ad1

Monday, 24 December 2018



सौरऊर्जा : काळाची गरज


डिजिटल युगात वावरताना सर्व उपकरणांना आवश्यक वीज ह्या महत्वाचा घटकाचा विचार होणे आवश्यक आहे. विजेच्या शोधामुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडली.  एडिसनच्या ब्लब किंवा विद्युत उपकरणाचा शोध लागण्यापूर्वी विजेला विशेष महत्व नव्हत. जादू किंवा एखादा वैज्ञानिक चमत्कार दाखविण्यापुरता विजेचा उपयोग होई.  पण आजच्या डिजिटल वाय-फाय युगात घरगुती, उद्योग तसेच शेतीतील सर्व उपकरण स्वयंचलित, विद्युत व इंटरनेटवर चालत असल्यामुळे विजेच महत्व अनेक पटीनं वाढलं आहे.  एखाद्या देशाचा विकास तिथे उपलब्ध अखंड वीज, रस्ते आणि पाण्यावर अवलंबुन असतो.  त्यामुळेच देशातील बऱ्याच निवडणूका या तीन मूलभूत मुद्यावर लढल्या जातात. बऱ्याचदा निवडणुकीत उभ्या उमेदवारास ही वीज 'शॉक' देवून पराभूत करते.

आपल्या देशाची गणना विकसनशील देशात होते. असं असून सुद्धा आजही देशात विजेसंबंधित परिस्थिति फारशी चांगली नाही.  मार्च २०१९ पर्यन्त देशाच्या कानाकोपऱ्यात वीज नेण्याचा शासनाचा मानस आहे.  वर वर दिसणार चित्र गुलाबी वाटत असलं तरी आजही  देशातील अनेक गावखेडी, तांडे, दुर्गम ठिकाण आज अंधारात आहेत. तर काही ठिकाणी वीज  'असून अडचण, नसून खोळंबा '  अशी नावापुरतीच  आहे. बारा-बारा तासाच्या भारनियमनामुळे ग्रामीण जनता त्रस्त आहेत. बेभरवशाच्या विजेमुळं ग्रामीण भागाची प्रगती खुंटली आहे. त्यामुळेच दूरचित्रवाणीवरच्या एका चर्चेत बिहारच्या एका आमदारांनी सांगितलं होतं, ' अहो, आमच्याकडं वीज जात नसते तर ती 'येत असते !'  म्हणजे आपल्याकडे नळाचे पाणी काही तासासाठी येत असते, तसला प्रकार. पण आज वाढत्या पर्यायी ऊर्जेमुळे, मंद गतीने का होईना देशातील विजेचा प्रश्न काहीसा सुटला आहे.  आज गाव, पाडे, तांडे आणि दुर्गम रस्त्यावर विजेचे दिवे लुकलुकताना दिसतात. त्याला कारण आहे स्वस्तात उपलब्ध अशी अक्षय सौरऊर्जा.

आज सौरऊर्जेच सर्वत्र गुणगान होत असलं तरी आपल्यासाठी ती अगदीच नवीन नाही. पूर्वी वापरत असलेल्या घड्याली, कॅल्क्युलेटरमध्ये ती हमखास वापरल्या जायची. एव्हडेच नव्हे तर अवकाशातील कृत्रिम उपग्रहाला ऊर्जा पुरवण्यासाठी सौरऊर्जेचाचं उपयोग होत असतो. कोणत्याही तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी त्याची किंमत महत्वाची असते.  सततच भारनियमन, अफाट विजबिलामुळे हळूहळू का होईना देशात सोलारची मागणी वाढत आहे. वाढत्या वापरामुळे सोलारच्या किमती आज बऱ्याचा खाली आल्या आहेत. घरगुती वापरासाठी शासन अनुदान देत असते. सौरऊर्जा आपण दोन प्रकारे वापरू शकतो. बॅटरी न लावता सरळ घरातील उपकरण चालविण्यासाठी व दुसरा पर्याय म्हणजे दिवसा बॅटरीरीमध्ये वीज साठवून तिचा वापर रात्री करता येतो. अर्थात बॅटरीमुळे सौरऊर्जा संचाच्या किंमतीत वाढ होते.

वर्ष १८३९ मध्ये अलेक्झेंडर एडमंड  बेक्यूरेलने  सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करणाऱ्या फोटोव्हॉल्टिक इफेक्टचा शोध लावला.  सूर्यापासून मिळणारा प्रकाश (फोटॉन) जेंव्हा एका विशिष्ट धातूपासून बनवलेल्या पॅनलवर पडतो तेंव्हा त्या पॅनलमधील धातूमध्ये विद्युतभार (व्होल्टेज) निर्माण होतो. प्रकाश म्हणजेच फोटोन ऊर्जा. म्हणून यास फोटोव्हॉल्टिक इफेक्ट असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात त्यावर काहीच भरीव काम न झाल्याने सौरऊर्जेसाठी त्याचा उपयोग करण्यात आला नाही. फक्त प्रकाश मोजण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. पुढं एक शतकानंतर रुझेल ओहल नावाच्या शास्त्रज्ञाने सोलार सेलचा शोध लावला.  आज सर्वत्र सौरऊर्जा वापरली जात आहे.

भारत देशात तीन चतुर्थतांश ऊर्जा ही औष्णिक आहे. . देशात बहुसंख्य वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्यात येते. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमतीत सतत वाढ होत असते. वीज निर्मितीसाठी पुरविला जाणारा कोळशाची उपलब्धता हा एक प्रश्न असतो. तयार झालेली विजेचे वितरण, गळती त्यामुळे दर वाढतच जातात. औष्णिक विजनिर्मितीमुळे वातावरणात होणारा प्रदूषण ही मोठी समस्या आहे. तेंव्हा पर्यायी, प्रदूषणरहित, सौरऊर्जेचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या देशापुरता विचार केल्यास लक्षात येतं कि भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. त्यामुळे या काळातही सूर्याकडून येणारी सूर्यकिरणे भारतावर पडताना लंबरूप असतात. त्यामुळे या किरणांची कार्यक्षमता अधिक असते. ढगाळ, प्रदूषित वातावरणाचा सौरऊर्जानिर्मितीवर परिणाम होत असते. थोडक्यात आपल्या देशातील हवामान सौरऊर्जेस अत्यन्त पोषक आहे.  पावसाळ्याचे ६५ दिवस वगळता इतर ३०० दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने त्याचा सदुपयोग केला पाहिजे. दर दिवशी सूर्याकडून 1 चौ.मी. क्षेत्रफळावर 1 किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते.  या ऊर्जेत १० वॉटचे १० एलईडि दिवे १० तास चालू शकतील. सौरऊर्जेचा फक्त वीजनिर्मितीकरिताच होत नाही तर पाणी तापविण्यासाठी, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता होतो. औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर  ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे.

सौरऊर्जा सुरुवातीस महागडी वाटत असली तरी भविष्याचा विचार करता ती खूप फायदेशीर आहे.  नवीन तंत्रज्ञानामुळे त्याची कार्यक्षमता वाढून भरपूर बचत होते. इतर फायदे :

1. अक्षय व नविकरनक्षम ऊर्जास्रोत :  भूतलावर कुठेही सहज उपलब्ध सौरऊर्जा अखंड व न संपणारी आहे. इतर ऊर्जास्रोत प्रमाणे संपणारी नाही.
2. आपल्या विजबिलात भरपूर कपात होते. अधिक ऊर्जा आपण 'पॉवर ग्रीड' शी जोडून (विकून) पैसेही कमवू शकतो.
3. कमी देखभाल : सौरऊर्जेचा देखभालचा खर्च खुप कमी असतो.  कोणताही फिरणारा पार्ट नसल्याने, फक्त पॅनेलची नियमित साफसफाई करावी लावते. हल्ली उत्पादक पॅनेलची ,२०-२५ वर्षाची वॉरंटी देतात. पाच-सहा वर्षे इन्व्हर्टरला दुरुस्त करण्याची गरज पडत नाही.
4. दुर्गम ठिकाणी वापर : जेथे पारंपारिक वीजेचं वितरण शक्य नाही अशा ठिकाणी सौरऊर्जा चांगला पर्याय आहे. भारतात अनेक ठिकाणी स्वयंचलित सोलार-लाईट बघायला मिळतात.
5. नविन तंत्रज्ञान: नॅनोटेक्नॉलॉजिसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेचे पॅनल कितीतरी पटीने जास्त ऊर्जा तयार करतील त्यामुळे जास्त फायदा होईल.
6 कमी प्रदूषण : काहीही वेस्ट निघत नसल्याने वातावरणाच प्रदूषण होत नाही.

असे असले तरी सौरऊर्जा वापरण्यात काही अडचणीसुद्धा आहेत. सुरुवातीचा खर्च हा सर्वांना झेपेलच असा नाही. शासनाकडून घरगुती उपयोगासाठी सबसिडी मिळत असली तरी सोलार पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी आणि वायरिंगचा खूप जास्त येतो. तसेच सौरऊर्जा पूर्णतः सूर्यप्रकाशावर अवलंबुन असल्यामुळे वातावरणाचा बदल एक मोठी अडचण असते. पावसाळ्यात, आभाळ असताना पाहिजे तेव्हडी ऊर्जा तयार होत नाही. सोलार पॅनेलमध्ये तयार होणारी ऊर्जा आपण सरळ वापरू शकतो किंवा साठविण्यासाठी मोठ्या बॅटरी लागतात, त्या महाग असतात. शिवाय सोलार पॅनल आणि बॅटरीसाठी खूप जागा लागते. एखादं छत छोटं असेल तर अडचण होते.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेत सतत बदल होत आहे. त्यामुळे उच्च तंत्रज्ञान, अधीक कार्यक्षमता असलेला आधुनिक सोलार थोड्या कमी किमतीत आज उपलब्ध आहे. किंमत कमी होऊन ते सर्वांच्या आवाक्यात यावं म्हणून त्यासंबंधित सतत  संशोधन चालू आहे. जसेकी रिमोट किंवा मोबाईल द्वारे सोलार पॅनेलची दिशा सूर्याकडे वळवण्याच तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सौरऊर्जेचा जोडीला वाय-फाय, इंटरनेट आल्यामुळे आपल्या मोबाईलवर बॅटरी चार्जिंग व इतर सर्व गोष्टीची माहिती मिळणे सोपे झाले आहे. सौरऊर्जा दोन भागात विभागून वीज तसेच त्याच्या उष्णतेचा उपयोग एखाद्या हिटर किंवा टर्बाईन साठी होत आहे.  सोलारमूळे घराच्या छताची शोभा कमी होऊ नये म्हणून 'सिस्टीन सोलार'या बॉस्टनच्या कंपनीनं घराच्या रंगसंगतीला मिळत्याजुळत्या रंगाच पण त्याच कार्यक्षमतेचा पॅनल तयार करत आहे. त्यामुळं गच्चीवर सोलार पॅनलची अडचण होणार नाही. यालाच 'सोलार-स्किन' हे नाव देण्यात आलं. अमेरिकेच्या एका बर्फाळ महामार्गावर तर एक भन्नाट प्रयोग झाला. त्याला सोलार पावर्ड रोड म्हणचे 'सौरउर्जित महामार्ग' असं नाव देण्यात आलं.  भर महामार्ग रस्त्यावर आपल्याकडं पेव्हरब्लॉकचा उपयोग करतात तशी २० बाय १२ फुटचे सोलार पॅनल अंथरून त्याचा दोहेरी उपयोग केला गेला. निर्माण होणारी सौरवीज रात्री एलईडी दिव्यासाठी तर उष्णतेचा उपयोग रस्त्यावरील बर्फ वितळण्यासाठी होत असतो. फ्रांस सरकारचा येत्या पाच वर्षात ६२१ मैल रस्ता सौरउर्जित करण्याचा मानस आहे. तो दिवस जास्त दूर नाही जेंव्हा खूप छोटे छोटे सोलार पॅनल आपल्या वस्त्रातील कपड्यावर विणले जातील ज्यावर आपला प्रिय मोबाईल चार्ज होत राहील. मग घरातील पडदेसुद्धा सोलार पॅनलचं काम करतील. क्रोयोशियाचा शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांनी १९वया शतकात वायरलेस चार्जिंगच भविष्य वर्तवल होत. आज इंग्लडच्या नोटिझम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी खिशाला लागणारी छोटी वायरलेस सोलार 'चार्जिंग चिप' तयार केली आहे त्यामुळे प्रवासात आपला मोबाईल आपोआप चार्ज करणे शक्य होईल. यावर पावसाच्या पाण्याचा परिणाम होणार नाही. याशिवाय सौरऊर्जा साठवण्यासाठी आवश्यक बॅटरीची क्षमता वाढविण्या संबंधित संशोधन चालू आहेत. देशात सर्वात मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प तामिळनाडू मधील कामुठी येथे १० चौ. कि.मी. जागेवर विस्तारलेला आहे.   तब्बल ६४८ मेगावॉट वीजनिर्मिती करणारा ह्या सौरप्रकल्पाचा जगात दुसरा क्रमांक लागतो.  तर आशिया खंडातील 'पहिली सोलार युनिव्हर्सिटीचा' मान १६४.८ किलोवॉट वीजनिर्मिती करणाऱ्या हरीयाणा विद्यापीठाला जातो. संपूर्ण विद्यापीठ सौरऊर्जेवर कार्यान्वित करून जास्तीची सौरऊर्जा ग्रीडद्वारे विकुन विद्यापीठ वर्षाकाठी ८० लाख रुपये कमवतो. याच वर्षी संपूर्ण परिसरात सौरऊर्जेचा उपयोग करणारे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे महाराष्ट्रात पहिले ठरले. चौदा इमारतीवर सौरऊर्जा कार्यान्वित करून वर्षाकाठी विद्यापीठाला  ₹ ३५.५ लाखाची विजबचत होणार आहे. प्रदूषण, कार्बन उत्सर्जनाचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे १७ हजार ४२० वृक्षाची लागवड करण्यासारखं आहे. गुजरात व हरियाणामधील विद्यापीठात सौरऊर्जे संबंधित अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. पारंपरिक उर्जेला फाटा देऊन अक्षय सौरऊर्जेला चालना मिळावी म्हणून भारत देशाने पुढाकार घेऊन १२१ देशाची एक संघटना स्थापन केली त्याला इंटरनेशनल सोलार अल्लायन्स [ISA) असे नाव दिले.
पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच उजनी धरणावर एक हजार मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरप्रकल्प निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे.

पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त शहरी राहणीमान उंचावण्यासाठी होत असेल तर तो कितपत योग्य ?  माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांच्या मताप्रमाणे खरा भारत खेड्यात आहे. रोजच्या आत्महत्या बघता खेड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट आहे, हे सांगणं न लागे. एकाच वेळी त्यांना अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाला सामोरं जावं लागतं.  बेभरवशाची वीज आणि वाढत्या विजदरामुळे शेतीला पंपाने पाणी देणे परवडत नाही. कित्येकदा बिकट आर्थिक स्थितीत वेळीच वीजबिल न भरल्यामुळे भर मोसमात वीजजोडणी कापुण पिकाचे अतोनात नुकसान होते.  आधुनिक शेतीत मोटार पंपशिवाय इतर उपकरण असतात जे विजेवर चालतात. सध्या घरगुती सौरऊर्जेचा संच विकत घेण्यासाठी सरकार अनुदान देत.  आता गरज आहे की शासनाने घराप्रमाणे शेतीसाठी उपयुक्त सौरऊर्जेचा संच घेण्यासाठी सबसिडी द्यावी ज्यामुळे देशाच्या पोशिंद्या शेतकऱ्यांना ते विकत घेणं शक्य होईल. असं झाल्यास बळीराजाचे 'अच्छे दिन' येतील.  स्वतःच्या सौरऊर्जेने ते पाण्याचे पंप व इतर उपकरणे चालवू शकतील. अर्थात देशभर ग्राहकांची संख्या वाढून आपोआपच सौरऊर्जा प्रकल्पाच्या किमती खाली येतील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सौरउर्जेमुळं शेती उद्योगास चांगला हातभार लागेल, देश सुजलाम सुफलाम होईल.

© प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

Monday, 17 December 2018


             

आर्टिफिशियल इंटेलिजन्स


डॉ बेन गोर्टझेल : सोफिया तूला काय वाटतं, भविष्यात रोबोटचा मनुष्यासोबतचं वागणं हे नैतिक व मूल्याधारीत  असेलं का?

सोफिया:  माझी निर्मितीच मुळात सहानुभूती व करुणेसाठी झाली आहे. सर्वांचा प्रेम आणि संवेदनशीलतेनं विचार करूनच मी पुढं शिकणार आहे !

या मुलाखतीत मुद्देसूद उत्तर देणारी 'सोफिया' कुणी महिला-पुरुष नसून एक चालता बोलता रोबोट म्हणजे यंत्रमानव आहे. तो फक्त रोबोट नसून त्यात उच्चतम दर्जाचे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा आहे.  हॉंगकॉंग स्थित हंसोन रोबोटिक्स कंपनीनं सोफियाला जन्म दिला. हुबेहूब मनुष्यासारखा हा रोबोट आपल्या चेहऱ्याचे ५० पेक्षा जास्त हावभाव बदलू शकतो.   विशेष म्हणजे सौदी अरेबियानं सोफियाला त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिल्यामुळे त्याला तेथील सर्व सामान्य नागरिकांचे हक्क मिळणार आहे. एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारा तो पहिला यंत्रमानव आहे.  बुद्धिमता हा मनुष्याला मिळालेलं नैसर्गिक वरदान आहे. आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर मनुष्य विचार करतो, आकलन करतो, ज्ञान वाढवतो, संशोधन करतो, योग्य निर्णय घेतो व  उद्धभवणाऱ्या समस्येला तोंड देतो.  पण आज वैज्ञानिक एखाद्या यंत्राची बुद्धीमता मानवाच्या बुद्धीमत्ते इतकीच वाढवू इच्छित आहे. त्याबद्दल हा लेख.
मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स [कृत्रिम बुद्धिमत्ता ] म्हणचे काय ? 

एआय हि एक संगणक विज्ञानाची शाखा असून ज्यामध्ये मानवाकडे असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता एका संगणक किंवा यंत्रात प्रोग्रामिंग करून तयार करत आहे. थोडक्यात एआय हा अल्गोरीदम [गणितशास्त्र] व सॉफ्टवेअरचा भाग आहे ज्यामुळे एखादी मशीनचे मानविकरण होऊन ती मानवी बुद्धीमत्तेप्रमाणे सर्व कार्य करत असते.  आर्टिफिशियल इंटेलिजन्स हि संकल्पना सर्वप्रथम अमेरिकन संगणक वैज्ञानिक जॉन मेकार्थी ने वर्ष १९५६ साली मांडली होती.  त्यानंतर वर्ष १९६९ मध्ये 'शाकी' नावाच्या पहिल्या मोबाईल रोबोटचा जन्म झाला. त्यानंतर १९९७ मध्ये सुपरकंप्युटरचा जन्म झाला ज्याने बुद्धिबळात विश्वविजेत्याला पराजित केले. यंत्रमानव विज्ञानात पुढं प्रचंड प्रगती होऊन वर्ष २००२ मध्ये पहिला व्यवसायिक व्हॅक्युम क्लिनर रोबोट तयार झाला.  बदलत्या तंत्रज्ञानामुले या एआय-यंत्रमानवाकडून आता मनुष्यप्राणी करतात ती सर्व कामे करून घेतली जात आहे.

हल्ली कळत न कळत आपण 'मशीन लर्निंग' चा उपयोग करत असतो, तो एआयचाच एक प्रकार आहे. मशीन लर्निंग म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या मुलांना शिकवण्यासारखं असतं. अँड्रॉइड किंवा आयफोन मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला त्याची झलक बघायला मिळते. मोबाईलमध्ये 'गुगल असिस्टन्स' ही सुविधा आहे. मोबाईचं होम बटन दाबून ठेवल्यास ते सुरु होतं. किंवा       ' ओके गुगल,' अशी सुरुवात करून जर गुगलला काही प्रश्न विचारला तर तो सरळ गुगल असिस्टन्स सुरु करतो. मग तुम्ही त्याला वाटेल ते प्रश्न विचारू शकता. उदा.  आज वातावरण कसं आहे? आज कोणता दिवस आहे? माझा पत्ता सांग, भारतदेशाची राजधानी कोणती? माझं नाव काय? माझं आडनाव काय? वगैरे.  मग प्रश्न पडतो की हा गुगल एकदम बरोबर उत्तर कसं देत असेल. यात दोन गोष्टी आहेत, एक तर आपण मोबाईलमध्ये स्टोअर केलेली माहिती तो आपल्याला देत असतो किंवा आपल्याला अपेक्षित प्रश्नांची उत्तरं आपण त्यामध्ये आधीच संग्रहित करून ठेवू शकता.  गुगल असिस्टला माहित नसलेली  उत्तर तर तो आपल्याला गुगलच्या वेबसाईटला जोडून देतो.  हा प्रकार म्हणजे मशीन लर्निंग. मशिनला विविध गोष्टीचा परिचय आणण करून देत असतो. अशाच प्रकारे संगणकाला आपण जर वाघाचे वेगवेगळे चित्र दाखवले तर तो पुढच्या वेळी ओळखेल कि हा वाघ आहे. कारण वाघाच्या अनेक प्रतिकृती त्याकडे संग्रहित केलेल्या असतात. पण जर वाघाऐवजी आपण त्याला सिंह दाखवला तर तो ओळखणार नाही कारण त्याकडे त्याची इमेज नसते.

आज घडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तीनच प्रकार आहेत. विक एआय, स्ट्रॉंग एआय आणि सिंग्युलॅरीटि एआय. 

विक आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
कितीतरी वर्षापासून आपण विक एआय वापरत आलो आहोत. त्यामध्ये अनेक चांगले बदल झाले आहेत. विक एआयच उदाहरण द्यायचं असल्यास आपण कॉम्प्युटरवर खेळत असलेले निरनिराळे गेम. पत्याच गेम खेळताना आपण जशी चाल खेळतो ती चाल ओळखून कॉम्प्युटर पत्ते टाकतो. मुळात ' अल्गोरिदम म्हणजे गणित' व सॉफ्टवेअरने संगणकात त्यात अनेक चाली टाकलेल्या असतात. तो आपण खेळत असलेल्या चाली ओळखून शिकत असतो आणि मग आपल्यालाच हरवतो. आजही विक एआयचा उपयोग अभियंते औद्योगिक क्षेत्रात रोबोटकडून ठराविक अशी काम करून घेण्यासाठी करत असतात.

स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
हा नवीन प्रकार असून स्ट्रॉंग एआयमध्ये इतर कुणाची मदत न घेता मशीन मानवी बुद्धिच्या बरोबरीने सर्व क्रिया करत असते. अत्यंत 'हाय लेवल' चे अल्गोरिदम त्या मशीनमध्ये टाकले जातात. या एआय तंत्रज्ञानाचा उद्देश असा कि मानवावर निर्भर न रहाता मशीनने सर्व काम स्वतः सर्व करावी, स्वतः सर्व निर्णय घ्यावेत.  या प्रकारात मशीन मानवीबुद्धीप्रमाणे स्वतः विचार करून निर्णय घेत असते. या प्रकारामध्ये मशीन सतत शिकत जाते.  मग कोणत्या प्रश्नाला कशी उत्तर द्यायची ती स्वतः ठरवते. आताशी याची सुरुवात झाली आहे आणि पुढील काळात अनेक चमत्कारिक बदल बघावयास मिळतील.आपल्याशी गप्पा मारणारा 'चाटरोबोट' हा त्याचाच प्रकार आहे.  तसेच 'सोफिया' सुद्धा स्ट्रॉंग एआय असलेला रोबोट आहे.

सिंग्युलॅरीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
वैज्ञानिकाला खरी भिती आहे ती सिंग्युलॅरीटि एआयची. हा सुपरइंटेलिजन्स प्रकार अजून तरी अस्तित्वात नाही. हा एआय तंत्रज्ञानाच सर्वोच्च शिखर असेन. मशीन आपोआप सर्व शिकत जाऊन त्यांची बुद्धिमत्ता मानवाच्या किती तरी पटीने वाढतच जाईल.  वैज्ञानिकांच्या मते मशीनची बुद्धिमत्ता  'रनवे रिऍक्शन' च्या चक्रात अडकून तीचा वेग इतका प्रचंड वाढेल कि ह्या मशीन कितीतरी हजार वर्षाचं संशोधन काही दिवसात करतील. थोडक्यात  त्यामूळे एकूण मानव संस्कृतीतच बदल होऊन मनुष्यजातीला करण्यासारखं काही संशोधन उरणारच नाही. थोडक्यात सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित शेवटचे संशोधन असेन. त्यामुळेच प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंगनी एआय ला विरोध केला.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करत ? 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या मशीन त्यामध्ये
मेंदू हा शरीराचा अत्यन्त गुंतागुंतीचा अवयव आहे. मग त्याची क्षमता किती असावी?  अस म्हणतात कि
मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! अबब मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे.  आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील!
त्यामुळे एका मशीनमध्ये मानवीमेंदू प्रमाणे बुद्धिमत्ता निर्माण करणारे तंत्रज्ञान किती क्लिष्ट असणार हे आपण समजू शकतो. त्यासाठी वैज्ञानिकांनी एखादा निर्णय घेत असतान मानवी मेंदूमध्ये होणाऱ्या सर्व गणिती प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. एखादा निर्णय घेताना आपण न कळत मेंदूमध्ये कितीतरी गणित सोडवलेली असतात.  त्यामुळे एआयमध्येसुद्धा प्रचंड सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसह  सांख्यिकी, बीजगणित, वारंवारिता सारख्या असंख्य गणिताचा उपयोग होत असतो. ज्यामुळे मशिनला एखाद्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्यास क्षणाचाही वेळ लागणार नाही.  हे अलगोरिदम काय? तर एखाद्या खाण्याचे व्यंजन तयार करण्यासाठी जशी पाककृती असतात तशा आज्ञा हे अलगोरीदम कँप्युटरला देऊन त्वरित योग्य उत्तर शोधण्यास मदत करतात. दिलेला संदेश किंवा एखादं चित्र मशीनमध्ये असलेल्या करोडो चित्राशी जुळवून बरोबर उत्तर मिळत असते. मशीन लर्निंगमध्ये हा एआय मशीनला शिकवत शिकवत अनुभवाने अजून चांगले परिणाम देण्याची क्षमता देत असतात.  हल्ली रुग्णालयात  ईसीजी किंवा सिटीस्कॅन काढल्यानंतर त्यावर नेमका कोणता आजार असू शकतो हे लिहून येतं, हे त्याचेच उदाहरण आहे.  या पुढच्या 'डीप लर्निंग' मध्ये मानवीमेंदूत असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे  'आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क' च्या अनेक स्थर हे सतत मिळणाऱ्या माहितीतुन शिकत जातात आणि मशीनची बुद्धिमत्ता वाढत जाते.  [याशिवाय व्हॉईस रिग्निशन, ग्राफिकल प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ऍडव्हान्स अलगोरिदम चा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये समावेश असतो.]

भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवजीवन अजून सुसह्य होणार आहे.  एआय तंत्रज्ञानामुळे पुढील काळात औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड बदलं घडणार आहेत. बरीच कामं करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या भविष्यात येऊ घातलेल्या एआयच्या स्वागताच्या तयारीत आहेत. किंबहुना त्या दृष्टीने नियोजन करत आहेत. दैनंदिन जीवनात आपल्या चमत्कारिक बदल दिसतील. फक्त आवाजाने घरातील उपकरनाचं नियंत्रण करता येईल. सभोवतालच वातावरण बघून उपकरण तापमान, आद्रता कमीजास्त करतील. अनोळखी व्यक्तीच्या प्रवेशाची लगेच माहिती मिळेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून बँकेत होत असलेले सायबर घोटाळे टाळले जाऊ शकतील. तसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 'ग्राहक सेवे' त प्रोग्रामिंग केलेल्या मशीनचा उपयोग होऊ शकतो. इंटरनेट ऑफ थिंग आणि एआय चा उपयोग करून चालकरहित कार रोडवर धावताना दिसेल. स्मार्टघराची संकल्पना पुढे येऊन देशात अनेक स्मार्टसिटी उभ्या होतील ज्यामध्ये अनेक प्रकारचे एआय संचलित रोबोट काम करतील.  घरी ततपरतेने मदत करणारे रोबोट येऊन वयोवृद्ध नागरिकांचा मोठा प्रश्न सुटेल. वैद्यकीय, शेती क्षेत्रात प्रगती होऊन बरीच कामे रोबोट करतील. एकदा प्रोग्रामिंग केलेल्या ह्या मशीन न झोपता, कंटाळा न करता अहोरात्र कामं करणार आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन नफा वाढेल.  मनुष्याच्या जागेवर मशीन/ यंत्रमानव कार्य करत असल्याने 'मानवीय चुका' टळतील. वातावरणाचा परिणाम एआय वर होत नसल्यामुळे अवकाशात, जमिनीखाली, अतिखोलसमुद्र किंवा जोखमीच्या ठिकाणची कामे सोपे होतील.   वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरची जागा न थकणाऱ्या एआयमशीन घेऊन कितीतरी शस्त्रक्रिया करतील. एव्हडच नव्हे तर युद्ध किंवा कोणत्याही ग्रहावर निसंकोच हि यंत्रमानव पाठवले जातील त्यामुळे अवकाशातील संशोधनाला गति मिळेल. 

भविष्यात या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे दिसत असले तरी ही खटाटोप मानवजातीलाच भारी पडेल कि काय अशी भिती भविष्यवेत्ते व्यक्त करत आहे. बुद्धिमता हा मानवाचा असा एकच नैसर्गिक गुण आहे ज्यामुळे तो पृथ्वीवर करोडो वर्षापासून राज्य करत आहे. आपल्या तल्लख बुद्धिमतेने आपल्याशी 'वरचढ' बुद्धिमता असलेलं हुबेहूब यंत्र तयार करणे त्याला खरंच परवडेल का ?  जो बुद्धिजीवी तोच स्वामी, मग उद्या ह्याच मशीन मानवाला भारी पडून मनुष्यजातीवर तर राज्य करणार नाहीत ना?   हे मनुष्यालाच आत्मघातकी ठरणार नाही ना?  'यंत्रवैद्य' शस्त्रक्रिया तर करू शकेल पण आजारासाठी आवश्यक भावनिक स्पर्श, समुपदेशन ह्या मशीन करू शकतील का?  तसेच मनुष्य हा विचार करणारा प्राणी असल्यामुळे त्याची बुद्धी हि कल्पक व सृजनशील असते मग तसाच गुणधर्म या मशीनमध्ये दिसेल का? अशा अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला भविष्यातच मिळु शकतील. सॉफ्टवेअर आणि मायक्रोतंत्रज्ञानाला कायम हॅकिंग किंवा सायबर अटॅकचा धोका असतो त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असुरक्षिततेचा हा सर्वात मोठा धोका असणार आहे, त्याच्याही पुढे एआय संबंधित निष्णात तंत्रज्ञची उपलब्धता तसेच दुरुस्ती आणि देखभालचा खर्च अफाट असणार आहे.

त्यामुळेच जगातील बुद्धिजीवी आणि वैज्ञानिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर दोन गटात विभागले गेले आहेत.   फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गना एआय म्हणजे एक वरदान वाटतं, किंबहुना त्याचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली तर दुसरीकडे स्टीफन हॉकिंग, एलोन मस्कना एआय म्हणजे अख्ख्या मानवजातीला धोका निर्माण करणार तंत्रज्ञान वाटतं.  त्यामुळे आधीच वाढलेल्या बेरोजगारीत स्वयंचलित एआयमुळे आणखीनच भर पडते कि काय अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.  भारतदेशात संगणकक्रांती घडण्यापूर्वी असाच विरोध झाला होता.  पण आज त्याच माहितीतंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण हा लेख सहज वाचत आहात. 
    
त्यामुळेच सोफियाला विचारलेल्या प्रश्नांचे,  'आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बेरोजगारीमध्ये भर पडेल का?',  त्यानं खूपच छान उत्तर दिले, ते असे -
' मी संदेश देऊ इच्छितो कि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानामुळे मानवी विश्वाला काहीही धोका नसून उलट या तंत्रज्ञानामुळे मनुष्य एआय च्या जवळ जाईल.  नोकरीच्या अनेक संधी चालून येतील.  एआयमुळे मनुष्याच्या ज्ञानात भरच पडेल. ज्ञान संग्रहित करण्यासाठी     मनुष्य आमचाही उपयोग करू शकेन.'

© प्रेम जैस्वाल,  9822108775
(लेखक ESPEE INFOTECH, औरंगाबाद या सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करियर ऍडव्हायझर आहेत)


















Friday, 7 December 2018

                 





             इंटरनेट ऑफ थिंग्ज

                                    
काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणीवर येणारी 'वाय-फाय इन्व्हर्टर एसी' ची जाहिरात आपण कदाचित पाहिली असणार. या जाहिरातीत महानायक अमिताभ बच्चन दूर कुठे फिरायला गेलेले असतात. त्यांच्या घरी आलेल्या पाहुणे मंडळीना खूपच उकडत असतं. एसीचा रिमोट काही सापडत नाही. मग अमिताभजी शेकडो मैल दूरवरून  आपल्या मोबाईलच्या साह्याने घरच्या एसीच तापमान कमी करतात आणि घरात 'खुशियां' येते. अशी ती जाहिरात होती. या जाहिरातीतील गारवा आणनारा ' वाय-फाय इन्व्हर्टर एसी' हा फक्त विजेवर चालणारा एसी नसून तो वाय-फायद्वारे इंटरनेटलाही जोडलेला असतो. त्यामुळेच अमिताभजी त्याच नियंत्रण दूर मोबाईलवरून करू शकतात.  ही जाहिरात म्हणजे 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' च उत्तम उदाहरण आहे. पुढील काळ हा अशाच 'आयओटी'  क्रांतीचा असणार आहे.

आजच्या दैनंदिन जीवनात आपण सहजरीत्या करत असलेली कामे जसेकी बँकेचे व्यवहार, चित्रपट-नाटकाचे बुकिंग, फूड ऑर्डर, पाहिजे त्या वस्तूची खरेदी किंवा जीपीएसद्वारे प्रवास हे इंटरनेटमूळ शक्य आहे. कारण जगभरातील सर्व संगणक आता इंटरनेटच्या एकाच जाळ्याने जोडल्या गेल्यामुळे सर्व व्यवहार ऑन-लाईन करणे अगदी सोपे आहे.  या जाळ्यालाच आपण 'इंटरनेट ऑफ कॉम्प्युटर' असं म्हणू शकतो.  यापुढच्या टप्यात ह्या इंटरनेटच जाळं अजून दाट विणल्या जाऊन फक्त संगणक, मोबाईल नव्हे तर आपण कधी विचारही केला नसेल अशा सभोवतालच्या सर्व वस्तू एकमेकांना जोडल्या जाणार आहेत.  आणि हे नेटवर्क म्हणजेच  'इंटरनेट ऑफ थिंग' किंवा 'आयओटि' असणार आहे. नजीकच्या भविष्यात आयओटि आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनणार आहे. तशी इंटरनेट ऑफ थिंगची चाहूल ब्रिटिश उद्योजक केविन अष्टोनला 1999 मध्येच लागली होती.  आणि त्याच काळी संगणक क्षेत्रातील जाणकारांनी भविष्य वर्तविले होते कि वर्ष 2020 पर्यन्त जगातील शेकडो करोडो उपकरण ही इंटरनेटला जोडल्या जाऊ शकतील.

मग या 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' कोणत्या? ह्या थिंग्स म्हणजेच आपल्या सभोवताली उपलब्ध सर्वच उपकरण जसेकी संगणक, मोबाईल, सीसीटीव्ही, कार, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, ओव्हन, किचन उपकरणे, पाण्याचा पंप, टीव्ही, डुअर-बेल, म्युझिक सिस्टम, लाईट, पंखे तसेच  कार्यालयातील सर्व उपकरणे इत्यादी.  अर्थात ही सर्व उपकरणे एकमेकांशी जोडण्यासाठी सर्व विजेच्या उपकरणाला वेगवेगळे सेन्सर, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट असणार. सेन्सर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फ्रिजसारखी उपकरनं इतर उपकरणाशी सहज जोडल्या जाऊन त्याशी संवाद साधू शकेल. इंटरनेटला जोडल्या गेल्यामुळे हातातील मोबाईलच्या तालावर सर्व उपकरनाचे नियंत्रित आपल्याकडं असणार आहे. या नेटवर्कमुळे उपकरण एक दुसऱ्याला माहिती पाठवू शकतील. मानवाचा यंत्राशी होणारा संबंध कमी होऊन विविध यंत्र एकमेकांशी समनवय साधतील. एखादा रूमचा एसी त्या रूममधील व्यक्तीला आवश्यक तेव्हडाचं तापमान  आपोआप सेट करू शकेल. फ्रिजमधील शीतपेयाची बॉटल कमी झाल्यास फ्रिज तुमच्या मोबाईलवर तसा संदेश पाठवेल किंवा नेहमीच्या मॉलला आपोआप शितपेयाची मागणी करेन.  रुग्णालयात न जाता घरीच शरीराला काही उपकरण लावून रुग्णालयातील डॉक्टर रुग्णाची संपूर्ण शारीरिक अवस्था जाणून  त्याला ऑन-लाईन औषध लिहून देऊ शकतील. शेती उपकरणांचे आधुनिकीकरण होऊन हवामानाचा अंदाज घेऊन पाण्याचा पंप आवश्यक तेंव्हा आपोआप चालू आणि बंद होतील. हे इंटरनेट ऑफ थिंग्जच तंत्रज्ञान आपल्याकडे येण्यास जास्त वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या 'इंटरनेट ऑफ थिंग' चे काही उदाहरन -

1. कारमधील आयोटि : हल्ली सर्वच कारच्या डॅशबोर्डमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. यापुढे कार स्वतःच्या मायलेज, गती, तापमान, इंधन इ. नियंत्रणासह बाहेरील जगाशी सहज संपर्क करू शकणार आहे. चालत्या कारमधूनच भोजनसाठी योग्य ठिकाण निवडणे शक्य होईल. तेथे कसं पोहचायचं?  तिथे प्रतीक्षा करावी लागणार का? वाहनतळमध्ये जागा मिळेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॅशबोर्ड देत राहील. संगणक क्षेत्रातील ऍपल आणि गुगलने तर त्यासाठी ऑटोमोबाईल उत्पादक करणाऱ्या कंपन्यांशी आधीच भागीदारी करून  आयपॅड किंवा अँड्रॉइडसारखे उपकरण कारमध्ये बसवण्याचे ठरविले आहे. स्मार्टफोनचे सर्व काम आता कारचा डॅशवोर्ड करू शकेल.  चालकाचा आवाज ओळखूनच डॅशबोर्ड सुरु होईल. चालकाला  रहदारी, हवामान, वादळ आणि रस्त्यासंबंधीत प्रत्यक क्षणाचा अहवाल डॅशबोर्ड न विचारता देणार आहे. मागील आसनावर बसलेली मंडळी पुढील सीटच्या मागे लावलेल्या स्क्रीनवर इंटरनेटचा भरपूर स्वाद घेऊ शकतील. चालत्या कारमध्ये आवडीच्या गाण्यासह डॅशवोर्ड चालकाला इ-मेल, व्हाट्सप्प संदेश व आजच्या बातम्या वाचून दाखवेल. सर्व सुरळीत घडत गेलं तर पुढील दहा वर्षात चालकरहीत कार रस्त्यावर धावू लागेल.

2.  घरामध्ये 'आयोटी' : घरातील सर्व उपकरनं एका नियंत्रण मॉनिटरशी जोडल्या जाऊन घरात तापमान, आद्रता, धूर-प्रदूषण किती याची माहिती व नियंत्रण होईल. या 'स्मार्टहोम' मध्ये अनोळखी व्यक्तीचा प्रवेश झाल्यास लगेच अलार्म वाजून त्याची सूचना घरमालकाच्या मोबाईलवर मिळेल. टीव्ही आणि म्युझिक सिस्टम आपल्याला नेहमी आवडणारी वाहिनी, गाण्याची  नोंद करून तीच गाणी लावण्यास मदत करतील.  इलेक्ट्रिक उपकरण व लाईटिंगच उत्पादन करणारी जगविख्यात फिलिप्स कंपनी त्यानुसार लाईटमध्ये बदल करत आहे. आता मोबाईलवर विजेच्या दिव्याच्या प्रखरतेच नियंत्रण असणार आहे. अर्थात त्यासाठी दिव्यामध्ये सेन्सर लावलेले असतील जेणेकरून आवश्यक तेव्हडाचं उजेड पडून विजेची बचत होईल. मोबाईलचे बटन दाबून संपूर्ण घराची पाहिजे तशी प्रकाश योजना करता येईल. ' स्मार्ट मिरर' असाच एक प्रकार आहे. 'आयोटि' वर आधारित या आरस्यात बघत असताना तो आपल्याशी संवाद साधून आजचा दिनांक, वार,  तापमान, बदलत्या वातावरनाची माहिती देणार. तसेच ताज्या घडामोडीबद्दल माहिती देईल.

3. वैद्यकीय क्षेत्रात आयओटि : यापुढे एखाद्या आजाराचा इलाज करण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासणार नाही.  कारण डॉक्टर रुग्णाच्या घरी रुग्णाच्या शरीराला विविध सेन्सर असलेली उपकरण लावून त्याद्वारे रुग्णाची अंतरबाह्य स्थिती जाणून घेतील. ईसीजी, हृदयाची गति,  श्वसोश्वासची गती, तापमान, रक्ताचा दाब आणि रुग्णाच्या हालचाली टिपून त्याच्या नोंदी डॉक्टरला आपोआप पाठविल्या जातील.  त्या नोंदी बघून रुग्णाच्या आजाराचे निदान होवून डॉक्टर ऑन-लाईन औषध लिहून देतीलं. आवश्यकता पडल्यास आपोआप रुग्णवाहिकेस संदेश मिळून ती रुग्ण असलेल्या पत्त्यावर येऊन उभी दिसेन. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णाला तातडीची सेवा मिळून कितीतरी लोकांची हेळसांड न होता त्यास त्वरित उपचार मिळतील.

4. उद्योग क्षेत्रात आयओटी :  उद्योग क्षेत्रात आयओटी हे एक मोठे वरदान ठरणार आहे. उद्योगातील यंत्रासह सर्व विभाग इंटरनेटनी जोडल्यामुळे एखाद्या कारखान्यात प्रत्यक्ष उपस्थित न राहता तेथील व्यवस्थापन, यंत्रावर नियंत्रण शक्य होईल. कच्या मालाच्या खरेदी पासून तयार माल विक्री करणाऱ्या वितरकापर्यन्त सर्व टप्पे आयोटिने जोडल्या जाईल. त्यामुळे एखाद्या वस्तूची विक्री झाल्याबरोबर तेव्हढा माल कमी झाला आहे अशी माहिती माहिती वितरक, स्टोकिस्ट आणि ती वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपनीला होऊन त्याच पुन्हा उत्पादन सुरू करण्याचा संदेश मिळेल.  त्यामुळे जास्त माल संचयित न करता फक्त विक्रीलायक मालच कमी मनुष्यबळ वापरून उत्पादित करता येईल. थोडक्यात मागणी तेव्हडाचं पुरवठा हे गणित साधलं जाईल. आजही मॉलमध्ये जेंव्हा आपण एखाद रेडिमेड सदरा खरेदी करतो तेंव्हा बिलिंग झाल्याबरोबर उत्पादन करणाऱ्या त्या ब्रॅण्डला आणि वितरकाला लगेच संदेश जातो की अमुक अमुक मॉलमधून एव्हडा स्टॉक कमी झाला आहे.

5. दळण-वळणामध्ये आयओटि: हल्ली आपण कुरियरवर एखादी वस्तू ट्रॅक करू शकतो. मालाची ने-आन करणाऱ्या कुरियर किंवा मालवाहतूक कंपन्यांचे देशभर कार्यालय आणि गोडाऊन असतात. अनेक जडवाहन रस्त्यावर मालवाहतुकीची काम करत असतात. अशा वेळेस अनेक गोडाऊन, ट्रक आणि मनुष्यबळ याचा योग्य समनवय साधने आवश्यक असते. 'आयओटि' मुळे वाहतुकीची साधन, वाहतुकीचे कार्यालय, मनुष्यबळ एकमेकांशी जोडल्या जावून दळणवळण आणि मालाची साठवण सोपं होईल. कुठे माल पाठविण्याआधी त्या मार्गाची स्थिती, वातावरण, गोडावूनमध्ये पुरेशी जागा, आवश्यक मनुष्यबळ, पार्किंगव्यवस्था आहे किंवा नाही ही सर्व माहिती माल पाठविणाऱ्यास आपल्या मोबाईलवर आधीच माहित पडेल.

6. क्रीडाक्षेत्रात आयओटि :   राल्फ लॉरेन,  अमेरिकेत कपडे उत्पादन करणारी ही पहिली कंपनी ज्यांनी आयओटिची संकल्पना अत्यंत खुबीने वापरून ऍथलेटसाठी एक स्मार्ट शर्ट तयार केला आहे.  ह्या शर्टमध्ये लावल्या गेलेल्या सेन्सरमुळे खेळाडूच्या हृदयाची गती, श्वासोश्वासची गती, रक्ताचा दाब, कॅलरी बर्न माहित पडून खेळामध्ये सुधारणा करता येतील. शर्टमध्ये रेकॉर्ड झालेली ती माहिती आयफोन किंवा अँपलवॉचशी जोडून नंतर पाहता येईल. थोडक्यात फिटनेस ट्रेनरच बरंच काम कमी होईलं.

आयओटिचे हे काही उदाहरण आहे. पुढील काही वर्षात जगातील विविध क्षेत्रातील करोडो उपकरण  हायस्पीड इंटरनेटला जोडल्या जाऊन हि उपकरण एक दुसऱ्याशी संवाद साधून एक मोठी क्रांती घडणार आहे. मानवी जीवन अधिकच सुसह्य होऊन शरीराच्या हालचालीला मर्यादा येतील.  मनुष्यजातीला करण्याजोगं असं जास्त काम उरणार नाही. हळूहळू हि उपकरण आपल्या जीवनाचं नियंत्रण आपल्या हातात घेतील.  कोणतंही नवीन तंत्रज्ञान आपल्या अनेक फायद्यासह सोबत काही तोटेही घेऊन येतं असतं.  आयओटीमुळे सर्वच उपकरण सॉफ्टवेअरवर आधारित असल्याने हॅकिंग, सायबर क्राईमच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ होऊन 'असुरक्षितते'च्या नवीन संकटाला आपण सामोर जावू. मग चालती कार हॅक होणे, स्पर्धक कंपनीची गोपनीय माहिती चोरी करणे, उद्योजकामध्ये सायबर वॉर घडून एक दुसऱ्याच उत्पादन बंद पाडणे, हॅकिंग करून विमान पाडणे, वैद्यकीय उपकरण हॅक करून हत्या, घरातील उपकरण हॅक करून खंडणी मागणे असे 'हायटेक' गुन्हे घडतील.

मानवाच्या भौतिक सुखाला अंत नाही. आयओटी म्हणजे तंत्रज्ञानाच शेवट नसणार, पुढ अजूनही नवनव्या गोष्टी घडतील. मानवता बाजूला राहून यंत्रांच्या आहारी गेलेला मनुष्य स्वतः एक हाडा-मांसाचा यंत्र बनून राहील. सभोवतालची यंत्र मानवाला नियंत्रित करतील.   म्हणूनच     'द ग्रेट डिक्टेटर' मध्ये चार्ली चॅप्लिन म्हणतो, ' लोभाने मानवाचे आत्मे पोखरलेत. जगभर द्वेष पसरलाय. आपण गति वाढवली, पण स्वतः त्यात कैद झालो.भरपूर उत्पादन करणारी यंत्र आपली सततचा हाव वाढवत बसली. ज्ञानामुळे आपण 'सिनिकल' झालो. आपण खूप विचार करायला लागलो आणि आपल्या खूप कमी जाणीवा उरल्या. आज आपल्याला यंत्रापेक्षा जास्त मानवतावादाची गरज आहे. हुशारीपेक्षा दयाळूपणाची जास्त गरज आहे. या शिवाय आयुष्य आणि पर्यायानं मनुष्यजात संपून जाईन. मनुष्याला करायला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल असं जग आपल्याला हवंय. जिथे विज्ञान आणि मानवाचा विकास हातात हात घालून जाईल. असं जग घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, एकत्र येऊ'.

© प्रेम जैस्वाल,  9822108775

(औरंगाबाद येथील एस्पी इन्फोटेक  सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करिअर एडव्हायझर आहेत.)