ad1

Friday, 22 November 2019




डॉक्टर तुम्हीसुद्धा..


मुंबईच्या प्रसिद्ध केईएम इस्पितळात घडलेली 29 वर्षीय डॉ. प्रणय जैस्वालची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. एखादया आत्महत्येची वार्ता आपण वृत्तमानपत्रात
मध्ये वाचतो तेंव्हा ती फक्त एक बातमी असते, पण जेव्हा निघून गेलेली व्यक्ती उच्चशिक्षित,  उंच शिखरावर पोहचली असते तेंव्हा त्या घटनेचं आपल्याला गांभिर्य कळतं. हल्ली शेतकरी आत्महत्या हा नित्याचीच बाब झाल्यामुळे सरकार प्रमाणे वाचकालाही अशा बातमीकडे बघायला वेळ नाही. पण मागील काही दिवसापासून घडत असलेल्या उद्योग-व्यवसायातील लोकांच्या आत्महत्या हा खरंच चिंताजनक प्रकार आहे.

मृत्यू अटळ आहे, येथे कुणीच अमर नाही.  येणारा तो जाणारच हे त्रिकालवादी सत्य. पण असं अवेळी स्वतःहून यमराजाला आमंत्रण देणं हे मनाला न पटणार आहे.  अजून तरी या घटनेमागील खरं कारण माहित पडलं नाही. पण कारण काही का असेना त्याला आत्महत्या हा एकच उपाय नक्की नव्हता आणि नाही.  या धर्तीवर असा एकही मनुष्यप्राणी नाही की ज्याच्या वाट्याला फक्त सुख, सुख आणि सुखच आलं.  जीवनात चढ-उतार, सुखदुःख आणि यश अपयश येतच असतात. प्रत्येक समस्येला उपाय असतात. बऱ्याच समस्या काही न करता काही काळानंतर सुटतात. पण यशाचे मोठमोठे घोट घेणारे आपण क्वचीत आलेलं दुःख मात्र चघळत बसतो. खरं म्हणजे त्या दुःखाशिवाय जीवनाला अर्थही नाही. खूप कमी लोकांच्या वाट्याला 'संथ वाहे कृष्णामाही' सारखं संथ सुखी जीवन येतं. जस अंधाराशिवाय उजेडात महत्व कळत नाही, तसंच दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नाही,  हेही तितकंच खरं.  मग अंधार बघून उद्या सूर्य उगवणारच नाही अशी नकारात्मक मानसिकता बाळगणे किती बरोबर?

डॉ. प्रणय जैस्वाल हे शल्यचिकित्सा विभागात निवासी डॉक्टर होते. अर्थात शालेय जीवनापासून त्यांनी भरपूर अभ्यास, कष्ट करून आज ते या पदावर पोहचले असतील. पुढील काही वर्षात ते एक निष्णात सर्जन म्हंणून प्रसिद्ध झाले असते. या जीवनात येऊन त्यांच्या हातून किती तरी चांगले कामं घडले असते. किती तरी रुग्णाचे इलाज करून, प्राण वाचवून, समाज, देशसेवा करून, नाव कमवून ते चांगलं जीवन जगू शकले असते. त्यामुळेच त्यांच्या ह्या अचानक 'एक्झिट' च अतिव दुःख होतं आहे.

वरील घटनेची कारणमीमांसा केली तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या अशा की हल्लीच्या युवकांमध्ये 'इमोशनल कोशन्ट' वर त्यांचं 'इंटेलिजन्ट कोशन्ट' हे भारी पडत आहे.  विध्यार्थ्याचं जीवन हे वह्या, पुस्तक, शाळा-कॉलेज, ट्युशन, परीक्षा आणि रँक येथपर्यंतच मर्यादित झालं आहे.  या दुष्टचक्रातून बाहेर डोकावयास त्यांच्याकडे वेळ आणि मुख्य म्हणजे इच्छाहि नसते. त्यामुळे जवळचे नातेवाईक कोणते हे त्यांना चार्ट, फॅमिली ट्री बनवून समजून द्यावं लागतं. त्यामुळे महत्वाच्या अशा भावनिक नात्याला ते मुकतात. नाते-गोत्यातील भाऊ-बहीण, चांगले मित्र जवळ नसल्यामुळे असे अभ्यासू विद्यार्थी आपल्या भावना इतरांशी सामायिक(इंग्लिशमध्ये 'शेअर') करत नाही. किंबहुना असं करणं त्यांना कमी पणाच वाटतं. मग ' एक तू हि सहारा' म्हणून ते स्वतःला जीवनसाथी मोबाईलच्या हवाली करतात. खरं म्हणजे अशा विद्यार्थी किंवा व्यक्तीस योग्यवेळी समुपदेशनाची(कौन्सिलिंग) गरज असते. महाभारतात साक्षात अर्जुनाला समुपदेशनाची गरज पडली होती. भर युद्धभूमीत श्रीकृष्णाने अर्जुनाच समुपदेशन केलं. कदाचित ते पहिलं समुपदेशन असावं. मग जेंव्हा देवाला समुपदेशनची गरज पडते तर मनुष्याला त्याची गरज का नसावी?

या घटनेचा दुसरा पदर असा की या नवीन पिढीला दुःख, कष्ट किंवा थोडक्यात 'प्रतिकूल परिस्थिती' मध्ये जीवन जगणे म्हणजे काय याची किंचितशी जाणीव नाही. तसेच कुणी अनावधानाने केलेला अपमान, कुणाचं जोरात बोलणं सहन करण्याची त्यांना सवय नाही. जमिनीवर कसं राहायचं त्यांना माहित नाही. लहानपणापासूनच सर्व सुखसोयी समोर लोटांगण घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडंही दुःख सहन करण्याची सहनशीलता दिसत नाही. मग अगदी टीव्हीचा रिमोट न दिल्यामुळे आत्महत्या, मोबाईलवर गेम खेळू न दिल्यामुळे आत्महत्या, वडील रागावले म्हणून आत्महत्या, अभ्यास न झेपत असल्यामुळे आत्महत्या, परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या अशा फालतू गोष्टीसाठी टोकाची भूमिका घेणाऱ्या बातम्या आपण वाचतो.

आज गरज आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःची जबाबदारी समजून घेण्याची. काबाड कष्ट करणारे, स्वतः उपाशी राहून तुम्हाला काहीच कमी पडू न देणारे, तुम्ही ब्रँडेड नेसावे म्हणून स्वतः जुने कपडे नेसणारे आई-वडील मुलांना यासाठी शिकवत नाहीत की त्यांनी भरपूर शिकून भर तारुण्यात आत्महत्या करून निघून जावं. उलट मी तर सांगेन आपण लहानाचे मोठे होतांना फक्त पालकांकडून नाही तर या देश आणि समाजाकडून आपण बऱ्याच गोष्टी घेत असतो आणि त्या समाजाला परत करणे आपली नैतिक जबाबदारी असते. आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांनी देश समाजाचा नाही तर किमान जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांचा तरी विचार करावयास पाहिजे होता. ज्यांनी जन्म दिला, स्वतः झिजून केजी पासून वैद्यकीय पीजी पर्यन्त शिक्षणाचा खर्च केला त्याबद्दल मुलांची पालकाप्रति काही जबाबाबदारी असते की नाही?

हल्ली फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटसप सारख्या आभासी युगात वावरणाऱ्या पिढीला खऱ्याखुऱ्या जगाबद्दल काहीच आस्था राहिली नाही. त्यांच्या संवेदना फक्त 'इमोजी' पुरत्या मर्यादित राहिल्या आहे.  त्यामुळे आज गरज आहे की विद्यार्थ्यांनी जीवन म्हणजे काय हे प्रथम समजून घेण्याची आणि त्यानुसार जीवनात सकारात्मकतेने पुढे पुढे जाण्याची.  शेवटी एव्हडच सांगेन,

*'जिंदगी हंसने गाणे के लिये है
पल दो पल, इसे खोना नही, खो
के रोना नही, तेरे गिरने में भी
तेरी हार नही, के तू आदमी है,
अवतार नही।'*

© प्रेम जैस्वाल (premshjaiswal@gmail.com)
  औरंगाबाद




बाऊन्सर नको, कौन्सेलर हवे!


एकदा प्रबोधनकार ठाकरेकडे शाळेचे शिक्षक तक्रार घेऊन गेले की तुमचा मुलगा शाळेत खूप खोड्या करतो. आता शिक्षकाला वाटलं की प्रबोधनकार ठाकरे आपल्या मुलाला मोठी शिक्षा करतील. पण झालं भलतंच, प्र. ठाकरे म्हणाले,' अहो गुरुजी या साठीच तर मी त्याला शाळेत पाठवलं!' तो मुलगा म्हणजेच हिंदू ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे!!

येथे हे नमूद करण्याचं कारण म्हणजे परवाच वृत्तमानपत्रात  एक बातमी वाचली. शालेय मुलं खोड्या करतात म्हणून शिक्षणाच माहेरघर असलेल्या पुण्यातील एका शाळेय व्यवस्थापनाने मुलांना शिक्षा देण्यासाठी  चक्क बॉउन्सर नेमले. बायन्सर म्हणजे उत्तम देहयष्टी असलेले, सहसा गडद कपडे परिधान केलेले धिप्पाड, उग्र चेहरा असलेले भितीदायक मानवप्राणी. सिने कलाकार म्हणजे सेलेब्रिटी, राजकीय व्यक्तीना जमावाकडून होणाऱ्या संभाव्य त्रासापासून रक्षणासाठी नेमलेले बाऊन्सर आपण नेहमी पाहतो. शिवाय बार, डान्सबार सारख्या ठिकानी ग्राहकांवर एक वचक रहावा म्हणून ही उभे केलेले बाऊन्सर आपण चित्रपटात पाहात असतो. त्यात वावगं असं काहीच नाही. पण शाळेसारख्या पवित्र ठिकाणी बाऊन्सर असा प्रकार पहिल्यांदाच ऐकावयास मिळाला.  खरंच शाळेत त्याची गरज आहे का?

मुलं हि उडान, मस्तीखोर असतातच कारण ते त्यांचं बालपण असतं. जीवनावश्यक शिक्षण, शिस्त आणि संस्कार देताना पालकांना घरी बऱ्याच मर्यादा येतात म्हणून आपण मुलांना शाळेत पाठवतो. पण संस्कार न देता त्यांना बाऊन्सरकडून १०० उठबैठकाची शिक्षा मिळत असेल तर ते किती योग्य? त्यातच जो शिक्षा भोगत होता त्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली नव्हती. अशा असंवेदनशील प्राण्याची विद्येच्या मंदिरात गरजच काय?

डी.एड, बी.एड. पदवीच्या अभ्यासक्रमात शिक्षकांना फक्त     विद्यार्थ्यांना एखादा विषय कसा शिकवावा एव्हडच प्रशिक्षण दिलं जातं नाही तर विद्यार्थ्यांशी कसं वागावं, कसं भावनिक नातं जपावं याचही शिक्षण दिलं जातं. परंतु, सत्य परिस्थिती अशी कि हल्लीचे शालेय शिक्षक स्वतःला एक-दोन विषय व त्या संबंधित प्रश्न-उत्तर आणि परिक्षेपुरतं मर्यादित ठेवतात. मग शिस्त आणि व्यवस्थापन ' नो वन्स कप ऑफ टी' होऊन जातं.  वाढत्या वयात शालेय विद्यार्थ्यांच्या शरीरात बरेच बदल घडत असतात. सभोवतालच्या सर्वच वस्तूबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. काही प्रमाणात संगतीचा परिणाम होत असतो.   त्यात मोबाईल, फिर क्या कहेने! अशा वेळेस विद्यार्थ्याच डोकं टाळ्यावर आणण्यासाठी शिक्षक सौम्य शिक्षा किंवा योग्य समुपदेशन करू शकतात.

थोडक्यात असे अघोरी प्रकार टाळण्यासाठी शाळेंनी बाऊन्सरची नेमणूक करता उत्तम समुपदेशकाची नेमणूक करावी. तसेच शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रम शिकवितानाच विद्यार्थ्यांच्या शिस्त आणि संस्कारावर भर द्यावी.


© प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com