ad1

Friday, 12 July 2019

...तर इलाजासाठी निष्णात डॉक्टर मिळणार नाहीत

           
आज वर वर जरी वैद्यकीय व्यवसाय (डॉक्टरकी पेशा) पद, सामाजिक प्रतिष्ठा आणि पैसा कमविणारा दिसत असला तरी संत तुकारामांनी म्हंटल्याप्रमाणे तो दिसतो तसा नाही आहे. तुका म्हणतात,

             पाण्यातील मासा, झोपणार कैसा,
              जावे त्यांच्या वंशा, तेंव्हा कळे।


आजच्या साधारण दोन दशकांपूर्वी परिस्थिती खुपचं वेगळी होती. त्या वेळेस डॉक्टरची मुलं वैद्यकीय क्षेत्रचं निवडायची. बारावीनंतर काय? असा करियरविषयीचा गंभीर प्रश्न सहसा कुणी डॉक्टरपुत्राला विचारत नसे. किंबहुना डॉक्टर पालकांसाठी तो सोयीचा पर्याय असे. डॉक्टरला समाजात अत्यन्त मानाचं स्थान, आदर, एक वेगळं वलय आणि प्रतिष्ठा होती.  डॉक्टर पालकांचा गाव किंवा शहरात स्वतःचा 'सेट' दवाखाना असायचा. शिवाय सामान्य जनतेची इमानेइतबारे सेवा केलेली पुण्याई गाठी असायची. त्यामुळे वडिलांच्या छत्रछायेत मुलांचीही 'प्रॅक्टिस'  बहरायची. पण आज देशातील सामाजिक परिस्थिती खूपच बदलली आहे. आज ९९% डॉक्टर आपल्या पाल्यांना 'बेटा डॉक्टरकी नको, इतर काहीही कर'  असा चेतावणीवजा सल्ला देताना दिसत असतात. कदाचित त्यामुळेच आज अत्यन्त हुशार, बुद्धिमान मुलं वडिलांकडून 'डॉक्टरकीचा डीएनए' मिळूनसुद्धा वैद्यकीय क्षेत्र न निवडता चक्क अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे. देशातील आयआयटी, एनआयटी, बिट्स सारख्या उच्चअभियांत्रिकी संस्थेत उत्तम पदवी घेऊन ती देशात न राहता परदेशात स्थायिक होत आहेत. अशी उत्तम बुद्धिमत्ता असलेली मुलं वैद्यकीय क्षेत्र न निवडता अभियंते बनून बाहेर देशात सेवा देत राहिली तर भविष्यात 'ब्रेनड्रेन' वाढून देशात वैद्यकीय सेवेसाठी चांगले डॉक्टर मिळणे कठीण होईल. आणि जर देशाच्या आरोग्यासंबंधित वैद्यकीय क्षेत्राचीच एव्हडी दयनीय स्थिती असेल तर तिथे देशाची प्रगती तरी कशी होणार? असं का घडत असावं या बद्दल प्रथम देशातील सामान्य जनतेने व त्यासोबत शासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मग या समस्येचं कारण काय?

आपल्याकडे एक जुनी म्हण प्रचलित आहे -

            मला आला ताप तर वैद्य माझा बाप,
            माझा गेला ताप मग मी वैद्याचा बाप!

आपल्याकडे रूग्णालयात भरती झालेला रुग्ण ठणठणीत होईपर्यंतच डॉक्टरला देव मानतो.  एकदा का तो ठणठणीत झाला तर मग तो बिलासाठी झिकझिक करत बसतो.  मग त्याला एक क्षण जास्त रुग्णालयात थांबू वाटत नाही. एरव्ही पर्यटनमौजेसाठीच्या खर्चात ₹ ५०००/- प्रतिदिनच्या रूम भाड्यापेक्षा त्याला दवाखान्याची ₹४०००/- प्रतिदिन भाडे त्याला जास्त वाटतो.  शेवटी आजार बाजूला राहून शरीरप्रकृतीपेक्षा त्याला पैसा मोठा वाटतो,  बिल महत्वाचे वाटते. मग वेळप्रसंगी ओळखीच्या व्यक्तीला, नगरसेवक, एखाद्या थिल्लर पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन बिलात घट करण्याचे प्रयत्न होतात . रुग्ण ठीक करण्यासाठी डॉक्टर, स्टाफने घेतलेले कष्ट, त्यांनी प्रपंच सोडून जागलेल्या रात्रीशी त्याला काहीच घेणंदेन नसतं. त्यातच इलाज करताना यदा कदाचित एखाद्या रुग्णाचे बरे-वाईट झाले तर देव रुपात दिसणारे पेशन्टचे नातेवाईक क्षणात दानवाचं रूप धारण करतात. मग सर्व नातेवाईक गोळा करून टोकाचे पाऊल उचलायला पुढे मागे बघत नाही,  कायदा हातात घेऊन रुग्णालयाची तोडफोड होते. हा प्रकार येथे न थांबता डॉक्टरवर प्राणघातक हल्ले होतात.  अशा देशभरातील शेकडो घटना आपण रोजच वृत्तपत्रात वाचत असतो. पश्चिम बंगालमध्ये तर हद्दच झाली. एक अंशी वर्षाचा वृद्ध रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारकर्त्या डॉक्टरवरच प्राणघातक हल्ला केला. दगडविटांनी अक्षरशः त्यांच्या डोक्याचं हाड(स्कल) मोडलं. अशी एखादी दुसरी बातमीच वृत्तमानपत्रात झळकते. राजकीय नेत्यांच्या दबावापुढे अशी प्रकरण दाबली जातात त्यावर वृत्तपत्रात किंवा समाजमाध्यमामध्ये चर्च होत नाहीत. पण खरी गोष्ट अशी कि अशा घटना प्रत्येक डॉक्टरच्या जीवनात नव्या नसून त्यांच्या तो दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. 

मुळातच वकील, डॉक्टर , सीए, इंजिनियर इत्यादी जीवनभर 'प्रॅक्टिस' करत असतात. कुणीही देव किंवा परफेक्ट नसतंच. सर्व रुग्णाची राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रकृती, शरीररचना, जनुके भिन्न असल्या कारणाने एक औषध सर्वांना सारखं लागू  होईलच असं नसतं. एखाद्या औषधाची रिएक्शन येऊ शकते. पण याचा अर्थ डॉक्टरचा त्या इलाजामागील हेतू अशुद्ध नसतो. आणि हो, डॉक्टरच जनरीक नाव 'मनुष्य' च, त्यामुळे इतर मनुष्याप्रमाणे एखादया डॉक्टरच्या हातून चूकही होऊ शकते. पण त्यामुळे त्यावर प्राणघातक हल्ला करणे अत्यन्त चूक. तसेच अशा एखाद्या अनुचित घटनेमुळे सरसगट सर्वच डॉक्टरांना एकाच भिंगाने बघणे खूप चुकीचे ठरेल. वाईट प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतातच त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. पण त्यासाठी इलाजकर्त्या डॉक्टरचा जीवच घेणे हा काही समस्येचा इलाज होऊ शकत नाही.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी लोकांची सेवा विकत घेत असतो. जसेकी चारचाकी रिपेअर, दुचाकी रिपेअर इ.   विशेष म्हणजे स्वतःच्या जिवापेक्षा आपल्याला या भौतिक सुख देणाऱ्या वस्तू मोठ्या वाटतात. कारण आपण स्वतःच्या शरीराचा आरोग्य विमा न काढता आधी भौतिक सुख देणाऱ्या इतर वस्तूचा इमानेइतबारे विमा काढलेला असतोच. अर्थात शरीराला दुययम स्थान असते. मुख्य म्हणजे यदाकदाचित गाडी रिपेरमध्ये काही त्रुटी झाली तर त्या रिपेअरवाल्याशी आपण त्याच्या पातळीवर जाऊन भांडु शकत नाही. कारण त्या 'हार्ड टार्गेट' समोर आपला इलाज चालत नसतो.  कारण रिपेअररशी भांडनाच प्रकरण आपल्याच अंगलट येऊ शकतं. पण डॉक्टर म्हणजे समाजातील 'सॉफ्ट टार्गेट' त्यामुळे तिथेच लोकांची मर्दुमकी चालते.

हल्लीच्या नवीन डिजिटल जनरेशनमध्ये वावरणाऱ्या मुलांच संवादकौशल्य पाहिजे तेव्हड चांगलं नसत. त्यातच व्हाटसप, मेसेजिंगमुळे मानवी संभाषण मागे पडत आहे. त्यामुळे आयक्यु जरी उत्तम असला तरी इक्यू (इमोशनल कौशन्ट) पाहिजे तेव्हड चांगलं नसतं.  त्यामुळे रुग्णांशी त्यांच्या पातळीवर येऊन भावनिक संयमशीर संवाद साधने मुलांना जमत नाही. तसेच डॉक्टर वडीलाप्रमाणे रुग्णाचे संभाव्य हल्ले झेलण्याची क्षमता, कला त्यांच्या मुलांमध्ये नसते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेऊन कुणीही डॉक्टर आपल्या पाल्याला स्वतःसारखं डॉक्टर बनवू इच्छित नाही. दुसरी महत्त्वाची कौटुंबिक समस्या अशी की निष्णात डॉक्टर बनेपर्यंत डॉक्टराला आपल्या जीवनाची तिशी-पस्तीशी पार करावी लागते. आज सुपरस्पेशालिस्टच्या जमान्यात फक्त एमबीबीएस किंवा एमडी, एमएस डिग्री पुरेशी नाही. त्यामुळे रामासारखी चौदा वर्षाचा अभ्यासाची मेहनत, अभ्यास आणि तपश्चर्या करूनही शेवटी काहीही साध्य होत नाही. तसेच रुग्णसेवेसाठी शासकीय मानांकननुसार स्वतःचा दवाखाना उभा करण्यासाठी आणि उपकरण खरेदीसाठी डॉक्टरला ५-६ करोड रुपये खर्च करावा लागतो. मग वैद्यकीयपेक्षा बारावी नंतर चार वर्षांनी अभियांत्रिकी पदवी घेऊन परदेशात एमएस करून स्थायिक होणे कधीही सोयीचा पर्याय वाटतो.

वैद्यकीय क्षेत्रांच्या समस्या येथेच संपत नाही त्यात अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत.  मुळात शासनाचं वैद्यकीय क्षेत्राबाबतच उदासीन धोरण यास तेव्हढेच जबाबदार आहेत. एकशे तीस कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची समस्या खूपचं बिकट आहे. जागोजागी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची घोषणा केली असली तरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱया गुणवन्त विद्यार्थाना  राहण्यासाठी, भोजनासाठी स्वच्छ वसतिगृह नाहीत की पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यातच दहा डॉक्टराच ओझं तीन डॉक्टरवर येऊन पडतं. मग रात्रीच्या पाळ्या, रुग्णांशी वादविवाद यामुळे त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उदभवत असतात. त्यातच लाल फितीत अडकलेला औषधाचा तुटवडा, बंद उपकरणे यामुळे समस्या वाढत जातात.  शिवाय शेकडो पक्षाचे कार्यकर्ते कायम डॉक्टराशी हुज्जत घालत असतात. एकंदरीत या सर्वांचा फटका इलाजकर्त्या डॉक्टरला बसतो. त्यामुळे परिस्थिती स्फोटक बनून रुग्ण आणि डॉकटरमध्ये वाद उद्दभवतात. प्रसंगी त्याची परिणीती भांडणात होते. शेवटी प्रशासनालाच नमते घेऊन वाद मिटवला जातो.

अशा उपद्रवी रुग्णाचा पायबंद करण्यासाठी भारतीय घटनेत कायद्याचे काही कलम असतीलही पण आजपावेतो कुणालाही शिक्षा झालेली ऐकिवात नाही. प्रत्येक कायदा आणि व्यवस्थेच्या समस्येसाठी आपल्याकडे शासकीय न्यायालय आहेत त्यामुळे रुग्णांनी स्वतः कायदा हातात न घेता सरळ सरळ न्यायालयात धाव घेतली पाहिजे जेणेकरून झाल्या प्रकरनाच 'दूध का दूध' होऊन दोषी रुग्ण किंवा डॉक्टराला शिक्षा मिळू शकेल.

वर नमूद केल्याप्रमाणे आज जरी हि समस्या मोठी वाटत नसली तरी भविष्यात तिचे वाईट परिणाम निश्चित दिसू लागतील. तेंव्हा आज गरज आहे कि शासनाने या समस्येकडे जातीने लक्ष घालून योग्य असे पाऊल उचलावेत.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
(नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)

                    - - - - - -



No comments:

Post a Comment