हिंगोलीचे दिवस
माझ्या शिक्षणाचा प्रवास जरा खडतरचं होता. हिंगोलीला आठवी ते दहावी शिकतांना स्थानिक विद्यार्थी टापटीप, नीटनेटके आणि आत्मविश्वासू दिसायचे. अर्थात त्यांची भाषा शुद्ध असायची. आमचं थोडं वेगळं होतं. खेड्यातून आल्यामुळे एक न्यूनगंड आणि भाषेचा फरक होताच, त्यात मी थोडा लाजरा-बुजराचं होतो. खोली घेऊन राहत असल्याने स्वयंपाक आणि सर्व काम आटोपल्यानंतर उरलेला वेळ अभ्यासासाठी मिळायचा. समाधानासाठी वेळापत्रक तयार केलं तरी ते पाळल्या जाण्याची शक्यता धुसरच होती. खोली घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा स्थानिक विद्यार्थ्यांचे जीवन अर्थात खुपचं सुसह्य होतं.
दहावीला असतांना आधी पोटापाण्याची सोय, सकाळची श्री पडोले सरांची ट्युशन, अभ्यास आणि मग दुपारची शाळा असं वेळापत्रक होतं. शाळेत सर गणित शिकवताना आमच्या मनात मात्र संध्याकाळच्या जेवणाची लसावी मसावी चालायची. भल्या सकाळी उठून आम्ही स्वयंपाक करायचो. कोणी बघु नये म्हणून शेजारी जागे होण्याआधीचं दारासमोर आम्ही सडासुद्धा टाकत असू. प्रत्येक वेळी स्वयंपाकसाठी मदत करण्यासाठी जोडीदार भाऊ असेलच असं नव्हतं. कधी तेल नसायचं तर कधी पीठ तर कधी रॉकेल तर कधी पाणी! बऱ्याचदा आम्ही जवाहर रोडवरील 'बाबाजीका मंदिर ' हून सायकल हॅन्डलच्या दोन्ही बाजूला बकीटी अडकहून पाणी आणायचो. क्वचित रेल्वेपूलाअलीकडं डाव्या बाजूला असलेल्या सरकारी विहिरीतून पाणी आनलं जाई. सर्व सामान उपलब्ध असूनही स्वयंपाक पूर्ण होईलच याची शास्वती नसायची. मध्येच फर्रर्रर्रर्र आवाज करत चालणाऱ्या स्टोव्हच्या 'अंगात' येई. नोजलमध्ये कचरा अटकून मधूनच तो बंद पडून आमची परीक्षा घेई. मंदिरात एक शांत दिपज्योत जळावी तेव्हडीच त्याची छोटीशी ज्योत जळताना दिसे. मध्येचं रॉकेलचा वास, भडका! म्हणून आम्ही प्लान 'बी' म्हणजे चूल तयार ठेवायचो. गावाकडील गडी शेतातील मालटाळ मोंढ्यात विकायला आणायचे मग त्यांच्याही भाकरी आम्हाला थापाव्या लागायच्या. कितीदा शाळेत, ट्युशनमध्ये खाकी पॅन्ट किंवा सदऱ्याला हळद किंवा स्टोव्हची काळीख लागलेली दिसायची. बऱ्याचदा भुकेच्या बेचैनीने मी अर्धकच्ची खिचडी मी खाल्लेली आहे.
त्या काळी आमच्याकडे रोज सकाळी एक काका खास वृतपत्र घेण्यासाठी येत असतं. आमच्याकडे ' दैनिक मराठवाडा' वृतपत्र येतं असे. वाचल्यानंतर काही तासांनी ते परत आणूनही देत असत. मी स्वयंपाक करत असतांना मध्येचं ते आले तर मला खूप त्रास होई. अशाच एका वैतागलेल्या सकाळी मी पोळ्या करत असतांना त्यांनी आमचं दार वाजवलं. तव्यावर पोळी आन हात पिठानं माखलेले अशा अवस्थेत मला त्यांचं येनं खटकलं. दार उघडताच रागाने मी त्यांच्या हातात वृतमाणपत्र दिलं आणि नकळत," काका तुम्ही स्वतः वृतमानपत्र विकत का घेत नाहित हो !" असे शब्द माझ्या तोंडून निघाले. एका छोट्या मुलाचं असं असंस्कारी उद्धट बोलण्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनीही मला भयंकर शाप देऊन टाकला, 'तू मॅट्रिक पास होणारचं नाहीस, मी तुला हे लिहून देतो!' त्यांच्या बोलण्यात महर्षी दुर्वासाचा राग होता. त्या काळी मॅट्रिकची परीक्षा पास होनं आजच्या सारखं 'बायें हात का खेल' नव्हती.
दार बंद केल्यानंतर माझं मलाच खूप वाईट वाटलं. माझ्यापेक्षा ते वयाने खूप मोठे होते. माझ्या कडून मोठी चूक झाली होती. मी त्यांना तसं नको बोलायला पाहिजे होतं. पण पश्चाताप करून फायदा नव्हता, बाण सुटला होता. संध्याकाळी हे प्रकरण माझ्या वडील भावास सांगितल्यानंतर त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली. खरंच त्यांचा शाप खरा ठरला आनं ऐन मॅट्रिकच्या कुरुक्षेत्रावर माझ्या घोडदौड स्वैर पळणाऱ्या रथाचा चाक धसला तर ! थोडी धाकधूक होतीच.
दहावीत असतांना माझी उठण्याची वेळ आणि शाळेच्या वेळामध्ये सात तासाचा फरक होता. भल्या सकाळी स्टोव्ह किंवा चुलीवर स्वयंपाक मग पडोले सरांची ट्युशन आटोपून सातला मी आमचं हिंगोलीचं शेत गाठत असे. सकाळच्या शांत एकांतात धुऱ्यावरील बाभलीखाली बसून अभ्यास करायला मला खूप आवडे. सुट्टीच्या दिवशी मी दिवसभर शेतातचं असे. खाण्यासाठी गव्हाच्या ओंब्या कधी हरबरा आनं बाजूलाच विहीर होती. अकोला रोडवर त्याकाळी विशेष रहदारी नव्हती. मोंढ्यात माल घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या, क्वचित एखादा ट्रक, बस किंवा पैंडल रिक्षा खुळनंखुळनं जातांना दिसे. आदर्श महाविद्यालयाच्या कॉलेजकुमार-कुमारीचे झुंडच्या झुंड सायकलवर जोरजोरात हसत, बडबड करत जाताना नजरी पडे. त्यांच्या बोलण्या खिदडण्यात अभ्यासाच्या ताणतणावाचा लवलेशही दिसत नसे. एकदा का दहावी झाली कि हुश.श...श आपण मोकळे! मग आपणही असंच रंगबिरंगी कपडे नेसून सायकलवर कॉलेजला जाणार, मधूनच असं स्वप्न मी रंगवत असे. दहा वर्ष नेसत आलेली खाकी पॅन्टचा विट आला होता.
शाळेत दुपारून सुट्टी होती. खोलीवर येऊन मी लगेच सायकलनी शेतात गेलो. माझ्या अभ्यासाच्या जागी जाणार तोच शेतातील धुऱ्यावर मला दोन सायकली दिसल्या पैकी एक लेडीज होती. शेतात दूरवर कुणीच दिसत नव्हते. थोडया वेळानी मी पाण्यासाठी विहिरीकडे गेलो तर तेथील झाडाखाली एकप्रेमीयुगल गप्पा मारताना दिसले. त्या जोडप्याला बघून मात्र मला एव्हडी खात्री पटली कि प्रेम फक्त आंधळं नसतं तर त्याला अनेक डोळ्याचे आजार असतात, किंबहुना डोळेच नसतात म्हणा की! बाजूच्या शेतगड्याला मी त्यांच्या येण्याबद्दल विचारलं तर तो काहीच बोलेना. परत जाते वेळी मी त्यांना मुद्दाम हटकलो. त्यावर त्या जोडप्याने 'हे शेत आमचंच आहे' असं उद्धट लबाडी मारली. नंतर ते कधी दिसले नाही.
आमच्या शेताच्या उत्तर धुऱ्यावरून एक पायवाट ऍड. पंडितराव देशमुख साहेबांच्या शेताला जाते. अधूनमधून साधारण अकरा वाजता ऍड. देशमुख साहेब आपल्या राजदूत फटफटीने खेताकडे येतं. निळ घातलेला पांढरा शर्ट, बेलबॉटम आणि थोडे झूलत चालणारे देशमुख साहेब मेन रोडवर गाडी उभी करून झपाझप त्यांच्या शेताकडे जातं. त्याच्या पाठीमागे कायम एक गडी चालत असे. त्याच पाऊलवाटेवर मुद्दाम रस्ता अडविल्यासारखा मी लांब पाय टाकून अभ्यास घोकत बसलेला असे. वकील साहेब आले कि मी थोडासा रस्त्याच्या बाजूला सरकून जाई.
एके दिवशी माझ्या जवळूनचं ते रस्त्याने पुढं गेले. मग थोडं थांबून मागे आले, मला माझं नाव आणि वर्ग वगैरे विचारलं. माझे मोठे बंधूसुद्धा वकील असल्यामुळे मला देशमुख वकिल साहेबांची ख्याती माहित होती. थोडी विचारपूस करून,'बाळा मी तुला नेहमी येथे अभ्यास करतांना बघत असतो, मॅट्रिक पास करून पुढं तू खूप मोठा होशील!' असे बोलून ते निघून गेले. त्यांच्या शुभेच्छानी काही क्षणासाठी का होईना मी सुखावलो.
त्या वेळेस 'मोठं होणं म्हणजे नेमकं काय' याची मला विशेष समज नव्हती. पण त्यांनी मला माझ्या मॅट्रिकबद्दल चांगला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या एव्हडं मात्र मी समजलो होतो. अशा प्रकारे दहावीतचं एका काकांनी शाप तर ऍड देशमुखांकडून मला शुभेच्छा मिळाल्या होत्या. अशा ही परिस्थितीत दहावी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण करून मी औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. आज नसलं तरी त्याकाळी 'इंजिनियर' या शब्दाला भलतंच वलय होतं. शेवटी इंजिनियरचं झालो.
नवीन पिढीला आपण सोसलेले कष्ट, खालेल्या खस्ता सांगून काही उपयोग नाही. 'नको तुमच्या त्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाची कहाणी' म्हणून ते ऐकायचं टाळतील. जे कष्ट आपण सोसले तशी वेळ मुलांवर येऊ नये म्हणून पालक हाल अपेष्टा सहन करून त्यांचा मार्ग सुकर करतात.
पाण्यातील मासा झोपणार कैसा,
जावे त्यांच्या वंशा, तेंव्हा कळे l
म्हणतात कि, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः बाप झाल्याशिवाय त्यांना 'बाप' कळणारच नाही.
हल्ली हिंगोलीच्या त्या शेताचं प्लॉटिंगचं काम चालू आहे. रस्त्याची रुंदी वाढली, बैलगाडी, घन्टी वाजवत जाणाऱ्या सायकली जाऊनं आधुनिक वाहनाची वर्दळ वाढली. अधून मधून मोजणी आणि तत्सम कामानिमित्त मला शेतात जावं लागतं. शेतात फिरतांना धुऱ्यावरील अभ्यासाची जागा मला अजूनही आठवते. काही दिवसांनी ती जागासुद्धा सिमेंटचे जंगल व्यापून घेईल, राहणार फक्त आठवणी!
©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह. मु. छ. संभाजीनगर
ooo ooo ooo ooo
No comments:
Post a Comment