ad1

Saturday, 17 October 2020


                              खिचडी गाथा





जे खाऊन आपण मोठे  (वय आणि आकाराने!) झालो त्याबद्दल दोन शब्द नं लिहावे, मग आपल्या लिखाणाला काय अर्थ हो? बॅचलर काळात एक-दोन नाही तर तब्बल १६ वर्ष जीच्या सेवनामुळे आपण या जीवनात तग धरू शकलो त्यासाठी एक लेख तर बनतोच!  विशेष म्हणजे आज सर्व पक्वान्न उपलब्ध असतांना 'एक हक्काचं आरोग्यवर्धक व्यंजन' म्हणून आजही माझं आणि तिचं ते 'पवित्र नातं' मी जपून आहे.

'बिरबल की खिचडी कब पकेंगी?'  या प्रश्नाने खिचडीला सतत प्रकाश झोतात ठेवलं. किंबहुना खिचडीला बिरबलमुळेच जास्तचं प्रसिद्धी मिळाली असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही. याचा अर्थ खिचडी हे व्यंजन अकबरच्या काळापासून सुरु झालं असं नाही. प्राचिन इतिहासात सन ३५० सालापूर्वी तशी नोंद आढळते. त्याला कारण ती तयार करावयाची सोपी, सहज पद्धत आणि तिचे फायदे. तांदूळ आणि दाळ (कोणतीही), एक पातेलं उपलब्ध झाले की खिचडी तयार!  जे आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत किंवा ज्यांना जिभेचे चोचले पुरवायचे ते त्यात आवडेल ते मसाले, जीवनसत्व वाढविणाऱ्या भाज्यांचा भरणा करू शकतात, बिचाऱ्या खिचडीचा त्यास विरोध नसतो. ती त्या वस्तूला आपलंसं करून घेते. काय तिची सहनशक्ती!

विभिन्न जाती, धर्म व पंथ असलेल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रांतात तिला वेगवेगळी नावं आहेत. नावाप्रमाणेच खिचडी तयार करण्याची पद्धत भिन्न असू शकते पण त्यामुळे तिची महती कमी होत नाही. मुंगाची खिचडी, तुरीची खिचडी, उडदाची खिचडी, मसालेदार खिचडी, आलू खिचडी, फोडणीची, रुग्णासाठी हलकी, साधी खिचडी असे शेकडो प्रकार आहेत. बऱ्याच खिचडीच्या स्वादिष्ट चवीने एखादया जुजबी हॉटेल ढाब्यावाल्याचं किंवा गावाचं नाव सर्वदूर प्रसिद्ध केलं आहे. जोडीला गरमागरम भज्जी, तूप आणि पापड असलं,  अहा..हा, तो फिर क्या कहेने ! एके काळी वारंग्याची (जिल्हा नांदेड ) खिचडी खूप प्रसिद्ध होती. किंवा खिचडीमुळेच वारंगा सारख्या छोटया बस फाट्याचं नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कालांतराने त्या खिचडीच लोन कळमनुरी, हिंगोलीमार्गे औंढा नतंर जिंतूरपर्यंत पोहचलं. तीस जोड मिळाली स्वादिष्ट भज्जाची! त्यामुळे खिचडी जास्तच प्रसिद्ध होत गेली. 

सर्व सुखसोयी पायाशी लोळणाऱ्या जमान्यात स्वतः स्वयंपाक करणारी 'बॅचलर जमात' आज दुर्मिळ होत चालली आहे.  पण आमच्या काळात उचशिक्षणासाठी (प्राथमिक पुढचं!) बाहेर गावी शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी खिचडी म्हणजे-'एक तुही सहारा' होती. भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या विद्यार्थांना सर्व काम स्वतः करावी लागायची. पैशाचे दर्शन दुर्लभ होतं. अभ्यास, गृहपाठ करून खोलीतील इतर कामं उरकणं कठीण जायचं. त्यामुळे झटपट पोट भरण्यासाठी खिचडी हा एकमेव पर्याय असायचा. पिठ मळून, गोल भाकरी-चपात्या थापणे, आणि विशेष म्हणजे त्या बिन भरवशाच्या पितळी स्टोव्हवर भाजणे दिव्य काम वाटायचं. मधूनच तो दळभद्री स्टोव्ह आमची सत्वपरीक्षा घ्यायचा. त्याची अग्निझोत मधूनच फर्रर्रर्रर्रर्रर्र करत एकीकडे वाकडं रूप धारण करायची. मधूनच बंद पडुन नीरव शांततेत मंदिराच्या गाभाऱ्यात छोटी ज्योती तेवत रहावी असं रूप धारण करायचा. पिन केल्यास भडका उडून रॉकेलचा उग्र वास सोडायचा. बऱ्याचदा त्यातलं रॉकेल संपलेलं असायचं. क्वचीत पिन बर्नरच्या छिद्रात तुटून अडकली तर बसा बोंबलत! मग खाणंपिणं बाजूला.  सायकलला स्टोव्ह टांगून ..फटलक...फटलक करत स्टोव्ह दुरुस्ती, रॉकेल आणण्यासाठी दुकान गाठावं लागायचं.

नवव्या वर्गात शिकत होतो. जिल्हा परिषद शाळेची वेळ सव्वा बाराची होती. दोन घास खिचडी खाऊन शाळेत जायचं ठरवलं होतं. पण स्टोव्ह जीव घेत होता. बारा वाजून दहाला शाळेसाठी निघायचं होतं. वेळे अभावी खाणं तर दूर ती शिजविणेसुद्धा शक्य नव्हतं. एक युक्ती सुचली- चालू स्टोव्हची पिन किंचितशी मोकळी करून मी तसाच शाळेसाठी निघालो. मधल्या सुट्टीत अडीच वाजता परत येणार होतोच तोपर्यंत खिचडी शिजून तो स्टोव्ह आपोआप बंद होईल अशी योजना होती. महत्वाचे तास चालू असतांना माझं मन मात्र चालू स्टोव्हवर शिजत ठेवलेल्या त्या खिचडीवर केंद्रित होतं. काय झालं असेल? मधूनच स्टोव्ह बंद पडला तर....? स्टोव्ह चालूचं राहून खिचडीचा कोळसा  तर झाला नसावा.... ? या प्रश्नापुढे वर्गात सर विचारत असलेले प्रश्न तुच्छ वाटू लागले. प्रतीक्षा होती मधल्या सुटीची. एकदाची घंटा वाजली. खोलीकडे धूम ठोकली. योजना सफल झाली होती. पोट भरून पुन्हा शाळेत.

दुसरा अनुभव अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा. स्ट्रगलचा काळ होता तो. धाकटा भाऊ किरणसोबत मी औरंगाबादला खोली करून राहत होतो.  नुकताच डे-नाईट क्रिकेट हा प्रकार  सुरु झाला होता. शेजारच्या कृष्णधवल टीव्हीवर साडे दहाला मॅच बघून आम्ही स्टोव्हवर खिचडीचा कुकर ( म्हणजे प्रगती!!) ठेवला. शिजण्याचा प्रतीक्षेत आम्ही बिछान्यावर पहुडलो होतो. एका तासाने आमची झोप उडाली ती काळ्या धुरांनी! खोलीभर काळाकुट्ट धूर पसरला होता. खिचडी पूर्णतः जळून खाक होऊन,उच्च दाबामूळे कुकरचा सेफ्टीव्हॉल्व्ह फाटला होता. अर्थात रात्री उपाशी झोपणे हा एकमेव पर्याय होता. शिवाय उद्या कुकर दुरुस्तीच काम....!

विद्यार्थी दशेत खिचडी हा एकमेव पर्याय होता. सर्व व्यवस्थित असेल तर दहा मिनिटाच्या आत ती शिजायची. आडकाठी आणायचा तर तो स्टोव्ह!  कधी  वॉशर, कधी बर्नर तर कधी पिन ऐन वेळी हात दाखवायचे. सर्व ठीक तर चक्क रॉकेल आमच्या जेवणात व्हिलन बनून हजर व्हायचा. बऱ्याचदा काही उकळ्या आल्या की भुकेमुळे शिजण्यापूर्वीच ती फस्त व्हायची. दाळ, लसूण, कांदे, चटणी, हळद, असो वा नसो काम थांबायचं नाही. पुढे पुढे आमच्या 'भोजनात' मोठी प्रगती झाली. सोबत वरण-टमाट्याचा 'शोरवा' तयार करायचो, त्यामुळे खिचडीला 'चार चांद' लागायचे.

आजही जमिनीत बोअर करणारी मशीन बघितली तर खिचडी आठवते. बोरिंगवर काम करणाऱ्या, कायम धुळीने माखलेल्या महान कारागिरांच बिऱ्हाड त्या गाडीवरंच असतं. बोरिंग-खिचडीचा 'चोली-दामन का साथ'. एकीकडे बोरिंगचा प्रचंड गोंगाट, कमालीची धूळ उडत असतांना थोड्याचं अंतरावर त्यांचे दोन सहकारी मात्र लसूण, कांदे, टमाटे चिरण्यात मग्न असतात. विशेष म्हणजे स्टोव्हपूरती सपाट जागा त्यांना मिळाली की सुरु.... . एका भल्या मोठया अल्युमिनियमच्या पातेल्यात गरमागरम खिचडी शिजत असते. एकीकडे ड्रीलचा जमिनीत दगड फोडून शिरत असतांनाचा ठन..ठंन.ठंन...फुस्स्स..फुस्स्स गोंगाट, धूळ तर दुसरीकडे फर्र्रर्र..र्रर्रर्र स्टोव्हवर खिचडी शिजत असते. काम संपन्न झालं की खिचडी झोडून ती मंडळी पुढच्या कामासाठी तयार!

वर्ष २०१७ मध्ये वृत्तमानपत्रात एक सुखद बातमी झळकली. माध्यमाने खिचडीला 'नॅशनल डिश' तर मायबाप सरकार दोन पाउले पुढे जाऊन या 'वन पॉट' मेन्यूला 'क्वीन ऑफ ऑल फूड' अशी उपमा देऊन जागतिक प्रसिद्धी देणार म्हणे, असं वाचलं.  त्यात म्हणे प्रोटीन, कार्बोहायड्रेट सह अमिनो ऍसिड, कॅलरी अशी आरोग्यवर्धक घटक असून शिवाय पचनासाठी ती हलकी वगैरे. देशातील प्रसिद्ध आहारतज्ञानी त्या बातमीस दुजोरा देऊन अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. वाचून सुखद धक्क्का बसला. मनमोराचा बिसारा फुलल्यासारखी माझी अवस्था झाली.  थोडक्यात प्रतिकूल परिस्थितीत जीने आम्हास जगवलं, तगवलं, ते व्यंजन काही साधंसुधं नव्हतं तर! कालांतराने कळालं कि त्यातसुद्धा प्रांतिय राजकारण शिरलं.  या बातमीने गव्हाचं प्रचंड उत्पादन करणाऱ्या उत्तर भारताचं महत्व कमी होऊन भात पिकविणाऱ्या दाक्षिणात्य प्रांताच महत्व वाढणार होतं. पंजाबच्या एका मंत्र्याने त्यास विरोध केला. शेवटी खिचडी विषयीची ती बातमी एक 'खयाली पुलावं' ठरली. असं असलं तरी शालेय विद्यार्थ्यांची गळती कमी होऊन उपस्थिती वाढावी, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून मध्यान्ह भोजन म्हणून खिचडीचा समावेश करण्यात आला. आज देशातील लाखो शाळेत मध्यान्ह भोजनात खिचडी दिली जाते. 

'तुम्ही चांगले स्वयंपाकी आहात' असं म्हणून कुणी माझी स्तुती केली तर त्यात 'खिचडी' चा मोठा वाटा आहे, असं मला वाटते. आजपावेतो मी किती तरी हजार वेळेस खिचडी तयार केली असेन. अर्थात बऱ्याचदा आजही हे व्यंजन तयार करण्याचं काम माझ्याच वाट्याला येत असते.  फक्त फरक एवढाचं - 'गॅसची ज्योत कमी कर' म्हणण्या ऐवजी तोंडातून सहज '. थोडी हवा कमी कर' असं निघतं! खिचडी तन-मनात भिनते ती अशी!!

खिचडीवर लिखाण करावं असं मनी येऊन माझ्या लिखाणाची खिचडी तर चांगलीच शिजली. पंचपक्वानाशी पैजा जिंकणारी तिची गाथा न संपणारी आहे, पण आता थांबतो.


© प्रेम जैस्वाल, पेडगावकर

ह. मु. औरंगाबाद 9822108775

(हि खिचडी सामायिक करण्यास माझी हरकत नाही.)






Thursday, 8 October 2020

ऑनलाईन शिक्षण,प्रशिक्षण, उद्योग-व्यवसायातील संधी

कालाय तस्मै नमः. बदल जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि या बदलाशी जुळवून घेण्यातच जीवनाचा अर्थ आहे.  देशात कोरोना महामारीचा शिरकाव होऊन सहा महिने उलटले. या कालावधीत सततच्या टाळेबंदीमध्ये दैनंदिन जीवनाप्रमाणे उद्योग-व्यवसायातसुद्धा आपण अनेक बदल अनुभवत आहोत. त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे -ऑनलाईन. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाईन मिटिंग, ऑनलाइन खरेदीविक्री व्यवहार, ऑनलाइन-शॉपिंग, ऑनलाईन कन्सल्टेशन आणि बरंच काही.

खरं तर ऑनलाइन व्यवहाराची सुरुवात कोरोनापूर्वीच झाली होती. संगणक, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट व्याप्तीमुळे सर्वच व्यवहार ऑनलाईन होत होते. पण कोरोनामुळे त्यासं मोठी उभारी मिळाली. कोरोनाबाबत सर्वच अनिश्चित आहे आणि यशस्वी लस येईपर्यन्त त्या विषाणूचा संसर्ग टाळणे हाच मोठा पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे मास्क लावणे, घराबाहेर न पडणे, सामाजिक अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण आणि संसर्ग होऊ नये म्हणून सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. पण थांबणे म्हणजेच संपणे,  'शो मस्ट गो ऑन' त्यामुळे प्रत्यक्ष संपर्क टाळून उद्योग-व्यवसायाचा गाडा पुढे ओढण्यासाठी ऑनलाइन शिवाय दुसरा पर्याय नाही.

कोरोना संसर्गाचं चक्र थांबावे म्हणून अंमलात आणलेल्या टाळेबंदीमुळे काही काळ जगातील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मनुष्यबळचं नाही त्यामुळे उद्योगाची चाक  थांबली होती. उद्योगावर मोठं संकट आल्यामुळे जीडीपीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत चक्क २३.९% घसरण झाली होती. विशेष म्हणजे हि आकडेवारी फक्त संघटित उद्योगक्षेत्राची आहे.  चित्र नकारात्मक दिसत असलं तरी या मंदीत दडलेल्या विविध संधीचा शोध घेऊन 'फिनिक्स' पक्षाप्रमाणे उद्योगात उभारी घेणे आवश्यक झालं आहे.

वेगाने वाढणाऱ्या शिक्षण क्षेत्रासाठी ऑनलाइनपद्धत नवीन नव्हती. किती तरी नावाजलेल्या उच्चशिक्षण संस्था पूर्वीपासून 'व्हर्च्युअल क्लासरूम्' शिक्षण देतच होत्या. कोरोनामुळे एकंदरीत सर्वच शैक्षणिक संस्थांना ऑनलाईनची रि ओढावी लागली. त्यामुळे उद्योगात नवीन संधी चालून आली. ऑनलाइनसाठी लागणाऱ्या हायस्पीड इंटरनेट, फायबर ऑप्टिक केबल, मोडेम, इंटरनेट सम्बंधित उपकरणे, संगणक, मोबाईल, मोबाईल ऍक्सेसरीज, हेडफोन, ट्रायपॉडसारख्या संलग्न उपकरणाची प्रचंड मागणी वाढत गेली. त्यामुळे ऑनलाइन संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे, विक्री पश्चात सेवा तसेच सुटे भाग निर्मिती उद्योगाला चालना मिळत आहे. बदल लक्षात घेऊन मोबाईल सेवा देणाऱ्या एयरटेल कंपनीने उच्चगती इंटरनेटसाठी लागणाऱ्या ऑप्टिक फायबरचे उत्पादन करणाऱ्या स्टारलाइट उद्योगसमूहाशी भागीदारी केली आहे. सर्वच क्लास ऑनलाइन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच एकंदरीत अध्यापनाची नोंद जशी उपस्थिती, होमवर्क, परीक्षा, मार्क, निकाल इ.याचा ताळमेळ लावण्यासाठी, फाईल स्टोअर करणाऱ्या विविध ऍप-सॉफ्टवेअर प्रणालीची प्रचंड मागणी वाढली आहे.  सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या तरुण उद्योजकांसाठी हि खूप मोठी संधी चालून आली आहे. ऑनलाइनची काम सहज सोपं करणाऱ्या सॉफ्टवेअरची नितांत गरज आहे. ज्यांना संगीत, पेंटिंग, कुकिंग, योगा, जिम, फोटोग्राफी, लेखन, ऍक्टिंग कला-कौशल्य आत्मसात आहे असे विविध क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक या ऑनलाईन युगात उत्तम प्रशिक्षण देऊन चांगली कमाई करू शकतात. शिवाय युट्युबवर चॅनलवर व्हिडीओ अपलोड करून जाहिरातीद्वारे चांगला रेव्हेन्यू कमवू शकतात. होतकरू उद्योजकांसाठी हि एक संधी आहे. एका सर्वेक्षणानुसार प्रशिक्षण उद्योगक्षेत्राची जागतिक उलाढालं वर्ष २०२१ पर्यन्त २४ हजार करोडच्या घरात जाणार आहे. एव्हढया अफाट गतीने वाढणाऱ्या प्रशिक्षण क्षेत्रामध्ये उद्योगाच्या शेकडो संधी दडलेल्या आहेत. उद्योजक त्या दिशेने वाटचाल करून यशस्वी होऊ शकतात.  शैक्षणिक वर्ग ऑनलाइन होत असले तरी प्रशिक्षणार्थींना पेन, पेन्सिल, नोटबुक,मार्कर, मार्करशाई, बोर्ड,  इत्यादी. स्टेशनरी वस्तूच्या मागणीत प्रचंड वाढ होणार आहे. 

अख्ख विश्व ऑनलाइन स्क्रीनसमोर आल्यामुळे जो नोकरवर्ग संगणक तंत्रज्ञानापासून दूर आहे त्यांना आता संगणक प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक होणार आहे. त्या शिवाय ते संगणक किंवा मोबाईलवर होणाऱ्या झूम मिटिंग, ऑनलाइन शॉपिंग, वेब मिटिंग, वेबिनार फाईल सेव/डाउनलोड इत्यादी गोष्टीशी समरस होऊ शकणार नाहीत. त्यामुळे पुढील काळात कंप्युटर प्रशिक्षण  घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीत निश्चित वाढ होणार आहे. थोडक्यात  कंप्युटर हार्डवेअर प्रमाणे कंप्युटर, सॉफ्टवेअर, कोडींग प्रशिक्षण व्यवसायात  मोठी मागणी वाढून या उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहे. होतकरू उद्योजक या व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. तसेच ऑनलाइन च्या युगात पारंपरिक बोर्ड, होर्डिंग, बॅनर जाहिरात प्रकार कुचकामी ठरत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हा उत्तम पर्याय आहे. हल्ली कंपन्या जास्तीत जास्त जाहिरात खर्च फेसबुक, गुगल, इन्स्टाग्राम, लिंकडींग, युट्युब सारख्या समाजमाध्यमामध्ये करत आहे.  नवीन उद्योजकांनी संगणक आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण घेऊन डिजिटल मार्केटिंग उद्योग सुरु करू शकतात. 

संशोधन होऊन जोपर्यंत कोरोना विषाणूवर लसीचा शोध लागत नाही तोपर्यंत सततचे निर्जंतुकीकरण, हात धुणे व सभोवतालची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.  नाक, तोंडाद्वारे विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, फेसशिल्ड, पीपीई किटसारख्या वस्तूची मागणी दिवसंदिवस वाढत आहे. फक्त देशापुरता विचार केला तर एकशे तीस कोटी जनसंख्येसाठी येणाऱ्या काळात किती मास्क, फेसशिल्ड इ. लागतील याचा अंदाज उद्योजक घेऊ शकतात. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन स्टीलबर्ड सारख्या हेल्मेटचं उत्पादन करणाऱ्या ब्रॅण्डने विविध प्रकारचे फेसशिल्ड विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं आहे. मागणी वाढतच जाणार आहे, तेंव्हा उद्योजक अशा उत्पादनाची माफक दरात ऑनलाइन विक्री करून चांगला नफा कमवू  शकतात. तसेच निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक सॅनिटायजर, साबण, डिटर्जंट, हॅन्डवॉश आणि सिल्व्हर हायड्रोजन पॅराक्साईड सारख्या वस्तूची पुढे प्रचंड मागणी वाढणार आहे. गरज आहे उद्योजकांनी या वस्तू सम्बंधित उद्योगात गुंतवणूक करुन उत्पादने ऑनलाइन विक्रीस उपलब्ध करून द्यावीत.

आज कोरोना संसर्गाचा भितीने सर्व जग त्रस्त आहे. कोव्हिड19 आजाराची पूर्वसूचना मिळावी म्हणून जनता जागरूक आहे. वाफेच मशीन, शरीराचे तापमान, पल्सऑक्सिमिटर, बीपी मीटर, ग्लुकोमीटर सारख्या वैद्यकीय उपकरणास प्रचंड मागणी आहे. त्यामुळे रुग्णालयाप्रमाणे घरोघरी अशी उपकरणे खरेदी केली जात आहे. कोव्हिड19 आजारामुळं अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. घरातील कर्त्या व्यक्ती गेल्यामुळे रुग्णालयाचा खर्च तसेच प्राणहानी यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. त्यामुळे आज जीवनविमा आणि मेडिक्लेम पॉलिसी हि काळाची गरज आहे. होतकरू उद्योजकांसाठी विमा-मेडिक्लेम पॉलिसी विक्री हा चांगला उद्योग ठरू शकतो. 'आरोग्य धन संपदा' आरोग्य सर्वोपरी हा मूलमंत्रावर कोरोनामुळे शिक्कामोर्तब झाले. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लागणाऱ्या व्हिटॅमिन ए, बी,सि,डी ज्या फळ, मेव्यात आहे अशा वस्तूची प्रचंड मागणी वाढत आहे. तसेच शरीराला मुबलक व्हिटॅमिन देणाऱ्या फळाचे उत्पादन करून ऑनलाइन विक्री हा सुद्धा एक चांगला उद्योग होऊ शकतो.

प्रसिद्ध कन्सल्टंसी एजन्सी मेकींसीच्या सर्वेनुसार येणाऱ्या काळात 'गिग एकोनॉमिक' हा प्रकार प्रचंड वाढणार आहे. अमेरीकेत ३०-४०% एकोनॉमि गिग पद्धतीची आहे. 'गिग इकॉनॉमिक्स'  म्हणजे एखाद्या उद्योगात पारंपारिक 'नऊ ते पाच'अशी बांधील नोकरी न करता ठराविक कामाचा कॉनट्रॅक्ट घेऊन फ्रिलांसिंग पध्द्तीने एखादं काम करणे. महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) कडून राज्यभर साधारण पाच हजार अधिकृत लर्निंग केंद्राद्वारे फ्रिलांसिंगसाठी उपयुक्त अतिशय उत्तम दर्जाचे अनेक कोर्सेसच प्रशिक्षण दिलं जातं.  ऑटोकॅड, टॅली, फोटोशॉप, वेब डिझायनिंग, सी, सी++ सारख्या संगणक कौशल्याच उपयोग करून फ्रिलांसिंग करू शकता. विशेष म्हणचे अशा कोर्सेससाठी ऑफलाईन आणि ऑननलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.  संगणकच्या जोडीने उद्योजक बनण्यासाठी लागणारी सर्व कठीण आणि मृदकौशल्याचा या कोर्सेसमध्ये समाविष्ट आहे. ते कौशल्य आत्मसात करून तरुण उद्योजक 'फ्रिलांसिंग उद्योग' सुरु करू शकता.

मग प्रश्न पडतो- हा बदल तात्पुरता आहे की कायमस्वरूपी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एक उदाहरण बघू.  काही वर्षांपूर्वी क्वचित एखाद्या उच्चभ्रू घरात शुद्ध पाण्यासाठी 'वॉटर फिल्टर' चा वापर होत होता. सिलबंद 'मिनरल वॉटर' ची मागणी अतिशय मर्यादित होती. डासदंश टाळण्यासाठी उदबत्ती, वडी, लिक्विडची एव्हडी मागणी नव्हती. आज घरोघरी वॉटर फिल्टरचा वापर होतो. सिलबंद पाण्याच्या बाटल्या पुरविणारे हजारो उद्योजक आहेत.  वाढते जीवनमान, संसर्गजन्य आजाराची भिती, न झेपणारा दवाखान्याचा खर्च यामुळे सर्वत्र वॉटर फिल्टर, सिलबंद मिनेरल वॉटर विक्री वाढत आहे.

मनुष्यजातीसाठी कोरोना हे काही पहिलं संकट नाही. या पूर्वी आपल्या पूर्वजांनी अनेक साथरोग, महामारी व दुष्काळ सारख्या मोठ्या संकटास तोंड दिलं.  येणाऱ्या संकटास दोन हात करून किंवा स्वतःला त्या संकटाशी जुळवून घेत जगरहाटी चालूच राहणार. मलेरिया, डेंग्यू, पोलिओ, चिकन गोनिया, स्वाइन फ्ल्यू सारख्या आजारामुळं आपण डासाचा त्रास कमी करणारी अगरबत्ती, लिक्विड, मच्छरदाणीचा वापर करू लागलो. कोरोनामुळे या वस्तूमध्ये सॅनिटायजर, मास्कची भर पडली. हळूहळू या नवीन जीवनशैलीचा अंगीकार करून मनुष्यजात निश्चितच या 'न्यू नॉर्मल' शी जुळवून घेईलं. असं म्हणतात कि, एखादी गोष्ट आपण सतत २१ दिवस नियमित करत गेलो तर ती आपल्या अंगवळणी पडून ती सवय होऊन जाते. गेल्या सहा महिन्यांपासून  आपण नियमित सॅनिटायजेशन, नियमित हात धुणे, मास्क लावणे, तापमान , ऑक्सिजन चेक करणे याची सवय लावून घेतली आहे. किंबहुना ती सवय आपल्या अंगवळणी पडली आहे. सांगायचं तात्पर्य की,  आज ज्या वस्तूची मागणी वाढली आहे ती तात्पुरती नसून पुढे तिचा खप वाढत जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी माफक दरात या वस्तूचं उत्पादन करून विक्रीस उपलब्ध करून देण्यास हरकत नाही. किंवा त्याच्या उत्पादन संलग्न उद्योगात गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

अर्थात उद्योग उभारणीसाठी शासनाचा मोठा हातभार आवश्यक आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींची 'आत्मनिर्भर भारत' हि कल्पना साकार करण्यासाठी शासनाने उद्योग सुरु करण्यासाठी लागणार इन्फ्रास्ट्रक्चर उद्योजकांना उपलब्ध करून दयावयास हवे.  खूप पूर्वी या बाबीचा विचार करून चीनसारखा देश इतर देशांच्या तुलनेत किती तरी पुढे गेला आहे.  उद्योजकासाठी आवश्यक रस्ते, पाणी, वीज आणि इतर प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीने उपलब्ध करून द्यावयास हवी.  शिवाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करून उद्योजकांना प्रोत्साहित करणे तेव्हढच आवश्यक आहे. देशातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा खेड्यात राहतो. तेंव्हा ऑनलाइन व्यवहाराची व्याप्ती वाढविण्यासाठी गावखेड्यात इंटरनेटबरोबरच अखंडविजेची तेव्हढीच गरज भासते. जो पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात अखंड वीजप्रवाह उपलब्ध होत नाही तोपर्यंत ऑनलाइन व्यवहारात वाढ होणार नाही.

एक अनुभवी प्रशिक्षणार्थी म्हणून सांगतो- महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उद्योग विकासात सिंहाचा वाटा आहे.  संस्थेच्या नावाला साजेसं कामं एमसीईडी करत असते. शासकिय असूनही दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात काहीच उणीवा राहू नये म्हणून एमसीईडी विविध क्षेत्रातील खाजगी अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून देत असते. या केंद्रातील प्रोजेक्ट ऑफिसर सर्व प्रशिक्षणार्थींना अतिशय तळमळीने उद्योगाची तसेच शासनाच्या योजनेची माहिती देऊन उद्योगनिर्मितीस प्रोत्साहित करत असतात. उद्योग हा देशाचा आर्थिक कणा आहे. गरज आहे, सर्व एमसीईडी सारख्या इतर शासकीय संस्थेने शासनाचं उद्योग विकासाच धोरण राबवताना फक्त ते औपचारिकता न ठेवता इमानेइतबारे राबविले पाहिजे जेणेकरून पुढे अनेक उद्योजक घडून देशाची पत वाढुन देशाच्या विकास प्रगतीत मोठा हातभार लागेल.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
(लेखक एस्पी अकॅडमी या संस्थेचे संचालक तसेच करियर मार्गदर्शक आहेत.)