जत्रा जशी आठवते - भाग २
'मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर'. कालानुरूपे काही गोष्टी विस्मरणात जायला हव्या. मेंदूची सुद्धा काही क्षमता असते ना! तसा भूतकाळात मन रमवून आणि भविष्याची चिंता करून वर्तमानात काहीच साध्य होणार नसतं. पण काळाच्या ओघात आपण किती जरी पुढे गेलो तरी बालपणीच्या काही आठवणी एखाद्या शिल्पावर कोरून ठेवाव्यात तशा त्या मनात घर करून बसलेल्या असतात.
आपला पिच्छा त्या सोडत नाही. तूम्ही कुठून आलात, कशे होता अशा विविध प्रश्नाचं कल्लोळ उठतं, खूप काही आठवतं आणि लिहावंसं वाटतं.
जत्रेच्या पहिल्या दिवसाच महत्व आमच्यासाठी 'नवस आणि थोडं मटनाचं मांसाहारी जेवण' या पलीकडे विशेष काही नव्हतं. घरातील अध्यात्मिक वातावरणामुळे ते सुद्धा अगदी लपूनछपून करावं लागायचं. ज्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून उत्सुक असायचो ती खरी जत्रा दुसऱ्या दिवशापासून सुरु व्हायची.
दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी नसायची. शाळेच्या खोल्या कमी म्हणून शिक्षक शाळेच्या मैदानात, कोवळ्या उन्हात गोल रिंगणातं बसून आमचे वर्ग घ्यायचे. नितनवरे गुरुजी, मस्के गुरुजी, डोके गुरुजी सारखी शिक्षक मंडळी जीव तोडून शिकवायचे पण त्या दिवशी आमचं मन लागत नसे. गावाच्या उत्तरेला गांगुचा माळ', त्या माळावरून जत्रेच्या व्यापाऱ्याच्या गाड्या धडधड करत आमच्या जवळून वाघामायकडे वळायच्या. आमची जत्रा त्यात खचून भरलेली असायची. मग वर्गातील मुलं त्याची जोरात चर्चा करायची. डोके गुरुजी हसरा चेहरा करत यायचे आणि पाठीमागे धपकन एक धपाटा मारून निघून जायचे. संपूर्ण लक्ष आता शाळा सुटण्यावर असायचं.
मग अचानक आमचे 'दयाळु' गुरुजी दुपारची सुट्टी 'डिक्लेअर' करायचे. झालं, शाळेच दप्तर एखाद्या कोपऱ्यात फेकून आम्ही जत्रेकडे धूम ठोकायचो. जत्रेचे काही दुकानदार आपली दुकान लावण्यासाठी खड्डे करण्यात गुंतलेले असायचे. काही थकलेले व्यापारी चुलीवर स्वयंपाक करून पोटापाण्याची व्यवस्था करायचे. आकाशपाळनेवाला सुद्धा पाळणा उभा करण्याची खड्डे खोदून तयारी करत असलेला दिसायचा. डोक्यावर दोन्ही हात ठेवून आम्ही त्यांची तयारी बघत बसायचो. हि इतंभूत माहिती आम्ही गावात सर्वांना सांगत बसायचो. तिसऱ्या दिवशी मात्र जत्रा 'फुल्ल फॉर्म' मध्ये यायची. सर्व दुकानदार नियोजित जागी आपले शेड-कणाद ठोकून एखाद्या शेठ सारखे मळकट जॅकेट घालून आरामात बसलेले दिसायचे. विशेष म्हणजे त्यांच्या जागा दरवर्षी फिक्स असायच्या. आकाशपाळणा, घोड्याचा गोलचक्री पाळणा सर्व तयारीत असायचे. मग आमच्यासारखे काही बहाद्दर सकाळी झोपेतून उठून, तोंड न धुता, घरी कोणाला न कळता धावत एक चक्कर मारून यायचे.
आता गावात जत्रेची लगबग सुरु व्हायची. मग काय, जमा केलेली १०,२० आणि एखादी ५० पैशाची नाणी खिशात घेत आम्ही जत्रेचा आनंद घेण्यासाठी निघायचो. वाटेत परत येणारे मुलं चेंडू उडवत, भवरे फिरवत, डोळ्याला प्लास्टिकचा चष्मा लावून फुगा-कम-पुंगीचा पौंsss आवाज काढत, बासरी फुकट परत यायची. कुणाच्या हातात ऊस, फुटाणे तर कुणाच्या हातात डमनी. आमच्या वेळेस 'डमनी' हा प्रकार खूपच फेमस होता. बूटपॉलिशच्या डब्बीची दोन चाक, वर पत्र्याची डमनी आणि ओढायला एक लांब काडी. बस, ती डमनी ओढत मुलं घरी यायची.
सैलानीपासूनच जत्रेचा गोंगाट ऐकू यायचा तशी आमची पावलं जोरात पडायची. आकाश पाळणे फिरण्याचा सतत क्वायं क्वायं आवाज, बासरी विकणाऱ्याचा मधुर गाण्याचा आवाज, फुगेवाल्या पुंग्याचा आवाज, 'माय मल चेंडू, मल चष्मा दे' असं मायच्या पदराला पकडून रडणाऱ्या लेकराचा आवाज. ' याडी मन बुगडा दरा द' 'तोन आबच पिसा दिनीती, कांई किदो, अब पिसा छेयी?' मध्येच गरम गरम भजेवाल्याचा आवाज आणि एव्हड काय कमी की अचानक भोंग्याचा आवाज ,' आता आलेली जोडी ७ सेकंड ३ पॉईंट, पावती घेऊन येणे!' सर्वत्र गोंगाट.
खरेदीची उत्सुकता तात्पुरती बाजूला ठेवून थोड्या गडबडीने आम्ही 'वाघामाय' च्या पाया पडायचो. देवळाजवळच 'संतोष आणि फुटनेवाली मावशी' फुटाणे, लेवड्या विकत बसायचे. 'फुटाणे' म्हणजे थोड्या पैशात जास्त वेळ आनंद! दोन दोन फुटाणे खात आम्ही जत्रेत फिरत असू. आमची आवडती दुकानं म्हणजे कटलरी. चेंडू, पुंगी, चष्मा, प्लास्टिकच्या छोट्या जीप, ट्रक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्मी टाकून बघायचे सिनेमे. या सर्व वस्तू २५ पैसे ते १ रुपयाच्या रेंजमध्ये असायच्या. खिशात पैसे नसले की हल्ली मॉल मध्ये करतो तशी 'ये कित्तेकू हय, वो कित्तेकू है' अशी फुकटी 'विंडो शॉपिंग' करायचो. पण कोणाच्या खिशात पैसे आहेत ते त्या जॅकेट घातलेल्या वैफल्यग्रस्त दुकानदाराला आधीच माहित असायचं. मग सर्व फिरून एखादा चेंडू आणि प्लास्टिकचा चष्मा घ्यायचो. त्या चष्म्यातून सर्व जत्रा रंगीतमय वाटायची, भन्नाट मज्जा यायची. ती चार-पाच दुकान पुढेमागे फिरत आम्ही बाहेर निघायचो. बाजूच्या हाटेलित पाणी प्यायचो. त्यावेळेस बिस्लरी हा प्रकार नव्हता त्यामुळे इन्फेक्शन काय हे आम्हाला माहित नव्हतं. हॉटेलिसमोर मोठ्या कढईत मळकट बनियन घालून आचारी भजे-जिलेबी तळत बसायचा. पाणी पिऊन आम्ही खदाणीतूंन पडलेल्या रस्त्याने मेनरोडवर यायचो. मध्येच कुठे शाळेचे गुरुजी दिसायचे, आम्ही कट् मारून दूर पळून जायचो. रोडवर ऊसवाला 'साटा' विकत उभा असायचा. त्याचा तो पांढरा मिशावाला चेहरा कधीच बदलला नाही. ज्यांना घरी जायचं ते 'मांदा, ५० पिसार साटा द' ऊस घेऊन सुसू करून त्याचा रस पीत पीत घरी जायचे. उसाच्या गाडीच्या बाजूला एक सिनेमावाला आपला 'दिल्लीला कुतूबमिनार देखो, आग्राका ताजमहल देखो. . . ..' असं म्हणत उभा असायचा. मग १० पैसे देऊन तो आम्हाला ताजमहल, कुतुबमिनार, इंडिया गेट अशी ठिकाण फिरवून आणायचा. वर त्याची धपधप अशी बॅकग्राऊंड 'म्युसिक' चाललेली असायची. खाली गुढघ्यावर बसून त्या चार गोल खिडकीतून आम्ही सिनेमे पाहायचो. चार आने दिले तर दोन जण सिनेमे बघायचे. मग त्याच्याकडे पाच पैसे चिल्लर नसायची म्हणून पाच पैशात एक जण पुन्हा सिनेमा बघायचा. मोठा डिस्काऊंट मिळाल्याचा आनंद व्हायचा. कधी कधी झटपट पैसे कमविण्यासाठी जत्रेत चक्री यायची, लालची लोकांचे खिसे त्यामुळे पटकन खाली व्हायचे. बाजूलाच लाल-पिवळ्या गारीगर विकणारा 'गारीगरवाले, गारीगरवाले' म्हणत थंडगार गारीगर विकायचा. खिशात चेंडू, डोळ्यावर पन्नास पैशाचा रंगीन चष्मा, पाच पैशाची गारीगर चोखत स्वर्गानन्द मिळायचा. तेथून पुढे आकाशपाळने क्वांयन, क्वांयन आवाज काढून नुसते गोंगाट करायचे. गळ्याला बांधलेली दस्ती, एक टांगती पर्स आणि दोन्ही बाह्या एकदम वर केलेला तो आकाशपाळनेवाळा दोन्ही हातानी तो पाळणा गरगर फिरवायचा. कधी कधी पाळन्याचे चारही झोके फुल्ल भरत नसत म्हणून पाळणा संतुलित करण्यासाठी तो एखाद्या मुलाला फुकटात बसवायचा. हा 'योग' आपल्या नशिबात यावा म्हणून बरीच मुलं त्या पाळण्याजवळ प्रतीक्षेत ताटकळत उभी रहायची. आकाशपाळण्यात बसलेली मंडळी खाली दस्ती फेकायची, मग ती उचलायची, ओरडाओरड करायची, शिट्या मारायची, भन्नाट मजा यायची. आता बारी घोड्याच्या चक्रीची. मुद्दाम जवळजवळच्या घोड्यावर बसून आम्ही गरगर फिरत असू, एक दुसऱ्याच्या हाताला हात मारत काही सेकंदात तोही चक्र थांबायचं. घोड्याच्या चक्रीच्या पलीकडे भांड्याची दुकान असायची. दुरूनच तांबे-पितळेच्या भांड्याची उन्हात चमकणारी उतरंड दिसायची. गावातील आया-माया आपल्या मुलींसाठी भांडी विकत घ्यायच्या. भांड्यावर नाव टाकण्याचा टँगटँग आवाज दूर पर्यन्त यायचा. तिकडं कुणीही मुलं फिरकायची नाही. ती भांडी आमच्या काय कामाची? अशी मजा लुटताना मध्येच,'आता आलेली जोडी ६ सेकंड ३ पॉईंट, पावती घेऊन येणे' असा भोंग्याचा आवाज यायचा. मग धसकट-माती तुडवत आमची पावलं शंकरपटा कडे पडायची.
ज्या प्राण्याकडून काम करून घ्यायचं, त्याच प्राण्यांचा थोडा मनोरंजनासाठीसुद्धा उपयोग करायचा, हि जुनीच परंपरा आहे. अशी प्राण्याची शर्यत सर्व जगात घडत असते फक्त स्वरूप वेगळं असतं. गावातील सर्व हौशी शेतकरी मंडळी आपल्या आवडत्या जोडीसह हजर रहायची. प्रेक्षक मंडळीच पूर्ण लक्ष त्या जोरात धावत येणाऱ्या जोडीकडं असायचं. जोडी हाकणारा जिव तोडून, दोन्ही हातानी चापटा मारत, शेपूट मुरगाळत जोडी हाकायचा. क्वचीत ओढाताण करत ती नामचीन जोडी फरार व्हायची, मग,' आता आलेली जोडी फरार!' झालं, मग त्या गड्याला खूप राग येऊन तो गोर्ह्याला बदबद बदडायचा. कारण भर स्पर्धेत त्याच्या इज्जतीचा पंचनामा व्हायचा. मग अशात एखाद्या उमद्या जोडीची चर्चा चालायची. काही जाणकार ' त्याची लय सोय हय हो, पहिला इनाम हीच जोडी हाणनार' असं बिडया फुकत, पानतंबाकू चघळत लोकं चर्चा करायची. विशेष म्हणजे हा लाऊडस्पीकर घडीवाले केळकर साहेब अनेक वर्षे सारखेच दिसायचे. वयाचा त्याच्यावर काही परीणाम झालेला दिसत नसे. खाकी हाफपेंट, पांढरा बाह्याची घडी केलेले उत्तम शरीरयष्टी असलेले केळकर सदैव हसतमुख दिसत. आता वाटते ते कदाचित आरएसएस चे साधक असावे.
बऱ्याचदा शर्यतीत वाद निर्माण व्हायचे मग ते निसतारण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी टेबल-खुर्च्या टाकून बसायची. जोडीने दोरा तोडल्या क्षणी त्या घडीचा काटा गर्रकन फिरायचा. केळकर भिंग घेऊन 'रिडींग' बघायचे आणि मग माईकमध्ये 'आता आलेली.........., ' केळकरचा अर्धा वेळ गावकऱ्यांना मागे सारण्यात जायचा. त्यात एखादा 'फुल्ल रिचार्जड' असला तर त्याची विशेष 'कॉमेंट्री' चालायची मग त्यातही थोडी मजा यायची.
तर अशा जत्रेत दिवसातून आमच्या २- ३ चकरा व्हायच्या. फक्त जेवणासाठी आम्ही घरी यायचो. तीन दिवस भरपूर मजा यायची. जत्रेत खरेदी केलेल्या वस्तूची 'व्हॅलेडीटी' जास्तीत जास्त आठवडाभर असायची. आजच्या चायनीज वस्तूप्रमाणे. काही वस्तू दोन दिवसातच तुटून जायच्या. उंच उंच उसळणारा चेंडू अचानक फाटून निकामी व्हायचा. त्या सोबत आमची हवा निघून जायची. सिनेम्यासोबत छोटछोट्या फिल्म यायच्या. त्या टाकून बघून, मनसोक्त आनंद मिळायचा.
पाचव्या दिवशी कुस्तीचे सामने व्हायचे. हा जत्रेचा शेवटचा खेळ असायचा. आम्हाला त्यात खास अशी मजा येत नसे. आम्ही आमच्या जत्रेत गुंग असायचो. जत्रेचे व्यापारी जत्रा गुंडाळण्यात व्येस्त असायचे. त्यांचं बिऱ्हाड पेडगावहून हलून दुसऱ्या जत्रेसाठी जण्याची ते तयारी करायचे. अशा प्रकारे पाच दिवसाची धुमधाम यात्रा संपायची आणि व्यापारी गाठोडं बांधून निघून जायचे. पाच दिवसात पाऊलांना रोज तीन वेळेस जत्रेकडे जायची सवयच पडुन जायची. त्यामुळे सहाव्या दिवशी सकाळी काही गावातील पोरं जत्रेच्या ठिकाणी जायची, जत्रा उठलेली असायची पण पोरं तेथे वनवन फिरून हाताला काही लागतं का ते बघायची. चार दिवस दणदणाट वाटणारी हीच ती जागा होती का? यावर विश्वास् होत नसे. एका हुरहूर शिवाय काहीच हाती लागत नसे. आठवणी मागे ठेवून जत्रा निघून जायची, पूर्ण एका वर्षासाठी !
©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
९८२२१०८७७५


