ad1

Wednesday, 30 January 2019









डिजिटल उपकरणे आणि अर्थिंगच महत्व


दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, ऑडिओ सिस्टीम, रेफ्रिजरटर, वॉशिंग मशीन, एसी, तसेच ऑफिसमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर,  युपीएस, वॉटर फिल्टरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळत असतो. हल्ली सर्वच इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये थोडंफार इलेक्ट्रॉनिक्स भाग असतोच. मग यापैकी डिजिटल उपकरणे आपण कशी ओळखायची ?

तर वरील सर्व उपकरण चालूबंद करण्यासाठी एक पॉवरबटन असतं.  वरील सर्व उपकरणाच्या पॉवर ऑन-ऑफ बटनाकडे बघितलं तर लक्षात येईल की काही ठराविक उपकरणाच्या बटनावरचं एक गोल मोठी रिंग ' ० 'असते आणि त्यावर ' I ' असा मार्क असतो.  अशी खुन असलेली उपकरण म्हणजेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असलेली उपकरण.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन प्रकार असतात, एक ऍनॉलॉग आणि दुसरा डिजिटल. ऍनॉलॉग हे जुन्या पद्धतीचे उपकरण ज्याचे सर्व पार्ट ऍनॉलॉग असतात. वाहणार करंट किंवा माहिती हि ऍनॉलॉग असते. डिजिटल उपकरणात वाहणारी माहिती हि हाय आणि लो स्वरूपात असते.  हाय म्हणजेच वन (1) आणि  लो म्हणजे झिरो (०)   अशा स्वरूपात असते.  मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, स्कॅनर, टॅब, एलसीडी टीव्ही हे सर्व डिजिटल उपकरण आहेत. या डिजिटल उपकरणात डिजिटल आयसी, मायक्रोप्रोसेसरसारखे नाजूक पार्ट जोडलेले असतात. हे सर्व उपकरण डिजिटल आहेत हे लक्षात यावं म्हणून 'पॉवर ऑन-ऑफ' हे एकसारखं म्हणजे फोटोतं दाखविल्याप्रमाणं असतं. या सिम्बॉलमध्ये एक मोठा 'झिरो' आणि '1' दडलेला आहे. डिजिटल उपकरण वापरायला नाजूक असतात त्यामुळं त्या उपकरणाला योग्य अर्थिंग देऊनच वापर करावा.

अर्थिंग म्हणजे काय ?

घरगुती वा कार्यालयात आपण वापरत असलेल्या विजेच्या उपकरणाच्या थ्री पिन पॉवरप्लगची एक पिन जाड आणि लांबीला थोडी पुढं आलेली असते. कोणतेही विद्युत उपकरण चालण्यासाठी मुख्यतः फेज (+ तांबडी)  आणि न्यूट्रल (- काळी) ह्या दोन तारचं आवश्यक असतात.  त्या दोन तारेमधूनच कोणत्याही उपकरनाला विद्युतपुरवठा मिळत असतो. देशातील सर्व विद्युत महामंडळ आपल्याला दोनच तारेतूनच वीजपुरवठा करत असतो.  थोडक्यात त्या  'लहान दोन पिन' जरी पॉवर सॉकेटमध्ये टाकल्या तरी उपकरण काम करतं. मग प्रश्न पडतो ती तिसरी पिन कशासाठी  ?  आपल्या वास्तूत बाहेरून दोन तारेचा वीजपुरवठा आल्यानंतर ' इलेक्ट्रिशियन'  त्यात तिसरी तार जोडतात. हि तिसरी तार त्या 'जाडजूड लांब पिन' मधून आपण वापरत असलेल्या उपकरणाच्या बॉडीशी जोडलेली असते. ह्या तारेच दुसरं टोक त्या त्या वास्तूच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून जमिनीत गाडल्या जाते. त्यालाच 'बिल्डिंगची अर्थिंग' असे म्हणतात. त्या तारेचा रंग सहसा हिरवा असतो.  सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी हि तिसरी तार खूपचं महत्त्वाची असते. ती शास्त्रीय पद्धतीनं केलेली असेल तर विद्युतप्रवाह उपकरणात उतरून लागणारा 'शॉक' तुम्ही टाळू शकता. विद्युत पुरवठा जरी महामंडळाची जबाबदारी असली तरी अर्थिंगची जबाबदारी हि त्या त्या घर-इमारत मालकाची असते. सुरक्षितता म्हणून अत्यंत योग्य अर्थिंग करणे अत्यावशक आहे.

उदाहरणार्थ, जर आपनं लोखंडी पत्रा असलेला कुलर वापरत असाल तर कुलरचा पंखा, पंप चालण्यासाठी दोन तारा (सहसा: तांबडी, काळी) पुरे. पण त्यामुळं कुलरमध्ये बिघाड होऊन विद्युतप्रवाह कुलरच्या बॉडीच्या पत्र्यात उतरला तर आपल्याला शॉक लागून अपघात घडू शकतो. म्हणून आपल्या सुरक्षेसाठी ती तिसरी (हिरवी तार) त्या बॉडीशी जोडल्या जाते. हि जाडजूड पिन म्हणजेच 'अर्थिंग पिन.' मग  ही अर्थिंगची पिन मोठी आणि लांब ठेवण्याचा उद्देश काय?  तर, तुमचं उपकरण सुरु होवो वा न होवो प्लग सॉकेटमध्ये टाकताच उपकरणाला अर्थिंग मिळणे आवश्यक. तुमची सुरक्षितता ही प्राथमिकता.  त्यामुळे पिन लांब असल्यानं पॉवरसॉकेटमध्ये प्लग टाकताच आधी उपकरणाला संपर्क अर्थिंगला होतो, नंतरच उपकरणाला वीज! शिवाय ती अर्थिंग पिन सॉकेटमध्ये घट्ट चिपकून रहावी म्हणून किंचितशी जाड व लांब असते.

मग प्रश्न पडतो कि बाजारात मिळणाऱ्या बरीच उपकरन जसेकी ट्रीमर, हेअर ड्रायर, स्टीमर,  शोभेच्या माळा, लायटिंग प्लगला दोनच पिन का असतात ? कारण त्या उपकरनाची बॉडी प्लास्टिक, लाकूड किंवा काचेची असते . त्यामुळं बॉडीमध्ये करंट उतरून शॉक लागण्याचा धोका नसतो.  पण आपल्या घरातील पाण्याची मोटर, कुलर, हिटर, गिझर, वॉटर फिल्टर, अव्हन आणि इतर उपकरणाला अर्थिंग आवश्यक असते. विजेचे वाढते अपघात लक्षात घेता आपण राहत असलेल्या इमारतीची, कार्यालयाची अर्थिंग आपल्या इलेक्ट्रिशयनद्वारे उत्तम प्रकारे करून घेणे 'अत्यन्त महत्वाचे' आहे. तसेच विजेची उपकरण वीज बंद करून काळजीपूर्वक हाताळणेच योग्य आहे. एव्हडच नाही तर, अर्थिंग व्यवस्थित असेल तरच आपण वापरत असलेले संगणक, लॅपटॉपसारखे नाजूक उपकरण चांगले काम करतील. थोडक्यात कोणतेही उपकरण चांगले चालण्यासाठी आणि सुरक्षेसाठी त्या त्या वास्तूची 'अर्थिंग' उत्तम असणे आवश्यक आहे. अर्थिंगमुळे डिजिटल उपकरणाची कार्यक्षमता वाढून त्याचं आयुष्य वाढत.

© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com

{हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही}

Tuesday, 1 January 2019












डिजिटल युगातील संभाषणकौशल्य


दि.५ जुलै, २०१८ ची हि घटना. आदर्श श्रीवास्तव नावाचा युवक अवध एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करत होता. त्याच्या लक्षात येतं की त्यांच्या बोगीमध्ये लहान वयाच्या २६ मुली (ज्या १० ते १४ वयाच्या) प्रवास करत आहे. मुली खूप घाबरलेल्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती दिसत होती. आदर्शला तो मानव तस्करीसारखा प्रकार वाटला. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या मोबाईलवरून रेल्वे प्रशासन, रेल्वेमंत्री आणि पंतप्रधाना ट्विट करून ती माहिती दिली. त्यांना काही मिनिटात रेल्वेकडून कारवाईबद्दल आश्वासन मिळालं. रेल्वे प्रशासनाची सूत्र विद्युतगतीने हालली. पुढच्याच स्टेशनला साध्या वेशातील रेल्वे पोलिस गाडीत चढले. गुंडांना ताब्यात घेऊन त्यानी त्या मुलींना मुक्त केलं. गुंडावर कठोर कायदेशीर कार्यवाही करून मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं.  हे कसं घडलं असेन? ट्विटरद्वारे एका क्षणात घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. घटनेच गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. काही मिनिटात माहितीच देवाण-घेवाण झालं आणि गुन्हेगार पकडल्या गेले. कशामुळं हे शक्य झालं असेन ? अर्थात एकविसाव्या शतकातील डिजिटल क्रांतीमुळे.

संभाषण म्हणजे कम्युनिकेशन या शब्दाचा उगम कॉमन या शब्दापासून झाला. दैनंदिन जीवनात आपण सतत संवाद करत असतो. हा संवाद कधी बोलका असतो तर कधी 'शब्दाविण संवादु'  म्हणजे फक्त देहबोली. दुसरा संवाद हा लिखित स्वरूपात असतो.  लिखित संवाद हे दोन प्रकारचे, अनौपचारिक आणि औपचारिक.  मित्रमंडळी, आप्त नातेसंबंधाशी होणारा अनौपचारिक पत्रव्यवहार हा प्रकार आता इतिहास जमा झाला आहे. आता फक्त शालेय अभ्यासक्रमातच तो बघावयास मिळतो.  अत्यल्प कॉलदरामुळे संवाद वाढून पत्रलेखन बंद पडलं. अनौपचारिक संभाषणाची जागा समाजमाध्यमांनी घेतली आहे.  व्हाटसप, फेसबुकमुळे नातेसंबंधातील व्यक्तीचे ग्रुप तयार होऊन क्षणाक्षणाच्या माहितीची देवाण-घेवाण होत असते.  त्यामुळे अनौपचारिक पत्रलेखनाची आता गरज उरली नाही.

दुसरा प्रकार म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार. कोणत्याही शासकीय वा खासगी संस्थेसंबंधित पत्रव्यवहार या प्रकारात मोडतात.  या संस्था किंवा उद्योगाच्या कार्यालयामध्ये दोन प्रकारचे संवाद होत असतात. संस्थेच्या आत होणारे रिपोर्टींग, नोटीस, मेमो, सरकुलर हा लिखित तर  उच्चधिकारी, सहकारी आणि इतर कर्मचारीसोबतच्या बैठका, चर्चा, प्रेझेंटेशन संवाद हा अंतर्गत संवाद तर व्यवहारनिम्मित इतर जगाशी साधला लिखित-अलिखित  संवाद म्हणजे बाह्यसंवाद. त्यामध्ये एक प्रकारची औपचारिकता असते. संस्थेतील सर्व पत्रव्यवहार हे लिखित स्वरूपाचे असणे आवश्यक असते परंतु डिजिटल क्रांती आणि 'पेपरलेस ऑफिस'  संकल्पनेमुळे सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात झाले आहे. पूर्वी पेपरला असलेले महत्व आज 'डाटा' ला आहे.  एखाद्या संस्था किंवा उद्योगाची सर्व माहिती हि डिजिटल डाटा स्वरूपात वाहत असते. त्याची गती आणि क्षमता वाढावी म्हणून वारंवार त्याशी संलग्न हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर 'अपडेट' केले जाते. त्यामुळे एखाद्या कार्यालयाचा डाटा हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे त्याची सुरक्षितता अत्यन्त महत्वाची असते.  संस्थेचे कार्यालय विविध शहरात  असतील तर त्यासाठी वेगवेगळे नेटवर्क वापरले जातात.  त्याला लोकल एरिया नेटवर्क (लँन) किंवा वाईड एरिया नेटवर्क (वॅन) असे म्हणतात. एका इमारतीतील सर्व विभागातील संगणक एकमेकांशी जोडण्यासाठी लँन चा उपयोग होतो तर विविध शहरातील कार्यालय वॅनने जोडलेली असतात. नेटवर्कमुळे कार्यालयातील माहितीची देवाण-घेवाण गतीने होऊन कार्यक्षमता वाढते. हल्ली कंप्युटरची जागा मोबाईलने घेतल्यामुळे कंप्युटरवरची सर्व कामे मोबाईलवर शक्य झालं आहे. थोडक्यात एका मोबाईलमध्ये अख्ख् कार्यालय सामावलेलं असतं. खूपच मोठी  उद्योगसंस्था असेल तर त्यांच्याकडे SAP प्रणाली असते ज्यामध्ये एखाद्या उद्योगाचे सर्व कार्यालयातील संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे माहितीच देवान-घेवाण जास्त गतीने घडून कार्यक्षमता वाढते.

ऑफलाईनपेक्षा जास्त महत्व ऑनलाईनला आल्यामुळे मनुष्यबळा एव्हडच महत्व संगणक आणि सॉफ्टवेअरचा आलं आहे. कंपन्याच्या व्यवस्थापनात त्यामुळे प्रचंड बदल झाले आहे. सर्वच ग्राहक ऑनलाईन झाल्यामुळे पारंपरिक वृत्तमानपत्रातील जाहिराती कमी होऊन त्याची जागा आता डिजिटल मार्केटिंगने घेतली आहे. त्यामुळे फेसबुक, गुगल ऍड, ट्विटर, लिंकडिन इत्यादी टूलचा जाहिरातीसाठी जास्त उपयोग होत आहे.  त्यामुळे वृत्तमानपत्रापेक्षा जास्त जाहिराती आज स्क्रीनवर चालू असतात.  खरेदी करणे इतके सोपे कि २-३ क्लिक आणि ती वस्तू दारात हजर. साहजिकच पूर्वीप्रमाणे वस्तू खरेदी साठी पर्चेस ऑर्डर, कोटेशन, बिल, रिसिप्ट अशा पेपरची गरज राहिली नाही.  हे ऑफलाईन पत्रव्यवहार आता कमी होऊन काही दिवसांनी इतिहासजमा होतील. 

कमी कॉलरेटमुळे लँडलाईन, इंटरकॉमचा मागे पडून मोबाईलचा वापर वाढला आहे. आज एखादा पेपर सकॅनिंग करून फॅक्स करण्यासाठी मोबाईल पुरे. ऑडिओ-व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमुळे आज खाजगी कंपन्याच्या मुलाखती ऑनलाईन झाल्या आहेत.  त्यामुळे खर्चात कपात होऊन कामास गती मिळते.   व्यवहारसंबंधित बैठकाची जागा  विडिओ कॉन्फरन्सिंगने घेतली आहे. हल्ली संस्थेत सुद्धा  मॅनेजर आपापल्या सहकाऱ्यांचा व्हाट्सआप ग्रुप तयार करतात. त्यामुळे  क्षणात एक संदेश सर्व सहकार्यांना पोहचतो. पेपरलेस ऑफिस आणि कॅशलेस व्यवहारामुळे पूर्वीप्रमाणे पेपर-फाईल कपाट, स्टोअररूमची आता गरज नाही. त्याची जागा आता  डाटा स्टोअर करणाऱ्या सर्व्हरने घेतली आहे तर मानवी सेक्युरिटीची जागा सायबर सेक्यूरिटीने घेतली आहे. माहितीचं महत्व वाढल्यामुळे सायबर अटॅकचा धोका वाढला आहे. तसं होऊ नये म्हणुन योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.  डिजिटल क्रांतीमुळे कॉर्पोरेट विश्वामधील संभाषणात आमूलाग्र बदल होऊन संभाषणासाठी आता नवनवीन टूलचा उपयोग होत असतो. त्यापैकी काही खालीलप्रमाणे :

1.  कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट : आपल्या ग्राहकांचा डाटा तयार करून सतत त्यांच्या संपर्कात रहाणे, ग्राहकाकडून प्रतिक्रया घेणे, कंपनीच्या ऑफर त्यांना माहित करणे. त्यामुळे ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण होतात. त्याचा फायदा विक्री वाढवण्यासाठी होतो. मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स 365 हे सर्व
परिचित सीआरएम टूल आहे.

2. सोशल इंट्रानेट सॉफ्टवेअर : हे नेटवर्क त्या संस्थेपुरते मर्यादित असते. लहान मोठ्या उद्योगातील अंतर्गत किंवा बाह्य पत्रव्यवहार आता पेपरलेस झाले आहे.  त्यामुळे कंपनीच्या नोकरवर्गातील होणारा पत्रव्यवहार संग्रहित करण्यासाठी किंवा पाहिजे तेंव्हा सामूहिक करण्यासाठी व तो सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

3 स्काईप : विश्वभरातील उद्योगधंद्यात वापरला जाणारा स्काईप हा महत्वाचा टूल आहे. आपल्या विविध विभागातील सहकार्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधण्यासाठी स्काईपचा उपयोग होतो. हल्ली सर्व उद्योगामध्ये स्काईपचा जास्त वापर होतो.

4. संयुक्तिक संभाषण : उद्योगविश्वात पारंपरिक पद्धधतीने मिटिंग घेणे खूप वेळखाऊ तसेच खर्चिक असतं. तसेच त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.  हल्ली सर्व नोकरवर्गाकडे मोबाईल असल्यानं व्हिडीओ कॉन्फरन्स, कॉल कॉन्फरन्स, डेस्क-टॉप शेअरिंग, इन्स्टंट चॅटिंग हे नवीन टूल वापरले जातात.त्यामुळे क्षणा क्षणाची माहिती प्राप्त होऊन त्यावर लगेच योग्य निर्णय घेतला जातो. त्यामुळे खर्च तसेच वेळेची बचत होते.

5.फाईल शेअरिंग सर्विसेस : इ-मेलद्वारे फाईल शेअर करताना जास्त मोठा डेटा असलेली फाईल आपण शेअर करू शकत नाही अशा वेळेस फाईल शेअरिंग सर्विस हा चांगला पर्याय आहे. मायक्रोसॉफ्टचा वन ड्राईव्हचा वापर करून आपण फाईल शेअरिंग करू शकतो.

6. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम : एखाद्या नविन प्रोजेक्ट संबंधित कामात सुसूत्रता आणण्यासाठी, नोकर-कर्मचाऱ्यांना प्रोजेक्टच्या विविध टप्प्याची माहिती देण्यासाठी,  कामाच्या प्रगती बद्दल अवगत करण्यासाठी या सिस्टीमचा उपयोग होतो.

नवीन तंत्र अंगिकारण्यात खाजगी संस्था खूप पुढे असतात. पण आज उशिरा का होईना शासकीय कार्यालयसुद्धा आता कात टाकत आहेत. आज जवळजवळ सर्व शासकीय कार्यालय संगणकीकृत झाल्यामुळे  सरकारी कामाला गती मिळाली आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी पूर्वीप्रमाणे कचेरीचे उंबरठे झिजवायची गरज पडत नाही. अगदी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन एफआयआर आज स्वीकारला जातो. पूर्वी कचेरीतून साधं रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी कितीतरी अडचणी यायच्या. आठवडा-पंधरा दिवसाचं काम काही शुल्क भरून एक-दोन दिवसात होणे शक्य झालं आहे. पारपत्र काढण्यासाठी एका दिव्यातून जावं लागतं असे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करता नाकीनऊ यायचा. पारपत्राची कटकट म्हणून 'नको ती परदेशवारी' म्हणत अनेकांची परदेशवारी हुकली. आज ऑन-लाईन अर्ज करून काही दिवसात पारपत्र घरी येतो. याच बरोबर मतदानकार्ड, आधारकार्ड काढणे किंवा त्यामध्ये दुरुस्त्या करणे अत्यन्त सोपं झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये ₹५० दिले तर घरपोच प्रमाणपत्र मिळण्याची सोय झाली आहे.  सर्वच कार्यालय ऑन-लाईन अर्ज स्वीकारत असल्यामुळे सामान्य जनतेला 'सरकारी काम काही महिने थांब' पासून मुक्ती मिळाली आहे. संगणकीकरनामुळे शासकीय कार्यालयातील अंतर्गत पत्रव्यवहाराला गती मिळाली आहे. त्यामुळे जनतेची कामे 'लाल फितीत' अडकत नाहीत.

डिजिटल युगात लिखित संभाषणासाठी आपण ई-मेल, टेक्स्ट, व्हाटसप, फेसबुक, ईनस्टाग्रामसह अनेक ऍप वापरत असतो.  प्रत्यक ऍपच आपलं आपलं महत्व आहे. पण ते वापरत असताना त्याची क्षमता व त्रुटी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.  इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ट मुळे येणाऱ्या दशकात संभाषण फक्त मनुष्यजातीपुरते मर्यादित न रहाता आपल्या सभोवतालच अख्ख विश्व एकदुसऱ्याशी संवाद साधेल.  या ' इंटरनेट ऑफ थिंग्स' मुळे जगभरातील करोडो उपकरणे इंटरनेटला जोडल्या जातील. त्यामुळे उपकरनाचा आपापसातील संवाद वाढेल त्यामुळे संभाषणाची व्याख्याच बदलून जाईल. पाश्चिमात्य देशामध्ये याची सूरवात झाली आहे.

ज्या गतीने तंत्रज्ञानात बदल घडत आहेत त्यावरून एक नक्की कि आजच तंत्रज्ञान किती दिवस टिकेल याची खात्री नाही. नवनविन संशोधनामूळे त्यात अनेक बदल घडत जातील. त्यामुळे त्यापासून दूर न जाता त्याशी जुळवून घेण्यातच सर्वांचं भलं आहे. 'जून ते सोनं' ह्या म्हणीत बदल करून डिजिटल युगात वावरताना 'नवं ते घेणं' हेच बरोबर आहे. आजही वयाची चाळीशी पार केलेल्या लोकांना या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना खूप दमछाक होते.  शासनाचे सर्व कार्यालय संगणकीकृत झाल्यामुले नोकरीसाठी संगणक प्रशिक्षनाची अट असते.  त्यामुळे सर्वांनी वेळीच संगणक व इंटरनेटच्या सर्व कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतःला अपडेट' करत रहावे, नसता आपली गणती 'आऊटडेट' मध्ये होईल.


©प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)