हल्ली सर्वांच लक्ष अंतराळाकडे लागलं आहे. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम अवकाशात अडकल्या आहेत. त्यांच्या परत येण्याची काळजी सर्वांना लागली आहे. अवकाशात असं काही असतं हे मला १९७९, म्हणजे मी दहा वर्षाचा असतांना थोडं कळालं होतं. त्याचं एक कारण होतं. आमच्या गावात भिती पसरून अचानक चर्चेला उधाण आलं होतं. आकाशातून जमिनीवर स्कायलॅब पडणार, स्कायलॅब पडणार!
नुकत्याच चौथ्या वर्गातील मला स्काय आणि लॅब या इंग्रजी शब्दांचा अर्थ माहित नव्हता. या बातमीमूळे अख्ख गाव घाबरून गेलं होतं. चावडीवर, मंदिराच्या पारावर एकचं चर्चा होत होती. गावकऱ्यांना स्कायलॅब म्हणजे मानवजात नष्ट करणारा बॉम्ब एव्हडंच माहित होतं. ती एक अफवा होती. प्रत्येक जन त्या अफवेमध्ये जास्तीची माहिती जोडत असे. त्यामध्ये केमिकल असणार, त्याचा धूर नाकात गेला की मनुष्य गुदमरून मरणार, असं वाटेल त्या अफवा ऐकू येत होत्या. त्याकाळी शहरातून गावाकडे येणाऱ्या माणसाकडे जास्तीची माहिती असायची. हिंगोलीहुन कुणी आलं की लोकं त्याच्या भोवती गोळा होऊन त्याच्याकडून 'हिंगोलीत स्कायलॅबबद्दल काय चर्चा चालू आहे?' अशी जास्तीची माहिती काढली जायची. त्यामुळे भीतीत अजुनच भर पडे.
'भित्यापाठी ब्रम्हराक्षस' काहीच दिवसात आपला शेवट होणार हीच भावना ग्रामीण भारतात वाढू लागली. अनेकांनी आपले दागिने, जनावर, जमिनी विकल्या आणि खर्च करायला सुरु केलं. शेतावर नांगरणी खुरपण्यासाठी गेलेल्या मजूरामध्ये सुद्धा त्याचं गप्पा चालायच्या. गावकरी गोडधोड जिलेबी, लाडू, भजे सारखे पंचपक्वान बनवून खाऊ लागले. पोरी-जावयाला बोलवून पाहूनसार हाऊ लागला, कपडेलत्ते करू लागले. 'बाई आपन हाय तवर हाय उद्याचा काय भरवसा' 'तू जिती राह्यली तर तिला सांभळ, मी जित्ती राह्यली तर......मी असं करीन.....तुही शेती मी सांभाळीन!'. शेवटची भेट म्हणून मायलेकी गळ्यात गळे टाकून रडू लागल्या. गावात लेकींना, सग्यासोयऱ्याचा ये-जा, त्याचा पाऊणचार वाढला. मटन दारू वाढली. कोंबड्या-बकऱ्याची कापाकापी वाढली. आवस-पुणवला पिणाऱ्यांनी रोज पिण्याचा सपाटा लावला होता. मरणार म्हणून लोकं मजा करून घेत होते. 'मेहनतीनं कमावलेलं धन मागं ठेवून काय करायचं हो? त्येला खायला कुत्र बी नसणार!'
स्कायलॅब नेमकी कुठं पडणारं हे निश्चित नव्हतं. अमेरिकेच्या नासा संस्थेकडून त्याची माहिती भारताला मिळायची. सांगोपांगी गावात पोहचेपर्यंत त्या बातमीचं काहींच्या काही व्हायचं. त्या काळी समाज जास्त शिक्षित नव्हता. स्कायलॅब हा काय प्रकार आहे हे स्वीस्तर समजवून सांगण्याइतका कुणीही शिक्षित तरुण नव्हता. मराठवाड्यात त्या काळी मराठवाडा, तरुण भारत आणि अजिंठा दैनिक प्रकाशित व्हायची. गावात आठवड्यातून एखाद्या दिवशी वृतपत्र बघायला मिळायचं. त्यामुळे तूटक बातम्या वाचायला मिळायच्या. सर्वच अनिश्चित असल्यामुळे बातम्यापुढे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं असायचं. गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आताच्या ३२ इंच टिव्हीच्या आकाराचा मोठा रेडिओ धूळखात पडला होता. लालाची शिकलेली मुलं त्याचं काही बरं करतील म्हणून तो नादुरुस्त रेडिओ आमच्याकडे आला होता. खारखूर करत त्यातून बातम्या, गाणी ऐकू यायची. मधूनच तो बंद पडे. आदळआपट, काड्या केल्या की कssर्कश आवाज आणि कमी आवाजात त्यातून विविध भारती, आकाशवाणी परभणीच्या बातम्या ऐकू यायच्या.
देशभरातून लोकांनी स्कायलॅबपासून सुरक्षित राहण्यासाठी केलेल्या उपाययोजनेच्या बातम्या ऐकू येत असतं. आमच्या कुटुंबाने सुद्धा बरंच काही केलं होतं. पडण्याच्या जागेची अनिश्चित्तता लक्षात घेऊन आमच्या काकांनी त्यावर जालीम उपाय शोधून काढला होता. कुटुंबातील दोन मोठया मुलांना पैसे सोनंनाणं घेऊन दोन भिन्न प्रांतात पाठवायचं ते ठरवत होते. 'काही अघटीत घडलंच तर कुटुंबातलं कुणी नं कुणी निश्चित पाठी मागे राहील!' अशी त्यांची ती योजना होती. पण तसं काही करता आलं नाही. मग स्कायलॅब पडण्याच्या काही दिवसाआधी गडयांना शेतात पाठवून कडू लिंबाचे डहाळे बोलविण्यात आले होते. बैठकीला असलेल्या आठ खिडक्यांमध्ये ते व्यवस्थित पसरवून, त्यावर दोन्ही बाजूने रिकामे पोते बांधून खिडक्या पॅक करण्यात आल्या होत्या. स्कायलॅब पडलाच तर त्याच्या विषारी केमिकल धुरापासून हे कडू लिंबाच 'एअर फिल्टर' बचाव करणार होतं! आमचं बघून गावातील काही लोकांनीसुद्धा हा प्रकार केला होता.
शेवटी १२ जुलै, १९७९ चा तो दिवस उजाडला. जेवण आटोपून रात्री कुटुंबातील एकूण एक जन बैठकीत जमा झाले. बैठकीला सर्व बाजूनी ' एअर फिल्टर' तर लावलेलेच होते. भितीमूळे धाकधूक आणि रेडिओमधून बातम्या ऐकण्याची उत्सुकता होती. मनातंच सर्व जण देवाचे नामस्मरण करत होते. उपास तापास, नवस आधीच झाले होते. आमच्या गोंगाटापुढे रेडिओचा आवाज येत नव्हता. शेवटी तो क्षण आला. रात्री १० च्या बातम्यात माहित पडलं कि तो स्कायलॅब हिंद महासागरात पाडण्यात आलं. सर्वांनी एकचं जल्लोष केला. खात्री करण्यासाठी पुन्हा इंग्रजी बातम्या ऐकण्यात आल्या. मोठ्या बंधूनी सर्वांना इंग्रजी बातम्या समजावून सांगितलल्या. रात्रीत गावात बातमी पसरली. सर्वांनी सूटकेचा श्वास घेतला.
काय होती ती स्कायलॅब?
अंतराळात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अमेरिकन अंतराळवीरांनी १९६९ मध्ये चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं. आता अमेरिकेला 'अंतराळात मानवी जीवनावर तेथील 'झिरो ग्रेव्हीटी' वातावरणाचा काय परिणाम होतो' याचं निरीक्षण करावयाचं होतं. यासाठी स्कायलॅब (स्काय -आकाश, लॅब -प्रयोगशाळा) ही प्रयोगशाळा अंतराळात पाठविण्यात आली होती. आजच्या इंटरनेशनल स्पेस स्टेशन (ISS) सारखीच ती फिरती लॅब होती. स्कायलॅब हे जवळपास नऊ मजली उंच आणि ७८ टनाचे स्टेशन होतं. अमेरिकेने १९७३ साली ते अवकाशात उभारलं होतं. १९७८ पर्यंत स्कायलॅब व्यवस्थित काम करत होतं पण नंतर सौर वादळामुळे त्याचे नुकसान झालं आणि त्यामध्ये बिघाड झाला. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ठराविक उंचीवर कक्षेत तिचे फिरणे अपेक्षित होते. पण अंतराळात फिरत असतांना बिघाड होऊन ती लॅब पृथ्वीच्या वातावरणाजवळ येत होती. पृथ्वीच्या गुरुत्वाकृषण शक्तीचा सुद्धा त्यावर प्रभाव पडत होता. हे सर्व अमेरिकेला अपेक्षित नव्हतं. जर का ती पृथ्वीच्या वातावरणात शिरली तर घर्षण - तापमान वाढून आणि आगीत भस्म होऊन ती पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी ती पडणार होती. भारताच्या भूभागावरही ती पडू शकते असा इशारा अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने दिला होता. अमेरिकेवर पडणार असेल तर निश्चितपणे अमेरिका ते आपल्या जमिनीवर पडू देणार नाही, ते भारतावरच पाडण्यात येईल असं बोललं जायचं. अमेरिकेचे भारतातील विशेष दूत थॉमस रेबालोविच यांनी स्कायलॅब अमेरिकेत पाडण्यात येईल असं सांगितलं पण या बातमीचा भारतीयांवर वेगळाच परिणाम झाला.
१२ जुलै १९७९ या दिवशी स्कायलॅब पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होतं. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण भारतभर हाय अलर्ट जारी केला होता. तोपर्यंत भारतीय लोक मृत्यूच्या प्रचंड मोठ्या दहशतीखाली होते. शेवटच्या क्षणी नासाने जाहीर केलं की स्कायलॅब हे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान हिंदी महासागरात कोसळले. या बातमी नंतर देश भर जल्लोष करण्यात आला होता. या स्पेस स्टेशनचे काही तुकडे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमी भागात पडले होते पण कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. या घटनेनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी ऑस्ट्रेलियाची माफी मागितली. ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक संस्थेने अमेरिकेवर या प्रकरणी ४०० डालरचा दावा ठोकला होता पण अमेरिकेने शेवटपर्यंत ही रक्कम चुकती केली नाही.
स्कायलॅबच्या या घटेनेनंतर आता अंतराळ क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे. पण अजूनही एखादे नियंत्रणाबाहेर गेलेलं रॉकेट नेमकं कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या क्षणी पडणार हे सांगता येत नाही. पृथ्वीचा ६०% भाग पाण्याने व्यापला आहे तर उरलेल्या ४०% भागावरचं मानववस्ती आहे. त्या ४०% च्या फक्त २.४४% जमिन ही भारत देशाने व्यापली आहे.
आता सांगा, पृथ्वीवर इतर भाग सोडून नेमक्या भारतावर ती स्कायलॅब आदळण्याची किती शक्यता होती? आपलं उत्तर, प्रतिक्रिया आणि आठवत असतील तर स्कायलॅबचे अनुभव कृपया कमेंटमध्ये लिहा.
© प्रेम जैस्वाल (पेडगावकर) ९८२२१०८७७५
ह. मु. छ संभाजीनगर
No comments:
Post a Comment