हल्ली प्रसिध्दी आणि समाज माध्यमामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भोंग्याची. देशात भोंग्याला नको एव्हढं महत्व प्राप्त झालं आहे. भोंग्या विषयी राज्याच्या सर्वच वृतपत्र तसेच वृत वाहिन्यावर भोंगा हा विषय अतिशय चवीने चर्चिला जात आहे. अर्थात त्या चर्चा जोरात ऐकू येण्यासाठी जनता पुन्हा दूरचित्रवाणीचा आवाज वाढवून ऐकत असते. म्हणजे घरात सुद्धा घरापुरता एक भोंगा असतोच!
मानवी जीवनात संवाद हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एक दुसऱ्याशी संवाद साधतांना तीन महत्वाचे घटक काम करत असतात. एक बोलणारा, दुसरा ऐकणारा आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे माध्यम. जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर बोलत असेल तर हवा ही माध्यमाचं काम करत असते. अंतर कमी असेल तर हवा ध्वनी लहरी ला ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत घेवून जाते. कान हे इंद्रिय श्रवणाच काम करत असतो. ऐकणाऱ्याची संख्या वाढली तर आपला आवाज दूर बसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचत शक्य नाही. कारण मानवी आवाजाला सुद्धा ठराविक मर्यादा असते. मग आपला आवाज समोर बसलेल्या व्यक्तीपर्यंत ताकतीन पोहचण्यासाठी आवाजाची तीव्रता वाढवणे आवश्यकता असते. त्यासाठी जे उपकरण वापरण्यात येतं त्याला साऊंड सिस्टीम असे म्हणतात. अशी मोठ्याने आवाज काढणारं उपकरण म्हणजे 'लाऊडस्पिकर,' जनतेच्या सामान्य भाषेत 'भोंगा'!
जेंव्हा एखादा जननेता किंवा ख्यातनाम व्यक्ती समूहाला संबोधत असते तेंव्हा या लाऊड स्पिकरला 'पब्लिक एड्रेस सिस्टीम (पीए सिस्टीम) असं छानसं नाव प्राप्त होतं. लग्न समारंभात प्रसन्न, आनंदमय वातावरण निर्मिती करण्यासाठी साऊंड सिस्टीम म्हणजे लाऊडस्पीकर आवर्जून लावल्या जाते. हल्ली वरातीमध्ये मधुर बँडची जागा डीजेने घेतली आहे म्हणजे हा फिरता डीजे उर्फ लाऊडस्पिकर! पण याच लाऊडस्पिकर मधून जेंव्हा नकोस असं काही ऐकू येतं किंवा ज्यामुळे 'ठराविक' ऐकणाऱ्यास त्रास होतो तेंव्हा तो लाऊडस्पिकर न राहता भोंगा बनतो. अर्थात भोंगा हा शब्द द्वेषपूर्ण टिकेच्या दृष्टीने उच्चारला जातो. लहान मुल जेंव्हा कर्कश आवाज करून जोरात रडत असतात तेंव्हा पालक 'प्रथम हा भोंगा बंद कर !' असा दम देतात.
आवश्यकता ही शोधाची जननी असते. अर्थात एखाद्या व्यक्तीचा आवाज दूर पर्यंत पोहचण्यासाठी लाऊडस्पीकरचा शोध लागला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला ग्रॅहम बेलने दूरसंचार उपकरणाचा शोध लावला होता. प्रथम विद्युत लाऊडस्पिकर जोहन फिलिप्स यांनी टेलिफोनला जोडून यशस्वी प्रयोग केला होता. सुरुवातीला लाऊडस्पिकचा उपयोग ठराविक अंतरावर जशाच तसा ध्वनी पुनर्जीवित करण्यासाठीच व्हायचा. त्या नंतरच्या काळात व्हॅक्यूम ट्ट्युबचा शोध लागला ज्या मुळे संचार क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. आता व्हॅक्यूम ट्ट्युबचा उपयोग करून आवाजाची तीव्रता वाढविणे सोपे झाले होते. साधारण १९१२ मध्ये लाऊडस्पिकरद्वारे मोठा आवाज काढणे शक्य झालं. पुढे या तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती होऊन १९२५ मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक एडवर्ड केलोग आणि केस्टर राईस या जोडीने डायनॅमिक स्पिकरचा शोध लावला. सुरुवातीच्या काळात लाऊडस्पिकरचा उपयोग दूरसंचार, सभा, समारंभ, फोनोग्राम साठी होत असे. व्याप्ती वाढून मग हे उपकरण लग्न-समारंभात गाणी वाजविण्यासाठी, निवडणुकीचा प्रचारासाठी किंवा युद्ध काळात सायरन म्हणजे धोक्याची सूचना देण्यासाठी होत असे.
मग हा लाऊडस्पिकर कसा काम करतो? समजून घेणं सोपं आहे. लाऊडस्पिकर साऊंड सिस्टीमध्ये दोन ट्रान्सड्युसरचा उपयोग होत असतो. पहिला ट्रान्सड्युसर म्हणजे माईक जो बोलणाऱ्याच्या आवाजाला म्हणजेच ध्वनी लहरी ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. बोलणारा व्यक्ती जेंव्हा माईक मध्ये बोलतो तेंव्हा त्या माईकच्या पडद्यावर त्याच्या आवाजाची कंपने आदळतात आणि त्याच रूपांतर माईक विद्युत ऊर्जेत करत असतो. ही विद्युत ऊर्जा तारेद्वारे वाहत जाऊन तिचं अम्पलीफायर अंपलिफिकेशन करत असतो. अम्पलीफायर मुळे मुळ विद्युत सिग्नल मोठे होतात. अम्लिफिकेशन झालेलं विद्युत सिग्नल शेवटच्या टप्यात लाऊडस्पिकरला जाऊन मिळतात. लाऊडस्पिकर हा ट्रान्सड्युसर या विद्युत ऊर्जेच रूपांतर मूळ ध्वनी ऊर्जेत, पण मोठ्या स्वरूपात करत असतो. परिणामतः त्यामुळे बोलणाऱ्याचा आवाज आपल्याला जोरात ऐकू येतो. थोडक्यात माईक आणि लाऊडस्पिकर मध्ये आवाजाची तीव्रता वाढविण्याचं खरं श्रेय तर अंपलिफायरला जायला हव.
अनेक भाषा, संस्कृती आणि विविधतेने नटलेल्या भारत देशात वर्षभरात अनेक प्रकारचे सण- उत्सव साजरे होत असतात. गरबा, गणेश उत्सव, नवरात्री आणि लग्न समारंभात आनंद निर्मितीसाठी हमखास लाऊडस्पिकर ऊर्फ डिजे चा उपयोग होत असतो. मुस्लिम प्रार्थना स्थळात दररोज पाच वेळेस लाऊडस्पीकर द्वारे मोठ्याने आजान दिली जाते. 'प्रार्थना स्थळ मग ती कोणत्याही धर्माची असो तिथे शांतता अपेक्षित आहे.' देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण या सामाजिक मुद्द्याला अनुसरुन याबाबत योग्य निर्णय दिलेला आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी केंद्र किंवा राज्याची प्रशासकीय यंत्रणा पुरेशी आहे. पण नेमक्या अशा धार्मिक मुद्याचा उपयोग करून समाजात द्वेषाचं विष पेरणी करून राजकीय पोळी भाजणे कितपत योग्य ?
आपल्या प्रजासत्ताक राष्ट्रात प्रजेची सत्ता म्हणजे लोकशाही फक्त नावा पुरतीच आहे. राजकारणात ठराविक पिढ्यान् पिढ्या भ्रष्ट बाहुबली कुटुंबाची चलती असते. बाप नेता त्यांनी भ्रष्टाचार द्वारे गोळा केलेली माया पुढे मुलाला राजकारणात 'सेटल' करण्यासाठी कामी येते. स्वतःचे अनेक उद्योगधंदे वाढवून त्यावर पडणाऱ्या प्रशासकीय धाडीपासून स्वतःला वाचविण्यासाठी राजकीय कवचकुंडले आवश्यक असतात. म्हणून पुन्हा सरकारमध्ये भागीदारी मिळवणे क्रमप्राप्त होते. कोट्यवधी रुपये खर्च करून लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांना एकदा संसदीय पद मिळाल की समाजसेवेच्या नावावर भ्रष्टाचार करण्यास कुरन मोकळे होतात.
देशात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी दारिद्रय आणि भूकबळी सारख्या अनेक समस्या असूनही कोणत्याच भोंग्यातून त्या विषयी कुणी आवाज काढत नाही. या समस्येला एक वेळ इलाज नसला तरी ठीक पण भोंग्याच्या आवाजात देशाची खरी समस्येचा आवाज दाबणे हा एक प्रकारची भूल (एनेस्थेसिया) नव्हे का? खरं तर समाजातून निवडून दिलेल्या नेत्यांनी भोंग्याच तोंड सरकारकडे वळवून त्याद्वारे लोकांच्या खऱ्या समस्या मांडने अपेक्षित आहे. पण असं न होता हल्ली धूर्त नेते भोंग्याच्या नावावर समाजात विषपेरणी करून मताच ध्रुवीकरण करत आहेत. एकदा का जातीद्वेषाचं विष पेरलं गेलं की मताच ध्रुवीकरण होऊन निवडणुकीसाठी जमीन सुपीक होते. थोडक्यात भोंग्याचा उपयोग नेते निवडून येण्यासाठी करत आहेत.
आज गरज आहे की जनतेने वेळीच या राजकीय भोंग्याला समजून घेण्याची. आपापसातील द्वेष कमी करून, जातीय सलोखा राखून, शांततेन जीवन जगण्याची. कारण या प्रक्रियेत नाहक भरडला जातो तो सामान्य नागरिक, धूर्त नेते नव्हे.
© प्रेम जैस्वाल, पेडगावकर
मो. ९८२२१०८७७५

No comments:
Post a Comment