ad1

Thursday, 22 December 2022

माजलगावचा मेस्सी!

                   माजलगावचा मेस्सी!
बीड जिल्ह्यातील माजलगाव जवळील एका छोटया खेड्यात जन्मलेला पांडुरंग तुकाराम म्हस्के पुढं चालून जगभरात प्रसिद्ध फुटबॉलपट्टू 'मेस्सी' म्हणून नावारूपाला येईल असं कुणालाच वाटलं नाही.  भारताचा तिरंगा आज मेस्सीमुळे जगभरात फडकत आहे.  खुद्द त्याच्या वृद्ध आईला हि बातमी पटवून द्यावी लागली कि टीव्हीवर ज्याचा उदो उदो होत आहे तो ढगळ चड्डी आनं निळ्या पट्ट्याचा सदरा नेसुन धावणारा खेळाडू दुसरा कुणी नसून आपलाच पांडुरंग हाय !

फिफा वर्ल्डकप जिंकल्यानंतर पुण्याहून अनेक वृत्तवाहिनीच्या ओबी व्हॅन माजलगावाकडे धावत होत्या.  सर्वांना मेस्सीच्या मूळ गाव माजलगावला काय चाललं याचं चित्रण करायची घाई होती.  न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीना काय बोलावं हे मेसीच्या आईला कळतं नव्हतं.  लेकराला टीव्हीत पाहून ती अति आनंदाने भावुक झाली होती.  डोळे पानावून ती माऊली एकदम भूतकाळात गेली. तिला तिचा तो शेतातील झोपडीसमोरील अंगणात दुडदुड वाकडातिकडा पळणारा लहानपणीचा पांडू आठवत होता. ओला नववारी पदर सावरत ती वृतपत्र प्रतिनिधीला सांगू लागली -

'लहानपणी पांडू लय चपळ होता. रिकामी पाण्याचा तांब्या असो कि घागर भांड दिसलं कि त्याला तो जोरात लाथा मारी, मारून ढकलत दूर नेई, पुन्हा परत लाथा मारून तो जाग्यावर आणून ठेवायचा. एकदा वावरातून त्याच्या बापानं दोन तिनं मोठे कलिंगड आणून ठेवलं. पांडूनं कापून खाणं सोडून त्येशी खेळत बसायचा. ते पाहून त्येचा बाप लय चिडायचा. खूपदा त्यानं  ज्वारीच्या फोकाऱ्यांनं मार बी खाला. भोकाड काढून वरडत रडणारां पांडू बाप भाहेर गेला कि पुन्हा तो कलिंगड, हिरवी पपई खेळायचा.'

मांजरसुंबा म्हणजे पांडू(मेस्सी) चं आजोळ.  अधूनमधून तो तिथं मामाकडं राही.  एकदा मांजरसुनंब्यावरनं त्याच्या मामा आला.  त्यानं पांडुला खेळण्यासाठी एक चेंडू आणला. चेंडू पाहून पांडूचा लय आनंद झाला. परशामामा चिखलात घान झालेले पाय धुईपर्यंत पांडूला चैन नव्हता.  थैलीतून चेंडू काढून तो इळभर खेळत राहीला.  राती बी जेवलाच नाय. झोपडीसमोर दिव्याच्या मंद उजेडात तो आम्ही झोपी जाईस्तोअर खेळत होता. चेंडूला लाथ मारी कि चेंडू दूर शेतात पिकात जाई. पांडू त्याला हात न लावता पायानं उडवत खोपीवर आणी. पुन्हा दूर मारी पुन्हा.....! त्याच्या या खेळालं कटाळून बापानं त्याचं नाव गावात शाळत टाकलं. जन्म तारीख माहित नव्हती म्हणून मास्तरांन २४ जून १९८७ अशी अंदाजे तारीख टाकून दिली!   बापानं लगेच माजलगावहून दोन तिन लिहायची पुस्तकं पेन कंपास असं तफतर आणून दिलं. काही दिवस तो गावातल्या शाळत पाठीमागं दफ्तर टाकून पायवाटांनी पायी ये जा करी. पण त्याचं शाळत मन लागत नव्हतं. शाळतून आला कि पुन्हा त्याचा तेच खेळ सुरु राही.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे.

एकदा काय झालं, बापानं नेमकंच वढयातुन एक हांडा पाणी स्वयंपाकसाठी आणलं होतं. पांडून बापाकडं लक्ष नं देता चेंडू ढकलत ढकलत दूर शेतातल्या चिपाट्यात नेला. थोड्या वेळानं पांडू गोल! गोल! असं जोरात वरडून उड्या मारत होता.  चेंडू सरळ पिण्याच्या पाण्याच्या हांड्यात पडला होता.  चिखलाने माखलेला चेंडू हांड्यात बघून बापाला लय राग आला. त्यानं पांडूला झोपडीचा फोकारा उपसून सपासप बदडलं. रडत रडत पांडू मायच्या जवळ गेला. मायनं त्याला गप करण्यासाठी पदरात बांधलेला एक रुपया देऊन गप केलं.  'गावात जाऊनशान त्या पैशाचे भजे-चिवडा खा!' असं सांगितलं. दोन तासानंतर पांडू शेतातल्या खोपीवर आला.

पांडूला राती स्वनात चेंडूच दिसे.  लयदा झोपेतच पांडू गोल गोल करून उड्या मारी. बऱ्याचदा तो झोपेतच हवेत लाथा मारत जाई. त्यामुळ भर हिवाळ्यात त्यानं पांघरलेली गोधडी दूर फेकल्या जाई. त्याच्या डोक्यातलं ते चेंडूचा भूत काही बाहेर निघत नव्हता.

गावातील शाळत झेंड्याच्या आधी  खेळाचे क्रिकेटचा खेळ सुरु होते . पांडू क्रिकेटचा चेंडू हातापेक्षा पायानच जास्त खेळत जाई. एकदा चौका जाणारया चेंडूला बॉर्डर वर उभ्या पांडुने जोरात लाथ मारली. चेंडू सरळ उभ्या स्टम्पला लागून तो फलंदाज  आऊट झाला. पांडूच  पायान चेंडू मारण्याच हुन्नर पाहून तेथे उपस्थित मुख्याध्यापक सरांना आश्चर्यचा धक्काच बसला. पांडू चांगला फुटबॉल खेळाडू होऊ शकतो त्याला फक्त चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहेत हे मुख्याध्यापकानी लगेच ओळखलं.  लगेच  मुख्याध्यापकांनी पांडूला मुंबईच्या प्रसिद्ध फुटबॉल कोचकडे  प्रशिक्षणासाठी पाठवायचा विचार केला.  पांडुच्या बापाचा त्यास विरोध होता.  शेतीकाम शिकून पांडू आपल्या मदतीस राहील असं वाटू लागलं. इथून पांडुचे दिवस फिरले.

पांडू मुंबईला जाण्याच्या तयारीला लागला.  तिकिटापुरते पैसे, एका दुपट्यात बांधलेल्या ज्वारीच्या भाकरी, झूनका आणि ठेचा घेऊन त्याने मुंबई गाठली. काही दिवस तो  मुंबईत एका मित्राकडे राहिला. मुंबईला राहायचा खर्चासाठी हंडीवजरच्या मामानी मदत केली. 'का भुललासी वरलिया रंगा.....' प्रमाणे दिसायला गोरगोमटा पण गावठी वागणूक असलेल्या पांडूचं कौशल्य बघून मुंबईच्या कोचंला आश्चर्यचा धक्काचं बसला. कोचन त्याची मुंबईला रहायची सोय केली. खोलीत पेइन्ग गेस्ट राहणारा पांडू शेजारच्या टीव्हीवर आंतरराष्ट्रीय सामने पाहू लागला,  फुटबॉल खेळाचे बारकावे शिकू लागला.  अंतरराष्ट्रीय सामने बघून त्याला फुटबॉल खेळाची योग्य दिशा मिळाली. पुढील प्रशिक्षणासाठी स्पोर्ट्स निधीतून त्याला परदेशी जाण्यासाठी मदत मिळाली. तो अर्जेंटिनाला गेला. काही वर्षानंतर माजलगावच्या खेड्यात जन्मलेला पांडुरंग तुकाराम म्हस्के अर्जेंटिनाचा पक्का नागरिक बनला. 'रोम मध्ये रोम सारखंचं रहावं लागतं''  प्रमाणे तिथल्या संस्कृतीला साजेसं नाव धारण केलं. म्हस्केचा पुढं मस्की असा अपभ्रश होऊन तो 'मेस्सी' झाला. आजही त्याच्या मूळ गावी माजलगावला लोकं त्याला 'म्हस्केचं पोरगं' म्हणून हाक मारतात.

आज तो आंतरराष्ट्रीय खेळाडू होऊन जगभरात त्याचं भरभरून कौतुक होत आहे. असं असलं तरी पांडू म्हस्के किंवा मेस्सीचे पाय जमिनीवर आहेत. त्याच्या डोक्यात यशाची हवा गेलेली नाही.  त्याची नाळ माजलगावच्या काळ्या पवित्र भूमीशी जुळलेली आहे.  परदेशी खेळात आणि प्रशिक्षणात व्यस्त असूनही  'ने मजशी परत मात्रभूमीला, सागरा प्राण तळमळला.....' प्रमाणे तो दर दोन तिन वर्षात हमखास त्याचे पाय माजलगावकडे वळतात. औरंगाबादपर्यंत हवाई प्रवास आणि नतंर मात्र औरंगाबाद- बीड-माजलगावं एसटी बसने तो आपल्या मूळ गावी भेट देतो. माजलगावच्या एसटी स्टॅन्डवरचे भजे चहा तो आजही न चुकता खातो. त्याचे चुलत काका, काकू, जुने मित्र आणि शेजारच्या गावकरी लोकांना मेस्सी  म्हणजे आपला पांडुरंग आला कि उत्साह चढतो.

' मी अर्जेंटीना सारख्या पश्चिमात्य देशाकडून खेळताना वेगवेगळे पंचतारांकित हॉटेल मध्ये राहिलो,  जेवलो पण माजलगावंच्या भजे-पोहे आणि चहाची सर जगभरात कुठेच नाही. मी शरीराने परदेसी असलो तरी मनाने भारतीय आहे.'

थोडक्यात आपला भारत देश आणि येथील नागरिक कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. मग आयटी क्षेत्र असो कि खेळस्पर्धा!  गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठमोठ्या आयटी कंपन्याचे सीईओ भारतीयचं आहेत. आज फुटबॉल खेळात माजलगावच्या पांडुरंग म्हस्के किंवा 'मेस्सी' मूळे बीड जिल्हा, महाराष्ट्र आणि भारताच नाव जगभरात गाजत आहे. त्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. कालच एका वृतपत्राच्या बीड आवृत्तीत छापून आलेल्या बातमीनुसार पांडू जन्मलेल्या गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीला 'पांडुरंग तुकाराम म्हस्के (मेस्सी) द्वार' असं नाव देण्यात आल आहे.

फिफा वर्ल्डकप जिंकून आलेल्या मेस्सीची गावातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. गावातील पोरं-सोरं मिरवणुकीत नाचू लागली. गावातील शाळेपासून मिरवणूक मारोती मंदिराला वेढा देऊन परत आली. मेस्सीने जागृत मारोतीला शेंदूर लावून, दर्शन करून नारळ फोडला. काही दिवसापूर्वी गावातील शाळेवर    सत्कार समारंभ थाटात पार पडला. गावातल्या लोकांनी शासनाकडून आलेल्या ओला दुष्काळ, पडझड आण गारपीटीच्या पैशातून ₹ ५०० वर्गणी करून शाळेवर एक समारंभ आयोजित केला.  समारंभाला मंडळ अधिकारी, गावाचे सरपंच,माजी सरपंच, पोलीस पाटील आणि माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. मेस्सीचा शाल-श्रीफळ, आमदार निधीतून रोख रुपये दहा हजार इनाम आणि प्रशस्तिपत्र पत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याला गावाकडून प्रेमाने मिळालेली दहा हजार रक्कम एक करोडसारखी वाटत होती. त्यानं मोठ्या मनानं ती गावातील शाळेला स्पोर्ट्सचा विकास या कामासाठी मदत म्हणून परत केली.  जेथून वाढलो, घडलो त्याचे उपकार तो मुळीच विसरला नाही, हे विशेष.

आभार प्रकट करतांना बालपणीच्या आठवणीने मेस्सीचे डोळे पानावले.  माजलगावं, हंडीवजर, मांजरसुंबा येथे घालवलेल बालपण आणि शेतातील खोपीवरच्या अंधुक आठवणीने तो भावुक झाला.  मला ज्या मुख्याध्यापक, मामा, मित्र व इतर लोकांनी जी मदत केली त्याची परतफेड मी आयुष्यभर करूच शकत नाही. माझ्यासारखे अनेक खेळाडू आपल्या भारतात आहेत फक्त त्यांना योग्य प्रशिक्षण व दिशा मिळाली पाहिजे, असे तो म्हणाला.  आयटी इंजिनियरप्रमाणे अनेक मेस्सी भारत देशात घडो यासाठी मी शासनाकडे नक्कीच पाठपुरावा करीन. जमल्यास  माजलगावं किंवा मांजरसुंब्याला 'मेस्सी फुटबॉल अकॅडमी' उघडून खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणाप्रमाणेच फुटबॉल खेळात पुढं आणण्याचा मानस आहे असं तो बोलला. शेवटी 'आय लव्ह माजलगावं, आय लव्ह मांजरसुंबा अँड आय लव्ह माय इंडिया' बोलून तो थांबला. 

Sunday, 17 April 2022

भोंगा आणि भूल



                      

हल्ली प्रसिध्दी आणि समाज माध्यमामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भोंग्याची. देशात भोंग्याला नको एव्हढं महत्व प्राप्त झालं आहे. भोंग्या विषयी राज्याच्या सर्वच वृतपत्र तसेच वृत वाहिन्यावर भोंगा हा विषय अतिशय चवीने चर्चिला जात आहे. अर्थात त्या चर्चा जोरात ऐकू येण्यासाठी जनता पुन्हा दूरचित्रवाणीचा आवाज वाढवून ऐकत असते.  म्हणजे घरात सुद्धा घरापुरता एक भोंगा असतोच!

मानवी जीवनात संवाद हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एक दुसऱ्याशी संवाद साधतांना तीन महत्वाचे घटक काम करत असतात.  एक बोलणारा, दुसरा ऐकणारा आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे माध्यम.  जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर बोलत असेल तर हवा ही माध्यमाचं काम करत असते.  अंतर कमी असेल तर हवा ध्वनी लहरी ला ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत घेवून जाते. कान हे इंद्रिय श्रवणाच काम करत असतो.  ऐकणाऱ्याची संख्या वाढली तर आपला आवाज दूर बसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचत शक्य नाही. कारण मानवी आवाजाला सुद्धा ठराविक मर्यादा असते.  मग आपला आवाज समोर बसलेल्या व्यक्तीपर्यंत ताकतीन पोहचण्यासाठी आवाजाची तीव्रता वाढवणे आवश्यकता असते.  त्यासाठी जे उपकरण वापरण्यात येतं त्याला साऊंड सिस्टीम असे म्हणतात. अशी मोठ्याने आवाज काढणारं  उपकरण म्हणजे 'लाऊडस्पिकर,' जनतेच्या सामान्य भाषेत 'भोंगा'!

जेंव्हा एखादा जननेता किंवा ख्यातनाम व्यक्ती  समूहाला संबोधत असते तेंव्हा या लाऊड स्पिकरला 'पब्लिक एड्रेस सिस्टीम (पीए सिस्टीम) असं छानसं नाव प्राप्त होतं. लग्न समारंभात प्रसन्न, आनंदमय वातावरण निर्मिती करण्यासाठी साऊंड सिस्टीम म्हणजे लाऊडस्पीकर आवर्जून लावल्या जाते. हल्ली वरातीमध्ये मधुर बँडची जागा डीजेने घेतली आहे म्हणजे हा फिरता डीजे उर्फ लाऊडस्पिकर! पण याच लाऊडस्पिकर मधून जेंव्हा नकोस असं काही ऐकू येतं किंवा ज्यामुळे 'ठराविक' ऐकणाऱ्यास त्रास होतो तेंव्हा तो लाऊडस्पिकर न राहता भोंगा बनतो. अर्थात भोंगा हा शब्द द्वेषपूर्ण टिकेच्या दृष्टीने उच्चारला जातो. लहान मुल जेंव्हा कर्कश आवाज करून जोरात रडत असतात तेंव्हा पालक 'प्रथम हा भोंगा बंद कर !' असा दम देतात.

आवश्यकता ही शोधाची जननी असते. अर्थात एखाद्या व्यक्तीचा आवाज दूर पर्यंत पोहचण्यासाठी लाऊडस्पीकरचा शोध लागला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला ग्रॅहम बेलने दूरसंचार उपकरणाचा शोध लावला होता.  प्रथम विद्युत लाऊडस्पिकर जोहन फिलिप्स यांनी टेलिफोनला जोडून यशस्वी प्रयोग केला होता.  सुरुवातीला लाऊडस्पिकचा उपयोग ठराविक अंतरावर जशाच तसा ध्वनी पुनर्जीवित  करण्यासाठीच व्हायचा. त्या नंतरच्या काळात व्हॅक्यूम ट्ट्युबचा शोध लागला ज्या मुळे संचार क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. आता व्हॅक्यूम ट्ट्युबचा उपयोग करून आवाजाची तीव्रता वाढविणे सोपे झाले होते. साधारण १९१२ मध्ये लाऊडस्पिकरद्वारे मोठा आवाज काढणे शक्य झालं.  पुढे या तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती होऊन १९२५ मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक एडवर्ड केलोग आणि केस्टर राईस या जोडीने डायनॅमिक स्पिकरचा शोध लावला. सुरुवातीच्या काळात लाऊडस्पिकरचा उपयोग दूरसंचार, सभा, समारंभ, फोनोग्राम साठी होत असे.  व्याप्ती वाढून मग हे उपकरण लग्न-समारंभात गाणी वाजविण्यासाठी, निवडणुकीचा प्रचारासाठी किंवा युद्ध काळात सायरन म्हणजे धोक्याची सूचना देण्यासाठी होत असे. 

मग हा लाऊडस्पिकर कसा काम करतो? समजून घेणं सोपं आहे. लाऊडस्पिकर साऊंड सिस्टीमध्ये दोन ट्रान्सड्युसरचा उपयोग होत असतो.  पहिला ट्रान्सड्युसर म्हणजे माईक जो बोलणाऱ्याच्या आवाजाला म्हणजेच ध्वनी लहरी ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. बोलणारा व्यक्ती जेंव्हा माईक मध्ये बोलतो तेंव्हा त्या माईकच्या पडद्यावर त्याच्या आवाजाची कंपने आदळतात आणि त्याच रूपांतर माईक विद्युत ऊर्जेत करत असतो.  ही विद्युत ऊर्जा तारेद्वारे वाहत जाऊन तिचं अम्पलीफायर अंपलिफिकेशन करत असतो. अम्पलीफायर मुळे मुळ विद्युत सिग्नल मोठे होतात. अम्लिफिकेशन झालेलं विद्युत सिग्नल शेवटच्या टप्यात लाऊडस्पिकरला जाऊन मिळतात. लाऊडस्पिकर हा ट्रान्सड्युसर या विद्युत ऊर्जेच रूपांतर मूळ ध्वनी ऊर्जेत, पण मोठ्या स्वरूपात करत असतो.  परिणामतः त्यामुळे बोलणाऱ्याचा आवाज आपल्याला जोरात ऐकू येतो. थोडक्यात माईक आणि लाऊडस्पिकर मध्ये आवाजाची तीव्रता वाढविण्याचं खरं श्रेय तर अंपलिफायरला जायला हव. 

अनेक भाषा, संस्कृती आणि विविधतेने नटलेल्या भारत देशात वर्षभरात अनेक प्रकारचे सण- उत्सव साजरे होत असतात. गरबा, गणेश उत्सव, नवरात्री आणि लग्न समारंभात आनंद निर्मितीसाठी हमखास लाऊडस्पिकर ऊर्फ डिजे चा उपयोग होत असतो.  मुस्लिम प्रार्थना स्थळात दररोज पाच वेळेस लाऊडस्पीकर द्वारे मोठ्याने आजान दिली जाते.  'प्रार्थना स्थळ मग ती कोणत्याही धर्माची असो तिथे शांतता अपेक्षित आहे.'  देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण या सामाजिक मुद्द्याला अनुसरुन याबाबत योग्य निर्णय दिलेला आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी केंद्र किंवा राज्याची प्रशासकीय यंत्रणा पुरेशी आहे.  पण नेमक्या अशा धार्मिक मुद्याचा उपयोग करून समाजात द्वेषाचं विष पेरणी करून राजकीय पोळी भाजणे कितपत योग्य ? 

आपल्या प्रजासत्ताक राष्ट्रात प्रजेची सत्ता म्हणजे लोकशाही फक्त नावा पुरतीच आहे. राजकारणात ठराविक पिढ्यान् पिढ्या भ्रष्ट बाहुबली कुटुंबाची चलती असते.  बाप नेता त्यांनी भ्रष्टाचार द्वारे गोळा केलेली माया पुढे मुलाला राजकारणात 'सेटल' करण्यासाठी कामी येते. स्वतःचे अनेक उद्योगधंदे वाढवून त्यावर पडणाऱ्या प्रशासकीय धाडीपासून स्वतःला वाचविण्यासाठी राजकीय कवचकुंडले आवश्यक असतात.  म्हणून पुन्हा सरकारमध्ये भागीदारी मिळवणे क्रमप्राप्त होते. कोट्यवधी रुपये खर्च करून लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांना एकदा संसदीय पद मिळाल की समाजसेवेच्या नावावर भ्रष्टाचार करण्यास कुरन मोकळे होतात.

देशात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी दारिद्रय आणि भूकबळी सारख्या अनेक समस्या असूनही कोणत्याच भोंग्यातून त्या विषयी कुणी आवाज काढत नाही. या समस्येला एक वेळ इलाज नसला तरी ठीक पण भोंग्याच्या आवाजात देशाची खरी समस्येचा आवाज दाबणे हा एक प्रकारची भूल (एनेस्थेसिया) नव्हे का? खरं तर समाजातून निवडून दिलेल्या नेत्यांनी भोंग्याच तोंड सरकारकडे वळवून त्याद्वारे लोकांच्या खऱ्या  समस्या मांडने अपेक्षित आहे. पण असं न होता हल्ली धूर्त नेते भोंग्याच्या नावावर समाजात विषपेरणी करून मताच ध्रुवीकरण करत आहेत.  एकदा का जातीद्वेषाचं विष पेरलं गेलं की मताच ध्रुवीकरण होऊन निवडणुकीसाठी जमीन सुपीक होते. थोडक्यात भोंग्याचा उपयोग नेते निवडून येण्यासाठी करत आहेत.

आज गरज आहे की जनतेने वेळीच या राजकीय भोंग्याला समजून घेण्याची. आपापसातील द्वेष कमी करून, जातीय सलोखा राखून, शांततेन जीवन जगण्याची. कारण या प्रक्रियेत नाहक भरडला जातो तो सामान्य नागरिक, धूर्त नेते नव्हे.

© प्रेम जैस्वाल, पेडगावकर
मो. ९८२२१०८७७५