ad1

Saturday, 20 July 2024

ओळखलं का मॅडम तुम्ही मला...


ओळखलं का....


नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस होता. नवीन वर्ष आणि रविवारची हक्काची सुट्टी असा 'सोने पर सुहागा..' योग क्वचितच येत असतो.  यावर्षी तो योग जुळून आला होता.  सुट्टीमूळे भरभरून शुभेच्छा द्यायला-घ्यायला सर्व हात मोकळे होते. 'आली त्याला पाठविली' शुभेच्छा शेअर फॉरवर्ड करण्याचा सोपा कार्यक्रम दिवस भर चालू होता. 

आपण सर्व उत्सवप्रेमी.  या वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकं जरा जास्तच उत्साही होते. सुट्टीमुळे लोकांनी निरनिराळे बेत आयोजित केले होते. नवीन वर्षाचे नवीन संकल्प करणाऱ्याचा आज पहिला दिवस!  कुणी ट्रेकिंग, कुणी भेटीगाठी तर काही नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या पार्टीच्या तयारीला लागले होते. आमचं मात्र असं काही नियोजन नव्हतं. थोड पुस्तक वाचून दुपारची थोडी झोप एव्हढचं.  सकाळपासून मोबाईलवर कॉल चालू होते अर्थात ते शुभेच्छा देणाऱ्याचे. अतिप्रिय लोकांना फॉरवर्डेड ग्रीटिंग पाठवणं कोरडी औपचारिकता पूर्ण केल्या सारखं वाटतं.  त्यामुळे दुपारपर्यंत मोबाईलवर शुभेच्छाची देवान-घेवान चालू होती. 

झोप लागणार तेव्हड्यात तीला एक कॉल आला. शुभेच्छा देणारं कुणी असेल म्हणून तीनं फोन उचलला. पलीकडला व्यक्ती "'मॅडम हैप्पी न्यू इअर, मला आज तुम्हांला भेटायचं आहे. मी तुषार, तुमचा खूप जुना विद्यार्थी. जरा आठवा मॅडम तुम्ही मला गणित शिकवलं. बघितलं तर नक्की ओळखसाल. माझं नाव तुषार...!"

पंचवीस वर्षात आमच्या अकॅडमीमध्ये बरेच विद्यार्थी  शिकून गेलेत. वयानुसार चेहऱ्यात खूप बदल झालेले असतात.  दहावीत शिकलेला मुलगा वीस वर्षानंतर शिक्षण, नोकरी आणि लग्न अशी प्रगती करून एक-दोन मुलांचा बाप झालेला असतो.   त्यामुळे जास्त वर्षानंतर असे कुणी विद्यार्थी भेटले तर सहसा  त्याच्या बालपणीचा चेहरा आम्हाला आठवनं शक्य नसतं. शाळेत जाणारे विद्यार्थी जेंव्हा ''कम्प्लिट मॅन' बनून सरळ 'ओळखलं का मॅडम/सर?' म्हणून समोर उभे राहतात तेंव्हा खूप पंचाईत होते. यावर एकमेव उपाय - 'हो रे ओळखलं तुला!' असं खोटं खोटं बोलायचं. त्यालाही थोडं बरं वाटतं. मग आपण बसायचं आठवत!  थोड्या वेळाने लिंक लागून जाते.  वयानुसार स्मृतीत फरक पडतो, तो असा.

काही महिन्यापूर्वी याचं तुषार व्यक्तीचा फोन आला होता. कुठे तरी गुजरातला चांगल्या कंपनीत नोकरीं करत आहे असं तो बोलला होता.  तुषार असं आपलं नाव सांगून त्याने त्याचा थोडा परिचयसुद्धा दिला होता. कधी तरी येऊन भेटेन असही तो बोलला होता.  पण आज तो औरंगाबादला होता त्यामूळे चार वाजता आम्ही त्याला घरी बोलावील. ठरल्याप्रमाणे तुषार घरी आला. नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आम्ही त्याचं स्वागत केलं. सोफ्यावर बसताच पानावलेले डोळे पुसत तो बोलत होता. त्याचे भावनिक अश्रू बघून आम्ही सुद्धा थोडं बुचकल्यात पडलो कि आम्ही असं काय केलं. भरलेला बांध फुटावा तसा तो सुरु झाला -

"खरं तर मॅडम मी तुषार नाही. मी माझी खरी ओळख तुमच्याकडून लपवून तुमच्याकडे शिकायला आलो होतो. तुमच्याकडे आलो तेंव्हा मी गावाकडे शाळेत सहावी शिकून मी शाळा सोडली होती. घरची परिस्थिती बरी नव्हती. पैशाचा चनचन होती. परिस्थिती बघून मला भावानी औरंगाबादला बोलावलं. बुद्धिमता आणि चुनुक ओळखून भावाने मला सरळ बाहेरून दहावीची परीक्षा देण्याचा सल्ला दिला.  सहावी शिकून सरळ दहावीचा अभ्यास करून परीक्षा देने हे मला तरी दिव्य काम वाटत होतं. मी औरंगाबादला दोन-तीन ठिकाणी ट्युशनसाठी चौकशी केली पण जास्त फि मूळे शिकवणी लावू शकलो नाही. शेवटी तुम्ही मला शिकविण्याची तयारी दर्शविली.  माझी पार्शवभूमी तुम्हांला कळू नये म्हणून मी ओळख लपवून तुमच्याकडे शिकायला येत होतो." यशाच उंच शिखर सर केल्यानंतर माणसात सत्य सांगायचं बळ निर्माण होतं. तसा तो बोलत होता. त्याच्या या बोलण्यामुळे आम्हाला थोड धक्का बसला.

"सहावी ते दहावी पास!  हे कसं काय ?" हा प्रवास मला माहित करायचा होता. 

"त्या वेळेस फॉर्म १७ भरून सरळ दहावीची परीक्षा देता येत होती. एका शिक्षणअधिकाऱ्याने त्या बाबतीत मला थोडी मदत केली.  सातवी, आठवी आणि नववी हे तीन वर्ष मी शाळेत नं गेल्यामुळे मला दहावीचं गणित मुळीच जमत नव्हतं. अगदी उणे उणे अधिक सुद्धा जमत नव्हतं. तुमच्याकडे मी अगदी बेसिक पासून गणित शिकत दहावीचा पूर्ण गणित शिकुन गेलो.  घरच्या परिस्थितीमूळे तुम्ही मला कधीही फि मागितली नव्हती. जसी जमेल तशी मी देत होतो."

" दहावी नतंर  पुढं काय शिकलास ?" 

"दहावी पास झाल्यामुळे मी डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकलो. पुन्हा नशिबी डिप्लोमाचं मॅथ आलं. त्यासाठी मी पुन्हा तुमच्याकडे यायचो.  डिप्लोमा नतंर मला महिंद्रा, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यामध्ये नोकरी मिळाली. दोन कंपन्याच्या अनुभवानंतर अहमदाबाद जवळील मारुती सुझुकी ऑटोमोबाईल कंपनीमध्ये मला चांगली नोकरीं मिळाली.  मागे वळून पाहिलं तर वाटतं तुम्ही त्या वेळी मॅथ शिकविल नसतं तर आज मी नोकरी न करता मला शेतात काम करावं लागलं असतं." 

"आता तू शिक्षण सोडलं का ?"

" नाही. डिप्लोमाच्या आधारे मी बिट्स पिलानी मध्ये बी. टेक. इंजिनियरिंग शिकत आहे. साढे तीन वर्षात माझं बी. टेक. सुद्धा पूर्ण होईल."  मला समजलं. एव्हड्यावरच तो थांबणार नव्हता पुढे शिकुण यशाच अजून उंच शिखर गाठण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात दिसत होती.

सहावी वर्गात शाळा सोडणारा विद्यार्थी आज चक्क बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि, पिलानी या देशात नावाजलेल्या प्रीमियर शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होता. त्याची जिद्द, मेहनत आणि धडपड कौतुकास्पद होती. अगदी रुळावरून घसरलेली शिक्षणाची गाडी त्याने आपल्या जिद्द आणि मेहनतीने पूर्वपदावर आणली होती.  विशेष म्हणजे त्याच्या शैक्षणिक प्रवासात आमच्याकडून जो थोडाफार हातभार लागला त्याची त्याला जाण होती.  आम्ही त्याला विसरलो होतो पण तो विसरला नव्हता. याची उतराई म्हणून तो खास भेटीला आला होता.  घरातील चांगल्या संस्काराशिवाय हे शक्य नाही.

शिक्षण क्षेत्राची अवकळा आणि विद्यार्थ्यांवर होतं असलेले संस्कार याबद्दल जास्त लिहायची गरज नाही.
कृतज्ञता व्यक्त करने तर दूर हल्ली शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुचं नावसुद्धा माहित नसतं. तशी त्यांना गरजही वाटत नाही.  भरपूर पैसा व सर्व सुखसोयी पायाशी लोळत असल्यामुळे गुरु-शिष्य हे नातं निर्माण होताना दिसत नाही. आपण जे कष्ट केले ते मुलांना नको म्हणून पालक त्यांच्या पंखात उंच उडण्याच बळसुद्धा निर्माण होऊ देत नाही. 'नवीन पिढी, जनरेशन गॅप' आपले विचार जुनाट आणि बदलाच्या नावावर पालक सर्व काही धकवून घेत असतात.  अशात एखाद्या खेड्यातील विद्यार्थी शिक्षकांचा शोध घेत येतो तेंव्हा अंधारात एक आशेचा किरण चमकल्यासारखा भास होतो.  आपल्या चांगल्या कामाची ती पावती असते. या सारखा दुसरा आनंद नसतो जो पैशात मोजण्यासारखा नसतो.

"तू आमच्याकडून ओळख लपविली,  मग तुझं खरं नाव किंवा ओळख आता तरी सांग?" माझी उत्सुकता त्याचं खरं नाव माहित करण्यात होती. 

चहाचा कप टेबलावर ठेवत त्याने लगेच खिशातून नोकरी करत असलेल्या कंपनीचा आय-कार्ड काढला. त्यावर नाव प्रिंट केलं होतं - शिवाजी धुपे ! ती एक ग्रेट भेट होती. नवीन वर्षाचा हा अनुभव येणाऱ्या काळात आम्हाला चांगले कार्य करण्याचे बळ देणारा होता.  एक आठवण म्हणून त्यांनी आनलेल्या मोठया पुष्पगुच्छासोबत आम्ही फोटो काढला.

"आमच्यामुळे तुझं भलं झालं असं तुला वाटत असेल तर तू सुद्धा तूझ्या जीवनात सभोवतालच्या लोकांना अशीच मदत कर बाबा"  मी सल्ला दिला.  प्रगतीचा आलेख असाच चढता रहावा म्हणून पुढील वाटचालीबद्दल थोडं मार्गदर्शन आणि शुभेच्छा घेऊन त्याने निरोप घेतला.

© प्रेम जैस्वाल पेडगावकर
    ह. मु. औरंगाबाद 
    ९८२२१०८७७५






Monday, 15 July 2024

लगीन करणार पण अंबानी सारखं!

लगीन करणार, पण अंबानी सारखं!
हुश्श! एकदाचा अंबानी विवाह सोहळा पार पडला. मागील काही दिवसात मीडियाने या विवाह सोहळ्याचे क्षणचित्र टाकून अक्षरशः कहर केला होता. 'एकदाच लगीन लावा आणि आम्हाला मुक्त करा'  तर 'हे लग्न नाही सर्कस' ' किती हा देखावा', 'किती हा भम्पकपणा' 'संपत्तीचं ओंघळ प्रदर्शन' अशी बरीच टिका माध्यमातून ऐकावयास मिळाली. आंतर्देशीय कलाकार त्यांनी कोटीने घेतलेली रक्कम, बॉलिवूडची हजेरी, राजकीय मंडळीची उपस्थिती ते रामदेवबाबाचं नृत्य अशा या ना त्या कारणाने हा विवाह सोहळा खुपचं गाजला. 'अति सर्वत्र वर्जयेत' प्रमाणे कोणतीही गोष्ट जेंव्हा प्रमाणाबाहेर होत असेल तर त्याचा विट येण साहजिक आहे .

लोकसभा निवडणुकीनंतर देशात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली ती घटना म्हणजे - रिलायन्स इंडस्ट्रिचे सर्वेसर्वा मुकेश अंबानीच्या चिरंजीवाच लग्न. विवाहसोहळा आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी एव्हडी भव्य होती कि भविष्यात २०२४ या वर्षाच्या विशेष घटनेत या विवाहाची नोंद निश्चित होईल. अगणिक उद्योगामूळे उद्योग जगत, मीडिया हाऊस, राजकीय संबंध त्यामुळे देशाच्या मीडिया हाऊसने या सोहळ्याला लार्जर देन इमेज कव्हरेज देऊन या लग्न सोहळ्याला अक्षरशः उचलून धरलं होतं. लग्नाच्या एकूण एक क्षणाची रनिंग कॉमेन्ट्री, व्हिडीओ क्लिप इन्स्टासारख्या इतर समाज माध्यमावर पोस्ट, व्हायरल होत होती.  विविध क्षेत्रातील मान्यवरांची पाहुण्याची एंट्री, त्यांचा पेहेरावा,  फिल्मी नृत्य,  स्वागत, महागडे रिटन गिफ्ट इ. क्षणोक्षणी दाखविली जात होती. देशाच्या उच्चप्रतिष्टीत अतिश्रीमंत घराण्याचं लग्न अर्थात तिथे आमंत्रित निमंत्रित सुद्धा त्याच स्तरावरची मंडळी असणार.  अमिताभ पासून रजनीकांत पर्यंत सर्वच फिल्म स्टार इव्हेंटमध्ये आले म्हणजे इव्हेंटला चार चांद लागणारच. एरव्ही प्रोटोकोल वगैरे पाळणारी मंडळींनी कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात त्यांनी काही कसर सोडली नाही.  त्यामुळे सर्व फिल्मी कलाकाराची हजेरी लोकांनी पाहिली. एकंदरीत या लग्नसोहळा 'नं भूतो नं भविष्यती' ठरवण्यात अंबानी परिवारांनी काहीच कसर सोडली नाही, असो. 

देशात एव्हडा भव्य विवाह सोहळा साजरा होत असतांना याची चर्चा समाजात होणे साहजिक आहे.  लग्न संपन्न झाल्यानंतर खर्चाचे नेमके आकडे समोर येतात. तो पर्यंत लोक त्या खर्चाचे अंदाज बांधत असतात. हौसेला मोल नाही आणि लग्न एकदाच होतं, हे वाक्य सर्वासाठी लागू होतं. असं म्हणतात कि या लग्नात अंबानी परिवाराने ५००० कोटी रुपये खर्च केले जे कि त्यांच्या एकूण संपतीचा हिशोब लावता ती रक्कम फक्त संपतीच्या ०. ५% टक्के रक्कम असू शकते. 

मग अंबानीने एव्हडा खर्च करावा का? याबदल समाज माध्यमात दोन सुर वाचावायस मिळतात.  पहिला अंबानी हे जगातील प्रतिष्ठीत उद्योगपती पैकी एक आहेत. ते त्यांच्या विविध उद्योगाद्वारे संपती कमवून, शासनाचा कर भरून आणि गरिबांना दानधर्म करुन  आपल्या मुलाच्या हौसे खातीर भव्य लग्नसोहळा साजरा करत असतील तर त्यात वावगं काय ? तर दुसरा सुर असा कि - असतील ते श्रीमंत पण संपतीच असं ओंघळ प्रदर्शन त्यांनी का करावं? पैसा आहे ठीक पण दाखवायची काय गरज? समाजातील व्यक्ती सर्वच बाबतीत श्रीमंत लोकांचं अनुकरण करत असतात. संस्कृती वरून खाली झिरपत येते असं म्हणतात. आज अंबानी लग्नावर ५००० करोड खर्च करत आहेत उदया इतर धनाड्य उद्योगपती त्यांचा कित्ता गिरवतील. आणि अशा महागड्या लग्नाचं लोन खालपर्यंत झिरपत आलं तर लोकांना ते परवडेल का?

देशात या पूर्वी अशी लग्न संपन्न झाली नाहीत असं मुळीच नाही.  हल्ली समाजात जे विवाह सोहळे संपन्न होतात ते अशाच 'बिग फॅट' लग्नाची कॉपी असते. किंवा एखाद्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटाच अनुकरण केलेलं असतं.   चित्रपट चालावा यासाठी बॉलिवूड मंडळी आवास्तव असं लग्नाचं डेकोरेशन, कपड्याची फॅशन, मेजवानी,  मेकअप, डीजे असा 'शावा शावा' शो ऑफ दाखवतात. चित्रपट सृष्टीचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. समाजातील नवे श्रीमंत मंडळी मग त्याचं आणि तशाच स्टाईलचं मुकाट अनुकरण करत बसतात. चित्रपट आणि वास्तविक जीवनातला फरक त्यांना कळत नाही. अंबानी मुळात श्रीमंत म्हणून त्यांनी उच्च दर्जाचे डेकोरेशन, मेजवानी, किंमती पेहराव, इत्यादि खर्च केलेत. ते बघून समाजातील लोकं जर तशीच सजावट, पेहेरावं किंवा इतर गोष्टीची नकल मारण्याचा प्रयत्न केला तर कठीण आहे. आणि ह्या संसर्ग रोगाची बाधा होण्यास जास्त वेळ लागणार नाही.  असंच घडलं गेलं तर उदया स्थळ जुळवताना मुली किंवा मुलाकडील मंडळी एक दुसऱ्याकडून अशाच 'चांगल्या लग्नाची' अपेक्षा करणार नाही का? मग ज्याची कुवत नाही अशा गरीबानी आपल्या मुलांची लग्ने कशी लावायची? बरं ज्यांच्याकडे आहे त्यांचं ठीक पण जे गरीब आहेत त्यांनी आपल्या मुलांची लग्न कशी करावी ?  ज्यांची आयपत नाही अशा कुटुंबाला पतपेढी किंवा हातउसने पैसे उचलून लग्न करावी लागतील ज्यामुळे समाज कर्जबाजारी होऊन समाजाचं आर्थिक आरोग्य धोक्यात येण्याची संभावना उदभवेल.

आज श्रीमंत लोकांनी लग्नाची व्याख्याच बदलुन टाकली आहे. लग्नात लग्नविधी आणि मंगलआष्टके अगदी दुय्यम स्थानी असतात.  पाहुण्याची राहण्याची व्यवस्था, भव्य मेजवानी,  डेकोरेशन, पेहेराव आणि संगीत डीजे यावरच सर्वांच लक्ष केंद्रित असतं. त्यातच आपली धम्मक दाखविण्यासाठी राजकीय नेते बोलविले असतील तर सर्व विधी बाजूला ठेवून प्रथम त्याची सरबराईस केली जाते.  लग्न आता विवाहविधी पुरती मर्यादित न रहाता कुटुंबाची 'आर्थिक शक्ती' दाखविण्याचे सोहळे झाले आहेत. पूर्वी घरासमोर किंवा शेतामध्ये मांडव टाकून लग्न उरकली जायची.  कोणत्याही प्रकारची भम्पकबाजी बघावयास मिळत नसे.  कुणी जास्तच करत असेल तर त्यास नावं ठेवली जायची.  जसं जसा समाजाचं आर्थिक स्तर सुधारत गेल तसं त्यात आपल्या सोयीनुसार बदल होत गेले.  त्याला तडका दिला बॉलिवूडच्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम आपके है कौन आणि करण जोहरच्या 'कभी ख़ुशी कभी गम' सारख्या चित्रपटानी! चित्रपटाचं अनुकरण करत लग्नाचा खर्च किती तरी पटीने वाढत गेला. हा संसर्ग रोग समाजाला एव्हडा गतीने लागला कि आज खेड्यातील लग्न सुद्धा शहरातील मोठंमोठ्या मंगल कार्यालयात साजरी होतात. पैसा नसेल तर वेळ प्रसंगी कर्ज किंवा हातउसने पैसे उचलून ती साजरी केली जातात. बऱ्याच सोयरीक जुळवतानाचं  'लग्न शहरात करावं लागेल बरं का, हॉल उत्तम हवा!' अशी अट टाकली जाते. किंवा 'तुम्हांला झेपत नसेल तर लग्न आमच्याकडे होईल' अशी मुलाकडील कुटुंबाकडून अट टाकली जाते. एकंदरीत मुलीच्या पालकांना कमी लेखण्याचा हा प्रकार असतो. ना ईलाजाने मुलाकडच्या मागण्या पूर्ण करण्यात मुलीचा बाप कोणतीही कसर सोडत नाही.  बऱ्याच लग्नात आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मंडळी वर-वधूची भेट न घेता परत जातात. कारण दोन्ही मंडळीकडील फोटोग्राफरचं फोटोशेशन संपता संपत नाही. ताटकळत बसलेल्या लोकांना वधू-वराच दर्शनपण होऊ देत नाहीत. मंगलाष्टकच्या वेळी तर पाच-सहा फोटोग्राफर नवंदम्पत्यांना घेरून उभे राहतात.  अमाप खर्च करून विवाहमुहूर्ताची वेळ न पाळता  ३-४ तास पाहुण्यांना अक्षरशः वेठीस धरलं जातं. २५ ते ५० लाख रुपये खर्च केलेल्या लग्नात पाहुण्यांच्या जेवण व इतर व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतात.  समाजात आधीच लग्नाच्या नावाखाली असे अनिष्ट प्रकार चालू असतांना अंबानीने अफाट खर्च करुन आधीच बिघडलेल्या लग्न चालरीतीला डबल तडका दिला असा ही सूर निघत आहे.  

चर्चेचा दुसरा सुर असा कि - विवाह सोहळ्यावर अंबानी ५००० खर्च करतात यात गैर काहीच नाही.  त्यांच्याकडे आहे त्यांनी खर्च केलेत.  संबंधित लोकांना रोजगार व पैसा मिळाला.  लग्न सोहळा हा एक मोठा उद्योग झाला आहे.  देशातील किती तरी उद्योग हे लग्न आणि लग्नाच्या संबंधित खरेदीवर अवलंबून आहेत.  फक्त कपडे उद्योगाचाचं विचार केल्यास लग्नसराईत हा उद्योग भयंकर तेजीत असतो.  देशात वर्षाला किती तरी हजार लग्न होतात. शहरी लग्नाचा खर्च साधारण १५ ते ३० लाखा पर्यंत जातो तर गावखेड्यात हा खर्च साधारण १० लाखापर्यंत जातो.  अर्थात त्यामुळे १५-३० लाख रुपये परत चलनात येत असतात. मुळात करन्सीचा अर्थ चलन,  थांबला तो पैसा काय कामाचा? शेवटी पैसा कमवायचा कशासाठी? कमविलेला पैसा कर देऊन तो विवाह खर्चाद्वारे पुन्हा चलनात येत असेल तर त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगाची भरभराट होईल.  त्याचीही पोटं भरतील.  त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे हातभारच लागणार.  

कोरोना काळात या गोष्टीची प्रचिती झाली होती. शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विवाह सोहळ्यावर बंदी घातली होती.  त्यामुळे विवाह साहित्याचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजक मंडळीचे व्यवहार ठप्प होऊन त्यांच्यावर  उपासमारीची वेळ आली होती. त्यात मंडप डेकोरेशन, कॅटरिंग, फुल रांगोळी सजावट, पूजेचे साहित्य, बँड-डीजे, प्रकाशयोजना, मेकअप कपडे, सोने चांदीचे व्यापारी यांचा समावेश होतो.  विशेष म्हणजे लग्नसमारंभात मोठा खर्च हा विवाह कार्यालयासाठी होतो. कोरोना काळात करोडो रुपये खर्च करुन बांधलेले भव्य विवाह कार्यालयं लग्न समारंभाविना ओस पडून बंद पडली होती.  मग त्यांनी कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, नोकरांना पगार कसा दयायचा? थोडक्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत इतर वस्तू प्रमाणे लग्न सोहळ्याचासुद्धा मोठा हातभार लागतो.

'हौसेला मोल नसतं'. लग्न एकदाच होतं तेंव्हा ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी अवश्य खर्च करावा. मुकेश अंबानिकडे अफाट पैसा खर्च करण्याची क्षमता होती त्यांनी पैसे खर्च करुन हौस केली पण इतरांनी मात्र त्याचं मूकाट अनुकरण करू नये.  'अंथरून पाहूनच पाय पसरावे.' कारण विवाह हा शक्ती प्रदर्शनासाठी नसून वधू-वर आणि समाजातील दोन कुटुंबांना जवळ आणणारी संस्कारविधी आहे.   


©प्रेम जैस्वाल पेडगावकर (ह मु छ. संभाजीनगर)
9822198775 

Friday, 5 July 2024

बॅटरी चा शोध




Alessandro Volta
अलीसॅनड्रो व्होल्टा : बॅटरीचा जनक

बॅटरी.  आज वीजेप्रमाणेच बॅटरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  मोबाईलची बॅटरी, लॅपटॉपची बॅटरी, घड्याळाची बॅटरी, दोन-चाकी वाहनांची बॅटरी आणि एव्हडच नाही तर वीज गेल्यानंतर बॅक-अपसाठी आवश्यक असते ती इन्व्हर्टरची बॅटरी. आज जेंव्हा सर्वत्र संगनकीकरण होऊन 'डाटा' साठवून ठेवनं जोखमीचं काम झालं असल्यामुळे बॅटरीच महत्व जास्तच वाढलं. आपण वापरतो त्या विजेच्या निर्मितीचा शोध लागण्याआधी वैज्ञानिकांनी बॅटरीचा शोध लागला, हे विशेष. हा महत्वाचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांच नाव होतं- अलीसॅनड्रो व्होल्टा. आणि हा शोध लागला एका छोट्या प्राण्याच्या प्रयोगातून. तो प्राणी म्हणजे एक बेडुक ! 

इटलीचा वैज्ञानिक, गल्व्हणीच्या संशोधनापूर्वी  वैज्ञानिकांना वीजेचे दोन प्रकार  माहित होते एक म्हणचे आकाशात चमकणारी नैसर्गिक वीज आणि दुसरी घर्षणाने तयार होणारी  इलेक्ट्रिस्टस्टिक म्हणजेच कृत्रिम स्थिरवीज. कृत्रिम स्थिर विजेचा शोध लागूनही त्याचा पाहिजे तेव्हडा उपयोग होत नव्हता. इलेक्ट्रोस्टस्टिक जनरेटर, इलेक्ट्रोस्टस्टिक बॅटरीचा उपयोग त्याकाळी काही वैज्ञानिक प्रयोगासाठी करत. तर जादूगार थोडं चमत्कार, मनोरंजन करण्यासाठी करत. थोडक्यात विजेला तेव्हड महत्व नव्हतंच. गल्व्हणीच्या प्रयोगानंतर मात्र विजेच्या शोधाला एक नवीन कलाटणी मिळाली. 

गॅलवानीचे विजेसंबंधित अनेक प्रयोग केले होते. त्यापैकी त्याचा बेडकाचा प्रयोग खूप महत्त्वाचा होता. या प्रयोगात गल्व्हनीनं एका मृत बेडकाचा पाय प्रयोगासाठी घेऊन त्यास इलेक्ट्रोस्टस्टिक जनरेटरन स्पर्श केला असता त्या पायानं त्यात जीव आल्यासारखं जोरात झटका मारत होता. मग त्यानं हाच प्रयोग इलेक्ट्रोस्टस्टिक जनरेटर न वापरता केला. त्यानं फक्त एका लोखंडी फेन्सला बेडकाचा पाय बांधून त्यास पितळी हुकने स्पर्श केला असता बेडकाच्या पायाने झटका दिला. या प्रयोगावरून गॅलवानी या निष्कर्षावर पोहचला कि बेडकाच्या शरीरात एक प्रकारची वीज निर्मिती होत असावी. त्या विजेस त्यानं बायोइलेक्ट्रिसिटी असं नावंही दिलं. गल्व्हणीच्या या प्रयोगाने जगात एकच खळबळ माजली. कारण गल्व्हनीनं बायोइलेक्ट्रिसिटी हा विजेचा तिसरा प्रकार समोर आणला होता.लुईजी गल्व्हनीच्याच प्रयोगाला व्होल्टानं आपल्या परीने निरीक्षण आणि पडताळणी केली. त्या प्रयोगाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि बॅटरीचा शोध लागला.
 

अलिसांद्रो व्होल्टाचा जन्म १८ फेब्रुवारी, १७४५ साली इटली देशातील कोमो, लोंबर्डी येथे झाला. एका सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या व्होल्टाचा वडिलांची परिस्थिती बेताचीच होती. जन्म होऊन साधारण चार वर्षे तो व्यवस्थित बोलतही नव्हता. बोलतच नसल्यामुळं व्होल्टाच्या बुद्धिमत्तेबद्दल त्याचे कुटुंब नेहमी सांशक असत. त्यामुळं त्याचे पालक त्याचा भविष्यबद्दल नेहमी चिंतेत असायचे. त्यातच घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळं पैशाची कायम चणचण असे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडलांनी भरपूर कर्जाचं डोंगर उभं केलं होतं.  व्होल्टा नेमक्या सात वर्षाचा असतानाच व्होल्टाच्या वडलाचं निधन झालं. शाळेत औपचारिक शिक्षण घेनं शक्य नसल्यामुळं छोट्या व्होल्टाच शिक्षण घरीच झालं.   बारा वर्षाचा होईपर्यंत त्याचे काकाच त्याला घरी शिकवत. नंतरच शिक्षण jesuit बोर्डिंग शाळेत झालं. Jesuit शालेच शिक्षण निःशुल्क होतं पण त्यांची एक अट होती की व्होल्टानं चर्चमध्ये प्रिस्ट व्हावं. व्होल्टच्या पालकांचा त्याला विरोध होता. त्यामुळं चार वर्षांनंतर व्होल्टाच्या पालकांनी त्याला शाळेतून काढलं. त्यांची इच्छा होती की व्हॉल्टन वकील बनून नाव कमवाव पण व्हॉल्टला विज्ञानाची आवड होती. विज्ञानाशिवाय व्हॉल्टला विविध भाषा शिकण्याची आवड होती. शाळेत असताना व्होल्टान लॅटिन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन भाषा अवगत केली होती. पुढं या भाषेचा उपयोग त्याला आपले वैज्ञानिक प्रयोग जगासमोर मांडण्यासाठी झाला. वयाच्या अठराव्या वर्षीच त्यानं इलेक्ट्रिसिटीवर अभ्यास करायला सुरुवात केली. आपले विजेसंबंधित विचार तो समकालीन वैज्ञानिकासमीर मांडत असे आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया समजून घेतं असे. 

Guilio Cesare Gattoni हा व्होल्टचा मित्र होता. तो खूप श्रीमंत होता. त्याची स्वतःची प्रयोगशाळा होती. व्हॉल्टला मदत व्हावी म्हणून त्यानं किती तरी वर्ष प्रयोगशाळा प्रयोगासाठी दिली होती.  वर्ष १७६५ मध्ये व्हॉल्टन पहिला वैज्ञानिक प्रबंध लिहून तो Giambatista Beccaria यापुढं सादर केला होता. हा प्रबंध विविध वस्तूच्या घर्षणाने तयार होणाऱ्या स्थिरवीज म्हणजेच ट्रायबायोइलेक्ट्रिकबद्दल होता.  १७६९ मध्ये व्हॉल्टन स्थिरवीज मूळ होणार आकर्षण आणि  रिपल्शन याचा सविस्तर अभ्यास करून त्याची गुरुत्वाकर्षण शक्तीसोबत तुलना केली.  परिणाम या विषयावर प्रबंध लिहिला. काही काळ व्हॉल्टन  वेगवेगळ्या शाळेला भेट देऊन त्यांना मार्गदर्शन केलं. शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान आणि भाषा शिकविल्या जाव्या अस त्याला वाटत असे. एव्हडच नाही तर काही दिवस त्यान कोमो पब्लिक स्कुलमध्ये भौतिकशास्त्र हा विषय शिकवला.  जोसेफ प्रिस्टलेच्या वेगवेगळ्या प्रबंधाचा व्हॉल्टन अभ्यास केला होता. जेंव्हा त्यानं स्थिरवीज तयार करणाऱ्या इलेक्ट्रोपोरसचा शोध लावला तेंव्हा त्यानं हि माहिती खास जोसेफ प्रिस्टलेला कळवली. व्हॉल्टला याद्वारे जाणून घ्यायचं होतं की हा शोध लावणारा तो पहिला आहे किंवा नाही. पण या आधी हा शोध १७६२ मध्ये Johann Wilcke यानं लावला होता. तरी व्हॉल्टन आपलं संशोधन चालू ठेवावं अस प्रिस्टलेनं सांगितलं.

व्हॉल्टन फक्त विजेसंबंधीत प्रयोग केले असं मुळीच नाही. आपल्या प्रयोगाद्वारे १७७६ मध्ये मिथेन गेस वेगळा करण्याचा शोध हि व्हॉल्टन लावला. मिथेनगॅस आणि हवेच मिश्रण एका बंद पात्रात घेऊन 'इलेक्ट्रिक स्पार्क' द्वारे स्फोट घडू शकत हे त्यानं दाखवून दिलं. अशा प्रकारे एक शोध लावत असताना व्हॉल्टन इतर शोधहि लावले.

तसेच उत्तम श्वास घेण्यासाठी हवेतील ऑक्सिजनच प्रमाण चांगलं असावं लागतं.  ते प्रमाण व्यवस्थित आहे किंवा नाही हे मोजण्यासाठी १७७७ मध्ये व्हॉल्टन वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणाऱ्या युडिओमीटरचा शोध लावला. यासाठी त्यानं हैड्रोजन वायूचा उपयोग केला होता. हवेतील ऑक्सिजन जेंव्हा हायड्रोजनच्या संपर्कात येत तेंव्हा रासायनिक प्रक्रिया होऊन पाणी तयार होतं.  त्यामुळं जेव्हड  युडिओमीटरमध्ये असलेला हायड्रोजन वायू कमी होईल तेव्हड हवेतील ऑक्सिजन जास्त अस समजलं जायी.

आपल्या वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगामुळं इटलीमध्ये व्होल्टा प्रचंड प्रसिद्ध होता. पण इटलीच्या बाहेर त्याचं नावं नव्हतं. इतर जगाला आपल्या प्रयोगाची माहिती व्हावी म्हणून व्होल्टानं इतर देशांच्या वैज्ञानिकाशी भेटीगाठी वाढवल्या. त्यासाठी १७७७ मध्ये तो स्वित्झर्लंड फ्रांससारख्या देशात सफरीसाठी गेला होता. १७७८ मध्ये व्हॉल्टन अजून एक महत्वाचा शोध लावला. त्यानं जगाला दाखवून दिलं कि एखाद्या कॅपसीटरचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्या  कॅपसीटर च्या इलेक्ट्रिक चार्जेसवर अवलबुन असत. त्यालाच पुढं व्होल्टेज अस नाव देण्यात आलं. आपल्या प्रयोगाची माहिती बाहेरील जगास व्हावी म्हणून व्होल्टा युरोपातील मोठं मोठया वैज्ञानिक केंद्राशी भेट देऊन आपल्या संशोधनाचे  प्रात्याक्षिक दाखवत असे. 
प्रसिद्ध वैज्ञानिक बेंजामिन फ्रेंक्लिन तसेच अंटोने लावोइझियर Antoine Lavoisier यांनी व्होल्टाचे प्रयोग पहिले होते. हळूहळू इटली बाहेर व्हॉल्टची ख्याती वाढतं होती. १७८२ मध्ये व्हॉल्टने इलेक्ट्रिक ऊर्जा संग्रहित ठेवणाऱ्या कँडेन्सरवर एक प्रबंध लिहिला. या कँडेन्सरचा उपयोग तो इतर विजेचे प्रयोग करण्यासाठी करत असे.

१७८८ मध्ये त्यानं अचूक इलेक्ट्रिक चार्ज मोजणाऱ्या एका इलेक्ट्रोस्कोपचा शोध लावला. १७९० मध्ये व्हॉल्टन वायूच्या गुणधर्माबद्दल संशोधन करून  तापमानाचा त्यांच्या आकारमानावर होणारा परिणामावर अभ्यास केला. अशा प्रकारे व्होल्टानविविध विषयावर संशोधन करून संपूर्ण युरोपमध्ये नाव कमावलं. त्याच्या विजेच्या प्रयोगाची दखल घेऊन लंडनमधील रॉयल सोसायटीनं १७९१मध्ये त्याची फेलोसाठी निवड केली. व्होल्टाच्या विजेविषयी अतुलनीय कार्याबद्दल वयाच्या ५० व्या वर्षी त्याला लंडनमधील रॉयल सोसायटीचा अत्यंत मानाचा कोप्ले मेडलनं सन्मानित करण्यात आलं.


बॅटरीचा शोध : 

असा कुणी विचार केला नसेल कि एका बेडकाच्या प्रयोगावरील वादाचा शेवट एका बॅटरीच्या शोधात होईल म्हणून. विशेष म्हणजे बॅटरीचा शोध लावण्यासाठी व्होल्टान स्वतः काहीच प्रयत्न केले नव्हते. त्यानं फक्त एका वैज्ञानिकान काढलेल्या निष्कृशाला आव्हान दिलं होतं. तो वैज्ञानिक म्हणचे इटलीचाच -  गल्व्हनी होता. 

गल्व्हनीन बेडकाला लोखण्ड आणि तांब्याच्या धातूचा स्पर्श केला असता बेडकांच्या पाय झटके देत असल्याचे दाखवून दिलं होतं. हे दुसरं तिसरं काही नसून बेडकाच शरीरच विद्युतनिर्मिती करत असं गल्व्हनीला वाटलं. ज्याप्रमाणे काही समुद्रीमास्यांच्या शरीर वीजनिर्मिती करतं त्याचप्रमाणे बेडकाच्या तसेच इतर प्राण्याच्या शरीरसुद्धा वीजनिर्मिती करत असावं.  १७९१ मध्ये गल्व्हनीनं जगजाहीर केलं की त्यानं प्राण्यांपासून तयार होणाऱ्या नवीन विजेचा शोध लावला. त्याच म्हणन होतं की प्राण्याचं शरीर वीजनिर्मिती करत आणि त्यांच्या शरीरातील मजातंतूमध्ये वाहणाऱ्या द्रव्याद्वारे ते इतर अवयवात वाहत असावी आणि त्यामुळंच त्यांचया शरीराची हालचाल होत असावी. 

व्होल्टा धार्मिक तसेच तत्त्वनिष्ठ होता. त्याचा विज्ञानावर गाढ विश्वास होता. प्राण्याच्या शरीरात वीज निर्मिती होणे म्हणजेच देवाने प्राण्यांना वीजनिर्मितीच वरदान दिल्यासारखं ठरतं होतं. थोडक्यात हा धार्मिकतेचा प्रश्न होता.  व्हॉल्टला हा विचार एखाद्या जादूसारखा वाटत होता. आणि विज्ञानात अशा गोष्टीला थारा नसते. व्होल्टाच मत होतं कि वीज त्या बेडकाच्या शरीरात होतं नसून बाहेरील दोन धातूच्या पट्यामूळ वीज निर्मिती होते. या भिन्न विचारामूळ गल्व्हनी आणि व्होल्टा यामध्ये वाद सुरू झाला. गल्व्हनी आपल्या मतावर ठाम होता तर व्होल्टा त्याशी किंचित सहमत नव्हता. 

गल्व्हनीचा प्रयोग आणि बायोइलेक्ट्रिसिटीची सर्वत्र चर्चा होत होती पण व्होल्टा त्याशी सहमत नव्हता. त्याचा त्याप्रयोगाकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. १७९२ मध्ये त्यानं गल्व्हणीच्या प्रयोगाचा खूप अभ्यास केला. वेगवेगळ्या धातूच्या पट्टया वापरून त्यानं बेडकाचा प्रयोग करून पाहिला असता त्याच्या लक्षात आले की समान धातूच्या पट्ट्याने बेडकास स्पर्श केला असता त्यावर काहीही परिणाम होतं नव्हता. एव्हढंच नव्हे तर एका बेडकास विविध धातूच्या दोन पट्ट्याने  स्पर्श केले असता वेगवेगळा परिणाम मिळत असे. या वरून व्होल्टा या निष्कर्षावर पोहचला कि वीज बेडकाच्या शरीरात नसून ती दोन विभिन्न धातूच्या पट्यामुळं तयार होतं होती. बेडकाच्या शरीरातील द्रव्य हे इलेक्ट्रोलाइटचं काम करत होते.  थोडक्यात वीजनिर्मितीसाठी बेडूक किंवा इतर प्राण्यांच्या अवयवाची आवश्यकता नाही हे व्होल्टान दाखवून दिलं.  त्यासाठी बेडकाच्या शरीरातील द्रव्याऐवजी साधं मिठाचं पाणी आणि दोन भिन्न धातूच्या पट्या वीज निर्मितीसाठी पुरे आहेत हे व्होल्टान दाखवून दिलं. त्याला त्यानं 'इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स'  असं नावं दिलं. वेगवेगळ्या धातूच्या परिणामाचा अभ्यास करून व्होल्टान त्या धातूचे उतरत्याक्रमान यादीच तयार केली. अनुक्रमे झिंक,लेड,टिन, आयर्न, कॉपर, सिल्वर, गोल्ड, ग्राफाइट आणि मॅगनिझ अशी ती यादी होती. थोडक्यात झिंक आणि ग्राफाईट मूळे मिळणारा इलेक्ट्रोमोटिव्ही फोर्स हा झिंक-टिन पेक्षा जास्त असा त्यानं शोध लावला. बऱ्याच दिवस अभ्यास करून व्होल्टान १७९७ मध्ये कॉन्टॅक्ट 'थेअरी ऑफ इलेक्ट्रीसिटी'  पूर्ण केला. बेडकाला बाजूला सारून त्यानं थोडं किंचितसं खारट मिठाचं पाणी किंवा सौम्य आम्ल वापरून त्यानं प्रयोग केले. तसेच दोन वेगळ्या धातूचे तुकडे जिभेला लावले असता जिभेला झटका बसत असल्याचं व्होल्टाच्या लक्षात आलं. 

वर्ष १८०० मध्ये व्होल्टान सिल्वर आणि झिंकच्या पट्ट्या वापरून प्रयोग केला. एका कपात सौम्य आम्ल घेऊन जेंव्हा दोन पट्या त्या आम्लात बुडवल्या असता त्याद्वारे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होत होता. अशा वेळी त्या कपात बोट बुडवले असता विजेचा झटका लागत असे.
 पुढं व्होल्टान अनेक सिल्वर, झिंकच्या पट्ट्या आणि त्यामध्ये ओलसर कागद किंवा कपडा एकमेकांवर रचून इलेक्ट्रोमोटिव्ही फोर्स म्हणजेच व्होल्टेज कितीतरी पटीनं वाढत असल्याचे निदर्शनात आलं. यालाच 'व्होल्टायीक पाईल' असं नावं देण्यात आलं. आणि अशा प्रकारे सतत करंट देणाऱ्या बॅटरीचा जन्म झाला. १८०० मध्ये आपला बॅटरीविषयीचा प्रबंध व्होल्टान इंग्लडच्या रॉयल सोसायटीला सादर केला.  रॉयल सोसायटीच्या जोसेफ बँकन तो सर्व वैज्ञानिका पुढं मांडून त्यावर चर्चा केली आणि तो प्रसिद्धीला दिला गेला. 

व्होल्टाच्या विजेच्या बॅटरीच्या शोधामुळं संपूर्ण वैज्ञानिक दुनियेत एक प्रकारची क्रांती घडली. व्होल्टाचा प्रयोग करून वैज्ञानिक आता पाहिजे तेव्हडी वीज निर्मिती, विजे संबंधी अभ्यास करू शकत होते. एव्हडच नाही तर रसायनशास्त्राचे वैज्ञानिकाला रासायनिक पदार्थाचा अभ्यास करणे सोपे झाले होते. विविध रासायनिक पदार्थ इलेक्ट्रोलाईटसारखे वापरून त्याचा अभ्यास ते करत होते. त्याकाळी सिल्वर आणि कॉपरचे नाणे चलनात होते त्यामुळं ते दोन नाणे वापरून वैज्ञानिक सहज एक छोटी बॅटरी तयार करत असतं. 

व्होल्टाच्या विजेच्या शोधामूळ रसायनशास्त्रासंबधित वैज्ञानिकाला एक प्रकारची मदतच झाली. व्होल्टाच्या शोधाच्या काही दिवसातच इंग्लिश भौगोलशास्त्रज्ञ विलियम निकोलसन आणि अंथोनी कारलीसलनं पाण्याचे विघटन करून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करण्याचा प्रयोग केला.  व्होल्टानं तर बॅटरीसंबंधित अनेक शोध लागत गेले. हंफ्री डेव्हिन एक शक्तिशाली बॅटरी तयार केली. ती वापरून त्यानं अनेक प्रयोग केले. पुढं बॅटरीसाठी त्यानं बेरियम, कॅल्शियम, लिथियम, मॅग्नेशियम, पोटेशीयम,सोडियम इत्यादी वापरून बघितलं. 

१८०१ मध्ये व्होल्टान आपल्या बॅटरीच प्रात्यक्षिक नेपोलियन बोनापार समोर करून दाखवल. तो प्रयोग बघून नेपोलियन अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यानं व्होल्टाला अरिस्टोक्रेटचा 'किताब दिला.

व्होल्टाची बॅटरी वापरून १८२० मध्ये हंस क्रिस्टीयन ओरस्टेडनं वीज आणि चुंबकत्वाचा प्रयोग करून बघितला. फॅराडेन व्होल्टाच्या प्रयोगाचा अभ्यास करून इलेक्ट्रिक मोटारचा शोध लावला. अशा प्रकारे व्होल्टामुळं विद्युत वैज्ञानिक युगात एक प्रकारची क्रांती घडली. आज आपण जी बॅटरी वापरतो त्याची सुरुवात एका बेडकाच्या प्रयोगापासून झाली, हे निश्चित!

व्होल्टानं फक्त विजेच्या विज्ञानात शोध लावले असं नाही. त्याला विविध भाषेचं ज्ञान होतं. तो उत्तम प्रकारे इंग्लिश, जर्मन, लॅटिन आणि फ्रेंच भाषा बोलायचा. वर्ष १७७७ मध्ये त्यान स्वित्झर्लंडमध्ये अध्यपकाची नोकरी केली, वर्ष १७७९ मध्ये तो परत इटलीला आला आणि पविहा विद्यापीठात त्यान प्राध्यापक म्हणून रुजू झाला. १७९४ मध्ये व्होल्टाचं टेरेसा पेरेग्रीनीसोबत लग्न झालं तिच्यापासून त्याला तीन मुलं झाली

वयाच्या ७४ वर्षापर्यंत व्होल्टासनं व्होल्टायीक बॅटरी, कपॅसिटर आणि इलेट्रोफोर्सच्या प्रयोग करून  विद्यापीठात मोठं नाव कमावलं होतं. शेवटच्या दिवसात व्होल्टासन आपलं जीवन आपल्या पत्नी आणि तीन मुलासोबत व्यतीत केलं.  मार्च ५, १८२७, वयाच्या ८२ व्या वर्षी त्याच निधन झाल. विजेच्या विज्ञानातील त्याच्या अमोल शोधाची पावती म्हणून विजेच्या भारच्या ऐकेकाला व्हॉल्ट असं नाव देण्यात आलं.

व्होल्टाच्या मृत्यूनंतर विजेच्या भारच एकक व्हॉल्ट म्हणून ठेवण्यात आलं. तसेच युरो चलन येण्याआधी त्याचा फोटो 10000 लायर नोटवर झळकला. त्याच्या जीवनगौरव म्हणून कोमोमध्ये व्हॉल्टच्या नावाने एक म्युझियम बनवण्यात आलं. व्हॉल्टचा जन्मदिवस बॅटरी दिवस म्हणून साजरा करतात.

© प्रेम जैस्वाल 9822108775
छ संभाजीनगर महाराष्ट्र 

Wednesday, 3 July 2024


                        

                                     उबंटू 

पैशाची हाव समुद्राच्या पाण्यासारखी असते. समुद्राचे पाणी पिल्याने तहान भागत नाही. उलट त्या खाऱ्या पाण्याने तहान वाढतचं जाते. तहान वाढली तसा मनुष्य पुन्हा जास्त पाणी पितो. शेवटी शरीरात मिठाचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मग ही हाव पद, प्रतिष्ठा किंवा पैशाची असू शकते.

आज येथे हे नमूद करायचं कारण काय? आज पैशामागे जग अधाशा सारखं धावत आहे आणि हा पैसा कमीत कमी कष्ट करून कसा मिळवता येईल याचा मनुष्य विचार करत आहे. राजकारणातून मिळणारा पैसा थोडा त्याच मार्गाचा.  निवडणुकीत दहा लाख लावा पन्नास लाख काढा!  अर्थात ते पन्नास लाख किंवा कोटी हे शासनाकडून त्या त्या शहर किंवा गावासाठी निधी स्वरूपात देण्यात आलेले असतात.  थोडक्यात गावातील इतर गोर-गरीब, दिन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी, मूलभूत सुविधेसाठी आलेला निधी हा वरच्या वर लाटला जातो. मूठभर लोकांचे कल्याण होऊन संपूर्ण गाव, शहर किंवा देश आहे त्यापेक्षाही खंगुण जातो.  हा प्रकार फक्त भारत देशात नाही तर जगातील इतर सर्व देशात कमी-जास्त प्रमाणात घडत असतो. स्वार्थी भौतिक सुखाच्या नादात मनुष्यचं मन एव्हड असंवेदनशील झालं की त्याला इतरांचा किंचितसा विचार करावयास वेळ नाही.

सर्व बाबतीत प्रगत, सुशिक्षित, नितीमत्तेची जान,सद्सदविवेक बुद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान असूनही मनुष्यजात असा स्वार्थी विचार करत असेल तर मग शहरीकरणाचा लवलेश नसलेली हजारो मैल दूर वनात राहणारी आदिवासी जमात अशाच स्वार्थीवृत्तीची असेल का? रानात वणवण भटकून मिळालेली कंद-मुळे, शिकार करून मिळालेलं मांस खातांना ते इतरांचा मुळीच विचार करत नसतील का?  

हे जाणून घेण्यासाठी एका मानवशास्त्रीय वैज्ञानिकांनी एक भन्नाट प्रयोग  केला.    त्यासाठी त्याने आफ्रिकेच्या दूर वनात जेथे खूपच अप्रगत मनुष्य वस्ती आहे अशा जागेची निवड केली. तेथे गेल्यानंतर त्याला दहा उघडी-नागडी उनाड मुलं जंगली खेळ खेळताना दिसली.  या वैज्ञानिकाने थोड्या दूर  अंतरावर एका झाडाच्या बुंध्याच्या सभोवताली गोलाकर अशी दहा फळ ठेवली.  आणि त्या दहा मुलांना 'जो पहिला येईल त्याला सर्व फळे मिळतील तेंव्हा शिट्टी वाजल्यानंतर पळत जाऊन ती फळ घेण्याचा आदेश दिला'.  वैज्ञानिकाला वाटलं की शिट्टी वाजल्यानंतर या पैकी एखादा मुलगा जोरात पुढे पळून हवे तितके फळ हातात घेऊन खात बसणार आणि मग इतरांना खायला काहीच मिळणार नाही, इतर उपाशी राहतील. पण प्रत्यक्षात घडलं उलटंच. ती सर्व दहा मुलं थोडंही न पळता एकमेकांच्या हातात हात घालून शांतपणे हळू हळू त्या झाडा जवळ गेली. प्रत्येकांनी एक एक फळ हातात घेतलं आणि एक गोलाकार रिंगण करून एकमेकांना देत ती खाऊ लागली. हा प्रकार बघून त्या वैज्ञानिकाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. असं अनपेक्षित घडलचं कसं यावर त्याचा विश्वासच बसेना. म्हणून वैज्ञानिकाने त्या आदिवासी मुलांची मानसिकता जाणून घेण्याचं ठरवलं. त्यावर मुलांनी सांगितलं की 'आमच्या समूहात जे जे मिळतं ते सर्वांचं असतं, त्यावर सर्वांचा सारखाच अधिकार असतो' इंग्रजीत यालाच ,'आय एम बीकॉज वी आर' असं म्हणतात. उबंटू नावानी हे तत्त्वज्ञानाच उदाहरण प्रसिद्ध आहे. मग मनात विचार येतो- जर हाच प्रयोग विकसित शहरातील मुलासोबत केला असता तर?

सांगायचं तात्पर्य असं की, या जगात सर्वांसाठी सर्व मुबलक प्रमाणात आहे. पण प्रत्येक्षात  ५% हावरट उद्योजक आणि राजकारणी नेत्याकडे ९५% संपती एकवटलेली आहे. आणि ९५% लोकांकडे फक्त ५% संपती आहे. याला 'संपत्तीची हाव'हे एकच कारण आहे. राजकारण्यांच्या भ्रष्ट्राचाराबदल प्रसिद्ध वक्ते शिव खेरानी खूपच छान उदाहरण दिलं आहे. एक भारतीय नेता काही कारणानिमित्त परदेशी जातो. तेथील मंत्री त्याची राहण्या, खाण्याची आणि मनोरंजनाची खूपच चांगली सोय करतो. न राहून आपला नेता त्याला विचारतो,' एक साधे राजकारणी असून तुम्ही माझी एव्हडी सोय कशी केली?' त्यावर तो मंत्री आपल्या नेत्यांना एका खिडकीजवळ घेऊन जातो. दूर एक पूल असतो त्याकडे बोट दाखवून तो आपल्या नेत्याला विचारतो, ' तो दूर पूल दिसतो का?'  हा नेता म्हणतो 'हो दिसतो की'.  त्यावर तो परदेशी मंत्री म्हणतो,' १०% मित्रा १०% !

काही वर्षानंतर तोच परदेशातील मंत्री भारतात येतो.  हा नेता परतफेड म्हणून त्याची खूपच सोयसाय करतो. भारावून जाऊन तो भारतीय नेत्यास 'एव्हड  जंगी स्वागत कसं करू शकतोस मित्रा?' याचं कारण विचारतो. त्यावर आपला नेता त्या नेत्यास एका खिडकीतून बोट दाखवत विचारतो,' तो पूल दिसतो का?' परदेशीय मंत्री म्हणतो- ' नाही दिसतं' . त्यावर आपला नेता म्हणतो,'१००% मित्रा १००% !'   मूळात तेथे पुलच नसतो!!

मग कसा विकास होईल गाव, शहर आणि देशाचा. एकीकडे आडमाप कर आणि महागाईने जनता त्रस्त असते तर दुसरीकडे एखाद्या लाकडाला किटाणू जसे आतून पोखरून पोकळ करतात तसा भ्रष्ट राजकारणी आणि त्याच्याशी लागेबंधे असलेल्या नोकरवर्गाकडून देश पोखरला जातो. उदघाटना आधीच करोडो रुपये खर्च केलेले पूल वाहून जातात. अचानक छत कोसळून हजार करोडो रुपयाचे नुकसान होते. गरज आहे थोडा विचार करण्याची, थोडी संवेदनशीलता जागृत करण्याची. तेंव्हाच नवा सूर्योदय होईल. सर्वसामन्याचा विकास होईल.

मग अशा वेळी प्यासा या चित्रपटातील गाण्याच्या ओळी आठवतात,

'ये महलों, ये तख्तों ये ताजों की दुनिया ये इन्सां के दुश्मन
समाजों की दुनिया ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?'


© प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)

Monday, 1 July 2024

डॉ सोशल मीडिया




                        डॉ सोशल मीडिया 

हल्ली सर्वांच्या हातामध्ये मोबाईल गुरु आहे. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण गुगलवर किंवा इन्स्टा सारख्या समाज माध्यमामध्ये शोधत असतो. मगं ते आरोग्या संबंधित आरोग्याविषयी असो की अजुन काही. एखाद्या बॉटलचं झाकन कसं उघडावं यावर दहा व्हिडीओ सापडतील. 'मी गुगल वर पाहिलं, गुगलवर कन्फर्म केलं ' गुगल म्हणजे माहितीचा खजिना आणि सर्व समस्याचे उत्तर गुगलकडे असतेच असा आता जनसामान्याचा समज झालेला आहे. पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की गुगलवरची बरीच माहिती हि सरासर चुकीची असते. त्यामुळे एखाद्या समस्येच वास्तविक जगात समाधान न शोधता अभासी माध्यमात त्या समस्येच समाधान शोधने अत्यन्त घातक ठरू शकते.  एका दवाखान्यातील फळ्यावर रुग्णाला उद्देशून स्पष्ट लिहिलं होतं -
 ' तुमच्या आजाराविषयी गुगलच ज्ञान फक्त तुमच्यापर्यंतचं ठेवा!' 

अलीकडे इंस्टाग्राम, व्हाटसप सारख्या समाज माध्यमातून बरीच माहिती लोक घेत असतात. किंबहुना काही महाभाग इन्स्टा-व्हाटसप विद्यापीठाचे पदविधर, पीचडी झाल्यासारखे ज्ञान देत फिरत असतात.  काय खावं, कधी खावं, किती खावं, कुणी खाऊ नये, कशामध्ये अँटी ऑक्सिडन्ट भरपूर असते आणि कशाने कॅन्सर होतो? विशेष म्हणजे कशामध्ये काही चांगल असेल तर ते - अँटीऑक्सिडन्ट! आणि काही खाण्यामध्ये वाईट होत असेल तर ते सरळ सरळ कॅन्सर!  दुसरं तिसरं काही नाही.  मग आयुर्वेदिक घ्यावं की होमिओपथी की एलोपथी  अशा आरोग्यविषयक पोस्ट भरपूर वाढल्या आहेत. आणि या पोस्ट फक्त अन्न-औषधा बद्दलचं असतात असं नाही तर भांडी कोणती वापरावी?  गॅस वापरावा का चूल का सोलार....तांदूळ, डाळ शिजवताना कशी शिजवावी जेणेकरून ऍसिडिटी होणार नाही वगैरे वगैरे. आधीच त्रस्त असलेली भाबडी लोकांसाठी असे उपदेश म्हणजे 'भित्या पाठी ब्रम्हराक्षसा सारखे असतात.  मग बिचारी जनता त्या पोस्टच तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असते. मग तवा, कढई, पिण्याच्या पाण्याची साठवण, फिल्टर पासून तर पाणी कसे प्यावे, कधी प्यावे कधी पिऊ नये, सकाळी लिंबू पिळून पाणी प्यावे का त्यात मध टाकावा का दोन्ही टाकून पाणी प्यावे .....अक्षरशः वैताग असतो.   एकदा का इन्स्टाला कळलं की तुम्ही आरोग्याविषयक जागरूक आहात, मग तो तशाचं पोस्टचं खाद्य तुमच्या मेंदूला पुरवत असतो. थोडक्यात तुम्ही त्या दुष्ट चक्रात अडकून जाता. 

डिमांड तसा सप्लाय. इन्स्टा किंवा गुगलवर अशा पोस्टचे रील टाकणारी मंडळी लाखोत असते. मग पोस्ट टाकणारे बहादर आपल्या पोस्टच्या लाईक वाढावे,  स्क्रीनटाईम वाढावा, लोकांनी पोस्ट शेअर वाढवून  पैशाची कमाई व्हावी म्हणून नको ते 'फेक' कन्टेन्ट गुगल किंवा इन्स्टावर 'लोड' करत असतात.  भिती असलेलं कन्टेन्ट इन्स्टावर जास्त चालतं. इतरांना शेअर करुन आपण लोकांचे प्राण वाचवू शकू म्हणून लोकं अशा पोस्ट शेअर करतात.  भित्री जनता त्यास बळी पडते, पोस्ट टाकणारा मात्र जाहिरातीद्वारे पैसे कमवून जातो. 

कळत न कळत आपण पश्चिमात्य देशाचं अनुकरण करत असतो. मग पोस्ट खऱ्या वाटाव्या म्हणून त्यास पश्चिमात्य देश जसेकी इंग्लंड, युरोप किंवा अमेरिकेच्या 'फ़ोर्ब्स', 'नासा' किंवा एखाद्या अमेरिकी एजंसीचा हवाला दिलेला असतो. पोस्टची विश्वसनियत्ता वाढण्यासाठी याची मदत होते.  मग आपली भोळी अशिक्षित जनता मुकाट ते मान्य करते. त्यात गोरी चमड़ीच्या लोकांना आपण प्राचीन काळापासूनच मान देत आलो आहोत. तो मग तो तिकड़चा विद्वान असो कि एखादा अगदी अशिक्षित भिकार मनुष्य असो. अस्खलित इंग्रजीत बोलतो ना म्हणजे ते अगदी खरं,  मग ते खोट कस्!
तसे अमेरीका किंवा यूके मधे अशा भरपूर रिकामटेकड्या सर्वे एजेंसी आहे त्यांचे अहवाल आणि भन्नाट फाइंडिंग ऐकुन त्यांची किव येते. 3000-4000 लोकांचे नमूने घ्यायचे आणि त्याची एक एवरेज रिडींग काढ़ायची की झाला सर्वे!  मग आपल्या वर्तमानपत्रात बातमी येते -

- जो सकाळीदोन कप चहा पितो 
त्याचे आयुष 10 वर्षाने वाढते, फक्त गवती चहा प्या, दिवसातून दोन वेळा प्या, ग्रीन टी पीत असाल तर सावधान!  कॉपी पिऊ नका, कॉफ़ी प्या तरुण रहा, कॉफी प्या म्हणजे पहिले अपत्य 
मुलगा होईल!  ई.

- जो कुत्रा पाळतो त्यास भूक 
कमी लागते, कुत्रा पाळत असाल तर सावधान!  कुत्रे पाळा तरुण रहा वगैरे. 

-ज्यांची ऊँची जास्त ते कमी 
रडतात, कमी उंची /जास्त उंची आरोग्यासाठी घातक! बोर्नव्हिटा प्या उंची वाढवा इत्यादी.

-ज्याच्या घरात मांजर ते जास्त 
सुखी राहतात. 

समजा या सर्वेवाल्यानी अख्या अमेरिकेच्या जनतेच जरी सैम्पल घेतले तरी ते आपल्या काय कामाचे? कारण त्यांची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक स्थिति तसेच खानपान राहनीमान एकन्दरीत सर्व आपल्यापेक्षा भिन्न. मग तुमचा सैम्पल सर्वे आमच्या विविधतेने नटलेल्या भारत देशात काय कामाचा? एव्हड़च काय महाराष्ट्राचे सैम्पल सर्वे आंध्रप्रदेशात चालू शकत नाही. पण आपल्या लोकांना अशा बातम्या किंवा पोस्ट वाचायला आवडतात. एक मनोरंजन म्हणून ठीक पण त्यावर विश्वास ठेवून त्याचं सरळ अनुकरण करने अगदी चुक. त्यामुळे आरोग्यविषयी तक्रारीसाठी इंस्टाग्राम न बघता आपल्या जवळच्या डॉक्टराचा सल्ला घेणे कधीही चांगले.

हल्ली इंस्टावर आरोग्य आणि ब्लड चाचणी विषयी अनेक पोस्ट दिसत असतात.  अशा पोस्ट रील बघून लोकं स्वतःच रक्त चाचण्या करुन घेत आहेत. ते जवळच्या डॉक्टरांकडून आजाराची शहानिशासुद्धा करून घेत नाही आणि आयुर्वेद वगैरे सुरु करुन आजाराच्या दुष्ट चक्रात अडकून पडतात. अमेरिकेच्या जास्तीत जास्त वैद्यकिय चाचण्याचे एव्हरेज सर्वे रिपोर्ट आपण स्टॅण्डर्ड समजून ते डोळे बंद करुन पाळत असतो. 

उदा.
-बीपी 80/120 असावा
-हार्टरेट 72 bpm असावा
तुमच वजन - से.मी.ऊँची -100 = तुमच वजन (kg)
एव्हडेच असावे.
-रक्ताच्या इतर चाचण्या. ई.

एखाद्या पंजाबी सरदार मुलाचे फॉर्मुलानुसार वजन 60kg  असेल, म्हणजे तो हडकुळा असेल तर अशा हडकुळ्या मुलाला पंजाबप्रांतात विवाह योग्य मुलगी मिळणे कठिन होईल. कारण पंजाब मध्ये मुलांचं वजन सरासरी 75 किलो आहे म्हणजे तो 60kg असलेला मुलगा म्हणजे - कुपोषित मुंडा!  बऱ्याच देशाची जनता बुटकी किंवा उंच असते म्हणजे ते एब्नॉर्मल आहेत अस समजायचं का? कित्येक पेशंटचा बीपी हा 120/140 असतो आणि ते मस्त जीवन जगतात. लक्षात घ्या या किंवा अशा टेस्टच्या फिगर म्हणजे 'फक्त एवरेज रिडींग' आहेत, आणि एवरेज हे स्टैण्डर्ड असू शकत नाही!

महत्वाचे, मानवी शरीराचा प्रत्येक व्यक्तीचा डिएनए वेगळा असतो. एकाचा चेहरा दुसऱ्याशी मिळत नाही, तुमच्या हाताचे ठस्से दुसऱ्यांशी मिळत नाही. त्याच प्रमाणे सर्वांचे अवयव आणि त्यांची संरचना सुद्धा वेगळी असू शकते.   मग ते आतडी असो, मूत्रपिंड, ह्रदय किंवा त्वचा. हेच कारण कि सर्वांचे ब्लड प्रोफाइल थोडे फार वेगळे असू शकतात. हेच कारण आहे की निष्णात फिजिशियन ब्लड रिपोर्ट पेक्षा पेशन्टच्या क्लिनिकल चेकअप ला जास्त महत्व देतात.  थोडक्यात 'They treat the patient and not the report'. 

आरोग्याविषयी जागरूक रहाने कधीही चांगलेच. 'प्रेवेन्शन इज अल्वेज बेटर देन क्युअर.' पण निष्णात वैद्यांचा सल्ला न घेता सोशल मीडियालाच डॉक्टर मानून स्वतः औषध घेणे अत्यन्त चुकीचे होईल. 

-प्रेम जैस्वाल (पेडगावकर )
ppedgaon@gmail.com 
9822108775