एक वो भी दिवाली थी!
आज समाजमाध्यमात एक पोस्ट वाचली, " आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मोबाईलचा डाटा कधीच समाप्त न होवो. तुमचा वाय-फाय अखंडीत चालत राहो, वगैरे." या शुभेच्छामध्ये एक विनोद आणि हल्लीच्या परिस्थितीवर टीका सुद्धा होती. मग प्रश्न पडतो, कुठून कोठे आलो आपण? हा लेख वीज नसलेल्या काळातील दिवाळीबद्दल आहे.
दसरा संपताच काही दिवसांनी दिवाळीचे वेध लागायचे. शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या. कोजागिरी पौर्णिमेंनंतर गावात फक्त आमच्या घरावर आकाशदिवा लावल्या जायचा. लहाने काका कलाकार होते. आकाशदिवा किंवा गणपती ते घरीच तयार करायचे. किंबहुना रेडिमेड प्रकार उपलब्ध नसावा. बांबूच्या कमड्या तयार करुन त्याचा षटकोनी आकाराचा आकाशदिव्याचा सांगडा तयार करायचे. चिक्की तयार करुन त्या सांगड्यावर रंगीत पेपर चिपकविल जायचं. त्याकाळी रेडिमेड डिंक, फेव्हीकोल असं काही नसायचा. एक वेळेस मी तो आकाशदिवा बनविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मोठया खांबाला वर अजुन एक खांब बांधून साधारण ३० फुटावर तो दिवा लावला जायचा. रोज संध्याकाळी त्याला खाली उतरवून त्यातील दिव्याची ज्योत व्यवस्थित करुन, तेल टाकलं जायचं. झेंड्याप्रमाणे हळुवार दोर ओढून तो आकाश कंदील वर चढविण्यात भलतीच मजा यायची. तिस फुटाची ती उंची बालपणी खूपच जास्त वाटायची. गावातील दूरवरच्या शेतातील मंडळींना तो लाल दिवा लुकलूकतांना दिसायचा. १९८३ पूर्वी पर्यंत गावामध्ये वीज नव्हती.
दिवाळीची खरी तयारी रंगरंगोटीने व्हायची. तीन भावाचं एकत्र कुटुंब बरंच मोठं होतं. तेव्हढाच मोठा घराचा पसारा होता. मातीच्या जुन्या घरासह नंतर बांधलेली विटा सिमेंटची भिंत असलेली जोडणीची मोठी बैठक होतीच. त्याकाळी गावातील फक्त दोन तीन घरचं सिमेंट आणि जोडणीचे असावे. जोडणीच घर म्हणजे त्याकाळी वैभवाच प्रतिक. दिवाळीत सर्वात मोठं काम म्हणजे संपूर्ण 'घर रंगविणे' हेच होतं. घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न असेल तरचं घरात लक्ष्मी येणार, असं त्यामागचं कारण. त्यामुळे दसऱ्यानंतर हे काम सुरु व्हायचं.
दिवाळी काही दिवसावर येताचं गावभर मातीच्या भिंतीची डागडुगी सुरु व्हायची. पावसाने भिंतीचे पापुद्रे निघायचे तर कधी भिंती पडायच्या. गावभर भिंती दुरुस्ती करुन त्याला शेनाने सावरण्यांची काम चालू व्हायचे. लहानमोठं काम लोकं घरच्या घरीच निपटून घ्यायचे पण मोठं असलं तर मात्र गडी लागायचा. गावात चिखलाचा गारा करुन भिंत दुरुस्त करण्यासाठी 'शिरपा गारा स्पेशालिस्ट' होता. जेवण भाकरी आणि थोडंफार धान्याचा मोबदला ठरवून त्या करवी लोकं गारा तयार करुन भिंती दुरुस्त करुन घ्यायचे. शिरपा जसा उंचीला तसा अंगानीही धीपाड जाडजूड होता. त्यामुळे मोठा चिखलाचा गारा तुडवनं त्याला सहज जमायचं.
शेनाने सारवल्यामूळे भिंतीला नवीन जीवन मिळायचं. हिरव्या शेणामुळे भिंतीला एक प्रकारचा नवीन 'कलर शेड' यायचा. हाच प्रकार आमच्या घरी घडायचा. महिलावर्ग 'फ्री स्टाईल' ने भिंतीचे खड्डे भरून, सारवून भिंतीला मजबूत करायचे. दिवाळी जवळ येता कामाला गती मिळायची. बालपणी आजच्या सारखे एशियन, बर्जर सारखे विविध तयार पेंट नव्हते की ब्रश नव्हते. मातीच्या भिंतीला चुनखडी कालवून लावल्या जायची. ठराविक भिंतीला अभ्रक लावली जायची. हा रंगरंगोटीचा विभाग आमच्या लहान काकाकडे होता. हिंगोलीच्या शॉपिंग लिस्ट मध्ये 'अभ्रक'खडी,गेरू, इतर रंगाचा समावेश करायचे. ऐका मोठ्या कापडी पिशवीत ती अभ्रक आणि थोडया गारगोट्या टाकून त्या पिशवीला पाणी टाकून सतत तुडवलं जायचं. तुडवल्यामूळे अभ्रकच्या पापुद्र्या अगदी बारीक होऊन तिचा चमकणाऱ्या नेलपेंट सारखा पेस्ट तयार व्हायचा. अशी अभ्रक जेंव्हा मातीच्या रुक्ष भिंतीवर चढायची तेंव्हा भिंतीला चारचांद लागायचे. ती चमचम चमकायची. पूर्वी आजच्या सारखी सरसकट भिंत एकाच रंगात न रंगवता खाली साधारण दीड फुटाची लाल रंगीत बॉर्डर मारली जायची. बॉर्डरमूळे ती भिंत जास्तच उठून दिसायची. तागापासून तयार केलेले लहान मोठे 'कुच्चे' वापरून संपूर्ण घराची रंगरंगोटी व्हायची. पेंटर हा प्रकार आम्हाला माहित नव्हता, आम्हीच पेंटर होतो. सर्व रंगाची कामं घरातील करण्याजोगी मंडळी आमच्यासारख्या लहानांना हाताशी धरून पार पाडायची. भिंतीचा वरचा भाग मोठे भाऊ तर खालचा भाग आम्ही मारायचो.
भल्या मोठ्या घराच्या खोल्याच्या रंगोटीचं काम लक्ष्मीपूजन दिवसापर्यंत चालायचं. घरासोबतचं मोठी बैठक, पिठाची गिरणीला रंगवावं लागायचं. काही ठिकाणी चुना तर काही ठिकाणी अभ्रक. नंतर नंतर ठराविक रंगाचे डिस्टेम्परचे पॅकेट बाजारात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे रंगवन्याच काम बरंच सोपं झालं. शेवटी तो लक्ष्मीपूजनाचा दिवस उगवायचा. या दिवशी छोटे काकाचं आध्यात्म शिगेला पोहचलेलं असायचं. पोथी पुरानातून त्यांनी चांगले दोहे शोधून काढलेले असायचे. दिवसभर वाटीमध्ये गडद लाल रंग आणि बारीक कुच्चा घेऊन ते कोणत्या नं कोणत्या खोलीत उंच स्टूलवर उभं राहून दोहे लिहायचे. आज 'कर्फ्यू दिवस' असायचा. नेहमीप्रमाणे आज आम्ही काकांच्या 'कव्हरेज क्षेत्रा'त येणं टाळायचो. नोकराचं आज काही खरं नसायचं, त्यांचं काकांची बोलणी खानं ठरलेलं असायचं. चूक झाली की 'बैल बैल, तुझे समजता नही ' ही त्यांची ओरड कायम असायची. आम्ही ती मुकाट ऐकून ते क्षेत्र टाळायचो. हेच आमचं 'बचाव तंत्र' होतं. दुपार होता होता लहान मोठ्या बैठकीसहित सर्व ठिकाणच्या भिंतीवर त्यांचे दोहे लिहून घराला 'अध्यात्मिक टच' लाभायचा. प्रत्येक प्रवेशद्वारावर 'शुभ लाभ' तर चौकटीवरच्या भिंतीवर 'ॐ' किंवा 'श्री' लिहिलं जायचं. 'शुभ-लाभ' चा अर्थ कमविलेलं लाभ किंवा धनाचा शुभ मार्गाने घरात प्रवेश व्हावा , वाईट मार्गाने नको हा त्यामागील अर्थ! भिंतीवर लांबलचक दोहे लिहिले जायचे. सतत वाचून ते आम्हाला मुखोदगत व्हायचे. काहीचा अर्थ स्पष्ट कळायचा तर काही फक्त वाचल्या जायचे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे -
चलो सखी अब जायीये जहाँ बसे ब्रिजराज l
गोरस बेचत हरी मिले एक पंथ दो काज l l
पद पखारी जलू पान करी आप सहित परिवार l
पितर पारू करी प्रभू हिपूनी मुदित गये लेहूपार ll
राम नाम अंकितग्रह शोभा बरणीन जाय l
गो तुलसीका बंधतर देख हर्ष कपिलाय ll
राम नाम सब कोई कहे दशरथ कहे ना कोय
एक बार जो दशरथ कहे कोटी बचन फल होय ll
राम नाम की लूट है लुटन वाले लूट l
अंत समय पश्चतायेगा प्राण जायेंगे छुट ll
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |; धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत l अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
काकांच असं लिहणं चालू असतांना दुसरीकडे आई, काकी, बहिणी महिलामंडळ स्वयंपाक घरात मात्र दिवाळीचं मिष्ठान, पुरणाच गोड जेवण तयार करण्यात गुंग असायचं. लोखंडी कढईमध्ये भलंमोठं पूरनं खदखद तयार व्हायचं. कुरडई, पापड बुंदीचे गरम लाडू सर्व 'याची देही याची डोळा' आम्ही फक्त बघायचो. स्वयंपाक घरातून पकवानाचा सुगन्ध आणि धुरच धूर बाहेर पडायचा. खायची परवानगी लक्ष्मीपूजा संपन्न झाल्यानंतर! हा कडक नियम. यापेक्षा मोठा ताप हा की भूक शमविण्यासाठी त्या दिवशी मुद्दाम भल्यामोठया जर्मलच्या भगोन्यात बेचव उडदाची खिचडी असायची. संध्याकाळपर्यंत ती पांचट खिचडी कडक होऊन तिचे दर्शन सुद्धा नकोसे वाटायचे. खायला काही गोड मागितलं की आमच्या मोठया बहिणी एक तर भगोन्याकडे अंगुलीनिदर्शन करायच्या नाही तर काकांना सांगते म्हणून भिती दाखवायच्या, बसा बोंबलत!
संध्याकाळ होता पूजेच्या ठिकाणी भिंतीवर कमळाचं फूल काढल्या जायचं. बऱ्याचदा हे काम माझ्या वाट्याला यायचं. घरात दिवे-वात्या लावन्याची व पूजेची एकचं गडबड सुरु व्हायची. घरातील सर्व फोटो सहित जुन्या नवीन वह्या जमा केल्या जायच्या. हार तयार केला जायचा. यातील क्वचित एखादं काम जसेकी हार वगैरे आमचे वडील करायचे. हा त्यांचा प्रांत नव्हता. पूजेच्या ठिकाणी बसलेले कडक काका ऐकामागून ऑर्डर सोडायचे. त्यांचं बोलणं असं होतं कि, बऱ्याचदा त्यांनी काय मागितलं हे आम्हाला नाही कळायचं. आम्ही 'हो समजलं' म्हणून कटायचो, मग मागे जाऊंनं काकीना चुपचाप विचारायचो 'काकांनी आता काय मागितलं?' अर्थात काकींना त्यांच्या भाषेची सवय झाली होती. तर अशा कर्फ्यू वातावरनात वह्या पुस्तक, खाते वही चोपडी वही यांची पूजा करुन लक्ष्मीपूजन संपन्न व्हायचं. सर्व वडील मंडळीचे पाय पडले जायचे.
एकीकडे पूजा चालू असतांना आम्हाला मात्र फटाक्याचे वेध लागायचे. फटाके मिळतील या आशेवर सर्व कामं होऊन जायची पण ते फटाके सहजासहजी हाताला लागत नसत. जेवणाप्रमाणे फटाके सुद्धा पूजेनंतरचं असा ठरलेला नियम होता. थोडक्यात प्रत्येक गोष्टीच्या आड पूजा यायची. पूजा संपली की आता आधी जेवण मग फटाके! हा जरा अतिरेक व्हायचा. मधूनच सर्व देव देवतांना, आजी-बाबांना नैवेद्य दाखवायला जावं लागायचं. या सर्व गडबडीत आमचे फटाक्याकडे कुणी लक्ष देत नसे. पण नंतर फटाके वाटप व्हायचं. पण काही टिकल्याच्या डब्ब्या, सुरसुरी, लवंगी फटाके आणि काळ धुरचं धूर करणारी सापाच्या गोळीवर आमची बोळवण व्हायची. फटाक्यापुढं भूक विसरून आधी फटाके उडवूनच नंतर जेवण करायचो. फटाके उडवीताना आमच्या आनंदात गावातील ग्रामस्थसुद्धा सामील होऊन दिवाळीचा आनंद घ्यायचे.
प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी होते. पण कालांतराने त्या उत्सवात खूपच बदल झालेत. आता ती तुडवनारी अभ्रक नाही की खडी नाही की बॉर्डर नाही. दहा वर्षात एकदा भिंतीला रंग मिळतो कारण प्रत्येक वर्षी ते शक्य नाही. आता रोजचं पक्वानाचा आनंद मिळत असतांना दिवाळी पक्वाणाचं महत्व नाहीसं झालं. समोर वाढलं तर कुणी खात नाही, बीपी, शुगर, हृदयविकाराची भिती वाटते. रोजचं छान कपडे त्यामुळे नवीन कपड्याचं महत्व राहिलं नाही. दिवाळी खरेदीच्या वस्तू बदलल्या. आता मानसिक सुखा ऐवजी लोकांचा कल दुचाकी, चारचाकी, फ्रिज सारख्या भौतिक सुख देणाऱ्या वस्तूकडे वळला आहे. समाजाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता ऑनलाईन ऑर्डर करुन आकाशादीवा हरपोच मिळतो. इलेक्ट्रिसीयन तो लटकवून देतो. सर्वच रेडिमेड, मग फराळ घरी का करावा? तेही ऑनलाईन ऑर्डर केल्या जातं. काही दिवसानंतर घरासमोर फटाके उडविण्याची गरज पडणारं नाही. फटाके उडवून देणाऱ्या एजेन्सी उपलब्ध होतील. फक्त मनी ट्रान्सफर केलं कि झालं. डिजिटल तंत्रज्ञान लोकांचा अस्सल आनंद हिरावून त्यांना आभासी जगात रमविण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.
सततचे संस्कार अंगात भिनतात किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडतात. बालपणी मनावर झालेले संस्कार वाया जात नाही. सिमेंटच्या भिंतीतूनही एखादं हिरवं रोपटं उगवून बाहेर यावं, असे कधी ना कधी ते बाहेर पडतातचं. आजही आम्ही दिवाळी तेव्हड्याच उत्सवाने साजरी करतोच. शक्य तेव्हढे नियमाचे पालन करतोच. मागील काही दिवसात मी पेंटच्या रिकाम्या डब्ब्याना छानसा रंग देऊन सजवलं. त्यावर काय लिहावं म्हणून गुगलवरून काही छानसे संस्कृत सुभाषित शोधून काढले, ते लिहिले. शेवटी 'वळणाचं पाणी वळनावरचं जातं' हे ही तेव्हढंच खरं.
बाकी काही नाही 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!' साजरी करा दिवाळी. हार्दिक शुभेच्छा.
©प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर
ह. मू. छ. संभाजीनगर, 9822108775