ad1

Saturday, 20 October 2018





जबाबदार कोण?


काल अमृतसरमध्ये घडलेली 'रेल्वे दुर्घटना' खूपच दुःखद आहे. हि घटना फक्त पंजाब नाहीतर संपूर्ण देशाला दुःखाचा चटका लावून गेली.  पंजाब तर दुःखाच्या सागरात बुडाला आहे.  साधारण ६९ पेक्षा जास्त लोकांचा या दुर्घटनेत करूण अंत झाला आणि शेकडो जखमी झाले. घरातील एक सदस्य वारल्यास संपूर्ण घर उद्धवस्त होतं, म्हणजेच ६९ कुटुंबावर दुखाच डोंगर पडल्यासारखं आहे. पण आपल्याकडं शोकांतिका अशी की अशाही दुःखद घटनेकडे बघण्याचा समाजात दृष्टिकोन हा राजकीय असतो. आणि सर्वत्र जिम्मेदार कौन? अशी एकचं चर्चा झडत असते. सर्वांचा प्रयत्न हा इतर पक्षावर ढकलून हात झटकण्याचा असतो, हि बाब खूपच खेदजनक आहे. सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवून निर्लज्जपणे आरोप फेटाळले जातात किंवा इतरांवर ढकळले जातात. कालांतराने 'विसरभोळी' जनता सर्व विसरून जाते, नेते मोकाट फिरायला मोकळे होतात.

समाजात सर्वच समारंभ, उत्सव हे कोणत्यांन कोणत्या रस्त्याच्या शेजारीच होत असतात. समारंभ, सभा आणि उत्सव साजरा करण्यासाठी शासनानं काही नियम आखून दिलेले असतात. पण उत्सव, मस्ती आणि आनंदाच्या भरात ते नियम पायदळी तुडवले जातात. लग्नाची वरात अर्धा रस्ता व्यापून काढली जाते. फटाके, बँड, डीजे वाजवत, बेफाम नाचताना बाजूने जाणाऱ्या वाहणाकडे कुणाचे लक्षही नसते. मग अशात कोणी नाचत नाचत बाजूनी वाहनांच्या समोर आला तर जिम्मेदार कौन? अर्थात तो नाचणारा वराती. कारण तो वाहक सर्व नियम पाळून, हॉर्न वाजवत गाडी चालवत असतो आणि कोणतंहि वाहन तुम्ही अचानक अर्जंट ब्रेक लावून थांबवू शकत नाही. पण आपल्याकडे 'रेशनल'वर 'इमोशन भारी पडतं. सरळ त्या गाडीवाल्याची गाडी फोडून लोकं मोकळे होतात.  वाहकालाच मोठी सजा देण्याचा प्रयत्न होतो.  तसेच  मोटरसायकल, सायकलवाला स्वतःच्या चुकीन भरधाव कारसमोर आला तर 'बघे' आधी मोठ्या वाहनावर जिम्मेदारी टाकून त्याला चोपतात. कारण खरी चूक कोणाची याशी कुणालाही घेणंदेन नसतं. मार खातो तो मोठी गाडीवालाच!

अमृतसरचा प्रकार थोडा तसाच आहे. संयोजकांनी ज्या ठिकाणी रावण दहन केलं त्या मैदान आणि रेल्वे पटरी दरम्यान एक दहा फुटाची संरक्षक भिंत होती पण हौशी प्रेक्षक दूर उभे राहून तो नजारा बघत होते. कुणी फोटो, कुणी शूटिंग करत होते. या धुंदित त्यांना बाजूने जाणाऱ्या रेल्वेचे भान नव्हते. मोटरमन रेल्वेला अर्जंट ब्रेक लावू शकत नाही त्यासाठी त्याला नियोजित थांब्याच्या साधारण एक किलोमीटर आधी तयारी करावी लागते. यदाकदाचित ब्रेक लावला तर ट्रेनचे डब्बे घसरून मोठा अपघात घडू शकतो.  दुसरी बाब अशी की पटरीची सुरक्षा, राखण हा मुद्दा रेल्वेच्या अखत्यारीत येते. त्या पटरीला कुणी इजा करने,  त्यावर उभे राहने हा अदखलपात्र गुन्हा आहे.  जसा रेल्वेचा अर्थसंकल्प, पोलीस प्रशासन वेगळे असते तसे त्यांचे काही कायदेही वेगळे आहेत. मुळात रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावरील घटना हि रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येते, तेथे रेल्वेचे कडक नियमच लागू पडतात. सदरील उत्सव हा दर वर्षी होत असल्यामुळे तसेच रेल्वेस्टेशनपासून २-३ कि मी अंतरावर असल्यानं रेल्वेनं खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते.

संयोजकाचे जसे गर्दी वाढण्याकडे लक्ष होते तसेच लक्ष त्यांनी सुरक्षेकडे देणे आवश्यक होते. रिकाम्या खुर्च्या येणाऱ्या प्रमुख नेत्याना भाषण संपेपर्यंत टोचत असतात. जशी गर्दी वाढते तसा नेते आणि संयोजकाचा हुरूप वाढतो. हल्ली प्रत्येक गर्दीचा संबंध हा मतदान आणि भविष्यातील निवडणुकीशी जोडलेला असतो. पण त्या धुंदीत सुरक्षेचा विषय पायदळी तुडवला जातो. लोकांच्या जीवाची पर्वा नसते. मग अशाच गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा काल सारख्या घटना घडतात. वाढती गर्दी बघून संयोजकाचे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन गर्दीवर नियंत्रण केले असते तर घटना टळली असती. किंवा गर्दीचा अंदाज बघून हा कार्यक्रम इतर सोयीच्या ठिकाणी घेता आला असता. कारण हजारो वर्षे आधीच मेलेल्या रावणदहनापेक्षा लोकांचे जीव जास्त महत्वाचे होते.

हल्ली प्रत्येकाच्या हातात सेल्फी, शूटिंग वाला कॅमेरा असल्यामुळे कोणत्याही घटनेची शूटिंग करून 'Live' दाखवणे, रेकॉर्डिंग करून फिरवणे असे प्रकार वाढले आहेत. या शूटिंगच्या नादात युवावर्ग वाटेल ते प्रकार करण्यास धजावत असतात. मग चालत्या ट्रेन, बस, मोटारसायकलवर शूटिंग घेणे असले प्रकार घडतात व बऱ्याचदा अपघातही होतात. कालच्या घटनेत काही असेही हौशी असतीलच हे नाकारता येत नाही.

शेवटी, अशा घटनेची चौकशी होतच असते, ती होईलही. पण गरज आहे की अशा घटनेपासून योग्य तो धडा घेऊन अशा घटना भविष्यात भारतातील इतर ठिकाणी घडू नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. या घटनेस जे दोषी आहेत त्यांना 'औपचारिकतेची सजा' न देता अद्दल घडवावी. मुख्य म्हणजे या घटनेस 'विरोधक' सत्तारूढ पक्ष अशा चष्म्यातून न बघता दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी.

या लेखातील सर्व विचार माझे आहेत. वाचकाचे विचार भिन्न असू शकतात. तेंव्हा वादावादी न करता आपले विचार आपण मुक्तपणे ठेवू शकता.

'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]



© काॅपीराईट

-प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

Monday, 8 October 2018

पीसी-एमसीईडीचा स्तुत्य उपक्रम





उद्योजक प्रशिक्षण : पीसी-एमसीईडीचा स्तुत्य उपक्रम

नुकतंच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चिंचवड शाखेतर्फे घेण्यात आलेल्या 'डिजिटल मार्केटिंग' कार्यशाळेच प्रशिक्षण घेऊन मी परत आलो. मार्केटिंग हा प्रत्येक व्यवसाय-उद्योगाचा अविभाज्य भाग. त्यामुळं हा डिजिटल कोर्स शिकून घ्यावा अशी खूप दिवसापासून इच्छा होती. म्हणतात ना 'इच्छा प्रबळ असेल तर सारं घडून येतं.' पीसी-एमसीईडीकडून ही संधी चालून आली.  'शासकीय' असूनही पुढंमागं न पाहता मी ह्या तीन दिवसीय कार्यशाळेचं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्या अनुभवाबद्दल हा लेख.

चेंज इज कॉन्सटन्ट. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. आपल्या सभोवताली अनेक बदल घडताना आपण बघत असतो, त्याचा अनुभव घेत असतो.  आज संगणक व इंटरनेट क्रांतीनं या युगात प्रचंड बदल घडवून आणले आहेत. या बदलासोबत बदलणे प्रत्येकाला क्रमप्राप्त झाले आहे. थोडक्यात बदलाशी वाद न घालता त्याशी समरस होण्यातच सर्वांचं भलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटाचं तिकीट ऑन-लाईन खरेदी न करता पारंपारिक पद्धतीनं रांगेत उभं राहून,  रोख रक्कम देऊनचं तिकिट घ्यायचं ठरवलं तर आपल्या पदरी निराशाच पडेल. कारण हल्ली सर्व सिनेमागृह ऑन-लाईन तिकीट बुकिंगनं  हाऊसफुल्ल होत असतात. आणि यदाकदाचित आपल्याला तिकीट मिळालं तरी पाहिजे तशी आसनव्यवस्था मिळणार नाही.

आणि असंच उदाहरण आपण व्यवसाय-नोकरीतील मार्केटिंगच्या संदर्भात घेऊ शकता.  पूर्वी एखादी वस्तू-सेवेची मार्केटिंग करणं खूप क्लिष्ट, वेळखाऊ आणि खर्चिक काम होतं.  प्रचंड जाहिरात खर्च, मग सेल्स ऑफिसर शेकडो 'कोल्ड कॉल' करून लीड जनरेट करत असत, प्रत्येक्ष फॉल्लोउप होऊन शेवटी व्यवहार. प्रत्येक विक्रीमागे लागणार मनुष्यबळ, कार्यालय खर्च खूप जास्त असे. कंप्युटर आणि इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मार्केटिंगसह इतर क्षेत्रात एक मोठी क्रांतीच घडली. आज जगभरातील खरेदीदार आणि विक्रेता दोन्ही कोणत्यानं कोणत्या मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रीनवर सहज उपलब्ध असल्यानं जास्तीत जास्त  व्यवहार हे ऑन-लाईन घडत आहे.  त्यामुळंच उद्योगात टिकून राहण्यासाठी फक्त पारंपरिक मार्केटिंगवर सर्वस्व अवलंबुन न राहता नव्या 'डिजिटल मार्केटिंग' चे टूल्स शिकून घेणं, त्याचा योजनाबद्द वापर करणे आवश्यक आहे.

'आवश्यकता हि अविष्काराची जननी असते.' थोडक्यात समाजाच्या गरजेनुसारच नवीन वस्तू किंवा सेवा जन्म घेत असतात.  कदाचित त्यामुळंच शासनाच्या  'महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ'  यांच्या चिंचवड शाखेनं उद्योजकासाठी विविध नवनवीन कोर्सेसच प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. ज्यामध्ये आयात-निर्यात, डिजिटल मार्केटिंग, बिजनेस फायनान्स मॅनेजमेंटसह अनेक उद्योगिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण मोजक्या दिवसाचं आणि अत्यन्त माफक शुल्कामध्ये उपलब्ध आहे. एमसीईडी-पिंपरीचिंचवड शाखेचा हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे.  एमसीईडीच्या डिजिटल मार्केटिंगचा प्रशिक्षणार्थी या नात्यानं माझा हा अनुभव आहे.

बदलाच्या या युगात स्वतःस 'अपडेट' केलं नाही तर आपण 'आऊटडेट' होत जातो. जगात सर्व गोष्टी डिजिटल होत असताना फक्त पारंपरिक मार्केटिंग टूल्स वापरणे म्हणजे स्पर्धेतून माघार घेण्यासारखे आहे. तसेच जुनाट शस्त्राला 'धार' लावून घेणं कधीही चांगलं, म्हणून मी 'डिजिटल मार्केटिंग'च प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. या कोर्सचा प्रचार आणि प्रसार पुरेसा न झाल्यान ह्याचं प्रशिक्षण फक्त काही मोठ्या शहरातच उपलब्ध होतं. त्यातच प्रशिक्षणाची अफाट वीस-पंचविस हजार फी, हॉटेलजेवण आणि प्रवासाचा खर्च  सर्वांच्या आवाक्यात नव्हतं. त्यामुळं 'विद्येच माहेरघर' असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी कमी शुल्कात अशा प्रशिक्षनाची सोय उपलब्ध करून एमसीएईडी-पिंपरी चिंचवड शाखेनं महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी खूप मोठं काम केलं आहे.

उद्योगविश्व म्हणजेच खाजगी कंपन्या. घडीच्या काट्यावर, काटेकोर शिस्तीत, चकाचक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नोकरवर्गाचा 'शासकीय' संस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोणच खूप वेगळा असतो. किंबहुना तो नकारात्मक असतो असं सांगायला हरकत नाही. त्यांना बऱ्याच शंकाकुशंका असतात. जसकी शासकीय प्रशिक्षण- मग प्रशिक्षक कसे असतील? तळमळीनं शिकवतील का वरवरचं? खरचं शिकवतील की टाईमपास? पूर्ण शिकवतील का फक्त औपचारिकता! असे नानाविध प्रश्न पडने साहजिक आहे.

पण अनुभवी प्रशिक्षणार्थी म्हणून सांगतो कि शासनपुरस्कृत पीसी-एमसीईडी येथील प्रशिक्षन घेतल्या नंतर आपला शासकीय संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जातो. त्यांच्या संस्थेच्या नावाला साजेसं कामचं पीसी-एमसीईडी आज करत आहे. शासकिय असूनही दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात काहीच उणीवा राहू नये म्हणून एमसीईडी खाजगी क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून देत असते. या केंद्रातील प्रोजेक्ट ऑफिसर सर्व प्रशिक्षणार्थींना इतर उद्योगाची माहिती तसेच शासनाच्या योजनेची माहिती देत असतात. प्रशिक्षणार्थी उद्योजकांना ते आस्थेने, तळमळीने शिकवून त्यांना उद्योगनिर्मितीस प्रोत्साहित करत असतात. उद्योग हा देशाचा आर्थिक कणा आहे. देशाच्या औद्योगिक प्रगतिच देशाची पत, जीडीपी वाढवत असते. त्यामुळंच जीडीपीला महत्व आहे. त्यामुळं गरज आहे की सर्व एमसीईडी सारख्या इतर शासकीय संस्थेने शासनाचं उद्योग विकासाच धोरण राबवताना फक्त ते औपचारिकता न ठेवता इमानेइतबारे राबविले पाहिजे जेणेकरून पुढं अनेक उद्योजक घडून देशाची पत वाढेल आणि देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लागेल.

प्रशिक्षण कालावधीत एमसीईडीनं चहा, भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.  आमच्या या प्रशिक्षण प्रवासात उत्तम 'हमसफर' सहप्रशिक्षणार्थी लाभले त्यामुळं प्रवासाचा शीण जाणवला नाही, त्यांचे मनपूर्वक आभार. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात ही छोटी पण ज्ञानाने मोठी कार्यशाळा संपन्न झाली. त्यासाठी मी आभार मानतो एमसीईडी-पिंपरी चिंचवड शाखेच्या प्रोजेक्ट ऑफिसर श्री श्रीकांत कुलकर्णी सरांचे, ज्यांनी आम्हाला उद्योगासंदर्भी अत्यंत तळमळीनं बहुमूल्य मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित केलं. मी आभार मानतो आमचे प्रशिक्षक श्री श्रीकांत लांबोले सर, एक्सपर्ट फॅकल्टी श्री अभिजित धेंडे सरांचे. श्री युवराज लांबोले सरांनी चांगलं मोटिवेट केलं, त्यांचेही आभार.  पीसी-एमसीईडी संस्थेच्या इतर सर्व कर्मचारी वर्ग जे या उपक्रमाशी प्रत्येक्ष-अप्रत्येक्षपणे जुळलेले आहेत त्यांचे आभार.  पीसी-एमसीईडीच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा.


 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com

Monday, 1 October 2018





डिजीटल युगात वावरताना
         

आज विज्ञान तसेच संगणक क्षेत्रातील तज्ञ आणि जानकार एक मतानं सांगतात कि या शतकात ज्या गतीनं बदल घडतं आहेत ते मागील शतकाच्या किती तरी पटिनं जास्त आहेत. थोडक्यात या बदलाची गति अफाट आहे आणि ती पुढं वाढतचं जाणार हे आपण बघतचं आहोत. विज्ञानातील प्रत्येक अविष्कार समाज आणि जगात बदल घडवत असतो आणि मानवीजीवन सूकर होण्यास त्याची मदतही होत असते. पण सिलिकॉन टेक्नोलॉजी आणि त्यानंतर गतिने वाढलेल्या माइक्रोटेक्नोलॉजीमुळे जगात जी प्रगति झाली त्याची तुलना करने कठिन आहे. जागतिकीकरण आणि त्या सोबतच आलेल्या कम्प्यूटर, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानामुळे दैनन्दिन जीवनात झालेला आमूलाग्र बदलाचा अनुभव आपण घेतच आहोत.

एक काळ होता की उद्योग म्हंटले की कितीतरी एकर जमिनीवर उभी मोठी फैक्ट्री, त्यात काम करणारी अवजड मशीन, त्यावर अहोरात्र झटनारे विविध विभागाचे हजारो कामगार आणि त्यांचे व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक,  प्रोडक्शन, क्वालिटी कण्ट्रोल, रिसर्च, लॉजिस्टिक्स, वितरण आणि डीलर असा मोठा पसरा असायचा. हा सर्व पसारा सांभाळुण करोड़ोची उलाढाल करनाऱ्या उद्योजकांची गणतीचं मोठे उद्योगपति म्हणून व्हायची. मग
अशा उद्योजगाचं ऑफिस म्हंटलं की उच्चव्यवस्थपाकाची केबिन, केबिन बाहेर कितीतरी सहकर्मचाऱ्यांचे टेबल, टेबलवर तुंबलेले फायलीचे गठ्ठे, त्या फायली सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक टेबलजवळ एक गोदरेजचं मोठं कपाट, फाईल सुरक्षित ठेवण्यासाठी खास स्टोररूम आणि इकडचे पेपर तिकडे फिरवणारा सेवकवर्ग. ऑफिस म्हंटलं तर विविध विभागाचा अंतर्गत आणि बाहेर जगाशी होणारा  पत्रव्यवहार आलाच. हा पत्रव्यवहार लिखित स्वरूचा असल्यानं दिवसभर टाइपरायटरचा खड़खड़ात चालायचा, त्यामुळे दिवसन दिवस पेपर आणि फाइलचे मोठ्मोठे गठ्ठे वाढत जायचे. जो पर्यन्त जागतिकिकरन होवून परदेशी कंपन्यानी आपले पाय देशात रोवले नव्हते तो पर्यन्त आपला कारभार हा ब्रिटिश कंपन्याच्या धरतीवर एका साचेबद्ध पध्दतीनेच चालू होता.  मग अशा पारंपरिक उद्योगात नोकरी मिळवण्यासाठी एक महाविद्यालयीन पदवी पुरेशी असायची. त्यांमुळे सर्व दारोमदार हे शाळा-महाविद्यालयात घेतलेलं शिक्षण म्हणजेच 'हार्डस्किल' वर असायची. थोडक्यात ज्याचं हार्डस्किल आणि त्या संबंधित क्षेत्राचं अनुभव चांगला तो 'नोकरीयोग्य' असे समीकरण असायचे.  त्याकाळी शिक्षणाचा दर्जाही चांगला असल्यामुळे चांगले 'नोकरीयोग्य' मनुष्यबळ सहज उपलब्ध असायचं.

१९९१ नन्तर सरकारनं परदेशी कंपन्यासाठी देशाची दारं उघडली आणि चित्रचं पालटलं. परदेशी उत्पादक कंपन्या, सेवा देणाऱ्या बँका, इंस्युरन्स, सारख्या विविध क्षेत्रातील कंपन्यानि भारतात पाय रोवायला सुरुवात केली. ह्या परदेशी कंपन्याची काम करण्याची भाषा, पद्धत आणि शैली वेगळी असल्यामुळे त्यांच्याशी जुळवून  घेण्यासाठी आपल्या भारतीय कर्मचाऱ्याना स्वतःत बदल करनं अनिवार्य झालं.  संवाद, संभाषण आणि पत्रव्यवहारासाठी इंग्रजी भाषा हा एकच पर्याय होता त्यामुळे इंग्लिश भाषेचे महत्व वाढने साहजिक होते. त्यातच सगळीकड़े संगनकीकरण, वाढते ग्राहकहक्क कायदे यामुळे सेवातत्परतेचे महत्व खुप वाढलं. थोडक्यात सर्वच क्षेत्रात कंप्यूटर, इंटरनेट आणि करियर उपयोगी सॉफ्टस्किलचं ज्ञान अत्यावश्यक झालं. त्यामुळेच 'सॉफ्टस्किल' ही नवीन संकल्पंना पुढे आली.

आज मोठ्या उद्योगांचे ऑफिस असो कि एखादी बैंक, संगणकीकरन व इंटरनेटमुळ त्यामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आज ऑफिससाठी खुप मोठ्या जागेची गरज राहिली नाही. मोठ्या ऑफिसचे रूपांतर एका संगणकीकृत छोट्याशा जागेमधे झालं आहे. सर्वच पत्रव्यवहार हे पेपरलेस झाल्यामुळे टाइपरायटर हा प्रकार हद्दपार होवून त्याची जागा कम्प्यूटर, लॅपटॉपनं घेतली आहे.  फायलीचे हजारो गठ्ठे, गोदरेजचे भरगच्च कपाट आणि स्टोररूमची जागा एका छोट्याशा आटोपशीर सर्वरने घेतली आहे.  वायरलेस लोकल एरिया नेटवर्क आणि इंटरनेटमुळे खाजगी तसेच शासकीय कार्यालय आज 'पेपरलेस' झाले आहेत. नेटमुळं क्षणात पाहिजे तो पेपर आपण देश-परदेशात पाठवू शकतो. त्यामुळं कामाची गती वाढून सेवक आणि टपाल-कोरियरचा खर्च कमी झाला आहे. आज इंटरनेटमुळे सर्व माहितीचे आदानप्रदान सोपे होवून जगाला एका खेड्याचे स्वरूप आले आहे.  सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल व कैशलेस होत असल्यामुळे आज बँकेत रांगा कमी झाल्या आहेत. करंसी नोट प्लास्टिक मनी होवून आज डिजिटल झाली, हा सर्व बदल काही वर्षात घडला. या बदलत्या युगात सर्व उद्योगांनी आपले कामाचे स्वरूप बदलले आणि ज्यानी प्रवाहनुरूप बदल केला नाही त्यांना त्याची किमत मोजावी लागली. उदाहरण घ्यायच असल्यास कॅमेराफिल्म जगातील कोडेक ही मोठी कंपनी जी ८०% फोटोपेपर विकायची काळानुरूप त्यांनी बदल केला नाही आणि मागे राहिली. आपल्याकडे सुद्धा एचएमटी, अम्बेसेडर कार अशा काही कंपन्या आहेत ज्या मागे राहिल्या. सेवाक्षेत्रातही ज्या कंपन्यानि बदल अवलंबिला नाही ते कालबाह्य झाल्या आणि बंद पडल्या.

कंप्यूटर आणि सॉफ्टवेअरमुळे उद्योगाचे स्वरूपही बदलले आहे. आज दोन उच्चशिक्षित तरुण २००० फुट ऑफिसमधे कंप्यूटर आणि सॉफ्टवेयरद्वारे करोडोची उलाढाल करत असल्याचे आपण बघत आहोत. उदाहरण द्यायच असल्यास उबेर ही टैक्सी कंपनी मुळात फक्त एक सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांच्याकड़े स्वतःच्या कार नाहीत पण उलढाल मात्र करोडोमधे आहे. ट्रीवॅगो अशीच एक हॉटेल कंपनी ज्यांची स्वतःची हॉटेल्स नाहीत. बुक माय शो, फ़ूडपांडा, ट्रैवेगों, बुकमायट्रिप, पेटीएम, ओला ह्या काही सॉफ्टवेयर कंपन्या आहेत ज्या विविध क्षेत्रात सॉफ्टवेयरद्वारे काम करून करोड़ो रूपयाच्या उलाढाली करत उद्योगक्षेत्रात नावही कमवत आहेत.

आज सर्वच दैनंदिन व्यवहार मोबाईलवर होत असल्यानं कुठंही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. दिवसभराचे सर्व उद्योग आज आपण काही मिनिटात कंप्यूटर आणि इंटरनेटवर घरी बसून करु शकतो. त्यमुळे वेळ आणि पैसे अशी दोहेरी बचत होते.  मग ते बस, रेल्वे, विमान किंवा सिनेमाचे टिकिट  असो कि एखाद्या दूर ठिकानावरील हॉटेलचे बुकिंग.  त्यासाठी रांगेत उभे राहण्याची किंवा प्रत्येक्ष तेथे जाण्याची गरज राहिली नाही.  एव्हड़च नव्हे तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तुची खरेदीविक्रिचे व्यवहारही एका क्लिकवर सध्या शक्य झाले आहे. विविध वेबसाईटवर आपण पाहिजे ती वस्तू मग ती भाजी असो कि महागड़ी कार खरेदी किंवा विक्री करु शकतो. एव्हडेच नाही तर इन्शुरन्स, लोनहप्ता, गैस-नळाच बिल, शाळेची फी आणि सर्व आर्थिक व्यवहार आपण कंप्यूटरवर सहज करु शकतो ज्यामुळे पैसा आणि वेळेची भरपूर बचत होत आहे. आज पैशाची योग्य गुंतवनुक करून मुबलक नफा मिळविण्यासाठी म्यूच्यूअल फंड, बॉन्ड, शेअर-कमोडिटी इत्यादि पर्याय उपलब्ध आहेत ते व्यवहार आपण घरी बसुन करु शकतो. चोरी न जाणारे सोने आपन नॉन-फिजिकल स्वरुपात ऑनलाइन खरेदी करु शकतो. तसेच विविध प्रकारचे कर जशेकी मालमत्ता कर, नळपट्टी, आयकर, जीएसटी इत्यादि आपण ऑनलाइन भरु शकतो.
     
आज स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांची संख्या ही जवळजवळ आपल्या देशाच्या लोकसंख्येएव्हडीच आहे. स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेऊन जाहिरात आणि मार्केटिंगमध्ये बदल घडणं सहाजिक आहे. सर्वच 'टार्गेट ऑडियन्स' कायम कोणत्यान कोणत्या स्क्रीनवर उपलब्ध असल्यानं त्यावर आपल्या उद्योग-सेवेची जाहिरात करणं सर्व उद्योजकाना क्रमप्राप्त झालं आहे.  त्यामुळंच 'डिजिटल मार्केटिंग' हि संकल्पना पुढं आली आहे.  पूर्वीप्रमाणे झोनल मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ब्रँच मॅनेजर, सेल्स ऑफिसर हि पद आज इतिहास जमा होतं आहेत. त्याची जागा आता डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, कंटेंट मार्केटिंग मॅनेजर, सोशल नेडॆ मॅनेजर, सर्च इंजिन मॅनेजर, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमायजर  अशी नवनवीन पद घेत आहेत.

आज सर्व शासकीय कामाचे संगनकीकरन आणि ऑनलाईन झाल्यामुळे आधारकार्ड, पैनकार्ड, मतदारकार्ड, ड्राइविंग लाइसेंस एव्हड़च नाही तर पासपोर्टसुद्धा आपण प्रत्येक्ष त्या कार्यालयात न जाता ऑनलाईन मिळवू शकतो. त्यामुळे कामाची गति वाढून लालफितीचा होणारा मनस्त्ताप ही कमी होत आहे.

आज शिक्षणक्षेत्रातही चॉक,बोर्ड आणि टॉक ही संकल्पना हळूहळू आउटडेट होत आहे आणि त्याची जागा इ-लर्निंगने घेत आहे. आज देशात डिजिटल स्कुलचे वारे वाहत आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयात कंप्यूटरयुक्त क्लासरूम, प्रोजेक्टर, वाय-फ़ाय आवश्यक झाले आहेत. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारीवृंद यांना कंप्यूटरचे पुरेसे ज्ञान आवश्यक झाले आहे.  देश-परदेशातील सर्व उच्चशिक्षण संस्था जसेकी आयआयएम्, आयआयटी, एनआयटी आणि इतर संस्थानी आपले इ-लर्निंग, व्हर्चुअल क्लासरूम सेशन व्यवस्था सुरु केली आहेत. त्यामुळे आज आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या उच्चशिक्षित अनुभवी अध्यापकाचे लेकचरस् आपण शक्य तिथे ऑनलाइन ऐकू शकतो आणि त्यांचे प्रमाणपत्रही मिळण्याची सोय आहे. त्यामुळे कमी खर्चात उच्चशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

एक गोष्ट सर्वाना मान्य करावीच लागेल ज्या गतिने हे बदल होत आहे त्या बरोबर आपणही 'अपडेट' होनं आवश्यक झालं आहे नाहीतर आपण 'आउटडेट' होण्याची संभावना आहे. टाइपरायटरची जागा इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर नन्तर  कम्प्यूटर आणि आज मोबाइलने घेतली आहे. करंसी नोटची जागा आधी प्लास्टिक कार्डने आणि आता डिजिटल ट्रांझकशनने घेतली. पुढील काही दिवसात रस्त्यावर आपल्याला फक्त इलेक्ट्रिक कार व ट्रक बघायला मिळतील आणि काही वर्षांनंतर त्या चालकरहित होतील!

आज अस कोणतच खाजगी किंवा सरकारी क्षेत्र उरल नाही जे कंप्यूटराईज्ड झाल नाही. उलट काही क्षेत्रात कंप्यूटर मनुष्यज्ञान शक्तिच्या पुढे निघत आहेत आणि हे मनुष्यजातीस एक आवाहन ठरणार आहे. तात्प्रर्य, आज गरज आहे कि प्रत्येक युवकानी हे बदल लक्षात घेवून फक्त पारंपारिक पद्व्याच ज्ञान न घेता काही कॉम्प्यूटर कौशल्य शिकुन सहज रोजगार मिळवन्याचा प्रयत्न करावा. आज घडिला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे आज कितीतरी असे  नोकरीसाठी उपयुक्त कोर्सेस आहेत जसेकी ऑटोकड, टैली, डीटीपी, वेब-डिजाईनसारखे कौशल्य शिकून युवक सहज शिकता शिकता पैसे कमावू शकतात.  याशिवाय युवकानी इंटरनेटच्या इतर सॉफ्टस्किल्स शिकुन अस्खलित इंग्रजीमधे संभाषण कस करता येईल यावरसुद्धा भर द्यावा.   आपण घेत असलेली पदवी खरोखरच कुणाच्या कामी येईल का याचाही विचार व्हावा. जास्त पद्व्या म्हणजे मोठी नोकरी हा गैरसमज दूर करून अनावश्यक शिक्षणात वेळ वाया घालु नये. कारण आज महाविद्यालयात घेतलेले ज्ञान म्हणजे 'हार्डस्किल' वर व्यवहारिक 'सॉफ्टस्किल' भारी पड़त आहे. आज असे कितीतरी उद्योजक आपल्याला भेटतील ज्यानी आपल्या सॉफ्टस्किलच्या जोरावर यशाच उंच शिखर गाठल आहे. एका सर्वेनुसार नोकरी आणि उद्योगधन्द्यात फक्त २०% कामच हार्डस्किल करते बाकी ८०% सॉफ्टस्किलने होत असतात. सॉफ्टस्किलमुळे हार्डस्किलला एक प्रकारची चकाकी मिळते.

हल्ली दहावी किंवा बारावीत शिकत असतानाच विद्यार्थी आपले करियर निश्चित करतात. यात वावग काहीच नाही. पण करियर निवडताना त्यानी हेही लक्षात ठेवावे कि त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात मग ते वैद्यकीय, इंजिनियरिंग असो की अकाउंट, व्यवस्थापन त्यात उंच शिखर गाठण्यासाठी त्यांना इंग्रजी, संभाषण व देहबोली, नेतृत्वगुण, कंप्यूटर आणि इंटरनेटच पुरेस ज्ञान, व्यवहार चातुर्य, आत्मविश्वास, विवेकशिलता, मोरल एथिकल वैल्यू, टीम स्पिरिट अशा काही सॉफ्टस्किलवरसुद्धा भर द्यावा लागेल तरच ते जीवनात यशस्वी होऊ शकतील.


 'चतुर्थ स्थंब ब्लॉग' वर आपण इतरही लेख वाचू शकता.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
(लेखक औरंगाबाद येथील एस्पी अकॅडमी या संस्थेचे संचालक तसेच करियर मार्गदर्शक आहेत. हा लेख नावासह शेअर करावयास हरकत नाही.]