला आहे.

आनंदाची व्याख्या व्यक्तिप्रमाणे बदलत जाते. शहरात राहणारे उच्चशिक्षित पुरोगामी उच्चभ्रू लोकं आनंद मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.  माया कमवून जस जशी श्रीमंती वाढते तसा आनंदही महाग होत जातो.  एखादं मोठं पर्यटन स्थळ पाहिल्याशिवाय किंवा एखादी परदेश वारी केल्याशिवाय त्यांना चैन, मजा येत नाही. पण तेव्हडाचं आनंद एका गावखेडयातील गरीब शेतकऱ्याला गावयात्रेत मिळत असतो. कारण त्याच्या मजेचा कक्षा जत्रेच्या पलीकडे गेलेल्या नसतात. थोडक्यात त्यांचं विश्वच छोटं असतं.  आजही गावातील जनता वर्तमानात जगत असताना दिसते त्यांना उद्याची जास्त चिंता नसते. छोटया छोटया गोष्टीत त्यांचं मन आनंदी होतं. पेडगावची जत्रा म्हणजे सर्व गावकऱ्यांच्या आनंदाचा एक उत्सवच. वर्षभर शेतातील काम आणि रोजरोजच्या कंटाळवाण्या कटकटीतुन सुटका मिळून थोडा आनंद भरणारा तो आनंदोत्सव आहे. 

वाघामायच्या जत्रेला 'जगदंबादेवीची यात्रा' म्हंटलं तर त्यातील अस्सलपणा निघून जाईल. हल्ली शहरी जीवन दिखाव्याचं झालं आहे. जगण्यातील अस्सलपणाच त्यात राहिला नाही. आजूबाजूचं जग दिखाव्याने भरलेलं वाटतं.  पण आजच्या या लेखात मी 'वाघामायच्या जत्रे' चं अस्सल म्हणजे खरंखुरं वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे माझे समकालीन म्हणजे १९६९ च्या पुढेमागे जन्मलेले असतील त्यांना हा लेख ३५-४० वर्षांपूर्वीच्या वाघामायची यात्रा फिरवून आणेलं. 'कालाय तस्मै नमः'  प्रमाणे कालांतराने गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनातं बरेच बदल घडले आहे. जीवनमान बरंच उंचावलं आहे, त्यामुळे सध्याच्या जत्रेत आणि मी किंवा आम्ही अनुभवलेल्या जत्रेत बरेच बदल घडले असतील, असं मला वाटतं.

रूढी, परंपरा आणि विश्वास या पुढे तत्वज्ञान, तर्क, विज्ञान आणि विवेकवाद याच काही चालत नसतं. त्यामुळे गावखेड्यात जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते पुढे हि असंच चालत राहणार. वाघमायची जत्रा त्याला अपवाद नाही. वाघामायच्या जत्रेच्या काही दिवस आधीच गावाकऱ्यांना जत्रेचे वेध लागायचे. शेतकरी शंकरपटात धावण्याजोग्या चांगल्या गोऱ्ह्याची निवड करत असत.  धावणाऱ्या जोडीच्या ,' खुराक' खाण्यापिण्याची जरा जास्तच सोय व्हायची. हौशी शेतकरी सुताराकडून शंकरपटासाठी वजनानी हलका-फुलका खासरा किंवा छकडा, कासरा, टोकदार पुराणी याची तयारी करायचे किंवा त्याची दुरुस्ती करायचे. सर्व तयारी जोरात चालायची. मग ज्यांना वाघामायचे नवस फेडायचे अशी मंडळी आधीच आपल्या आयपतीप्रमाणे लहान-मोठं बकरं 'बुक' करून ठेवायची. परिस्थिती असो वा नसो गावच्या वाघामायचा नवस लोकं चुकवत नसत, नाहीतर वाघामाय कोपेल अशी भीती. ज्यांना घडतं नसे ते ' पैशे मुंगा-उडदावर नखंर कापसावर देईन,  मी कुठं पळून चाललो का ?' असं वचन देऊन सावकाराकडून उधारउसनवारीने नवस पूर्ण करत. त्यासोबत आधीच दारूची सोय केल्या जाई. मग पिणारे हौशी ओढ्या-नाल्यात मोहादारू काढून आधीच 'पहिल्या धारेच्या' बाटल्या भरून ठेवत.  नव्यानं उजवलेल्या सासुरवासण्या पोरींना माहेरच्या जत्रेचे वेध लागे. जत्रे निमित्त चार दिवस का होईना एक परम सुखाची माहेरची वारी होईल अशी त्यांना आशा असे. मग कधी बाप सासरी येईल आन जत्रसाठी माहेरी घेऊन जाईन असं वाटे. 

लहान असल्यामुळे जत्रेची पूर्वतयारी आमच्या समजण्या पलीकडची असायची. फक्त एव्हड समजायचं की ढगळवगळ पायजमा सदरा, डोक्यावर रुमाल गुंडाळलेला गाव-हवालदार लगबघीने गावातील गल्ल्यात फिरून गावातील प्रतिष्टीत मंडळींना कुठे तरी जमवायचा. थंडीच्या दिवसात सकाळचं कोवळं ऊन खात हि चर्चा मारुतीच्या पारावर किंवा इतर कुठेतरी व्हायची. आता वाटतं ते जत्रेच काही तरी नियोजन करत असावे.  पण आम्हाला जत्रेबद्दल कळायचं ते फक्त 'हिंद प्रिंटिंग प्रेस' मध्ये छापलेल्या अतिपातळ गडद गुलाबी, पिवळे, लाल व जांभळे पाम्प्लेट हातात आल्यावरच. त्यावेळी आजच्या सारखे 'फास्ट कम्युनिकेशन' ची साधन नव्हती. पोस्ट नव्हतं की फोन नव्हते. त्यामुळे 'फणाल्या गावच्या यात्रेला कुणी जात असंल तर पाम्प्लेट पाठवा रे' असं करून पाम्प्लेट पाठवले जायचे. त्याकाळी एसटी बस बेभरवशाची होती त्यामुळे इतर गावाचे पाम्प्लेट पाऊलवाटेंने कुणीतरी गावात घेऊन यायचे. पेडगावच्या पुढे मागेच ढोलम्बरी, भटसांवगी सारख्या सभोवतालच्या गावाच्या जत्रा असायच्या.  हल्ली जसे आयपीएलचे सामने होतात तशी एका मागून एक सभोवतालच्या गावच्या जत्रा भरायच्या. मग गावातील बाया, लहान मोठी पोरं जत्रेची मजा लुटण्यासाठी किंवा खर्चासाठी आधीच पै पै जमवून ठेवायची. कुणी 'कापूस इकुन'कुणी थोडं धान्य इकून, मोलमजुरी करून जत्रेच्या तयारीत जुंपायची. आम्ही पाच पाच दहा दहा पैसे जमा करून ते एखाद्या डब्यात, उतरंडीच्या एखादया मटक्यात लपवून ठेवत असू. जत्रेत काय काय खरेदी करायचं ते आधीच ठरलेलं असायचं.  परिस्थिती कशीही असू दया, कर्ज उसनवारी करून का होईना गाव-खेड्यात सण साजरे होतातच, मग जत्रा तर गावातला मोठा उत्सव त्यामुळे कुठेही कसर सोडली जात नसे.

अशा तयारीत गाव असताना जत्रेचा तो पहिला दिवस उगवत असे. वाघामायचे नवस. 'देवावर भार ठेवोनिया' प्रमाणे गावातील सुखदुःखे जनता वाघामायच्या हवाली करायची. चांगलं झालं ते वाघामायच्या नवसं कबूल केल्यामुळं. ग्रामीन भागात नवस करण्यात महिला खूप पुढे असतात. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मापासून मरेपर्यंत महिला आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. संसारिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना अनेक दुःखाचा सामना करावा लागतो. ती एक अस्थिर तारेवरची कसरतचं. सासरी नांदणाऱ्या महिलांना आपल्या पती, मुलाबाळासह आपल्या माहेरच्या लहान भाऊ-बहीण, आई-वडिलांची आणि एकंदरीत सर्वांचीच काळजी लागलेली असे. काही आयाच्या चिंतेचा 'कव्हरेज एरिया'  एव्हडा दूर पर्यन्त पसरलेला असायचा की त्या आज्याना आपल्या नातवाच्या कुटुंबाचीसुद्धा फिकीर लागलेली असे. मग त्या नातेच सासर कुठं का असेना, ती आजी तिला पेडगावच्या वाघामायचा नवस कबूल करायला बोलवत असे.  'माय म्हया पोरीलं पोरगं होउदे, 'म्हया भावाचं दुखन बरं कर,' 'माय म्हया पोरीच्या पोरील लई पोरी झाल्या,एक पोरगं होउदे' असा नवस कबूल करायच्या. यात गावातील कोणताच समाज मागे नव्हता.  मग तो बंजारा असो की हटकर, आदिवाशी असो की मराठा,  कलाल असो की राजपूत, वाघामाय सर्वांचीच. मग गावातील बंजारा महिला 'वाघायाडी मार छोरीनं आजी एक छोरा व्हेयद याडी'  'मारं भियार घणो दुःखरंच, घणे पिसा लागगे याडी'  या बिचाऱ्या भाबड्या बायकांना हे नाही कळायचं की उद्या हा भाऊ बरं झाल्यानंतर तुला विचारणारसुद्धा नाही. पण आई-बहिणीची माया वेडी असते. माझ्या आईनं भारतात कुठे तरी भूकंप झाल्याचं ऐकलं होतं. तिला माझी फिकीर. तिनं लगेच नवस कबूल केला की 'वाघामाय मला पोराला काय होऊ देऊ नको, मी त्याच्या भारोभार गूळ वाटिन आन एक गाईचं गोऱ्ह दान करीन.'  नवस तर कबूल केला पण काही कारणाने बरेच वर्ष तिचा हा नवस पूर्ण करायचा राहूनच गेला. मग माझ्या लग्नानंतर तिनं तो नवस फेडण्याचा ठरवलं.  मग काय, वाघामाय मंदिरासमोर एका तराजूत मी आणि दुसऱ्यात ६७ किलो गूळ.  माझ्या भारोभार गूळ गावभर वाटण्यात आलं. तसंच एक गोऱ्ह मोकाट सोडून देण्यात आलं. मला मात्र आईचा तो अहिंसक, शाकाहारी नवस फार आवडला. नंतर कळालं की त्यासाठी नवस झाला तो भीषण भूकंप गुजरातच्या भुजमध्ये झाला होता, मी राहत असलेल्या मुंबईपासून ८५० किमी दूर! तर असं, या ना त्या कारणाने लोकं वाघामायला नवस करायचेच. लोकांच्या सर्व बिकट समस्येवर एकच उपाय असायचा - वाघामायची पूजा किंवा नवस.

जत्रेचा पहिल्या दिवस म्हणजे वाघामायचे नवस. नवसाच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर गावातील उत्सवाला उधाण यायचं.  गावभर  जाणकू-सटवाच्या डफड्याचा आवाज येई. गावातील वातावरण बदलून जायचं.  ज्यांच्या घरी नवसाच बकरं कापणार अशा घरी जवळच्या पाहुण्यारावळ्यांची रेलचेल असायची. जवळचे सग्गेसोयरे, खास करून पोरी-जवाईबापू, 'इव्हाही'  हजर असायचे. मग ही सर्व मंडळी हातात लाल झेंडे घेऊन सोबत दावणीला बांधलेला बोकडं घेऊन वाजत गाजत निघायची.  जाळावर तापवलेलं जानकूच डफडं 'डंगलंग व्हकलंन्ग डंगलंग व्हकलंन्ग करत पुढं चालायचं. लहानसहान पोरं लाल झेंडे, निशाण घेऊन पूड पुढं मिरवायची. मागे म्यांss  म्यांss  करणार बकरं घेतलेली पुरुष मंडळी, नवीन नऊवारी साड्या, हातभार बांगड्या आन आणि डोक्यावर पदर, पूजेची थाळी घेतलेल्या महिला व पोरंसोर असायची. उगीच इतर देवाची नाराजी नको म्हणून वाघामायच्या वाटेवर सत्यामाय व सैलानीची पूजा व्हायची. कदाचित बोकड्याला त्याच्या भविष्याची जाणीव व्हायची म्हणून त्याचे पाय पुढं पडत नसंत, बऱ्याचदा तो म्यांss  म्यांss ओरडत पाय जमिनीला रोवल्यावाणी जागेवरुन हालत नसे. सत्यामाय पासून वाघामाय पर्यन्त रस्त्यावर सर्वत्र लालझेंडे घेतलेली पोर माणसं अशी गर्दी दिसायची. 

सैलाणीच्या थोडं पुढं 'गाडा ओढण्यासाठी' गावातील काही बैलगाड्या एकमेकाला बांधून ठेवलेल्या असत. लहानपणी आम्ही त्या गाड्यात बसायचो. मग ज्याची गाडे ओढण्याचा नवस केला तो गाडा ओढत असे. त्याला थोडं सोपं जावं म्हनून इतर लोकं थोडा हातभार लावायची. हर हर महादेव, हर हर महादेव गाडे ओढणार गाडे ओढत. आमची थोडी पाळी व्हायची, शिरणी-गुळाचा प्रसाद खायला मिळे. जानकूच्या डफड्याचा 'डंगलंग व्हकलंन्ग डंगलंग व्हकलंन्ग' असा आसमांत गुंजनारा आवाज, दोरीला बांधलेले अनेक बोकडं, हातात लाल निशाणी झेंडे घेतलेले पोरं, नवीन कपडे घातलेली नवसा घरची मंडळी, त्यात कुंकुनी माखलेली त्यांची कपाळ अशी जत्रा निघायची.

आमच्या घरासमोर बैठक म्हणजे गावाच्या पश्चिम दिशेचं प्रवेशद्वारचं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जत्रा आम्हाला दिवसभर बघायला मिळायची. गावातील वृद्ध, प्रतिष्ठीत मंडळी कायम त्या जोत्यावर बसून असायची. बिडया फुकतं, तंबाकू-सुपारी चघळत विविध विषयांवर गप्पा मारत बसायची. मोहनसिंगकाका, मेंबर हरसिंगकाका, नथुभैया रेखा, किसन आमरुकाका, आमचे वडील-दादा, काका, गना गव्हाळेमामा, द्वारकामामा, गंगाभैया अशी अनेक प्रतिष्ठीत मंडळी बैठकीच्या जोत्यावर बसलेली असायची. आदिवासी समाजातील तसेच दोन्ही तांड्यातिल बायकांचे घोळके धुरडा उडवत वाघामायच्या दर्शनाला निघायचे. बंजारा  समाजाच्या आयाबहिणी कचोली-घागरा, गळ्यात काळी पोत, हातात पाटल्या व पायात कडे डोक्यावर रोवलेले दोन शींगे, त्यावर खालपर्यंत लोंबलेली चुनरी किवा ओढनी असा त्यांचा पेहराव असायचा. अशी पारंपारिक वेशभूषा करून लगबघिने जत्रेला निघायच्या. त्यात लहान मोठया सर्वच पोरीसोरी असायच्या. बैठकीजवळ आल्याबरोबर त्या आवाज न करत लाजून भरभर चालत निघायच्या. जोत्यावर बसलेले आमचे दादा तांबडा पटका सावरत मोठ्या आवाजात विचारायचे, 'इ दी छोरी तारं कांई बेटा ? त्यावर ती बया हसून म्हणायची,' हवं काका, इ दी मार छ,इ दी नानक्या वरलील, ये दी छोरा परलीलं छ'. मग कोणीतरी नवसाबद्दल विचारालं तर त्यावर ती बाई म्हणायची,    ' दी वरस वेगे काका, मारं छोरारं पेटे मांई घन्नो दुकरचं हिंगोली नांदेड से वेगे, घणे पिस्सा खर्च व्हेगे, कांयी फरक छेयी, जेती आब से वाघायाडीरे हातेमं आन उच् टाळेवाळ!' अज्ञानात सुख असतं ते असं.

तर अशी ही गर्दी उत्साहात वाघामायच्या मंदिरासमोर जमा व्हायची.  सर्व लोकं वाघामायची पूजा करून मनोभावे पाया पडतं. माया नववारी साडीचा पदर हातात घेऊन, 'वाघामाय, लेकराबाळालं सुखी ठेवं' असं म्हणून पाया पडायची.  मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात खाटीक पाणी टाकत टाकत चाकू घासत बसलेला असे. दुसरीकडे नारळ फोडले जायचे.  मग बोकड्याची पूजा करून त्यावर पाणी शिपडलं जाई. अर्थात त्या थंड पाण्याला तो 'रिस्पॉन्स' म्हनून अंगावरून उडवून देण्यासाठी बोकड आपलं अंगाची कातडी हलवत असे. या प्रकारालाच ' बोकड्याने 'झडती' दिली, नवस कबूल झाला!'  असं समजत खाटीक लगेच बोकडयावर  सूरी चालवत असे.

कापलेल्या बोकडाचं रक्त देवीला वाहून मग त्याचे चारही पाय एका दोरीने उलटे लाकडाला बांधून दोन माणसं मोठ्या लगबघीने त्याला घरी आनत. ते दोघे एव्हडया लगबघीने का चालंत असावे? याच उत्तर मला अजूनही कळलं नाही. बरीचशी 'देशी' प्रिय मंडळी दुपारपासूनच 'रिचार्ज' मारत 'फुल्ल' असायची. एखाद्या ओसरीत नाहीतर जनावरांच्या कोठयात त्या नवसाच्या बोकड्याची चिरफाड होई आणि गावात वाटण्यासाठी मटणाचे काही हिस्से पाडले जात. एखादा मांसाचा तुकडा- हाडुक मिळलं या आशेनं गावातील कुत्रे सतत जीभ काढत त्या कोठ्याजवळ उभी राहत. 

इकडे मटणाची तयारी होत असताना तिकडे बाया          'कोडड्यास' करण्यासाठी शिळवटावर तिखटमसाला काळमीरे वाटण्याची घाई करत. त्या दिवशी गावभर सर्व गल्ली-बोळीत मटण शिजण्याचा सुवास येई.  जवळजवळ सर्वच घरात मटण शिजत असे. मग पिणारी मंडळी आपल्या 'उद्योगात' गुंग होत असे. कोणी मोहा-हातभट्टीची कुणी देशी घेत. मग या खाण्यापिण्याच्या उत्सवात न पिणारी पोरंसुद्धा कधी कधी बाटली जायजी. 'आरं उलुकशी पी काय व्हतं नाही'  असा आग्रह करत न पिणाऱ्यालाही सराईत मंडळी थोडी दारू पाजत. पूर्वी आमचं देशीच दुकान होतं. नवसाच्या दिवशी सर्व वयस्कर गावकरी दुकानात गर्दी करत असत. त्यात डफडं वाजविणाऱ्या पासून सर्वच पिणारी मंडळी दुकानात येत. आलेल्या पाहुण्याला गावकरी मोठया आग्रहाने दारू दुकानात घेऊन यायचे. जत्रेसाठी आलेली फुटानेवाली नवसाच्या दिवशी गावात पाराजवळ फुटाणे विकायची.  मग पिणारे पेपर,धोतरात गुंडाळलेले फुटाणे, भारत-बबूलालाचे  नरडे, चिवडा किंवा क्वचीत सुक्का बोंबिल आणत. मनसोक्त गप्पा मारत, चिल्लमी-बिडीचा धूर काढत एक मेकाला आग्रह करत हि मंडळी दारू ढोसत.  खूप चढल्यानंतर पाहुण्याला आग्रहाना  पाजण्याचा कार्यक्रम होत असे. लोकं जावईबापु आनं 'इव्हायी' च्या खातीरदारीमध्ये काही कमी पडू देत नसत.   कंदील चिमण्यांच्या मिनमिनत्या अंधुक प्रकाशात फुरके मारत मटणाच्या कोड्ड्यास-भाकरीच जेवण होई.  बऱ्याचदा नवसाला आलेल्या पाहुण्याला 'फुल्ल' पाजून, मटणाचा पावणचार करून गावातील एखादी सोयरीक जुळविली जायची.

एकंदरीत, जत्रेचा पहिला दिवस भरपूर दारू पिऊन मटण खाण्याची चंगळ यातच जात असे. कधी कधी दारू पिणारे आपसात भांडण-तंटा करीत पण असली प्रकरण गावातच मिटवल जाई.  काही प्रकरण घडून गावाची शांतता भंग होऊ नये म्हणून बासंबा पोलीस स्टेशनहून दर वर्षी एक-दोन पोलीस शिपाई गावात येत.  बऱ्याचदा बंदोबस्त करून थकलेले पोलीस गावच्या रंगामध्ये रंगून गेलेली मी पाहिली आहे.  कधी कधी तेसुद्धा  'फुल्ल' होत. अर्थात त्यानंतर पोलीस पाटलाला गावातील शाळेवर त्यांच्या कोंबड्याची व्यवस्था करावी लागे. अशा प्रकारे - देवीची पूजा करून, नवस फेडून, मनसोक्त खाऊनपिऊन तृप्त होऊन लोकं जत्रेचा पहिला दिवस  साजरा करत.  दुसऱ्या दिवशी लोक उरलेल्या खुर-मुंडीचा समाचार घेत. पुढील चार दिवस गावात अशीच धूम असे. 

ज्याप्रमाणे धगधगत्या मातीच्या चुली-निखाऱ्यावर भाजलेल्या 'भाकरी' ची सर गॅसवरच्या 'ज्वारीच्या रोटी  ला येऊच शकत नाही त्याचप्रमाणे गावाच्या यात्रेची सर शहराच्या आनंदनगरीला येणे शक्य नाही. १९७८ च्या काळात बोटावर मोजावे एव्हडयाच लोकांच्या 'पोटावर हात' असायचा बाकी सर्वांची 'हातावर पोट' असायची. मोलमजुरी कष्ट करून कमवणे आणि मगच खाणे. दैनंदिनच्या गरजांच पूर्ण न होत असल्याने मागे काही शिल्लक ठेवणे शक्य नव्हते.  गावात सर्वत्र कुडानं-तुरहाट्याची माती शेणाने सारवलेली बसकी घरं होती. गावातील कित्येक घरांना कुलूपच नसायचे.  गावात लाईट नव्हती, रेडिओ नव्हता की सायकल. धोतर पांढरा कुर्ता किंवा चिकनी सुताची बनियन हाच पुरुषी पोषाख होता. क्वचीत एखाद्या शिकल्या गडीकडे 'बेळफाटी' म्हणजे पायजामा असायचा. आर्थिक  परिस्थिती गरीब असूनही गावात एकोपा होता. शिक्षणाचा दर्जा उत्तम होता.

आज सर्वत्र दारूबंदीची चर्चा आहे. त्या काळी अशा बंदीची गरजच पडली नाही. 'अति सर्वत्र वर्जयेत' प्रमाणे जर अति होत असेल तर वेळीच पाऊल उचलणे योग्य. कारण पूर्वी गावात खूप कमी कष्टकरी लोक दारू पित. शेतावर, रानमाळावर काबाडकष्ट करून, दिवसभर विहीर खोदून, खंटी खोदून काम करून थकलेले गावकरी शिन घालविण्यासाठी दोन घुट पोटात टाकायचे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसाच नसल्यामुळे त्याकाळी कुण्याही पोरांसोराना चैनीखातिर दारू पिताना मी तरी पाहिलं नाही. कदाचीत त्यामुळे आज गावातील बरीच मुलं उच्चशिक्षण घेऊन चांगली नोकरी करत असावी. हल्ली गाव सधन झालंय. भौतिक सुख घराघरात लोटांगण घालत आहेत. आधुनिकीकरनामुळे सर्व शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध असल्यामुळे कष्ठाची कामे उरली नाहीत. पण ती आधुनिकता विचारात आली नाही त्यामुळे गावात चैनीखातीर पिणारी युवा मंडळी वाढली आहे, असं मी ऐकून आहे. त्यातच मोबाईलच्या 'फ्री डेटा' ने त्यांना निष्क्रिय केलं आहे. पुढे येणाऱ्या काळासाठी हि एक धोक्याची चाहुल आहे. त्यामुळे 'उद्या गावाचं म्हणजेच देशाच भविष्य ज्यांच्या हातात' अशा युवकांनी वेळीच त्यातून सावरने आवश्यक आहे. माझे हे वैयक्तिक मत.

                                
 ©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
   ह मु औरंगाबाद ९८२२१०८७७५