ad1

Friday, 29 August 2025

पेडगावचा पोळा



                           पेडगावचा पोळा


काल गावाकडे आलो होतो. हिंगोली तालुक्यातील पेडगाव हे माझं मूळ गाव. जिथे मी सातवीपर्यंत शिकलो.  त्यानंतरचं शिक्षण हिंगोलीला झालं. नेहमी गावाकडे जात नसलो तरी गावाकडची ओढ कायम असते.   पण स्वतःला शहरात गुंतवून घेतलेल्या माणसाकडे एव्हढी कारण असतात जी त्याचं पाऊलं गावाकडे पडू देत नाहीत. 

'वेड्याच सोंग घेऊन पेडगावला जाणे' किंवा  'पेडगावचे शहाणे' या प्रसिद्ध म्हणीत असलेलं गाव आमचं नव्हे. ते ऐतिहासिक महत्व असलेलं पेडगाव अहिल्यानगर जिल्ह्यात आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा उपयोग करुन तेथील बहादूरगड (धर्मवीरगड) किल्यातील मोठा खजिना आणि २०० अरबी घोडे लुटले होते.  त्यानंतरची मोठी घटना अशी की छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना प्रथम याचं ठिकाणी आणलं होतं.  याच गडावर त्यांचा छळ सुरु झाला होता. तेंव्हापासून या दोन्ही म्हणीचा उगम झाला असावा. त्यामुळे वाचतांना वाचकांनी गल्लत करू नये, म्हणून हा खुलासा. 

पूर्वी ग्रामीण जीवन हे पूर्णतः शेतीवर आधारित असतं. शेतीचे सर्वच कामं मशागत लागवडी पासुन पिक काढणी आणि विकेपर्यंत सर्व काही बैलांच्या भरोशावर असायचं. त्यामुळे बैलजोडीशिवाय खेड्याच जीवनाची कुणी कल्पनासुद्धा करू शकत नव्हतं. त्यामुळे सर्व भूधारकांकडे किमान एक दोन तरी बैलजोडया असायच्या. वेळप्रसंगी इतरांचे बैलसुद्धा कामी यायचे. अशा वर्षभर शेतकऱ्याचे ओझे खांद्यावर वाहणाऱ्या बैलांची पूजा फक्त एकच दिवस व्हायची. एकाच दिवशी बळीराजा त्याला एखाद्या लग्नाच्या नवरदेवासारखा सजवायचा, घरोघरी त्याला सजवून मिरवायचा. त्यासोबत तो स्वतः ला सजवून मिरवायचा, तो एकमेव दिवस म्हणजे पोळा. काही ठिकाणी त्याला बैलपोळा म्हणतात. पण पोळा सण असतोच मुळात बैलाचा त्यामुळे बैल या शब्दाची जोड आवश्यक नाही. लग्नाला कुणी नवरा-नवरीचं लग्न असं म्हणतं का? नाही. कारण  मुळात लग्न हे असतं नवरा-नवरीच! असो. 

त्या एक दिवसाच्या पोळ्याची तयारी मात्र खूप दिवसापासून सुरु असते. बालपणापासुन मी ती तयारी बघत आलोय त्यामुळे भूतकाळातील त्या सर्व गोष्टी एखाद्या चित्रफिती प्रमाणे समोरून जातांना दिसतात. मग मनात विचार येतो आज तो उत्साह, ती सणाची धामधूम कुठे गेली? कुठून कोठे आलो आपण? यालाच प्रगती म्हणायची का? एक भरलेल्या आणि उत्साहाने भारलेल्या पेडगावच्या पोळ्याच वर्णन मी आज करणार आहे. वयानुसार उदया कदाचित सर्व गोष्टी आठवणार सुद्धा नाहीत म्हणून ही उठाठेव. 

आमचे थोरले काका ज्यांना आम्ही 'बडे दादा' म्हणायचो  यांच्याकडे पोळा सणाचा चार्ज असायचा. किंबहुना ते काम इतर भावाना जमायचं नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. बडे दादा खूपच हरहुन्नरी होते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्यांना पटायचा नाही. इंग्रजीत हैप्पी गो लक्की ज्याला म्हणतात असा त्यांचा स्वभाव होता. इतर भाऊ व्यवहार किंवा हिशोब बघत असले तरी जनावरांची सायसोय, त्यांना सजवनं, नागर भरन वखर डवरा भरन अशी सर्व किरकोळ पण अत्यन्त महत्वाच डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. बऱ्याचदा आमचे वडील (मधवे भाऊ) किंवा लहाने काका त्यांच्या कामात ढवळाढवलं करायचे तेंव्हा ते त्यांना झापायचे.  तेंव्हा यांनाही झापणारं कुणी आहे हे बघून थोडा आनंदही व्हायचा. त्यांचे वादविवाद बघून आम्ही मनातल्या मनात हसायचो. पण त्यांचा तो वाद त्या क्षणापुरताच मर्यादित असायचा. लहाने दोन्ही भाऊ नमतं घ्यायचे, बडे दादाचे उद्योग चालू रहायचे. तर बैल असो किंवा इतर जनावरं त्यावर बडे दादाचं प्रेम हे काखनभर जास्तच होतं. आणि ते अस्सल होतं. 

पोळ्याच्या किती तरी दिवस आधीपासून तयारी सुरु व्हायची. आम्ही शाळेत गुंतलेलो असलो आम्हांला ती तयारी दिसून यायची. साधारण महिन्या आधीपासून ती तयारी सुरु व्हायची.  अठरा जोड्या बैलासाठी लागणाऱ्या झुली, वेसन, कासरे,, इतर साज-श्रगार व्यवस्थित आहेत की नाही याची ते खात्री करुन घ्यायचे. वर्षेन वर्षे वापरून झुली मधूनच कुठे फाटलेल्या असल्या की त्याला ते शिवून घ्यायचे. प्रत्येक बैलाच्या गळ्यात घुंगरूच्या घुंगरमाळा किंवा घंट्या आहेत की नाही याची बडे दादा खात्री करून घ्यायचे. ज्या गोष्टी कमी पडत आहेत त्या ते हिंगोलीहून आवर्जून आणण्यासाठी सांगायचे. बऱ्याचदा बैलासाठी वेसन कासरे कमी पडायचे. त्यासाठी आधीपासूनच एक दोन गडी इतर कामे सोडून बैठकीच्या जोत्यावर दोरी वळत बसलेले असायचे. तागापासून दोन्ही हातांच्या तळव्यात तयार होणारी ती दोरी वळता वळता सारखी लांब होत जायची. मधूनच गडी त्यात ताग जोडून तो पुढं वळायचा.  ती दोरी वळण्याची कला आम्हासारख्याना भुरळ घालायची. मग आम्हीसुद्धा गड्याप्रमाणे दोरी वळण्याचा प्रयत्न करायचो पण ते जमायचं नाही. गुजराती भाषेमध्ये म्हणं आहे,'जेनो काम तेनो थाय बिजा करे सो गोतो खाय'  मधूनच ती दोरी एक तर पातळ व्हायची किंवा एकदम जाड! कंटाळून आम्ही सोडून द्यायचो. मग गडी आम्हाला 'तू तुपलं लिहायचं काम कर' म्हणून टोमणे मारायचे. 

एक एक साजश्रँगाराची जोड करता  करता पोळा दोन  दिवसावर यायचा. लग्नाआधी घरामध्ये जसा उत्सवाच उधान येतं तसं तयारीत जोर यायचा. अशात कुणाची हिंगोलीला वारी होत असेल तर त्याला बैलांची शिंग रंगविण्यासाठीच वारनीश आणि सजविण्यासाठीच्या बेगडी पट्या आणल्या जायच्या. आदल्या दिवशी गडी बैलांना अंघोळ घालण्यासाठी डोहात घेऊन जायचे. त्यासोबत गडीसुद्धा पोहून घ्यायचे. तसं ते जोखमीच काम असायचं. शिंग लागुन जखमी होण्याची भिती असायची. संध्याकाळी 'खांदमळन' असायची. वर्षभर ज्या खांद्याच्या भरवशावर शेतीची कामं उरकली जातात ती खांदी मळण्याचा तो कार्यक्रम. 

पोळ्याच्या दिवशी दुपारपासून बैल सजावटीला सुरुवात व्हायची. विविध रंगाच्या चमचमीत बेगड पेपर घडी करुन दोऱ्याच्या सहाय्याने त्याच्या पट्ट्या कापल्या जायच्या. एका परातीत कापलेल्या पट्या घेऊन त्या आम्ही बैलाच्या शिंगाला लावण्यासाठी घेऊन जायचो. शिंगाला लावलेल्या ओल्या वारनीशवर त्या बेगडपट्ट्या सहज चिपकून जायच्या. पाठीवर रंगबिरगी झुल, शिंगावर चमकणाऱ्या विविध रंगाच्या बेगडी पट्ट्या, गळ्यात घन्टी व घुंगराच्या माळा, नाकात रंगीन नवीन वेसन, लाल गुलाबी रंगाने रंगविलेले नवीन कासरे असा साज चढवून सजविलेले बैल पोळ्यात नेण्यासाठी तयार असायचे. वर्षेभर शेताची कामं ज्याच्या खांद्यावर त्या जनावराला आज पूर्णतः सजवीलं जायचं. 

एकीकडे पोळ्यासाठी बैल सजवीनं जोरात चालू असतांना दुसरीकडे घराच्या स्वयंपाकघरातून किती तरी व्यन्जनाचा सुगन्ध बाहेर दरवळायचा. १५-१६ शेताचे गडी, गिरणी चालवीणारा नोकर, घरातील लहान मोठे १५-२० सदस्य आणि सर्व देव-माताच्या पूजेचे आणि सर्व बैलासाठीचे नैवेद्य अशा मोठ्ठया पुरणपोळ्याच्या गोडधोड स्वयंपाक्काची घरात तयारी चालू असायची. पुरणपोळ्यासोबतच बुंदीचे लाडू, भजे, कुरडीपापड, तिखट वरण असा खास बेत असायचा. आमचं अर्ध लक्ष बैलाच्या सजावटीच्या कामात तर अर्ध लक्ष पाकगृहातून येणाऱ्या सुगंधाकडे असायचं. न कळत पाय पाकगृहाकडे वळायचे. पूजेपूर्वीच पुरन किंवा बुंदी लाडूवर डल्ला मारायची इच्छा व्हायची. एरव्ही न लागणारी भूक त्यादिवशी जरा जास्तच उफाळून यायची. पण आमच्याकडे एक दुष्ट परंपरा होती. ज्या दिवशी सणाच्या गोडधोड जेवणाचा खास बेत असायचा त्या दिवशी आमच्या बहिणी एका मोठ्या पातेल्यात(भगोन्यात) उडद डाळीची अगदी बेचव खिचडी करुन ठेवायच्या. भजे वड्याच्या घाण्याचा सुगन्ध आम्हाला पाकगृहाकडे आकर्षिक करू लागला की आमची भूक शमविण्यासाठी बहिणी आम्हाला ती दुष्ट खिचडी खायला सांगायच्या. जे की एखाद्याच्या प्रबल इच्छेवर अत्याचार करण्यासारखा प्रकार असायचा. नैवेद्याशिवाय आम्हाला एखाद्या व्येनंजनाचा स्पर्शसुद्धा करण्याची मुभा नसायची. पण बऱ्याचदा आईला तो 'अतिरेक' नाही पटायचा, आमची कीव येऊन नैवेद्य न दाखवताच एखादा पुरणाचा गोळा आम्हाला ती चुपचाप खाऊ द्यायची. आम्ही तो क्षणात गिळून घ्यायचो. एकाच बघून मग इतर भाऊ त्यांचा मोर्चा पाकगृहाकडे वळवायचे. पण त्यांच्या नशिबी नैवेद्य दाखविण्याचं काम यायचं.  खायचं असेल तर लवकर नैवेद्य दाखवा!

साधारण पोळ्याच्या पंधरा वीस दिवस आधी आमचे 'लहान काका' कुणाला तरी हिंगोलीहून गड्यासाठीच्या सदऱ्याचा कपडा आणायला पाठवायचे. 'कपडे' विभाग त्यांच्याकडे होता. वीस मीटरहून मोठा सुती कपड्याचा ठान आणून टेलरला सर्व गड्याच्या सदऱ्याचा माप दिला जायचा. हातात कैची, मापाचा टेप घेऊन डुलत डुलत साहेबरावमामाची पावलं आमच्या घराकडे वळायची. तोंडात विशिष्ट प्रकारे जीभ फिरवत ते काका समोर हजर व्हायचे. सर्व गड्यांची माप देतांना काका त्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दयायचे. टेलरमामा आमच्या काकाची बोलणी एकण्यासाठी सदैव तत्पर असायचे. काकासमोर त्यांची पुरती फजिती व्हायची. एव्हढं कडक बोलून आणि टेलरमामानी ते व्यवस्थीत ऐकून नको ते व्हायचंचं. एखाद्या शर्टाची बटणे तर इतर एखादा शर्ट काचेविनाचं यायचा. काही सदरे खूपच मोठी शिवून यायची. 

सारखे नेसलेले सदरे, गांधी टोपी, माथ्यावर गुलाल कुंकू लावलेले गडी सजविलेल्या बैलजोड्यासह घुंगराच्या आवाजात पोळ्याच्या तोरणाखाली हजर व्हायच्या. जोरजोरात डफड्याचा आवाज कांनी पडायचा. पोळा भारताच त्याला जास्तच चेव यायचा.  'मान' असलेली जोडी डफड्याच्या आवाजात पोळ्यासाठी हजर व्हायची. गावातील सर्व जोड्या तोरणाखाली येताचं 'हर बोला महाssदेव, हर बोला महाss देव' अशा घोषणानी वातावरण धुंद होऊन जायचं. पोळा म्हणजे बेधुंद शेतकरी हे समीकरण. त्यामुळे तोरणाखाली आलेल्या गावकऱ्यापैकी बरीच मंडळी 'रिचार्ज' मारून फुल्ल झालेली असायची. पोळ्यासाठी त्यांनी आधीपासूनच घरी तसा 'इंतजाम' करुन ठेवलेला असायचा.  वयाची अट जरा  क्षिथिल  व्हायची. गावात देशी मिळत असली तरी गावभर हातभट्टीच्या दारूचा सुकाळ असायचा. अशी 'पहिल्या धारेची' घेतलेली बेशुद्ध मंडळी मग पोळ्यात इतरांच मनसोक्त मनोरंजन करायची. अशा 'धुंद' धामधूमीत काही अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस स्टेशन बासंब्याहून एक दोन पोलीस गावात हजर व्हायचे. पोळा संपत संपत ते सुद्धा झुलायला लागायचे. 

पोळ्यात गावातील पाटलाची 'मानाची जोडी' असायची. पूर्वीपासून ती प्रथा चालत आलेली. त्यामुळे त्या जोडीचा मान प्रथम असायचा. विवाह मंडपात जसे मंगलआष्टक बोलले जातात तसे ब्राहमनातर्फे मंगलआष्टक झाल्यानंतर गावातील काही मंडळींना मंगलआष्टक बोलण्याचा चेव चढायचा. मग एकाने सुरु केलं की दुसरा त्याला तोड द्यायचा. दोन्ही मंगळाष्टक बोलणारे भिडले की उपस्थितीतांच भरपूर मनोरंजन होऊन पोळा सुटायचा.  'हर बोला महाssदेव, हर बोला महाssदेव' च्या घोषणा देत बैलाला हाकलत सर्वप्रथम मारुती मंदिराच दर्शन घेऊन बैलजोड्या पूजेसाठी घरी यायच्या. तोपर्यंत मोठया बैठकीच्या समोर एका बाजेवर एक चादर किंवा सतरंजि अंथरून त्यावर नैवेद्य आणि पूजेच सामान तयार असायचं. बैलजोडयासह गड्याला कुंकू लावलं जायचं.  जोड्या फिरवीनं झाल्यानंतर लगेचंच गावातील घरोघरी जाऊन वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यासाठी लोक गावभर फिरायची.  सर्व समाजातील मंडळी मिसळून जायची.   त्या काळी गावात बरीच डोक्यावर कोसल्याचा लाल, पांढरा फेटा नेसलेली मंडळी असायची. त्यांना विशिष्ट मान असायचा. या निमित्ताने आमचं अख्ख्या गावातील गल्ल्या फिरणं व्हायचं. नवीन कोरे धोती सदरा नेसलेले ग्रामस्थ 'रामराम रामराम' करत गावभर फिरतांना दिसायचे. त्यांचे नवे कोरे कपडे गुलाल कुंकूने माखलेले असायचे. धुंदीत टोपी फिरून  जायची, खाली पडायची. ऐकून ती संध्याकाळ काळ खूपच मंतरलेली वाटायची. शिक्षणानिमित्ताने बरीच वर्षे आम्ही गावापासून दूर असायचो. पाया पडत फिरतांना गावातील वृद्ध आया बहिणी आम्हाला आस्तेने विचारायच्या 'तू लहान का? तू किरण का प्रेम ? कोन लहान कोन मोठं? तू कुठं लिहायला? अशी विचारपूस करायचे. पाया पडताच हाती सोप सुपारी, कडदोरा मिळायचा. लहानपणी आम्ही ते मोजून त्याची इतरांशी तुलना करायचो. अनेक घरातून चहा किंवा जेवणाचा आग्रह व्हायचा. एक दुसऱ्याची आस्थेने विचारपूस व्हायची. गावाकडची जुनी मित्रमंडळी भेटायची. मधूनच एखादा 'फुल्ल रिचार्ज' घेतलेला गडी भेटला तर मग विचारायची सोय नसायची. 'ओहरडोज' झालेला तो गडी मग हात सोडायचा नाही. नाईलाजाने त्याचं पूर्ण 'भाषण' ऐकून घ्यावं लागायचा. त्याला दुखवून काही फायदा नसायचा. पूर्वी पिलेल्या आणि वायफळ बडबड करणाऱ्या लोकांबद्दल मला थोडी चीड यायची. पण आता वाटतं शेतात काबाडकष्ट करुन शिन घालविण्यासाठी त्यानं दोन घुट घेतली तर कुठं कोणाचं बिघडतं. समाजात दारूच्या नशेपेक्षा इतर किती तरी घातक नशा आहेतच की! पैशाची नशा, पदाची नशा, प्रतिष्ठेची नशा, धर्माची नशा. दारूची नशा तशी तात्पुरती असते जी साधारण सहा तासात उतरून मनुष्य पूर्णतः शुद्धीवर येतो. पण इतर नशा उतरता उतरत नाही. पैसा, पद, प्रतिष्ठा व धर्माच्या नशेतील व्यक्ती दारूच्या नशेपेक्षा किती तरी पटीने समाजासाठी घातक ठरतो, असं मला वाटतं. धर्माच्या नशेला तर अफूच्या गोळीची उपमा देण्यात आलेली आहे जी अख्ख्या देशासाठी घातक आहे, असो. 

मोठ्या धामधूमीत तर कधी रिमझिम पावसात पोळा संपल्यानंतर घरी गड्याची पंगत बसायची. रिचार्ज घेतलेली मंडळी काका दादापासून अगदी दूर बसायची. सर्वांना सर्व कळायचं. कळून न कळल्याच सोंग चालायचं. बऱ्याचदा जेवण वाढताना गडीचा 'फॉर्म' आम्हाला कळायचा. मधूनच बाहेर गल्लीत कुणी बडबडत चालण्याचा आवाज यायचा. पूर्वी शुगर, बीपी, थायरॉइड, हार्ट अटॅक म्हणजे काय हे डॉक्टरशिवाय कुणालाच माहित नसायचं. ग्रामस्थ अशा शब्दापासून शंभर नाही तर हजार कोस दूर होते. खाणारे गडी यथेच्छ भोजन करायचे. वाढणारे वाढत जायचे. कुठंही काही कमी पडायचं नाही, कमी पडू दयायचे नाही. गोडधोड पुरणपोळ्या खाऊन, जमेल तेव्हढे पिऊन, तृप्त होऊन सर्व पोळा साजरा व्हायचा. ढारढूर करत गाव झोपी जायचं.  दुसऱ्या दिवशी महादेव दर्शन असायचं. गावातील मोजक्याच जोड्या महादेव दर्शनासाठी चिंचोली महादेवाला जायच्या. पूर्वी मधल्या रस्त्याने तर नंतर रोडने जाणं व्हायचं. वाटेत वाघामायचे दर्शन व्हायचे. 

हे सर्व वर्णन भूतकाळातील साधारण ३०-४० वर्षापूर्वीच्या पोळ्याविषयीचं होतं. कालांतराने सर्व बदलत गेलं. वृक्षाची जुनी पाने गळून जशी नवी पाने फुटतात तशी जुनी पिढी निघून नवीन पिढी उदयास आली. अर्थात बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. डिजीटल युगात पेडगावचा पोळा कसा भरतो याबद्दल मला बरीच उत्सुकता होती.  नवीन पिढी मोबाईलमूळं कायम एंगेज असते. लाखो इन्स्टाच्या रिल्स, युट्युब आणि व्हिडिओ गेम्समूळे 2 GB डाटा कधी संपतो कळतसुद्धा नाही. पण विचारपूस केली असता गावात आज घडीला चाळीस एक बैलजोडया असतील असं कळालं. म्हणजे पोळा बघण्यासारखा असणार हे निश्चित झालं.

एक काळ होता जेंव्हा आमच्या एका कुटुंबात १८ बैलजोड्या होत्या. म्हणजे ३६ बैल! गावा सभोवताली चारी दिशाला पसरलेल्या शेत आणि घरकामासाठी तेव्हढे बैलं लागायची.  संपूर्ण ग्रामीण जीवन हे बैलांच्या भरवशावर असायचं. नागरनं, वखरनं, डवरनं. तसेच खळ्यात मळणीसाठी, शेतधान्याच्या वाहतुकीसाठी बैलं लागायची. तरुण गोऱ्ह्याचं जोड शंकरपटासाठी तर डंगर (रिटायरमेन्ट जवळ आलेलं) जोड पाण्याच्या टाकीसाठी वापरात यायचं. दिवसातून एकदा एसटी बस त्यामुळे गावी ये जा करण्यासाठी बैलगाडी किंवा डमनी लागायची. बैलगाडीच्या वरातीत मी गेलेलो आहे.  थोडक्यात शहरी लोकं गायीला गौमाता म्हणून मोठा दर्जा देत असतीलही पण सर्व कामं ज्यांच्या नशिबी येतात ती बैल!  आमच्या गोठ्यात बैलासोबतच इतर तीस एक गाई, गोऱ्हे आणि म्हशी असायच्या.  पूर्वी ज्यांच्याकडे  भरपूर शेती, गुरंढोर, धान्याची पोती आणि भरपूर दूधदुभेट्याची रेलचेल असायची अशा घराला सधन कुटुंब मानलं जायचं.   कालांतराने सधन कुटुंबाची व्याख्या बदलत गेली. हल्ली ज्याच्याकडे मोठं घर आणि घरासमोर दोन तीन  फोर्चूनरसारख्या लांब गाड्या उभ्या असतात अशा कुटुंबाला जनता सधन कुटुंब मानते. 

अलीकडच्या काळात शेतीत बदल झालीत.  सजीव बैलाची कामं निर्जीव यंत्र करू लागली. सर्वत्र ट्रॅक्टर, मळनियंत्र दिसू लागली. त्यामुळं बैलाचं महत्व कमी होत गेलं.  बैलं होती तर त्यासोबत इतर जनावर सुद्धा होती. अर्थात शेतीसाठी भरपूर शेंद्रीय खत मिळत होतं.  पिकाला शेणखत त्यामुळे शेत जमिनीला फायदा व्हायचा. आणि खाणाऱ्याला सुद्धा केमिकलरहित अन्न खायला मिळे.  आता शेन नाही, गॅसमूळे चुलीची राख नाही त्यामुळे उकरंडा प्रकार कुठं दिसत नाही.  काही वर्षानंतर येणाऱ्या पिढीला उकरंडा हा शब्द माहित नसणार.  शेंद्रीय खत इतिहास जमा होऊन त्याजागी  केमिकलयुक्त खत आलं आहे.  अर्थात त्याचा वाईट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.  खेड्यापाड्यात कॅन्सर सारखे रोग पसरत आहेत. शेतीत कमावलेला पैसा दवाखान्यात जात आहे.  

कष्टकरी बैलासोबत आपसूकच गड्याचेही कष्ट व्हायचे. खाल्लेलं अन्न जिरायची सोय व्हायची. बैलं जनावरं कमी झाली यंत्र आली तशी गावात शुगर, बीपी आणि इतर विकार वाढलेत.  पूर्वी  लग्न समारंभात एखादा शहरी श्रीमंत पाहूना असायचा ज्याच्यासाठी वाढपी 'एक कमी साखरेचा चहा करा'  असं म्हणायचा.  कष्टकरी शेतकरी दुरणात गुळवणी सोबत पाच-सहा पोळ्या सहज फस्त करायचे.  सोबत बुंदीचे लाडूसुद्धा. पण आता चित्र बदललं. जेवन वाढतांना आता त्यांचा हातसुद्धा आडवा येतो, 'गोड चालत नाही' म्हणतात. बीपी शुगरच्या १२०/८० अशा रिडींग त्यालाही कळू लागल्या आहेत. अंजिओप्लास्टि अंजिओग्राफी असे भयानक शब्द गाव खेड्यात सुद्धा ऐकावयास मिळतात. तालुक्यातील दवाखान्यात अंजिओप्लास्टि होत आहेत म्हणे, यालाच प्रगती म्हणायची का?

अशातही किती तरी वर्षानंतर मला पोळा बघण्याचा योग आला. काळ बदलला असला तरी पोळा संस्कृती टिकून आहे हे काय कमी आहे.  या वेळेस इतरांचे पाय पडण्यासाठी मी बाहेर पडलो पण माझे पाय पडणाऱ्याची संख्या मला वाढलेली दिसली.   जणु गावातील लोकं मला 'तुम्ही आता वयस्कर होत आहात'  याची जाण करुन देत होती.  गावात मोजकीच धोतर नेसणारी मंडळी उरलेली दिसली. फेटावाले एकही नाही. जुनी पानं गळून नवी पालवी फुटली होती. टी शर्ट जीन्समूळ तुम्ही स्वतःला तरुण दिसण्याचा आव आणू शकता, पण वय लपवू शकत नाही, हे सुद्धा या वेळी कळलं. 

काल पाय पडण्याच्या निमित्ताने का होईना पुन्हा गावच्या गल्याबोल्या फिरणं होऊन गेलं. बालपणी याच गल्याच्या फुफाडात आम्ही मुक्त खेळलो होतो. याच गल्लीबोळीतील दगडाच्या ठेचा खात आमचं उनाड बालपण गेलं. याचं गल्यात आमच्या घनगड्या घनानत आम्ही पळायचो.  त्या सर्व चाळीस वर्षापूर्वीच्या आठवणी काल ताज्या होत गेल्या.  गल्लीतील लोकं बदलली, मातीची घर सिमेंटची झाली.  राहिल्या त्या मातीच्या सावरलेल्या घराच्या आठवणी. हो फक्त आठवणी. 

डायटिंग करत का होईना,  कालचा पोळा पुरणपोळ्याहून गोड झाला.

©प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह. मु.छ.संभाजीनगर. 9822108775







हिंगोलीचे दिवस



                    हिंगोलीचे दिवस


माझ्या शिक्षणाचा प्रवास जरा खडतरचं होता.  हिंगोलीला आठवी ते दहावी शिकतांना स्थानिक विद्यार्थी टापटीप, नीटनेटके आणि आत्मविश्वासू दिसायचे. अर्थात त्यांची भाषा शुद्ध असायची. आमचं थोडं वेगळं होतं. खेड्यातून आल्यामुळे एक न्यूनगंड आणि भाषेचा फरक होताच, त्यात मी थोडा लाजरा-बुजराचं होतो. खोली घेऊन राहत असल्याने स्वयंपाक आणि सर्व काम आटोपल्यानंतर उरलेला वेळ अभ्यासासाठी मिळायचा.   समाधानासाठी वेळापत्रक तयार केलं तरी ते पाळल्या जाण्याची शक्यता धुसरच होती. खोली घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा स्थानिक विद्यार्थ्यांचे जीवन अर्थात  खुपचं सुसह्य होतं. 

दहावीला असतांना आधी पोटापाण्याची सोय, सकाळची श्री पडोले सरांची ट्युशन, अभ्यास आणि मग दुपारची शाळा असं वेळापत्रक होतं. शाळेत सर गणित शिकवताना आमच्या मनात मात्र संध्याकाळच्या जेवणाची लसावी मसावी चालायची. भल्या सकाळी उठून आम्ही स्वयंपाक करायचो.  कोणी बघु नये म्हणून  शेजारी जागे होण्याआधीचं दारासमोर आम्ही सडासुद्धा टाकत असू. प्रत्येक वेळी स्वयंपाकसाठी मदत करण्यासाठी जोडीदार भाऊ असेलच असं नव्हतं. कधी तेल नसायचं तर कधी पीठ तर कधी रॉकेल तर कधी पाणी! बऱ्याचदा आम्ही जवाहर रोडवरील 'बाबाजीका मंदिर ' हून सायकल हॅन्डलच्या दोन्ही बाजूला बकीटी अडकहून पाणी आणायचो. क्वचित रेल्वेपूलाअलीकडं डाव्या बाजूला असलेल्या सरकारी विहिरीतून पाणी आनलं जाई.  सर्व सामान उपलब्ध असूनही स्वयंपाक पूर्ण होईलच याची शास्वती नसायची. मध्येच फर्रर्रर्रर्र आवाज करत चालणाऱ्या स्टोव्हच्या 'अंगात' येई. नोजलमध्ये कचरा अटकून मधूनच तो बंद पडून आमची परीक्षा घेई. मंदिरात एक शांत दिपज्योत जळावी तेव्हडीच त्याची छोटीशी ज्योत जळताना दिसे. मध्येचं रॉकेलचा वास, भडका! म्हणून आम्ही प्लान 'बी' म्हणजे चूल तयार ठेवायचो.  गावाकडील गडी शेतातील मालटाळ मोंढ्यात विकायला आणायचे मग त्यांच्याही भाकरी आम्हाला थापाव्या लागायच्या. कितीदा शाळेत, ट्युशनमध्ये खाकी पॅन्ट किंवा सदऱ्याला हळद किंवा स्टोव्हची काळीख लागलेली दिसायची. बऱ्याचदा भुकेच्या बेचैनीने मी अर्धकच्ची खिचडी मी खाल्लेली आहे.

त्या काळी आमच्याकडे रोज सकाळी एक काका खास वृतपत्र घेण्यासाठी येत असतं.  आमच्याकडे ' दैनिक मराठवाडा'  वृतपत्र येतं असे.  वाचल्यानंतर काही तासांनी ते परत आणूनही देत असत. मी स्वयंपाक करत असतांना मध्येचं ते आले तर मला खूप त्रास होई.  अशाच एका वैतागलेल्या सकाळी मी पोळ्या करत असतांना त्यांनी आमचं दार वाजवलं.  तव्यावर पोळी आन हात पिठानं माखलेले अशा अवस्थेत मला त्यांचं येनं खटकलं. दार उघडताच रागाने मी त्यांच्या हातात वृतमाणपत्र दिलं आणि नकळत," काका तुम्ही स्वतः वृतमानपत्र विकत का घेत नाहित हो !" असे शब्द माझ्या तोंडून निघाले.  एका छोट्या मुलाचं असं असंस्कारी उद्धट बोलण्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनीही मला भयंकर शाप देऊन टाकला,  'तू मॅट्रिक पास होणारचं नाहीस, मी तुला हे लिहून देतो!' त्यांच्या बोलण्यात महर्षी दुर्वासाचा राग होता.  त्या काळी मॅट्रिकची परीक्षा पास होनं आजच्या सारखं 'बायें हात का खेल' नव्हती.

दार बंद केल्यानंतर माझं मलाच खूप वाईट वाटलं. माझ्यापेक्षा ते वयाने खूप मोठे होते. माझ्या कडून मोठी चूक झाली होती.  मी त्यांना तसं नको बोलायला पाहिजे होतं. पण पश्चाताप करून फायदा नव्हता, बाण सुटला होता. संध्याकाळी हे प्रकरण माझ्या वडील भावास सांगितल्यानंतर त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली.  खरंच त्यांचा शाप खरा ठरला आनं ऐन मॅट्रिकच्या कुरुक्षेत्रावर माझ्या घोडदौड स्वैर पळणाऱ्या रथाचा चाक धसला तर ! थोडी धाकधूक होतीच.

दहावीत असतांना माझी उठण्याची वेळ आणि शाळेच्या वेळामध्ये सात तासाचा फरक होता. भल्या सकाळी स्टोव्ह किंवा चुलीवर स्वयंपाक मग पडोले सरांची ट्युशन आटोपून सातला मी आमचं हिंगोलीचं शेत गाठत असे.  सकाळच्या शांत एकांतात धुऱ्यावरील बाभलीखाली बसून अभ्यास करायला मला खूप आवडे. सुट्टीच्या दिवशी मी दिवसभर शेतातचं असे. खाण्यासाठी गव्हाच्या ओंब्या कधी हरबरा आनं बाजूलाच विहीर होती. अकोला रोडवर त्याकाळी विशेष रहदारी नव्हती. मोंढ्यात माल घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या, क्वचित एखादा ट्रक, बस किंवा पैंडल रिक्षा खुळनंखुळनं जातांना दिसे. आदर्श महाविद्यालयाच्या कॉलेजकुमार-कुमारीचे झुंडच्या झुंड सायकलवर जोरजोरात हसत, बडबड करत जाताना नजरी पडे. त्यांच्या बोलण्या खिदडण्यात अभ्यासाच्या ताणतणावाचा लवलेशही दिसत नसे.  एकदा का दहावी झाली कि हुश.श...श आपण मोकळे! मग आपणही असंच रंगबिरंगी कपडे नेसून सायकलवर कॉलेजला जाणार,  मधूनच असं स्वप्न मी रंगवत असे. दहा वर्ष नेसत आलेली खाकी पॅन्टचा विट आला होता.  

शाळेत दुपारून सुट्टी होती. खोलीवर येऊन मी लगेच सायकलनी शेतात गेलो. माझ्या अभ्यासाच्या जागी जाणार तोच शेतातील धुऱ्यावर मला दोन सायकली दिसल्या पैकी एक लेडीज होती. शेतात दूरवर कुणीच दिसत नव्हते. थोडया वेळानी मी पाण्यासाठी विहिरीकडे गेलो तर तेथील झाडाखाली एकप्रेमीयुगल गप्पा मारताना दिसले. त्या जोडप्याला बघून मात्र मला एव्हडी खात्री पटली कि प्रेम फक्त आंधळं नसतं तर त्याला अनेक डोळ्याचे आजार असतात, किंबहुना डोळेच नसतात म्हणा की! बाजूच्या शेतगड्याला मी त्यांच्या येण्याबद्दल विचारलं तर तो काहीच बोलेना. परत जाते वेळी मी त्यांना मुद्दाम हटकलो.  त्यावर त्या जोडप्याने  'हे शेत आमचंच आहे' असं उद्धट लबाडी मारली.  नंतर ते कधी दिसले नाही. 

आमच्या शेताच्या उत्तर धुऱ्यावरून एक पायवाट ऍड. पंडितराव देशमुख साहेबांच्या शेताला जाते.  अधूनमधून साधारण अकरा वाजता ऍड. देशमुख साहेब आपल्या राजदूत फटफटीने खेताकडे येतं.  निळ घातलेला पांढरा शर्ट, बेलबॉटम आणि थोडे झूलत चालणारे देशमुख साहेब मेन रोडवर गाडी उभी करून झपाझप त्यांच्या शेताकडे जातं. त्याच्या पाठीमागे कायम एक गडी चालत असे.  त्याच पाऊलवाटेवर मुद्दाम रस्ता अडविल्यासारखा मी लांब पाय टाकून अभ्यास घोकत बसलेला असे. वकील साहेब आले कि मी थोडासा रस्त्याच्या बाजूला सरकून जाई.

एके दिवशी माझ्या जवळूनचं ते रस्त्याने पुढं गेले. मग थोडं थांबून मागे आले, मला माझं नाव आणि वर्ग वगैरे विचारलं. माझे मोठे बंधूसुद्धा वकील असल्यामुळे मला देशमुख वकिल साहेबांची ख्याती माहित होती. थोडी विचारपूस करून,'बाळा मी तुला नेहमी येथे अभ्यास करतांना बघत असतो, मॅट्रिक पास करून पुढं तू खूप मोठा होशील!' असे बोलून ते निघून गेले.  त्यांच्या शुभेच्छानी काही क्षणासाठी का होईना मी सुखावलो. 

त्या वेळेस 'मोठं होणं म्हणजे नेमकं काय' याची मला विशेष समज नव्हती.  पण त्यांनी मला माझ्या मॅट्रिकबद्दल चांगला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या एव्हडं मात्र मी समजलो होतो. अशा प्रकारे दहावीतचं एका काकांनी शाप तर ऍड देशमुखांकडून मला शुभेच्छा मिळाल्या होत्या. अशा ही परिस्थितीत दहावी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण करून मी औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. आज नसलं तरी त्याकाळी 'इंजिनियर' या शब्दाला भलतंच वलय होतं. शेवटी इंजिनियरचं झालो.

नवीन पिढीला आपण सोसलेले कष्ट, खालेल्या खस्ता सांगून काही उपयोग नाही. 'नको तुमच्या त्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाची कहाणी' म्हणून ते ऐकायचं टाळतील. जे कष्ट आपण सोसले तशी वेळ मुलांवर येऊ नये म्हणून पालक हाल अपेष्टा सहन करून त्यांचा मार्ग सुकर करतात. 

पाण्यातील मासा झोपणार कैसा,
जावे त्यांच्या वंशा, तेंव्हा कळे l 

म्हणतात कि, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः बाप झाल्याशिवाय त्यांना 'बाप' कळणारच नाही.

हल्ली हिंगोलीच्या त्या शेताचं प्लॉटिंगचं काम चालू आहे. रस्त्याची रुंदी वाढली, बैलगाडी, घन्टी वाजवत जाणाऱ्या सायकली जाऊनं आधुनिक वाहनाची वर्दळ वाढली. अधून मधून मोजणी आणि तत्सम कामानिमित्त मला शेतात जावं लागतं. शेतात फिरतांना धुऱ्यावरील अभ्यासाची जागा मला अजूनही आठवते.  काही दिवसांनी ती जागासुद्धा सिमेंटचे जंगल व्यापून घेईल, राहणार फक्त आठवणी!

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह. मु. छ. संभाजीनगर 

                     ooo ooo ooo ooo